शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 265

विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर , दि. २२:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कल्याणाची धोरण निश्चिती केली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना  रोजगार, शिक्षण अशा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने देखील अशा प्रकारच्या अनेक योजना आखल्या असून दिव्यांगासाठीच्या राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रीडा संचालनालय आणि स्वर्गीय प्रभाकर दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथील मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पर्धास्थळी भेट दिली, तसेच स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही अतिशय उत्साहवर्धक गोष्ट आहे. दिव्यांगाकरता काम करणाऱ्या संस्थांच्या असलेल्या अडचणी देखील दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. या संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींवर देखील मात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पॅरा ऑल्मिपिकमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. अनेक क्रीडा प्रकारात त्यांनी पदके पटकावली आहेत. त्यांचाही येत्या काळात यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. कुठल्याही खेळात जीत व हार यापेक्षा सांघिक भावना महत्त्वाची असते. ज्यांच्यामध्ये संघ भावना तयार होते ते जगाच्या कुठल्या क्षेत्रात गेले तरी मागे वळून पाहत नाहीत. स्पर्धेत सहभागी होणे हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, स्वर्गीय प्रभाकरराव दटके ट्रस्टचे प्रमुख सुभाष राऊत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले दिव्यांग खेळाडू उपस्थित होते.

०००

राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहे.

कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत शासनाच्या वतीने वेळोवेळी पंतप्रधान त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्र्यांना विनंती करण्यात आली होती. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळू शकेल असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

०००

 

निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २२: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आले असून दि. 1 एप्रिल 2025  पासून  त्याची अंमलबजावणी होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या निर्णयाचे स्वागत करत  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निर्णयाचे स्वागत करताना मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री म्हणून केंद्र सरकारला याबाबत केलेल्या पत्र व्यवहार व पाठपुराव्याला यश आले आहे. “केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने यापूर्वी 8 डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या कालावधीत निर्यातीवर निर्बंध लादले होते, ज्यामध्ये निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत (MEP) आणि पूर्णतः निर्यातबंदी यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2024 पासून लागू असलेले 20% निर्यात शुल्क आता रद्द करण्यात आले आहे. देशातून कांदा निर्यातीवरील निर्बंध असतानाही 2023-24 आर्थिक वर्षात एकूण 17.17 लाख मेट्रिक टन (LMT) तर 2024-25 आर्थिक वर्षात (18 मार्चपर्यंत) 11.65 LMT कांद्याची निर्यात झाली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये 0.72 LMT असलेली मासिक निर्यात जानेवारी 2025 मध्ये 1.85 LMT पर्यंत वाढली होती. हा निर्णय शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी घेण्यात आला आहे.

०००

केंद्राने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क हटवले; निर्यातीचा मार्ग मोकळा -पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि. २०: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले असून, आता कांदा निर्यातीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राज्यात कांदा पिकाची लागवड जास्त झाली आहे व पोषक हवामान असल्याने उत्पादन जास्त होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून कांदा पिकावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला निर्यात शुल्क हटवण्याबाबत विनंती केली होती.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी लक्षात हे निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. १ एप्रिल २०२५ पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्याचबरोबर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहेत.

पणन मंत्री रावल पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनात केंद्र सरकारला कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रब्बी कांद्याची लागवड झालेली आहे. कांद्याला पोषक हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढणार आहे. राज्याच्या बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक वाढायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने बाजारात कांद्याचे भाव कमी होणार नाही, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय मागणीनुसार निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असे मंत्री रावल यांनी सांगितले.

यंदा कांद्याखालील लागवड क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढले आहे, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे.

०००

केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द

मुंबई, दि. २२: महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि.1एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या निर्णयाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, “केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत हा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले आहे.

०००

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सव आवश्यक- मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):  वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इतर मागास वर्ग कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवास इतर मागसवर्ग कल्याण मंत्री सावे यांनी आज भेट दिली. ग्रंथोत्सवातील ग्रंथ प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. तसेच ग्रंथोत्सव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. जयदेव डोळे, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. ह. नि. सोनकांबळे, ॲड बाबा सरदार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचनाचे आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी महत्त्व आहे. त्यामुळे आपले व्यक्तिमत्व विकसीत होते,असेही मंत्री सावे यावेळी म्हणाले.

०००

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन

मुंबई, दि. २२: फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते शनिवारी डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी ‘हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथाचे लेखन केले आहे.

आपसात एकी नसल्यामुळे अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केले असे सांगून फुटीरतेमुळे महाराणा प्रताप यांना देखील पराभव पाहावा लागला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अशा फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले, असे राज्यपालांनी सांगितले.

परकीय शासकांमुळे भारत एकसंध राष्ट्र झाले असे चुकीचे दावे केले जातात असे सांगून सम्राट अशोक यांच्या काळात भारत कितीतरी दूरपर्यंत जोडला गेला होता, असे राज्यपालांनी सांगितले. सांस्कृतिक व अध्यात्मिकदृष्टया भारत नेहमीच एक राष्ट्र होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी लेखक सचिन नंदा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याला एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, आवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता, लेखक सचिन नंदा, एनएसईचे प्रमुख डॉ. आशिषकुमार चौहान, रवींद्र संघवी, मिलिंद घुमरे आणि इतर निमंत्रित उपस्थित होते. समीर कोपीकर यांनी आभार मानले.

०००

एचपीव्ही लसीकरणाने मुलींच्या कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंड, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करत मुलींना आरोग्यदृष्ट्या सक्षम करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही (HPV) लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.  मंत्री मुश्रीफ म्हणाले की, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. गडहिंग्लज, आजरा, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे, शिक्षक पालकांनी शंका निरसन करून लसीकरणासाठी आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजरा तहसीलदार समीर माने,गडहिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीता कोरे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत तसेच वैद्यकीय, महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी अधिष्ठता डॉ.मोरे व यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लसीविषयी माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले.

किरण कदम यांनी स्वागत केले तर सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

०००

भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. २२ : येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमलताई गवई आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले. सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळते. समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे.

येत्या काळात ज्ञान हीच शक्ती राहणार आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन त्यानुसार आपल्यातही बदल घडून येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही शेतीमध्ये बदल घडविताना आधुनिक शिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीतील प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्काराची संकल्पना ही गरजेची आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी त्यांना प्रशिक्षणही देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरस्काराच्या मिळालेल्या पाच लाख रुपयांमध्ये वीस लाख रुपयांची भर घालून त्यातून दरवर्षी पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन केले.

प्रारंभी हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेचे कार्य आणि पुरस्काराबद्दल माहिती दिली. यावेळी मिथीला कवीश्वर, श्रीमती राठोड, वैष्णवी मानवटकर, वैष्णवी कदम, समीक्षा नागापुरे, धनश्री मोये, आयुष्य दिवाण, सौम्या राऊत, दीप्ती काळमेघ यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि वंदना वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारत आणि कार्डीयाक कॅथलॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, दादाराव केचे, सुलभा खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, केवलराम काळे, सुमित वानखेडे, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे, सचिन देव महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा ही महत्त्वाची असून अशा कार्यांना कायम मदत केली जाईल. रुग्णालयामार्फत देणगी आणि नागरिकांच्या सहभागातून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. यातून अनेकांचे प्राण वाचले. गरजूंना मदत झाली. त्यामुळे संत अच्युत महाराजांना अभिप्रेत असलेली सेवा घडली आहे. या रुग्णालयाचा तळागाळातील नागरिकांना लाभ होणार आहे. येत्या काळात फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण आदींच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा. रुग्णालयाच्या विकासाचे ध्येय ठरविण्यात यावे. तसेच येत्या काळातही रुग्णालयाने निस्वार्थी भावनेने कार्य करावे, असे आवाहन केले.

शारदा उद्योग मंदिराला भेट देऊन महिला उद्योगाबद्दल मत व्यक्त करताना त्यांनी उद्योगात महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी महिलांनी कौशल्य आत्मसात करावे. दर्जेदार सेवा दिल्यास त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकेल,असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पंचवटी येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान बेलोरा विमानतळ येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, प्रविण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.

०००

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून मिलेट रॅलीत जनजागृती

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत मौजे कुर ता. भुदरगड येथे आयोजित मिलेट महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी – कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आबिटकर यांनी बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटरचे वाटप केले.

या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ. योगेश बन यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार याबाबत सांगितले. यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. आहारात नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये असावीत. लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन अशा पोषक घटकांनी समृद्ध असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले. शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मृत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गंत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

प्रथम तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) रक्षा शिंदे, कोल्हापूर, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले (अशासकीय सदस्य) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई, अजित देसाई, माजी उपसभापती (भुदरगड) मदन पाटील, कुरचे सरपंच कल्याण निकम, अशोक फराकटे,अशोक व भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज, नितीन भांडवले, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड, सुनील कांबळे, आत्मा (बीटीएम ) यांनी नियोजन केले. या कार्यशाळेस शेतकरी, प्रक्रियादार, नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शविला.

०००

 

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...