शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 252

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ

मुंबई, दि. २८ : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही  शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

केंद्र शासनकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून केंद्र शासनाकडे  पाठपुराव करावा अशा सूचनाही विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

केंद्र सरकार आणि राज्य शासन तसेच खासगी कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या  सामाजिक दायित्व निधीतून तुती व टसर उद्योगाचा एकात्मिक विकास  करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तातडीने बैठक घेऊन रेशीम शेती संचालनालयाचे कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील बाएफ या संस्थेची मदत होत आहे. या संस्थेच्या मदतीने रेशीम उद्योग कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

बाएफ संस्थेने तुती लागवड ते कापड निर्मितीतील मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी रेशीम संचालनालयास मदत करण्याबाबतचे सादरीकरण केले. तुती लागवड, अंडीपुंज ते कोष निर्मिती, कोषोत्तर प्रक्रीया उद्योगास चालना देवून समूह पद्धतीने विकास, त्याद्वारे मुल्यवर्धीत साखळी निर्माण करणे,  रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याबाबत बाएफ व रेशीम संचालनालय यांनी क्षेत्रे निश्चित करावी. ज्या क्षेत्राच्या साखळी विकासामध्ये तुट अशा क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यरत व्यक्तींनी  त्यासाठी बाएफ संस्थेने मुल्यवर्धीत साखळी निर्माण करुन स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि रेशीम उद्योगाला चालना दिली आहे, अशा उरळी कांचन, जि. पुणे येथे प्रत्यक्ष भेट देवून पुढील दिशा व कार्यकक्षा निश्चित करण्यात येत आहे.

रेशीम शेती आणि वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशीम उद्योगासाठी आवश्यक  निधी संदर्भात पाठपुरावा आणि राज्यातील रेशीम संदर्भातील संबंधित विभागाचा समनव्य करून याला अधिक गती देण्यात येत आहे. तुती लागवड, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीसाठी वन विभागाची मदत आणि. झोमॅटो व झेप्टो या कंपनीच्या सामाजिक दायीत्व निधीतून आदिवासी जिल्ह्यामध्ये तुती, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत अजून याबाबतच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

टसर क्षेत्रामध्ये रेशीम अळीचे संगोपन करताना शेतकऱ्यांना  येणाऱ्या अडचणीसंदर्भात संबधित जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने सहकार्य करण्याचे नियोजन करावे. निधीची आवश्यकता असल्यास किंवा प्रस्ताव प्रलंबित असल्यास त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

तुती व टसर क्षेत्रातील विकासाकरिता विशेषतः महीला व अदिवासी घटकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 10 हजार लाभार्थ्यांसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन

राज्यातील तुती व तसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 75 टक्के इतक्या सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच राज्यांतर्गत रेशीम शेती नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. रेशीम शेतकऱ्यांना विद्या वेतनासह 15 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन पर अनुदान, सूत उत्पादन अनुदान योजना, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती रेशीम सुत उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य आधुनिक यंत्रसामग्रीसाठी अनुदान, मल्टी अँड रेलिंग युनिट 100 प्रति किलो अनुदान, ऑटोमॅटिक रेलिंग युनिट 150 रुपये प्रति किलो, अनुदान टसर रीलींग युनिट 100 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत आहे.

यासाठी  केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा उपयोग करून, योग्य तंत्रज्ञान, शेकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन  ग्रामीण, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढीसाठी  त्यांना आर्थिक सक्षमता मिळू देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच बरोबर आदिवासी, ग्रामीण भागात तुतीची लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणत रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मुंबईचे महत्व आणखी वाढणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 28 : येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या महानगराचे महत्व आणखी वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 2025-26 साठीचा रू. 40,187.41 कोटींचा अर्थसंकल्प महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी एमएमआरडीए सभागृहातील बैठकीत सादर केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. मुखर्जी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात  रु. 35,151.14 कोटी म्हणजेच एकूण खर्चाच्या सुमारे 87 टक्के निधी पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ही तरतूद मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, नवीन बोगदे मार्ग, सागरी मार्ग, जलस्रोत विकास आणि नागरी पायाभूत सुविधा यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पीय अंदाजात 2025-26 साठी रू. 36,938.69 कोटी महसूल अपेक्षित आहे.

