बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 319

मराठी साहित्यविश्वामधील कोल्हापूरचे योगदान

  • ३ अ.भा.मराठी साहित्य संमलेनांच्या आयोजनासह ८ अध्यक्ष पदांचा मान,
  • मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान
  • ८ साहित्य अकादमी पुरस्कार

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम  येथे संपन्न होत आहे. दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर असून  त्या मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या अभ्यासिका असून त्यांनी स्त्री-जाणिवांना प्रखर प्रकाशात आणण्याचेही अमूल्य कार्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाच्या भूमिकेत असणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मराठी साहित्य आणि संमेलनातील योगदानासाठी असलेलं अतुट नातं विसरून चालणार नाही.

यापुर्वी  ३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन

कोल्हापूरच्या साहित्यविश्वाचा आढावा घेतला तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते ग्रामीण साहित्य चळवळीच्या वाटचालीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरचे योगदान नजरेत भरते. ग्रामीण भागात साहित्य संमेलनांचे आयोजन, वाचक घडविण्याच्या प्रक्रियेत आणि लेखकांच्या जडणघडणीतही कोल्हापूरचा वाटा मोठा आहे. आत्तापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहेत. यातील 18 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1932 साली सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर 1974 साली 50 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.  त्यानंतर 1992 सालचे 65 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथेच रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. एम.ए. करीत असतानाच त्यांनी पत्रकारितेत ‘सहसंपादक’ या नात्याने प्रवेश केला. रमेश मंत्री यांच्या नावावर १३० हून अधिक पुस्तके आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर, प्रख्यात लेखक ना. सी. फडके, ‘रातवा’कार चंद्रकुमार नलगे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, विनोदी लेखक शंकर पाटील, प्रा. रमेश मंत्री, आनंद यादव, शंकरराव खरात, सखा कलाल, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, राजन गवस अशा दिग्गजांनी मराठी साहित्याला समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापुरात ज्यांचे साहित्यविश्व फुलले, अशा आठ लेखकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.

कोल्हापूर मधील मराठी साहित्यिक

कोल्हापूर जिल्ह्यातील वि. स. खांडेकर, ना.धों. महानोर यांच्यापासून ते अलीकडील काळातील कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा प्रवास मराठी साहित्याला सुवर्ण झळाळी देणारा आहे. साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. वि. स. खांडेकरांनी मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला होता. नवनाथ गोरे हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत. नामदेव धोंडी महानोर हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रानकवी होते. त्यांच्या कविता आणि गाण्यांनी मराठी काव्य साहित्यावर विशेष ठसा निर्माण केला आहे. अगदी आजच्या काळातील ग्रामीण भाषेवर आधारीत रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साहित्यिक यामध्ये कथाकार आप्पासाहेब खोत, बाबा परीट, कवी विनोद कांबळे, नीलेश शेळके, अनुवादक सुप्रिया वकील, सोनाली नवांगुळ यांचे योगदान चांगले आहे.

कोल्हापूर मधील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक

१९६० साली वि. स. खांडेकर यांना ययाती साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये रणजित देसाई यांना स्वामी साठी तर १९९० सालचा पुरस्कार आनंद यादव यांना झोंबी या लेखनासाठी मिळाला. १९९२ मध्ये विश्वास पाटील यांच्या झाडाझडतीला, २००१चा राजन गवस यांना तणकट साठी, २००७ चा गो. मा. पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र) साठी, २०२१ चा किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थंतराची डायरीसाठी तर अलीकडेच २०२३ मध्ये कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

कोल्हापूर मधील मराठी साहित्य विश्वातील दिग्गज

वसंत गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार केले असून १९९४ ते २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे या संस्थेची होती. त्यानंतर कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते. जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून त्यांनी अनेक विज्ञानकथा पुस्तकांचे लेखन केले आहे. झोंबी कार म्हणून ओळखले जाणारे आनंद यादव यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.

मृत्युंजयकार शिवाजी सावंत ख्यातनाम मराठी कादंबरीकार आपणाला परिचित आहेतच. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत त्यांनी अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणखात्याच्या लोकशिक्षण ह्या मासिकाचे संपादक म्हणून केले. ‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (१९६७) ही पहिली कादंबरी लिहिली. सावंत यांना अनेक साहित्यपुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०) आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

विजय तेंडुलकर एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. त्यांच्या एकांकिका यात अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका समग्र एकांकिका (भाग १ ते ३) प्रसिद्ध आहेत. त्यांनी काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे कथांचे लेखनही केले आहे. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन , चिमणा बांधतो बंगला , चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिली आहेत. तसेच अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे.

रमेश मंत्री यांची बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. ‘थंडीचे दिवस’, ‘सुखाचे दिवस’, ‘नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. प्रांजळ, प्रसन्न, दिलखुलास लेखणीतून उतरलेली त्यांची प्रवासवर्णने वाचकांना त्या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतात. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते.

कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान

ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे  यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती. त्यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट ता. शिरोळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी, दूर राहिला गाव, रस्ताच वेगळा धरला, स्वतःतील अवकाश हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. माणूस आणि मुक्काम, रशिया – नव्या दिशांचे आमंत्रण, ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

संकलन – सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

अभिजात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ!

जैसी हरळांमाजी रत्नकिळा।

कि रत्नांमाजि हिरा निळा

तैसी भाषांमाजी चोखळा।

भाषा मराठी।।

अशा शब्दात सार्थ अभिमानाने गौरवण्यात आलेल्या मराठी भाषेला दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असल्याचे विविध पुराव्यांवरून निर्विवादपणे सिद्ध झाले आणि अभिजात भाषा म्हणून तिच्या दर्जावर अखेर गेल्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राजमान्यतेची मोहर उमटली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने मराठी भाषा ही प्राचीन, समृद्ध व श्रेष्ठ असल्याचे योग्य ते दाखले, साहित्य परंपरेची माहिती व इतर दस्तावेज केंद्र सरकारला सादर केले. त्यांची वस्तुनिष्ठता सिद्ध झाल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली दहा वर्षे सुरू असलेल्या लढ्याला यश आले आणि आपल्या मराठीच्या मुकुटात अभिजात भाषा म्हणून श्रेष्ठत्वाचे एक सुंदर मोरपीस खोवले गेले. मराठीवर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना अभिमान वाटावा असा हा क्षण. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केल्यामुळे मराठीचा गौरवशाली समृद्ध इतिहास व तिचे सांस्कृतिक वैभव आता जगभर पोहोचेल, असा विश्वास मराठीजनांच्या हृदयात निर्माण झाला आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होणे हा गौरव तर आहेच पण त्यासोबतच ती संवर्धित  व वृद्धिंगत करण्याची मोठी जबाबदारीही सर्व घटकांची आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग संबंधित विद्यापीठांच्या स्थापनेपासूनच आहेत. परंतू स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ मात्र राज्यात अस्तित्वात आले नव्हते. इतर राज्यांचा विचार केला तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अशी विद्यापीठे फार पूर्वीच स्थापन केली गेली आहेत. प्रादेशिक अस्मिता जपण्यासह भाषेचा निरंतर विकास व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी १९८१  ते २०१२ या कालावधीत तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषा विद्यापीठांची स्थापना झाली व त्या माध्यमातून सर्व शाखांचे शिक्षण त्या राज्याच्या भाषेत तेथे देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याची खंत भाषाप्रेमींना जाणवत होती. त्यातून मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही लोकभावना प्रबळ होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठाची मागणी तशी जुनीच. १९३३ मध्ये नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात यावर प्रथमच चर्चा करण्यात आली व त्यानंतर १९३९  च्या साहित्य संमेलनात साहित्यिक व भाषेचे अभ्यासक मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठी ही केवळ लोकव्यवहार व साहित्यनिर्मितीची भाषा म्हणून मर्यादित न ठेवता ती ज्ञानभाषा व आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्याची गरज प्रतिपादित होत असताना त्या दृष्टीने या भाषेसाठी समर्पित स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे होते.

महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व मुळात अभिजातच असलेली  मराठी जपायची तर तिचा इथून पुढला प्रवास मराठीसाठी समर्पित विद्यापीठातून व्हावा यावर सर्व साहित्यिक व मराठीप्रेमींचे एकमत होते. या लोकभावनेची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीचे बीजारोपण केले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने जुलै २०२३ मध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येऊन या प्रयत्नांना गती देण्यात आली. या समितीने अवघ्या दोन महिन्यात सर्वसमावेशक तपशील व अहवाल राज्य शासनास सादर केला. त्या आधारावर मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषा विद्यापीठ कुठे स्थापन करावे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यासाठी वऱ्हाडातील रिद्धपूरशिवाय अधिक योग्य अशी दुसरी जागा कोणती असणार? रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकापासून नवे पंथ व भक्तिमार्ग उदयास येत होते. श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली. जातिनिरपेक्षता आणि अहिंसा हे या पंथाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात महानुभाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पंथाचा उत्तरेकडे दिल्ली व पंजाबपर्यंत प्रसार झाल्याचे अभ्यासक सांगतात.

श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथाचे आद्यपुरुष व श्री चक्रधर स्वामींचे गुरु. त्यांचे वास्तव्य रिद्धपूर येथे होते. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. महानुभाव पंथाच्या प्रारंभिक अनुयांपैकी एक व मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेले म्हाइंभट श्री चक्रधरांच्या पहिल्या भेटीतच प्रभावित झाले. स्वामींच्या विचारांनी प्रेरित होऊन म्हाइंभट्ट कायमचे रिद्धपूर येथे स्थायिक झाले. त्यांनी चक्रधर स्वामींचे विचार व शिकवणुकीचे आयुष्यभर अनुसरण केले.

श्री चक्रधर स्वामींच्या आदेशाने  म्हाइंभट्टानी इसवी सन १२७८ मध्ये ‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ रिद्धपूरच्या पावनभुमीत लिहिला. (या ग्रंथ लेखनाच्या कालनिश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.) विशेष म्हणजे या पंथाने मराठी भाषेला त्यांच्या साहित्यात प्रथम व मोलाचे स्थान दिले. महानुभावांच्या सांकेतिक लीपींबाबतही अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. स्वामींच्या उत्तरागमनानंतर महाराष्ट्रभरातील त्यांचे सर्व शिष्य रिद्धपूरला आलेत. श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र व कार्याच्या स्मरणार्थ तसेच त्यांचे शिष्य व महानुभाव पंथियांना त्यांचे मार्गदर्शन व सहवास लाभत राहावा यासाठी म्हाइंभट्ट यांनी लीळाचरित्राची निर्मिती केली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू, श्री नागदेवाचार्य, केशिराज, म्हाळसा यांच्या प्रतिभेला अंकुर फुटलेत. स्मृतिस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, दृष्टांत पाठ इत्यादी ग्रंथ येथे निर्माण झालेत. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. ज्याला ‘महदंबेचे धवळे’ म्हणतात. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी कथा व काव्य निर्मिती केली. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती रिद्धपूर येथे झाली. त्या काळी मराठी भाषेतून तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करणारा महानुभाव पंथ अधिक नावारूपास आला व त्यातूनच ‘मराठी वाङ्मयाचीही काशी’ अशी रिद्धपूरची ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयीन साहित्याची क्रांती येथे घडून आली. या साहित्यातून अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पट उलगडला व समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य रिद्धपूर येथून सुरू झाले व मराठी भाषेची नाळ रिद्धपूरशी जोडल्या गेली. मराठी भाषेच्या समृद्ध होण्यात महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे आणि त्यास रिद्धपूर साक्षी राहिले आहे.

मराठीचा अधिक सखोल अभ्यास, संशोधन व भाषेच्या संवर्धनासाठी या विद्यापीठाची मोलाची भूमिका असणार आहे. विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ.अविनाश आवलगावकर यांची  नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते प्राध्यापक होते. मराठी व इंग्रजी विभागाचे प्रमुख व अधिष्ठाताही ते होते. साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक असलेले डॉ. आवलगावकर यांचे मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य व समीक्षा या विषयांवर प्रभुत्व आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये त्यांचा समावेश होता. शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा त्यांना अनुभव असून, त्यांची अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. डॉ. आवलगावकरांचे व्यापक अनुभव व शैक्षणिक नेतृत्व विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंका नाही

मराठी भाषा विद्यापीठात वैविध्यपूर्ण व बहुभाषिक शिक्षण कसे मिळेल व येथील विद्यार्थी त्याच्या आयुष्यात रोजगारासाठी कसा सक्षम होईल याकडे प्रामुख्याने विद्यापीठाने काटेकोर नियोजन केले आहे. अभिजात मराठी भाषा व साहित्यात येथे स्वतंत्र पदवी व पदविका घेता येणार आहे. मराठीचे लेखन व संवाद कौशल्याधारित अल्पावधीचे अभ्यासक्रम येथे असणार आहेत. शासन दरबारी इंग्रजीचा सर्रास वापर होतो, त्या ऐवजी मराठीला प्राधान्य देत मराठीचा वापर वाढावा यासाठी विशेष अभ्यासक्रमासह मराठी साहित्याचे अध्ययन व अध्यापन यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. यासाठी इतर राज्यातील विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन आदींची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. परदेशातील साहित्याचे अनुवाद मराठीत व येथील मराठी साहित्य जगभरात अनुवादित स्वरूपात उपलब्ध करता यावे यासाठी अनुवादावर आधारित शिक्षण, इतर भाषेतील साहित्य व मराठी साहित्याचा तौलानिक अभ्यास या विषयांवर येथे अभ्यासक्रम असणार आहे.

आपल्या देशात लिपी स्वरूपातील महत्वपूर्ण दस्तावेज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अनेकांचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. अशा लिपींचा अभ्यास व संशोधन करून देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तावेज जतन करण्याच्या उद्देशाने लिपी आधारित अभ्यासक्रम येथे असणार आहे. मराठीचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. उपयोजित कले अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा व सर्व क्षेत्रांना साहित्याशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

रिद्धपूर येथील विद्यापीठासाठी सुमारे ६० एकर जागा संपादन करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. येत्या  शैक्षणिक वर्षापसून येथे काही अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत व्यवस्थापकीय परिषदेने मंजूरी दिली असून शासनाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासनाने ४  कोटी २५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील अंदाजे १ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, कार्यालय व सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. उर्वरित प्रस्तावित निधीतून विद्यापीठासाठी आवश्यक त्या सर्व बाबी म्हणजे ग्रंथालय, संदर्भ ग्रंथ कक्ष, अभ्यासिका आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.

अभिजात मराठीच्या संवर्धनासह तिचे भाषिक सौष्ठव जपून ती अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झाले आहे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ‘जगातील सर्व प्रगल्भ भाषांना जे साधलं ते मराठीलाही साधता येईल. फक्त आपला विश्वास हवा, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायभाषेच्या क्षमतेवर.

अभिजात मराठीचा अभ्यास, संशोधन व विकास करता यावा यासाठी उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर असंख्य हृदयात हा विश्वास दृढ झाला आहे!

श्रीमती पल्लवी धारव

सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर

साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका शोध घेता आला. या तुलनेत साहित्य संमेलनाचा इतिहास हा केवळ दीडशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडे लेखक-कवी ही व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. समूहापेक्षा आपण निराळे आहोत, आणि वेगळा विचार करत आहोत, ही जाणीव या व्यक्तींकडे होती. (मध्ययुगात ही जाणीव असली तरी लेखक-कवी व्यापक लोकसमूहाचा भाग होते.)

साहित्य संमेलनाचा प्रारंभ

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले.

