मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 2

वेव्हज्‌ २०२५ – प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ

  • जागतिक माध्यम संवादात सदस्य देशांनी स्वीकारला वेव्हज्‌ जाहीरनामा
  • क्रिएट इन इंडिया चॅलेंज भारतात सृजनशील अर्थव्यवस्थेला चालना देणार
  • वेव्हज्‌मध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञान अहवालांनी वर्तवले सृजनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या गरुडझेपेचे भाकित

मुंबई, दि. ०५ : वेव्हज्‌ अर्थात जागतिक दृक-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद या अतिशय प्रतिष्ठेच्या, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पहिल्या वहिल्या महोत्सवाचा मुंबईत सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेत उत्साहात समारोप झाला. या शिखर परिषदेला प्रदर्शक, उद्योग धुरीण, स्टार्टअप्स, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध कलाकार आणि प्रभावशाली आशय निर्माते असोत, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागामुळे ही परिषद म्हणजे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेसाठी संगमाचे केंद्र ठरली.  प्रदर्शने, पॅनेल चर्चा आणि बीटूबी सहकार्याच्या उत्साही मिलाफासह, या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि भारताची माध्यम आणि मनोरंजनाची उदयोन्मुख जागतिक महासत्ता म्हणून असलेले स्थान अधिक भक्कम झाले.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाने विविध तारेतारका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि कथाकथनाच्या या महोत्सवाचा गुरुवारी  प्रारंभ झाला. वेव्हज्‌ हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधाची ही एक लाट आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले. भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल आशय, गेमिंग, फॅशन, संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जगातील सर्जकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यांच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना केवळ प्लॅटफॉर्ममध्येच नव्हे, तर लोकांमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि भारतीय तरुणांना त्यांच्या एक अब्ज न सांगितलेल्या कथा जगाला सांगण्याचे आवाहन केले. वेव्हज म्हणजे भारताच्या केशरी अर्थव्यवस्थेची पहाट असल्याचे जाहीर करत त्यांनी युवा वर्गाला या सृजनशील लाटेवर स्वार होण्याचे आणि भारताला जागतिक सर्जनशील निर्मिती केंद्र बनवण्याचे आवाहन केले.

उच्च-परिणाम साधणारी ज्ञान सत्रे

पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या उद्देश पुढे नेत, चार दिवसांत वेव्हज 2025 ने विचार, कौशल्य आणि महत्त्वपूर्ण अभिप्राय यांच्या उच्चस्तरीय देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. वेव्हज 2025 चा विचारविनिमय मागोवा संवाद आणि सहकार्यासाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करत होता, ज्यामुळे जगभरातील विचारवंत, उद्योगधुरीन, धोरणकर्ते आणि व्यावसायिक एकत्र आले. पूर्ण सत्रे, विभागीय चर्चासत्रे आणि महत्वपूर्ण शिक्षणसत्रांच्या काळजीपूर्वक तयार केलेल्या मालिकेद्वारे, शिखर परिषदेने माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या नवीनतम नवकल्पना आणि उदयोन्मुख धोरणांचा शोध घेतला. या सत्रांनी विशेषज्ञता क्षेत्रात वैचारिक देवाणघेवाण करण्यास सक्षम केले.

वेव्हज्‌ची प्रारंभिक आवृत्ती उच्च-परिणाम साधणारी ज्ञानवर्धक सत्रे आणि प्रसारण तसेच माहिती आणि मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्र, डिजिटल मीडिया आणि चित्रपट यासारख्या विषयांच्या विस्तृत व्याप्तीचा समावेश असलेल्या चर्चासत्रांच्या माध्यमातून स्मरणात राहील. तीन मुख्य सभागृहांमध्ये (प्रत्येक सभागृहात एक हजारहून अधिक सहभागी सामावले जातील) तसेच 75 ते 150 पर्यंत क्षमता असलेल्या पाच अतिरिक्त सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 140 हून अधिक सत्रांसह, शिखर परिषदेत उपस्थिती मोठ्या संख्येने राहिली – अनेक सत्रांमध्ये पूर्ण उपस्थिती नोंदवली गेली.

पूर्ण सत्रांमध्ये मुकेश अंबानी, टेड सॅरंडोस, किरण मजुमदार-शॉ, नील मोहन, शंतनू नारायण, मार्क रीड, ॲडम मोसेरी आणि नीता अंबानी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची 50 हून अधिक प्रमुख भाषणे होती. विकसित होत असलेल्या मनोरंजन उद्योग, जाहिरातीचे विशाल क्षेत्र आणि डिजिटल परिवर्तनाबाबत त्यांनी महत्वपूर्ण अभिप्राय मांडत यथार्थ चित्र सादर केले. चिरंजीवी, मोहनलाल, हेमा मालिनी, अक्षय कुमार, नागार्जुन, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अल्लू अर्जुन आणि शेखर कपूर यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्यांपैकी बहुतांश जण वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य होते, आभासी निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सिनेमा आणि कंटेंट निर्मितीच्या भविष्यावर विचारपूरक चर्चा केली.

