शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 367

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प  –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ११  (जिमाका): सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज वाशी, नवी मुंबई येथे काढले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, श्री. मुरलीधर मोहोळ, नागरी उड्डाण राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ, महाराष्ट्र भवन, नैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामे, ठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका), पश्चिम परिघीय (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमिपूजन; 18 होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स व सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्घाटन आणि ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, गणेश देशमुख, कोसिड,  दिलीप ढोले यांच्यासह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विमानांच्या यशस्वी लॅंडिंग व फ्लायपास्टकरिता सिडको व अन्य संबंधितांचे अभिनंदन केले. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. याप्रसंगी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच सिडकोच्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजय सिंघल यांनी सिडकोच्या प्रकल्पांविषयी संक्षिप्त माहिती दिली.

०००

 

महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी, आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड दि. ११ (जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. ही घटना महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी असून आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार सर्वश्री श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार सर्वश्री गणेश नाईक,  प्रशांत ठाकूर, महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह डॉ. इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  C295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते.

यावेळी माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे नमूद करून या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे.
“मार्च २०२५ मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच सिडको ने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील असा विश्वास श्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रवाशांसाठी फायदेशीर प्रकल्प – उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस

नवी मुंबई विमानतळाच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरुन दरवर्षी अंदाजे 9 कोटी प्रवासी प्रवास करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शिवडी न्हावाशेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे.

०००

 

८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची १२ नोव्हेंबरला परतफेड

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड ११ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १२ नोव्हेंबर, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.४३ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे – रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

विजयादशमीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.        यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता  घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

Governor C. P. Radhakrishnan greets people on Vijayadashmi

Mumbai, 11 Oct : The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan has greeted the people on the auspicious occasion of Dussehra or Vijayadashmi. In his message, the Governor has said: “The festival of Vijaya Dashmi or Dussehra symbolizes the victory of goodness over evil. The festival reassures that Truth shall always prevail.  May the festival bring peace, bliss and prosperity to all.  I extend my heartiest greetings to the people on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

0000

 

 

‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी : नव्या ७ हजार गावांचा समावेश – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya
  • केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविणार
  • हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी
  • विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी

मुंबई दि. १० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी, राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 21 जिल्ह्यातील 6959 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.

राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकीत भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल. यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना कृषि विभाग करेल. यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रासाठी मंजूर अतिरिक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे. हळदीवरील संशोधनासाठी तसेच निर्यातक्षम उत्पादन बनवण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी विशेष बाब म्हणून निर्बंध शिथील करून मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा झाला. 50 टक्के पदे ही त्याच विद्यापीठांच्या बाधित प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव ठेवण्यात येतील. चारही कृषि विद्यापीठांत 3 हजार 232 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून, यामुळे बाधित झालेल्या कुंटुंबातील पात्र उमेदवाची यात भरती करण्यात येईल. ही विशेष भरती प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेचा निर्णय, समांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण याची सांगड घालण्यात येईल, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’

मुंबई, दि. १० : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था/ मंडळे, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण

नवी दिल्ली, दि. 10 : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 31,962 कोटी रुपये, बिहारला 17,921 कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला 13,404 कोटी रुपये मिळाले आहेत.

हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.131 / दि.10.10.2024

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर; पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. १० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्प‍िटल, आठवा मजला, चर्नी रोड येथे ४ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतर झाले आहे.

या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाऊंडेशन ट्रस्ट, आयुर्वेदिक हॉस्प‍िटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई- ४०० ००२ या पत्त्यावर करण्यात यावा. तसेच या बदलाची सर्व अधिनस्थ कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथ, माध्य.) जिल्हा परिषद, मनपा, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या १८६ पदांच्या पदनिर्मितीस मान्यता

मुंबई, दि. 10 : धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे  प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे,  योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण 186 धर्मादाय आरोग्य सेवकांची बाह्यस्त्रोताने नेमणूक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विभागामार्फत घेण्यात आला आहे. ही पदे धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत.

धर्मादाय रुग्णालये योजनेची अंमलबजावणी करीत असतांना सद्यस्थितीत संबंधित धर्मादाय रुग्णालयांमार्फतच वैद्यकीय समाजसेवकाची नेमणूक करण्यात येत होती. हा समाजसेवक रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामार्फत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची उचित माहिती न मिळणे, अनावश्यक कागदपत्रे मागणे, योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना, ऑनलाईन प्रणाली, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पालाईनसह आरोग्य सेवकांची पदभरतीची सुधारणा केली आहे. 

आरोग्य सेवकांच्या पदभरतीमुळे धर्मादाय रुग्णालये अधिकाधिक लोकाभिमुख होतील. रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची योग्य माहिती, त्यांच्यावर केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे उपचार करण्यात येतील. खऱ्या गोर-गरीब गरजू रुग्णांना योजनेनुसार उपचार मिळणे सुलभ होईल.   धर्मादाय रुग्णालयाकडून रिक्त खाटांची वेळोवेळी अद्यावत माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येत आहे किंवा कसे याबाबत धर्मादाय आरोग्य सेवक यावर लक्ष ठेवतील. योजनेची अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाच्या स्थापनेपासूनच  कक्षाच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 पर्यंत 418 रुग्णांना या योजनेचा लाभ उपलब्ध करुन घेण्यात आला. यासाठी 13 कोटी 25 लाख रुपये रकमेचे उपचार रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात सहजतेने उपलब्ध झाले आहेत. राज्यातील हिंगोली जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयांचे जाळे पसरले आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12,000 बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, एन.एन रिलायन्स, बाई जेरबाई वाडीया, डॉ.बालाभाई नानावटी हॉस्पीटल, ब्रीट कॅण्डी हॉस्पीटल, दि बॉम्बे हॉस्पीटल, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, डी.वाय.पाटील हॉस्पीटल, के.ई.एम. हॉस्पीटल, सह्याद्री हॉस्पीटल, संचेती हॉस्पीटल, जहांगीर हॉस्पीटल इत्यादी मोठ्या रुग्णालयांचाही समावेश आहे

नागरिकांना वैद्यकीय आपत्तीच्या काळात धर्मादाय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचार मिळावेत याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा 1800 123 2211 या क्रमांकावर उपलब्ध असणार असून या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णांना योजनेबाबतची संपूर्ण माहिती 24×7 उपलब्ध होणार आहे.

तसेच https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट दिल्यावर धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या आदी  माहिती मिळणार आहे, असे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

अनुसूचित जाती-जमाती राज्य आयोग सामाजिक न्यायासाठी कार्यरत – उपाध्यक्ष ॲड्. धर्मपाल मेश्राम

मुंबई, दि. १० :- अनुसूचित जाती – जमातीच्या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी जलदगतीने सोडविण्यासाठी आयोग कार्यरत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आयोग न्यायप्रक्रिया राबवित असल्याचे अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने राज्य आयोग समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना शासनाने अंमलात आणल्या आहेत. आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे कार्यरत असून प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी त्यांचे सहकार्य महत्वाचे आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपाध्यक्ष मेश्राम म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आज प्राप्त तक्रारीबाबत सुनावणी घेण्यात आली आहे.  राज्य शासनाने आयोगासाठी केलेल्या निधीच्या तरतुदीचा समाजाला न्याय देण्यासाठी योग्य वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुसूचित जाती जमाती संदर्भातील तक्रारी तसेच या प्रवर्गातील शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी https://sjsa.maharashtra.gov.in/en/maharashtra-state-commission-sc-st या संकेत स्थळावर आपल्या तक्रारींची नोंद करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्विकारणे व तपास करणे. अनुसूचित जाती/जमातीचे कल्याण, आरक्षण, संरक्षण, विकास संबंधी इतर बाबी राज्य शासनाकडून ठरविण्यात येतील त्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत आयोग कार्यरत आहेत.  

राज्य आयोगाचे अध्यक्ष आनंदराज अडसूळ यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले. अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाकडे प्राप्त १५ तक्रारीवर आज वरळी येथील आरे दुग्ध शाळा इमारतीतील राज्य आयोगाच्या कार्यालयात सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष श्री. मेश्राम बोलत होते. यावेळी पोलीस निरिक्षक सोनम पाटील, रमेश वळवी, संसदीय अधिकारी रत्नप्रभा वराडकर उपस्थित होते.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...