सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 350

महाबळेश्वर येथे २६ ते २८ एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सव – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ०५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये 

स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रीडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे 

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदीरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.

निवासव्यवस्था आणि उपक्रम

पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.

परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम

भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृती, सौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘जीबीएस’संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे!

मुंबई, दि. ०५ : ‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलपे आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, सातारा जिल्ह्यात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, जिल्हा रुग्णालयात जीबीएस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र १० बेड आरक्षित करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील अशी खबरदारी घ्यावी, जिल्ह्यात कुठेही दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलविले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

नवीन ऊर्जा स्रोतांच्या विकासाबरोबरच वीज वितरणातील सुधारणांवर भर द्या – उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ५ : राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मितीमध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एचएसबीसी फोर्ट, मुंबई येथे आयोजित उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेंश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर उपस्थित होते.

उर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. राज्यात सौर आणि पवन ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवून प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मितीला गती देण्यात यावी. शेती, उद्योग, व्यापार वापरासाठी वीज आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल यावर विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

राज्यातील विविध उर्जा प्रकल्प, निर्मितीच्या व्यवस्था आणि वीज मागणी यांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

राज्यातील ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण यंत्रणांसह वीज निर्मिती केंद्रे, नवीन प्रकल्प, सौर व पवन उर्जा विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीज पुरवठ्याच्या गरजा याविषयीही चर्चा झाली.

राज्यातील वीज उत्पादन क्षमता, मागणी-पुरवठा तफावत, भार नियमन धोरणे आणि नवीन प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. अपूर्ण वीज प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही यावेळी चर्चा झाली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

राज्यातील निवासी डॉक्टरांना आवश्यक सेवा सुविधा द्याव्या – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई दि. ०५ :  राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्त्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय होणे महत्वाचे आहे. यासाठी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये त्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव तुषार पवार, शंकर जाधव आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, निवासी डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सुरक्षेसाठी रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. निवासी डॉक्टर्सना रुग्ण कक्षाशेजारी साईड रुम, महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू  करण्याबाबत गृह विभागासोबत समन्वय साधून त्याचा पाठपुरावा करावा. डॉक्टरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा.

निवासी डॉक्टरांसाठी वसतीगृहाची सुविधा करावी. नवीन वसतीगृहे बांधकामांबाबत प्रस्ताव सादर करावेत. काही ठिकाणी वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारती उपलब्ध करून घ्याव्यात. ज्या डॉक्टरांची वसतीगृहात निवासव्यवस्था होत नाही, अशा डॉक्टरांना घरभाडे भत्ता देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. मुश्रीफ यांनी दिले.

बैठकीत मूलभूत सुविधा मिळणे बाबत तसेच निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत मिळावे. शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भेटीसाठी पासेस प्रणाली लागू करणेबाबत चर्चा झाली. निवासी डॉक्टरांना प्रलंबित महागाई भत्ता देण्यासंदर्भात महाविद्यालय स्तरावरून माहिती घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘एमएसआयडीसी’द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु

मुंबई: दि. ०५: राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ३७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

“राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला असून, यामध्ये राज्य महामार्ग आणि उच्च वाहतूक असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांचा विकास आर्थिक वृद्धी आणि जलद वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” असे MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

.क्र. प्रदेश जिल्हा लांबी

(कि.मी.)

प्रकल्प किंमत

(रु. कोटी)

1 नाशिक नाशिक, अहिल्यानगर 517.92 3217.14
2 नाशिक – 2 धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधूदुर्ग 552.53 3448.57
3 कोंकण 538.25 4450.00
4 नागपूर नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली 606.15 3387.14
5 पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 1330.75 8684.29
6 नांदेड नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर 548.02 3207.14
7 छत्रपती संभाजीनगर छ.संभाजीनगर, जालना, धाराशीव, बीड 680.16 3395.71
8 अमरावती अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ 1175.41 7174.00
एकूण 5949.19 36964.00

या संदर्भात MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित म्हणाले, “हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्यायोगे राज्य महामार्ग आणि ग्रामीण जिल्ह्यांतील रस्ते वर्षभर योग्य स्थितीत राहून वाहनांच्या जलद चालनासाठी सक्षम होतील. विविध रस्ते जोडून राज्याच्या विकासाला आणि आर्थिक समृद्धीस प्रचंड चालना देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MSIDC चे अध्यक्ष आणि मंत्री, सा.बां. (सा.उ. वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी MSIDC द्वारे रस्ता सुधारणा कामांना निर्धारित कालावधीत गुणवत्तेमध्ये तडजोड न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

श्री. दीक्षित यांनी सांगितले की, हा प्रकल्प हायब्रिड ऍन्युटी मॉडेल (HAM) अंतर्गत राबविला जाईल, जो केंद्रीय सरकारने देशातील रस्ता बांधकामाचा वेग वाढवण्यासाठी स्वीकारलेले मॉडेल आहे. “राज्य सरकार प्रकल्प खर्चाचा ३०% हिस्सा समभाग म्हणून प्रदान करेल, तर उर्वरित रक्कम MSIDC द्वारे राज्य स्वामित्व असलेल्या बँकांकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे.

