शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 383

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी श्री. कटियार यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उप आयुक्त रमेश आडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

मुंबई, 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.

 यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

सुनिल डहाळे/प्रतिवेदक

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई, दि. 26 :  भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

000

प्रजासत्ताक दिन : राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वजवंदन

मुंबई, दि. 26 :   देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली.

राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सलामी देण्यात आली.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी पत्नी सुमती यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व उपस्थित लहान मुलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप केले.

000

Republic Day: Governor C. P. Radhakrishnan unfurls National Tricolourat Raj Bhavan

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan unfurled the National Tricolour on the occasion of the 76th Republic Day at Raj Bhavan Mumbai on Sun (26 Jan).

Officers and staff of Raj Bhavan and platoons of the State Reserve Police Force and Maharashtra Police saluted the flag even as the National Anthem and  State Song was played.

Governor Radhakrishnan  joined by his wife Sumathi Radhakrishnan exchanged Republic Day greetings and distributed sweets to all those present on the occasion.

0000

पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार

नवी दिल्ली दि. 25:  देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  महाराष्ट्रातून  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व  गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी  दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास  आणि  चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना  पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

11 मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व  गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत.

व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

या वर्षी एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 07 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि  113 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह  23 महिला तर 10 हे परदेशी नागरिक आहेत. 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

0000

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापकीय सल्लागार सदस्य राजेश पांडे, अभिनेते प्रवीण तरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाचे प्राध्यापक, उच्च व तंत्रशिक्षण तसेच भाषा संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री सामंत म्हणाले, हे संमेलन मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन आहे. या संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित, युवा आणि मराठी भाषा, स्त्री साहित्य आणि मराठी, बालसाहित्य, संत साहित्य आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेल्या तरुण पिढीसाठी कार्यक्रम होणार आहेत असे सांगून ते म्हणाले यावर्षीपासून मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुढच्या पिढीला मराठी भाषा कळावी, मराठी भाषेचे संवर्धन, जतन व्हावे हा मराठी भाषा विभागाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पुण्यातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे या संमेलनात सहकार्य आवश्यक आहे. सर्व विद्यापीठांच्या भाषा विभागांनीही हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संमेलनाला येणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तक महोत्सव समितीच्या माध्यमातून एक एक पुस्तक भेट देण्यात येणार आहे. तसेच या संमेलनामध्ये पुस्तक आदान- प्रदान करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी डोंबिवलीच्या पै फाउंडेशन संस्थेकडून २ लाख ५० हजार पुस्तके आणण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत स्वतः जवळची वाचून झालेली पुस्तके जमा करून संमेलनस्थळी उपलब्ध असलेले पुस्तक बदलून घेता येणार आहे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पुणे दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी भाषा विभागाच्यावतीने संमेलन स्थळाचे मुख्य प्रवेशद्वार, कार्यक्रम पत्रिका, शोभायात्रा, संमेलन स्थळी उभारण्यात येणारी दालने, प्रवेशद्वारावर लावण्यात येणारे फलक आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

0000

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न  

नाशिक, दि.25 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  जिल्ह्यात पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत नाशिक येथे गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे आयोजित ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते झाले.

यावेळी  पर्यटन संचालनालय, मुंबई चे संचालक बी. एन. पाटील, पर्यटन  संचालनालय, नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नाशिक परिसरातील पर्यटन स्टेकहोल्डर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ नाशिक चे अध्यक्ष व सदस्य, भोसला मिलिटरी स्कूल चे विद्यार्थी व पर्यटन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पर्यटक उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी येथे उभारण्यात आलेल्या टेंटची व स्टॉलची पाहणी केली.

गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे २५ जानेवारी २०२५ ते ३१  मार्च २०२५ पर्यंत इको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. जेथे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी लक्झरी कॅम्पिंग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवामध्ये एकूण ६० टेंट उभारण्यात आले आहेत. तसेच विविध वस्तू विक्रीसाठी बचत गट इत्यादी यांना छोटे २० स्टॉल्स टेंट  उपलब्ध करून दिले आहेत. सदर महोत्सवामध्ये उभारलेले टेंट पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पर्यटकांसाठी  विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व साहसी उपक्रम आयोजित केले आहेत. या उपक्रमांमध्ये Wine Experience Center, हस्तकला व खाद्य पदार्थ प्रदर्शन व विक्री, ग्रामीण जीवन शैली चे अनुभव, जमीन, हवा आणि पाणी या संबंधित साहसी उपक्रम, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे.

