मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 376

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये   दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना  दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जुन बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

एकूण  9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार

राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत  एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये  सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी  47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.

 

तपशील

 

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

 

दि.30 ऑगस्ट, 2024

रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील

मतदार

दि.15.10.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या

 

1 पुरुष 4,67,37,841 4,93,33,996 4,97,40,302
2 महिला 4,27,05,777 4,60,34,362 4,66,23,077
3 तृतीयपंथी 2,593 5,944 6,031
एकूण 8,94,46,211 9,53,74,302 9,63,69,410

 

मतदान केंद्रात वाढ

सन 2019 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये 96 हजार 653 असलेली मतदान केंद्रांची संख्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 186 आहे. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42 हजार 604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57 हजार 582 आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 हजार 500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1 हजार 181 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा, प्रसाधन सुविधा, इ.पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत, फक्त मुंबई प्रादेशिक विभागामध्ये उद्वाहन असेल तर वरच्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे.

मतदानाची टक्केवारी

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

विधानसभा / लोकसभा निवडणूक पुरूष मतदान  (%) महिला मतदान (%) तृतीयपंथी मतदान (%) एकूण (%)
विधानसभा सन 2014 64.33 61.69 37 63.08
विधानसभा सन 2019 62.77 59.26 25.48 61.1
लोकसभा सन 2024 63.45 59.04 25.35 61.33

 

यंत्रणेची सज्जता

महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2 लाख 26 हजार 624 मतदान यंत्र,  एकूण 1 लाख 26 हजार 911 कंट्रोल युनिट आणि एकूण 1 लाख 37 हजार 118 व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि. 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावरील सोयीसुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आदर्श आचारसंहिता

भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात कालपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचार संहिता विधानसभा नविन सभागृह स्थापन होण्याची घटनात्मक अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे या कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिरात प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.

राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती

राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.

सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी  माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात करावयाच्या आहेत.

तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणूक संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

मतदारांसाठी सुविधा

दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6 लाख 36 हजार 278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

ही सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. दि.30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्यापपर्यंत 69 लाख 23 हजार 199 इतकी वाढ झाली आहे.

प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6 लाख इतके कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हीडिओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणाऱ्या मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

मतदारांसाठी उपयुक्त  संगणक प्रणाली  (IT Application):-

 यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने विकसीत केलेली संगणक प्रणाली पुढील प्रमाणे आहे.

सी व्हिजील (c Vigil) :- आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हीजील (c Vigil) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

सक्षम (App) :- पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लीकेशन (IT Application) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

केवायसी (Know Your Candidate) App :- मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.

इएसएमएस (ESMS App/Portal) निवडणूक अधिक मुक्त व निःपक्ष वातावरणात व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहेत. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी इएसएमएस (ESMS App/ Portal) वरुन कळविण्यात येत आहे.

1950 क्रमांकाची हेल्पलाईन

राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येईल.

विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – २०२४ दि. 25 जुन 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – 2024 अंतर्गत स्वीप उपक्रम :- या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.

परिशिष्ठ 1

दि.15.10.2024 रोजीच्या मतदार यादीतील विविध मतदारांची संख्या

अ.क्र.

 

तपशील

 

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

 

दि.30 ऑगस्ट, 2024

रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील

मतदार

दि.15.10.2024 रोजीच्या अद्यावत मतदारांची संख्या

 

1 पुरुष 4,67,37,841 4,93,33,996 4,97,40,302
2 महिला 4,27,05,777 4,60,34,362 4,66,23,077
3 तृतीयपंथी 2,593 5,944 6,031
एकूण 8,94,46,211 9,53,74,302 9,63,69,410
अ.क्र.

 

मतदारांचा प्रवर्ग

 

संख्या

 

1. दिव्यांग 6,36,278
2. सेनादलातील मतदार 1,16,355
3. 18-19 वर्ष वयोगट 20,93,206
4. 85+ वर्षावरील जेष्ठ नागरीक 12,43,192

००००

वंदना थोरात/विसंअ/

राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

दिल्लीतील कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.135/ दि.15.10.2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली, 15 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.  भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे.

असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर  29 जागा  या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत.

यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नांदेड, केरळ आणि  उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे – विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत  असल्याची खातरजमा, ‘पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट’ अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व  सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.

उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

****

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.136/ दि.15.10.2024–

 

 

ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा – डॉ.सदानंद मोरे

मुंबई, दि. 15 : लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय हा विद्वत्तेच्या क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांच्या कार्याविषयीचे साहित्य 18 खंडांमध्ये एकत्रित केले असून नवीन पिढीने अशा साहित्यिकांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन डॉ.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या चर्चेत डॉ.लवटे आणि डॉ.अशोक चौसाळकर हे चर्चक म्हणून सहभागी होते.

डॉ.मोरे म्हणाले, वाचकांनी दर्जेदार साहित्य वाचावे यासाठी अशी साहित्य निर्मिती होणे आणि ती वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ सातत्याने असा प्रयत्न करीत असून यापुढेदेखील अशी उत्तमोत्तम विषयांवर आधारित साहित्य निर्मिती केली जाईल. मंडळाकडे अतिशय कमी मनुष्यबळ असतानादेखील दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असल्याबद्दल कौतुक करुन साहित्य प्रेमींचे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.लवटे यांनी तर्कतीर्थांवरील 18 खंड हे प्रचंड कार्य असल्याचे सांगून यासाठी हजारो हातांनी संदर्भ पुरविल्याचे सांगितले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्य जीवनाविषयीचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांनी भाषण आणि इतर साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्यासाठी कधीच नकार दिला नसल्याचे तथापि पुस्तक परिक्षण मात्र ते अतिशय चोखंदळपणे करीत असल्याचे डॉ.लवटे यांनी नमूद केले. तर्कतीर्थांवरील 18 खंडांच्या प्रकाशनासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळासह शासकीय मुद्रणालयाचे आभार व्यक्त केले. विश्वकोश मंडळाच्यावतीने मराठी विश्वकोशाचे लेखन कसे झाले याबाबतचे दस्तऐवज संग्रहित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.चौसाळकर यांनी देखील तर्कतीर्थ आणि त्यांच्या साहित्याबाबत माहिती दिली. डॉ.लवटे यांनी केवळ 3-4 वर्षात त्यांचे कार्य एकत्रित करुन हे प्रचंड कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याचप्रमाणे राजारामशास्त्री भागवत तसेच आचार्य जावडेकर यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रारंभी मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मंडळामार्फत आतापर्यंत 688 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मंडळामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकावर वाचन प्रेरणा दिनानिमित्त चर्चा केली जाते, त्यानुसार आज तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सोलापूर, दि. १५ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी, सिंचन ,शैक्षणिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

           शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या आढावा बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस  अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

           राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणासह विविध मोठे, माध्यम व लघु पाणी प्रकल्पाची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्राची माहिती घेऊन त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध पिकांविषयी जाणून घेतले. तसेच जास्तीत जास्त सिंचन सुविधा उपलब्ध केल्यास शेतकरी वर्गाला त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

           जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती घेताना सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयामधील एमआरआय, सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे यासह अन्य यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू असली पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या मशीन वेळोवेळी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी वर्गाची असल्याचे निर्देश राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी दिले.

           पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामांची माहिती घेतली. भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सूचित केले.

          सोलापूर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना उजनी धरणातून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या कामाचाही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आढावा घेतला. तसेच महापालिकेला करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस विभाग जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

           प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली. यामध्ये जिल्ह्याची सर्वसामान्य माहिती, कृषी, आरोग्य, सिंचन, पाणी प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पर्यटन आराखडा आरोग्य, शैक्षणिक तसेच पारधी समाजाच्या वंचित नागरिकांना मतदार कार्ड वाटप आदी बाबत माहिती दिली. तसेच महापालिका आयुक्त श्रीमती उगले तेली यांनी हे महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे सादरीकरण यावेळी केले. शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी शहरी भागातील तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. त्याप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या वतीने राबवण्यात आलेले विविध अभ्यासक्रमाची माहिती सादर केली. तसेच विद्यापीठास शैक्षणिक उपक्रम राबवताना येत असलेल्या अडचणीची माहिती देऊन त्या सोडवण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली.

याप्रसंगी उद्योजक, वकील, आय एम ए, संपादक व अन्य मान्यवरांशी संवाद साधला.

