सोमवार, ऑगस्ट 4, 2025
Home Blog Page 299

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम; चौकशी करून कारवाई होणार – मंत्री उदय सामंत

विधानसभा लक्षवेधी सूचना

 

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;

चौकशी करून कारवाई होणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २५ : मुंबई शहर व उपनगरात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, कोळीवाडा, वाशी नाका चेंबूर आणि धारावीच्या साईबाबानगर परिसरात अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकामाबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची म्हाडाच्यावतीने कारवाई लवकरात लवकर होईल. विशेषतः राखीव भूखंड, सार्वजनिक जागा आणि खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करून बांधकामे उभारल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात येणार असून, अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी कडक पावले उचलली जातील.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठी

वाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार– पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २५ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदुर बाजार, भातकुली, अमरावती तालुक्यामधील १०५ गावांच्या वाढीव पाणीपुरवठा  योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन  दरडोई ५५ लिटर्स पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य राजेश वानखेडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सदस्य नारायण कुचे यांनी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री पाटील म्हणाले, या वाढीव पाणीपुरवठा योजनेस २०२१ मध्ये तांत्रिक मंजुरी तर २०२२ मध्ये  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कामे संथ गतीने झाल्याने कंत्राटदारास दंड आकारण्यात आला आहे. या योजनेतून सध्या ८१ गावांना दरडोई ४० लिटर्स पाणीपुरवठा होत आहे.योजनेच्या उर्वरित कामांना गती देऊन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे

वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २५ : बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत १७७ योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील ४५ आणि माजलगाव तालुक्यातील २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रियेनंतर मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामे मंजूर करण्यात आली. कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे  मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी शासनामार्फत बीड जिल्हा परिषदेकरीता टाटा कन्स्लटन्सी सर्विसेस व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांकडील कामांकरिता नॅबकॉन्स या त्रयस्थ संस्थेचीतांत्रिक तपासणी करण्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या त्रयस्थ कंपनीद्वारे या योजनेच्या विहित टप्प्यांवरील कामांची तपासणी करण्यात येते व तपासणी अहवालामध्ये काही दोष, त्रुटी आढळून आल्यास त्यांची पुर्तता संबंधित कंत्राटदारामार्फत त्याच खर्चातून करण्यात येते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

बीड जिल्हा रुग्णालयातील कोविडकाळातील भ्रष्टाचार प्रकरणी

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार

– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २५ : बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

याबाबत सदस्य नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही.या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

चंद्रपूर जिल्हा बँकेतील सायबर चोरी प्रकरणी

मुख्यमंत्र्यांची परवानगीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी– राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. २५ : चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम एका अज्ञात व्यक्तीने हरियाणाच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, बँकेत झालेली नोकरभरती व इतर गैरव्यवहारांचीही चौकशी होणार आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि तपास जलद गतीने करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प नवी मुंबई, महापे येथे सुरू करण्यात आला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे सायबर पोलीस स्टेशनसह सहा विभाग कार्यरत असतील. प्रकल्प Go Live च्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच संपूर्णतः कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील सायबर सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेंतर्गत जास्तीत जास्त सुविधा निर्मिती करावी- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २५ :- राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर मुख्य सचिव अनिल डीग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, उदय जोशी व नवनाथ फरताडे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले की, वाढीव निधीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक क्रीडा सुविधा विकसित करण्यात येणार असून या सुविधांसाठी क्रीडामंत्र्यांमार्फत निधीचे वाटप केले जाईल. तसेच, राज्यातील विविध विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक आर्थिक अनुदान मागणीच्या १९ प्रस्तावांना राज्य क्रीडा विकास समितीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  त्याचसोबत अतिरिक्त अनुदान मागणीचे प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

बैठकीत यावेळी क्रीडा संकुलाची विकास कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळमार्फत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा संकुलांसाठी केंद्रीकृत निधी वितरण प्रक्रिया व सनियंत्रणासाठी कार्यपद्धती बाबत चर्चा करण्यात आली.

