बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 382

भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातून जगाच्या कल्याणाचा मार्ग – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 12 : भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माच्या मार्गावर चालण्यातच जगाच्या कल्याणाचा मार्ग दडला आहे. आजचा दिवस हा संकल्प घेण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

ड्रॅगन पॅलेस येथे आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथी गृहाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत  होते. यावेळी माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर व मान्यवर उपस्थित होते.

दीक्षाभूमीनंतर नागपूरला जागतिक लौकिकात आणल्याचे काम सुलेखाताईंनी ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून केले आहे. संपूर्ण जीवन त्यांनी धम्म प्रचारासाठी  समर्पित केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक नागपूरला भेट देतात. या भेटीत ते आवर्जून ड्रॅगन पॅलेसलाही भेट देतात. येथील स्वच्छता व निगा उत्तम असल्याने स्वाभाविकच याला एक विशेष  महत्त्व आहे. आज योगायोगाने सुलेखाताईंचा जन्म दिवस असून ताईंच्या सर्व उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शुभेच्छा दिल्या.

नागपूर महानगरालगतच्या ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधा भक्कम करु –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. 12 : नागपूर महानगरासह लगतच्या ग्रामीण भागामध्ये गत दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसित झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा  देणे गरजेचे होते. मी मुख्यमंत्री असताना सर्वात अगोदर प्राधान्याने येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. इतर पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आपण एनएमआरडीएच्या माध्यमातून परिपूर्ण नियोजन केले. नरसाळा हुडकेश्वर या भागातील जनतेसाठी तेव्हा दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनामुळे विकासकामांना आता नियोजनबद्ध गती देता आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अमृत-2 योजना अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील 25 गावांसाठी 716 कोटी 90 लाख रुपयांचा  महत्वाकांक्षी गटरलाईन व मलनि:सारण प्रकल्प आणि हुडकेश्वर नरसाळा भागातील 115 कोटी 46 लाख रुपयांच्या मल नि:सारण प्रकल्पाच्या भूमिपूजन सभारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, माजी आमदार सुधाकर कोहळे,  मल्लिकाजून रेड्डी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते.

नगर पंचायत बेसा, पिपळा, बहादुरा, बिडगाव , हुडकेश्वर, नरसाळा यासह परिसरातील लहान गावांसाठी गटरलाईन व मल नि:सारण प्रकल्प हे आवश्यक होते. मल नि:सारण प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय  स्वच्छतेमुळे आरोग्य व इतर प्रश्न सुटणार आहेत. आपल्या भागातून जाणारी पोहरा नदी ही प्रकल्प नसल्याने नाल्यात रुपांतरित झाली आहे. या नदीलाही आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्वच्छतेचे रुप प्राप्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आमदार  चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी पुढाकार व पाठपुरावा केल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

वास्तविक या व इतर प्रकल्पासाठी मधल्या काळात कसलाही निधी मिळाला नाही. याची कमतरता आपले शासन आल्यानंतर आपण आता भरुन काढत कामांना गती दिली आहे. या प्रकल्पांना निधीही उपलब्ध करुन दिला आहे असे ते म्हणाले.

आपल्या योजना या परिवर्तनाचे प्रतिक झाल्या आहेत. आपण लाडक्या बहीणींसाठी योजना आणली. लेक लाडकी सारखी योजना आणली. यात एक लाख रुपयांपर्यतची मदत आपण मुलींना देतो. उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के फीस शासनामार्फत आपण देत आहोत. याच्या जोडीला आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीची योजना दिली आहे. आजच्या घडीला 11 लाख लखपती दिदी तयार झाल्या असून आपण एक कोटी लखपती दिदी तयार करणार आहोत. यात नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त लखपती दिदी तयार करु असे ते म्हणाले. सर्वसामान्य समाजातील घटकाला, माणसांना केंद्रस्थानी ठेवून आपण योजना आखल्याचे त्यांनी सांगितले.

आपले सरकार सर्वांसाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी आपण वीज बिल माफी दिली आहे. याच्या जोडीला जवळपास 14 हजार मेगावॅट विजेची उपलब्धता सौर ऊर्जेच्या माध्यमातून करीत आहोत. कोणत्याही स्थितीत दररोज  बारा तास वीज शेतकऱ्यांना आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले. ही दिवसाचे बारा तास वीज असेल. सौर तंत्रज्ञानामुळे  ही वीज आठ रुपयांऐवजी तीन रुपये प्रती युनीट शासनाला पडत आहे. शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देत आहोत. शिवाय सरकारचे आपण यातून 10 हजार कोटी रुपये वाचवित असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे हे मॉडेल इतर राज्यांनी अंगिकारावे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांना सांगितल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर यांनी  विविध विकास कामांचा आढावा मांडला. बेसा येथील भूमिपूजन समारंभाचे प्रास्ताविक नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती संजय मीना यांनी तर नरसाळा येथील आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम

मुंबई दि. 12 – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येदेखील झाली आहे.

मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन यावर्षीदेखील या अभियानाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमासदेखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

 

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार

मुंबई, दि. १० : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून राज्यात सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यांपुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

आदिवासी बांधवांसाठी सावऱ्या दिगरचा पूल ठरेल विकासाचा सेतू – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 12 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्त) – शासनाच्या आदिवासी विकास विभागाने बिलगांव ते सावऱ्या दिगर येथील पुलासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे येत्या एक ते दीड वर्षात हा पूल पूर्णत्वास येऊन, या अतिदुर्गम भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांसाठी हा पूल विकासाचा सेतू ठरेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या बारा वर्षांपासून  निधीअभावी रखडलेल्या बिलगाव ते सावऱ्या दिगर येथील उदई नदीवरील पूल आणि बोधी नाल्यावरच्या पुलांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित,  बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुणाल पावरा, विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता जगदिश पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा , सुभाष पावरा , शिवाजी पराडके, राड्या पावरा , जोमा पावरा, दिलीप सरंपच, खुशाल पावरा, लितिश मोरे, हिरालाल काळूसिंग  यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातील अतिदुर्मग भाग असलेल्या सावऱ्या दिगरच्या पुलाचे काम गेल्या अनेक वंर्षापासून निधी अभावी रखडले होते. 2012 साली मान्यता मिळालेल्या या पुलासाठी भरीव निधीची गरज होती. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागातूना यासाठी 45 कोटींच्या भरीव निधीला मान्यता देत या कामाची निविदा प्रक्रीया देखील पुर्ण केली. त्यांच्या हस्ते या रखडलेल्या पुलाचे काम महिन्या  दिड महिन्यात सुरु होणार आहे. या 45 कोटींमध्ये या भागातील उदई नदीवरील सावऱ्या दिगरच्या पुलासह बोधी नाल्यावरच्या पुलाचे काम देखील होणार आहे. मुळातच या पुलाअभावी या भागातील 08 गाव आणि अनेक पाड्यातील लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. आरोग्य यंत्रणेला देखील याठिकाणी पोहचण्यात मोठी अडसर निर्माण होत होती. तर पावसाळ्यात पाणी आल्याने या भागाती गावांचा संपर्क तुटत असल्याने महसुल यंत्रणेला देखील स्वस्त धान्य दुकानाचे चार महिन्याचे रेशन एकाचवेळी गावात पोहचवून ठेवावे लागत होते. त्यामुळे या गाव परिसरातील नागरीकांनी या पुलाच्या बांधकामासाठी आदिवासी विकांसमंत्री यांनी साकडे घातले होते.

या पुलाच्या उद्घाटनावेळी हा पुल या भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांना शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकास सेतू म्हणून उपयोगात येईल असा विश्वास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केला. या भागातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्यातील शासन कटीबद्ध असून आदिवासी बांधवांना मागेल ती योजना देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. या पुलाप्रमाणेच या भागातील रस्ते आणि विद्युतीकरणासाठी देखील मोठी निधी मंजुर करुन दिला असून येत्या दोन तीन महिन्यात अनेक वाड्या- पाड्यांपर्यत  वीज पोहचून वीज समस्येचे निराकरणे होईल असा विश्वास देखील मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी येथील नागरिकांना दिला.

या पुलामुळे या भागातल्या सावऱ्या दिगर, बमाना, उडद्या, खोपरगाव. मांजरी, मुखानी, बादल अशा मोठ्या गावांना जाण्याचा जवळचा मार्ग प्रस्थापित होणार असल्याने या ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाचा प्रवास सुकर होणार असल्याचे यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या.  आश्रमशाळांच्या बळकीटकरणातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सोईसुविधांयुक्त शिक्षण, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी घरकुल, लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शबरी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या हाताला काम, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे देखील यावेळी  माजी खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या.

‘महाप्रीत’ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १२ :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रीत) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. ‘महाप्रीत’च्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘महाप्रीत’च्या संचालक मंडळाची २५ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. ११ ऑक्टोबर) संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यासह संचालक मंडळाचे इतर विभागीय प्रतिनिधी आणि ‘महाप्रीत’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की ‘महाप्रीत’च्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामुळे पुनर्वसनासाठी हजारो परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. यातून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रीत राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत साकारणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती करून या महामार्गाच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. गोवा ऊर्जा विकास अभिसरणासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची संधी ‘महाप्रीत’ला मिळाली आहे. ही संधी म्हणजे ‘महाप्रीत’च्या जागतिक दर्जाच्या कामाची पावती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत महाप्रीत संचालक मंडळाने विविध प्रस्तावांवर मंजूर केला त्यात प्रामुख्याने १) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमातील घटक ज्यात किसन नगर ठाणे येथील दोन मोकळ्या जमिनींवर सुमारे १ हजार ६५० कोटींच्या ५ हजार २१३ पुनर्वसन निवासी युनिट्सचे बांधकाम, २) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड या एसपीव्हीची ठाणे येथील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निर्मिती, ३) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाण्यातील किसान नगर, कोपरी आणि लोकमान्य नगर येथील क्लस्टर्सच्या विकासास मान्यता, ४) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) साठी पीडीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन अंदाजे १ हजार ३७२ कोटी, ५) महाप्रीत द्वारे AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी १० हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मान्यता, ६) “मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांसाठी एमएसएमई क्षेत्रासाठी ४०० मेगावॅट क्षमतेच्या भारतातील सर्वात मोठ्या रूफ टॉप सोलार योजनेपैकी एक अस्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी सौर प्रकल्पांसाठी MSRDC सोबत JVA करण्याचे निर्देश तसेच NTPC ग्रीन सोबत JVA ला 10GW च्या अक्षयऊर्जा प्रकल्पांसाठी पुढील कार्यवाहीसाठी आणि गोवा शासनाचे गोवा ऊर्जा विकास अभिसरण साठी ३० MW सौर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत डिसेंबर २०२३ मध्ये दावोस येथे करण्यात आलेल्या सौर, पवन-सौर संकरित प्रकल्प, AI प्रकल्पाच्या विविध  प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाप्रीत’ला देण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व भिवंडी आणि चंद्रपूर, यवतमाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना या प्रकल्पांची माहिती मंडळाला देण्यात आली.

विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक 12 – राज्य शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी योजना राबविल्या जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तत्पूर्वी बंटर भवन कुर्ला येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र उद्योग तसेच परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात महिलांबरोबरच शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी देखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन भूमिपूजन तसेच लोकार्पण झालेले प्रकल्प

छेडा नगर उड्डाण पुलाचे लोकार्पण. पूर्व द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर पासून ते यु टर्न करिता प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. चुनाभट्टी रेल्वे फाटक वरून प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चुनाभट्टी प्रवेशद्वार व इतर कामाचे लोकार्पण. कामराज क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण.

टिळक नगर येथील हनुमान मंदिर उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मधील नाना नानी पार्क व बालोद्यान याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ. कुर्ला विधानसभेमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ. नेहरूनगर टिळक नगर या म्हाडा वसाहती मधील दुसऱ्या टप्प्यातील मला निसारण महिन्यांच्या कामाचे शुभारंभ. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण.

00000

जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

लातूर, दि. ११ : बाराव्या शतकात सामाजिक समतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सर्व समाज घटकांना सोबत घेवून विकास कामे राबविण्यावर आपला भर असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. जळकोट येथे महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी आमदार गोविंद केंद्रे, नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तहसीलदार राजेश लांडगे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कोरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण यांच्यासह हावगीस्वामी मठाचे डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, बस्वलिंग शिवाचार्य महाराज आदी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वरांचे विचार युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. जळकोट येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यामुळे सर्वांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल. उदगीर, जळकोट तालुक्यात विविध विकास कामे राबविताना आपण सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला एकाच दिवशी निधी मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी बस स्थानक परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.

उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये दळणवळण, सिंचन, वीज, आरोग्य सुविधांची निर्मिती करून येथील नागरिकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे. याठिकाणी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उदगीर येथे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ उभारणीचे आपले ध्येय असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये लाभ देण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात ही रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल. यासोबतच युवकांना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

जळकोट, उदगीर तालुक्यात झालेल्या पायाभूत सुविधा निर्मितीमुळे दोन्ही तालुक्यांचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी सांगितले. तर जळकोट नगरपंचायत इमारत, शहरातील रस्ते व विविध विकास कामांना ना. बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांनी आभार मानले.

डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

०००००

घोणसी तांडा येथे साठवण तलावाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन

लातूर, दि. 11 : जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा (खंबाळवाडी) येथे जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाची निर्मिती केली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.

जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. श्याम डावळे यांच्यासह स्थानिक सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

घोणसी तांडा (खंबाळवाडी) साठवण तलाव हा खंबाळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या तलावाच्या निर्मितीसाठी 15 कोटी 36 लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

घोणसी तांडा (खंबाळवाडी) या साठवण तलावामुळे 22.50 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून परिसरातील 311 हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे. यासोबतच परीसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास क्रीडामंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

००००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ११ :- यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटे तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची, स्नेहाची लयलूट करण्याचा सण आहे. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने, अशाश्वतावर शाश्वताने विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान, भक्ती, शक्तीची पूजा करतो. नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा दसरा हा सण आपल्या गौरवशाली संस्कृतीचे एक प्रतीक आहे. हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात निश्चितपणे आनंद घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील बळीराजा, महिला, युवक यांच्यासह वंचित-उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस यावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विविध घटकांसाठी शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. राज्य शासनाने सुरु केलेल्या लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

०००००

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू – सांस्कृतिक कार्यमंत्री...

0
पुणे, दि. १४ : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक...

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे ‘भूषण’

0
मुंबई दि १४ : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी ‘भूषण’ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ...

राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि.14 : राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. या देवस्थान जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकार धोरण...

नागपूरमधील विविध आरोग्य सेवेचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला

0
मुंबई, दि.१४ : नागपूर शहर विस्तारत असून त्याठिकाणी आरोग्याच्या सेवा योग्य पद्धतीने होणे अपेक्षित आहे. कामठी येथे ५० खाटांचे रुग्णालय आहे ते १०० खाटांचे...