वेव्हज्‌ 2025 मधील 40 महत्वाची शिक्षण सत्रे व्यावहारिक शिक्षण आणि सर्जनशील अन्वेषण देण्यासाठी विशेषत्वाने निर्मित केली होती. आमिर खानचे द आर्ट ऑफ ॲक्टिंग, फरहान अख्तरचे क्राफ्ट ऑफ डायरेक्शन आणि मायकेल लेहमनचे इनसाइट्स इन फिल्ममेकिंग यासारख्या सत्रांद्वारे सहभागींना उद्योग तंत्रांचा थेट अनुभव घेता आला. ॲमेझॉन प्राईमद्वारे पंचायत बनवणे, ए आर लेन्स डिझाइन करणे, ए आय अवतार तयार करणे आणि उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गेम विकसित करणे यासारख्या पडद्यामागील अदाकारी पेश करण्यात आली. या सत्रांमध्ये व्यावसायिक आणि इच्छुक निर्मात्यांना वेगाने विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहण्यासाठी कृतीशील ज्ञान आणि साधनसामग्रीविषयी माहिती प्रदान करण्यात आली.

वेव्हज्‌मध्ये 55 विभागीय चर्चासत्रे देखील होती ज्यांनी प्रसारण, डिजिटल मीडिया, ओटीटी, ए आय, संगीत, बातम्या, लाइव्ह कार्यक्रम, ॲनिमेशन, गेमिंग, आभासी निर्मिती, चित्रकथा आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विशेष संकल्पनेवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले. या परस्परसंवादी सत्रांमध्ये मेटा, गुगल, ॲमेझॉन, एक्स, स्नॅप, स्पॉटीफाय, डी एन ई जी, नेटफ्लिक्सआणि एन व्ही आय डी ए आय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांमधील वरिष्ठ व्यावसायिकांसह फिक्की, सी आय आय आणि आय एम आय सारख्या उद्योग संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले. क्षेत्र-विशिष्ट महत्वपूर्ण अभिप्राय आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेल्या या चर्चेत गंभीर आव्हानांबाबत उपाय शोधण्यात आले आणि वाढ आणि नवोन्मेषासाठी नवीन दिशानिर्देश देण्यात आले.

वेव्हज्‌ बाजारने व्यवसाय करारांमधून 1328 कोटी रुपये कमावले; महाराष्ट्र शासनाने ‘माध्यम आणि मनोरंजन’ क्षेत्रात 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्हजच्या छत्राखाली 1 ते 3 मे दरम्यान आयोजित वेव्हज बाजारचा आरंभीचा हंगाम जबरदस्त यशस्वी झाला कारण त्याने सर्जनशील उद्योगांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्यासाठी एक प्रमुख मंच म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन क्षेत्रात 1328 कोटी रुपयांचे व्यवसाय करार तसेच व्यवहार नोंदवले गेले. एकूण अंदाजित उत्पन्नापैकी 971 कोटी रुपये हे केवळ आंतर व्यावसायिक बैठकांमधून प्राप्त झाले आहेत. खरेदीदार-विक्रेता बाजार हे या बझारचे एक प्रमुख आकर्षण होते, ज्यामध्ये 3,000 हून अधिक बीटूबी बैठका झाल्या. आंतरराष्ट्रीय सहकार्याअंतर्गत एक मोठी कामगिरी म्हणून, न्यूझीलंडमधील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. ओन्ली मच लाउडरचे सीईओ तुषार कुमार आणि रशियन फर्म गॅझप्रॉम मीडियाचे सीईओ अलेक्झांडर झारोव्ह यांनी रशिया आणि भारतात परस्पर-सांस्कृतिक महोत्सवात सहकार्य करण्यासाठी आणि कॉमेडी आणि संगीत विषयक कार्यक्रमांची सह-निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करारावर लवकरच चर्चा करण्याची घोषणा केली. प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहुवार्षिक सहयोगाची घोषणा ही बझार चे आणखी एक आकर्षण होते कारण जागतिक स्तरावर प्रीमियम कोरियन आशय वितरित करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीचे अनावरण करण्यात आले. इतर टप्पे म्हणजे ‘देवी चौधराणी’ चित्रपटाची घोषणा, जो भारताचा पहिला अधिकृत इंडो-यूके सह-निर्मिती असलेला चित्रपट ठरला. आणि ‘व्हायलेटेड’ चित्रपट जो यूके आणि जेव्हीडी फिल्म्सच्या फ्यूजन फ्लिक्सची सह-निर्मिती असेल.

महाराष्ट्र शासनाने वेव्हज्‌मध्ये 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून शिखर परिषदेत व्यावसायिक मूल्य वाढवले आहे. यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी 1,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले, तर राज्याच्या उद्योग विभागाने प्राइम फोकस आणि गोदरेजसोबत अनुक्रमे 3,000 कोटी रुपयांचे आणि 2,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले.

जागतिक माध्यम संवाद 2025 मध्ये सदस्य राष्ट्रांनी वेव्हज जाहीरनामास्वीकारला

मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान (वेव्हज 2025) आयोजित करण्यात आलेला जागतिक माध्यम संवाद 2025 हा एक ऐतिहासिक कार्यक्रम होता ज्यामध्ये 77 राष्ट्रांचा सहभाग होता, जो जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो. वेव्हज 2025 मधील जागतिक माध्यम संवादाने सांस्कृतिक संवेदनशीलतेचा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे ‘वेव्हज घोषणापत्र’ स्वीकारले, त्यामध्ये डिजिटल अंतर कमी करण्याची तातडी आणि जागतिक शांतता व सौहार्दाला प्रोत्साहन देण्यासाठी माध्यमांचा वापर यावर भर देण्यात आला. चर्चेमध्ये विविध संस्कृतींना एकत्र आणण्यात चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाढणाऱ्या सर्जक अर्थव्यवस्थेत वैयक्तिक कथांचे महत्त्व अधोरेखित झाले.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तंत्रज्ञान आणि परंपरेच्या समन्वयावर जोर देत, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाद्वारे तरुणांना सक्षम करण्याची गरज मांडली. माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आशय-सामग्री निर्मितीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला आणि स्थानिक आशय-सामग्री, सह-निर्मिती करार आणि संयुक्त निधी उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या “क्रिएट इन इंडिया” स्पर्धेतून 700 हून अधिक जागतिक सर्जकांना यशस्वीपणे निवडण्यात आले, आणि पुढील आवृत्तीत ही स्पर्धा 25 जागतिक भाषांमध्ये विस्तारित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. या परिषदेने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भविष्यातील जागतिक सहकार्यासाठी मजबूत पायाभरणी केली, तसेच त्यामध्ये सर्जनशील उत्कृष्टता आणि नैतिक सामग्री निर्मितीवर भर देण्यात आला.

वेव्हज: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील आकांक्षी स्टार्ट-अप्ससाठी एक प्रवेगक

वेव्हज्‌ स्टार्ट-अप प्रवेगकांनी 45 प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांपैकी लुमिकाई, जिओ, कॅबिल, वॉर्मअप व्हेंचर्स सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अद्वितीय कल्पना थेट मांडण्यासाठी  30 माध्यम आणि मनोरंजन स्टार्ट-अप्सची निवड केली. 1000 हून अधिक नोंदणींसह, या उपक्रमामुळे सध्या सुरू असलेल्या 50 कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहेत. याशिवाय, 100 हून अधिक स्टार्ट-अप्सनी समर्पित स्टार्ट-अप पॅव्हेलियनमध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली. वेव्हज एक उपक्रम म्हणून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारे एंजल गुंतवणूकदार नेटवर्क तयार करून स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी आणि वाढीसाठी एक स्पष्ट गुंतवणूक परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवते. टियर 1 आणि टियर 2 मधील स्टार्ट-अप्स वेव्हज मध्ये चमकले आणि त्यांच्या संस्थापकांनी केंद्रस्थानी स्थान मिळवले. अशा निर्मात्यांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी वेव्हज्‌ इनक्यूबेटरचे नेटवर्क स्थापित करेल ज्यामध्ये समर्पित मार्गदर्शक आणि बीज भांडवल गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार असतील. वेव्हएक्स (WAVEX) अनोखे आहे कारण ते अशा कल्पनांना सुविधा देते ज्यांचे अद्याप मूर्त उत्पादन नाही, परंतु त्यांच्याकडे ठोस क्षमता आहे.

वेव्हज्‌ 2025 मध्ये प्रकाशित प्रमुख ज्ञान अहवाल

माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मुंबईतील वेव्हज परिषद 2025 मध्ये पाच महत्त्वपूर्ण अहवालांचे अनावरण केले. हे अहवाल भारताच्या समृद्ध माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेचे सर्वसमावेशक विहंगावलोकन करतात, त्यात आशय सामग्री निर्मिती, धोरणात्मक चौकट आणि थेट कार्यक्रम यांसारख्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

माध्यम आणि मनोरंजनावरील सांख्यिकीय पुस्तिका 2024 – 25:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेली ही सांख्यिकीय पुस्तिका भारताच्या माध्यम परिदृश्यातील वाढीचे कल, प्रसारण, डिजिटल माध्यम, चित्रपट प्रमाणन आणि सार्वजनिक माध्यम सेवांबाबत महत्त्वपूर्ण डेटा-आधारित अंतर्दृष्टी प्रदान करते. भविष्यातील धोरणनिर्मिती आणि उद्योग धोरणांसाठी अनुभवजन्य पुराव्यांवर आधारित आवश्यक माहिती उपलब्ध करून देते.

फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स’ – बीसीजी

बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपचा हा अहवाल भारताच्या सर्जक अर्थव्यवस्थेच्या विलक्षण वाढीवर प्रकाश टाकतो, त्यात 20 ते 25 लाख सक्रिय डिजिटल सर्जकांचा सहभाग आहे. या सर्जकांचा वार्षिक 350 अब्ज डॉलरहून अधिक खर्चावर प्रभाव पडतो, आणि 2030 पर्यंत हा आकडा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. हा अहवाल सर्जकांसोबत लघुकालीन व्यवहारांऐवजी दीर्घकालीन, प्रामाणिक भागीदारी निर्माण करण्यावर जोर देतो.