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री

या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. मुंबई महानगर प्रदेशामधील सुरू असलेली पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे राज्याच्या प्रगतीच्या वाटचालीला वेग देत आहेत. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान महाराष्ट्राने एकूण ₹15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली असून, त्यापैकी एमएमआरडीएने एकट्यानेच 11 सामंजस्य करार करत ₹3.50 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. हे करार एमएमआरडीएच्या नेतृत्वात साकारले गेले असून, महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी असलेला जागतिक स्तरावरील विश्वास दर्शवतात. ही अर्थसंकल्पीय तरतूद एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगिण व गतिमान विकास ही आमची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. नव्या मेट्रो मार्गांपासून ते जलस्रोत प्रकल्पांपर्यंत सर्व क्षेत्रात समावेशक प्रगती साधणारा हा अर्थसंकल्प आहे. एमएमआरडीएच्या योजनांमुळे मुंबई जागतिक आर्थिक केंद्र म्हणून पुढे येईल, एमएमआरडीएने सादर केलेला 2025-26चा अर्थसंकल्प हा दूरदृष्टी असलेला, व्यापक आणि मुंबई महानगर प्रदेशाचा बहुआयामी विकास साधणारा दस्तऐवज आहे.”

2025-26 या वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा भविष्यमुखी आहे. 35,000 कोटींपेक्षा अधिक निधी थेट प्रकल्पांसाठी आहे. मेट्रो मार्ग विस्तार, भुयारी मार्ग, जलस्रोत विकास, नवे व्यापार केंद्र – हे सर्व मुंबईमहानगर प्रदेशाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. एमएमआरडीएचा 2025-26 अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्याचा आराखडा आहे,” असे प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएच्या नेतृत्वाखाली हा अर्थसंकल्प मुंबईसह महानगर प्रदेशाला जागतिक शहर होण्याच्या प्रवासात मैलाचा दगड ठरणार आहे. या अर्थसंकल्पातून मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक, समतोल व वेगवान विकासास चालना मिळणार असून, प्रवासाचा वेळ व अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीस दिलासा मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात प्रकल्पांसाठी निधीची तरतूद :

  1. मेट्रो प्रकल्प मार्ग 2 ब : डी. एन. नगर – मंडाळे- रू.  2,155.80 कोटी
  2. मेट्रो प्रकल्प मार्ग 4 : वडाळा – घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली- रू. 3,247.51 कोटी
  3. मेट्रो प्रकल्प मार्ग 5 : ठाणे – भिवंडी – कल्याण-रू. 1,579.99 कोटी
  4. मेट्रो प्रकल्प मार्ग 6 : स्वामी समर्थ नगर –कांजुरमार्ग-रू. 1,303.40 कोटी
  5. मेट्रो प्रकल्पमार्ग 9 : दहिसर ते मिरा-भाईंदर व 7 अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराजआंतरराष्ट्रीय विमानतळ) – रू. 1,182.93 कोटी
  6. मेट्रो प्रकल्प मार्ग 12 : कल्याण – तळोजा- रू. 1,500.00 कोटी
  7. विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविणे- रू. 521.47 कोटी
  8. ठाणे ते बोरीवली (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) 4 पदरी भुयारी मार्ग- रू. 2,684.00 कोटी
  9. मुंबई शहरातील ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मागापर्यंत वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकाम- रू. 1,813.40 कोटी
  10. उत्तन ते विरार सागरी किनारा प्रकल्प-रू. 2,000.00 कोटी
  11. प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोताचा विकास करणे (सुर्या प्रकल्प, काळु प्रकल्प, देहरजी प्रकल्प)- रू. 1,645.00 कोटी
  12. ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंताच्या भुयारी मार्ग बांधणे- रू. 1,200.00 कोटी
  13. फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत मार्ग बांधणे- रू. 1,000.00 कोटी
  14. के.एस.सी.नवनगर प्रकल्प (कर्णाळा-साई-चिरनेर-NTDA) – रू. 1,000.00 कोटी

2025-26 या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आलेले नवीन प्रकल्प

  1. मेट्रो मार्ग 5 चा विस्तार: दुर्गाडी (कल्याण) ते उल्हासनगर
  2. मेट्रो मार्ग 10: गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड)
  3. मेट्रो मार्ग 13 :- शिवाजी चौक (मीरा रोड) ते विरार
  4. मेट्रो मार्ग 14: कांजूरमार्ग-बदलापूर
  5. ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन जंक्शनपर्यंतचा भुयारी मार्ग बांधणे. भाग1
  6. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर पर्यंत उन्नत रस्त्याचे डिझाइन आणि बांधकाम भाग-2
  7. ऐरोली बोगदा ते कटाई नाका रोड (भाग 3)6.71 किमीचा रस्ता
  8. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extn. MUIP)

अ) मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील कामे :-

  1. सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन पर्यंत रस्ता तयार करणे.
  2. घोडबंदर- जैसलपार्क 60 मीटर 30 मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे
  3. राष्ट्रीय महामार्ग समांतर घोडबंदर साई पॅलेस ते ठाकुर मॉलपर्यंत 30 मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे.
  4. मिरारोड पुर्व व पश्चिम यांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल व रस्ता बांधणे.