०००

नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, दि. ०५: नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर परिसर विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सावरगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, श्री क्षेत्र नारायण गड संस्थान, बीडचे महंत शिवाजी महाराज, अश्वलिंग देवस्थान, पिंपळवंडीचे मधुकर महाराज शास्त्री, मदन महाराज संस्थान, कडाचे बबन महाराज बहिरवाल, बंकटस्वामी महाराज संस्थान, नेकपूरचे लक्ष्मण महाराज मेंगडे, ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना, अहिल्यानगरचे अशोकनाथ पालवे महाराज, नालेगाव, अहिल्यानगरचे मस्तनाथ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नाथ संप्रदायाने भक्तीचा मार्ग दाखविला आहे. या भक्तीमार्गानेच मुक्तीचा मार्ग दाखविला आहे. नाथांनी हे आपल्या आचरणातून सिद्ध केले आहे. मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त येथे येण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. मंदिर परिसर विकासाच्या विविध कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. रोप वेबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

भारत हा भाविकांचा देश आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केले. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. मात्र,  भक्तीमार्गामुळे आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहिले. वारकरी संप्रदाय आणि विविध पंथांनी ईश्वरी विचारांना आणि संस्कृतीला जिवंत ठेवले. मच्छिंद्रनाथांचे आशीर्वाद घेताना  भक्ती आणि माणुसकीचा संदेश आपल्याला मिळतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आमदार सुरेश धस आणि मोनिका राजळे यांनी भाविकांची वाढती गर्दी पाहता कानिफनाथ मंदिरापासून मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मच्छिंद्रनाथ मंदिरापासून कानिफनाथ मंदिरापर्यंत रोप वे तयार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, तर सचिव बाबासाहेब म्हस्के व कोषाध्यक्ष रमेश ताठे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी मान्यवरांचे स्वागत केले.

०००

गंजगोलाई परिसरातील रस्ते सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

  • शहरातील स्वच्छतेला, चांगल्या सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना
  • जिल्हा परिषदेच्या बाळंतविडा उपक्रमांचीही घेतली दखल

लातूर, दि. ०५ (जिमाका) : गंजगोलाई हे लातूरचे ऐतिहासिक वैभव असून गंजगोलाईला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर नियतव्ययापेक्षा अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय बनसोडे, जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

गंजगोलाईकडे जाणारे रस्ते आणि परिसराचे सुशोभीकरण करताना या वास्तूचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून त्यानुसार आराखडा तयार करावा. या आराखड्यात समाविष्ट कामे गंजगोलाईचे ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारी, या वास्तूला साजेशी आणि दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी केल्या. लातूर शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. समन्वयाने काम करून शहर स्वच्छ राहील, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून गर्भवती महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बाळंतविडा’ उपक्रमाचाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी माहिती घेतली. तसेच उपक्रम चांगला असून पात्र आणि गरजू महिलांना चांगल्या दर्जाच्या वस्तू, साहित्य यामाध्यमातून उपलब्ध होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्युत भार वाढल्याने नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधीची गरज आहे. यासोबतच ऐतिहासिक वारसा असलेल्या गंजगोलाई परिसरातील रस्ते विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केली. वाढीव निधी मिळाल्यास ‘बाळंतविडा’ कीटमध्येही आणखी काही वस्तूंचा समावेश करता येईल, असे ते म्हणाले.

महानगरपालिका हद्दीच्या लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी समन्वय करून कार्यवाही करावी, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता, कृषि संलग्न सेवा, पशुसंवर्धन, शाळा, अंगणवाडी इमारती, गाव तिथे स्मशानभूमी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे यांनीही जिल्ह्यातील विविध मागण्या यावेळी मांडल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सन २०२४-२५ अंतर्गत आतापर्यंत झालेल्या निधी खर्चाची आणि सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांची माहिती दिली.

०००

जिल्हा विकासासाठी भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):  जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करेल. प्राप्त निधीचा विनियोग हा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कामे करण्यासठी करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ (सर्व साधारण) च्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतला. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालक सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.  तर जिल्हा मुख्यालयातून आ. रमेश बोरनारे, आ. अनुराधाताई चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.

खर्चाचा आढावा

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन २०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा घेतला. जिल्ह्याला सन २०२४-२५ साठी ६६० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून ५१६ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील २२५ कोटी निधी प्राप्त झाला असून त्यातील १८७ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.

१२०० कोटी रुपयांचा आराखडा

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सादरीकरण करुन जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी १२०० कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध प्रमुख कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. शहरी सुविधांचा विकास, जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढीला चालना देणे, घृष्णेश्वर विकासासाठी १५६.६३ कोटी रुपयांचा विकास आराखडा अशा विविध विकासकामांचा व योजनांचा त्यात समावेश आहे.

लोकसंख्येची वाढ पाहता वाढीव निधीची पालकमंत्र्यांची मागणी

पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले की, जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने तयार करावयाच्या पायाभुत सुविधा विकास व अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत आहे. त्यामुळे नागरी सुविधा विकासासाठी निधी मिळावा,अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

सौर उर्जेच्या वापरासाठी स्वतंत्र तरतूद करावी- मंत्री अतुल सावे

इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले, पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात अधिक सुविधांचा विकास होणे आवश्यक असून त्यासाठी अधिक निधी मिळावा. तसेच सौर उर्जेचा अंगिकार करण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घ्यावे- पालक सचिव श्री. कांबळे

पालक सचिव श्री. कांबळे यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षात छत्रपती संभाजीनगर शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे.  तसेच शहरात उद्योगांची गुंतवणूक होत असून उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांमधील २० टक्के निधी राखीव ठेवावा आणि हा निधी रोजगार निर्मितीसाठीच्या उपक्रमांसाठी खर्च करावा, अशी सूचना त्यांनी केली.

‘घाटी’साठी स्वतंत्र तरतूद

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे. प्रस्तावित आराखड्यातील निधी हा शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण अशा सामाजिक क्षेत्रात त्या त्या आवश्यक प्रमाणात खर्च करावा. शाळांच्या विकासाठी मनरेगाच्या निधीतून कामे करण्यात यावी. स्वच्छता उपक्रमांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर उर्जेचा अवलंब करावा. त्यासाठी उचित तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यात महत्त्वाचे असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील अन्य सुविधा विकासासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा अधिकाधिक वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक

आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्ह्यात होत असलेल्या विविध कामांबाबत प्रशासनाचे कौतुक केले. संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा सुरु केल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे तर मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी उपक्रमांबद्दल आयुक्त जी. श्रीकांत यांचे अभिनंदन केले. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करतांना राज्याचे त्यात १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान असावे यादृष्टिने प्रत्येक क्षेत्रात प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.

०००

नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड दि. ०५ : २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. समुद्रात वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी राज्यात नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाड्यात आणण्यात येईल, ज्यामुळे आगामी पिढ्यांना दुष्काळ बघावा लागणार नाही याचे नियोजन शासनाने केले आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली. कोनशिला अनावरण, व पूजन करून रिमोटद्वारे कळ दाबून खुंटेफळ साठवण तलाव ते शिंपोरा बोगदा कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा आष्टी उपसा सिंचन योजना एक महत्त्वाचा भाग आहे.

कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रमसिंह पंडित, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आदींसह माजी आमदार भीमराव धोंडे तसेच लक्ष्मण पवार साहेबराव दरेकर तसेच शंकर देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी खुंटेफळ येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. आष्टी तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा खुंटेफळ तलावाच्या रूपाने विकसित होत आहे याचे ४०% काम पूर्ण झाले असून आगामी काळात या कामाला अधिक गती दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

नदीजोड प्रकल्प आवश्यक

या भागात संपूर्ण शेती बागायती करायची असेल तर नदीजोड प्रकल्प आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दिलेल्या पहिल्या सुधारित प्रशासकीय मान्यतांपैकी आष्टी उपसा सिंचन योजना एक होती. तब्बल ११ हजार कोटी रुपयांची मंजूरी मिळाली आणि निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे हे काम वेगाने सुरू आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ ठरेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. याशिवाय, या प्रकल्पात शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा, यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२०२२ मध्ये महाराष्ट्रातील चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू केला. या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहेत. या नदीजोड प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती केली असून त्यांनी देखील मान्यता देण्याची ग्वाही दिली आहे.

उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर

उपसा सिंचन योजना या खर्चिक आहेत, त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू नये म्हणून आम्ही राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विजेच्या बिलाचा भार शेतकऱ्यांवर येणार नाही. अनेक ठिकाणी उपसा सिंचन योजना विजेच्या बिलामुळे बंद पडायच्या, मात्र आता या योजना सोलरवर चालतील. आष्टी उपसा सिंचन योजना सुद्धा सौरऊर्जेवर चालवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना

शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरू केली. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली. १६ हजार मेगावॅट क्षमतेचे फीडर तयार करून, शेतकऱ्यांसाठी असलेले हे प्रकल्प डिसेंबर २०२६ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या आपण शेतकऱ्यांना जी वीज देतो ती एका युनिटला आठ रुपयाला पडते, सौरऊर्जेचे काम पूर्ण झाल्यावर ती प्रति युनिट तीन रुपयांना पडेल, या वाचलेल्या पैशांमुळे घरगुती आणि औद्योगिक वापराच्या विजेच्या संदर्भाने निर्णय घेता येतील. ऊर्जा विभागाने पुढील पाच वर्षाचे दर निश्चित केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

जेव्हा 53 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणू, तेव्हा जायकवाडीत इतके पाणी असेल की ते सहज वितरित करता येईल. त्यामुळे मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. माणदेशातील दुष्काळ संपवला आहे, घरात पाणी पोहोचले आहे तेच चित्र मराठवाड्यामध्ये निर्माण करायचे आहे, त्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे, आपणही एकत्र राहून विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन करतानाच बीडचा इतिहास समृद्ध आहे आणि आपल्याला तो पुढे न्यायचा आहे, त्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठवाडा व अहिल्यानगरच्या भागाची स्थिती लक्षात घेऊन या भागात सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केले. बीड जिल्ह्यात सर्व प्रकारच्या विकासकामांवर लक्ष देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

२००७ पासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना केलेली मदत व आता मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविक केले.  प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांग़ितले.

भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि खेळाडूंचा सत्कार

भारताला खो-खो मधील पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि टीममधील खेळाडू, प्रशिक्षक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रियंका इंगळे ही बीड जिल्ह्यातील खो-खो खेळाडू आहे.

खुंटेफळ सिंचन तलावासाठी शेतजमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला धनादेश प्रदान

खुंटेफळ सिंचन तलावासाठी शेतजमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबदला धनादेश प्रदान करण्यात आले. सर्वश्री रामा थोरवे, देविदास थोरवे, महादेव थोरवे, विठोबा काळे, आसाराम पठारे या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.

०००

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे जेव्हा मुलांना शाळेच्या ओट्यावर तिसरीची कविता समजून सांगतात…

नागपूर, दि.05 :  नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा रोजच्याप्रमाणे सकाळी सुरु झाली. शालेय प्रार्थना व पाठ होत असताना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे शाळेच्या पाहणीसाठी शाळेत पोहोचतात. तिथल्या शांततेला व शिस्तीत शाळेच्या ओट्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जातात. वडीलकीच्या नात्याने मुलांची चौकशी करतात.

खुद्द शालेय शिक्षणमंत्री यांच्या या शाळा भेटीने मुख्याध्यापिका विजया गोतमारे यत्किंचितही गोंधळून  न जाता विश्वासाने पुढे येतात. शाळेची संपूर्ण माहिती त्या देतात. शिक्षणमंत्री इयत्ता तिसरीतील मुलींशी गप्पांमध्ये रमून जातात. त्यांना एक-एक प्रश्न विचारत शाळेतल्या अडचणी जाणून घेतात. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी त्यांनी दिलेल्या विश्वासावर पुढे येते. ‘सर मी कविता वाचून दाखविते असे सांगून लय धरते.

शाळेतल्या या सकाळच्या वातावरणाला नुकताच उत्तरायणाकडे कललेला सूर्य उब घेऊन आलेला असतो. अशा या भारलेल्या वातावरणाला कशिश ‘पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् कौलारावर थेंब टपोरे तडम् तडतड तडम्’ हे बडबड गीत सादर करुन शिक्षण मंत्र्यांनाही तिसरीच्या भाव विश्वात घेऊन जाते. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे मुलींच्या गुणवत्तेचे कौतुक करुन पुढच्या शाळा भेटीला रवाना होतात.

कळमेश्वर येथील नगर परिषदेची शाळा, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कळमना संजयनगर येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळा याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे व वरिष्ठ अधिकारी होते. कळमेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत त्यांनी विचारणा करुन त्यावर उपचार केले जातात का याची माहिती घेतली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये चर्मरोगासारख्या आजारावर लक्ष वेधून शिक्षकांनी त्याबाबतही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजे असे सांगितले. मुलांच्या स्वच्छतागृहाची त्यांनी पाहणी केली.

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...