शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 264

माझगाव न्यायालयात ‘सुकून’ व ‘चला बोलूया’ कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

मुंबई, दि. २३: जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे कार्यालय, माझगाव न्यायालय येथे ‘सुकून’ व ‘चला बोलूया’ कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे उद्घाटन (दि. १९ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तसेच प्रलंबित व दाखल पूर्व कौटुंबिक वादाच्या समन्वयक समितीच्या प्रमुख श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण सदस्य सचिव एम. एस. आझमी, मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रधान न्यायाधीश नगर दिवाणी व सत्र न्यायालय अनिल सुब्रमण्यम, सुकून टाटा सामाजिक संस्थेचे प्रकल्प सह-संचालक श्रीमती अपर्णा जोशी, दिवाणी व सत्र न्यायालय वकिल संघ अध्यक्ष ॲड रवि जाधव, दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायीक अधिकारी, माझगाव विभागातील विविध पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते-डेरे म्हणाल्या, पोलिस यंत्रणा यांनी सदर कौटुंबीक समूपदेशन केंद्राचा उपयोग करावा. त्यामुळे न्याययंत्रणा व पोलिस यंत्रणावरील ताण कमी होण्यास मदत होणार असून सर्व पक्षकारांना लाभ होईल. सदस्य सचिव आझमी व श्रीमती जोशी यांनी केंद्राच्या कामकाजाबदल मार्गदर्शन केले. प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी आभार मानले.

हे केंद प्रत्येक गुरुवारी व शुक्रवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, १३ वा मजला, माझगाव इमारत, सरदार बलवंत सिंग धोडी मार्ग, नेसबिट रोड, माझगाव मुंबई-४०००१० येथे कार्यरत असणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीकरीता मोबाईल क ८५९१९०३६०१ अथवा इमेल dlsamumbai20@gmail.com वर संर्पक साधावा, असे आवाहन सचिव अनंत देशमुख यांनी कार्यक्रमदरम्यान केले.

0000

 

त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी; उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आगामी  च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वर परिसराची नैसर्गिक रचना सुंदर आहे. या परिसराच्या विकासासठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील कामे कालबद्धरितीने पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे करताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग होईल, विद्युत वाहने उपयोगात येतील, असे नियोजन करावे. त्यासोबत स्थानिक नागरिकांना अधिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था करावी, अशा सूचनाही श्री.फडणवीस यांनी दिल्या.

प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच करण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यामुळे कुंभामेळ्यासंबंधी कामांना कायदेशीर चौकट प्राप्त होईल आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येईल. आयोजनादरम्यान विविध सुविधांचे उत्तम व्यवस्थापन होण्यासाठी हे गरजेचे आहे.

गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा ११०० कोटी रुपयांचा असून त्या अंतर्गत या स्थानाचे अध्यात्मिक  व पर्यटनाच्यादृष्टीने महत्व लक्षात घेवून विकासकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

 

कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. २३  : विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती  मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला  प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला. कॉन्फडेरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यंग इंडियन्‍सच्‍या नाशिक शाखेतर्फे पश्‍चिम क्षेत्र परिषदेने आयोजित संवादात नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सीआयआय यंग इंडियन्‍सच्‍या नाशिक शाखेतर्फे पश्‍चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संवादाने झाला. सीआयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि न्यूज १८ चे अँकर आनंद नरसिंहन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, यंग इंडियन्‍सच्‍या पश्‍चिम क्षेत्राचे अध्यक्ष कृणाल शहा, वेदांत राठी, नाशिक शाखेचे संस्‍थापक अध्यक्ष जनक सारडा, नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर, पारुल धाडीच, भाविक ठक्‍कर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासाची दिशाही स्पष्ट केली. कार्यक्षम प्रशासन, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी कुंभमेळा, त्याअनुषंगाने होणारी विकासकामे याबाबतही त्यांनी नाशिकरांना आश्वस्त केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये औद्योगिक  विकासाची मोठी क्षमता आहे. येथील मनुष्यबळ आणि हवामान लक्षात घेता पर्यटन आणि औद्योगिक विकासाला भरपूर वाव आहे. एचएएलमुळे डिफेन्स इकोसिस्टम इथे आहे. मुंबईचा फायदा पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरांना झाला. समृद्धी महामार्गामुळे आता नाशिकचा अधिकगतीने विकास होणार आहे.  देशातील सर्वात मोठे बंदर आता वाढवण येथे होत आहे. नाशिक येथून वाढवणसाठी ग्रीनफिल्ड रोड तयार करणार असल्याने त्याचा खूप मोठा फायदा नाशिक शहराला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरावर भर

