रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 384

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 25 :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रणेंद्र (रोणु) मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य तसेच कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, पद्मभूषण पुरस्कारांसाठी  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांची झालेली निवड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा, कलासमृद्धीचा गौरव आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव झाल्यानंतर, त्यांना आता पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांना तसेच आश्विनी भिडे देशपांडे,  रणेंद्र मजुमदार, वासुदेव कामत, अच्चुत पालव यांनी महाराष्ट्राचं, देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं, त्यांना जाहीर झालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव आहे. हा गौरव भावी पिढीच्या मनात कलाक्षेत्राबद्दल प्रेम, आस्था निर्माण करेल, असा विश्वास आहे.

वनं, पर्यावरण आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळलेल्या अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यातल्या प्रत्येक निसर्गप्रेमीचा गौरव आहे. जंगल वाचणारा माणूस ही ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांनी इतरांनाही जंगल वाचायला शिकवलं. त्याबाबतची गोडी निर्माण केली. त्यातून वनांच्या संरक्षणाबाबतची जागृती वाढली, हे त्यांचं मोठं यश आहे, असं मी मानतो.

चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणे. जंगल, पशु, पक्षी यांच्या संरक्षण, संवर्धनाची सक्रीय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा, पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवापिढीला प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.

होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा, अर्ध्या शतकाहून अधिक काळ विदर्भातील गरीबांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या समर्पित वृत्तीचा गौरव आहे. विदर्भातील वैद्यकीय सेवेतील भीष्मपितामह असा गौरव असलेल्या डॉ. विलास डांगरे यांनी ध्येयनिष्ठेने, समर्पित वृत्तीने पन्नास वर्षांहून अधिक गरीब रुग्णांची सेवा केली. याकाळात डॉक्टरांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा समर्पित सेवाकार्याचा गौरव आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

———-०००००——–

‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तर अभिनेते शेखर कपूर या तिघांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली, वन, वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले चैत्राम पवार यांच्यासह अकरा मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील समाजकारण, कला, साहित्य, चित्रकला, वैद्यकीय, वनसंवर्धन, कृषी, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जोशी सरांना अभिवादन करतानाच ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनाही हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिवादन करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भुषण अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट, नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करीत त्यांच्यावर अधिराज्य गाजवले आहे. अच्युत पालव यांनी आपल्या ४० वर्षाच्या कारकीर्दीत सुलेखन क्षेत्रात नाव कमवले आहे. नागपुरचे ७० वर्षीय  होमिओपॅथिक डॉक्टर विलास डांगरे यांनी ५० वर्षांहून अधिक काळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना नाममात्र शुल्कात उपचार केले आहेत. विदर्भात त्यांची ओळख वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी आहे. प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक व वनाधिकारी अशी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची ओळख संपूर्ण देशाला आहे. चैत्राम पवार यांनी वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धनामध्ये उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन त्यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

तर चित्रकार वासुदेव कामत, गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, जसपिंदर नरूला, रानेंद्र मुजुमदार, अरुंधती भट्टाचार्य, सुभाष शर्मा यांनी देखील आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर झळकल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

००००

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानाची पाहणी

अहिल्यानगर दि.२५- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली. जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिले पाऊल आहे, असे श्री.विखे पाटील यावेळी म्हणाले.

त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी होते.

पालकमंत्र्यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती घेतली. स्पर्धेच्या वेळी कुस्तीच्या आखाड्याभोवती प्रेक्षकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धेसाठी येणारे मल्ल, पंच आणि पदाधिकाऱ्यांची  चांगली व्यवस्था करावी. कुस्तीगीरांना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. स्पर्धा स्मरणीय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपये मंजूर केले आहे. यातील २० कोटीचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होत आहे. यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्या. आवश्यकता असल्यास अधिक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. ८०० पेक्षा अधिक कुस्तीगीर, १५० पंच आणि २०० पेक्षा अधिक पदाधिकारी स्पर्धेसाठी येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे संतोष भुजबळ,  शिवाजी चव्हाण, अर्जुन शेळके, युवराज करुजले उपस्थित होते.

००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन

मुंबई, दि.२५:- भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या दोहोंचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याचा बहुमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून, त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.