ब) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामे :-

  1. ठाणे येथील ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध रस्त्यांचे बांधकाम (23 रस्ते)

क) वसई विरार क्षेत्रातील कामे :-

  1. वसई विरार क्षेत्रातील रस्ते, खाडीवरील पुल व रेल्वे उड्डाणपुलांची कामे.
  2. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील 4 प्रमुख शहरे व सभोवतालच्या गावांना

जोडणारा 40 मी. रुंदीचा रिंगरोड विकसित करणे.

  1. वसई विरार शहर महानगर पालिका हद्‌दीतील 5 रेल्वे ओव्हर ब्रिज कामांचे बांधकाम.

ड)  रायगड जिल्ह्यांतर्गत अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची कामे:-

  1. रायगड जिल्ह्यांतर्गत अलिबाग तालुक्यातील 3 पॅकेज मधील रस्त्यांची कामे

इ)   कुळगांव बदलापूर नगरपरिषद :-

  1. कुळगांव बदलापूर केबीएमसी क्षेत्रामध्ये कात्रप ते बेलावली बदलापूर दरम्यान रोब बांधणे
  2. कात्रप पेट्रोल पंप ते खरवई जुवेली (बदलापूर बायपास – भाग-2) पर्यंत सीसी रस्त्याचे बांधकाम करणे

अंदाजित उत्पन्न रु. 36,938.69 कोटी असून, वित्तीय तूट रु. 3,248.72 कोटी इतकी आहे. ती अतिरिक्त जमीन विक्री, रोखे, शासनाचे अर्थसाहाय्य व वित्तीय संस्था कर्जाद्वारे भागविण्याचे नियोजनआहे.

अपेक्षित उपत्पन्नामध्ये :-

1)         राज्य शासनाकडून मिळणारे दुय्यम कर्ज – रू.  2,082.00 कोटी

2)        जमिनीची विक्री – रू. 7,344.00 कोटी

3)        कर्जाऊ रकमा –  रू. 22,327.35 कोटी

4)        इतर जमा रकमा – रू. 856.07 कोटी

5)        केंद्र महसूल –  रू. 305.27 कोटी

6)        शासनाचे अनुदान / विकास हक्क –  रू. 1,024.00 कोटी

7)        नागरी परिवहन (युटीएफ) – रू. 3,000.00 कोटी

यांचा समावेश असून याप्रमाणे एकूण रू.  36,938.69 कोटी उत्पन्न अपेक्षा असून, खर्च सुमारे         रू.  40187.49 कोटी असून त्याचा तपशिल खालीलप्रमाणे:-

1 ) प्रशासकीय खर्च – रू. 373.95 कोटी

2)  प्रकल्प देखभाल व संचालन खर्च – रू. 619.95 कोटी

3)कर्मचारी वर्गास अग्रोम व कजे – रू. 11.00 कोटी

4)कर्ज आणि अग्रीम – रू. 101.00 कोटी

5)सर्वेक्षणे / अभ्यास- रू. 336.65 कोटी

6) अनुदाने – रू. 299.75 कोटी

7) प्रकल्पावरील खर्च – रू. 35,151.14 कोटी

8) कर्जाऊ रकमा परतफेड – रू. 488.60 कोटी

9) कर्जाऊ रकमेवरील व्याज व इतर शुल्क – रू. 2,805.37 कोटी

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. 28 मार्च, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवर 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्यातून यशस्विपणे पार पाडू, असे प्रतिपादन जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी (कुंभमेळा) रवींद्र भारदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामनारायणदास महाराज, कपिलधारा कावनई, महंत कृष्णचरदास महाराज, महंत राजारामदास महाराज, महंत भगवानदास महाराज,  महंत नरसिंगाचार्य महाराज, महंत बालकदास महाराज,  पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री.महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची व सहकार्याची आवश्यकता आहे. प्रयागराज येथे झालेला कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर येथेही मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत 3 ते 4 पट अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी पावसाळ्याचा कालावधी असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षितेचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. कुंभ पर्वणी काळात महंत व भाविकांच्या स्नासासाठी नदीपात्रातील पाणी स्वच्छ व वाहते ठेवण्याच्या दृष्टीने पर्यायी पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळासाठी योग्य नियोजन व सुविधांसाठी आवश्यक जमिनी कायमस्वरूपी संपादित केल्या जातील. साधू-महंत यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असेही जलसंपदा मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.