अ स्टुडिओ कॉल्ड इंडिया’ – अर्न्स्ट अँड यंग (Ernst & Young)

अर्न्स्ट अँड यंगचा हा अहवाल भारताला त्याच्या भाषिक विविधता, समृद्ध संस्कृती आणि तंत्रज्ञान कौशल्याच्या जोरावर जागतिक सामग्री केंद्र म्हणून चित्रित करतो. यामध्ये अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवांमध्ये भारताला 40 – 60 टक्के खर्चाचा फायदा आणि भारतीय ओटीटी सामग्रीसाठी वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामुळे भारताची जागतिक सांस्कृतिक राजकीय भूमिका बळकट होत आहे.

कायदे आणि थेट कार्यक्रम क्षेत्रातील घडामोडी:

‘खैतान अँड कंपनी’च्या नव्या कायदेशीर मार्गदर्शक पुस्तिकेत इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि त्यासंदर्भातील नियमावली यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, मिडिया क्षेत्रातील व्यावसायिकांना भारतातील नियामक चौकटीतून वाट काढण्यासाठी मदत मिळणार आहे. याशिवाय, भारतातील थेट कार्यक्रम क्षेत्रावर प्रकाशित करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेनुसार सध्या या क्षेत्राची 15 टक्के दराने वाढ होत असून, त्या पार्श्वभूमीवर, या वाढत्या उद्योगासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवाना प्रक्रियेतील सुलभता अत्यावश्यक आहे असेही  या श्वेतपत्रिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी: राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) – मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अ‍ॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील  प्रतिभेचा जागतिक उत्सव

वेव्हज् 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व  1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला  स्टार बनवले आहे.

32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हज्‌मधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती.  होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी  जगासमोर येण्याची एक संधी  देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. “प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.

8 वे राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलन आणि राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार

वेव्हज्‌चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या आठव्या राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी संमेलनात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी देशभरातील 12 उत्कृष्ट सामुदायिक नभोवाणी केंद्रांना ‘राष्ट्रीय सामुदायिक नभोवाणी पुरस्कार’ देऊन गौरवले. डॉ. मुरुगन यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हे राष्ट्रीय संमेलन भारतातील सामुदायिक माध्यमाच्या क्षेत्राला नवप्रवर्तन, समावेश आणि प्रभावाच्या माध्यमातून अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विचारमंथन आणि  सहकार्याची संधी निर्माण व्हावी या उद्देशाने देशभरातील 400 पेक्षा अधिक सामुदायिक नभोवाणी (सीआर) केंद्रांचे प्रतिनिधी एकाच मंचावर आले होते. सध्या देशात एकूण 531 सामुदायिक नभोवाणी केंद्र कार्यरत आहेत.

भारत मंडप– ‘कला ते कोडप्रवास

वेव्हज्‌ 2025 मध्ये भारताची कथाकथन परंपरा ‘कला ते कोड’ या संकल्पनेतून उलगडणाऱ्या ‘भारत मंडप’ या अनुभवात्मक विभागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मंडपामध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील तोंडी आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवप्रवर्तनापर्यंतच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवले गेले.

‘भारत मंडप’ने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि नव्या तंत्रज्ञान लाटेचा समतोल साधत भारताचा आत्मा उलगडला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंडपाला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री  एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव तसेच अनेक मान्यवरांनीही भेट देऊन या मंडपाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आणि लोक भारताच्या सांस्कृतिक खजिन्यांच्या शोधामुळे आ‍श्‍चर्यचकित  झाले.

भारताच्या सर्जनशील प्रवासाचा गौरव करणारे हा मंडप केवळ एक प्रदर्शन नव्हते, तर भारताला एका सर्जक राष्ट्राच्या रूपात मांडणारे प्रभावी माध्यम होते. या मंडपाने भारताची सांस्कृतिक खोली, कलात्मक उत्कर्ष आणि जागतिक कथाकथनात उद्योन्मुख नेतृत्व दाखवून दिले.

वेव्हज्‌चा समारोप सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प

वेव्हज्‌ 2025 ने सर्जनशीलता, व्यापार आणि सहयोग यांना एकत्र आणणारे जागतिक व्यासपीठ म्हणून एक उच्च दर्जा प्रस्थापित केला. दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय करार, मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवोपक्रम गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्हजने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली. 77 देशांनी वेव्हज जाहीरनाम्याला पाठिंबा दिला. वेव्हज बाजार आणि वेव्हेक्स अॅक्सलरेटरचे यश यामुळे स्पष्ट झाले की, भारत नावीन्य, समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत आहे. या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर, वेव्हजने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नाही, तर एक जागतिक चळवळ सुरू केली आहे — जी जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा, गुंतवणूक आणि संधी देत राहील.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा – प्रभू गौर गोपाल दास

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभू गौर गोपाल दास बोलत होते.

