शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 365

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

जळगाव दि. 11 ( जिमाका ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथील सोनबर्डी टेकडी परिसर विकास अंतर्गत शिवस्मारक (शिवसृष्टी) आणि भीमस्मारक ( भीमसृष्टी ) लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ. सुरेश ( राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जामनेर शहरात जी भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी आपण निर्माण केली आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देव, देश आणि धर्मावर सातत्याने आक्रमण होत असताना, महिलांची विटंबना होत असताना.  सर्व सामर्थ्याने लढा देऊन रक्षण केले आणि स्वराज्य स्थापन केले. अशा आपल्या राज्यांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष असताना अशी भव्य शिवसृष्टी निर्माण केली हे अत्यंत आनंददायी आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य काय असतात हे संविधानातून दाखवून दिले. अशा या महामानवाच्या विचाराचे सदैव स्मरण करू देणारी भीमसृष्टी उभी केली.

या शासनाने शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या,महिलांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आखल्या म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या विचाराने वाटचाल करत आहोत आणि पुढेही असेच काम करत राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे हे आम्हा जामनेरकरांचे स्वप्न होते ते आज पूर्णत्वास आले असून थोड्याच दिवसात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप, वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक तसेच संत सेवालाल महाराज यांची सृष्टी तयार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जामनेर शहरात उभे असलेले दोन्ही स्मारकं आणि जामनेर तालुक्याचा झपाट्याने होणाऱ्या विकास यावेळी अधोरेखित केला. खा.छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही ग्रामविकास मंत्री यांच्या कार्याचे कौतुक करून भव्य स्मारक उभं केल्याबद्दल अभिनंदन करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

कशी आहे शिवसृष्टी

▪️छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती साधारणतः १६ फुट उंचीचा ब्रांझ धातुचा पुतळा व सिहासन ३२ फुट आहे

▪️हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या नगारखानासहित वाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकार केली आहे.

▪️या मराठामोळ्या शैलीच्या वाड्याची लांबी १०० फूट आहे आणि यात तळ मजल्यावर १२ खांब आणि पहिल्या मजल्यावर २४ खांब आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी ५० फूट असून उंची वाड्याची तटबंदी धरून साधारण ३८ फूट आहे.

कशी आहे भीमसृष्टी

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती साधारणतः १५ फुट उंचीची संविधान घेतलेली आणि राष्ट्राला उद्देश करत असलेली ही पूर्णाकृती भव्य मूर्ती साकार केली आहे.

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २४ मुद्रा या त्यांना असलेल्या २४ उपाध्यांसहित कायमस्वरूपी अशा स्टील प्लेट्सवर महान विभूती गौतम बुद्धांच्या बोधिवृक्षाच्या पिंपळ पानांवर केल्या आहेत.

▪️डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीमागे संविधान चक्र केले असून त्यामागे बोधिवृक्ष साकार केला आहे. यातून महान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते.

00000

महोदय ! आपण आमच्या भावना जाणून घेताहेत याचा आनंद आहे…

नांदेड दि. ११:  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना, संस्था अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद साधला. अडीच तास ते ऐकत होते. काय करता येईल यावर उपाय सांगत होते. बदल घडविण्याचे उपाय करण्याचे सूतोवाच करत होते. त्यामुळे अनेक शिष्टमंडळांनी राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीने आम्हाला शांततेने ऐकून घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली.

राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज संवाद कार्यक्रमासाठी अमरावतीवरून विमानाने नांदेड विमानतळावर सायंकाळी 5 वा. दाखल झाले. याठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात आली. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांनी लगेच संवाद कार्यक्रमाला सुरूवात केली. सर्वप्रथम नांदेड येथील खासदार तसेच यापूर्वीच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादाला राज्यसभेचे सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भिमराव केराम, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधरराव पटने यांची उपस्थिती होती. या शिवाय विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या शिष्टमंडळाने पिकविमा योजनेच्या व्याप्तीमध्ये व प्रभावात वाढ करण्यात यावी. नांदेड येथून मुंबई विमान प्रवासाची सुविधा, नांदेड-लातूर, नांदेड-बिदर रेल्वे, आदिवासी भागातील विकासाला वनविभागाच्या कायदाचा अडसड, लेंडी प्रकल्पाचे दीर्घकाळापासून रेंगाळणे, बाभळी बंधाऱ्याचा मोबदला न मिळणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅजेटचा आधार घेणे, नदीकाठच्या गावांमध्ये बाबु उत्पादन वाढविणे, मुस्लिमांना शिक्षणाच्या संधीमध्ये आरक्षण देणे, धार्मिक भावना भडकविणारी व्यक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच मोठ्या उद्योग समुहांना नांदेडमध्ये आमंत्रित करावे अशा विविध विषयांची मांडणी यावेळी केली.

