शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 251

बॅनरवर नाही तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रम संपन्न

गावच्या विकासासाठी भरीव निधी ;ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली- वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे

जिल्हा वार्षिक नियोजनचे शंभर टक्के निधी खर्चा बद्दल दोन्ही मंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे केलं कौतुक

जळगाव दि. २९ : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गावचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे . त्यासाठी सरपंचासह सर्वांनी पुढाकार घेऊन मेहनत घेणे गरजेचे असते. बचत गटाच्या महिला अधिकाधिक सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी जिल्हाभर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सुसज्ज अशा मॉलचे निर्मिती करण्यात येत आहे. गावाचा विकास बॅनरवर नाही, तर जमिनीवर दिसला पाहिजे.” असं सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले.ते जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्यात बोलत होते. दिनांक 29 मार्च रोजी सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते.

यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजू मामा भोळे, आ. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकामांचे व घरकुल धारकांना जागा वाटप आदेश वितरण

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभरातील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवक यांना 45 ग्रामपंचायत भवन , 130 स्मशानभूमी बांधकाम, स्मशानभूमी पोहोच रस्ते अश्या विविध विकास कामांच्या योजनांच्या आदेश वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 कंत्राटी ग्रामसेवकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा भारातून सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या खुमासदार व मिश्कील शैलीत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याचा अहवाल क्रमांक राहिला आहे. यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेने मेहनत घेऊन कामे मार्गी लावली आहे. गेल्या कालावधीत जळगाव जिल्ह्याने शाळांना संरक्षक भिंत ही अभिनव योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यातील जवळपास 500 शाळांमध्ये आपण संरक्षक भिंत उभारून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देऊ शकलो आहोत. पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या ग्रामपंचायतीची इमारत नसेल अशा ग्रामपंचायतींना सुसज्ज अशी 45 इमारती आपण मंजूर केल्या आहेत. यासाठी उत्कृष्ट इमारती उभ्या राहाव्यात म्हणून ग्रामपंचायतिना बक्षीसाची योजना देखील आपण केली आहे. या गावात ग्रामपंचायतीची इमारत सुंदर असेल ते गाव विकसित असते अशी त्याची ओळख निर्माण होते. गाव सुंदर करायचे असेल तर त्यासाठी सरपंचांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावात देखील ‘जो काम करेगा वही गाव पे राज करेगा’ अशीच भूमिका येणाऱ्या काळात ग्रामस्थांनी घेणे गरजेचे आहे.. आमदार होणे सोपे असते मात्र कमी लोकांमधून निवडून येऊन सरपंच होणे कठीण असतं त्यामुळे निवडून आलेल्या सर्व सरपंचांवर देखील मोठी जबाबदारी आहे. असेही ते यावेळी म्हणाले.:ग्रा मपंचायतीच्या अनेक किस्से मिश्कीलपणे त्यांनी मांडून उपस्थितांचे मन जिंकली.

सरपंचानी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते.- मंत्री गिरीश महाजन

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्राम पातळीवर सरपंच आणि सदस्यांनी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते. त्यासाठी सरपंचांनी इतर कामात गुंतून न राहता गावच्या विकासाचा विचार केला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पावले उचलत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. या पुढच्या काळात एकही कुटुंब स्वतःच्या घराशिवाय राहणार नाही या दृष्टीने सरपंचांनी पुढाकार घेऊन घरकुल योजना अधिक व्यापक केली पाहिजे. ग्रामसेवक व सरपंचांमध्ये समन्वय समन्वय ठेवून स्वच्छ गाव – सुंदर गाव करण्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली; – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मंत्री सावकारे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगत सांगितले की पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कामे मिळणार असल्याने ग्रामपंचायतींना चांगल्या दर्जाची कामे आपल्या गावात करून घेता येणार आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली असून गावच्या विकासाला पुढे नेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे देखील यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्री ग्राम ग्रामपंचायत विकास योजना यासंदर्भात माहिती देत ग्रामपंचायतीने या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कार्यक्रमाचा उद्देश व योजनेची व्याप्ती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक हर्षल पाटील यांनी केले.
जिल्हा वार्षिक नियोजनचे शंभर टक्के निधी वितरणाबद्दल दोन्ही मंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे केलं कौतुक
जिल्हा वार्षिक नियोजनाचा शंभर टक्के निधी त्या त्या प्रशासकीय विभागाच्या विकासकामासाठी वितरित झाला. हे सातत्य जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे असून याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या कामाचे कौतुक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

0000

नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो;सामाजिक ऐक्यासह बंधुत्व अधिक दृढ होवो-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.२९ : वसंत ऋतूच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा हा नवचैतन्य, नवनिर्मिती, नवउत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी जनतेच्या जीवनात भरभराट, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्वपूर्ण सण आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गावातून-शहरातून शोभायात्रांचे आयोजन करून मराठी माणूस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हे मराठी नववर्ष राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देवो, सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. नव्या संकल्पांनी प्रेरित होऊन आपण सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने योगदान देऊया. आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अधिक बळकट, समृध्द, संपन्न करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

***

गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २९: गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी अशीच उंच आणि डौलाने उभारूया असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घराघरांत उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे.  हा सण सामान्यांच्या जीवनात नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा घेऊन येवो. सर्वांना समृद्धी आणि यश प्राप्त होवो उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रगतीशील राज्य असून नवनव्या संधीना गवसणी घालण्याची राज्याची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपला महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, अशी मनोकामना व्यक्त करतानाच नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान बाळगण्याचे, आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि पाणी, हवा यांचे प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.