०००००

मोहिनी राणे/स.सं

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४:- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

राज्याचे शालेय शिक्षण धोरण राबविताना मराठी भाषेचा सन्मान आणि स्थान अधिक उंचावण्यावर कटाक्षाने भर देण्यात येईल अशी ग्वाहीही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देतांना शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत सदस्य रोहित पाटील, सदस्य प्रवीण स्वामी, सदस्य सिद्धार्थ खरात आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, की राज्यातील विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून त्याचे व समाजाचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी शिक्षण विभागाने या क्षेत्रात अनेक सुधारणा सुरू केल्या आहेत. शिक्षण हक्क (RTE) कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक मुलाला चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग कटीबद्ध असून यासाठी शाळेत पायाभूत व दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.

पायाभूत भौतिक सुविधांसाठी रोडमॅप तयार

शाळेमध्ये पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असून स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, वर्गखोल्या, ग्रंथालये, वाचनालये आणि खेळाची मैदाने उपलब्ध करण्यासाठी रोडमॅप तयार केला जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, TET परीक्षेच्या आधारे गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती केली जात असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन भरती प्रक्रियेवर भर दिला जात आहे. इयत्ता ११ वीचे प्रवेश व २५ टक्के RTE प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जात आहेत.

अशैक्षणिक जबाबदाऱ्या कमी करणार

शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचे काम करता यावे यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक जबाबदाऱ्या कमी करण्यात येणार आहेत. यंदा राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले आहे.

विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करणार

आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करून आरोग्य तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

कला, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन

स्पेशल गुरुकुल योजनेअंतर्गत राज्यात ८ विशेष शाळा सुरू करण्यात येणार असून या शाळांमधून खेळाडू, विज्ञान, कला इत्यादी विषयांमध्ये विद्यार्थी घडवले जातील.

‘गुढीपाडवा पटसंख्या वाढवा’

राज्यातील शिक्षण संस्था व शिक्षक शिक्षण क्षेत्रात सेवाभावी व समर्पित वृत्तीने काम करत असून शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी राज्यशासन खंबीरपणे उभे राहील. यावर्षी काही शिक्षकांनी ‘गुढीपाडवा पटसंख्या वाढवा’ हा उपक्रम स्वतःहून सुरू केला असल्याचेही शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

मारवाडी समाजाचे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : राजस्थान राज्यातील मारवाडी समाज महाराष्ट्रात अतिशय मेहनतीने उभा राहिलेला आहे. हा समाज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोठे योगदान देत आहे. जन्मभूमी सोडून त्यांनी कर्मभूमीत केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बिर्ला मातोश्री सभागृह येथे राजस्थान ग्लोबल फोरमच्यावतीने सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार राज पुरोहित, संजय उपाध्यय, विजय दर्डा, अभिनेते आणि कवी शैलेश लोढा, राजस्थान ग्लोबल फोरमचे राकेश मेहता, मोतीलाल ओसवाल, दिलीप महेश्वरी आदि मान्यवर उपस्थित होते.

राजस्थान ग्लोबल फोरम हे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उत्तम कार्य करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या राजस्थानी समुदायाचा विकासात मोठा वाटा आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर हे राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी असणारे तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा संपर्क असणारे संवेदनशील व्यक्तीमत्त्व आहे. त्याच्यातील अद्वितीय आत्मविश्वास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर नागरी सत्कारास उतर देताना म्हणाले, तुम्हा सर्वांच्या मेहनतीमुळे जे काही साध्य झाले, ते मिळाले आहे. हाच खरा सन्मान आहे. माझ्या सार्वजनिक जीवनात जो माझा एकदा मित्र झाला, तो कायमचा मित्र राहिला आहे. कधीच कोणाशी संबंध तुटले नाहीत. सर्वांची मदत करता आली हाच माझ्यासाठी सर्वोत्तम सन्मान आहे. मला भाईसाहेब या नावाने ओळखले जाते याच्यासारखा आनंद कोठेही नाही, असे सांगून श्री.माथूर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

विधानपरिषद लक्षवेधी

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २४ : मुंबईतील अनेक रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन त्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

