शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 254

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रित-एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

मुंबई,दि. 27 : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनीमध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.

एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड कंपनी मोठे गृहनिर्माण प्रकल्प, आयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात व  परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी करणे तसेच अशा प्रकल्पांना निधी देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, भिवंडी महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका या प्रमुख प्रकल्पांमध्ये पीएमएवाय आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी महाप्रितकरत आहे. मुंबईत सुमारे 56 एसआरए प्रकल्प महाप्रितराबविणार आहे. एमएमआर आणि विशेषतः मुंबई शहरातील विविध खाजगी सहकारी गृहसंकुल संस्थांनी त्यांच्या परिसराचा पुनर्विकासासाठी महाप्रितसोबत चर्चा केली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई शहरातील गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्याकरिता महाप्रितआणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत.

महाप्रितईएसजी अनुपालन, स्वच्छ आणि हरित ऊर्जा निकषांचा अवलंब, कचरा पुनर्वापर, डीकार्बोनाइज्ड साहित्य, नवीनतम आणि पर्यावरणपुरक लवचिक बांधकाम तंत्रज्ञान, राष्ट्रीय पर्यावरणपूरक मानके, राज्यातील दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रकल्प देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय मानके यावर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता  महाप्रितकंपनी अग्रस्थानी आहे. तसेच महाप्रितआणि एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडची तज्ज्ञता व कौशल्यामुळे होणारे फायदे लक्षात घेता, दोन्ही सरकारी संस्थांनी समान हितांच्या प्रकल्पांवर पीएमसी अथवा ईपीसी तत्वावर प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी म्हणाले, एनबीसीसी आणि महाप्रितयांच्यातील सहकार्यामुळे पुनर्विकास कार्य करण्यास मदत होईल व गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच केंद्र सरकारच्या संस्थांना विकासकांची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होत असल्यामुळे, पुनर्विकासांची कामे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.

एनबीसीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी म्हणाले, एनबीसीसी (इंडिया) मुंबई आणि महाप्रितयांच्या संयुक्त सहकार्यामुळे मुंबई व मुंबई परिसरातील पुनर्विकासांची प्रकल्प राबविण्यात येतील. तसेच अशाच प्रकारचे प्रकल्प नवी दिल्ली व  इतर राज्यांमध्ये संयुक्तपणे राबविण्यात येतील.

यावेळी महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक सुभाष नागे,  प्रकल्प संचालक पी. आर.के. मुर्ती, कार्यकारी संचालक सुनील पोटे तसेच एनबीसीसी (इंडिया) नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रदिप शर्मा, कार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

0000

भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद- मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. २६ : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची खात्री आणि समान अधिकार संविधानाने मिळवून दिले. भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा हा प्रवास अभिमानास्पद असून यापुढेही असेच मार्गक्रमण करीत आपण लोकशाही बळकट करू, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत केले.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर विधान परिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री ॲड शेलार यांनी संविधानाची महती आणि त्याचे महत्व अधोरेखित केले

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, ३७० कलम हटविण्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे जम्मू – काश्मीर देशाच्या घटनात्मक प्रवाहात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे देशाच्या एकात्मतेला बळकटी मिळाल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

0000

भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २६ : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचे उज्वल भवितव्य सुनिश्चित केले. अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली. गेली ७५ वर्ष अविरतपणे देशाला मार्ग दाखवण्याचे काम संविधानाने केले आहे आणि पुढे शतकानुशतके करत राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले.

भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर विधानपरिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, प्रत्येक जण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री संविधानाने दिली. स्त्री-पुरुषांना समान अधिकार संविधानाने मिळवून दिला. म्हणूनच आज महिला मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा उच्चपदांवर पोहोचू शकल्या. त्यामुळे संविधान हा केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद आहे. भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती प्रत्येक भारतीयांने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताचा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञात, अज्ञात वीरांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. त्यातून अखेर देश स्वतंत्र झाला आणि पुढे संविधानापर्यंत पोहोचला, असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यशासन जनतेच्या भल्यासाठी काम करताना संविधानाचे सगळे मानदंड पाळत आहे. सुशासन, लेक लाडकी, लाडकी बहीण सारख्या लोकहिताच्या योजना, सारथी, बार्टी, आर्टी, महाज्योती सारख्या संस्था, शेतकऱ्यांसाठीच्या कृषी सुधारणा योजना, संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाला पुढे नेण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण, आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत ठोस काम करून संविधानाचे तत्व पाळले जात आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून हे इंजिन वेगाने धावण्यासाठी जी ऊर्जा लागते केवळ आर्थिक नसून, संविधानाच्या तत्वांतून येते आणि पुढेही येत राहील, असे मत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान कधीही कालबाह्य होणार नाही. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अहवालानुसार, त्या विद्यापीठातून 200 वर्षांत शिकून गेलेल्या विद्वान विद्यार्थ्यांपैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभरण्यात आला. त्याखाली ’द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणजे ‘ज्ञानाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे लिहिले आहे. अशा ज्ञानसंपन्न, महान विद्वानाने भारतीय संविधान तयार केले, हे आपल्या देशाचे भाग्य आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, कलम 370 हटवण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, संविधानाचा 75 वर्षांचा हा प्रवास अभिमानास्पद आहे आणि भारताच्या प्राचीन लोकशाही वारशाचा हा उत्सव आहे. याच पवित्र संविधानाच्या प्रकाशात आपण पुढे मार्गक्रमण करत लोकशाही अधिकाधिक बळकट करत राहू हा विश्वास आहे. संविधानाचे पावित्र्य आणि महत्त्व पुढल्या पिढ्यांनाही प्रेरक ठरावे यासाठीच प्रत्येक तालुक्यात संविधान भवन साकारले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

मतदार याद्यांच्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

मुंबई, दि. २६ : मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.गजानन देसाई, भारतीय जनता पक्षाचे गोपाळ दळवी, शिवसेना पक्षाचे विलास जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रवींद्र पवार, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन परसनाईक तसेच विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय पक्ष हे निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे भागीदार आहेत. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी क्षेत्रिय तसेच राज्यस्तरावर नियमितरित्या बैठका घेऊन निवडणुकीच्या विविध विषयाबाबत समन्वय राखण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर १७ ते २० मार्च २०२५ या कालावधीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधी समवेत बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

या वेळी बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना समजून घेतल्या. तसेच याविषयांवावत सविस्तर चर्चा करुन सर्व राजकीय पक्षांच्या सूचनांची नोंद घेऊन त्या अनुषंगाने कायद्यातील तरतूदी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

0000

गजानन पाटील/ससं/

प्रत्येक नागरिकाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता संविधानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

लोकशाही ही संविधानाचा सर्वात मोठी ठेव

मुंबई, दि. २६ : हे जगात सर्वोत्तम आहे. भारताचे २०४७ मध्ये विकसित देशाचे स्वप्न साकारवयाचे आहे. ही स्वप्नपूर्ती करण्याची क्षमता संविधानात असून देश संविधानाने दिलेल्या मार्गावर चालत आहे. संविधानाने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती आणली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानामुळे रक्त विरहीत क्रांती देशात झाली. या संविधानात प्रत्येक भारतीयाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता आहे, असे गोरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काढले. भारतीय संविधानाच्या ७५ वर्ष गौरवशाली परंपरेच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहभाग घेत मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाच्यावतीने ४३४ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये संविधान मंदीर स्थापन करण्यात आले आहेत. मूल्यशिक्षणात संविधानाची मुल्ये शिकविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात संविधान भवन बांधण्यात येणार आहे. उच्च भारतीय मुल्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले आहे. भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. लंकेतील सीतेची सुटका, गीतेचा उपदेश आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान संविधानात आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही. त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इंग्रजांचे कॅबिनेट मिशन

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात भारतात कॅबिनेट मिशन पाठविले. या कॅबिनेट मिशनमध्ये तीन मंत्री होते. या कॅबिनेट मिशनने भारताला स्वतंत्र करण्यासाठी भारताचे स्वत:चे संविधान असायला पाहिले, असा अहवाल दिला आहे. भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकार 1935 चा कायदा करण्यात आला. संविधान सभेने एकेका कलमावर, शब्दावर चर्चा केली आहे. सभेने 165 दिवस 11 तास काम केले. या सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली तर शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. तसेच 26 नोव्हेबर 1949 रोजी संविधान स्वीकारले, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणले.

