गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 41

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी –  राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 29 : ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे ऊर्जा विभागातर्फे २८ एप्रिल ते १२ मे, २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाड्याच्या तयारीचा आढावा घेताना राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महावितरणचे उपसचिव नारायण कराड, सह सचिव उद्धव डोईफोडे, मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील, महावितरणचे संचालक अरविंद बाधिकर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि विद्युत निरीक्षक दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सेवा पंधरवड्याची शपथ  विभागाच्या प्रत्येक कार्यालयात घेण्यात यावी. पंधरवड्याच्या निमित्ताने ऊर्जा विभागाच्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सोयीसुविधांनी सुसज्ज करावे, जेणेकरून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. तसेच नागरिकांच्या तक्रारी  वेळेत सोडवण्याची कार्यपद्धती अधिक प्रभावी करावी, असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 29 : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर नेता येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंचे संवर्धन व विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक अमोल गोटे व दुरदृश्य प्रणालीद्वारे परभणी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात असलेल्या सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावे. चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावे. तसेच धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा भूसंपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी केली.

0000

मोहिनी राणे/ससं/

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. 29 : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेअंतर्गत 5% थेट निधी पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशासाठी पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा 5% थेट निधीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, राज्यपेसा संचालक शेखर सावंत तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले, पेसा कायदा 24 डिसेंबर 1996 अस्तित्वात आला आणि महाराष्ट्र राज्याचे यासंदर्भातील नियम 2014 साली लागू करण्यात आले. विभागाच्या एकूण आदिवासी घटक योजना निधीपैकी ५% निधी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना दिला जातो. आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी नागरिकांमध्ये त्यांच्या हक्क आणि जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती होणे आवश्यक असून ग्रामपंचायत स्तरावरील पेसा समित्यांची पुनर्रचना करावी असे त्यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.

या बैठकीत पेसा कायदा 1996 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पेसा नियमांची अंमलबजावणी, तसेच पेसा 5% थेट निधी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणी प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

‘आयआयसीटी’ व शिक्षणाच्या क्षेत्रात युट्यूबने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 29 : भारतात ‘क्रिएटिव्हिटी’ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर ‘क्रिएटिव्हिटी’  असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॉटेल ताज एंड, वांद्रे येथे युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मुंबईमधील क्रिएटिव्ह इकॉनॉमी, मुंबईमध्ये होणारी ‘वेव्हज’ समिट,  मुंबई ,महाराष्ट्र व देशात यूट्यूबचे फॉलोअर, युट्यूबचा विस्तार,  शिक्षण आणि अन्य क्षेत्रात होणारा उपयोग यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव श्रीकर परदेशी,  विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

चर्चेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी युट्यूब  हे चांगले माध्यम होऊ शकते.  शैक्षणिक साहित्य विविध क्रिएटिव्हिटी वापरून युट्यूबवर टाकल्यास विद्यार्थी आवडीने पाहत त्याचे आकलन करतात.  क्रिएटरच्या माध्यमातूनही असे शैक्षणिक साहित्य युट्यूबवर टाकल्यास त्यांच्या शिकवण्याची पद्धत ही त्यांना आवडून विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यांचे विषय समजू शकतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बद्दल युट्यूबमुळे होऊ शकतात. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात युट्युबने शासनास सहकार्य करावे.

मुंबईमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये युट्युबने शासनासोबत काम करावे. संस्थेची रचना, अभ्यासक्रम, तसेच भविष्यातील क्रिएटिव्हिटीचे क्षेत्र निवडून त्यावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शॉर्ट टर्म, लाँग टर्म अभ्यासक्रम संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. यामध्ये यूट्यूब महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जगाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’  बनण्याची क्षमता मुंबईमध्ये आहे. अशा मुंबई शहरात ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. युट्यूबमुळे अनेक ‘ क्रिएटिव्ह’  लोक आपले कौशल्य जगासमोर आणत आहेत. त्यांच्यातील माहीत नसलेले कला गुण युट्यूबमुळे समोर येत आहेत.  अशा व्यक्ती युट्यूब  चॅनेल चालवून आपली ‘क्रिएटिव्हिटी’ जगासमोर आणतात.  या चॅनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्नही त्यांना मिळत असते, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

टेमघर प्रकल्पाची उर्वरित कामे, गळती रोखण्याच्या कामांसाठी ४८८ कोटी ५३ लाखांच्या खर्चास मान्यता

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्प (ता. मुळशी) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी व गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ४८८ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मौजे लवार्डे-टेमघर (ता.मुळशी) येथे मुठा नदीवर ३.८१२ अघफू साठवण क्षमतेचे दगडी धरण बांधण्यात आले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत या प्रकल्पातून पुणे शहरास ३.४०९ अब्ज घन फूट पिण्याचे पाणी आणि  धरणाच्या खालच्या बाजूस नदीवरील पाच कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील नऊ गावांतील हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनास सुविधा उपलब्ध होईल, असे नियोजन आहे.  धरणात २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असून, धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. प्रकल्पातील पाण्याचा पूर्णपणे लाभ घेता यावा यासाठी गळती रोखणे आवश्यक असल्याने गळती प्रतिबंधक उर्वरित कामे व मजबुतीकरणासाठी फेब्रुवारी २०२५ मध्येच मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आता पुढे उर्वरित कामे व गळती रोखण्याच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

–०—

भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी ४० रुपये मेहनताना मिळणार; १९६४ नंतर प्रथमच बदल

भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भिक्षागृहातील व्यक्तिचे पुनवर्सन करण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या कामासाठी दररोज चाळीस रुपये मेहनताना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

आतापर्यंत १९६४ पासून दरमहा पाच रुपये मेहनताना दिला जात असे. भीक मागण्याची वृत्ती कमी व्हावी या उद्देशाने राज्यात महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध कायदा १९६४ पासून अस्तित्वात आहे. त्या अंतर्गत राज्यात भीक मागणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी १४ भिक्षेकरी गृह सुरु आहेत. या भिक्षेकरी गृहात ४ हजार १२७ इतक्या व्यक्तिंचे पुनर्वसन करण्यात येते. या संस्थेत दाखल झालेल्या व्यक्तिला भिक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा याकरिता शेती तसेच लघु उद्योगांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. असे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तिला यापुर्वी दरमहा पाच रुपये इतका मेहनताना देण्यात येत असे. हा मेहनताना आता दररोज चाळीस रुपये करण्यात येणार आहे. यातून भीक मागण्याची वृत्ती कमी होऊन, अशा व्यक्तिंना कामाची गोडी लावता येणार आहे. या निर्णयामुळे भिक्षेकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.

–०—

केंद्राच्या पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय

प्रधानमंत्री – यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अॅवार्ड स्किम फॉर व्हायब्रंट इंडिया (PM- YASASVI ) या एकत्रिकृत शिष्यवृत्ती योजनेच्या केंद्राच्या मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या योजनेंतर्गत ओबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र सरकारने २०२१-२२ ते २०२५-२६ वर्षांकरिता जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. यानुसार इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्यायच्या शिष्यवृत्तीचे प्रमाण केंद्र हिस्सा साठ टक्के आणि राज्य हिस्सा चाळीस टक्के, असे असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय २३ जून २०२३ रोजी जारी झाला आहे. त्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

–०—

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी महा इनविट संस्थेची स्थापना

इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

राज्यात रस्ते व पूल आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि भांडवल उभारणीसाठी ‘महा इनविट’ (Maha InvIT – Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी संकलनास नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून खासगी व सार्वजनिक गुंतवणूकदारांना स्थिर परताव्याची संधी मिळणार आहे.

‘महा इनविट’ अंतर्गत शासन ट्रस्ट स्थापन करणार असून, त्यात प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक अशी रचना असणार आहे. हा ट्रस्ट सेबीच्या नियमानुसार कार्यान्वित केला जाईल. इनविट (InvIT) ही संकल्पना १९६० मध्ये अमेरिकेमध्ये अंमलात आणली गेली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण –एनएचएआयने २०२० मध्ये नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट स्थापन करून निधी उभारला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्र अशी संस्था स्थापन करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.

महा इनविटद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळ यांच्या निवडक मालमत्ता या ट्रस्टमध्ये हस्तांतरित केल्या जातील. यामुळे भविष्यातील महसूली उत्पन्न एकरकमी स्वरुपात ट्रस्टला मिळेल आणि त्यातून नवीन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने महा इनविटसाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (SPV) स्थापन करण्यालाही तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात दीर्घकालीन गुंतवणूक आकर्षित होणार असून, पायाभूत सुविधा क्षेत्रात तरलता वाढेल, उच्च व्याजदराच्या कर्जावरचा अवलंब कमी होईल आणि रस्ते प्रकल्पांच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

