मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 369

महिलांना भरारी घेण्यासाठी कृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा

नांदेड दि. ३० जानेवारी : कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड,नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते असे प्रतिपादन,राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र साह्यभूत भूमिका सोडून आता या क्षेत्रातही महिलांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सारख्या केंद्रांनी आता या दृष्टीने देखील प्रयत्न करावे. अशा महिलांना आणखी प्रशिक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात गुरुवार (ता.३०) रोजी महिला मेळाव्यास त्या संबोधित करीत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी,उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प्रणीता देवरे चिखलीकर,उद्योजिका चंद्रिका चव्हाण, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका भालेराव, कर्करोग तज्ञ डॉ. सुप्रिया सोनजे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होत्या.

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून तंत्रज्ञान युगात युवतींना अनेक संधी  उपलब्ध आहेत.कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून ड्रोन पायलट बनण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली आहे,अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. त्यातून महिला आत्मनिर्भर, सक्षम व आरोग्यमय होतील, याची खात्री असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

आमदार चित्रा वाघ यांनी, हर घर शौचालय व लखपती दीदी अशा योजनांचा  महिलांनी लाभ घ्यावा. नावासमोर आईचे नाव जोडून शासनाने महिलांचा सन्मान केला आहे. कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठ एकशेबारा डायल करावा असे आवाहन केले. शासनाने लखपती दिदिसाठी अकरा कोटी तर बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. महिलांनी उभारलेल्या प्रदर्शनींना भेटी देऊन संवाद साधला. चंद्रिका चव्हाण यांनी महिलांसाठी उद्योगाच्या संधी, डॉ भालेराव यांनी स्त्रियांचे आरोग्य व डॉ. सोनजे यांनी कर्करोग निदान व उपचार तर प्रा. कुलकर्णी यांनी, निरामय, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याचा कानमंत्र दिला. यावेळी यावेळी परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

इतिहासाचा समृद्ध वारसा ‘शिवशस्त्र शौर्य प्रदर्शना’तून नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहाेचवू – अपर मुख्य सचिव विकास खारगे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार शुभारंभ

नागपूर,दि.30: महाराष्ट्राला समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व विभाग प्रयत्नशिल असून नागपूर येथे येत्या 7 फेब्रुवारी पासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटीशांच्या ताब्यात असलेली वाघनखे हे खास या प्रदर्शनाचे आकर्षण असून यासमवेत शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी संबंधीत विभाग प्रमुखांनी आपली जबाबदारी चोख बजावावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिले.

सिव्हिल लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालयात खास उभारण्यात आलेल्या सभागृहात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा  अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी घेतला.

या प्रदर्शनीच्या निमित्ताने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करुन त्यांनी संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, अभिरक्षक मयुरेश खडके, सहाय्यक संचालक संदीप शेंडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवकालीन इतिहास हा श्रध्देसमवेत प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे  जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणातील ही महत्वाची टप्पे असून एक प्रकारे ही आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक शक्तीस्थळ आहेत. या ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभवाला सातत्याने समाजापर्यंत पोहचविण्याची नितांत गरज असून यातून सामाजिक शांतता व स्वास्थ्य अधिक दृढ होते. राज्यात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई येथे वाघनख्यांसह हे शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन आपण याच उद्देशाने आयोजित केल्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या प्रस्तावित समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज सुरेश भट सभागृह येथे भेट देऊन पाहणी केली.

मध्यवर्ती संग्रहालय येथे जय्यत तयारी

झिरो माईलपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच वेळी सूमारे 50 लोकांना प्रदर्शनाची  पाहणी करता येईल. त्यानुसार गटाने प्रवेश व्यवस्था असेल. वाघनखे व शिवशस्त्रासह खुले शिल्पदालन, शिलालेख दालन पाहता येईल. खुलेशिल्प दालनामध्ये मध्य भारतातील आढळून आलेली इसवीसन पूर्व ते मध्ययुगीन काळापर्यंतची विविध  मुर्तीशिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत. शिवकालीन शस्त्र दालनामध्ये वाघनखे, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्नीबाण आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. अग्नीबाण हा राज्याच्या केवळ नागपूर येथील संग्रहालयात उपलब्ध आहे.

या ठिकाणी विविध मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. मुख्य समारंभ हा संग्रहालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर सुरेश भट सभागृहात संपन्न होईल.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. ३०: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना मिळून एकूण १ हजार २९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास व ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली.

या बैठकीस राज्याचे सर्व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही राधा, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

मान्यता देण्यात आलेल्या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा व ७०० कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १४५ कोटी रुपये, आदिवासी उपयोजनेकरिता ६३ कोटी १३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि ५३ लाख १ हजार रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात खूप ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके असून तेथील संवर्धनाचे काम सुरू आहे. ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, या आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. राज्याच्या पर्यटन विभागाकडूनही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

आदर्श शाळा उपक्रम राबवावा
पुणे जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल ३०३ शाळा अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनीही आपल्या शाळांचा अशा पद्धतीने विकास करण्याचा आराखडा तयार करून सादर करावा. या शाळांचा दर्जात्मक विकास करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घेता येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र

जिल्ह्यात पुणे मॉडेल पीएचसी अर्थात आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र १०८ उपक्रमाची चांगल्या प्रमाणे अंमलबजावणी करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘जीबीएस’ आजाराबाबत घेतला आढावा
यावेळी गुलियन बॅरे सिंड्रो अर्थात ‘जीबीएस’ आजाराबाबतही आढावाही श्री. पवार यांनी घेतला. जिल्ह्यात आज अखेर या आजाराचे १२९ रुग्ण असून पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयासह, काशीबाई नवले रुग्णालय, भारती विद्यापीठ रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आदी या उपचारांची सोय असलेल्या रुग्णालयांशी संपर्कात असल्याचे पुणे मनपा आयुक्तांनी सांगितले.

उपचाराचे अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी आपल्या रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठीची पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. उपचारांसाठी अवास्तव दर करणाऱ्या रुग्णालयांकडून उपचारांची देयके कमी करून रुग्णांना दिलासा द्यावा. दराबाबत ऐकत नसलेल्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

केंद्रीय शिष्यवृत्तीचा प्रश्न केंद्रीय स्तरावर सोडविण्याबाबत प्रयत्न सुरू- चंद्रकांत पाटील
विविध शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने शिक्षण संस्थांना येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यस्तरावरून मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या १०० टक्के शिष्यवृत्तीबाबतची पद्धती योग्यरीत्या कार्यान्वित करण्यात आली असल्याने त्यामध्ये अडचणी येत नाहीत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी मंत्री भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्यासह खासदार, आमदार यांनी विविध सूचना केल्या.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२५- २६ मराठी उपक्षेत्र निहाय प्रस्तावित नियतव्यय पुढील प्रमाणे:
कृषी व संलग्न सेवांसाठी ७१ कोटी २० लाख, ग्रामीण विकास साठी १७५ कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी २३ कोटी २६ लाख, ऊर्जा विकास साठी ८५ कोटी, उद्योग खाणकाम साठी ७७ कोटी ७६ लाख, परिवहन साठी १८५ कोटी, सामान्य आर्थिक सेवा साठी २९ कोटी, सामाजिक सामूहिक सेवा ३९० कोटी ११ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ५५ कोटी १२ लाख याप्रमाणे १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी ३ कोटी ४० लाख, ऊर्जा विकाससाठी १० कोटी १५ लाख, उद्योग साठी १० लाख, परिवहन साठी १० कोटी, सामाजिक सामूहिक सेवांसाठी १९४ कोटी ७ लाख, नाविन्यपूर्ण योजनांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपये अशा प्रस्तावित नियतव्ययास मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी १४ कोटी १५ लाख, ग्रामीण विकास ४ कोटी ८५ लाख, पाटबंधारे व पूर नियंत्रण १ कोटी ३० लाख, ऊर्जा विकास ३ कोटी ४३ लाख, उद्योग खाणकाम २० लाख, परिवहन ८ कोटी ९७ लाख, सामाजिक सामूहिक सेवा २८ कोटी ९४ लाख, नाविन्यपूर्ण योजना १ कोटी ४५ लाख अशा एकूण ६३ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह ५३ कोटी १ लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत झालेल्या खर्चाचा व कामांचाही आढावा घेण्यात आला.
0000

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील संविधान उद्देशिका प्रतिकृती, जनसंवाद कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर, दि. ३० : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या सात कलमी कृती आराखडा अंतर्गत जनसंवाद कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे व जनसंवाद कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले.

 आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाने सुरु केलेल्या घर घर संविधान अभियानानिमित्त लातूर जिह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वागतला बुके ऐवजी संविधान देवून प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती लावण्याच्या सूचनाही कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे उद्घाटना पालकमंत्री ना. भोसले यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कक्षाची निर्मिती जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून या कक्षाचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

‘झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३० :- जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून  या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि  नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरचे खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य, लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव आय एस चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, पोलिस आयुक्त, सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे सूचित करुन केईएम.जे.जे यासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरुन औषध विकत घेण्याची वेळ येऊ नये, यादृष्टीने रुग्णालयामार्फत औषध उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून झिरो प्रिस्किप्शनची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये पूरेशा प्रमाणात एमआरआय, व्हेंटीलेटर, सिटी स्कॅन मशीन्सची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे सूचित केले. केईएम मधील रुग्णांची संख्या लक्षात घेता त्याठिकाणी तातडीने नवीन अतिरिक्त एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावे,त्यासाठीची खरेदी प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी, जोपर्यंत नवीन मशीन्स येत नाही तोपर्यंत रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी वाडीया,खालसा या रुग्णालयांतून तपासणी सुविधा उपल्ब्ध करुन द्यावी. केईएमच्या खाटांची क्षमता वाढवण्यासाठी त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शताब्दी टॉवर संदर्भात लवकर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हेंटीलेटर व इतर सुविधांच्या बाबत आढावा घेऊन त्याची पूर्तता करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबई मधील रस्ते सुव्यवस्थित चांगले ठेवण्यात यावे. रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता फुटपाथवरुन सुरक्षित चालण्याची नागरिकांची जागा मोकळी करावी. पावसळ्यापूर्वी करावयाची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात यावी. रस्त्यांची डागडूजी, नालेसफाई या सर्व कामांना आत्ताच सुरवात करावी जेणेकरुन पावसळ्यापूर्वी ती योग्यपद्धतीने पूर्ण होतील. त्याचप्रमाणे लालबाग, माटुंगा, परळ याठिकाणच्या पूलांचे रिसफरिंग करावे. मुंबईतील पर्यावरणाचे संतुलन आणि हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यास कटाक्षाने लक्ष देण्यात यावे,यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबई शहरातील सर्व बागांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने चांगली संस्था नेमून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मुंबईच्या स्वच्छेतच्या दृष्टीने पुन्हा डीप क्लिन्सिंग ड्राईव्ह सुरु करण्यात यावे. महापालिकेने ससून डॉक व इतर भागातील कचरा स्वच्छ करावा. सर्व पुलांच्या खालील जागेचे सुशोभिकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे पावसळ्यापूर्वीच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्ती तसेच पुर्नविकास प्रकल्पांच्या विविध कामांसाठी ट्रान्झींट कॅम्प आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न् पूर्ण करण्यासाठी शासन विविध शासकीय गृहनिर्माण संस्थ्याच्या सहकार्याने सर्वांना परवडणारी घरे या संकल्पनेची अंमलबजावणी मोठ्या स्वरुपात करणार असून यामध्ये महिला,विद्यार्थीनी,डबेवाले,गिरणी कामगार,ज्येष्ठ नागरिक,पोलिस, या सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणार आहेत यासाठी म्हाडाची गृहनिर्माण धोरण नव्याने आणणार आहे. सर्व योजनांच्या अमंलबजावणीतून लोकांना लाभ देण्याचा उद्देश असून सर्व यंत्रणांनी कालबद्धपणे काम करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

मुंबई शहरच्या सन २०२५ -२६  वर्षासाठीच्या  एकूण  ६९०  कोटी रुपयांच्या  प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या  व्यवस्थापनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद  उपलब्ध करून द्यावी. तसेच हवेच्या गुणवत्ता लक्षात घेता  मुंबई शहरातील स्मशान भूमीत शवदहनासाठी एलपीजी, सीएनजीची व्यवस्था करावी,असे सूचित केले.

कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी   बांग्लादेशी आणि रोहिंग्ये यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच  याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याचे सूचना दिल्या. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी संदर्भात  उचित कार्यवाही करण्याचे सूचित केले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ प्रारुप आराखडा

मुंबई शहरामध्ये एकूण ११ मोठी शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये मुंबई शहरातील रुग्णांची संख्या व मुंबई शहरा बाहेरील रुग्णांची संख्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आहे, यामध्ये सर्वसाधारण आजार व गंभीर आजार अशा दोन्ही प्रकारचे सामान्य कुटुंबातील रुग्ण उपचार घेत आहेत, यासाठी रुग्णालयामध्ये औषधोपचार व यंत्रसामग्री तसेच रुग्णालयातील वॉर्डचे आधुनिकीकरण अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रुपये १३२.४७ कोटीच्या निधीस मान्यता दिली.