संविधान सभेचे कामकाज

जगात सर्वाधिक प्रदीर्घ काळ संविधान निर्मितीचे काम भारतीय संविधान सभेने केले आहे. सभेमध्ये 389 सदस्य होते, त्यापैकी 292 सदस्य प्रोव्हेंशनस असेम्बंली मधून निवडून आले होते. 92 सदस्य हे संस्थानचे होते, 4 जण चिफ कमीशनर कॉन्सीट्युएन्सीमधून निवडून आले होते. संविधान सभेचे पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली, या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने झाली होती. संविधान सभेने मसुदा लेखन समिती तयार केली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीने अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. संविधान लागू करताना संविधानात उद्देशिका, 22 भाग, 395 कलमे होती. आता संविधानात 25 भाग, 448 कलमे, 12 परिशिष्ठ आहेत. मसुदावेळी 7 हजार 635 सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या, त्यापैकी 2 हजार 473 सुधारणा स्वीकारण्यात आल्या. संविधानात आतापर्यंत 106 घटना दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 106 वी दुरूस्ती महिलांना संसदेत व विधानसभेत 33 टक्के आरक्षणाची आहे.

लोकशाही ही संविधानातील सर्वात मोठी ठेव

संविधनातील उद्देशिका आपली आहे. आम्ही भारतीय लोक सांगतो, म्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे, की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वावर उभे राहिलेले हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो. त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाही, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने मुलभूत हक्क बहाल केले आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्म, भेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानता, समान संधी, कलम १५ मध्ये भेदभाव करता येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूदही केली आहे.

संधीची समानता

संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा समान आहे. कुठल्याही व्यक्तीला जात, पंथ, धर्म या आधारावर संधी मिळणार नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा राहीली पाहिजे, असा प्रयत्न डॉ. बाबासाहेबांनी संविधानात केला आहे. संविधानातून राजकीय लोकशाही नको, सामाजिक, आर्थिक लोकशाही आली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब सांगायचे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय संविधानाने पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार दिला आहे. भारत एक संघराज्य प्रणाली आहे. हे राज्य सांस्कृतिक एकतेवर अवलंबून आहे. कार्यपालिका, न्यायपालिका, विधीपालिका हे तीन स्तंभ भारतीय लोकशाहीचे आहे. तर अदृश्य स्तंभ हा प्रसार माध्यमे आहे. संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली आहे. या तत्वानुसार समान नागरी कायदा करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर दिली आहे. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लागावी, यासाठी राज्य प्रयत्नशील राहील, असेही या तत्वानुसार नमूद केले आहे. पशु, जनावरे यांच्या कत्तलीस मनाई करण्याचे तत्वही राज्य धोरण मार्गदर्शक तत्वामध्ये आहे.

मुख्यमंत्री यांचे भाषण पुस्तक स्वरूपात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानाची ७५ वर्ष गौरवशाली परंपरेच्या चर्चेत सहभाग घेत मनोगतानंतर सदस्य भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानावरील विधानसभेतील भाषण पुस्तक रूपात प्रकाशित करीत पुस्तक सर्वांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी मान्य करीत मुख्यमंत्री यांचे भाषण पुस्तक रूपातच नव्हे, तर डिजिटल स्वरूपातही वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

१२ महत्त्वाचे कायदे मंजूर; अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १२ महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून,दरदिवशी सरासरी ९ तास कामकाज चालले. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विरोधी पक्षालाही त्यांच्या मुद्द्यांसाठी संपूर्ण संधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, या अधिवेशनात महत्वाच्या विधेयकांमध्ये माथाडी कामगार कायद्यातील सुधारणा विधेयकाचा समावेश असून या विधेयकामुळे बनावट माथाडी आणि ब्लॅकमेलिंग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक आणि विनियोजन विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात संविधानावर विशेष चर्चा झाली, तसेच अर्थमंत्री यांनी शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे,जो महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल.

मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल सर्व आमदार, मंत्री, पिठासीन अधिकारी, विधानमंडळ कर्मचारी आणि माध्यमांचे आभार मानले.

१३ कोटी लोकांच्या विकासाचा अर्थसकंल्प :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवून अर्थव्यवस्था बिघडू न देता अर्थसकंल्प सादर केला.राज्यातील १३ कोटी लोकांच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला. विकासाचे आणि लोकाभिमुख प्रकल्प शासन राबवित आहे. शेतकरी, कष्टकरी , कामगार वर्ग  या सर्व घटकांचा विचार राज्य चालवताना करत आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना पुढे नेताना  सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करित आहोत. परकीय गुंतवणूक वाढविण्यातही राज्य अग्रेसर असून, दाओस येथे झालेल्या परिषदेत १५ लाख कोटीचे करार करण्यात आले. एक खिडकी योजनेअंतर्गत राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. स्टार्ट अपमध्ये राज्य अव्वल असून, आपल्या राज्यावर इतर राज्यांच्या तुलनेत कर्जही कमी आहे. १०० दिवसांच्या कामकाजाचे उद्दिष्ट  मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना दिले होते, त्यानुसार सर्व विभागांनी उत्तम काम पार पाडले असून, अनेक विभागांनी उद्दिष्ट पुर्ण केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन ३० जून रोजी मुंबईत

