रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 356

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

२०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

मुंबई, दि.३ :- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापूर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या  ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी’ चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक; लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे साधला संवाद

अमरावती, दि. 3 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.

याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती आय ए कुंदन या दुरदृष्यप्रणालीद्वारे तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार सुलभा खोडके, आमदार उमेश ऊर्फ चंदू यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार गजानन लेवटे, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनापा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त नियोजन कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी उपस्थित होते.

यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावर बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले. सुरु कामे विहित वेळेत पूर्ण करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये मेळघाटातील आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘मिशन 28’ उपक्रम, चिखलदरा येथील साहसी खेळ प्रकार, वन पर्यटन विकास आदींबाबत यावेळी माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सहासी खेळ प्रकारात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले.

00000

कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनाचे सूक्ष्म नियोजन करा – अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल

नाशिक, दि. ०३ (जिमाका) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा दुर्घटनारहीत, सुरक्षित होण्यासाठी गर्दी नियंत्रणाचे सूक्ष्म नियोजन करावे. साधूग्रामसाठी आवश्यक जागेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांनी येथे दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. चहल यांनी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. चहल म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कामांना गती द्यावी. त्यासाठी सांघिक भावनेने काम करावे. मुख्यमंत्री लवकरच कुंभमेळ्यातील विविध कामांचा आढावा घेणार आहेत. घाट, नदी पात्राची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट याचेही नियोजन करावे. गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पाहणी करावी. तसेच भक्कम बॅरिकेटस उभारावेत. त्यासाठी संबंधित व्यावसायिकांशी संवाद साधावा. गर्दी नियोजनासाठी स्वयंसेवकांची मदत घेता येईल का याचीही पडताळणी करीत त्याचेही नियोजन पोलिस दलाने करावे. सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामांचे प्रस्ताव सादर करावीत, असेही निर्देश डॉ. चहल यांनी दिले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळ्यातील कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली, तर पोलिस आयुक्त श्री. कर्णिक, महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, पोलिस अधीक्षक श्री. देशमाने यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

०००

गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली,(जिमाका),दि.03: गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे आज घेण्यात आली. या बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 अंतर्गत गाभा क्षेत्रासाठी 212 कोटी, बिगर गाभा क्षेत्रासाठी 106 कोटी, आकांक्षित जिल्ह्यासाठी 25 टक्के अतिरिक्त  निधील रुपये 83.69 कोटी आणि नाविन्यपूर्ण व इतर योजनांसाठी मिळून एकूण 418.45 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे. तथापि, कार्यान्वयन यंत्रणेकडून 823 कोटी रुपयांची निधी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत 404.56 कोटींची वाढीव मागणी सादर करण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, गडचिरोली हा विशेष बाब म्हणून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टावर भर देत विविध योजनांचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. प्रादेशिक विकास आराखड्याखेरीज मिळणाऱ्या निधीचा प्रभावी वापर, पर्यटन आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या योजनांवर भर, तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन लोकसहभागातून विकास आराखडा राबवावा, असेही ते म्हणाले.

2024-25 मध्ये मंजूर झालेला निधी अद्याप का खर्च झाला नाही, काय अडचण आहे, याबाबत विचारणा करून त्यांनी सदर निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम उभारणी, शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे आणि योजनेंतर्गत खरेदी साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे यासारख्या सूचनाही त्यांनी केल्या.

भौगोलिक आव्हाने आणि विकास निधीची गरज – सहपालकमंत्री जयस्वाल

राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी जिल्ह्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र तसेच या जिल्ह्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल लक्षात घेता रस्ते, आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्याची मागणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण दुर्गम भागातील रस्त्यांची अत्यंत खराब परिस्थिती सुधारण्यासाठी विशेष निधी देण्याची विनंती केली.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कोणत्या विभागाला किती निधीची मागणी आहे आणि त्यातून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची सविस्तर माहिती सादर केली. बैठकीत मंत्रालयातील वरिष्ठ सचिव आणि जिल्हा कार्यकारी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

गोठणे जोड रस्ता कामासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि ०३ (जिमाका): गोठणे जोड रस्ता कामाची मागणी दोन वर्षापासून ग्रामस्थ करत आहेत. या जोड रस्त्याच्या कामासाठी वन्यजीव विभागाच्या आवश्यक परवानगीसाठी ऑनलाईन प्रस्ताव तात्काळ दाखल करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यातील गोठणे जोडरस्ता कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वन्यजीव संरक्षक स्नेहलता पाटील, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, भूसंपादन अधिकारी मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी सोपान टेंबे, तहसीलदार अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोठणे जोड रस्ता कामाची मागणी गत दोन वर्षांपासून ग्रामस्थ करत आहेत. तथापी वन्यजीव जीव विभागाकडील  परवानगीसाठीचा आवश्यक ऑनलाईन प्रस्ताव अद्यापही दाखल न झाल्याबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन लोकांचे प्रश्न ऑन द स्पॉट सुटले पाहिजेत, यासाठी तात्काळ कार्यवाही करा. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करावा. पावसाळ्यातपूर्वी या रस्त्यावरून जाऊ शकतील अशा पद्धतीने खडीकरण करावे, असे निर्देश दिले.

०००

आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके

अमरावती, दि. ०३ : देशातील विविधता, सामाजिक समृद्धी आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भर देणार असल्याचे सांगत आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.

सामाजिक न्याय भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री किरण सरनाईक, केवलराम काळे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, राजेश वानखडे, गजानन लेवटे, माजी आमदार प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसीचे किरण पातुरकर, आदिवासी विकास अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. आदिवासींचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकर मेळघाटचा दौरा करण्यात येईल. त्यानुसार तेथील प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नवसारी वसतिगृहाजवळील         कचरा काढून ती जागा त्वरित स्वच्छ करण्यात यावी. डीबीटी वेळेवर देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. स्थानिकांची गरज लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या हाताला काम देण्यात येईल. वन हक्क जमीन पट्ट्यांपासून आदिवासी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक  सोयी -सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रत्येक आदिवासी महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिंनी, नागरिक यांच्याशी डॉ. उईके यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी संबंधितांना सूचित केले.

डॉ. उईके यांनी सकाळी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेतील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड. जे.व्ही.पाटील पुसदेकर आदी उपस्थित होते.

०००

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

मुंबई, दि. ३ : मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी सुरुवातीला राजभवनातील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली.

याच हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ सन १९८० मध्ये चहापान झाले होते.

त्यानंतर एडवर्ड यांनी ‘जल लक्षण’ या राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेसाठी राखीव असलेल्या अतिथिगृहाला भेट दिली. या अतिथीगृहात सन १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ व त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचा राष्ट्रीय अतिथी या नात्याने मुक्काम होता.

राज्यपालांचे सचिव प्रविण दराडे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी त्यानंतर एडवर्ड यांना ‘जल किरण’ अतिथीगृह, ‘जल विहार’ हे ऐतिहासिक सभागृह तसेच ब्रिटिश कालीन बंकर दाखवले.

यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खासगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हे देखील उपस्थित होते.

राजभवनातील अधिकाऱ्यांचे आभार मानून प्रिन्स एडवर्ड पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात राजभवन येथे असलेले ‘गव्हर्मेंट हाऊस’ स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे व राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राचे राजभवन झाले.

0000

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई, दि. ३ : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि. ५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर “लेखक तुमच्या भेटीला” आणि “एका संगीतकाराची मुशाफिरी” या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच “शब्दव्रती” या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवाय, ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिक, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

महिलांसाठी तालुकास्तरावर ‘अस्मिता भवन’ उभारावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. ३ : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज, राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लड्डा, विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव सुनिल सरदार, उपसचिव आनंद भोंडवे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती, शेतीसंलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

याचबरोबर रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त ‘माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच ‘माविम’चे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री कू. तटकरे यांनी दिले.

बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामधील रिक्त पदे कायम स्वरुपासह बाह्यस्त्रोत व कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आल्याची माहिती सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथा, कविता लिहितात, ज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, बालके यांना घरपोच आहार, लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींग, लाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन, पोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला, पिंक रिक्षा, लाडकी बहीण योजना, फिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी

मुंबई, दि. 03 :- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

0000

ताज्या बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...