–०—

 जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरणास मंजुरी

राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण-२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्याच्या सागरी क्षेत्राची गरज, बाजार पेठांची स्थिती, उद्योजकांच्या अपेक्षा या बाबी लक्षात घेऊन बंदर विकास धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ अनुसार अंमलबजावणी करण्यात येते. या धोरणात जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. यासाठी या धोरणास मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारने मेरीटाईम इंडिया व्हिजन -२०३० आणि मेरीटाईम अमृतकाल व्हिजन-२०४७ यांच्या माध्यमातून भारताला सन २०३० पर्यंत जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती उद्योगांत जगातील पहिल्या दहा देशांत आणि जहाज पुनर्वापर क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच भारताला जहाज बांधणी क्षेत्रात सन २०४७ पर्यंत पहिल्या पाच देशांत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या बाबी विचारात घेऊन जहाज बांधणी जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्रांवर समर्पित लक्ष केंद्रीत करणे शक्य व्हावे यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. धोरण तयार करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या देशांची धोरणे, देशातील इतर राज्यांची धोरणे यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

धोरणाचे अपेक्षित फायदे – या धोरणाच्या माध्यमातून जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्राच्या विकासाकडे समर्पित लक्ष देणे शक्य होणार आहे. या धोरणातील तरतुदींमुळे बंदर प्रकल्प विकासक नवीन जहाज पुनर्वापर प्रकल्प निर्माण करु शकतील. यामुळे बंदराचा वॉटर फ्रंट आणि जमिनीचा पुरेपूर वापर होण्याबरोबरच जहाज पुनर्वापर सुविधा उपलब्ध होईल. जहाज बांधणी प्रकल्पांमुळे नवीन भारतीय जहाजांची बांधणी आणि दुरुस्ती करता येईल. जहाज पुनर्वापर सुविधा मुळे आयुर्मान संपलेल्या जहाजांचे तोडकाम करणे शक्य होईल. यातून राज्यातील जहाज बांधणी जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर क्षेत्राच्या विकासाला दिशा मिळेल

–०—

 पीक विमा योजनेत बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना

सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करुन, पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा, खरीप पिकासाठी दोन टक्के रब्बी पिकासाठी दीड टक्के व नगदी पिकांना पाच टक्के याप्रमाणे ठेवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार एक रुपयात विमा देण्याऐवजी आता शेतकरी हिस्सा खरीपासाठी दोन टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के आणि नगदी पिकांना पाच टक्के ठेवण्यासही मान्यता देण्यात आली.

राज्यात सध्या २६ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणी तक्रारी येत असल्याने या त्यामध्ये बदल करून आता सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राबविताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्या नंतर प्राप्त होणारी विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतर योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबरोबरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली.

–०—

कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणाऱ्या नव्या योजनेस मंजुरी

शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वातावरण अनुकूल शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुढील पाच वर्षांत दरवर्षी पाच हजार कोटी याप्रमाणे एकूण २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली.

योजनेच्या परिणामकारक रितीने अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजूर तरतुदींच्या एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदींच्या ०.१ टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करुन घेण्यात येणार आहे. योजनेत अत्यल्प, अल्प भूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हानिहाय उद्दीष्ट निश्चित करुन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर योजना राबविण्यात येईल.

या योजनेसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पित त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेत अंतर्भूत करायच्या घटक अथवा बाबींसाठी सध्या राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली.

–०—

 आदिवासी समाजाच्या धर्तीवर गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर गौंड गोवारी समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात शिक्षण, निवास, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी  प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील बहुआयामी योजनांचा समावेश राहणार आहे.

सहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश – “गोवारी समाजाच्या अंदाजे ६००० विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देण्यास येणार. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच  या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, भोजन, निवास खर्च, ट्युशन फी, सुरखा अनामत, शिक्षण शुल्क इत्यादीसाठीचे  शुल्क संबंधित निवासी शाळेस अदा करण्यात येईल  हे शुल्क संबंधित विद्यार्थी इयत्ता १२ वी उत्तीर्ण होईपर्यंत देण्यात येईल. मात्र या विद्यार्थ्यास दरवर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