जे विकासक अनेक वर्ष करार करूनही बांधकाम करत नाहीत, त्यांच्या ताब्यातील प्रकल्प सरकार ताब्यात घेणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अशा प्रकल्पांमुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जात असून, त्यांचे पुनर्वसन हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. गिरगाव, ताडदेव आणि इतर ठिकाणी वर्षानुवर्षे रहिवासी असलेल्या संरक्षीत भाडेकरूंचा हक्क अबाधित राहील. कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास महत्वाचा असून त्यामुळे रहिवाशांना पर्यायी निवास उपलब्ध होईल. मालकी हक्क प्रदान करून रहिवाशांना कायदेशीर संरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. पुनर्विकास योजनेत सुधारणा करण्यासाठी नवीन धोरण तयार केले जाईल. मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणे हे सरकारचे  उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

डॅनेज पॅलेट पुरवठा निविदा प्रक्रियेतील अनियमिततेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. २५ : डॅनेज पॅलेट पुरवठा निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितते प्रकरणी दोषी अधिकारी किंवा कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याबाबत सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य कृपाल तुमाने यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेसदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. 

निविदा प्रक्रिया राबवताना बदलण्यात आलेल्या निकषांची तपासणी केली जाईल असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कीया प्रकरणी पूर्ण पारदर्शकता पाळली जाईल. सध्या डॅनेज पॅलेट पुरवठ्यास स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणी कोणासही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत तातडीने बैठक घेण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

कोंढवा-येवलेवाडी-पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कठोर कारवाई  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : पुणे शहरातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते.

येवलेवाडी भागात अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, याप्रकरणी काही विकासकांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महानगरपालिका, पीएमआरडीए आणि महसूल विभाग एकत्र येऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतील. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांशी समन्वय साधून पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कंत्राटदाराने भ्रष्ट मार्गाने अनधिकृत प्लॉटिंग करून लोकांची फसवणूक केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात स्पष्ट केले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

देवस्थान इनाम जमिनी प्रश्नावर लवकरच निर्णय  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ – महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनी प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. या जमिनींपैकी काही सॉइल ग्रँट स्वरूपाच्या असून त्या देवस्थानांच्या मालकीच्या आहेत, तर काही रेव्हेन्यू ग्रँट स्वरूपात असून त्या जमिनीचा शेतसारा वसूल करण्याचे अधिकार देवस्थानांना दिलेले आहेत.

राज्य सरकारने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती, आणि त्या समितीचा अहवाल नुकताच सरकारकडे आला आहे. या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि देवस्थानांची पूजा-अर्चा सुरळीत सुरू राहील, अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सदाभाऊ खोत यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार विधिमंडळात कायदा मंजूर केला जाईल. सध्या राज्यात जवळपास सव्वा लाख शेतकरी कुटुंबे या इनाम जमिनींवर अवलंबून आहेत. मुख्यमंत्री आणि संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा करून योग्य तो न्याय्य निर्णय घेतला जाईल. शेतकरी आणि देवस्थान व्यवस्थापन यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

0000

संजय ओरके/विसंअ/

तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : पुण्यातील 101, 102 सर्वे नंबरवरील संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या व्यवहारांमध्ये तुकडेबंदी कायद्याविरोधात व्यवहार झाले आहेत. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते.

पुण्यातील परिसरात 1912 पासून जमीन व्यवहार सुरू असून, 2023 पर्यंत या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले असल्याचे सांगून महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, सर्वे नंबर 101 येथे 35 खरेदीखतांची नोंद झाली आहे. सर्वे नंबर 102 येथे 55 व्यवहार झाले आहेत. एकूण 66 एकर जमीन व्यवहाराच्या कक्षेत आहे. 50 टक्के जमीन खरेदी करणाऱ्या एका गटाने 100टक्के नोंदी आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. शासनाने या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, महसूल नोंदी आणि अन्य दस्तऐवज तपासण्याचे काम सुरू आहे. यातील काही व्यवहार दिवाणी न्यायालयात आणि हायकोर्टात प्रलंबित आहेत. काही जमिनींवर अनधिकृत प्लॉटिंगदेखील झाल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या व्यवहारांचे संपूर्ण दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे हित आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन होईल याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २४ : ग्रंथालयांचा निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला  उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