यावेळी महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, रामसनेहीदास महाराज, राघवदास महाराज, सतीश शुक्ल यांच्यासह महंतांनी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने विविध सूचना मांडल्या.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीसाठी आलेल्या सर्व महंतांचे स्वागत केले.

नागरिकांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

अमरावती, दि. 28 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी 700 च्या वर निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. जनसंवाद  कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात येणार असून त्यासंबंधीची पोहोच पालकमंत्री कार्यालयातून येत्या आठ दिवसात देण्यात येणार आहे.

वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विषयावर सुमारे चार तास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुमारे सातशेच्या वर तक्रारी पालकमंत्री यांनी स्वतः स्वीकारल्या. पालकमंत्री  यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उमेदच्या महिला बचतगटांच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी – निलेश सागर

मुंबई दि. २८: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, एपिडा (APEDA) आणि एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त पुढाकारातून आज पंढरपूर तालुक्यातील शिवस्वराज शेतकरी महिला उत्पादक कंपनीचा शेवगा दुबई ला निर्यात झाला, त्याचा आज शुभारंभ कार्यक्रम कंटेनर ला अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला.
या कार्यक्रमासाठी उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राउत, एपिडा चे उप महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक मंजिरी टकले, संदीप जठार, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन प्रवीण वानखडे शिवस्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्ष व सर्व संचालक मंडळातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी निलेश सागर म्हणाले, “अभियानाच्या दृष्टीने आजचा दिवस मैलाचा दगड ठरणारा आहे, उमेद अभियानाच्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी आमची यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे, एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या मदतीने आणि एपिडा (APEDA) यांच्या मदतीने आज पहिला कंटेनर दुबईला जात आहे. दर्जेदार शेवग्याचे उत्पादन महिलांनी केल्यामुळे त्यांचा शेवगा आज निर्यात होत आहे. यापुढे राज्यभरातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील राहील. शेतमाल निर्यात करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर कोल्ड स्टोरेज ची व्यवस्था मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे वेगवेगळ्या विभागासोबत समन्वय करण्यात येईल” असे श्री सागर यांनी सांगितले.
अभियानाचे अतिरिक्त संचालक यांनी उमेद्च्या महिलांचा शेतमाल निर्यात होण्याच्या अनेक शक्यता असून खरेदीदार आणि महिला यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात येईल. आजच्या या उदाहरणामुळे राज्यभरातील ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. उमेद अभियानाच्या गरिबी निर्मूलनाच्या उद्दिष्टातून लखपती दीदी घडविण्याच्या प्रक्रियेचा आजचा टप्पा अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
एपिडा चे उप महा व्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी त्यांच्या विभागाकडून उमेद अंतर्गत ग्रामीण महिलांचा शेतमाल निर्यात होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण महिलांना त्यांच्या हक्काची अंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यापुढेही मदत सुरु राहील असे सांगितले
एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे चेअरमन प्रवीण वानखडे यांनी राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात शेतमाल बाहेरच्या देशात पाठविता येईल मात्र त्यासाठी शेतीमालाचा  दर्जा सुद्धा सर्वोत्तम असावा लागेल. भारतातील शेतीमालाला चांगली मागणी आहे,त्यासाठी चांगले निर्यातदार भेटणे आवशक आहे, या प्रकारचे निर्यातदार उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवस्वराज्य शेतकरी महिला उत्पादक गटाच्या अध्यक्ष श्रीमती कौशल्य शंकर जाधव म्हणाल्या की,आमच्या शेवग्याचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे आमच्या सर्व महिलांना खूप आनंद होत आहे, आम्ही आता आमच्या भागातील महिलांना निर्यात होऊ शकणाऱ्या शेती उत्पादनाचा आग्रह करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

नवीन महाराष्ट्र सदनात दंत व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

नवी दिल्ली दि. २८ : कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित दंत व नेत्रचिकित्सा शिबीराचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.