घरकुल योजना  – गोवारी समाजासाठी घरकुल-टप्पा-१ अंतर्गत दहा हजार  घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. त्यासाठी १२५ कोटी रूपयांच्या निधीसही मंजूरी देण्यात आली. (त्यासाठी) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  १.२० लाखांपेक्षा कमी असावे, लाभार्थ्यांचे स्वतःच्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा,) लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या  घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेत विधवा/विधुर, दिव्यांग,) अनाथ, परितक्त्या, कच्च्या घरामध्ये राहणारे, घरात कोणीही कमावत नाही अशा महिला, पूरग्रस्त क्षेत्रातील रहिवासी असा प्राधान्यक्रम असणार आहे. योजनेंतर्गत किमान २६९ चौ. फूट इतक्या क्षेत्रफळ असलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यात येईल.  मंजूर सर्वसाधारण क्षेत्रातील घरकुलासाठी प्रति घरकुल १.२० लक्ष व ४ टक्के प्रशासकीय निधी रु.४८०० तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दर्गम क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.१.३० लक्ष व ४ टक्के प्रशासकीय निधी रु.५२०० याप्रमाणे  देण्यात येईल.

या योजनेतील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले ९०/९५ दिवस (रु.१९,५७०/- पर्यंत) अकुशल मजुरीच्या स्वरुपात संबंधित जलसंधारण आणि मनरेगा विभागांतर्गत अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देय असलेले १२,००० किंवा या योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत वेळोवेळी लागू होणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास लाभार्थी पात्र असेल.

स्टॅंड अप इंडिया –  समाजातील तरूणांनी उद्योग उभे करावेत आणि समाज आणि राज्याच्या विकासात हातभार लावावा यासाठी गोवारी समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ टक्के मधील जास्तीत जास्त १५ टक्के रक्कमेचे अनुदान देण्यात येईल. पात्र ला नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित  १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

स्पर्धा परीक्षेची तयारी – “गोवारी” या समाजातील विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम किमान ६० टक्के गुणासह उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना पूर्व तयारी करणे, परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच यासाठी आवश्यक ते मुलभूत निवासी प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात  येणार आहे. त्यासाठी ५०  लाख  रुपये इतका निधी मंजूर करण्यासही मान्यता देण्यात आली.

तसेच  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत बसण्यासाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्यात येत आहे. यासाठी २५  लाख रूपये निधी महाज्योती संस्थेस उपलब्ध करुन देण्यात  येत आहे.

सैन्य आणि पोलिस भरती – लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलिस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतीना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पुर्व तयारी करणे यासाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देण्यासाठी “महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास तसेच यासाठी रु.५० लक्ष इतका निधी मंजूर करण्यास शासन माद्वारे मान्यता देण्यात आली.

या योजनांमुळे गोवारी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

–०—

 मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरुन पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वैयक्तिक व्याज परतावा योजना २०१९ मध्ये कार्यान्वित झाली. तेंव्हा पासून महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे १ हजार ८६७ लाभार्थी आहेत. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे ३३९ लाभार्थी आहेत. या  योजनेची मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविल्यामुळे कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

या दोन्ही महामंडळांच्या मार्फत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येत आहे. पण आता लघू व मध्यम उद्योग सुरु करण्याकरिता आता अधिकची भांडवली व पायाभूत गुंतवणूक आवश्यक ठरू लागली आहे. तसेच कच्चा मालाच्या किमतीत झालेली दरवाढ यामुळे या कर्ज मर्यादेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यास मंजूरी देण्यात आली.

–0—

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

हे धोरण २०३० पर्यंत लागू राहील. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अशा येत्या पाच वर्षांसाठी १ हजार ९९३ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व वापरास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करून आणि पर्यावरणीय शाश्वतता, आर्थिक वाढ व उर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देणाऱ्या शाश्वत आणि नाविन्यपूर्ण परिवहन उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व विक्रीमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

या धोरणांतर्गत स्वच्छ गतिशीलता संक्रमण मॉडेल (Clean Mobility Transition Model)राबवले जाणार आहे. याअंतर्गत २०३० पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदुषणकारी वायू, तसेय हरित गृह वायू (GHG) उत्सर्जने रोखण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणांतर्गत राज्यात विक्री व नोंदणी झालेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या किंवा नुतनीकरण शुल्कातून माफी देण्यात आली आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार होण्यासाठी राज्यामध्ये चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा भक्कम विकास करण्यात येणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक २५ कि.मी. अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची उभारली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढावा यासाठी वाहन खरेदीत २०३० पर्यंत सवलत दिली जाणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (परिवहनेत्तर), राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस (M3,M4) तसेच खासगी, राज्य/शहरी परिवहन उपक्रमांतील बसेस यासाठी मूळ किंमतीच्या १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तर इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहने, चारचाकी (परिवहन -M1), चारचाकी हलके मालवाहू वाहन, चारचाकी मालवाहू वाहने (एन २, एन ३) तसेच शेतीसाठीचे इलेट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र वाहनांसाठी मूळ किमतीच्या १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

पथकरात सूट : – या धोरणांतर्गत मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदूहृय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यावर प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना व बसेसना पथकर पूर्ण माफ करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील अन्य राज्य व राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात पन्नास टक्के इतकी सवलत देण्यात येईल.

