मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 3

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

छत्रपती संभाजीनगर, दि.०४ (जिमाका): पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. वृक्ष लागवड, संवर्धन करुन जनसहयोग संस्था करीत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचे पवार यांनी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री पवार हे आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोकअहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास  प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून ‘संपुर्ण वन’ही वनवाटीका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली. यावेळी आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.

समवेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या प्रक्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात ४०० प्रजातीचे वृक्ष, वनस्पती इत्यादीचा समावेश आहे. या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. वृक्ष लागवड, वृक्ष देखभाल आदी कामे करणाऱ्या कामगारांशी उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चा केली. याठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करुन घेतली. विविध प्रजातीच्या वनस्पती, फुले, वेली आदी  एकाच क्षेत्रात असल्याने याठिकाणी  संशोधन केंद्र स्थापन करावे,अशी मागणी ही संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेचे संदीप जगधने, नंदन जाधव, मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते.

०००

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी

छत्रपती संभाजीनगर, दि. ४: उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढीजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी नवीन इमारतीच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे सुरू असलेले काम दर्जेदार झाले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा यंत्रणा व संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करा, असे सांगतानाच त्यांनी कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता श्रीमती पुजारी यांनी यांनी सारथी संस्थेच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सारथी संस्थेचे प्रभारी उपव्यवस्थापकीय संचालक रामदास दौंड, छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता सुंदरलाल भगत, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता योगिता जोशी यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

परिवर्तनशील ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’उपक्रमात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. ०४ : प्राप्त संधी आणि प्रशिक्षण याच्या आधारे तळागाळातील सक्षमीत महिला स्वयं सहायता गटातील महिला देशातील अन्न सुरक्षा मानकांना परिभाषित करू शकतात, याचे माहिम सीफूड प्लाझा हे एक उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र ईट राईट स्ट्रीट फूड हब या परिवर्तनशील उपक्रमात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

देशातील पहिले संपूर्णपणे महिलांकडून संचलित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन, बृहन्मुंबई विभाग यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने, माहिम रेतीबंदर येथे स्वयं सहायता गटाच्या सदस्य असलेल्या महिलांकडून भारतातील पहिले संपूर्णपणे महिलाकडून संचालित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 2 मे रोजी माहिम येथे पार पडला. राज्यमंत्री कदम यांच्याहस्ते महिला स्वयं सहायता गटांच्या 153 महिलांना  प्रमाणपत्रे  प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, बृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न)  मंगेश माने उपस्थित होते.

येथील महिलांकडून तयार अन्नपदार्थ हे फक्त स्वच्छ व चविष्ट नसून त्यामध्ये  कोकणची पारंपरिक खाद्य संस्कृती खोलवर रुजलेले असल्याचे सांगत राज्यमंत्री कदम यांनी स्वयं सहायता गटांच्या सर्व महिलांचे स्वच्छतेची उच्च मानके राखल्याबद्दल गौरवोद्गार काढले. माहिम सीफूड प्लाझामधील खाद्यपदार्थ स्टॉल्सना राज्यमंत्री कदम यांनी भेटी दिल्या.  तसेच अस्सल कोळी पदार्थांचा आस्वाद घेत महिला उद्योजकांशी संवाद साधला.

माहिम सीफूड प्लाझा दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतो. स्वयं सहायता महिला बचत गटाच्या 153 महिलांद्वारे पूर्णपणे व्यवस्थापित, प्रत्येक स्टॉलवर कठोर स्वच्छता नियमांचे पालन केले जाते. येथील महिलांनी ईट राईट इंडिया उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे, ज्यामध्ये ऑडिट आणि तपासणीद्वारे अन्न सुरक्षा मानकांचे संपूर्ण पालन सुनिश्चित केले जातात.

राज्यमंत्री कदम यांनी यावेळी हबच्या यशस्वी प्रमाणीकरणासाठी योगदान दिलेल्या प्रमुख व्यक्तींना देखील सन्मानित केले. ज्यामध्ये बीएमसी जी-उत्तर वॉर्डचे समुदाय संघटक दक्षिता पवार आणि अनिकेत पाटेरे, समुदाय विकास अधिकारी अनिकेत पाच्छरकर आणि अजिंक्य पाच्छरकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर

मुंबई, दि. ०४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१) https://results.digilocker.gov.in

२) https://mahahsscboard.in

३) http://hscresult.mkcl.org

४) https://results.targetpublications.org

५) https://results.navneet.com

६) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results

८) https://www.indiatoday.in/education-today/results

९) https://www.aajtak.in/education/board-exam-results

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in  (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

०००

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ चर्चासत्र

मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले.

‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ यासंदर्भात ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेत ‘वेव्हजएक्स’ चर्चासत्र झाले. यावेळी ॲमेझॉन वेब सर्विसेसचे उद्योग विषयतज्ज्ञ महेश्वरन जी. यांनीही मार्गदर्शन केले.

आजच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगांना अनेक संधी आहेत. आपला कंटेंट चांगला असेल तर उद्योगांनी वेगवेगळ्या क्लाऊड सर्विसेसच्या सहाय्याने आपल्या क्षेत्राचा विस्तार करावा. त्यासाठी बाजारात ‘क्लाऊड सर्विसेस’च्या विविध प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांनी आपला कंटेंट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असा सल्ला श्री. पद्मनाभन यांनी दिला.

श्री. महेश्वरन यांनी क्लाऊड सर्विसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. त्यात सॉफ्टवेअर व अप्लायन्सेस, लिंक, मीडिया कनेक्ट, मीडया लाईव्ह, मीडिया कन्वर्ट, मीडिया पॅकेज, मीडिया टेलर, व्हिडिओ सर्विस, डेडलाईन थिंकबॉक्स, डेडलाईन क्लाऊड, ॲमेझॉन क्लाऊड फ्रंट, अमेझॉन एफएसएक्स, डीसीव्ही यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या माध्यमातून कंपनी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्टार्टअपच्या प्रगतीसाठी इकोसिस्टीम तयार होत आहे. नवीन उद्योगांचा खर्च कमी करणे, त्यांना डेटा ॲनालिसिस उपलब्ध करून देणे, त्यांच्या कंटेंटचे मूल्यवर्धन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध होत असून याचाही वापर नवीन स्टार्टअप यांनी करणे गरजेचे आहे, असे श्री. महेश्वरन यांनी सांगितले.

——- ०००——

संतोष तोडकर/विसंअ/

डिजिटल माध्यमातील प्रचार प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा आवश्यक – एम. ए. पार्थसारथी

Oplus_16908288

‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ॲडव्हर्टायझिंग’ परिसंवाद

मुंबई, दि. ४ : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग’ या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.

श्री. पार्थसारथी म्हणाले, सामजिक संशोधनातून  माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धती, जनगणना, सर्वेक्षण, संभाव्यतेवर आधारित, निश्चित माहिती, निवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते.

डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोध, नियोजन, अंमलबजावणी, आणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीय, खासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगट, लिंग, आवडीनिवडी, ऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहे, असेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले.

अचूक माहिती संकलित करणे गरजेचे

ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजना, वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जाते, दुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते.

०००

गजानन पाटील/ससं/

सिनेमाच्या प्रभावी मांडणीत दिग्दर्शकाची जबाबदारी महत्त्वाची – रिची मेहता

‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ चर्चासत्र

मुंबई, दि. ४ : सिनेमामध्ये एखाद्या  विषयावर मांडणी करताना दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जसा आहे त्याच पद्धतीच्या फ्रेममधून दिग्दर्शक सिनेम प्रेक्षकापर्यंत नेतो. आपल्या सिनेमातून नेमका काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे याची जबाबदारी दिग्दर्शक म्हणून खूप महत्वाची असते, असे प्रतिपादन रिची मेहता यांनी केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिट मध्ये ‘बिहाइंड द फ्रेम : मास्टरिंग द आर्ट ऑफ द सिनेमा’ या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये रिची मेहता मध्ये बोलत होते.

 

रिची मेहता म्हणाल्या की, सिनेमा अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा योग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने एकाचवेळी देश-विदेशात पोहचवू शकतो. स्वानुभवातून निर्माण झालेले कथानक, विषयसूत्र हे अधिक सशक्तपणे मांडता येतात, जे प्रेक्षकांनाही सहजतेने भावतात. नाटक, काल्पनिक कथानक यावर आधारित सिनेमा कोणत्याही माध्यमातून व्यक्त केल्या जाणाऱ्या आशयाची प्रामाणिकता, सत्यता ही ठळकपणे  बघणाऱ्यांच्या लक्षात येते,  हे लक्षात घेऊन अधिक संवेदनशीलतेने भोवतालच्या घटना, प्रसंग यांच्याकडे बघता आले पाहिजे.

 

सिनेमा आणि वेबसिरीज यांच्या विषयांच्या मांडणीमध्ये तसेच प्रेक्षकवर्गामध्ये फरक असतो.  सिनेमामध्ये विषय, पात्र आणि त्याची मांडणी यांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो आणि वेबसिरीजमध्ये हे घटक  सिनेमासारख्या क्रमाने येत नाही तर तिथे ते  वेगळ्या पद्धतीने येतात, दोन्ही माध्यमे प्रभावी असून त्याचा सुयोग्य वापर करून दिग्दर्शक आपल्या विषयाला निश्चितच परिणामकारक पद्धतीने व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहचवू शकतो, असे रिची मेहता यांनी सांगितले.

 

0000

वंदना थोरात/विसंअ/

समाजमाध्यमांतील ‘इन्फ्लुएंसर’ने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे

मुंबई दि. ४ : समाजमाध्यमांतील इनफ्लुएंसर्सने स्वतःची खरी ओळख जपणे गरजेचे असल्याचे मत ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग फॉर इन्फ्लुएंसर’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज २०२५ दृकश्राव्य आणि मनोरंजन समिटमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये सहभागी सहेली सिन्हा म्हणाल्या, इन्फ्लुएंसरने जबाबदारीने विविध ब्रँडसोबतची भागीदारी केली पाहिजे. ब्रँडसोबत केलेली भागीदारी ही केवळ जाहिरात करणे एवढेच नसून ती  एक मोठी जबाबदारी आहे. कारण ग्राहक प्रभावी व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी जाहिरात केलेल्या गोष्टी विकत घेत असतात. त्यामुळे इन्फ्लुएंसरने स्वतः त्या गोष्टीची माहिती, अनुभव घेऊन मगच त्याबाबत इतरांना सांगण्याची पारदर्शकता जोपासणे आवश्यक आहे. जाहिरात करताना नेहमी अटी व शर्ती आणि त्या-त्या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठीच्या सूचना, नियमावली पाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शिबानी अख्तर यांनी समाजमाध्यमांतील इन्फ्लुएंसरने प्रामाणिकपणास महत्त्व द्यावे. प्रामाणिक कंटेंट दीर्घकाळ टिकतो आणि विश्वास निर्माण करतो. आरोग्यासारख्या संवेदनशील विषयांवर ब्रँडिंग करताना विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

विनय पिल्लई म्हणाले, कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना त्या प्लॅटफॉर्मची कार्यपद्धती नीट समजून घेऊन त्या चौकटीत आपले सादरीकरण करावे. कारण प्रत्येक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. हे लक्षात घेऊन आपल्याकडील वैशिष्ट्यांची ओळख करून त्यानुसारच कंटेंट बनवावा. स्वतःची विशिष्ट ओळख  विकसित करावी. सोशल मिडिया प्रभावी असले तरी दूरचित्रवाणी आजही प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

मयंक शेखर यांनी विश्वास व विश्‍वासार्हता निर्माण करण्याची गरज असून  सातत्याने अधिकृत माहिती मांडणे म्हणजे विश्‍वासार्हतेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्रभावी व्यक्तींनी केवळ ट्रेंड फॉलो न करता, योग्य आवश्यक बाबी मांडल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तनू बॅनर्जीं यांनी माध्यमे सतत बदलत आहेत, त्यामुळे इन्फ्लुएंसरनेही आपल्या कार्यपद्धती बदलायला हवी. ग्राहकांना शिक्षित करणे व सजग ठेवणे देखील प्रभावी व्यक्तींची जबाबदारी आहे, असे सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

अभिजात चित्रपट सामूहिक सांस्कृतिक अस्मिता आणि वारशाचे प्रतिबिंब – अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम

मुंबई, दि.4 :- “भारतीय लोकांना जुन्या आठवणीत रमायला आवडते. एकीकडे जुनी पिढी त्यांच्या तरुणपणातील जादू पुन्हा जगायचा  प्रयत्न करत आहे. जुने अभिजात  चित्रपट निखळ मनोरंजनापेक्षाही आपल्या सामूहिक सांस्कृतिक अस्मिता  आणि वारशाचे प्रतिबिंब आहेत. चित्रपट पुनर्संचयित करणे ही एक बारीकसारीक तपशिलांबाबत जागरुक राहण्याची  प्रक्रिया आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, आपण मूळ संकल्पनेशी प्रामाणिक राहू शकतो. असे पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो, अहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

वेव्हज -2025 – जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये आज स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रपट प्रकाशन आणि वितरण क्षेत्रातील दिग्गज कमल गिआनचंदानी यांनी सांगितले की, भारत सरकारच्या नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली,  ज्याचा उद्देश चित्रपटविषयक खजिन्याचे जतन करणे, डिजिटायझेशन करणे आणि पुनर्संचयित करणे हा आहे.. हे आव्हान खूप मोठे आहे, विशेषतः तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे तसेच डिजिटल डेटा जतन करण्याच्या वाढत्या जटिलतेमुळे चित्रपट रील्सवर परिणाम होतो . मात्र तरीही, ही जबाबदारी तातडीने आणि समर्पित भावनेने पार पाडायला हवी “, असे  मगदूम यांनी सांगितले.

शहजाद सिप्पी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या उत्क्रांतीचा मागोवा घेत, मागील दशकातील कथात्मक मांडणीच्या शैलीतले वेगळेपण उपस्थितांसमोर मांडले आणि अभिजात सिनेमांच्या अद्वितीय वारशाची जाणिव उपस्थितांना करून दिली. त्या काळी चित्रपट निर्मिती ही एक वेगळीच कला होती आणि आजचे प्रेक्षकही त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, वेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

०००

भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

मुंबई, दि.4  :- भारत हा मोशन पिक्चर असोसिएशनसोबत भागीदारी वाढवून जागतिक स्तरावर सुरक्षित सर्जनशील उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी केले

मुंबईत सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या अर्थात वेव्हज् 2025 च्या तिसऱ्या दिवशी, मोशन पिक्चर असोसिएशनने (एमपीए) भारताच्या चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव दर्शवणारा एक सर्वसमावेशक अहवाल सादर केला. या अहवालाच्या प्रकाशन समारंभाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि एमपीएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिव्हकिन उपस्थित होते.

डॉ. मुरुगन यांनी एमपीएच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांवर वाढता प्रभाव मान्य केला. “भारतीय कथा भाषा आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन प्रभाव पाडू शकतात हे आरआरआर आणि बाहुबली सारख्या चित्रपटांनी सिद्ध केले आहे,” असे डॉ. मुरुगन म्हणाले. धोरणे, निर्मिती प्रोत्साहन आणि मजबूत बौद्धिक संपदा संरक्षणाद्वारे सर्जक-प्रथम परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेवर जोर दिला. अलीकडील पायरसीविरोधी सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी डिजिटल युगात कलावंतांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावरही भर दिला.

चार्ल्स रिव्हकिन यांनी भारताच्या मनोरंजन उद्योगासाठी “महत्त्वपूर्ण क्षण” असलेल्या या काळात एमपीएच्या भारतासोबतच्या सातत्यपूर्ण भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला. “भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे आणि या प्रवासाला पाठिंबा देणे एमपीएसाठी अभिमानास्पद आहे,” असे रिव्हकिन म्हणाले. भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी उद्योगांनी 26 लाख रोजगारांना आधार दिला आणि वार्षिक आर्थिक उत्पादनात 60 अब्ज डॉलरहून अधिक उत्पन्न मिळवले.

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...