टेक्नोसॅव्ही व्हा

सध्या जग वेगाने डिजिटल दिशेने वाटचाल करत आहे. स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणक, आणि इंटरनेट यांसारखी तंत्रज्ञान आपला रोजचा भाग बनत आहेत. अशा काळात ‘टेक्नोसॅव्ही’ होण ही केवळ गरज नसून ती एक अनिवार्यता बनली आहे. विविध ऑनलाईन कोर्सेस, मोबाइल अ‍ॅप्स आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे तंत्रज्ञान शिकण आता पूर्वीपेक्षा अधिक सोप झाले आहे, असेही प्रभू गौर गोपाल दास यांनी सांगितले.

शिकण थांबवू नका आयुष्यभर विद्यार्थी राहा

प्रभू गौर गोपाल दास म्हणाले, शिकण ही एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. वय कितीही असो, नवीन कौशल्य शिकणे, भाषा आत्मसात करणे किंवा एखादा छंद जोपासणे यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. वृद्धापकाळातही अल्झायमर आणि डिमेन्शियासारखे आजार टाळण्यासाठी मेंदूला वर्कआउट देणे गरजेचे आहे. डिजिटल युगात विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सद्वारे हे अधिक सुलभ झाले आहे.

मानसिक आरोग्य सांभाळा

दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. ध्यान, वाचन, मनमोकळ्या गप्पा किंवा छंद जोपासा. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा दिनक्रम ठेवा. या गोष्टींचा अवलंब केल्यास तणाव आणि मानसिक विकारांवर मात केली जाऊ शकते.

संस्कृती विसरू नका

संस्कृती आणि मूल्य ही आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासात आपण पुढे जात असताना, आपल्या परंपरा, नीतिमूल्य विसरता कामा नये. स्मार्ट, डिजिटल व भविष्यकाळासाठी सज्ज होण महत्त्वाच असलं तरी आपले संस्कार आणि मूल्य यांचा विसर पडू देऊ नका, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनात सतत रेंगाळणारे विचार जर व्यक्त झाले नाही तर ते मानसिक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे  मनातील त्रासदायक विचार एखाद्या व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे किंवा ते लिहून मोकळ होणे. ही पद्धत मनावरचा भार हलका करते आणि मन:स्वास्थ्य टिकवते. आनंदी आणि समाधानी जीवनासाठी इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशीच तुलना करा. सतत आपल्याकडे काय नाही याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे याची जाणीव ठेवल्यास आयुष्य अधिक समृद्ध होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रालयाच्या या मंदिरात तंत्रज्ञान हे दैवत असून डिजिटल टेक्नॉलॉजी ही अभंगासमान आहे, आधुनिक काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कौशल्य ही यशस्वी भविष्यासाठी आवश्यक ठरली आहेत. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार भक्तिभावाने करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  – उपमुख्यमंत्री अजित पवार

Oplus_131072

मुंबई, दि. ०५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने आयोजित केलेला ‘टेक वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण बदलांचा केवळ स्वीकार करत नसून बदलाचे नेतृत्व करत असल्याचा संदेश ‘टेक वारी’ उपक्रमाच्या  माध्यमातून जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे ‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमला, प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ५ ते ९ मे दरम्यान टेक वारी अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ अशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून  सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, टेक-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडविण्यास मदत होईल.

महाराष्ट्र ‘आय गॉट’वरही प्रथम येईल – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून लोकाभिमुख काम करणारे महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. ‘आय गॉट’ वर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आपले राज्य पहिल्या तीनवरून प्रथम क्रमांक प्राप्त करेल. प्रशासनाने अधिक गतीमान सेवा देण्यावर भर द्यावा. आपल्या प्रत्येकाच्या कामाच्या मूल्यमापनातूनच एकंदरीत कामाचे मोजमाप होत असते महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक बदलाला सामोराही जात आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील हे बदल स्वीकारून आपले काम अधिक गतीमान पद्धतीने करतील, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.

इज ऑफ लिव्हिंगमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे राहील : प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार

प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवगत करून अधिकारी व कर्मचारी काम करत आहेतच पण काळानुरूप आपल्या सेवा ‘इज ऑफ लिव्हिंग’ असल्या पाहिजेत. त्या अधिकाधिक लोकामिभुख असाव्यात यासाठी प्रशासनाने काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘टेक-वारी’ उपक्रमात मंत्रालय ते गावपातळीवरील अधिकाऱ्यांचा सहभाग – आयुक्त आर.विमला

महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला म्हणाल्या की, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या प्रयत्नामुळे आणि राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आज केंद्र शासनाच्या ‘ऑय गॉट’ प्रणालीवर सर्वाधिक प्रशिक्षण घेणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिल्या तीन मध्ये आहे. ‘टेक-वारी’ उपक्रम नाविन्यपूर्ण असून त्याचा लाभ नक्कीच सर्व अधिकारी घेतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी ‘टेक वारी’ या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अथक परिश्रम घेवून केले, मात्र त्यांच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंत्रालयात आरोग्य, शिक्षण, कृषी या विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सचे, मन:शक्ती प्रयोगकेंद्रातील उपक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी सूत्रसंचालन केले.

