मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 377

लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नाशिक, दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नागरिकांच्या मूलभुत गरजा लक्षात घेवून आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज देवळाली मतदार संघातील सय्यद प्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार आमदार सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, सरपंच भाऊसाहेब ढिकले माजी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी व कॅन्टोमेंट अशा तीन भागात विभागलेला आहे. या तीनही भागातील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकासकामांसाठी गेल्या अडीज वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नाशिकरोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. या न्यायालयाच्या उभारणीतून नागरिकांची सोय होणार असून वेळ वाचणार आहे. 1 हजार 500 कोटी रूपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण कामांचे आज भूमिपूजन झाले असून आवश्यक निधीही यासाठी मंजूर झाला आहे. या रस्त्यांचे दर्जेदार काम दिड वर्षाच्या कालावधीत  पूर्ण केले जाणार आहे. यासह आवश्यक ठिकाणी पाणंद रस्त्यांचे कामेही केली जाणार आहे. येणा-या काळात एकलहरे येथील विद्युत संच दुरूस्ती तसेच संत श्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज 660 कोटींच्या आरखडा प्रस्तावास मंजूरी देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले सर्व घटकांच्या विकासाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे.  44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रूपयांचे वीज बिल शासनाने भरून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून  गाईच्या दुधाला रूपये 35 हमीभाव देण्यात आला आहे. शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधीचा २ कोटी चाळीस लाख महिलांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन निर्यातबंदी उठवली. येणाऱ्या काळात सौर वीज पंपाच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज उपलब्धेतचा पर्याय उपलब्ध होणार असून याद्वारे 91 हजार 500 मेगावॅट वीज शेतक-यांना उपलब्ध होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालय 34 कोटी निधीतून साकारले जाणार असून  या रूग्णालयांच्या माध्यमातून नाशिक-पुणे  महामार्गावर होणाऱ्या अपघातातील रूग्णांना वेळेत प्राथमिक  उपचार मिळणार आहेत. देवळाली कॅन्टोमेंट बोर्डालाही यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रूपये 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून  या निधीतून लॅमरोड, देवळाली शहर या भागात रस्त्यांच्या कामांसह विविध कामे करणे शक्य झाले आहे. तसेच भगूर येथील स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी रूपये 40 कोटींच्या निधीस मान्यता प्राप्त झाला असल्याचे आमदार सरोज आहेर यांनी  प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे व सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनीही  मनोगत व्यक्त केले.

या कामांचे झाले भूमिपूजन

• राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण (मंजूर निधी रक्कम रूपये 172.89 कोटी)
• मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करणे (मंजूर निधी रक्कम रूपये  34.51 कोटी)
• देवळाली मतदार संघातील 122 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
000000

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत राज्यात चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात १२३ कोटी रुपये अनुदान वर्ग

मुंबई, दि. १५ : राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या  योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरु आहे.

0000

शैलजा पाटील /वि.सं.अ

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई,दि.15 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेऊन सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

15 ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अवर सचिव उर्मिला धारवड, कक्ष अधिकारी ऐर्श्वया गोवेकर, आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जो सर्वाधिक वाचन करतो, तो सर्वोत्कृष्ट बनतो. यामुळे मुलांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढीस लागावी, यासाठी शासनाने वाचन चळवळ सुरू केली आहे. हा महावाचन उत्सव मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येत असून मागील वर्षी राज्यातील ५१ लाख मुलांनी सहभाग नोंदविला होता. यंदा एक कोटी मुले सहभागी होतील, असे नियोजन केले आहे. मुलांनी पुस्तकाचे वाचन केल्यास जगाचे नेतृत्व करतील.

मराठी आणि जर्मन भाषेत साधर्म्य असून मराठीचे महत्व ओळखून जर्मन शिकविणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. मराठी ही साहित्य आणि संस्कृतीने समृद्ध भाषा असल्याने तिला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री. केसरकर यांनी आभार व्यक्त केले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीचा आणि मुंबईचा नागरिकांनी अभिमान बाळगायला हवा. मराठीमध्ये साहित्य, संशोधन करण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ एकाच छताखाली चारही कार्यालये आणण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन या सर्वात मोठ्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. साहित्यिक हे राज्याचे वैभव असल्याने त्यांची मुंबईत कामानिमित्त आल्यास या इमारतीमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकांचे गाव संकल्पना राबविली. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे एक गाव करण्याचाही संकल्प आहे. विश्वकोष निर्माते लक्ष्मणशास्त्री यांचे वाई (जि.सातारा) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगाव कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभाग आणि इतर प्रकाशकांनी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली. आभार आणि सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम

मुंबई, दि. 15 :- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदींसह मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार…दोन वर्षं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची!

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  साधला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद

मुंबई दि. १४ :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे  जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले.

राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार पराग शहा, सुभाष देसाई,  विद्या चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक विकास कामे, योजना राबवित आहे. या योजनांमधून नागरिकांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. या योजनांच्या, प्रकल्पांच्या पूर्तीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. विकास कामांबाबत ज्यांना काही सुचवायचे असल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे लेखी घ्यावे,असे  ते म्हणाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यपालांनी साधला संवाद

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज भवन येथे उद्योग, आदिवासी, अल्पसंख्यांक डीआयसीसीआय, तृतीयपंथी, दिव्यांग, खेळाडू आणि मागासवर्गीय यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल. या मान्यवरांनी उपस्थित केलेल्या सूचना, मांडलेले प्रश्न सोडवण्यास  संबधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे,अशा  सूचना त्यांनी  दिल्या. तृतीयपंथी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबत निर्देश दिले जातील, असे राज्यपाल महोदयांनी सांगितले. जे प्रश्न स्थानिक पातळीवरचे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावेत, असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतला आढावा

नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाची कामे संबधित यंत्रणांनी निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना दिल्या.

बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरसीएएल च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार,

कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ही कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त  वापर करावा. प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत. विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. मुंबई उपनगर जिल्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुयोग्य नियोजन व्हावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत राज्यपाल महोदयांनी मेट्रो, रेल्वे, रस्ते, म्हाडा, वन, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था या विषयीचा आढावा घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सादरीकरणातून मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे व उपक्रमांची माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरा

मुंबई, दि. १४ : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे केले आहे. तसेच जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक होणार आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून राज्यातील विविध ठिकाणी उपक्रम होतील.

सहा महसुली विभागापैकी मुंबई विभागातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा या ठिकाणी आज सायंकाळी आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, सहाय्यक संचालक संदिप बलखंडे तसेच ज्येष्ठ अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास भरभरून उपस्थिती लावली.

000

संजय ओरके/विसंअ/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १४:- हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहज, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

000

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपट्याच्या पानांद्वारे मतदार जागृती संदेश

मुंबई दि. १४ :- ‘केंद्रस्तरिय अधिकारी आपल्या दारी’ हा उपक्रम १७१- मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच झालेल्या कार्यक्रमात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ‘स्वीप’ अंतर्गत या संकल्पनेतून दसऱ्याचे औचित्य साधून शिवाजीनगर येथील स्थानिक नागरिक व मतदारांना आपट्याच्या पानांवर नैतिक मतदानाचा संदेश देण्यात आला.

आपले मत अमूल्य आहे….

दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे.. त्या निमित्ताने आपट्याच्या पानांवर ‘आपले मत सोन्यासारखे अमूल्य आहे, त्याचे मोल करू नका.. मतदान नक्की करा’, ‘आपण खास आहात आणि आपले मतही’ असे संदेश असणारे सोनं म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर यांच्या व १७१- मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री सुदाम परदेशी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या समन्वय अधिकारी मनिषा पंडित व अन्य सहकारी यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला व उपस्थित नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

—–000—–

केशव करंदीकर/विसंअ/

गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. १४ : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहेत. गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबई महानगर क्षेत्रात ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार करण्यात येत आहे. गिरणी कामगारांचे १ लाख ७४ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले असून कामगार विभागाने १ लाख ८ हजार अर्ज वैध ठरविले आहेत. गिरणी कामगारांसाठी यापुढेही जास्तीत जास्त घरे बांधण्यात येतीलअसे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

प्रकल्प प्रवर्तकांच्या निवडीसाठी स्वारस्थ अभिव्यक्ती प्रक्रीयेत पात्र ठरलेल्या (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) कर्मयोगी एव्हीपी रिॲलिटी आणि चढ्ढा डेव्हलपर्स ॲण्ड प्रोमोटर्स या पात्र प्रवर्तकांना मंत्री श्री.सावे यांच्या हस्ते हेतू पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आलेयावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री श्री.सावे म्हणाले कीसन १९८२ च्या संपानंतर बृहन्मुंबईतील ५८ बंद झालेल्या आणि आजारी कापड गिरण्यांतील गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत एकूण १५ हजार ८७० सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. म्हाडामार्फत आणखी  २८७४ सदनिकांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. उर्वरीत गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून अजून साधारणत: १ लक्ष घरांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सावे म्हणाले कीदेशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. ८१ हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहेत. ५ लाख ५० हजार रूपये शासन देणार तर उर्वरित ९ लाख ५० हजार रूपये पात्र लाभार्थी गिरणी कामगार किंवा त्याच्या वारसदारांना द्यावी लागतील. हे घर १५ लाख रूपयांत मिळणार असून पुढील ३ वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यात ३०० चौ.फूटाचे राहण्यायोग्य घरकूलकम्युनिटी हॉलबागलहान मुलांसाठी खेळण्याची जागाज्येष्ठ नागरिकांसाठी छोटे उद्यान असेलअशीही माहिती मंत्री श्री.सावे यांनी यावेळी दिली.

000

संजय ओरके/विसंअ/                         

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय

0
रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना; समाज व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास...

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

0
मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण,...

घनसावंगी मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३ : जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणी पुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता...

शिरोळ मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. १३: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव...

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात...