बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 320

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाची प्रसिध्दी जगभरात – मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिध्द होईल, याची खात्री बाळगतो, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तमाम महाराष्ट्राच्यावतीने प्रधानमंत्री मोदी यांना मनापासून धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही आमची वर्षानुवर्षे असलेली मागणी त्यांनी पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे.

सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले, त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. नियोजनामध्ये पुणे येथील सरहद संस्थेचे संजय नहार यांनीदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने जबाबदारी खांद्यावर घेवून दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उंचाविण्यासाठी ते काम करतात त्यांचे देखील अभिनंदन आहे. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री बाळगतो.

०००

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रथमच ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

  • मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत स्वागताध्यक्ष, शरद तांदळे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे, या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहदचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, मिलिंद जोशी यांनी दिली.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. 19 रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून, दि. 20 रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.

‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून, प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरविण्यात येत आहे.

दि. 19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. 20 रोजी दिल्लीत पोहोचणार असून, दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून, दि. 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद पुण्याचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.  मराठी भाषामंत्री डॉ. सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तेही रेल्वेद्वारे प्रवास करणार असून, साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार आहेत. रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर, वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), अॕड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

०००

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी  अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ -२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु, मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले.  आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

नाशिक रोड न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • नाशिक रोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर न्यायालयाचे उद्घाटन

नाशिक, दि. १६ (जिमाका) :  न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगतीशील समाजाचा पाया आहे. लोकसंख्या आणि न्यायालयीन प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणामुळे न्यायालयांवरील कामाचा ताण वाढत आहे. त्यासाठी राज्यातील न्याय व्यवस्थेचे बळकटीकरण करीत सुविधा पुरविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. नाशिक रोडच्या नवीन न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि गतिमान करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केला, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत त्याचे अधिकार पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरीष्ठस्तर या न्यायालयाचे उद्घाटन आणि ई सेवा केंद्र, ई ग्रंथालय आदींचे उदघाटन आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिकचे पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे, न्यायमूर्ती किशोर संत, न्यायमूर्ती मिलिंद साठे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुदाम गायकवाड, जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नाशिक रोडच्या नवीन न्यायालय स्थापनेमुळे प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होऊन न्याय प्रक्रियेत गतिमानता येण्यास मदत होईल.

भारतीय न्याय संहिता, नागरिक संरक्षण संहिता आणि साक्ष संहिता या तीन नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात राज्यातील अंमलबजावणीचा मुख्यमंत्री महोदयांकडून आढावा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी नुकताच घेतला आहे. या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यात गतिमान आणि प्रगतिशील कायदा व सुव्यवस्था उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले

राज्यात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 27 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित केल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळी न्याय वैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस दल प्रशिक्षित केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथे साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

न्यायमूर्ती कर्णिक म्हणाले की, सुदृढ समाजासाठी न्यायपालिका आवश्यक आहे. न्यायालयाच्या इमारत बांधकामांसाठी राज्य सरकारचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी उकृष्ट वास्तू रचनाकार उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात न्यायालयीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. न्यायालयात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसासाठी अधिकार पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विधी सेवा समितीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

न्यायमूर्ती कोतवाल यांनी सांगितले की, जनसेवेसाठी न्यायपालिकेला अधिकार दिले आहेत. सुदृढ समाज आणि खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

न्यायमूर्ती मोरे म्हणाले की, नाशिक रोड येथील न्यायालयामुळे वेळेची बचत होईल.

न्यायमूर्ती संत म्हणाले की, न्यायालय हा समाजाचा आधार असतो. सुसंस्कृत समाजात न्यायालयाचे महत्व आहे. न्याय जलद, सुलभ आणि कमी खर्चात मिळण्यासाठी नाशिकरोड येथील न्यायालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यायमूर्ती साठे म्हणाले की, नाशिक शहरासाठी आणखी एक न्यायालय उपलब्ध झाले आहे. रेल्वे स्थानकापासून हे न्यायालय जवळ आहे. त्यामुळे पक्षकारांना न्याय लवकर मिळण्यास मदत होईल.

श्री. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी  प्रास्ताविक केले. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, दि. १६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,  जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी  संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड  उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या  १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल.

शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला.  सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयांचे उद्घाटन

पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधिशांसमोर खटला मांडणी, खटला पडताळणीबाबत सतत अध्ययन करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र  न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, आमदार शरद सोनवणे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुन्नर एस.एस. नायर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. ए. एच. हुसेन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. अहमद खान पठाण, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. राजेंद्र उमाप आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या, त्यामाध्यमातून जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याबाबीचा विचार करुन जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन झाल्यामुळे विविध प्रकारचे खटले दाखल होईल, प्रत्येक खटले पीडित व आरोपीच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे न्यायाधिश आणि वकील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रत्येक खटल्याचा बारकाईने वकिलांनी अभ्यास केला पाहिजे; प्रत्येक खटल्याची पडताळणी केली पाहिजे, लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करावे. खटल्याचा गांभीर्याने विचार करुन वकिलांनी न्यायालयात पुरावे सादर केले पाहिजे. नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करीत राहिले पाहिजे, कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून विविध कलमाचा वापर करुन पक्षकारांना वस्तुनिष्ठपद्धतीने न्याय मिळवून दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

जुन्नर येथील न्यायालयात तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत, कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावे, याकरीता न्यायाधीशांचीही मदत घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाची इमारत सन 1838 या सालाची असून विविध राजवटीचे कामकाज परिसरातील भुईकोट किल्ला, गढी येथून चालत होते; या ऐतिहासिक वास्तूचा पुनर्विकासाबाबतच्या विविध मागण्या विचारात घेवून न्यायालय, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील संघटना तसेच आदींनी मिळून विकास आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांच खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जुन्नर येथील न्यायालयीन इमारत परिसर विकास आणि निवासस्थानाबाबत कार्यवाही करण्यात येत असून याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगामी काळात जुन्नरवासियांना अभिमान वाटेल असाप्रकारचा परिसर विकसित करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

न्यायालयीन वास्तू दिमाखदार तसेच सर्व सुविधांनीयुक्त असल्या पाहिजेत आणि त्यामधून नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, याकरीता जिल्ह्यात टप्प्याने न्यायालयीन इमारतीचा विकास करण्यात येत आहे. जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आले असून आज जुन्नरवासियांच्या न्यायिक इतिहासात आजचा दिवस एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या न्यायालयामुळे पक्षकरांना खेड-राजगुरुनगर येथे जाण्या-येण्याची वेळ तसेच इंधनाची बचत होणार असून परिणामी त्रासही कमी होणार आहे.

न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी खटले, दिवाणी आणि फौजदारी खटले निकाली काढण्यास निकाली काढण्यास मदत होणार आहे. परिसरातील नवोदित वकिलांना सेवा देण्याची संधी उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. शिवाजीनगर येथील वकिलांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार इमारतीला साजेसे असे स्वच्छतागृह आणि परिसराचा विकास करण्यात येईल. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, देशातील उत्तम वास्तूविशारदाकडून उत्कृष्ट आराखडा उपलब्ध करुन देण्यात यावा. देशातील सर्वात चांगली उच्च न्यायालयाची इमारत मुंबई येथे उभारु, अशा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

भारतीय संविधानानुसार न्यायालय देशात कायद्याची अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावतात. भारतीय संविधानाने न्यायालयाला स्वातंत्र्य दिले असल्यामुळे ते  निर्भयपणे आणि तत्वनिष्ठ काम करीत असतात. न्यायालय एक लोकशाहीचा स्तंभ असून नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे राज्य संकल्पना डोळयासमोर ठेवून वकिलांनी पक्षकाराची बाजू मांडून न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

न्यायमूर्ती मारणे म्हणाले, पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या 53 लाख खटल्यांपैकी 7 लाख 10 हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास असून तो टिकवण्यासोबतच निकाल वेळेत लावण्याकरीता प्रयत्न करावे. याकरीता वकिलांनी स्वत:चा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, जुन्नर येथील न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. परिसरातील सर्वसामान्यांना पारदर्शकपद्धतीने वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश महाजन म्हणाले,  उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार काम करीत असताना राज्यशासनाची मदत आवश्यक असते. राज्यशासनाच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात पाच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. आज जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू झाले असून परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे महाजन म्हणाले.

ॲड. अहमदखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जुन्नर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवदास तांबे यांनी केले.

यावेळी विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव विलास गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब दांगट, अतुल बेनके, न्यायाधीश, वकील, विविध वकील संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

०००

आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके

  • १०० दिवसांच्या कृती आराखडा अंमलबजावणीच्या सूचना
  • आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर

नांदेड दि. १५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा सादर करण्यास सांगितले असून त्यानुसार तळागाळातील वंचित घटकाचा विकास साध्य करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून गरीबांच्या कल्याणासह आदिवासी विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले.

किनवट येथे उपविभागीय कार्यालयात त्यांनी प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी, आदी योजनांच्या खर्चाचा आढावा घेतला व लाभार्थ्यांच्या संवादानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होती.

शासनाने शेवटची व्यक्ती, कुटूंब केंद्रबिंदू मानला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचाव्यात, हाच उद्देश ठेवून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात पेसातंर्गत १३ जिल्हे व ५९ तालुके आहेत. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून ७ जानेवारी रोजी राज्यातील ४९७ आश्रमशाळेत मंत्री, राज्याच्या सचिवांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुक्काम करून तेथील सर्व सोयी – सुविधांची पाहाणी केली आहे. पेसातंर्गत नोकरी भरतीत अनिमियतता, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश, विद्यार्थ्यांचा डीबीटी, आहाराचा प्रश्न यापुढे निर्माण होणार नाही. तसेच भविष्यात एकही आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा आराखडा तयार करण्यात आला आहे ,अशी  माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या अध्ययन, अध्यापनातील समस्यांच्या सोडवण्यासोबतच कृती आराखड्याच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. नांदेड जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या महिला, पुरुषांवर अन्याय, अत्याचार करण्याचा प्रयत्न आदीवासी समाज कदापि सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर उपस्थित होते. प्रकल्प स्तरावरील आरोग्य, शिक्षण, पाणी आदी योजनांच्या खर्चाचा आढावा मंत्र्यांसमोर सादर केल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

तत्पूर्वी, त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हयात आदिवासी उपाय योजनेतील सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. पेसा कायदा, वसतीगृह आणि विद्यार्थ्यांच्या सुविधा आदी बाबतही चर्चा झाली.

०००

 

विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. पंतप्रधान मोदी यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे एक डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा फायदा थेट नागरिकांना मिळत असून देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कीर्तिकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री व बँकेच्या संचालक शोभा फडणवीस, अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेने 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात विदर्भातील एक अग्रगण्य बँक म्हणून सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेची ओळख आहे. महिलांना अर्थकारण उत्कृष्टपणे समजते. बचत करणे हा महिलांचा मूळ गुणधर्म आहे. त्यामुळे महिलांच्या हाती बँक असेल तर ती उत्कृष्टच चालेल, यात शंका नाही. रिझर्व बँकेच्या कायद्याचे पालन करीत तसेच एनपीए मानकाला छेद न देता बँक चालविणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास असतो. या बँकेबद्दल सामान्य माणसाला आपुलकी असते. बँकेने सुद्धा दिलेले कर्ज शिस्तीमध्ये परत घेतले पाहिजे. आज 300 कोटींची उलाढाल असलेल्या सन्मित्र बँकेचा एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आहे, ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी असून यासाठी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी अतिशय चांगली प्रगती केली आहे. व्यावसायिक बँकांसमोर सहकारी बँकेने आव्हान उभे केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहकारी बँका टिकतील का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सन्मित्र सारख्या बँकांनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने स्वीकारून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आज या बँकेने कोर बँकिंग, डिजिटल बँकिंग पद्धती स्वीकारली आहे. सन्मित्र बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय हाती घेतले आहेत. बँकांकडून नागरिकांना कर्ज दिली जातात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करीत आहे. सन्मित्र बँकेने सुद्धा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून त्यांनी रोजगार उभा केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चक्र चालण्यास मदत झाली. या बँकेने पुढील वाटचाल अधिक जोमाने करावी.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच वर्षी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भविष्यात आणखी दमदार पाऊल टाकून 500 कोटी, 750 कोटी आणि 1000 कोटीचा टप्पा बँकेने पार करावा. तसेच इतर सहकारी बँकांसाठी सन्मित्र बँक एक रोल मॉडेल म्हणून उभी राहावी, अशी अपेक्षा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा विस्तार सहा-सात जिल्ह्यात झाला असून महिलांना आर्थिक सक्षम करणे, हेच या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बँकेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात संचालक शोभा फडणवीस म्हणाल्या की, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले, याचा मनापासून आनंद आहे. बँकेची वाटचाल यशस्वीपणे होत असून पुढे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. आज सन्मित्र बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम, डीजीटल बँकींग आदी सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे आमच्या बँकेचा एनपीए कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लक्षलक्षिता’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन कीर्ति चांदे यांनी तर आभार माधवी तांबेकर यांनी मानले.

०००

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १६ – प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित  ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. द सत्संग फाउंडेशन नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते. 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी, या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने  महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

०००

१९८५ सालचे नांदेडचे आठवणीतले अ. भा. मराठी साहित्य संमेलन

नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. याचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील होते. नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस चाललेल्या संमेलनाच्या आयोजनाची धुरा पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कडे होती. केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा या संमेलनाच्या आयोजनात मोठा वाटा होता. नांदेडचे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय ठरले….

उत्तम गुणवत्तेचे कार्यक्रम आणि खास मराठवाडी पद्धतीचे आदारातिथ्य व जेवण. यशवंत महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात भोजन व्यवस्था केली होती. साहित्य संमेलनासाठी पुणे – मुंबईहून आलेल्या साहित्यिक पाहुण्यांनी खास नंदिग्रामी व्यंजनांची तोंड भरून तारीफ केली होती. दही, ठेसा आणि वऱ्‍हाडी ज्वारीची भाकरी रूचीपालट करून गेली.

मला आठवते मी संयोजन समितीत होतो. तेव्हा दूरदर्शन सर्वदूर पोचले नव्हते. नांदेडवरून मुंबईसाठी विमानसेवा नव्हती. नांदेड ते मुंबई हा साधारणतः बारा-चौदा तासांचा रेल्वे प्रवास. त्यामुळे मुंबईला ध्वनी चित्रफीत पोचावायची कशी? हा प्रश्न आयोजकांसमोर पडला. स.दि.महाजन हे संयोजन प्रमुख होते. ते मोठे कल्पक. संमेलनाच्या उद्घाटनाची बातमी दूरदर्शनवर आली पाहिजे म्हणून आदल्य दिवशीच उद्घाटनाचा श्रोत्यांविना डमी सोहळा पार पडला. त्याची शुटिंग घेऊन मुंबईला पाठविण्यात आली. अर्थातच दुसऱ्या दिवशी बातमी योग्य प्रकारे सोबतीला पोहोचविण्यात आली. मात्र, व्हिज्युअलसाठी अशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या मागचा उद्देश हा सर्वांना उद्घाटनाची बातमी कळावी हा होता.

हा सोहळा संपल्यानंतर कथाकार शंकर पाटील गमतीने म्हणाले. यावर छान विनोदी कथा लिहिता येईल. तेव्हा खूप हशा पिकला. बातमीसाठीची धडपड आणि साहित्य संमेलनाच्या बातमीचे महत्त्व कायम मनावर अधोरेखित राहिले संमेलन आठवले की ही घटना मात्र आठवतेच आठवते.

नांदेडचे हे साहित्य संमेलन आठवणीत राहण्याची तशी अनेक कारणे आहेत. राजा गोसावी हे अंध कवी या संमेलनातून रसिक श्रोत्यांसमोर आले. राजा मुकुंद यांच्या ‘पोरी जरा जपून ‘ या कवितेला रसिकांनी जोरदार दाद दिली.

राम नगरकर यांच्या ‘रामनगरी’ने हसवता हसवता श्रोत्यांना अंतर्मुख केले. आकाशवाणीला मुलाखत देण्यासाठी त्यांना जे अनुभव आले. ते ऐकताना सतत हास्याचे फवारे उडत होते.

संमेलनाचे अध्यक्ष कथालेखक शंकर पाटील हे तीनही दिवस साहित्य संमेलनात अत्यंत साधेपणाने वावरले. पद्मश्री शामराव कदम यांच्या लिंबगाव येथील शेतात आम्ही गेलो होतो तेव्हा शेती, सहकार, शिक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. निजामी राजवटीत मराठवाड्यातील जनतेवर झालेल्या अनन्वित अत्याचाराच्या हकिकती ऐकून शंकर पाटील व्यथित झाले. हा किस्सा कवी ना. धों. महानोर यांनी सांगितला.

कथाकथनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझ्याकडे होते. द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या कथांना रसिक श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मराठवाडी बोलीतून सादर केलेल्या रा. रं. बोराडे यांच्या ‘म्हैस’ या कथेने तर श्रोत्यांची हसून हसून मुरकुंडी वळवली. या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा’ हा खानदेशची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरील कार्यक्रम खूप भाव खाऊन गेला. परभणीचे आशा जोंधळे आणि अशोक जोंधळे यांच्या गळ्यातून उतरलेली बहिणाबाईंची गाणी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचली. त्यांना बेहद्द आवडली. दत्ता चौगुले यांच्या बासरीने ही गाणी अमीट केली. फ. मुं. शिंदे यांच्या मार्मिक आणि गंभीर निवेदनाने हा कार्यक्रम उंचीवर गेला. या संमेलनानंतर महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे प्रयोग झाले.

या साहित्य संमेलनानिमित्त ‘नांदण’ नावाची अत्यंत देखणी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. नांदेडच्या सांस्कृतिक, साहित्यिक वैभावाची नोंद घेणारे लेख या अंकात असून भालचंद्र कहाळेकर, नरहर कुरुंदकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा नांदेड जिल्ह्यातील लेखक, कवींवर स्वतंत्र टिपणे आहेत. नांदेडचा सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा समजावून घेण्याच्या दृष्टीने ही स्मरणिका महत्त्वाची ठरेल.

नांदेड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तम व्यवस्था, काटेकोर नियोजन आणि कसल्याही प्रकारच्या वादविवादाविना पार पडले. या संमेलनात एकच उणीव जाणवत होती. ती म्हणजे विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या आकस्मिक निधनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडत होते. कुरूंदकर गुरूजी हयात असते तर या संमेलनाची उंची आकाशाला गवसणी घालणारी ठरली असती.

०००

  • प्रा.डॉ.जगदीश कदम, ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड, भ्रमणध्वनी ९४२२८७१४३२

 

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...