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नाशिक, दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नागरिकांच्या मूलभुत गरजा लक्षात घेवून आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज देवळाली मतदार संघातील सय्यद प्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार आमदार सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, सरपंच भाऊसाहेब ढिकले माजी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी व कॅन्टोमेंट अशा तीन भागात विभागलेला आहे. या तीनही भागातील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकासकामांसाठी गेल्या अडीज वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नाशिकरोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. या न्यायालयाच्या उभारणीतून नागरिकांची सोय होणार असून वेळ वाचणार आहे. 1 हजार 500 कोटी रूपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण कामांचे आज भूमिपूजन झाले असून आवश्यक निधीही यासाठी मंजूर झाला आहे. या रस्त्यांचे दर्जेदार काम दिड वर्षाच्या कालावधीत  पूर्ण केले जाणार आहे. यासह आवश्यक ठिकाणी पाणंद रस्त्यांचे कामेही केली जाणार आहे. येणा-या काळात एकलहरे येथील विद्युत संच दुरूस्ती तसेच संत श्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज 660 कोटींच्या आरखडा प्रस्तावास मंजूरी देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले सर्व घटकांच्या विकासाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे.  44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रूपयांचे वीज बिल शासनाने भरून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून  गाईच्या दुधाला रूपये 35 हमीभाव देण्यात आला आहे. शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधीचा २ कोटी चाळीस लाख महिलांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन निर्यातबंदी उठवली. येणाऱ्या काळात सौर वीज पंपाच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज उपलब्धेतचा पर्याय उपलब्ध होणार असून याद्वारे 91 हजार 500 मेगावॅट वीज शेतक-यांना उपलब्ध होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालय 34 कोटी निधीतून साकारले जाणार असून  या रूग्णालयांच्या माध्यमातून नाशिक-पुणे  महामार्गावर होणाऱ्या अपघातातील रूग्णांना वेळेत प्राथमिक  उपचार मिळणार आहेत. देवळाली कॅन्टोमेंट बोर्डालाही यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रूपये 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून  या निधीतून लॅमरोड, देवळाली शहर या भागात रस्त्यांच्या कामांसह विविध कामे करणे शक्य झाले आहे. तसेच भगूर येथील स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी रूपये 40 कोटींच्या निधीस मान्यता प्राप्त झाला असल्याचे आमदार सरोज आहेर यांनी  प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे व सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनीही  मनोगत व्यक्त केले.

या कामांचे झाले भूमिपूजन

• राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण (मंजूर निधी रक्कम रूपये 172.89 कोटी)
• मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करणे (मंजूर निधी रक्कम रूपये  34.51 कोटी)
• देवळाली मतदार संघातील 122 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
000000

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत राज्यात चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात १२३ कोटी रुपये अनुदान वर्ग

मुंबई, दि. १५ : राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या  योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरु आहे.

0000

शैलजा पाटील /वि.सं.अ

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई,दि.15 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेऊन सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

15 ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अवर सचिव उर्मिला धारवड, कक्ष अधिकारी ऐर्श्वया गोवेकर, आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जो सर्वाधिक वाचन करतो, तो सर्वोत्कृष्ट बनतो. यामुळे मुलांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढीस लागावी, यासाठी शासनाने वाचन चळवळ सुरू केली आहे. हा महावाचन उत्सव मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येत असून मागील वर्षी राज्यातील ५१ लाख मुलांनी सहभाग नोंदविला होता. यंदा एक कोटी मुले सहभागी होतील, असे नियोजन केले आहे. मुलांनी पुस्तकाचे वाचन केल्यास जगाचे नेतृत्व करतील.

मराठी आणि जर्मन भाषेत साधर्म्य असून मराठीचे महत्व ओळखून जर्मन शिकविणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. मराठी ही साहित्य आणि संस्कृतीने समृद्ध भाषा असल्याने तिला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री. केसरकर यांनी आभार व्यक्त केले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीचा आणि मुंबईचा नागरिकांनी अभिमान बाळगायला हवा. मराठीमध्ये साहित्य, संशोधन करण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ एकाच छताखाली चारही कार्यालये आणण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन या सर्वात मोठ्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. साहित्यिक हे राज्याचे वैभव असल्याने त्यांची मुंबईत कामानिमित्त आल्यास या इमारतीमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकांचे गाव संकल्पना राबविली. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे एक गाव करण्याचाही संकल्प आहे. विश्वकोष निर्माते लक्ष्मणशास्त्री यांचे वाई (जि.सातारा) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगाव कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभाग आणि इतर प्रकाशकांनी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली. आभार आणि सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम

मुंबई, दि. 15 :- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदींसह मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

ताज्या बातम्या

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात...

दहावी परीक्षेच्या निकालात मुलींची वाढती टक्केवारी समाधानकारक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई, दि. १३: दहावीच्या परीक्षेत मुलींच्या यशाची वाढती टक्केवारी ही समाजातील सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर बनत असून, हे यश त्यांच्या...

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
वर्धा, दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार...

‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई,...