रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 354

‘एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुबंई, दि. ०४: ‘एमएसआरडीसी’च्या अंतर्गत राज्यात द्रुतगती मार्गाचे विविध प्रकल्प कार्यान्वित असून काही प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार असल्याचा असा विश्वास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) च्या कामकाजाचा व १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल आदी अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी द्रुतगती मार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांना द्रुतगती महामार्गांनी जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

नागपूर ते गोवा ८०२ किमी शक्तिपीठ महामार्ग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग, नाशिक रिंग रोड, कोकण एक्सप्रेस, शेगाव-सिंदखेडराजा भक्ती मार्ग  आदी प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग, राजीव गांधी बांद्रा-वरळी सी-लिंक, ठाणे खाडी पूल क्र.३ या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच प्रगतीपथावरील समृद्धी महामार्गाचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा,  यशवंतराव चव्हाण मुबंई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, जीएसटी भवन तसेच समृद्धी महामार्गावर वाहतूक नियंत्रण सुलभ होण्यासाठी प्रस्तावित आयटीएमएस यंत्रणेचाही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी आढावा घेतला.

०००

मोहिनी राणे/ससं/

 

 

शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.4: राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेंतर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सोपान टोणपे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या योजनेमूळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे.  शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.  पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार आहे.

000

रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष वोलोदीन यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ०४: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

सशक्त राष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्ये सशक्त होणे आवश्यक आहे असे सांगून संसदीय सहकार्य राज्यस्तरावर व विभाग स्तरावर देखील वाढावे या दृष्टीने ही भेट असल्याचे रशियन संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

रशियात ८९ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांतात विधानसभा व स्थानिक सरकारे आहेत.  भारतात देखील राज्ये व विधानमंडळे आहेत. या स्तरावर संसदीय संबंध वाढवून परस्परांच्या चांगल्या संसदीय प्रथा परस्परांना अंगीकारता येतील असे वोलोदिन यांनी सांगितले.

आपल्या भेटीत आपण विधानमंडळ, उद्योग व्यापार प्रतिनिधी यांसह मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भेटत असल्याचे सांगून वोलोदिन यांनी मुंबई विद्यापीठात १९६४ पासून रशियन भाषा विभाग कार्यरत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

रशिया आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असताना भारत देत असलेल्या पाठिंब्याबद्दल वोलोदिन यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या देशाने सातत्याने प्रगती केली आहे, असे सांगून भारत रशिया व्यापार सध्याच्या ५७ अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर इतका होईल असा विश्वास वोलोदिन यांनी व्यक्त केला.

रशिया नेहमी भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे असे सांगून भारत-रशिया संबंध नेहमी बहीण भावाप्रमाणे बळकट असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

उभय देशांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान यांसह ब्रिक्स व्यासपीठावर देखील सहकार्य वाढत आहे. उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढल्यास युवा पिढी परस्परांजवळ येईल, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईजवळील वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर भारत इराण रशिया व्यापार वाढेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी वोलोदिन यांनी राज्यपाल श्री. राधाकृष्णन तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

०००

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर- २०२४’ मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. ०४: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल (Annual Status of Education Report) ‘असर-२०२४’ मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सादर करण्यात आला. या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांनी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी राबविलेल्या शाळा पूर्व तयारी मेळावा- ‘पहिले पाऊल’ चे कौतुक करुन मुख्यमंत्र्यांनी देशाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर भविष्यात शालेय शिक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ.अश्विनी भिडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार,, प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या संचालक फरिदा लांबे, फाऊंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अहवालातील ठळक बाबी :

प्रथम संस्थेने महाराष्ट्रात 33 ग्रामीण जिल्ह्यातील 987 गावांतील 19,573 घरांमधील 33,746 मुलांचे सर्वेक्षण केले. तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असलेल्या मुलांचे प्रमाण 2022 च्या 93.9 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये 95 टक्के इतके आहे. 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या आठ वर्षांपासून 99 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही 2018 मधील 99.2 टक्क्यांवरुन एकूण पटनोंदणीचे आकडे 2022 मध्ये 99.6 पर्यंत वाढून 2024 मध्ये सुद्धा स्थिर आहेत.

पटनोंदणीबरोबरच वाचन, गणित, डिजिटल साक्षरता आदींबाबतही अहवालामध्ये नोंद घेण्यात आली आहे. 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विविध डिजिटल टास्क करण्याचे प्रमाण 83.4 ते 92.3 टक्के इतके आहे. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.

वय वर्ष 15 ते 16 याच्यामध्ये 98 टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, अशी नोंदही ‘असर’ अहवालात घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण

मुंबई, दि. ०४: ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात https://maitri.maharashtra.gov.in/  या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या अनावरणप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, तसेच उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

MAITRI (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या MAITRI 1.0 पोर्टलचे आता 2.0 व्हर्जन आणण्यात आले असून https://maitri.maharashtra.gov.in/ यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आणि तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी सादरीकरणावेळी सांगितले.

पोर्टलची वैशिष्ट्ये

पोर्टलमुळे महाराष्ट्रातील उद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढणार असून उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदार यांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार आहे.