साधारणतः तेव्हापासून साहित्य संमेलनांना सुरुवात झाली असे म्हणता येते.

साहित्य संमेलनाचे बदलते स्वरूप

गेल्या दीडशे वर्षात साहित्य संमेलनांचे स्वरूप बदलले. कथा, कविता, कादंबरी व अन्य वाङ्मय प्रकार यांना केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्रपणे कथा संमेलन, कविता संमेलन, कादंबरी संमेलन, अनुवादकांचे संमेलन,बालकुमार साहित्य संमेलन, गझल संमेलन यांचे आयोजन होऊ लागले.

वाङ्मयीन प्रवाहांची समृद्धी

दरम्यानच्या काळात उदयास आलेल्या विविध वाङ्मयीन प्रवाहांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी साहित्य संमेलनाचा मार्ग स्वीकारला. त्यातून ग्रामीण साहित्य संमेलन, सत्यशोधकी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन,  विचारवेध साहित्य संमेलन, भटके विमुक्त साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशा संमेलनाची सुरुवात झाली.

प्रादेशिक साहित्य संमेलन

मराठी प्रांतातील विविध भौगोलिक प्रदेशांनी स्वतःची स्वतंत्र ओळख जपणारी साहित्य संमेलने पुढील काळात सुरू केली. यातून मराठवाडा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, गोमंतकीय साहित्य संमेलन, बृहनमहाराष्ट्र साहित्य संमेलन, कोंकण मराठी साहित्य संमेलन अशी संमेलने प्रादेशिक विभागानुसार जिल्हा वा तालुका पातळीवरही त्या त्या भूगोलाप्रमाणे आयोजित करण्यात येऊ लागली.

मराठी बोलीचे भरणपोषण

मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. तिची नानाविध रूपे एकाच वेळी अस्तित्वात आहेत. तिच्या असंख्य प्रादेशिक, क्षेत्रीय बोली आहेत. बोलींमुळे मराठी भाषेला चैतन्य प्राप्त झाले आहे. कधीकाळी बोलींना दुय्यम समजण्याची मानसिकता समाजात होती, तथापि अलिकडच्या काळात बोलींविषयीचा अभिमान जाणीवपूर्वक व्यक्त होऊ लागला आहे. यातून त्या-त्या बोलीत लिहिणाऱ्या लेखकांनी बोली विषयक भान निर्माण करणारी साहित्य संमेलने आयोजित करण्यास सुरुवात केली. यातून बोली विषयक साहित्याचे भरण पोषण झाले.  झाडीबोली साहित्य संमेलन, वऱ्हाडी साहित्य संमेलन, अहिराणी साहित्य संमेलन, मराठवाडी बोलींचे साहित्य संमेलन, कोंकणी साहित्य संमेलन अशा भाषाभान जागृत करणाऱ्या संमेलनाची निर्मिती याचाच परिपाक आहे.

विचारधारांचा प्रचार प्रसार

विशिष्ट विचारधारा लक्षात घेऊन, विशिष्ट व्यक्तिमत्व व ऊर्जाकेंद्र लक्षात घेऊन फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, गुणिजन साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन अशा संमेलनांचे आयोजन होऊ लागले. अस्मितादर्श या नियतकालिकाने अनेक वर्ष लेखक मेळावे आयोजित केले, त्यांचे स्वरूप साहित्य संमेलनाचेच होते. विशिष्ट व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय साहित्य संमेलन, शासकीय अधिकारी साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, विद्यार्थी साहित्य संमेलन, उद्योजक साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन यांच्या आयोजनात सुरुवात केली. यातील कामगार साहित्य संमेलनांस शासकीय पातळीवरून भरीव अर्थसहाय्य मिळते.

प्रतिभा संगम : विद्यार्थी साहित्यिकांचे व्यासपीठ

प्रतिभा संगम हे विद्यार्थी साहित्य संमेलन विद्यार्थी चळवळीच्या वतीने आयोजित केले जाणारे अभिनव साहित्य संमेलन आहे. लेखक कवींना ज्या विशिष्ट टप्प्यावर मार्गदर्शनाची गरज असते आणि व्यासपीठांची आवश्यकता असते, अशा टप्प्यावर ‘प्रतिभा संगम’ साहित्य संमेलन त्यांना अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध करून देते. तीन दशकांची परंपरा असणाऱ्या प्रतिभा संगमने महाराष्ट्राला अनेक नामवंत साहित्यिक दिले आहेत.

साहित्य संस्कृती मंडळाचे भरीव अर्थसहाय्य

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग अंतर्गत असणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली, त्यातून साहित्य संमेलनांना मोठे बळ मिळाले व गावोगावी साहित्य संमेलने आयोजित होऊ लागली. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात खेड्यापाड्यात साहित्य संमेलने होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी होऊन साहित्यविषयक चर्चांची व समकालीन प्रश्नांची चर्चा करतात असे दिसते.

विश्व मराठी साहित्य संमेलनाचा जागर

राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन साहित्यकेंद्री नसले तरी यात होणारी भाषाविषयक चर्चा  महाराष्ट्री समाजाच्या हिताची असते.

मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने दरम्यानच्या काळात विश्व मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विविध साहित्य संस्थांची विश्व संमेलने मागील काळात संयुक्त अरब अमिरात, मॉरिशियस, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशात आयोजित करण्यात आली आहेत. ‘मुक्तसृजन’ साहित्य पत्रिकेच्या वतीनेही  विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे, डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुबई येथे डिसेंबर महिन्यात हे संमेलन आयोजित करण्यात आले. गेल्या अनेक दशकांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक मराठी संमेलनांचेही वेगळेपण अधोरेखित करण्यासारखे आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या या जागरामुळे मराठी भाषेचा विस्तार सर्वदूर होताना दिसतो.

मराठवाड्यातील साहित्य संमेलने

मराठवाडा ही मराठी भाषेची जन्मभूमी आहे. निजामी राजवटीत हा प्रदेश भाषिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या दडपशाही खाली होता. तथापि विसाव्या शतकात येथील लेखक कवींनी एकत्र येऊन जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवून साहित्य परिषदेची स्थापना केली व मराठवाडा साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. ही संमेलने भाषा विकासासाठी व राजकीय आत्मभानासाठी अत्यंत महत्त्वाची होती. मराठवाड्याला निजामाच्या जोखडाखालून मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्यात मराठवाडा साहित्य संमेलनांचा उल्लेख अपरिहार्य आहे.

आजही मराठवाड्याच्या बहुतेक जिल्ह्यात वेळोवेळी साहित्य संमेलने होत असतात. अगदी या दोन महिन्यांची नोंद घ्यायची झाली तरी एकट्या नांदेड जिल्ह्यात आठ ते दहा साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले. भोकर या ठिकाणी लोकसंवाद साहित्य संमेलन, सावरगाव या ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलन, सगरोळी या गावात साहित्य संस्कृती मंडळाच्या साह्याने राज्यस्तरीय साहित्य संमेलन, तसेच सोनखेड व मुदखेड या ठिकाणीही साहित्य संमेलने आयोजित केली गेली. नजिकच्या काळात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने जिल्हा ग्रंथोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अनुवादित मराठी साहित्याचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. नांदेडच्या आजूबाजूला शिरूर अनंतपाळ, धर्मापुरी या ठिकाणी संमेलने झाली. माजलगाव, अंबाजोगाई, जालना, वाळूज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी या दोन महिन्यात साहित्य संमेलने आयोजित केली गेली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे एप्रिल महिन्यात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नांदेड येथे समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलने भाषा समृद्धीसाठी आवश्यक

साहित्य संमेलनाची ही रेलचेल भाषिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे. साहित्य हा एकूण भाषा व्यवहाराचा अत्यंत छोटा भाग आहे, तरी साहित्यामुळे भाषासंस्कृती आणि समाजसंस्कृती प्रवाहित होत असते. विचारांची आदान प्रदान करण्यासाठी व प्रचार प्रसार करण्यासाठी साहित्याइतका दुसरा उत्तम मार्ग नाही समाजातील सर्वच घटकांनी साहित्य संमेलनांचे महत्त्व ओळखले आहे.

अलिकडच्या काळात जेव्हा मराठी भाषेवर आक्रमणे वाढली आहेत. इंग्रजीचा अतिरिक्त वापर सभोवताली होऊ लागला आहे. अनेक इंग्रजी शब्दांचे बस्तान आमच्या दैनंदिन जीवनातही बसले आहे, अशावेळी साहित्य संमेलनातून केल्या जाणाऱ्या भाषाविषयक चर्चा समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बहुतेक साहित्य संमेलनातून अभिजात मराठीच्या संदर्भात चर्चासत्रे आयोजित केली गेली, भाषेचा अभिमान मनामनापर्यंत पोहोचवणारी घटना आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी समाजाचा अभिमानबिंदू आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व दिवाळी अंक हे मराठी भाषक समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा घटना अन्य भाषिक प्रांतामध्ये होत नाहीत.

मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मागच्या दीडशे वर्षात भाषा संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्य संमेलनाचे योगदान लक्षात घेण्याजोगते आहे, असे म्हणता येईल.

प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर

मराठी विभाग प्रमुख

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

संपर्क – ९४२३२७४५६५

 

(डॉ .पृथ्वीराज तौर हे प्राध्यापक असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा विभागप्रमुख व ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

अभिजात मराठीचा गौरव… दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन…

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

मराठी साहित्य विश्वात साहित्य संमेलनाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कदाचित इतर भाषांमध्ये अशा पद्धतीचे साहित्य संमेलने क्वचित होत असावेत. साहित्य संमेलन भरवण्यासाठी शासन आर्थिक मदत करीत असल्यामुळे उत्तम पद्धतीने हा उपक्रम राबवता येणे शक्य झाले आहे. संमेलनामुळे लहान मोठे साहित्यिक एकत्रित आल्याने विषयांची देवाण-घेवाण होते. प्रेरणा, प्रोत्साहन मिळते. शिवाय विविध विषयांवर होणाऱ्या परिसंवादातून नवसाहित्यिकांना साहित्य व्यवहारातील विविध घडामोडींचे आकलन होत असते. नव्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होत असल्यामुळे अनेक शंकांचे निरसन होत असते. वंचितांनाही स्थान मिळते. अमळनेर येथे झालेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात तृतीयपंथी तथा ट्रान्सजेंडर यांच्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. यातून साहित्यिकांना अनेक कथाबीज प्राप्त झाले असावेत. संमेलनाचा प्रमुख घटक म्हणजे ग्रंथ दालनं! अनेक मान्यवर प्रकाशकांचे पुस्तकांचे स्टॉल असल्यामुळे एकाच ठिकाणी आवडत्या पुस्तकांची खरेदी साहित्य रसिक, वाचकांना करता येते.

ग्रंथ वाचन आणि प्रसार यांना चालना मिळावी, साहित्यिकांनी एकत्रित येऊन चर्चा करावी, या उदात्त हेतूने न्यायमूर्ती रानडे यांनी साहित्य संमेलन भरवण्याची कल्पना लोकहितवादी यांच्याकडे मांडली. 1865 मध्ये झालेल्या ग्रंथगणनेनुसार 431 गद्यग्रंथ व 230 पद्यग्रंथ निर्मिती झाल्याचे आढळून आले. 1878 च्या फेब्रुवारीच्या ज्ञानप्रकाशच्या अंकातून जाहिरात वजा साहित्यिकांना एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आल्यावर पुणे येथील हिराबागेत 11 मे, 1878 रोजी न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले साहित्य संमेलन भरले.

नुकतेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याच अनुषंगाने 98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न होणार आहे. देशाच्या राजधानीत सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उद्घाटन करणार आहेत. एवढा मान क्वचित इतर कुठल्या भाषेला मिळाला असेल, असा प्रश्न सुखावणारा आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिल्ली राजधानीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मराठी भाषिक मोठ्या संख्येने स्थिरावलेले आहेत. त्यांचेही स्नेहसंमेलन या निमित्ताने होणार आहे. आपल्या भाषेवर प्रत्येकाचे प्रेम असते, अभिमान असतो. प्रत्येक वाचकाचे दैवत एखादा लेखक असतो. अशा दैवत लेखकाला प्रत्यक्ष पाहण्याचा, ऐकण्याचा योग यानिमित्ताने येणार आहे, असं म्हटलं तर ही वाचकांसाठी पर्वणीच म्हणता येईल.

‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही केवळ कवी कल्पना नसून ती पूर्वी आणि आत्ताही सत्यरूप घेऊन अवतरत आहे. राजधानी दिल्लीचे रक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली होती. आताही दिल्लीत शेकडो मराठी लोक विविध अधिकारपदावर कार्यरत आहेत. दिल्लीचे रक्षण करीत आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी देश रक्षणात बहुमूल्य कामगिरी बजावलेली आहे. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला’ हे शब्द आजही मराठी मनावर रुंजी घालत आहेत.

मराठीची उज्ज्वल पताका संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा आणि सत्तर वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दिल्लीच्या ऐतिहासिक तालकटोरा येथे हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने फडकणार आहे, याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन हे पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णपान ठरावे असेच आहे. मराठी माणूस, सारस्वत, प्रकाशक, वाचक, रसिक आणि मराठी अभिजात भाषा हे सगळेच जगाच्या साहित्य विश्वात ठळक नोंद घेणारे आहे, यात शंका नाही.

अभिजात भाषेचा दर्जा उंचावला पाहिजे, या अनुषंगाने मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हावे, दर्जेदार निर्मिती व्हावी, प्रचार – प्रसार व्हावा, यासाठी पूरक असे हे दिल्लीत भरणारे मराठी साहित्य संमेलन असणार आहे. मराठी बाणा कसा असतो याचा अनुभव दिल्लीकरांना करून देण्यासाठी जास्तीत जास्त मराठीच्या अनुयायांनी या संमेलनात सहभागी व्हावे. सर्वच पातळीवर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी आपण मराठी म्हणून कटिबद्ध असायला पाहिजे.

मराठी भाषेने नेहमीच देशातील नव्हे, तर परदेशीय भाषांना आदराने जवळ केलेले आहे. सगळ्याच भाषांचा स्वीकार करणारी मराठी भाषा, अनेक बोलींनी समृद्ध असणारी मराठी भाषा, जाज्वल्य लोक इतिहास, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकसाहित्याने नटलेल्या मराठी भाषेचा सन्मान आज सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होत आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी व मराठीचे कौतुकाचे साक्षीदार होण्यासाठी संमेलनास उपस्थिती आवश्यक आहे. आपणच आपल्या भाषेचा गौरव करणार नाही तर मग कोण करणार?

प्रा. संजीव गिरासे

प्राचार्य, स्व. आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे.

भ्रमणध्वनी 9325534511

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास निधी उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका):  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. तसेच सर्वोपयोगी अद्यावत सभागृह उभारले जावे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने अशा लोकोपयोगी कमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरण या कामाचे भुमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, संजय ठोकळ, राजेंद्र जंजाळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, पुतळ्याचे सुशोभिकरण व परिसराचा विकास ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कदाचित हे चांगले काम माझ्या हातून व्हावे, असे होणार असावे. आता सर्व लोकप्रतिनिधी हे एक विचारांचे आहेत. अशा चांगल्या कामासाठी आम्ही निधी आणून हे काम पूर्ण करु. समाजहिताच्या या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही. उत्तम दर्जाचे काम करु. पुतळा, परिसर विकास व सभागृह अशा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वास पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

इमाव कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला बोध देणारे आहे. हे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. प्रत्येकाने ते वाचायला हवे. अण्णा भाऊ साठे यांचे यथोचित स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत,असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संजय ठोकळ यांनी केले. पंचशिला भालेराव व त्यांच्या कलापथकातील कलावंतांनी अण्णा भाऊ साठे यांची गाणी सादर केली.  विनोद साबळे यांनी आभार मानले.

०००

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. १६ (जिमाका): सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने, अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे, प्रभाकर शेळके, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, आज जग वेगाने बदलत आहे आणि इतक्या वेगाने बदलते की एक गोष्ट आपल्याला समजण्याच्या अगोदर दुसरे काही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप संपत नाही तोवर ए.आय हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. आजच्या युवा पिढीचे वाचन कमी झाले आहे. इंग्रजांनी 200 वर्षापूर्वी देशात इंग्रजी भाषा आणली आणि या इंग्रजी भाषेत आपण सर्व जण गुरफुटून गेलो आहे. यामुळे आज आपण अहिराणी, मराठी भाषा बोलणे विसरून चाललो आहे. या भाषेला टिकविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कष्ट आपल्याला करावे लागणार आहे. मुलांना अहिराणी थोडीफार यायला पाहिजे ते शिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अहिराणी असो, मराठी असो ही आपली स्वत:ची भाषा प्रत्येकाला येणे आवश्यक आहे.  सांस्कृतिक वारसा असणारे भारत वर्ष आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातूनही वाचनालयासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आज साहित्यिकांची संख्या हळूहळू कमी होत आहे.  आपण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.

या दोन दिवशीय ग्रंथोत्सवात काल परिसंवाद कार्यक्रमांत ‘ग्रंथानी मला घडविले’ या विषयावर विद्यार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केले. आज झालेल्या परिसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने यांनी ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’ या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले. कथाकथन कार्यक्रमात साहित्यिक सुरेश मोरे यांनी शेतकरी आत्महत्या या विषयांवर ‘यसा दादानी फाशी लीदी’ यावर कथाकथन केले. तर अहिराणी कथाकार प्रविण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यांन’ हे एकपात्री नाटक सादर करुन प्रेक्षकांना हसवुन मंत्रमुग्ध केले.

बहुभाषिक कवी संमेलनात प्रभाकर शेळके, रावसाहेब कुवर, अरुणकुमार जव्हेरी, लतिका चौधरी, के.बी.लोहार, बाळु श्रीराम, प्रविण पवार, चंद्रशेखर कासार, प्रा.एन.डी.पाटील, माया साळुंखे, दत्तात्रय कल्याणकर, कमलेश शिंदे, गुलाब मोरे, अरविंद भामरे, शामल पाटील, सुनिल पाटील, गोकुळ बागुल, यशवंत निकवाडे, ईश्वर परदेशी, दत्तात्रय वाघ, जयराम मोरे, अहमद शेख, संजय धनगड, पौर्णिमा पाठक या कवीनी सहभाग घेतला. कवी संमेलनांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे यांनी तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील यांनी मानले.

०००

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू – मंत्री हसन मुश्रीफ

सांगली, दि. १६, (जिमाका) : शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी. त्यांना चांगली सुविधा द्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, या नविन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी व्यवस्था करावी. शासकीय रूग्णालय व महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेरीटवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होणे, त्यांना चांगली सुविधा देणे व तशा प्रकारचे काम करण्याची शासनाची व आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तयार करणे हे काम हातामध्ये घेऊ. या रूग्णालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृह दुरूस्तीसाठी 17 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. या रूग्णालयामध्ये हृदयरोग विभाग, मिरजेला कॅन्सर केअर हॉस्पीटल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी, नर्सिंग कॉलेजला इमारत मंजूर होण्यासाठी, सुपरस्पेशालिटी रूग्णालय मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली व मिरज ची पूर्वीपासून वैद्यकिय पंढरी म्हणून ओळख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रात सांगली जिल्हा वैद्यकीय पायाभूत सुविधामध्ये अग्रेसर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवनविन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी चांगल्या सुविधा देऊ. आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी, मिरज येथे नर्सिंग कॉलेज व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होण्यासाठी आवश्यक निधीसाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे रूग्णालय मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरामध्ये वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय हे गोरगरीब रूग्णांचा आधारस्तंभ म्हणून उभे आहे. हे हॉस्पीटल चांगले व्हावे गोरगरीब रूग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. सांगली व मिरज शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यक सोयी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रूग्णालय व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व रूग्णांना चांगली सेवा मिळावी हे ध्येय ठेवून काम करीत आहोत. डॉक्टरांनी रूग्णांना चांगली सेवा द्यावी, रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

प्रारंभी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटरचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.

प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केले.

०००

महाराष्ट्राबाहेर पुन्हा एकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा डंका!

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.
केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.
अशी आहे मराठी साहित्य संमेलनाची गौरवशाली परंपरा
मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ १८७८ साली पुण्यात रोवली गेली. त्यानंतर महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक संमेलने महाराष्ट्राबाहेर पार पडली आहेत. विशेष म्हणजे १८७८ साली सुरू झालेली साहित्य संमेलनाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले संमेलन १८७८ साली पुणे येथे पार पडले.
✒️ यानंतर १९०९ साली म्हणजेच तब्बल २१ वर्षांनी सातवे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
✒️ १९१७ साली म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी दहावे संमेलन मध्यप्रदेश मधील इंदूर येथे पार पडले.
✒️ १९२१ साली तब्बल चार वर्षांनी अकरावे संमेलन बडोदा (गुजरात ) येथे पार पडले.
✒️ १९२८ साली तब्बल सात वर्षांनी चौदावे संमेलन मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे पार पडले.
✒️ १९२९ साली पंधरावे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ १९३० साली सोळावे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
✒️ १९३१ साली सतरावे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
✒️ १९३४ साली तब्बल चार वर्षांनी विसावे संमेलन बडोदा (गुजरात) येथे पार पडले.
✒️ १९३५ साली एकविसावे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पार पडले.
✒️ १९४६ साली तब्बल अकरा वर्षांनी ३० वे संमेलन कर्नाटकमधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ १९४७ साली ३१ वे संमेलन तेलंगणातील हैद्राबाद येथे पार पडले.
✒️ १९५१ साली तब्बल चार वर्षांनी ३४ वे संमेलन कर्नाटक मधील कारवार येथे पार पडले.
✒️ १९५३ साली ३६ वे संमेलन गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडले.
✒️ १९५४ साली ३७ वे संमेलन दिल्ली येथे पार पडले.
✒️ १९६१ साली ४३ वे संमेलन तब्बल सात वर्षांनी मध्यप्रदेशमधील ग्वालेहर येथे पार पडले.
✒️ १९६४ साली ४५ वे संमेलन गोव्यातील मडगाव येथे पार पडले.
✒️ १९६७ साली ४७ वे संमेलन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडले.
✒️ १९८१ साली तब्बल १४ वर्षांनी ५६ वे संमेलन छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडले.
✒️ २००० साली ७३ वे संमेलन तब्बल 19 वर्षांनी कर्नाटक मधील बेळगाव येथे पार पडले.
✒️ २००१ साली ७४ वे संमेलन मध्यप्रदेशमधील इंदोर येथे पार पडले.
✒️ २०१५ साली तब्बल 14 वर्षांनी ८८ वे संमेलन पंजाबमधील घुमान येथे पार पडले. त्यानंतर 2018
✒️ २०१८ साली ९१ वे संमेलन गुजरात मधील बडोदा येथे पार पडले.
यानंतर यंदा तब्बल ७ वर्षांनी पुन्हा २०२५ साली ९८ वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्ली येथे पार पडणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा जागर
मराठी ही केवळ एक भाषा नसून शब्द, साहित्य, संगीत, कला आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. संत साहित्यापासून ते आधुनिक काव्यापर्यंत, लोककथांपासून आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत मराठी साहित्याचा वारसा अत्यंत समृद्ध आहे.
या संमेलनात मराठी साहित्यविश्वातील मान्यवर लेखक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक एकत्र येणार आहेत. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून मराठी भाषेचे भवितव्य उजळवण्याचा संकल्प केला जाणार आहे.
या भव्य सोहळ्याचा भाग बना!
दिल्लीतील हे साहित्य संमेलन मराठी संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्यप्रेमी, लेखक, कवी, विद्यार्थी आणि मराठी भाषा जपणाऱ्या सर्वांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी आहे. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे. चला, तर मग मराठी साहित्याचा हा ऐतिहासिक उत्सव दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीवर भव्य स्वरूपात साजरा करूया!
०००
– वर्षा फडके- आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक, दि. १६ (जिमाका):  पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आज भगूर नगर नगरोत्थान महाअभियान अभियांनंतर्गत भगूर शहराकरीता 24.38 कोटी निधीच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भगूर शहर हे एतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून सन 1925 पासून येथे नगरपरिषद अस्तित्वात असून ती आता शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. भगूर शहराच्या विकासासाठी, शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. चार वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियांनंतर्गत भगूर शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. भगूर शहर हे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व थीमपार्क करिता शिखर सामितीच्या बैठकीमध्ये 40 कोटींच्या विकास आराखड्यास मंजूरी दिली असून प्रथम टप्प्यामधील कामाकरिता 16 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळाच्या दृष्टीने आता शासन स्तरावर बैठका व नियोजन सुरू झाले आहे. यानिमित्ताने नाशिकसाठी केंद्र व राज्यशासानाकडून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी प्रयत्नशील राहील. भगूरवासियांना सर्व मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी कमतरता भासू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या स्मारक व थीमपार्कसाठी मंजूर 40 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले 16 कोटींच्या निधीतून सूरू झालेले स्माराकाचे काम अतिशय दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होणार आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट साठी 75 कोटींचा आराखडा सादर केला असून त्यास मंजूरी प्राप्त होताच कामे सुरू केली जातील. संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचा व परसिराच्या विकासासाठी 45 कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला असून त्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळावी,असे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.

०००

 

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाची प्रसिध्दी जगभरात – मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिध्द होईल, याची खात्री बाळगतो, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तमाम महाराष्ट्राच्यावतीने प्रधानमंत्री मोदी यांना मनापासून धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही आमची वर्षानुवर्षे असलेली मागणी त्यांनी पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे.

सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले, त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. नियोजनामध्ये पुणे येथील सरहद संस्थेचे संजय नहार यांनीदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने जबाबदारी खांद्यावर घेवून दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उंचाविण्यासाठी ते काम करतात त्यांचे देखील अभिनंदन आहे. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री बाळगतो.

०००

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...