मुंबई शहरातील काही भागांमध्ये डोंगर उतारा खाली झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये अति सामान्य व गरीब कुटुंबे राहत आहेत यांच्या सुरक्षितेसाठी व संरक्षण अर्थ डोंगर उतारा खाली संरक्षण भिंतीची कामे घेण्यात येत आहे यासाठी  रूपये २६.९० कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली.

शासकीय महाविद्यालयाचा विकास या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ९ मोठी शासकीय महाविद्यालय मध्ये आवश्यकता सोयी सुविधा व साधन सुविधा तसेच एज्युकेशन अपग्रेशन याकरिता रुपये २५.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली.

महिला व बालविकास या विभागाअंतर्गत मुंबई शहरातील डेविड ससून डोंगरी उमरखडी येथील बालसुधार गृह इमारतींचे सक्षमीकरण तसेच येथील मैदानांचे सुशोभीकरण व बालक युवकांसाठी इतर क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, यासाठी रुपये १५.२० कोटीच्या निधीस मान्यता दिली. एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील सर्व अंगणवाडी येथे स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याचे प्रयोजन आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये आवश्यकता मूलभूत सुविधा साधन साहित्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी लागणारा आवश्यक निधी रुपये ५.२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील सर्व कोळीवाड्यांमधील पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे रंगरंगोटी व सौंदर्यकरण यांची कामे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील जीटीची बांधकामे व मजबुतीकरण करण्यात येत आहे, यासाठी रुपये ३३.२६ कोटीची रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरामध्ये एकूण ५ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून यामध्ये एक युवतींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक अल्पसंख्यांक साठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे येथील यंत्र सामग्री साठी तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी रुपये ८.२५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम व शैक्षणिक संस्थांतर्गत असलेले खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण करून मैदानी तयार करावयाचे आहेत यासाठी रुपये ५.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील युवकांना व युवतींना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करीत आहे, यासाठी रुपये ३.५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तू एशियाटिक लायब्ररी या ठिकाणी जुन्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी व त्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे , यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुपये ०.०२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

पोलीस व तुरुंग या विभागांना पायाभुत सुविधा पुरविणे यामध्ये  पोलीसांना वाहन उपलब्ध करणे, पोलीस वसाहती व पोलीस स्थानके अद्ययावत करणे,  पोलीस व तुरूंग या विभागांना साधनसामग्री पुरविणे, जिल्हा रस्ता सुरक्षा उपाय करणे, पोलीस व तुरुंग या विभागांच्या कामांसाठी रूपये ६४.१० कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्हयातील गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत शासकीय कार्यालये व शासकीय निवासी इमारतींची दुरूस्ती करणे तसेच सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभांवती संरक्षक भिंत बांधणे या कामांसाठी रूपये ४०.३६ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करणे करीता रूपये ४६.६८ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके संवर्धन करणे करीता रूपये २०.७० कोटीची निधी मागणी आहे (३% राखीव निधी) मुंबई शहर जिल्हयामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविणे करीता रूपये ३१.०५ कोटीची निधी मागणी आहे. (राखीव ४.५% शाश्वत विकास ध्येय १% सह) मुंबई शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) अंतर्गत अपारंपारिक उर्जा विकास करणे करिता रूपये २.८५ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा धारावी, सायन, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, येथील मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने रुपये २२५.१९ कोटीची निधी मागणी करण्यात आलेली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली, ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार व्यवस्थापक भागवंती मेश्राम  यांच्यासह सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली

महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी  उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह माहिती अधिकारी अंजु निमसरकर, पत्रकार निलेश कुलकर्णी  कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

००००

 

 