–०—

राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

राज्यात अॅप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण (Aggregators Policy) लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात अॅप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण तयार करण्याकरिता सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल, मोटार वाहन अधिनियम व नियमातील तरतुदी याअनुषंगाने राज्यामध्ये हे समुच्चयक धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत ॲप बेस वाहन सेवा सुरू करण्यासाठी संबंधित वाहन मालकास विविध सुरक्षाविषय बाबींची पुर्तता करावी लागणार असून यामुळे प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होणार आहे. राईड पूलिंगचा पर्याय निवडणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केवळ महिला चालक, प्रवाशांसोबताचा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून जाणार आहे.

ॲप बेस वाहनांसाठी संबंधित अर्जदाराने मार्गदर्शक तत्त्वांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत  सर्व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. अॅप बेस वाहनांसाठी अॅग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पुर्तता करणारे अॅप / संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. वाहनांचे रिअल टाईम जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, चालकांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असेल. चालकांना मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणे तसेच चालक व सहप्रवाशी यांच्यासाठी विमा आवश्यक करण्यात आला आहे. प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी, तक्रारींचे निवारण करण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक करण्यात आले आहे. राज्यात समुच्चयक धोरण लागू करण्याबाबतची नियमावली स्वतंत्रपणे प्रकाशित केली जाणार आहे.

0000

मुंबईत होणारी ‘वेव्हज्’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

००००

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई, दि. 29:- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राज्यात विविध इमारतींची कामे सुरु असून ही कामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिल्या. तसेच वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील मुस्लिम बांधवांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा व इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

या बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन, निधी वितरण, शिक्षण व इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्या दूर करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

0000

“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”

मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने “TECH वारी – टेक लर्निंग वीक” या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञान, साधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. ५ ते ९ मे, २०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे TECH-वारी हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणाऱ्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित TECH-वारी ही समर्पण व सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे, जे शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरीता सक्षम करणे हा आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण

TECH-वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहजसोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज् (IoT), सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले जाईल. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.

प्रसिद्ध वक्त्यांचा अपूर्व मेळा

या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यांचे ५ मे २०२५ रोजी व्याख्यान होणार आहे. ‘प्रवास पाककृतीचा’या विषयावर ६ मे २०२५ रोजी सुप्रसिद्ध शेफ माधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.’आरोग्यपूर्ण जीवनशैली’ या विषयावर रूजता दिवेकर यांचे ७ मे रोजी तर,’जीवन संगीत’ या विषयावर डॉ.संतोष बोराडे यांचे ८ मे रोजी २०२५ रोजी, ध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.

प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ या विषयावर सचिव (MeitY) श्री. एस. कृष्णन,’कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी एआय इंडिया मिशन चे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांचे,’विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’या विषयावर निती आयोगाच्या फेलो देबजानी घोष यांचे, ‘भाषा अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान’या विषयावर डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

‘महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, ‘स्टार्टअप डेमो डे – महा-राईज प्लॅटफॉर्म’या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, ‘आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, ‘कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, ‘नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, ‘वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे.

नॅस्कॉमचे विशेषज्ञ

‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावर एलटीआय माईंडट्रीचे  ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)’ या विषयावर एलायड डिजिटलचे रवींद्र देशपांडे यांचे ,’ब्लॉकचेन’ या विषयावर बेकर ह्युजेस या विषय लौकिक रगजी यांचे ,’सायबरसुरक्षा’ या विषयावर नॅस्कॉमचे प्रसाद देवरे, सुक्रित घोष यांचे,’स्मार्ट मिटिंग्स कशा घ्याव्यात’ या विषयावर झूमचे शैलेश रंगारी व मेहर उल्लीपालेम यांचे, ‘डिजिटल जागरूकता’ या विषयावर मास्टेकचे प्राजक्ता तळवलकर, राहुल मुळे यांचे व्याख्यान  होणार आहेत.