दुसरे शिष्टमंडळ शासकीय अधिकाऱ्यांचे भेटले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील विविध योजनांची सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, महिलांच्या योजना  यासंदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

तिसरे शिष्टमंडळ हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी विविध समस्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून तर गोशाळेला मिळणारे अनुदान गोपालकांना का नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न चर्चेला आले. त्यानंतर वैद्यकीय व्यवसायातील वरिष्ठ व नामांकित डॉक्टरांचे पथकाने या व्यवसाय व नांदेड मधील समस्या व त्यावरील उपाययोजनेवर चर्चा केली. त्यानंतर उद्योग व्यवसायातील मान्यवरांनी आपल्या समस्या व मागण्या सादर केल्या. नांदेड जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व देणाऱ्या विविध मान्यवरांशी देखील राज्यपालांनी चर्चा केली. पॅरॉऑलिम्पिक मधील प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळांडूसोबत राज्यपालांनी यावेळी फोटोही घेतले.

माध्यम प्रतिनिधींसोबत राज्यपालांची चर्चा झाली. विद्यापिठातील वेगवेगळे अध्यासन, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, आदिवासींच्या समस्या, रेल्वेमधील बंद झालेले आरक्षण, मुस्लिमांसाठी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना, कम्युनिटी किचन आदी विषयांवर राज्यपालांशी पत्रकारांनी चर्चा केली. यामध्ये नांदेड येथील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रातिनिधीक सहभागात मान्यवर माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्यपालांच्या या बैठकीमध्ये माध्यम प्रतिनिधींनी राज्यपालांच्या संवाद कार्यक्रमाबद्दल कौतूक केले.

सामान्य माणसासाठी संवाद

सामान्य माणसाला मुंबईमध्ये भेटण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे विविध क्षेत्रातील प्रातिनिधीक मंडळींना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन भेटण्याचा अशा संवादातून आनंद मिळतो. समस्या कळतात. राज्य शासनाला काही बाबी लक्षात आणून देता येतात. राज्यपालांच्या अधिकारामध्ये असणाऱ्या बाबींची अंमलबजावणी करता येते. त्यामुळे हा संवाद कार्यक्रम सुरू केला आहे, असे राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले. नांदेडमधील जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी यावेळी कौतुक केले.

जिल्हाधिकारी झाले अनुवादक

राज्यपालांना मराठी व हिंदीमध्ये संवाद साधण्यास अडचण भासू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अनुवादकाच्या भुमिकेत आले होते. राज्यपालांना प्रत्येकाला आपल्या भाषेतच संवाद साधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी, राज्यपाल आणि इंग्रजी शिवाय अन्य भाषेमध्ये संवाद साधणाऱ्या जनतेतील सेतू झाले होते.

०००

नांदेड विमानतळावर राज्यपालांचे स्वागत

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर सायंकाळी ५ वा. आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विमानतळावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.