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

मुंबई दि. 30 : कृषी विभागाने त्यांच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा, अशा सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सूचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयात राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये आज कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, प्रधान सचिव (व्यय) साैरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांची निवड यादी गुणवत्तेवर करण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, सर्व लाभार्थ्यांना सॅच्युरेशन मोडपर्यंत लाभ द्यावा, मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांना प्राधान्य द्यावे, प्रतिक्षा यादी गुणवत्तेवर तयार करावी, मदतीपेक्षा शेतकऱ्यांच्या  शेती विकास व उत्पन्न वाढ करणाऱ्या भांडवली गुंतवणूकीवर भर द्यावा. कालबाह्य झालेल्या योजना नव्याने प्रस्तावित कराव्यात. विकेल ते पिकेल याबाबत पिक पद्धती अवलंबण्यात यावी, वन क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व उचित पिके घेता यावी यासाठी बांबू फेंसिग व योग्य पिके घेण्याचे नियोजन करुन त्यानुसार योजना तयार कराव्यात. पिक विमा, एनडीआरफ, एसडीआरएफ व नुकसानभरपाईबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा व भांडवली गुंतवणूकीवर जास्त भर द्यावा. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून राज्याच्या उत्पन्नात कशी भर घातला येईल याबाबत नियोजन करावे, उपग्रहाच्या माध्यमातून पडिक जमीन किंवा कमी उत्पन्न देणारी जमिनीबाबत उचित नियोजन करावे. उपलब्ध निधी आणि लाभार्थी यांची योग्य सांगड घालावी. राज्यात गरज असणारी पण कमी  उत्पादन असणाऱ्या पिकांचे उत्पादन वाढवावे. जी पिके शेतकऱ्यांसाठी व शासनासाठी नुकसानीची आहेत याबाबत नव्याने पर्यायी पिकांचे धोरण तयार करावे, अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, लाभार्थ्यांनी योजनांसाठी विभागाकडे येण्याऐवजी विभागाने योजना देण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, राज्यातल्या विविध क्षेत्रांनुसार योजनांची गरज ठरवण्यात यावी. सर्व योजनांमध्ये सुसूत्रीकरण असावे. लाभार्थ्यांचा शोध घेणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या गरजेनुसार योजना देऊन खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कसा होईल, असे नियोजन करण्यात यावे. कृषी विभागाच्या योजना राबवताना त्या योजनांचा राज्याच्या विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. एकाच प्रकारच्या सर्व योजना एकत्र करण्यासाठीही प्रस्ताव तयार करावा अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी यावेळी दिल्या.

या उच्चस्तरिय समितीची पहिली बैठक आज झाली. तसेच इतर सर्व विभागांचा सविस्तर आढावाही या समितीमार्फत घेण्यात येणार आहे. यानंतर विविध विभागांच्या राज्य योजना व जिल्हा योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना पोहचावेत व त्यांचे मूल्यमापन करून सुसूत्रिकरण करण्यासाठी शिफारस या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये मित्र संस्थेने केलेल्या शिफारशींचाही समावेश असणार आहे. तसेच कालबाह्य झालेल्या योजना, द्वरुक्ती होणाऱ्या योजना, जलद आर्थिक वाढ करण्यासाठी योजनांचे सुसूत्रीकरण करणे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या दृष्टीने ही समिती शासनास शिफारशी करणार आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

वाळू निर्गती धोरण २०२५ चे प्रारुप हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध

मुंबई, दि. 30 : शासनामार्फत वाळू/ रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण, दिनांक १६.०२.२०२४ व शेतामधील वाळू निर्गतीबाबतचे धोरण, दिनांक १५.०३.२०२४ अधिक्रमित करण्यात येऊन त्यामध्ये काही सुधारणा करुन प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ चे प्रारुप हरकती/ सूचनेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ च्या प्रारुपाच्या अनुषंगाने काही हरकती, सूचना किंवा अभिप्राय सूचवावयाचे असल्यास https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेस्थळावर व deskkha1-sandpolicy@mah.gov.in या ई-मेलवर शुक्रवार, दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या हरकती/ सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे महसूल विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामपंचायत हद्दीमधील जे वाळू गट निविदेसाठी प्रस्तावित करण्यात येणार नाहीत तसेच, ज्या वाळू गटास पर्यावरण अनुमती प्राप्त होणार नाही अशा वाळू गटामधून वाळूचे उत्खनन करणे, तसेच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्तीना हातपाटी-डुबी पद्धतीने विना लिलाव परवाना पद्धतीचा वापर करुन वाळू गट उपलब्ध करुन देणे. खाजगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे अथवा इतर कारणामुळे जमा झालेली वाळू निष्कासन करुन शेतजमीन लागवडीयोग्य करण्यासाठी वाळूचे निष्कासन करणे तसेच, नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुडवडा या बाबी विचारात घेऊन कोणत्याही काँक्रीटच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कृत्रिम वाळूचा वापर करणे तसेच, पर्यावरण अनुमती प्राप्त वाळू गटामधून खाडी व नदीपात्रातील वाळू गटांसाठी लिलाव प्रक्रियेचा अवलंब करुन वाळू उत्खनन करणे व मोठ्या खाणीमधील ओव्हर बर्डन मधून निघणाऱ्या वाळूचा वापर करणे यासाठी सध्याच्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

सन २०२३-२०२४ या काळावधीत वाळू निर्गतीसाठी डेपो पद्धतीचा उपयोग करुन वाळू डेपो मार्फत नागरिकांना वाळू उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेपो मार्फत वाळू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अडचणी डेपो पद्धती व लिलाव पद्धती यामधील गुण-दोष यांचा विचार करुन वाळू निर्गतीसाठी सर्वंकष सुधारित धोरण विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने हे धोरण हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

जे. जे. रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

मुंबई, दि. 30 : इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्हस् असोसिएशन (IASOWA) यांनी ग्लॉकोमा आजाराचा धोका लक्षात घेता कावसजी जहांगीर नेत्र विभाग, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह यांना ५ लाख रुपयांचे नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. याचे लोकार्पण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते २९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. ग्लॉकोमा आजाराचा सामना करण्यासाठी ओ.पी.डी. कावसजी जहांगीर नेत्र विभाग, जे. जे. रुग्णालय, यांना नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओ लेन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुगणालय समूह यांनी IASOWA चे आभार व्यक्त केले.

ग्लॉकोमा हे संपूर्ण जगात अपरिवर्तनीय पण टाळता येणारे अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे आणि ते जवळपास ८ टक्के जागतिक अंधत्वासाठी जबाबदार आहे. सन २०१० मध्ये संपूर्ण जगभरात ग्लॉकोमाचे प्रमाण ६०.५ दशलक्ष होते आणि २०२० पर्यंत ते ८० दशलक्ष झाले असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण जगभरातील ३९.३६ दशलक्ष अंध लोकांपैकी तीन दशलक्षांहून अधिक लोक ग्लॉकोमामुळे अंध आहेत.

भारत हे जागतिक अंधत्वाच्या सर्वाधिक प्रादेशिक भारासाठी (२३.५%) जबाबदार आहे. ग्लॉकोमा हा मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) आणि अपवर्तक दोष (रेफ्रॅक्टिव्ह एरर) नंतर अंधत्वाचे तिसरे प्रमुख कारण आहे. ग्लॉकोमाचे प्रमाण ११.९ दशलक्ष असून त्यात अंधत्वाचे प्रमाण ८.९ दशलक्ष आहे. ग्लॉकोमा १२.८% अंधत्वासाठी जबाबदार आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दरमहा सुमारे १५०-२०० ग्लॉकोमा रुग्ण पाहिले जातात. डोळ्यांमधील वाढलेला दाब (Intraocular Pressure – IOP) हे ग्लॉकोमाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

ग्लॉकोमा निदानासाठी वापरले जाणारे उपकरणे :

नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर (Non-Contact Tonometer – NCT) : हे एक उपकरण आहे जे डोळ्यांचा दाब (IOP) लवकर आणि डोळ्याला थेट स्पर्श न करता सहजपणे तपासते. यामुळे रुग्णाला अधिक आराम मिळतो, तांत्रिक सहायकावरील अवलंबित्व कमी होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो.

गोनिओस्कोपी (Gonioscopy) : हा एक नियमित तपासणीचा प्रकार आहे, ज्याद्वारे आईरिस आणि कॉर्निया यामधील कोन (Iridocorneal Angle) मोजला जातो. गोनिओलेंस (Gonioscope) व स्लिट लॅम्प किंवा ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने हे परीक्षण केले जाते. ग्लॉकोमाचे निदान व उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओलेंस हे ग्लॉकोमाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपकरणे आहेत.

ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह, मुंबई हे १८० वर्षांच्या गौरवशाली इतिहास असलेले एक प्रतिष्ठित आणि अग्रगण्य वैद्यकीय संस्थान आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी ही सर्वात जुनी वैद्यकीय संस्था असून, येथे वैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तसेच, या रुग्णालयात सर्वसामान्य आरोग्य सेवेपासून सुपर-स्पेशॅलिटी आणि तृतीयक आरोग्य सेवेपर्यंत रूग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवली जातात.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत 

मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन विभागाचा शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा आणि अंमलबजावणी‘ या विषयावर पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4, बुधवार दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील पर्यावरण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ग्लोबल वार्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाहरित महाराष्ट्रनिल ध्वजब्लु फ्लॅग उपक्रमनमामि चंद्रभागा व नमामि गोदावरी हे अभियानतलाव संवर्धनासाठी घेण्यात आलेले निर्णय तसेच अगामी कुंभमेळाच्या अनुषंगाने पर्यावरण दृष्टीने खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशा महत्वपूर्ण विषयावर  निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा कसा तयार करण्यात आला आहे याविषयी मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

0000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...