निधी वाढ करण्यासाठी आवश्यकती माहिती वित्त विभागाकडे सादर केली असल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, सध्याचा निधी 60% वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक ग्रंथालयाला त्यांचा प्रगती अहवाल पाठवण्यासाठी नवीन कार्य पद्धतीचा अपलंबन करण्यात येत आहे. निधीचा योग्य विनियोग आणि ग्रंथालयांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे.ग्रंथालयांचे भवितव्य आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी रोडमॅप –  शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : राज्यातील ग्रामीण आणि शहरी शाळांमध्ये भौतिक सुधारणा आणि शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य हेमंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.

या रोडमॅपमध्ये भौतिक सुविधा उभारण्यात येणार असल्याचे सांगून शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, त्यामध्ये प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय करणे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार करणे. विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग आणि ई-लायब्ररीसारख्या सुविधा उपलब्ध करणे. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली आणण्यासाठी नवीन धोरण तयार करणे. प्रत्येक शिक्षकाला आधुनिक प्रशिक्षण देण्यावर भर. राज्यभर पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करणे. शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज सुलभ करणे. शाळांच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे. शिक्षक, शिक्षण संस्था आणि शासन एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण देण्याचा संकल्प शासनाने केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

खागी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी नवा कायदा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २४ : राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.

केंद्र सरकारने खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी  नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन नवीन अधिनियम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर खासगी शिकवणी वर्गांवर अवलंबून राहावे लागते. या दुहेरी शुल्कामुळे पालकांवर आर्थिक ताण येतो, त्यामुळे शासनाने या विषयावर नियमन करण्याचे ठरवल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

जुनी पेन्शन योजनासंदर्भात पर्यायी व्यवस्थेचा विचार शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि.२४ : मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे . तथापि, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्यात आलेला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मंत्री श्री.भुसे यांनी उत्तर दिले.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले की, केंद्र शासन आणि राज्य शासनाने डीसीपीएस (Defined Contribution Pension Scheme) व एनपीएस (National Pension System) यांसारखे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यासंदर्भात शिक्षकांना आपल्या खात्यांची नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्यांनी अद्याप खाते उघडले नसेल, त्यांनी लवकरात लवकर खाते उघडावे, अशा सूचना श्री.भुसे यांनी यावेळी केल्या.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, जुनी निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात अनेक तज्ञांनी उच्च न्यायालयासमोर आपले मुद्दे मांडले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 30 एप्रिल 2019 आणि 26 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित निर्णय दिले होते. त्यानुसार 10 मे 2019 रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले की, हा विषय विधी व न्याय तसेच वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, दोन्ही विभागांनी यावर भूमिका घेतली आहे की, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना राज्य शासनाने कोणताही स्वतंत्र निर्णय घेऊ नये.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

अवैध शिकारींच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २४ : वन्य जीवांच्या शिकारीमध्ये सहभागी असलेले काही लोक आता शहरीभागात स्थलांतरित झाले असून त्यांचा संबंध वन्यजीव तस्करीशी असण्याची शक्यता आहे. अशा लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य मिलींद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना वनमंत्री नाईक बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य अनिल परब, श्रीकांत भारतीय यांनी सहभाग घेतला.

शिकाऱ्यांचा व्यापार भारतापुरता मर्यादित नसून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याची माहिती देऊन वनमंत्री नाईक म्हणाले की, वन विभाग आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून, अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत आहे. वाघांचे संरक्षण करण्यासाठी सतत गस्त घालण्यात येत असून, स्थानिक प्रशासनाला देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील पिसी वाघिणीच्या आणि पांढरकवडा वनक्षेत्रातील टी नाईन या दोन वाघिणींच्या गळ्यात शिकारीच्या फासाची तार अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची या फासातून सुटका करण्यात येऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