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली.  दळणवळण सुविधांचा विकास झाल्यास  त्याचा लाभ नाशिकला होईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो, याकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुगल बरोबर भागीदारी करून सेंटर ऑफ एक्सलन्स बाबत काम सुरू केले आहे. कृषी, कायदा क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने नव्या रोजगार आणि उद्योग संधी निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून नवे अभ्यासक्रम  विकसित करण्यात येत आहेत. रतन टाटा स्कील युनिव्हर्सिटीने याबाबत दहा हजार महिलांना प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील उद्योजकांना अधिक वाव देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

नाशिकमध्ये शेती प्रक्रिया उद्योगाचे उत्तम मॉडेल

उद्योगासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.  नाशिकची ओळख प्रगत शेतीसाठी आहे.  जिल्हा द्राक्षे, कांदे, भाजीपाला उत्पादनत आघाडीवर आहेत. कृषी क्षेत्रात मूल्यवर्धित साखळी नाशिकने विकसित केली असून हे नाशिक मॉडेल आहे. याशिवाय, सह्याद्री ॲग्रोने प्रक्रिया उद्योगाचे मॉडेल अतिशय चांगल्या पद्धतीने राबविले आहे.

राज्याने स्मार्ट योजना, ॲग्री बिझनेस योजना सुरू केली. बाजारपेठ व्यवस्थेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काम सुरू केले. केंद्रीय योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २० लाख घरे उभारण्यात येत आहे. त्याचा लाभ विविध माध्यमातून ग्रामीण भागाला होत असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्याची १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी रोडमॅप तयार

भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची १ ट्रिलियन अर्थव्यवस्था २०२९ मधेच होईल यासाठी रोडमॅप तयार आहे. आर्थिक विकासासाठी दळणवळणाची गती महत्वाची आहे.  पायाभूत सुविधाही महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीनेच समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. शक्तिपीठ महामार्गही तयार करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्रात गुंतवणूकसाठी अनुकूल वातावरण, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात

देशात विकासाच्या बाबतीत स्पर्धात्मक वातावरण आहे. दहा-बारा राज्ये  उद्योग आणि आर्थिक विकासात चांगले काम करत आहेत. महाराष्ट्र यात आघाडीवर आहे.  कारण येथे गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण आहे. देशात येणारी सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. ही गुंतवणूक केवळ महानगर क्षेत्रात नव्हे, तर राज्यात सर्वत्र व्हावी यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्याला यश मिळत आहे. मुंबई, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही गुंतवणूक होत आहे.  पहिल्या तीन तिमाही अहवालात औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र ‘मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’ आहे. ज्या इतर राज्यात काही चांगल्या कल्पना आहेत, त्याचीही अंमलबजावणी राज्यात करत आहोत. राज्यात शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

यंदाचा कुंभमेळा अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम असणार

देशाची सभ्यता ही एक वारसा आहे. कित्येक वर्षापासून ती चालत आली असल्याचे नमूद करून श्री. फडणवीस म्हणाले, प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याला  जात, धर्म, भेदभाव गळून पडला. ही आपली ताकद आहे. भारतीय मनाची आस्था हेच संस्कृती आणि सभ्यता टिकून राहण्याचे कारण आहे. युवा वर्गाने कुंभमेळ्याशी जोडून घेतले पाहिजे. कुंभमेळ्यात पर्यटन, उद्यमशीलता याला वाव असल्याने त्यात युवांचा सहभाग यामध्ये घेतला जाईल. एकाचवेळी अध्यात्मिकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम आपल्याला पहायला मिळेल.

युवा वर्गानेही प्रशासन आणि सरकारला सहकार्य होईल यासाठी पुढे आले पाहिजे. नाविन्यपूर्ण संकल्पना, उद्यमशीलता यांचा उपयोग कशाप्रकारे होतो, हेप्रयागराज मध्ये दिसले. नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी ते अधिक चांगल्या पद्धतीने उपयोगात आणता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील विकास कामावेळी आणि प्रत्यक्ष कुंभमेळ्यात ही युवाशक्ती निश्चितपणे महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील कायदा सुव्यस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे यांनी आपले विचार मांडले. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह गोवा, मध्यप्रदेश, गुजरातमधील सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई दि. 23 : जीएसटी कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यवासायिक, करदात्यांकडून जीएसटी कायद्याचे अनुपालन, कर भरणा करताना अनावधानाने चुका झाल्या आहेत. या चुकांमुळे व्याज आणि दंड याचा आर्थिक भुर्दंड करदात्याला लागू नये, तसेच वस्तू व सेवा कर विवादांचे निराकरण सुलभतेने होऊन विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जीएसटी अभय योजना सुरु केली आहे. पात्र करदात्यांनी या योजनेचा 31 मार्च 2025 पर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तू व सेवा कर विभागाद्वारे करण्यात आले आहे.