०००

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची १२ व १४ ऑक्टोबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात बाष्पके संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम या विषयावर बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्र हे बाष्पक उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. बाष्पक सयंत्र हे वाफेशी संबंधित आहे. हे ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मिती इत्यादीसाठी वापरले जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. बाष्पक हे अत्यंत उपयोगी जरी असले तरी त्याच्या स्फोटकतेमुळे ते धोकादायकही ठरु शकते. यासाठी शासनस्तरावर बाष्पके संचालनालयामार्फत घेतलेले धोरणात्मक निर्णय, बाष्पकांच्या सुरक्षित व प्रभावी वापराकरिता जनजागृती, तसेच बाष्पकं हाताळतांना जिवीत व वित्तहानी होवू नये याकरिताचे प्रयत्न याबाबत सहसंचालक श्री. वानखेडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 12 आणि सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्वेता शेलगावकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

केशव करंदीकर/वससं/

मनोरा आमदार निवास समोरील चौकाचे उद्या विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. ११ : मनोरा आमदार निवास, नरीमन पॉईंट, येथील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४.०० वाजता विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामकरण निर्णयामुळे मातंग समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून या निर्णयाचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात येत आहे. मनोरा आमदार निवास समोरील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी पूर्ण व्हावी यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उद्याच्या या समारंभाची जय्यत तयारी सुरू असून सर्वांनी मनोरा आमदार निवास समोरील चौकात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवघे ४९ वर्षांचे आयुष्य साहित्यरत्न अण्णाभाऊंना मिळाले, पण या अल्पकाळात त्यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले. प्रतिकूलतेशी टक्कर देत जबरदस्त जीवन इच्‍छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतात “जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव !” या त्यांच्या काव्यपंक्ती समताधिष्ठीत समाजरचनेसाठी आपल्याला लढण्याचे बळ देतात. “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली…” महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले गाव, कुंटुंब यांना दूरावत मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्यांच्या मनातील व्यथा अण्णाभाऊंनी या लोकगीतातून अतिशय नेमकेपणाने व्यक्त केली आहे. हे लोकगीत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाप्रसंगी अनेकांच्या ओठावर होते. आपल्या लेखणी आणि वाणीने मराठी साहित्यविश्वात शोषितांचा आणि वंचितांचा आवाज बुलंद करणाऱ्या या महान लेखकास आणि समाजसुधारकास मी अभिवादन करतो, या चौक नामकरणामुळे आदरणीय अण्णाभाऊंची प्रेरणादायी स्मृती चिरंतन स्वरूपात जपण्यात येत आहे, अशी कृतज्ञ भावना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.

०००

श्री. किरण वाघ/विसंअ/

अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

जळगाव, दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्त) : राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात केले.

महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला मेळावा आज अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच महिला उपस्थित होत्या.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की,  राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

आज अमळनेर येथे 1760 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. राज्य शासनाने पाडळसरे धरणाकरीता 4890 कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील शेतीला बारामाही पाणी उपलब्ध होणार आहे. लोअर तापी प्रकल्प पाडळसरे अंतर्गत  उपसा सिचन योजना क्रमांक 1 ते 5 चे भूमीपूजन आज होत असून यामुळे 25 हजार 657 हेक्टर  जमीनीस पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे येथील  शेती सुजलाम सुभलाम होणार आहे.राज्य शासनाने अमळनेरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला असून गावागावात रस्ते, सिंचन,बंधा-याचे काम होत आहे. पुर्वी अमळनेर मध्ये दहा  दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. नगरोत्थान महाअभियान योजनेतंर्गत अमळनेर शहरवासीयांना आता 24 तास पाणीपुरवठा होणार आहे. असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, राज्य शासनाने महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळ हे नफ्यात आले आहे. शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. पाडळसरे धरणासाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच येत्या एक दोन महिन्यात पाडळसरे प्रकल्प हा बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ठ करण्यात येईल. गत दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विकास कामे केली असून जनसामान्यांच्या पाठीशी ऊभे राहणारे सरकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन

✅    लोअर तापी प्रकल्प पाडळसरे, ता.अमळनेर जि.जळगाव अंतर्गत उपसा सिंचन योजना 1 ते 5 मध्ये 25 हजार 657 हेक्टर जमीन सिंचनासाठी पाईपद्वारे पाणी पुरवठा वितरण नेटवर्कचे पंप हाऊससह बांधकाम करणे रु. 1010.19 कोटी.