०००

संध्या गरवारे /विसंअ/

 

 

बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

  • परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के
  • मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

मुंबई, दि. ०५ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी निकाल जाहीर केला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल

कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के), कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के), मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के), अमरावती 1,32,814 (91.43 टक्के), पुणे 2,21,631 (91.32 टक्के), नाशिक 1,44,136 (91.31 टक्के), नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची टक्केवारी अधिक

सर्व विभागीय मंडळांतून 6,76,972 मुले तर 6,25,901 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,49,932 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 4,07,438 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5,80,902 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1,64,601 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान शाखेतील 7,15,595 विद्यार्थी (97.35 टक्के), कला शाखेतील 2,81,606 (80.52 टक्के), वाणिज्य शाखेतील 2,77,629 (92.68 टक्के), व्यवसाय अभ्यासक्रम 24,450 (83.26 टक्के) तर आयटीआय मधील 3,593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (82.03 टक्के).

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.38

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,258 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी 92.38 इतकी आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 व जून-जुलै 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस श्रेणीसुधार/ गुणसुधार साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

मुंबई, दि. ४  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी  देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.

राज्य शासन आणि आंतरराष्ट्रीय माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख संस्थांमध्ये झालेल्या भेटीमध्ये राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार आणि कौशल्य विकासासाठी नवे मार्ग खुले होण्यासंदर्भात चर्चा झाली.

आगामी पाच वर्षात मनोरंजन क्षेत्रात भारताला संधी  – नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस

नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस यांनी यावेळी भारताला आगामी पाच वर्षांत मनोरंजन क्षेत्रात मोठी संधी असून भारत एक महत्त्वाचा बाजार होणार  असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी नेटफ्लिक्स आणि राज्य शासन यांच्यातील संभाव्य सहकार्याची चर्चाही यावेळी झाली. ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध कथा जगभर पोहचवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या संधी विषयी यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. सारंडोस यांनी चर्चा केली. श्री सारंडोस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत वेव्हज् (WAVES) शिखर संमेलन आयोजित केल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

वेव्हज् संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे – देवराज सान्याल

दरम्यान, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवराज सान्याल, अभिनेता-दिग्दर्शक व एक्सेल एंटरटेनमेंट चे संस्थापक फरहान अख्तर व  सहसंस्थापक आणि निर्माते रितेश सिधवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. वेव्हज् (WAVES) संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करून

समाधान व्यक्त केले. तसेच हे संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी सांगितले.

राज्यात जागतिक दर्जाचा स्टुडिओ उभारण्यासंदर्भात मोशन पिक्चर बरोबर चर्चा

जागतिक पातळीवरील चित्रपट,  टेलिव्हिजन आणि स्ट्रिमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

श्री. रिवकिन यांनी 1913 मध्ये प्रदर्शित झालेल्या

पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘राजा हरिशचंद्र’ ची आठवण काढत भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव केला.

महाराष्ट्रमध्ये जागतिक दर्जाचे स्टुडिओ उभारण्यासाठी

सहकार्याबद्दल  उभय मान्यवरांमध्ये चर्चा झाली. तसेच

निर्मात्यांसाठी प्रोत्साहन योजना व बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

वेव्हज (WAVES) संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक मीडिया नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतलेल्या भेटीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप व कुटूंबातील अन्य सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अरुणकाका जगताप यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांची घट्ट नाळ जुळलेले कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. त्यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चोखपणे काम करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. जगताप कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करत त्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

 

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. डॉक्टरांची टीम पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत, यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

राजूरमध्ये कावीळग्रस्त रुग्णांची संख्या २६३ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शाळेत उभारण्यात आलेल्या विशेष उपचार कक्षाला भेट देत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थ, रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. रुग्णांमध्ये मुले आणि मुलींची संख्या अधिक असल्याने त्यांच्या आहाराचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यास सांगितले आहे. तसेच पालकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी समुपदेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रकल्प कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा दूषित झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले.

तलाठी आणि ग्रामसेवक मुख्यालयावर अनुपस्थित राहत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. यावरही पालकमंत्र्यांनी प्रशासनातील सर्व विभागांनी साथरोग आटोपेपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश दिले.

कोविड संकटकाळातील अनुभव लक्षात घेऊन गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांना सक्रीय करावे, तसेच राजूरसह शेजारील गावांचेही सर्वेक्षण करावे, असे निर्देशही देण्यात आले. पाण्यात टाकण्यासाठी लागणारे जंतुनाशक औषध आणि रक्त तपासणीसाठी लागणारी यंत्रणा जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.

रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विशेष पथक कार्यरत असून, राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.

दुषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी तातडीने करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे.

“हे संकट रोखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे,” असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

०००

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे. हे नवीन ‘ECINET’ नावाचे एकाच ठिकाणी सेवा देणारे व्यासपीठ आयोगाच्या ४० हून अधिक विद्यमान मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्सचे एकत्रीकरण व पुनर्रचना करणारे ॲप असेल असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

ECINET मध्ये आकर्षक युजर इंटरफेस (UI) आणि सोपी युजर एक्सपीरियन्स (UX) असेल, जे सर्व निवडणूक संबंधित सेवांसाठी एकच व्यासपीठ पुरवेल. अनेक अ‍ॅप डाऊनलोड करणे, वेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवणे यांचा त्रास यामुळे कमी होईल.

हा उपक्रम मार्च २०२५ मध्ये झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकार झाला. यावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित होते.

ECINET वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवरून संबंधित निवडणूक माहिती पाहण्याची सुविधा देईल. ही माहिती अधिक अचूक राहण्यासाठी केवळ अधिकृत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांद्वारेच ती प्रविष्ट केली जाईल. अधिकाऱ्यांकडून माहिती प्रविष्ट केल्यामुळे ती विश्वसनीय राहील. मात्र, कोणताही वाद निर्माण झाल्यास, अधिकृत फॉर्ममध्ये भरलेली प्राथमिक माहिती ग्राह्य धरली जाईल.

ECINET मध्ये मतदार सहाय्य अ‍ॅप, मतदान टक्केवारी अ‍ॅप, CVIGIL, सुविधा २.०, ESMS, सक्षम आणि KYC अ‍ॅप यांचा समावेश असेल, जे मिळून आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. ECINET मुळे जवळपास १०० कोटी मतदार व निवडणूक यंत्रणेतील सुमारे १०.५ लाख बूथ स्तर अधिकारी (BLOs), सुमारे १५ लाख राजकीय पक्षांचे बूथ स्तर प्रतिनिधी (BLAs), ४५ लाख मतदान कर्मचारी, १५,५९७ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), ४,१२३ मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) यांना फायदा होणार आहे.

ECINET ची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे आणि सुलभ वापर, सुरळीत कार्यक्षमता व मजबूत सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर चाचण्या घेतल्या जात आहेत. हे व्यासपीठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ३६ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून, त्यांच्यातील ७६७ जिल्हा निवडणूक अधिकारी व ४,१२३ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर आणि निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी प्रसिद्ध ७६ प्रकाशनांतील ९,००० पानांची तपासणी करून विकसित करण्यात येत आहे.

ECINET द्वारे पुरवण्यात येणारा डेटा लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० व १९५१, मतदार नोंदणी अधिनियम १९६०, निवडणूक संचालन नियम १९६१ व भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या कायदेशीर चौकटीतच राहील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

०००

 

 

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारा महाबळेश्वर येथे आयोजित ‘महापर्यटन उत्सव-२०२५’चा शानदार समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

पर्यटन महोत्सवला उत्तम प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचे सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव येण्यासाठी महत्वाचे आहे. शौर्य आणि निसर्ग सौंदर्याचा सुंदर मिलाफ महाबळेश्वर येथे पाहायला मिळतो. निसर्गाने सुंदर पश्चिम घाट आपल्याला दिला आहे, ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा दिला आहे, अनेक सुंदर, पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्याकडे आहेत, हे सौंदर्य देश-परदेशात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि हा महोत्सव त्यादृष्टीने महत्वाचा आहे.

महाबळेश्वर देशातील उत्तम पर्यटनस्थळ

महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे नवे गिरीस्थान म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या क्षेत्रातील स्कुबा डायव्हिंगसारख्या नव्या कल्पना पुढे आणून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना बॅकवॉटर संबंधी असणारी बंधने दूर केल्याने तेथे चांगली पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनामुळे रोजगार निर्मितीला चालना

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आल्यावर रोजगार निर्माण होतात, मात्र पर्यटन क्षेत्रात कमी गुंतवणूकीत अधिक रोजगार निर्माण होतात. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता या व्यवसायात आहे. पर्यटन क्षेत्रात पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. राज्याला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे कार्य पुढील ५ वर्षात करण्यात येईल.

मुंबई येथे आयोजित वेव्हज् परिषदेमुळे क्रिएटर्स इकॉनॉमिमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करताना आपल्या सांस्कृतिक विविधता कंटेन्ट क्रिएटर्सच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत. पर्यटकाला स्थानिक वैशिष्ठ्याचा परिचय करून दिल्यास पर्यटक त्या त्या भागाकडे वळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर निसर्गाने समृद्ध असून पर्यटनाची अमर्याद क्षमता इथे आहे. मुनावळे येथे जलपर्यटनालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पर्यटकांना इथल्या निसर्गासोबत इथल्या कला, संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. इथल्या भूमीपुत्राला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या कुटुंबासोबत भूमातेची सेवा करण्याची संधी मिळेल. तीन दिवसात महोत्सवला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून इथल्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने लोकाभिमुख योजनांना चालना देण्यासोबत गड-किल्ले संवर्धनाला चालना देण्याचे कार्य केले. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी देखील प्रयत्न होत आहेत. भिलार येथे पुस्तकांचे गाव, मांघर येथे मधाचे गाव आहे.  इथे सर्वोत्तम स्ट्रॉबेरी उत्पादन होते, वेण्णा लेकचे सौंदर्य आहे, लोकसंस्कृतीचे विविध रंग आहेत. हे सर्व एकाच ठिकाणी आणण्याचे काम महापर्यटन उत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. अत्यंत नेटके नियोजन आणि सुरक्षित पर्यटन यामुळे हा महापर्यटन उत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. महाबळेश्वरला नवे आणि सुंदर पर्यटनस्थळ म्हणून विकसित कारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. महापर्यटन उत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने महोत्सवाचा विस्तार करून पुढल्यावर्षी अधिक पर्यटक येतील याचा प्रयत्न व्हावा. पर्यटन क्षेत्रातील अभिनव कल्पना या महोत्सवात पाहायला मिळाल्या. परदेशातील पर्यटनाच्या उत्तम संकल्पनादेखील पर्यटन विभागाने स्वीकाराव्यात अशी सूचना त्यांनी केली.

प्रास्ताविकात पर्यटनमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महापर्यटन उत्सवाचा हा पहिलाच प्रयत्न होता. महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता राज्यातील प्रत्येक विभागात दरवर्षी पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. या माध्यमातून त्या विभागातील पर्यटनस्थळे, वैशिष्ट्ये याचे ब्रँडिंग करण्यात येईल. पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मुनावळे येथील पर्यटन सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यात यश येईल. कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये पर्यटन विकासाचा आराखडा तयार करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तीन दिवसाच्या महापर्यटन महोत्सवात ७५ हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. शिवकालीन शस्त्र, छायाचित्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, महाराष्ट्राचा बाज असलेले कार्निव्हल परेड, लेझर आणि ड्रोन शो, हेलिकॉप्टर राईड, किल्ले आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन, खाद्य जत्रा, लेझर आणि ड्रोन शो, लोककला अशा विविध उपक्रमांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही मंत्री  देसाई म्हणाले.

मुनावळे येथे शिवसागर जलाशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुनावळे येथे शिवसागर जलाशयातील १० जेट स्कीचे लोकार्पण करण्यात आले. पर्यटन महोत्सवला सहकार्य करणाऱ्या क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्ष मनीषा गोखले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जपानचे कौन्सीलेट जनरल यमाशीता सान,  व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी,  संचालक डॉ.बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पर्यटन महोत्सवाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मृणाल कुलकर्णी, नवेली देशमुख, समन्वय समिती सदस्य आदी उपस्थित होते.

०००

 

भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, दि. ०४: केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबतच त्यांना न्याय मिळवून देण्याकरीता राज्यशासन समर्पित भावनेने काम करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्य शासनाच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, हवेलीचे तहसीलदार किरण सूर्यवंशी, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यशासनाच्या वतीने भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या कल्याणासाठी लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यांच्याकरीता विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ देऊन नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याकरीता प्रशासनाने काम करावे. आजही या जाती-जमातीतील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे, त्यामुळे येत्या दोन वर्षात भटक्या जाती व विमुक्त जमातीतील एकही नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहाच्याबाहेर राहणार नाही, त्यांच्या न्याय व हक्काचे उल्लंघन तसेच त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यादृष्टीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रशासनाने काम करावे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलासाठी गायरान जमिनी उपलब्ध करुन दिल्या आहेत, हे काम राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक प्रारूप म्हणून पुढे आणावे, याप्रमाणे राज्यातील इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याकरिता लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज केल्यापासून ४८ तासात दाखले उपलब्ध करुन द्यावेत. ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार शिबिराचे आयोजन करुन लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करावे. याबाबत केलेली कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. याकामी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’ तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे, याकरिता सर्वांनी मिळून काम करायचे आहे. नागरिकांच्या कल्याणकरीता प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या राज्यशासन पाठीशी भक्कमपणे उभे राहील.  केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सामाजिक व आर्थिक समतोल साधण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, मुख्यमंत्री यांनी १०० दिवस कार्यालयातील सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत महसूल विभागाने भटके विमुक्त विकास परिषदेच्यामदतीने जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जातीच्या ३ हजार ९६२ नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यात सुमारे १८ हजार कातकरी समाजाचे नागरिक राहत असून त्यापैकी १५ हजार नागरिकांना जातीचे दाखले, १६ हजार आधार कार्ड व आयुष्यमान कार्ड, ७०० कुटबांना पीएम सन्मान निधीचा लाभ, तसेच त्यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या शासकीय गायरान जमिनीतून ७५० कुटुंबाना जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्याआधारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याकरीता जातीचे दाखले, आधारकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळातही भटके विमुक्त विकास परिषदेने असेच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.

काळे म्हणाले, भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या मुलांना शाळेच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी ‘पालावरची शाळा’ उपक्रम सुरु करून शिक्षणाची व्यवस्था केली आहे.  शासकीय योजनेचे लाभ मिळण्याकरिता लागणारे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे, याकरिता शासनाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात सर्वंकष मोहीम राबवावी, अशी सूचना काळे यांनी केली.

यावेळी डॉ. पुरी यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात जिल्ह्यातील भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या १ हजार ७० नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक कांचन जगताप यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

०००

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...