००००

समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण

मुंबई,दि.२९: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष सन२०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एमबीए एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून अवांछित कॉल (स्पॅम कॉल) च्या माध्यमाद्वारे उमेदवारांना गैरप्रकारे पर्सेंटाईल वाढवून देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींची तातडीने दखल घेवून एफआयआर दाखल केला आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे. परंतु याबाबत काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित नाही असे संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांना बळी पडू नये आवाहनही सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याकरीता विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशपत्राची पडताळणी क्युआर कोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांचे फेशल रेकग्नीशन (चेहरा पडताळणी) बायोमॅट्रीक उपस्थिती घेण्यात येणार आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून सदर प्रक्रीयेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सीईटी कक्षात देखरेख करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये पर्यवेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षकांना बॉडी कॅम उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षे दरम्यान कोणताही गैरप्रकार होवू नये याची दक्षता घेण्यात येत आहे.

तसेच उमेदवाराची पडताळणी त्यांनी सोबत आणलेल्या मुळ ओळख पत्रावरुन उदा. आधार कार्ड पॅन कार्ड पारपत्र इत्यादी करण्यासाठी गट-अ शासकीय अधिकाऱ्यांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय स्तरावर सहसंचालक तंत्रशिक्षण यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षे दरम्यान परीक्षा केंद्रावर काही अडचण आल्यास सीईटी कक्षाशी समन्वय साधुन तातडीने दूर करण्याकरीता जिल्हा स्तरावर शासकीय संस्थांच्या प्राचार्यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रावर भरारी पथकामार्फत सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे.

या कार्यालयाच्यावतीने एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिनांक १व २ आणि ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० वा. दुपारी ०२.०० ते ४.३० वा. या दोन सत्रात महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील एकूण १७४ परीक्षाकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेस १.५७ लाख उमेदवार बसणार आहेत. परीक्षा केंद्र व आजुबाजूच्या परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्तथेचे योग्य नियोजन करुन परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याकरीता अपर मुख्य सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनी पोलिस आयुक्त पोलिस अधिक्षक यांना परीक्षा केंद्रावर योग्य ती पोलिस सुरक्षा पुरविण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही भुलथापांना बळी नये विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आवाहन करण्यात आले आहे.
00000

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरण- अॅड.माणिकराव कोकाटे

मुंबई, दि.२९: राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी दिली.

कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६००० रूपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन २०२३-२४ पासून राबवण्यात येत आहे.या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रती वर्ष, प्रती शेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकदा १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे. प्रधान मंत्री यांच्या हस्ते दिनांक २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे.

आजअखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ५ हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते माहे डिसेंबर २०२४, ते माहे मार्च, २०२५ या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वितरण सोहळयामध्ये राज्यातील एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम १९६७.१२ कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे. या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत एकूण ६५,०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे. त्यानुसार राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे २१६९ कोटी रुपये लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे.

00000

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई,दि.२९: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वानी नव्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन करतो व गुढीपाडवा तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील सर्वांना  शुभेच्छा देतो. नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

0000

विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २९:– महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आणि उद्योजकता, व्यापार – उदीम अशा सर्वच क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो. सर्वांकरिता सुख- समृद्धी, समाधान आणि भरभराटीचे क्षण घेऊन येवो, अशी मनोकामना देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी खंडप्राय भारतवर्षाचे वैभव वृद्धिंगत करण्याचा कळसाध्याय रचला. त्यांच्याकडून प्रखर राष्ट्रभक्ती- स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळाली. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र आज शेती- सिंचन, शिक्षण – आरोग्य, उद्योग – गुंतवणूक, ऊर्जा – तंत्रज्ञान यांसह सामाजिक न्याय, महिला सबलीकरण तसेच साहित्य- कला- क्रीडा आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर आहे. या वाटचालीत अनेक थोरांचे, धुरिणांचे योगदान आहे. त्यांनी दिलेला हा राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न – संकल्प साकार करण्यात विकसित महाराष्ट्र म्हणून वाटा उचलायचा आहे.

त्यासाठी आपल्याला एकजूट आणि निर्धार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे नववर्ष निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विकासाच्या संकल्पना, सामाजिक न्यायाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वकांक्षी प्रकल्प साकारण्यासाची ऊर्जा घेऊन येईल अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील तरूणांच्या उद्योग – व्यवसायातील नवसंकल्पना, शिक्षण – तंत्रज्ञान आणि संशोधनांच्या पंखात भरारीचे बळ लाभावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य, पशुधनाची समृध्दी आणि भरभराट घेऊन येवो, निसर्गाची कृपा घेऊन येवो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

0000

वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महंत रामगिरी महाराज, पुरुषोत्तम मोरे, माणिक मोरे, अक्षय महाराज भोसले तसेच वढू ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा  विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले,  राज्य शासन हे लोककल्याणकारी आहे. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून जनकल्याणाचा संकल्प शासनाने केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या. तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट किल्ले हे आपले धरोहर आहेत. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येईल. गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले,  मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट वे ऑफ इथे साजरी करण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे.

वढू गाव हे महाराष्ट्राचे उर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे, असे सांगून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल. गोरक्षकांचे काम करणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महंत रामगिरी व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार मांडले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महंत  रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्म रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला ग्रामस्थ तसेच शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन

पुणे, दि. २९: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री नृसिंह यांची कर्पूर आरती आणि महा आरती केली. तसेच श्री लक्ष्मींचे दर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुजारी प्रसाद दंडवते यांनी पूजा केली.

प्रदक्षिणावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय कुमार वांकर, डॉ. प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले.

यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे आदी उपस्थित होते.

0000

सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक –  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर, दि. २९ – वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.

मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता तामिळनाडू, झारखंड या राज्यात तसेच नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया, सिकलसेल या आजारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली.गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना पदवीप्रदान

दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीची विद्यार्थीनी  डॉ. जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित यांना द्वितीय तर  डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय  क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि  रोख पारितोषिक दिले गेले. यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक, अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

 

0000

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...