✅     नगरोत्थान महाअभियान योजनेतर्गत अमळनेर शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा योजना 197.00 कोटी

✅    राष्ट्रीय महामार्ग 39 ते जांभोरा ढेकू सारबेटे हेडावे अमळनेर शिरसाळे तरवाडे वावडे मांडळ रस्ता प्रजिमा 51 कि.मी  47.68 कोटी

✅    हायब्रीड अन्युटी अंतर्गत आमलाड- मोड- शहादा- सांगवी – हातेड अमळनेर पारोळा रस्ता  सुधारणा करणे 206.00 कोटी

✅    वावडे जानवे बहादरपूर पारोळा कासोदा रोड प्रजिमा 46 मि 14 ते 38/900 ची सुधारणा करणे 130 कोटी

✅   आपत्ती सौम्यीकरण कामे पूर प्रतिबंधक कामे, आर्च पुलाचे बांधकाम करणे, दुष्काळ प्रतिबंधक कामे अंतर्गत 110.54 कोटी

✅    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 58.99 कोटी रस्ता कामांचे अशी एकूण 1760.40 कोटी रुपयांच्या कामांच्या भूमिपूजन श्री.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

00000

ताडोबात येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवाप्रमाणे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 11 : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, अशी भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकॅडमीचे संचालक एम.एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू, उपसंचालक (बफर) पियुषा जगताप, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रसिध्द डॉक्टर तथा निसर्गप्रेमी रमाकांत पांडा, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, अरुण तिखे, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, पद्मापूरच्या सरपंच आम्रपाली अलोने आदी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज अतिशय आनंदाची बाब आहे. चंद्रपूर नेहमीच पुढे राहावा, असाच आपला प्रयत्न असतो. वाघ हा पर्यावरणाचा मित्र असून ताडोबा ही आपल्याला परमेश्वराची देण आहे, त्याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. वाघाचे संरक्षण केले म्हणूनच जिल्ह्यात वाघ वाढले. चंद्रपूर पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर आपण चंद्रपुरात सफारी करीत आहोत. सफारीसाठी आलेले पर्यटक सैनिक शाळा, आर्मी म्युझियम, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, एसएनडीटी विद्यापीठ, आदींचा आनंद घेऊ शकणार आहेत. चंद्रपुरात वाघांची संख्या सर्वाधिक आहे.

चंद्रपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. मोहर्ली, ताडोबा, बफर झोन, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने काम करीत आहोत. तसेच प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपण सर्वजण मिळून ताडोबाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करुया. यासाठी सर्व वनमजूर, वन अधिकारी, वनरक्षक, वनसेवक, रोजंदारी करणारे कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.

जिप्सी असोसिएशनला 25 लक्ष देणार : वन विभागात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एफडीसीएमच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना राहिलेला फरक देण्यात आला आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन देण्यासाठी आपण आग्रही भूमिका मांडली. तसेच ताडोबा फाउंडेशन मधून जिप्सी असोसिएशनला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिप्सी असोसिएशनची वागणूक चांगली असली तरच पर्यटकांचे समाधान होईल व जिल्ह्याचे नाव उंचावेल.

निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव : प्रसिद्ध उद्योगपती स्व. रतन टाटा यांचे चंद्रपूरशी व्यावसायिक नाते नाही. तरीही त्यांचे चंद्रपूरसोबत वेगळेच ऋणानुबंध होते. रतन टाटा यांनी राज्यपालांच्या राजभवनात मोर संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी 25 कोटी दिले. सरकार आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर येथे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभे राहत आहे. त्यासाठी टाटांनी 100 कोटीची देणगी दिली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आर्किटेकसाठी टाटा यांनी 3 कोटी दिले. कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी येथील 90 गावे दत्तक घेतली. स्व. रतन टाटा यांचे स्मारक चंद्रपुरात करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्याचवेळी निसर्ग माहिती केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.

ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांना धनादेश वाटप : यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांना प्रत्येकी 3 लक्ष 50 हजारांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात खुंटवडा, भोसरी, काटवल, वडाळा, कोकेवाडा, बिलोडा, किन्हाळा, सोनेगाव, आष्टा, निंबाळा, चेकबोर्ड, मामला, हळदी, अर्जुनी, वायगाव, झरी, घंटाचौकी, दुधाळा, मोहर्ली, घोडेगाव, मुधोली, आगरझरी, सितारामपेठ, भांबेरी आदी गावांचा समावेश होता.

गुराख्यांना स्मार्ट स्टिकचे वाटप : यावेळी गुराख्यांना वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मार्ट स्टिकचे वाटप करण्यात आले. यात मारुती जांभुळे, गणेश श्रीरामे, बुद्रुक कुलसंगे, अंकुश केदार, नरेंद्र डडमल, प्रकाश कन्नाके, लक्ष्मण तोफे, जयंत गडमल, विश्वनाथ मरसकोल्हे, मारुती आत्राम, राहुल आत्राम, वासुदेव सिडाम, परशुराम मडावी आदींचा समावेश होता. तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या हस्ते अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

००००००

चांगले शिक्षण, संस्काराद्वारे देश घडविण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना भरीव निधी देवून शाळा सुंदर व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या वाढत असून ही समाधानाची बाब आहे. चांगले शिक्षण व संस्कार देवून देश घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा सन 2023-24 बक्षीस वितरण व जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-25 च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विश्वास चितळे, राजेंद्र नागरगोजे, विनायक शिंदे, वैभव नलवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, गत दोन अडीच वर्षात भरीव निधी दिल्यामुळे शाळा सुंदर व सुसज्ज बनू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांची जिल्हा परिषद शाळेबाबतची मानसिकता बदलून या शाळांच्या पटसंख्येत वाढ होवू लागली आहे. शाळांना, शिक्षकांना अधिक चालना मिळण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर म्हणाल्या, शिक्षक हा समाज घडवत असतो. शिक्षकांनी चांगली मुले घडविण्याबरोबरच स्त्री सुरक्षितता, स्त्री पुरूष समानता, महिला अत्याचार यावरही लक्ष देवून चांगला समाज घडविण्यासाठी विशेष योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात विभाग स्तरावर प्रथम व राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद ढालेवाडी शाळेचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.

प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते व रूपाली माळी यांनी केले. कार्यक्रमास सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

यवतमाळ, दि. ११ (जिमाका) : महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. जिल्हा समजून घेतांना विविध क्षेत्रात जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्याचे कृषि, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी मनमोकळी चर्चा करतांना त्यांच्या समस्या देखील समजून घेतल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय वन अधिकारी धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीस अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राज्यपालांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी शिक्षण, पर्यटन, उद्योग, वर्धा नांदेड रेल्वे मार्ग, जिल्ह्यातील विविध महामार्ग प्रकल्प, घरकुल योजना, विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजना, जल जीवन मिशन, रोजगार हमी योजना, पेसा क्षेत्राच्या विकासासाठी केली जात असलेली कामे आदींची राज्यपालांनी माहिती घेतली.

आदिवासी कल्याणासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली पीएम जनमन योजना तसेच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या ई- ऑफीस प्रणालीची अंमलबजावणी, सेवा हमी कायदा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देणारे सादरीकरण राज्यपालांसमोर सादर केले. यावेळी त्यांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना उत्तमपणे राबविल्या गेल्या पाहिजे, असे सांगितले.

अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज्यपालांनी विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी संवाद साधला. कृषि क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी संवाद साधतांना त्यांनी जिल्ह्याचे कृषि क्षेत्र समजून घेतले. या क्षेत्राच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती घेतली. उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधतांना जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाची माहिती जाणून घेतली. तसेच उद्योगाच्या क्षेत्रात जिल्ह्यात असलेल्या समस्या देखील जाणून घेतल्या.

आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला. आयुर्वेदाला चालणा देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी या क्षेत्रातील लोकांनी राज्यपालांसमोर मांडले. देशपातळीवर चमकलेल्या विविध क्रीडा प्रकारातील गुणवंत खेळाडूंशी संवाद साधतांना त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पत्रकारीतेच्या क्षेत्रातील काही लोकांशी संवाद साधतांना जिल्ह्यातील विविध प्रश्न समजून घेतले. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी देखील त्यांनी संवाद साधला.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

यवतमाळ, दि.११ (जिमाका) : महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शासकीय विश्राम भवन यवतमाळ येथे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तत्पुर्वी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.

०००

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  

 नवी दिल्ली 11 :  केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उत्कृष्टता केंद्र (CoE) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) झाला. या कराराद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांसाठी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रे उभारली जातील.

यावेळी रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील उपस्थित होते. यासोबतच तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आणि NIELIT चे महानिर्देशक डॉ. मदन मोहन त्रिपाठी, अभिषेक सिंग,अतिरिक्त सचिव उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी संयुक्त प्रकल्प प्रस्तावाद्वारे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. NIELIT शिक्षक व विद्यार्थ्यांना उद्योगांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम, क्रेडिट कोर्सेस, आणि प्लेसमेंट सहाय्यता यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.

या प्रसंगी श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सदर उपक्रमाचा  शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी  महाविद्यालयांमधील  विद्यार्थ्यांनाकरीता सेंटर फॉर एक्सलन्स  ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश  असून सदर सेंटर मार्फत  येणार अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण 2020 शी सुसंगत असल्याचे सांगितले.

मा. केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव  यांनी महाराष्ट्र राज्याला औद्योगिक  वारसा लाभलेला असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सर्वागिण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने  सदर उपक्रम  राबविणारे महाराष्ट्र हे  देशातील प्रथम राज्यआहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये  यशस्वीरित्या अंमलबजावणी करुन पुढे  देशभरात  सदर उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यातील 40 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये यापूर्वीच 6 तंत्रनिकेतनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT),  क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, तर 3 तंत्रनिकेतनांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रे कार्यरत आहेत. उर्वरित तंत्रनिकेतनांमध्येही उत्कृष्टता केंद्रे उभारण्याची योजना आहे, जी या कराराच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर पूर्ण केले जातील.

राज्यातील तंत्रशिक्षणाला एक नवी दिशा देणाऱ्या या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि प्रशिक्षण मिळेल. याकरीता तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक  यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.

00000

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ई -उपस्थितीत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई, दि. ११ : सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) टप्पा-२ या प्रकल्पांतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.

यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता हांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते.

हॅमच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी येत्या अडीच वर्षांच्या काळात ६ हजार कि.मी लांबीचे रस्ते पूर्णत्वास येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॅमच्या माध्यमातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून एकूण ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत.  यापैकी ३० टक्के निधी हा राज्य शासनामार्फत व ७० टक्के निधी हा कर्ज स्वरूपात विविध वित्तीय संस्थाकडून उभारण्यात येत आहे.

कर्ज स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी सद्यस्थितीत रूपये ५,५०० कोटी इतका निधी कर्ज स्वरूपात देणेबाबत हुडको या वित्तीय संस्थेसमवेत अंतिम वित्तीय करारनामा करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत होणारे सर्व रस्ते हे काँक्रीट पृष्ठभागाचे होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन संबंधित भागांचा आर्थिक विकास होणे, वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी होणे, पर्यावरणाचे प्रदुषण कमी होवून आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होणे, आपत्ती निवारणास मदत होणे, पर्यटनात वाढ होणे, रोजगार निर्मिती होणे असे अनेक फायदे होणार आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत कोकण विभाग-१५, पुणे विभाग-२८, नाशिक विभाग-२४, छत्रपती संभाजीनगर विभाग-२०, नांदेड विभाग-१३, अमरावती विभाग-३०, नागपूर विभाग-१५ अशी एकूण १४५ प्रकल्प मंजूर आहेत. सदर प्रकल्पांची निविदा निश्चिती करण्यात आलेली असून भूमिपूजन झालेल्या कामांचा आजपासून शुभारंभ करण्यात येत आहे.

नव्याने होणाऱ्या या रस्तांमुळे रस्त्यांमुळे गावांमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक व पर्यटन स्थळे चांगल्या दर्जाच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन रोजगार उपलब्ध होणार आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे १० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत ब्रीज कम बंधारा बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या लांबीमधील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत. तसेच जल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे प्रकल्प राबविताना सामाजिक व पर्यावरण सुरक्षा सांभाळली जाणार आहे.

०००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...