या योजनेत सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षाशी संबंधित सीजीएसटी कायद्याच्या कलम 73 अंतर्गत जारी केलेले मागणी आदेश लाभासाठी पात्र आहेत. या व्यतिरिक्त, ज्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला कलम  74 अंतर्गत मागणी आदेश जारी करण्यात आले होते. परंतु अपिल अधिकारी, अपिलीय न्यायाधिकरण किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार हे मागणी आदेश कलम 73 मध्ये रुपांतरीत झाल्यास अशी प्रकरणे अभय योजने अंतर्गत लाभासाठी पात्र आहेत. योजनेच्या अटी आणि शर्तींच्या अधिन राहून केवळ मूळ रक्कम भरल्यास त्यावरील मूळ रक्कम भरल्यास त्यावरील व्याज व दंड  माफ होणार आहे. व्याज व दंड माफिसह अशी प्रकरणे बंद करण्याची संधी या योजनेद्वारे करदात्यांना उपलब्ध आहे.

या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक देय कर भरण्याची अंतिम तारीख दि.31 मार्च 2025 आहे. त्यामुळे पात्र करदात्यांनी आवश्यक देय कराचा त्वरित भरणा करुन व्याज व दंड माफिचा लाभ घ्यावा आणि प्रलंबित जीएसटी थकबाकीतून मुक्त व्हावे. आवश्यक स्पष्टीकरण किंवा मदतीसाठी आपल्या नोडल, क्षेत्रीय जीएसटी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वस्तू व सेवा कर विभागाद्वारे करण्यात आले आहे.

००००

सेंट्रल पार्क परिसरात बारामतीचा बदलता इतिहास मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

बारामती, दि. २३:  सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर सुशोभिकरण, कुस्ती महासंघ शेजारील कामाची आखणी अंतिम करणे, कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसर, घारे साठवण तलाव सुशोभीकरण आणि पदपथाचे काम, सेंट्रल पार्क सुशोभीकरण आणि प्रशासकीय भवनच्या बाहेरील रंगकामाची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

सेंट्रल पार्क परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ, जलतरण तलावकरीता ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरश्या बसवाव्यात. कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे. तीन हत्ती चौक परिसर सुशोभीकरणाची कामे करताना परिसरातील जागेचा पुरेपूर वापर करावा. दीपस्तंभाचे काम करण्यापूर्वी जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

कुस्ती संघ ते घारे साठवण तलाव दरम्यान  कॅनाल परिसरात पदपथाचे कामे करताना संरक्षक भिंतीतून पाणी गळती होणार नाही, याचा विचार करुन कामे करावीत. नागरिकांकरीता शौचालय उभारण्यात यावे. ज्येष्ठांनाही या पदपथावर फिरताना त्रास होणार नाही, याचाही विचार करावा. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

0000

मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अभिवादन

मुंबई, दि. 23 : शहीद दिनानिमित्त आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सचिन कावळे, सहायक कक्षाधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

राज्यपालांचे शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

मुंबई, दि. 23:- शहीद दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज रविवारी (दि. 23) राजभवन येथे शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Governor offers tribute to revolutionaries Bhagat Singh, Rajguru and Sukhdev

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portraits of great revolutionaries Bhagat Singh, Rajguru and Sukhdev on the occasion of the Martyrs’ Day at Raj Bhavan, Mumbai on Sunday, 23rd March 2025. officers of Raj Bhavan and State police were present on this occasion.

००००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन

नाशिक, दि. २३ मार्च : (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा केली. त्यांनी कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला.

यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे,  देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,  पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार,  त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते.

00000

शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहिदांना अभिवादन

नाशिक, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.

सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

नागपूर, दि. २२: लोकमत माध्यम समूहाद्वारे आयोजित सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांना लिजंड अवॉर्ड, प्रख्यात गझल गायक तलत अझीझ यांना आयकॉन अवॉर्ड, शास्त्रीय गायक अनिरुद्ध ऐथल तसेच अंतरा नंदी आणि अंकिता नंदी यांना उदयोन्मुख प्रतिभा पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना भारतीय संगीताच्या क्षेत्रात आज नवीन पिढी अत्यंत सक्षमपणे पुढे येत असल्याचा अभिमान आहे. राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरविण्यात आलेले उदयोन्मुख कलावंत नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.

पुरस्कार वितरणानंतर उस्ताद शुजात हुसेन खान आणि ग्रुप यांनी सुफी गायन व सितारवादनाची प्रस्तुती सादर केली. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...