कर्मयोगी भारत हे डिजिटल शिक्षणासाठी मुख्य भागीदार,नॅस्कॉम हे  स्टार्टअप सहयोगी व तंत्रज्ञातील विशेषज्ञाचे भागीदार, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट – पोषण व आरोग्य संवर्धनासाठी पाककला सत्र या सर्वांचा या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग असणार आहे.

आजीवन शिक्षणाचा प्रसार

डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, TECH- वारीने निरंतर शिक्षण संस्कृतीला चालना दिली आहे. आयगॉटसारख्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मचा वापर वाढवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रेरित केले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचारी आयगॉटवर आहेत व 10 लाखांहून अधिक कोर्स पूर्ण केले आहेत.

प्रशासनातील नवोपक्रमांना चालना

TECH-वारी हे सिद्ध करते की, केवळ खासगी क्षेत्रच नाही तर शासनही नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून परिवर्तन साधू शकते. सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना आणि डिजिटल उपायांमध्ये सहभागी करून महाराष्ट्र एक अभिनव, कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन घडवत आहे.

नवसंधी निर्माण करणारा उपक्रम

TECH-वारी हे केवळ शिक्षणापुरते सिमित नसून, उद्योजकता व नाविन्यपूर्ण उत्पादने यांना संधी देणारे हे व्यासपीठ आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहकार्याने “महाराईज- स्टार्टअप पिचिंग” हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्यात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2025 मधून विजयी ठरलेल्या 24 स्टार्टअप्सना प्रशासनातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले उत्पादने व सेवा  सादर करण्याची संधी मिळणार आहे.

भविष्याकडे निर्धारपूर्वक पाऊल

TECH-वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र ठामपणे सांगतोय – आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाही, तर बदलाचे नेतृत्व करतो आहोत. प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे आणि एका तंत्रसज्ज, प्रगत व संवेदनशील महाराष्ट्रासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना दृष्टिलाभ करून देण्यासाठी आधुनिक नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी. तसेच नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय हे 35 वर्षे जुने नेत्र रुग्णालय आता विविध देशांमध्ये नेत्र रुग्णालयांचे जाळे असलेल्या अगरवाल नेत्र रुग्णालय साखळीचा भाग झाले आहे.

आदिवासी भागांचे संविधानिक पालक या नात्याने आपण राज्यातील आदिवासी भागांमधील लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. या दृष्टीने नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागात नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अगरवाल नेत्र रुग्णालयाने गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी फिरते नेत्र रुग्णालय सुरु केल्यास ती भारतमातेची चांगली सेवा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

आपण झारखंड येथे राज्यपाल असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती तसेच आपण आपल्या कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता असे सांगून यंदा प्रधानमंत्र्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७,५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करणार आहोत, या दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आधुनिकीकृत आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली.

उद्घाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवाल, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital; calls for promoting eye donation

Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the renovated ‘Aditya Jyot Eye Hospital’, now part of Dr Agarwal’s Eye Hospital network at Wadala in Mumbai on Tue (29 April).

Speaking on the occasion, the Governor called upon the people to come forward for eye donation. Stating that he has himself pledged his eyes, he appealed to modern eye hospitals to organise eye check up camps in rural and tribal areas for the benefit of tribals. The Governor appealed to the Agarwal Eye Hospital to create a Mobile Unit of the Hospital and reach out with modern eye care facilities to the poor and needy across the country.

Earlier the Governor visited the renovated eye hospital and unveiled the plaque. Dr S. Natarajan, Clinical Head of Aditya Jyot Eye Hospital checked the Governor’s vision on the occasion.

CEO of Agarwal Eye Hospital Dr. Adil Agarwal, Chief Strategy Officer, Dr Agarwal’s Eye Hospital Dr. Vandana Jain, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, doctors and staff of Dr Agarwal’s Eye Hospital were present.

0000

शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि २९ :-  शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिल्या.

मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला सह सचिव  कैलास गायकवाड, अवर सचिव सुनील सामंत उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागीय आयुक्त  दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी या बैठकीत सन २०२३ व २०२४ मधील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे  त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तालुकास्तरीय समितीने संबंधित यंत्रणांकडून आवश्यक असणारा अहवाल प्राप्त करून घ्यावा. जिल्हास्तरावरही प्रलंबित प्रकरणाचा  नियमित आढावा घेऊन प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणांचा आढावा घ्यावा. शेतकरी आत्महत्या मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. जाधव -पाटील यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/स.सं/

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...