मुंबई, दि. २६ : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ३० जून २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रत्यक्षात १४६ तास कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात १४६ तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ९ तास ७ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.८४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८३.५५ टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित ९ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी ९ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५ असून ५ सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या अधिवेशनात “जागतिक महिला दिन” आणि “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त” मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर चर्चा घेण्यात आली.

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज झाले असून रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाल्याची माहिती सभापती प्रा.शिंदे यांनी दिली. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.६७ टक्के तर सरासरी उपस्थिती ८३.६५ टक्के होती.

विधान परिषदेत तीन शासकीय विधेयके पुर:स्थापित करण्यात येऊन तीन विधेयके संमत करण्यात आली. तर चार विधानसभा विधेयके पारित करण्यात आली. विधानसभेकडे एकूण पाच धन विधेयके शिफारशी शिवाय परत पाठविण्यात आली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात जास्तीत जास्त प्रश्नांना न्याय मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका सभापती प्रा. शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये पुकारण्यात आलेल्या आजवरच्या प्रश्नांच्या सरासरीपेक्षा जास्त संख्येने प्रश्न चर्चेला घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या अधिवेशनात ‘जागतिक महिला दिन’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त’ मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर चर्चा घेण्यात आली.

0000

सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २६: महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘स्वयंसिद्धा’च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात “कांचनताईंनी ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिलांना त्यांनी स्वयंसिद्धा च्या माध्यमातून विविध शिक्षण – प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यातून अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळाली. यातून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. कांचनताईंच्या निधनाने महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

000

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी पोलिस, महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय साधावा- कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

मुंबई, दि. २६ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात  होण्यासाठी पोलिसमहानगरपालिका व संबधित जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेऊन काम करावे. रत्नागिरीसिंधुदुर्गरायगडमुंबई व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायींची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची प्राधान्याने काळजी घ्यावी. महानगरपालिकेच्या वार्ड अधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी सजावट करावीअसे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या १३४ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलमुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरजिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर तर रत्नागिरीसिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबेडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेभारतीय बौद्ध महासंघाचे प्रदीप कांबळेभिकाजी कांबळेविश्वशांती मित्रमंडळाचे प्रीतम कांबळेकामगार नेते रमेश जाधव,आशिष गाडेमुंबई महानगरपालिका प्रशासनसमाज कल्याणएमएमआरडीए तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ.आंबेडकर यांच्या आंबवडे या ठिकाणी सजावटीसह सुशोभीकरण करणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी तसेच रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे येथील पुतळ्याची व परिसराची स्वच्छता व डागडुजी करणेमुंबई शहर आणि मुंबई उपनगर परिसरातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यांची सजावटविद्युतरोषणाईसह अन्य कामे, रत्नागिरीसिंधुदुर्गरायगडमुंबई व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनमहानगरपालिका यांनी प्रधान्याने पूर्ण करावीतअसेही आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.

0000

गजानन पाटील/ससं/

अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीस गती देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २६ : अहिल्यानगरमधील खर्डा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरूस्ती करण्याकरिता बगीचासुशोभीकरणसंरक्षण भिंतदरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी. जलदगतीने काम पूर्ण करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्याच्या स्मारकाच्या जतनासंदर्भात विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खर्डा किल्ल्याच्या दुरूस्तीसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना स्मारकाची डागडुजी व जतन करताना विचारात घ्याव्यात, असे निर्देश यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले कीस्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील उर्वरीत भिंतबुरूजखोल्या यांची दुरूस्ती व संवर्धन करणेतसेच प्रवेश दरवाजा बांधणेसंरक्षित भिंत उभारणेरोशणाई या बाबींचा समावेश करून फेरनिविदा काढण्यात याव्यात व जतन व दुरूस्तीच्या कामांस गती द्यावी.

यावेळी विभागाच्या उपसचिव नंदा राऊतपुरातत्व वस्तु संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गेसहायक संचालक अमोल गोरे यावेळी उपस्थित होते.

 

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...