सुलेखनकार अच्युत पालव, एसबीआयच्या माजी अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे- देशपांडे, बारीपाड्याचे वनसंरक्षक चैतराम पवार, ज्येष्ठ गायिका जसपींदर नरूला, अरण्यॠषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ बासरीवादक रोणू तथा राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ विलास डांगरे या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांनी आपापल्या कर्तृत्वाने, त्या त्या क्षेत्राचा गौरव वृध्दिंगत केला आहे. या सर्व मान्यवरांनी व्रतस्थ राहून कार्य केले आहे. यामुळे या क्षेत्रांच्या लौकिकात भर घातली गेली आहे. ही बाब प्रेरणादायी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

अरण्यॠषी श्री. चितमपल्ली आणि डॉ. विलास डांगरे यांची कर्मभूमी नागपूर आणि विशेषत: विदर्भ परिसर राहिली आहे. या दोहोंचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
000

सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२५:- सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. त्यासाठी निर्धार करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे. आगामी काळात ‘डेटा सेंटर’चे ‘कॅपिटल’ होणार आहे. आपले एमएमआर क्षेत्र जागतिक ‘ग्रोथ सेंटर’ होणार आहे. जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र ‘मॅग्नेट’ आहे. या सगळ्या शक्तिस्थळांमुळे महाराष्ट्राचे भारतीय अर्थव्यवस्था शक्तिशाली करण्यात अनन्य साधारण योगदान राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही. शेती – सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा यांसह पायाभूत सुविधा क्षेत्रांत महाराष्ट्राने आतापर्यंत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. सामाजिक न्यायाच्या बाबतीत ही महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदलात समतोल राखण्याचे भान- संवेदना जतन केली आहे. महाराष्ट्राचा हाच लौकीक आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी एकजूट करायची आहे.आपले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली करायचे आहे. त्यासाठी सर्व भेद बाजूला ठेवून, परस्पर स्नेह, सौहार्द वाढवूया. सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम भारत घडविण्याचा संकल्प करूया. आपल्या पुर्वसुरींना दिलेला राष्ट्रप्रेमाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करूया असे आवाहन करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

000

हा देश प्रत्येक देशवासियाचा; सर्वांच्या एकजुटीतूनंच आजचा बलशाली भारत भक्कमपणे उभा,  ही एकजूट कायम ठेवूया…

मुंबई, दि. २५ :- देशाचं स्वातंत्र्य,  देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ आपल्या संविधानात, लोकशाही व्यवस्थेत आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळे आपलं संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभावाच्या विचाराचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी दृढसंकल्प होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रवासियांना केलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या मागील ७६ वर्षांच्या वाटचालीत या देशातल्या शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, संशोधक, सैनिक, साहित्यिक, खेळाडू, कलावंत अशा अनेकांनी आपापल्या परिश्रमाने देशाचा गौरव वाढवला. देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं देशाच्या प्रगतीत, जडणघडणीत योगदान दिलं. हा देश प्रत्येक देशवासियाचा आहे. आपल्या सर्वांच्या एकजुटीतूनंच आजचा बलशाली भारत भक्कमपणे उभा आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवूया, असं निर्धारयुक्त आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

—–०००००—–

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवोदित वकिलांनी कायम शिकत राहणे गरजेचे – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

पुणे, दि. २५: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम जेष्ठ वकिलांकडून शिकत आणि अभ्यास करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ अर्थात ‘ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या. इंदापूर येथील या न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी आगामी अर्थसंकल्पात अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, खासदार सुप्रिया सुळे, प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश इंदापूर यू. एम. मुधोळकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. जे. तांबे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. ए. यु. पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गिरीश शहा आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या याकडे जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे, असा सल्ला देऊन त्या म्हणाल्या,  यशाला कोणताही जवळचा मार्ग असू शकत नाही हे कायम लक्षात ठेवावे. कोर्टाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रयत्न करा. कायम व्यावसायिकता बाळगावी. लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करा.

बारामती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथून सुमारे ३ हजार न्यायालयीन प्रकरणे इंदापूर येथील न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा गरिबांचा खटला मोफत चालविण्यासाठी प्रयत्न करा असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी आणखीन ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर येथील आज उद्घाटन झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी अतिरिक आठ कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच येथे वकिली करणाऱ्या वकीलांसाठी कोर्टाच्या इमारतीशेजारी नवीन तात्पुरते लोखंडी बांधकाम उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून वीस लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांचं खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे न्यायालयांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरीष्ठस्तर दिवाणी न्यायालय झाल्यामुळे सुमारे शंभर ते सव्वाशे वकील, ५०० ते हजार पक्षकार यांना बारामती येथे जावे लागायचे ते वाचले.