वाघांना अनेक प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. आपसातील झुंज, रस्ते, रेल्वे अपघात तसेच विद्युत कुंपण यामुळे वाघांचा मृत्यू होतो. या घटनांवर नियंत्रणासाठी कोअर एरियातील वाघ वस्तीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घेणे, वाघांच्या अधिवासात सुधारणा करून त्यांचे नैसर्गिक जीवनमान राखणे, स्थानिक प्रशासन, पोलिस आणि वन विभाग यांच्यात समन्वय साधून शिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे, संशयित शिकाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवणे आणि गुप्तचर यंत्रणांचा अधिक चांगला वापर करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

अधिकाऱ्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कंत्राटी सेवा मुदतवाढ नाही – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. २४ : म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने नेमणूक केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना तीन वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ दिली जात नाही, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य प्रसाद लाड, अनिल परब यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कमाल तीन वर्षांसाठी कंत्राटी आधारावर नियुक्त केले जात असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले की, तीन वर्षांनंतर फक्त राज्य सरकारच्या विशेष मान्यतेने सेवा मुदतवाढ दिली जाते. ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आणि सरकारकडून विशेष मंजुरी मिळाली नाही, त्यांची सेवा तात्काळ समाप्त केली. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कंत्राटी नेमणुकीसाठी स्पष्ट नियमावली पाळली जाईल असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

बीडीडी चाळीबाहेरील बांधकामासंदर्भात फेरसर्वेक्षण करून पात्रता निश्चित करणार  मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २४ : मुंबईतील ना. म.जोशी मार्ग बी.डी.डी. चाळ परिसरातील सामाजिक संस्था, क्रीडा मंडळ, व्यायाम शाळा यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात नव्याने सर्वेक्षण करण्यासंदर्भात अर्ज आल्यास फेरसर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी बी.डी.डी. चाळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, ना.म.जोशी मार्ग बी.डी.डी. चाळ परिसरातील झोपड्या, दुकाने व इतर बांधकामे याची पात्रता निश्चित करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. लाभार्थ्यांची योग्य ती आवश्यक कागदपत्रे तपासून पात्रता निश्चित करण्यात आली आहे. कागदपत्रे योग्य असूनही ती ग्राह्य धरण्यात आली नसल्यास अशा बाबी पारदर्शकतेने पाहून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

लॉयड मेटल्सच्या खनन क्षमता वाढीला केंद्राची मंजुरी  खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 24 : : केंद्र सरकारने सुरजागड येथील में.लॉयड मेटल्स कंपनीच्या खाण प्रकल्पासाठी वार्षिक खनन क्षमतेची मर्यादा ३ दशलक्ष टनांवरून १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि सदस्य भावना गवळी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती

लॉयड मेटल्स कंपनीने केंद्र सरकारकडे क्षमतेच्या वाढीसाठी विनंती केली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यावरण व वन मंत्रालयाने यास मान्यता दिली, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही “कन्सेंट टू ऑपरेट” प्रमाणपत्र दिले आहे.

खनिकर्म मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले की, कंपनीने जिल्ह्यात आणि राज्यात एकूण ४,६३२ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये महिलांसाठी विशेषतः गार्बेज युनिट स्थापन करण्यात आले असून, त्यात ६०० महिलांचा समावेश आहे. तसेच, कौशल्य विकास केंद्रामार्फत २,३०७ स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, कंपनीने गावात ग्रंथालये, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, तसेच सीबीएसई पॅटर्नची शाळा (नर्सरी ते पाचवीपर्यंत) स्थापन केली आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रकल्पही राबवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ते बाधित होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केली असून, खनिज उत्पन्नातील निधी १० किमीच्या परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक सोयीसाठी वापरण्यात येणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.देसाई म्हणले की, राज्य सरकार मायनिंग हब विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्राकडील प्रलंबित प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाची विस्तृत आढावा बैठक घेतली आहे. पर्यावरण परवानग्या आणि खाण प्रकल्पांसंबंधी तातडीने निर्णय होण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल,” असेही खनिकर्म मंत्री श्री.देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरावेळी दिली.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या थकबाकी  देण्यासंदर्भात शासन सकारात्मक