साहसी पर्यटन उपक्रमांमध्ये महोत्सवात पॅरा सेलिंग, पॅरा मोटरिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, डुओ सायकलिंग, ऑल-टेरेन व्हेईकल्स (एटीव्ही) आणि पेंटबॉल अरेना यासारख्या रोमांचक ॲक्टीव्हिटीजचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि फोटोग्राफी, निसर्गोपचार, बायोडायनामिक शेती, आदिवासी कला आणि संस्कृती आणि इको-मरीन एक्सप्लोरेशनवरील कार्यशाळा यांचा देखील अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटकांनी नाशिक मधील लक्झरी कॅम्पिंग व विविध साहसी क्रिडा प्रकारांचा सांस्कृतिक उपक्रमांसमवेत अनुभव घेणेसाठी नक्की या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 25 :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रणेंद्र (रोणु) मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य तसेच कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पद्मभूषण पुरस्कारांसाठी  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांची झालेली निवड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा, कलासमृद्धीचा गौरव आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव झाल्यानंतर, त्यांना आता पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांना तसेच आश्विनी भिडे देशपांडे,  रणेंद्र मजुमदार, वासुदेव कामत, अच्चुत पालव यांनी महाराष्ट्राचं, देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं, त्यांना जाहीर झालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव आहे. हा गौरव भावी पिढीच्या मनात कलाक्षेत्राबद्दल प्रेम, आस्था निर्माण करेल, असा विश्वास आहे.

वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं. त्याबाबतची गोडी निर्माण केली. त्यातून वनांच्या संरक्षणाबाबतची जागृती वाढली, हे त्यांचं मोठं यश आहे, असं मी मानतो.

चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणे. जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रीय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.

होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा, अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेने, समर्पित वृत्तीने पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

———-०००००——–

‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तर अभिनेते शेखर कपूर या तिघांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली, वन, वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले चैत्राम पवार यांच्यासह अकरा मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील समाजकारण, कला, साहित्य, चित्रकला, वैद्यकीय, वनसंवर्धन, कृषी, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जोशी सरांना अभिवादन करतानाच ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनाही हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिवादन करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भुषण अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट, नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांच्यावर अधिराज्य गाजवले आहे. अच्युत पालव यांनी आपल्या ४० वर्षाच्या कारकीर्दीत सुलेखन क्षेत्रात नाव कमवले आहे. नागपुरचे ७० वर्षीय  होमिओपॅथिक डॉक्टर विलास डांगरे यांनी ५० वर्षांहून अधिक काळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नाममात्र शुल्कात उपचार केले आहेत. विदर्भात त्यांची ओळख वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी आहे. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी अशी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची ओळख संपूर्ण देशाला आहे. चैत्राम पवार यांनी वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन त्यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

तर चित्रकार वासुदेव कामत, गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, जसपिंदर नरूला, रानेंद्र मुजुमदार, अरुंधती भट्टाचार्य, सुभाष शर्मा यांनी देखील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर झळकल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

००००

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानाची पाहणी

अहिल्यानगर दि.२५- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली. जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिले पाऊल आहे, असे श्री.विखे पाटील यावेळी म्हणाले.

त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी होते.

पालकमंत्र्यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती घेतली. स्पर्धेच्या वेळी कुस्तीच्या आखाड्याभोवती प्रेक्षकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धेसाठी येणारे मल्ल, पंच आणि पदाधिकाऱ्यांची  चांगली व्यवस्था करावी. कुस्तीगीरांना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. स्पर्धा स्मरणीय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपये मंजूर केले आहे. यातील २० कोटीचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होत आहे. यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्या. आवश्यकता असल्यास अधिक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. ८०० पेक्षा अधिक कुस्तीगीर, १५० पंच आणि २०० पेक्षा अधिक पदाधिकारी स्पर्धेसाठी येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे संतोष भुजबळ,  शिवाजी चव्हाण, अर्जुन शेळके, युवराज करुजले उपस्थित होते.

००००

ताज्या बातम्या

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...