सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 352

राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. ०: महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन (कलाकार विभाग २०२४ – २५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ४ ) जहांगीर कलादालन येथे पार पडले.

यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय आहे. कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारे कला विषय निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याला चित्रकला, स्थापत्यकला व वास्तू निर्माण कलेचा मोठा वारसा लाभला आहे. शिवकालीन गडकिल्ले, भित्तिचित्रे व शिल्पकलेचा देखील वारसा राज्याला लाभला आहे. अशा कला संपन्न राज्यात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रदर्शने आयोजित केली जावी तसेच कलाकारांना दिली जाणारी बक्षीस राशी वाढवली जावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात देशविदेशातून पर्यटक येतात. अशावेळी शहरामध्ये एकाच वेळी अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारे भव्य बहुमजली कला केंद्र असावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. मुंबईत कला प्रदर्शनासाठी दालनांची संख्या सध्या कमी आहे. ही उणीव दूर करण्यासाठी  भव्य व प्रशस्त कला प्रदर्शन कला केंद्र असावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शनासाठी राज्यभरातील कलाकारांकडून ७७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या; त्यापैकी १४८ कलाकारांच्या १८० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती कला संचालक डॉ संतोष क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात दिली.

शकुंतला कुलकर्णी यांच्यावतीने त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण विभाग व दिव्यांग विभाग या प्रवर्गातून १५ कलाकारांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, सर ज जी कला अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. राजनीश कामत, प्रदर्शन अधिकारी संदीप डोंगरे उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच कला प्रदर्शन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

०००

क्रीडा विभागाची एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करा – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ०५: क्रीडा विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजित व्यवस्थापन करणे, विभागाचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. ही प्रणाली विकसित करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

ई – गव्हर्नन्स अंतर्गत क्रीडा संचालनालय स्तरावर एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुधीर पाटील, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजितरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्य एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा व खेळाडूंच्या कामगिरीचा तपशील एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल. विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ई गव्हर्नन्स – प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करावी, असे मंत्री श्री. भरणे यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत क्रीडा विकास व युवा हितावह विविध योजना राबविण्यात येत आहेत. पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणे, यशस्वी व प्रतिभावान खेळाडू घडविणे, अत्याधुनिक प्रशिक्षणाकरीता आर्थिक सहाय्य करणे, खेळाडूंना प्रोत्साहन सवलती व गौरव, शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन, वयोवृद्ध खेळाडूंना मानधन, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना अंतर्गत अनुदान, खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत दैनंदिन क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा गुण सवलत, खेळाडूंना शिष्यवृत्ती तसेच युवा महोत्सव, युवा कल्याण उपक्रमांना सहाय्य इ. योजनांचा समावेश आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

 

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०५ : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मंत्रालयात धुळे नंदुरबार पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई. रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता, सह सचिव बी.जी.पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धुळे व नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई-उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, १०० दिवस कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी, कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची कामे मिशन मोडवर करावी

उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रत्येकाला पिण्याचे पाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. त्यात नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी ग्रामीण भागात जल जीवन मिशन, पाणी पुरवठा विभागांतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठ्याची कामे ‘मिशन मोड’ वर  दर्जेदार करावीत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

मोहिनी राणे/ससं/

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची – सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार

मुंबई,  दि. ५ : देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोजक्या सैनिकांसह प्रकाशाच्या वेगाने चपळता दाखवून मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला, त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्री ४ फेब्रुवारी हा दिवस “मराठा दिन” म्हणून साजरा करत आहे. ही सर्व महाराष्ट्रीयनांसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्रीला २५६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस व्यासपीठावर माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार श्रीमती जोल्ले, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, पोस्ट विभागाच्या संचालक व्ही. तारा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच यावर्षी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री च्या “मराठा दिन” या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मराठा लाईट इन्फंट्री ही देशाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक  करून, देशात व देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी मत व्यक्त केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांनी असीम पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता. या घटनेचे स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण यावेळेस करण्यात आले. यावेळेस नरवीर  तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम उलगडवून दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.

000

बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापि, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीककरिता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेला, जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे. यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आजपासून म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.

बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नुतनीकरण आणि लाभ वाटपाकरीता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाईन प्रणाली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राद्वारे यापूर्वी हे काम होत होते. केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने आता ३६६ तालुका सुविधा केंद्रे निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रति दिन १५० अर्ज हाताळण्यात येतील, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

राज्यात ८ नोव्हेंबर, २०२४ पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, आज अखेर एकूण ५ लाख १२ हजार ५८१ अर्ज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत. सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेत, यामध्ये कामगारांची काही ठीकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते व कामगांचा वेळ व रोजगाराचे नुकसान होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. कामगारांच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभता, सुसुत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारीत सूचना देण्यात आल्या असल्याचेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले की, लाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राचे उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजीकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा सुविधा केंद्रमधील पाच पैकी तीन कर्मचारी हे एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील. तर उर्वरीत दोन डाटा एंट्री ऑपरेटर बांधकाम कामगारांना त्याच्या तपशिल बदलाचे काम करतील. बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज दिनांक ३१ मार्च, २०२५ पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने या सर्व कामाकरीता मंडळ स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी दिली आहे.
000

अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा-अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे 

मुंबई,दि.५:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी काटेकोर नियोजन करा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षेतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉय, श्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना, शाळा आधुनिकीकरण अशा महत्वपूर्ण योजना आहेत. अशा सर्व लोकाभिमुख योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
000000

‘ॲग्री स्टॅक’ योजना – कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल…

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले असतील. आपण याठिकाणी या उपक्रमाबाबत विस्ताराने पाहू.

भारत एक कृषिप्रधान देश असून, देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषी क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे. महाराष्ट्रात कृषी क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या ५५ टक्के आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करुन योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे. केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अॅग्री स्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ॲग्री स्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्री स्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्या अभिलेखांपैकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीने अद्ययावत केले जात असल्याकारणाने तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होत आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे. सर्व प्रथम बीड जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात अॅग्री स्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्मिती करण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला. बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरुन महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने अॅग्री स्टॅक योजना अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

ॲग्रिस्टॅक योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू संदर्भिकृत माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे हे प्रमुख उद्द‍िष्ट आहे. याचबरोबर  शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे तसेच प्रमाणिकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे, शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे व उच्च-गुणवत्तेचा डेटा व अॅग्रि-टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे यांचा समावेश आहे. 

योजनेचे फायदे

ॲग्रिस्टॅकमुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील, पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल, शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल, शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्याची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही, शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. अॅग्री स्टॅक योजनेची राज्यात सुयोग्य अंमलबजावणी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकार सोबत सामंजस्य करार ११ जुलै, २०२३ रोजी केला आहे.

-सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

 000000

 

विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करावे
  • योजनांचा लाभ शंभर टक्के डीबीटीमार्फतच जमा करावा

मुंबई, दि. ०४: राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे. विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात (डिबीटीद्वारे)जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समाजातील तळागाळातील घटकांच्या योजनांचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या योजनांचा लाभ थेट बॅंक खात्यात जमा होईल यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणाबाळ निवृत्ती वेतन योजना यांचे लाभ देताना शंभर टक्के ते थेट बॅंक खात्यातच जमा झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील वसतीगृहे, शाळा यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, भोजन आदींची गुणवत्ता कशी आहे याच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देणे सुरू करावे. भोजनाचा दर्जा मंत्री, सचिव, अधिकाऱ्यांनी तपासावा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येऊ नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे. विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी- सुविधांमध्ये  सुधारणा  करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पध्दतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक  न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात यावेत. विभागात गुणवत्ता नियंत्रण पथकाची स्थापना करावी त्यांच्या मार्फत वसतीगृह, शाळांमधील सुविधांच्या गुणवत्तेची पडताळणी करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. वसतीगृह, शाळा यामधील सुविधा तसेच तेथील साहित्य, बांधकाम याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ॲप विकसती करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी, अस्तित्वातील योजनांमध्ये सुधारणा, नव्या योजना सुरू करणे, योजनांच्या अंमलबजावणीमधील अडथळे दूर करणे आदींच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

००००

शैलजा देशमुख/विसंअ/

अभिनव उपक्रम, डिजीटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०४ : शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे  डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. भविष्यकालीन धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाने अधिक जोमाने काम करावे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शाळा भेट उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे शालेय व्यवस्थापन, शिक्षणाचा दर्जा, मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा,  शाळेतील भौतिक सुविधा याची माहिती नियमित मिळण्यास मदत होईल. हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवण्यात यावा. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे. शाळा आणि वसतीगृहांना अचानक भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी  पथके करावीत.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला गुण असतात. त्यांना शालेयस्तरावरूनच वाव मिळाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रास मदत, सहकार्य करण्यासाठी काम करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्था इच्छुक आहेत. या व्यक्तींचे तसेच सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जावी. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घ्यावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता वाढीसाठी सांगली, सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल उपक्रमाची माहिती घ्यावी आणि हा उपक्रम राज्यात सुरू करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा निर्माण केली जाणार आहे. ही शाळा  डिजिटल सुविधांनी परिपूर्ण  करून शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभाग यासाठी आवश्यक साधने दिली जाणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

बारावी, दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. ०४:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यावेळी उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण मंडळामार्फत राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का ? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट 1982 या कायद्याची अंमलबजावणी करुन व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल.

मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी सावरकर यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...