मुंबई, दि. २४ : आदिवासी विकास विभागाअंतर्गत एकूण ५५६ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने, १ नोव्हेंबर २००५ च्यानंतर लागलेले जे शिक्षक आहेत त्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने, ६ डिसेंबर २००५ व २५ सप्टेंबर २००६ ला मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत निर्णय घेऊन एकूण १२२२ शिक्षकांना नियमित करण्यात आले आहे. या शिक्षकांना मानधन / वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत शासन सकारात्मक असून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

आदिवासी विकास मंत्री श्री. उईके यांनी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सांगलीतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप

मुंबई, दि. २४ – पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेत आतापर्यंत ५३४४ लाभार्थ्यांना १२.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. केंद्र सरकार ६० टक्के तर राज्य सरकार ४० टक्के निधी उपलब्ध करून देते, असे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अरुण लाड यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सदाभाऊ खोत यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्री.जयस्वाल म्हणाले, गेल्या आठवड्यात निधी प्राप्त झाल्याने २१ तारखेला अनुदान वितरित करण्यात आले. सध्या केवळ १३५६ लाभार्थ्यांचे अनुदान शिल्लक असून उर्वरित निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्यावर लवकरच संपूर्ण वाटप पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

योजनेच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी शासन विशेष मोहीम हाती घेणार असून, भविष्यात अधिक प्रभावी योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

संजय ओरके/विसंअ/

 

धुळे शहर व ग्रामीण भागातील विजेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Oplus_131072

मुंबई, दि. २४ : धुळे शहर व ग्रामीण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजेच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी निरंतर वीज योजनेतून जास्तीत जास्त रोहित्र उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा  राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे बैठकीत धुळे शहर व धुळे ग्रामीणचा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका येथील ऊर्जा विषयक प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार मोनिका राजळे, संचालक अरविंद बाधिकर, संचलन व सुव्यवस्था महापारेषण संचालक सतिश चव्हाण, प्रकल्प महावितरण संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता महापारेषण संजीव घोळे, अधीक्षक अभियंता प्रकाश लिमकर, भुसावळ मंडळ महापारेषणचे अधीक्षक अभियंता  मनीष खत्री, अधीक्षक अभियंता उदय येवले, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुधारण्याच्या उपाययोजनांवर तातडीने काम करावे. महापारेषणने धुळे ग्रामीण येथील बोरिस व शिरूर येथे 132 के.व्ही. चे दोन उपकेंद्र तात्काळ प्रस्तावित करावीत. तसेच धुळे शहरातील एमआयडीसी जवळील अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन एमआयडीसीचे वाढीव क्षेत्र निर्माण होत असून उद्योगांची उभारणी होत आहे या दृष्टीने एमआयडीसी लगत 132 के.व्हीचे उपकेंद्राचा प्रस्तावही तात्काळ मार्गी लावावा, अशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.

धुळे शहरात काही ठिकाणी विजेच्या तारा उंच इमारतीला चिकटलेल्या असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ए.बी. केबलसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच धुळे शहर व ग्रामीण भागातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी विद्युत देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले.कुसुम योजनेची प्रलंबित कामे व मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

0000

मोहिनी राणे/ससं/

क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

मुंबई, दि. २४ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करावा, या शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला. हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान या महान विभूतींना तो सन्मान मिळायला हवा.”

या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या माध्यमातून या विभूतींचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

मध्यरात्री राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे  धडक दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली.  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे रात्री 12.30 ला रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णालयातील वॉर्डमध्ये राऊंड घेऊन सखोल आढावा घेतला. अधिकाऱ्यांची  चौकशी करून आतापर्यंत झालेल्या एकूण शस्त्रक्रिया याविषयी माहिती घेतली. बाह्यरुग्ण विभाग तसेच आंतररुग्ण विभागामध्ये सद्यस्थितीत 321 भरती असलेल्या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. आतापर्यंत झालेले 51 यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत अधिकारी, डॉक्टर्स व त्यांच्या चमूचे  कौतुक केले.

तसेच किडनी प्रत्यारोपण ICU व NICU ला प्रत्यक्ष भेट दिली. त्याचप्रमाणे अपुऱ्या असलेल्या यंत्रसामुग्री विषयीची दखल घेतली. यावेळी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर  यांच्या समक्ष रुग्णालयातील टप्पा 3 बद्दल प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यामध्ये लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट इत्यादी आजारांवर उपचार करण्यात येतील.  आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या   कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.

तसेच  तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे  आश्वासन दिले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल ऑफिसर डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. माधव ढोपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, डॉ. अरुण सोळंके आदी उपस्थित होते.

00000

 

मेळघाटातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

अमरावती, दि. 24 (जिमाका): मेळघाटातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी दौरा करण्यात आला. त्यानुसार आज दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देण्यात आल्या. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यविषयक असलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या. येत्या काळात मेळघाटात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.

मेळघाटातील आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी श्री. आबीटकर यांनी  दौरा केला. आमदार केवलराम काळे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, सहायक संचालक भारती कुलवाल आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. आबीटकर यांनी मेळघाटात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. इतर ठिकाणी ज्या सुविधा नागरिकांना मिळतात तशाच सुविधा मेळघाटतही तयार करण्यावर भर देण्यात येईल. अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालय या भागातील महत्त्वाचे असल्यामुळे या ठिकाणी सुविधा वाढविण्यात येतील. आरोग्य यंत्रणेने सकारात्मक राहून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन केले.

दरम्यान मंत्री श्री. आबीटकर यांनी सकाळी हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. केंद्रातील आंतररुग्ण कक्षातील रुग्णांकडून माहिती घेऊन संवाद साधला. तसेच प्रयोगशाळा, औषध भांडार आदींची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. केंद्रातील पाणी आणि विजेची समस्या तातडीने निकाली काढण्यात येईल. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना दिल्या. चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात श्री. आबीटकर यांनी औषधी विभाग, आंतररुग्ण कक्ष, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृह, रक्तसाठा केंद्र, एक्स-रे केंद्राची पाहणी केली.

यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या आरोग्य यंत्रणांनी जाणून त्यानुसार सुधारणा करावी. रुग्णालयात प्रामुख्याने ग्रामीण आणि गरजू रुग्ण येत असल्याने त्याला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हिरडा येथील अंगणवाडी केंद्राला त्यांनी भेट दिली. याठिकाणी 47 बालके असून यातील एकही बालक कुपोषित नसल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच येत्या काळात चांगले कार्य करावे. बालकांचे पोषण होण्यासाठी त्यांना आणि मातांना सकस आहार पुरविण्यात यावा, असे निर्देश दिले. यावेळी लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.

बोरुगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाला श्री. आबीटकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने रस्ते आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे सांगितले. दौऱ्यादरम्यान श्री. आबीटकर यांनी नागरिक, संस्था आणि संघटना त्यांच्याकडून निवेदने आणि तक्रारी स्वीकारल्या.

00000

प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान तात्काल वितरीत करून दोंडाईचा येथील सौर प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन खरेदी  करावी. लवकरात लवकर जमिन अधिग्रहण करुन सानुग्रह अनुदान देवून धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाच्या आढाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव पी. अन्बलगन, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.राधाकृष्णन.टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेश नंदा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानिर्मितीने  ४७६.७६ हेक्टर खासगी  जमिन थेट खरेदी पध्दतीने अधिग्रहित केली असून प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. जेवढी जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे तेवढीच जमिन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घ्यावी. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवून स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरीत करावे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १००० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जर १३५० हेक्टर जमिन प्राप्त झाली तर ९०० एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा उरलेली जमिन एमआयडीसीला देण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सौर ऊर्जेसाठी पॅनल तसेच इतर यंत्रणा उभारावी. टाटा पॉवर कंपनीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे सौर ऊर्जा प्रकल्प लवकर पूर्ण करावा तसेच या परिसरात उद्योग उभारण्यासाठी, एमआयडीसाला जागा देण्यात यावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा...

0
नांदेड,३ ऑगस्ट:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात...

‘संपूर्णता’ अभियानातील कामगिरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा सन्मान

0
नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, 2025 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात...

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण...

0
नाशिक, दि. 3 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण

0
परभणी, दि. ३ (जिमाका) - शेतकरी, घरगुती ग्राहक आणि नवउद्योजकांना २४ तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच...

सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. 03 : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही...