शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 366

मानवता, दातृत्त्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

मुंबई, दि. १०: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवता, दातृत्त्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे मूर्तिमंत असल्याचे देशाला ठाऊक होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कॅन्सर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

०००

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई दि १०: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

0000

भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला

मुंबई, दि. १०:  “उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

जगाने अनमोल रत्न गमावले

मुंबई, दि. १०: निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ असलेले अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे, अशी शोकमग्न प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पद्मविभूषण रतन टाटा आपल्या कर्तृत्वाने अजरामरच राहतील. पण त्यांचे अस्तित्व हे  आधुनिक भारतीय उद्योग जगतासाठी आधारवड ठरले होते, असे नमूद करून मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, टाटा या नावावरील विश्वास रतन टाटा यांनी आणखी दृढ केला.

टाटा परिवाराचे आणि मुंबईचे नाते अतूट राहीले आहे. रतन टाटा यांनी मुंबईवरही भरभरून प्रेम केले. मुंबईसाठी ते नेहमीच भरीव योगदान देत आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, लोक कल्याणकारी उपक्रमाला ते नेहमीच पाठबळ देत आले आहेत. रतन टाटा यांच्याकडे उद्योजकतेची विशाल दृष्टी होती. त्यातही मानवता हा केंद्रबिंदू होता, हे त्यांच्याशी संवाद साधताना लक्षात येत राहायचे. मीठापासून ते विमानापर्यंतचा उद्योग, व्यवसाय करताना रतन टाटा यांनी मातीशी, मानवतेशी असलेल्या नात्यात कधीही अंतर येऊ दिले नाही.  त्यांच्या नावाप्रमाणेच जगाने एक अमुल्य असे रत्न गमावले आहे.रतन टाटा हे नाव संपूर्ण देशाला सकारात्मक ऊर्जा देणारे, बळ देणारे  होते. ते उद्योग विश्वाचे शिरोमणी होते.  उद्योजकांच्या पिढ्यांना त्यांनी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन केले. सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय याचे रतन टाटा हे सर्वोत्तम उदाहरण होते.

भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दिवंगत टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्ववर चरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

०००

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण

कोल्हापूर, दि. ०९ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील रू.२०० कोटींहून अधिक विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच पुर्ण कामांचे लोकार्पण केले. यामध्ये आजरा भुदरगड उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण त्यांच्याहस्ते झाले. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या भुदरगड पोलीस स्टेशनच्या इमारतीचेही लोकार्पण व तहसिल कार्यालय गारगोटी या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही त्यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आजरा भुदरगड उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम ६.७७ कोटी रूपयांच्या निधीमधून पुर्ण करण्यात आले आहे. ५९ महसुली सजे, ९ मंडळे आणि २१३ गावांचा समावेश आहे. उपविभागातील दोन्ही तालुक्यांची लोकसंख्या २.७० लाख आहे. तसेच भूमिपूजन झालेल्या गारगोटी ता. भूदरगड तहसीलच्या दुमजली इमारतीच्या बांधकामासाठी १०.७६ कोटी रू. निधी मंजूर आहे. रक्कम रूपये १४.५६ कोटींच्या तहसिल कार्यागलय राधानगरी इमारतीचे भूमिपूजनही ऑनलाईन स्वरूपात यावेळी झाले.

दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचाही शुभारंभ

दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईल स्वरूपात गारगोटी येथून झाला. दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील आसनगाव गावाजवळ असून दूधगंगा नदीवर एकूण २५.४० अ.घ.फू. क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे. प्रकल्पाद्वारे कोल्हापूर जिल्हयामधील राधानगरी, भुदरगड, कागल, हातकणंगले, शिरोळ व करवीर असे एकूण ६ तालुक्यातील एकुण १२५ गावातील ४६९४८ हे. क्षेत्र व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकूण १२९८५ हे. असे एकूण ५९९३३ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पास काळम्मावाडी प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते.

दूधगंगा धरणाच्या पायथ्याशी २x१२ मेगावॅट इतक्या स्थापित क्षमतेचे जलविद्युत केंद्र कार्यान्वित असून महाजनको कंपनीकडे सन २००२ रोजी हस्तांतरित करण्यांत आले आहे. दगडी धरणामधून अनुज्ञेय गळतीपेक्षा मोठ्या प्रमाणात गळती असल्याने मुख्य अभियंता (जसं), पुणे यांनी वेळोवेळी दिलेल्या भेटीत गळती प्रतिबंधक योजना तातडीने अवलंबून धरणातून होणारी गळती अनुज्ञेय प्रमाणात आणणे बाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र पुणे या संस्थेकडून दि. १०/११/२०२१ ते दि. १३/०२/२०२३ या कालावधीमध्ये वेग वेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम लवकर हाती घेणे बाबत सर्व स्तरावरून मागणी होती. त्या अनुषंगाने गळती प्रतिबंधक उपाययोजनेचा विशेष दुरुस्ती अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर  करण्यात आला. त्याअन्वये रु. ८०.७२ कोटी रुपये इतक्या किंमतीस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आणि या कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून या वर्षीच्या हंगामामध्ये गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे कामास सुरुवात होत आहे.

०००

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूरमधून शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून शुभारंभ करण्यात आला.

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान देय आहे. राज्यात आज अखेर १७ लाख २३ हजार ३०  इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र ४० हजार २२० लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेचा गारगोटी या ठिकाणी शुभारंभ झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र युवोपचार केंद्र इत्यादीद्वारे शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी केले. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यामधून अंमलबजावणी सुरू होत आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामदेव गोपाळ भोसले व कांचन अप्पासो रेडेकर यांना तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे उपस्थितीत होते.

०००

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. ९ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे उपस्थित होते.

०००

राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. ९ ( जिमाका):  शासनाने शेतकरी, कष्टकरी ,शिक्षण, महिला यांच्या प्रश्नासोबतच राज्यातील जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील विविध वास्तूंचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले .

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, आदिल फरास , वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की,  एक लाख लोकसंख्येकरीता जेवढे डॉक्टर असणे अपेक्षित आहे तेवढे डॉक्टर सध्या नाहीत. तथापि, एक लाख लोकसंख्येसाठी किमान 100 डॉक्टरांची सुविधा देण्याच्या दृष्टीने सरकारची वाटचाल सुरू असून त्या अनुषंगाने विद्यमान सरकारने राज्यात नव्याने दहा वैद्यकीय रुग्णालयांची निर्मिती केली आहे . भविष्यात आणखी काही वैद्यकीय रुग्णालये उभारण्यात येतील. या कामाकरता निधीची कमतरता भासणार नसल्याची ग्वाही देऊन कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यातील जनतेला अद्यावत उपचारासाठी पुणे – मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सोई – सुविधा कोल्हापूरमधूनच उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असून त्याचाच परिपाक म्हणून सुमारे 837 कोटी रुपयांच्या विविध कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच जिल्ह्यातील जनतेसाठी अद्यावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. या 837 कोटी रुपयांमध्ये 600 खाटांचे  सामान्य रुग्णालय  इमारतीचे बांधकाम , 250 खाटांचे कर्करोग रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 250 खाटांचे अतिविशेष उपचार रुग्णालय इमारतीचे बांधकाम, 100 खाटांचे आरोग्य पथक स्थापन करणे, अंतर्गत रस्त्याचे काँक्रीट / विद्युतीकरण , संकुलातील वाहनतळ न्याय वैद्यकशास्त्र विभागकरिता इमारतीचे बांधकाम, जमिनीचे सपाटीकरण – सुशोभीकरण करणे , टेबल टेनिस /बास्केटबॉल / बॅडमिंटन वॉल कोर्ट आदी बांधकाम त्याचबरोबर पाच विद्यार्थी वस्तीगृहाचे बांधकाम अशा स्वरूपाचा विविध कामांचा समावेश आहे . हे सर्व बांधकाम 30 एकरातील विस्तीर्ण अशा जागेवर करण्यात येणार आहे .

०००

जागतिक स्पर्धेसाठी बँकांनी तयार रहावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर दि ९ (जिमाका):  कोल्हापूर जिल्ह्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सहकार चळवळ रुजवली .त्यांच्या योगदानामुळेच तत्कालीन कालखंडात सुमारे 37 सहकारी संस्था उभ्या राहिल्या. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना 1938 सालची असून विद्यमान संचालकांच्या सचोटीमुळे सध्या ही बँक सुस्थितीत आहे. तथापि, यात समाधान न मानता जागतिक स्पर्धेसाठी या बँकेसह राज्यातील इतर बँकांनी तयार राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक , खासदार धैर्यशील माने, बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , आमदार राजेश पाटील माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संजय घाडगे, माजी आमदारअमोल महाडिक आदी उपस्थित होते .

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारत व इ – लॉबीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले . ते पुढे म्हणाले, येथील शेतकरी कष्टाळू आहे. बँकेमार्फत घेतलेले कर्ज तो वेळेत फेडतो. ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणजे ही बँक असून ई-लॉबी सुविधा सुरू करणारी ही राज्यातील पहिली बँक असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. तसेच सहकार व राज्यातील बँकांचे प्रश्न केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या मदतीने सोडवणार असल्याचे सांगून आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल्याचे सांगितले .

बँकेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात 191 शाखा सुरू असून आतापर्यंत सुमारे 204 कोटीचा ढोबळ नफा या बँकेला झाला आहे .जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना या बँकेने सढळ हाताने कर्जपुरवठा केला आहे .आतापर्यंत सातत्याने अ वर्ग मिळवला असून नोटबंदी कालावधीतील सुमारे 25 कोटी रक्कम पुन्हा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . तर या बँकेत सुमारे 9500 कोटी रुपयांच्या ठेवी असून सध्या बँक सुस्थितीत असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार राजू आवळे यांनी दिली .

सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन पाच मजली इमारत बांधली असून धनादेशाच्या  वठणावळीसाठी अगदी सुट्टीच्या दिवशीही बँक सुरू राहणार आहे .या नवीन इमारतीमध्ये अकाउंट , एटीएम ,क्लिअरिंग , गुंतवणूक , साखर कारखाना तसेच व्यक्तिगत कर्ज पुरवठा ,गुंतवणूक आदी विभाग या नवीन इमारतीमध्ये कार्यरत राहणार आहेत .इ – लॉबी सुविधेमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा – सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत . यावेळी या इमारतीचे आर्किटेक्चर ,इंजिनियर , सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर , फर्निचर फिक्चर कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी बँकेच्या संचालकासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

०००

 

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. ९ (जिमाका) : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

दसरा चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आदी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शाहु महाराजांच्या भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली. शिक्षण, सहकार आदिंची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोल्हापूरची उद्योगनगरी म्हणून ओळख असून, खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी काम करत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथे कन्वेंशन सेंटर उभारण्यासाठी 277 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. अमृत 2.0 योजना पहिल्या टप्प्यासाठी 152 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या दुसरा टप्प्यासाठी 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करण्यासाठी 25 कोटी अशा माध्यमातून कोल्हापूरचे विकास प्रकल्प पुढे नेत आहोत, असे ते म्हणाले.

कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी महापालिका प्रशासनास केल्या.

उपस्थित महिलांना नवरात्रीच्या, आगामी दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या महापुरावेळी आपण आलो होतो. त्यावेळी कोल्हापूरकरांचे मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा पाहिला. इथल्या मातीत प्रेमाचा ओलावा आहे. त्यावेळी आरोग्यमंत्री या नात्याने साथीचे रोग पसरू नये, यासाठी वेळीच उपाययोजना केल्या होत्या. तसेच, अन्नधान्य, चारा, पाणी आदी सर्व आवश्यक गरजा पूर्ण केल्या होत्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विकासाबरोबरच कल्याणकारी योजनाही राज्य शासन राबवत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यात 17 हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असून या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते दिले आहेत. ऑक्टोबर व आगामी नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आता महिलांना लखपती करण्याचे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी योजनेतून 5 कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला. मुख्यमंत्री युवा कार्य योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण योजना, लेक लाडकी, बसप्रवासात सवलत अशा अनेक योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील सर्व गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरसाठी भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले. तसेच, 2019 च्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचे स्मरण केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महालक्ष्मीची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन विश्वराज जोशी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामांचा तपशील

कोल्हापूरच्या विकासासाठी जवळपास चार हजार कोटींच्या विकास कामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. ती पुढीलप्रमाणे – कोल्हापूर सांगली जिल्हा पूरनियंत्रण करणे – 3 हजार 200 कोटी, आंतराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे – 277 कोटी, अमृत 2.0 योजना पहिला टप्पा – 152 कोटी, अमृत 2.0 योजना दुसरा टप्पा – 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करणे – 25 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे – 25 कोटी,  पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे – 2 कोटी 50 लक्ष, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे – 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे – 7 कोटी, शहरात ठिकठिकाणी हेरिटेज लाईट बसविणे – 1 कोटी 50 लक्ष, रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाऊंटेन उभारणे – 5 कोटी, रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करणे – 3 कोटी 31 लक्ष, रंकाळा तलाव येथे मिनिचर पार्क तयार करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती करणे नुतनीकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष,

सिध्दार्थनगर येथे पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 74 लक्ष, अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराअंतर्गत म्युझिकल हेरिटेज स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष, छत्रपती शिवाजी स्टेडिअम सपाटीकरण करण्यासाठी 2 कोटी, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 31 बाजारगेट अंतर्गत श्री निरंजन संस्था तालीम मठ येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करण्यासाठी 3 कोटी.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध गार्डनमध्ये बैठक व्यवस्था (बेंचेस) बसविण्यासाठी 4 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये ओपन जिम व उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर शहरात ओला, सुका, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी वेट आणि ड्राय गारबेज कलेक्टर बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष.

कोल्हापूर महानगरपालिका प्र.क्र. 1 शुगरमिल अंतर्गत कसबा बावडा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 56 मधील म.न.पा.चे. रि.स. नं 462 येथील (ओपन स्पेस) संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष. शाहू उद्यान विकसित व सुशोभिकरण करण्यासाठी 1 कोटी,  कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन करण्यासाठी 3 कोटी 30 लक्ष.

०००

ताज्या बातम्या

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

0
‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार...

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन...

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

0
कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो...

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

0
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” - शिबाशिष सरकार सर्जनशीलतेत...

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

0
भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे -  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन मुंबई,...