न्यायालयीन इमारती आणि निवासस्थानांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुणे येथील राणीचा बाग येथे न्यायाधीशांठी ३२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत. इंदापूर येथील न्यायालयाच्या इमारतीशेजारील पंचायत समितीची दोन एकर जागा न्यायालयाच्या ताब्यात मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आवश्यक तितका खर्च करण्यात येईल. मुंबई येथे २ हजार कोटी रुपये खर्च करून जीएसटी भवन उभारण्यात येत आहे. तेथे भाड्याच्या इमारतीत असलेली शासकीय कार्यालयेही स्थलांतरित करण्यात येणार असल्याने प्रचंड भाडे वाचणार आहे. एअर इंडियाची इमारत शासनाच्या ताब्यात मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर तेथेही राज्य शासनाची कार्यालये स्थलांतरित करता येतील,

यशदाचा विस्तार करून उर्वरित १०० एकर जागेवर मसुरीच्या धर्तीवर अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, राज्यात जनतेची, तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची सोय व्हावी अशा देखण्या इमारती उभ्या करण्यासाठी प्रयत्न असतो. सारथीची चांगली वास्तू पुण्यात उभी केली असून सामाजिक न्याय विभागाची इमारत उभारण्याचे निश्चित केले असून

शालेय शिक्षण भवन, नोंदणी भवन, कृषी भवन, जमाबंदी आयुक्तालय भवनाची कामे सुरू आहेत. जीएसटी भवनाचे काम संपत आले आहे. कामगार भवन, पणन आणि सहकार भवन, साखर भवन शेजारी एक नवे भवन, नगर विकास भवन, महिला  व बाल विकास आयुक्तालयासाठी भवन, बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे महानगर पालिका इमारत आधी भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोनाच्या संकटाच्या काळातही या इमारतीच्या कामासाठीचा निधी कमी पडू दिला नाही आणि इमारतीचे काम थांबले नाही. इंदापूर येथील वकील हे एकविचाराने काम करतात त्यामुळे त्यांनी हे न्यायालय सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने या न्यायालयाला मंजुरी दिली, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. मारणे म्हणाले, न्यायालयीन व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाकडे मार्गक्रमण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पक्षकारांना न्यायासाठी पुणे शहरात यावे लागू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात वकील आणि पक्षकार येत असल्याने मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्यात येत आहेत. सध्या बारामती, खेड राजगुरुनगर, वडगाव मावळ आणि आज इंदापूर येथे ही न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच जुन्नर येथे न्यायालयाचे काम सुरू करण्यात येत आहे. लवकरच शिरूर येथेही सुरू करण्यात येईल. पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या ५४ लाख खटल्यांपैकी ७ लाख १० हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेत पुण्यापासून बाजूला झाल्यामुळे वकिलांनी स्वतःचा दर्जा, वकिलीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, या भागात न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या इमारतीमुळे तातडीने न्यायव्यवस्थेकडे न्यायासाठी येता येणार आहे. इंदापूरला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकार, पोलीस, वकील यांचा अमूल्य वेळ वाचणार असून या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी संधी मिळणार आहे. सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक १५३ न्यायाधीश असून एकट्या पुणे शहरात ८० न्यायाधीश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू करण्यात येत आहेत. इंदापूर येथे हे न्यायालय झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील काही दूर अंतरावरील भागातून बारामती येथे न्यायालयीन कामासाठी जावे लागण्याचा त्रास वाचणार आहे, असे सांगून पुणे शहर व जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक ॲड. गिरीश शहा यांनी केले.

कार्यक्रमास माजी आमदार विजय मोरे, यशवंत माने, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा आदी तालुक्यातील न्यायाधीश, विविध वकील संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

0000

गेटवे ऑफ इंडियावर होणार ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ उर्दू मुशायरा

मुंबई, दि.25: प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या २६ जानेवारी २०२५ रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५:३० वाजता ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या उर्दू मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उर्दू शायरी, गझल आणि सूफी संगीताचे सादरीकरण होणार असून, यामुळे उर्दू भाषा आणि सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन मिळणार आहे.

या कार्यक्रमात देशातील अनेक प्रसिद्ध शायर आणि गायक सहभागी होणार आहेत. प्रख्यात गायक सलमान अली यांचे सूफी गायन आणि सिराज अहमद खान यांची गझल सादरीकरण कार्यक्रमाची विशेष आकर्षणे असतील. त्याचबरोबर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. क़मर सुरूर फारूकी, आणि नैम फ़राज़ हे मान्यवर शायरही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. क़ासिम इमाम करतील.

कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असेल. हा कार्यक्रम सामाजिक माध्यमांवर आणि डिजिटल व्यासपीठांवर थेट प्रसारित केला जाईल, ज्यामुळे देश-विदेशातील रसिकही याचा आस्वाद घेऊ शकतील.
‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा कार्यक्रम उर्दू साहित्य आणि संस्कृतीसाठी महत्त्वाचा आहे.
०००

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,  खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्रीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते.

०००

निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

पुणे, दि. 25 : लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात श्री.कुलकर्णी बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देवून डॉ. कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्यपातळीवरील कार्यक्रम आयेाजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे; त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. समाजातील मतभेद चर्चेतून सोडविणे, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी मतदार दिवस साजरा करण्यात येतो. मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे.

राज्यात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व संबंधित शासकीय यंत्रणेचे सुमारे 16 लाख कर्मचारी काम करीत असतात. निवडणुकीच्या वेळी काम करणाऱ्या प्रत्येकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, प्रत्येक व्यक्ती सत्कारास पात्र आहे, प्रत्येकांपर्यंत निवडणूक आयोगाची भावना पोहोचली पाहिजे, यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात येतो, असेही डॉ.  कुलकर्णी म्हणाले.

मतदारांमधील उदासिनता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, लोकशाही सशक्त करण्यामध्ये निवडणुकीची भूमिका महत्वपूर्ण आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अचूक पद्धतीने पार पाडण्यासाठी गाव पातळीपासून ते भारत निवडणूक आयोगापर्यंत सर्वच अहोरात्र काम करीत असतात. यामध्ये मतदार यादी आणि मतदार हा निवडणुकीचा आत्मा आहे. त्यामुळे शहरी भागात तसेच नवमतदारांमधील उदासिनता कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्याविद्यालयांनी पुढे येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणासोबतच मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळांसारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे, याकरीता स्वत:मध्ये बदल केला पाहिजे, नवीन पिढीला त्याबाबत जाणीव झाली पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

निवडणूक यंत्रणेचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे कार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रास्ताविकात श्री. डुडी म्हणाले, मतदार जनजागृती करुन मतदार नोंदणीचे कार्य, निवडणूक यंत्रणेचे कार्य गावोगावी पोहोचविणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व लक्षात घेता मतदार जनजागृती व पात्र मतदारांची मतदारयादीत नाव नोंदणी मोहीम वर्षभर राबविण्यात यावी. निवडणूक यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांपर्यत पोहोचून ही कामे करीत असतात. गतवर्षी पार पडलेल्या निवडणुकीच्यावेळी सर्वांचा सहभाग घेवून पात्र मतदार नोंदणीचे काम चांगल्याप्रकारे झाले.

निवडणूक यंत्रणेने विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत निवडणूक यंत्रणेचे कार्य कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. आपले एक मत बहुमूल्य असून मतदान करतांना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नका, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका,  असे श्री. डुडी म्हणाले.

डॉ. चिटणीस म्हणाले, निवडणुकीच्या काळात प्रशासनासोबत ‘मतदार राजा जागा हो’ कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कार्यात एम.आय.टी. विद्यापीठाला सहभागी करुन घ्यावे.

यावेळी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार २०२५ : नंदूरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री,  लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अकोला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, हातकणंगलेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि मुंबई उत्तर पूर्वचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे

विधानसभा निवडणुकीच्यावेळी टपाली मतपत्रिकांची देवाण- घेवाण उत्कृष्ट नियोजन :  छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट मतदार सुविधा पुरस्कार २०२५: अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) संजय सक्सेना, बृहन्मुंबई शहरचे सह आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण.

लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: उत्कृष्ट निवडणूक वार्तांकन पुरस्कार २०२५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालिन संचालक राहुल तिडके, प्रभारी संचालक तथा उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे.

यावेळी मतदार जागृती दालन, सेल्फी पॉईंट, मतदार जागृती खेळ आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमाबरोबरच मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, ऑलिम्पिक महिला नेमबाज तथा निवडणूक सदिच्छादूत राही सरनोबत, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, अंतराळ उद्योजक श्वेता कुलकर्णी, तृतीयपंथी कार्यकर्ता तथा निवडणूक सदिच्छादूत गौरी सावंत, तृतीयपंथी छायाचित्र पत्रकार झोया लोबो, अमुक-तमूक यूट्यब चॅनेलचे ओंकार जाधव व सावनी वझे आणि खास रे टी.व्हीचे संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

0000

 

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...