एकच अर्ज प्रणाली – उद्योगांना विकसनाच्या विविध टप्प्यावर परवाने, ना- हरकत इत्यादीची आवश्यकता असते. मैत्री पोर्टलमार्फत विविध परवाने, ना- हरकत इत्यादी उपलब्ध असल्याने उद्योगांना शासकीय विभागांकडे स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

रिअल-टाईम ट्रॅकिंग आणि डॅशबोर्ड – गुंतवणुकदारांना त्यांच्या अर्जाची सद्य:स्थिती पाहता येणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट आणि ऑनलाईन सहाय्य केंद्र – गुंतवणुकदार व उद्योजकांना विविध योजना, परवाने, सबसिडी इत्यादीची विविध माहिती तत्परतेने उपलब्ध होणेसाठी मैत्री पोर्टलवर ‘उद्योग मित्र’ चॅटबॉट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटर – सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहनपर लाभांचे अंदाजपत्रक समजणार.

डिजिटल डॉक्युमेंट डिपॉझिटरी (Digi Locker) – उद्योग संबंधित आवश्यक कागदपत्रांची सुरक्षित साठवणूक आणि सहज उपलब्धता होणार.

राष्ट्रीय सिंगल विंडो सिस्टम (NSWS) सोबत दोन-मार्गी समाकलन – एकाच पोर्टलवरून सर्व अर्ज आणि मंजुरी प्रक्रियांचे संकलन.

विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी

पोर्टलमध्ये १५ विविध विभागांच्या ११९ सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामधील १०० सेवा संपूर्णपणे एकत्रित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, बॉयलर्स, नगर विकास आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला अत्याधुनिक ऑनलाईन सुविधांचा लाभ मिळणार आहे.

तसेच अतिरिक्त नवीन सेवा समाविष्ट केल्या जातील आणि सेवा संख्येतील वाढ २०० पर्यंत करण्यात येणार आहे, असे आयुक्त कुशवाह यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी

https://x.com/maitri_ifc

https://in.linkedin.com/company/maharashtra-industry-trade-and-investment-facilitation-cell?trk=public_post_follow-view-profile

https://www.facebook.com/ifcMAITRI/

https://www.instagram.com/maitri_ifc/

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. ०४: अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. हँकी यांनी दावोस येथील गुंतवणूक करारांच्या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्या उत्सुक असल्याचे श्री. हँकी यांनी सांगितले. तसेच राज्यात ऊर्जा, नव तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नवनवीन क्षेत्रामधील सहयोगाबद्दल चर्चा केली.

राज्यात ऊर्जा क्षेत्रात असलेली संधी, विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय (दि. ०४ फेब्रुवारी, २०२५)

👉🏽 महसूल विभाग

वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ

शासकीय भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कृषिक, निवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या शासकीय जमिनींचे किंवा भाडेपट्टयाने दिलेल्या वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत संपली आहे. मात्र, राज्यात अशी रुपांतरणाची खूप प्रकरणे प्रलंबित असल्याने या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या सवलतीच्या दराने अधिमूल्य भरण्याच्या योजनेस आणखी एक वर्षांची मुदत वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जांसाठी ही योजना लागू राहणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

०००

👉🏽 जलसंपदा विभाग

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली.

०००

👉🏽 मृद व जलसंधारण विभाग

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत होणारे २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येतात. या जलाशयाची पाणीपातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाशांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी या बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

०००

सामान्य मुंबईकरांना दिलासा; ग्लोबल मुंबईचा शुभारंभ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०४: मुंबई महापालिकेने आज कोणतीही करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याने सामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सकारात्मक, विकासाभिमुख, विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आधुनिक मुंबईचा शुभारंभ ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली आहे.

मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. शिदे बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला. मुंबई वेगाने कात टाकत आहे. विकसित होत आहे. आम्ही दोन टप्प्यात मुंबईच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण केले. ग्लोबल मुंबईची चाहूल देणाऱ्या अर्थसंकल्पासाठी आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचं उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

भविष्यासाठी मुंबई वेगाने कात टाकतेय हे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पात ४३ हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. त्यावरुन मुंबईचा विकास राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं किती गांभीर्याने घेतला आहे, हे दिसून येते. भांडवली खर्चातली ही वाढ विक्रमी असून येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सात हजार कोटींनी भर पडली आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

‘बेस्ट’ साठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावरही भर देण्यात आलेला आहे. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई हा दिलेला शब्द खरा करून दाखवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल मुंबई ही देशाचं फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत आहे. जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखाने तळपताना दिसेल त्याचाच हा शुभारंभ असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००

मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ४ : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॉडेल करिअर सेंटर मार्फत २७ युवकांना एसी टेक्निशीयन म्हणून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआय या संस्थेचे भारताचे जनरल मॅनेंजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम, एकलव्य व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे प्रशिक्षक उमाकांत लोखंडे, एकलव्य आयटीआयचे रघुनाथ धुमाळ यासह पालघर आयटीआयचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेवून प्रशिक्षण उपलब्ध करुन देत आहे. सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेच्या सहकार्याने पालघर व या परिसरात आयटीआय सोबत दहावी, बारावी व पदव्युत्तर युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आगामी एक वर्षात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

०००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि.०४ :- अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली.

नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्र.१ मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर ७ जुलै २०२४ रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता.

उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१४ मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून रु.७.५० लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे.

0000

 

ताज्या बातम्या

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...