नवीन महाराष्ट्र सदनात ‘द केअरींग टच’ च्या सहकार्याने आज दंत आणि नेत्र तपासणीचे एक दिवसीय शिबीर महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आले.

याअंतर्गत महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, बांधकाम विभाग, विद्युत विभाग,महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तसेच सदनातील अन्य आस्थेपनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटूंबियांनीचीही नेत्र आणि दंत तपासणी मोफत करण्यात आली. यासबंधित काही समस्या असल्यास त्याची संपूर्ण माहिती तज्ज्ञाद्वारे देण्यात आली.

द केअरींग टच च्यावतीने दंत चिकित्सक डॉ. क्षितीजा भक्ते, दंत सहायक, नेत्र रोग तज्ज्ञ आदी उपस्थित होते.

या शिबीराचा लाभ सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सारीका शेलार, स्मिता शेलार या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.

00000

अंजु निमसरकर

संचालक दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज शुभेच्छा देण्यात आल्या. महासंचालक श्री. सिंह यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे,  संचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे तसेच महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी श्री. कांबळे आणि श्रीमती देशपांडे – पाटोदकर यांनी त्यांच्या सेवा कालावधीत महासंचालनालयाच्या कामकाजात भरीव योगदान दिले आणि अनेक विविध व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले, अशा शब्दात त्यांचा गौरव केला.

संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले की, श्री.कांबळे यांनी महासंचालनालयाच्या कामकाजात नवतंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केली आणि कार्यप्रणालीत नाविन्यता आणली. त्याचा लाभ महासंचालनालयाच्या कामकाजात झाला.

संचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांनी दयानंद कांबळे आणि मयुरा देशपांडे – पाटोदकर यांचे महासंचालनालयातील कामकाजातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक (प्रशासन) गोंविद अहंकारी यांनी देखील मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे आणि संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे-पाटोदकर यांनी सत्कार स्वीकारुन महासंचालनालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.

000

संजय ओरके/विसंअ/

राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. २८ :- चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून, जन सुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत

मुंबई, दि. २८ : मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले असून मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये बृहन्मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. ज्या पाणीपरवठा पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रेती आणि खडी जमा झाल्यामुळे पाईपलाईन अंशतः जाम झाली होते. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामध्ये पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
000

जिल्ह्यात ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्ड प्रमाणेच “मिलेट बोर्ड” स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे मिलेट महोत्सव पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी (करवीर) अरुण भिंगारदेवे, नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाडी आदी उपस्थित होते. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच मिलेट रॅलीमध्ये पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पाककला स्पर्धेत मिलेट पासून बनविण्यात आलेल्या पदार्थांची पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी चव चाखून पदार्थांचे कौतुक केले. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी केली. राधानगरी कृषी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ड्रोन व्दारे फवारणी करण्यात येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले.

जिल्ह्याच्या अर्थकारणाला समृद्ध करण्यात शेती आणि शेतकरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचा विचार करुन शेतीसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देवून पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, सध्याच्या फास्ट फुडच्या जमान्यात वरई, नाचणीला आपण विसरत चाललो आहोत. परंतु आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरात तृणधान्यांपासून विविध पदार्थ बनवून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या पदार्थांचा आहारात वापर वाढवावा. शेतकऱ्यांनी हेक्टारी 125 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध भागातील वातावरणाचा विचार करुन त्यानुसार विविध पिके घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. नाचणी, वरई सारख्या तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. आहारातील मिलेटचे महत्त्व पटवून देण्यात मिलेट महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून राज्याला दिशादर्शक ठरेल अशा भव्य कृषी महोत्सवाचे नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.

शेती पिकांवर फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कमी पाण्यात पूर्ण पिकांवर आधुनिक व समांतर पद्धतीने फवारणी केली जात आहे. यामुळे कमी कष्टात पैशाची व वेळेची बचत होत फवारणी होत आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा उपयोग करुन घेवून अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीवर भर द्यावा. यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी प्रास्ताविकातून मिलेट महोत्सवाची माहिती दिली. डॉ. योगेश बन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

दरम्यान मिलेटचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये मिलेट बाईक रॅली काढण्यात आली, याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

ताज्या बातम्या

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो...

0
मुंबई दि. १८: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ...

विधानसभा लक्षवेधी

0
सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणार-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई, दि. १८ :- सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन या...

राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

0
शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून...

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना...

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर...

0
मुंबई, दि. १८ : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासह महत्त्वाची १६ विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरामध्ये महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट...