मुंबई, दि. 8 :- “मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, महाराष्ट्राच्या हितरक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. लालबाग, परळ भागातल्या वास्तव्यामुळे मुंबईतील कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आस्था होती. शिवसेनेचा आणि कामगार चळवळीचा उत्कर्षाचा काळ त्यांनी जवळून अनुभवला होता. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी सर्वस्पर्शी विपुल लेखन केलं. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
शासकीय आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके
◆ विद्यार्थ्यांशी साधला संवाद
◆ आश्रमशाळेतील सोई-सुविधांची केली पाहणी
यवतमाळ, दि.७ (जिमाका) : ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, बोटोणीच्या सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेत आगमण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना त्यांनी आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकतांना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होते, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्याचा आदिवासी विभाग नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देणारा विभाग बनवू, असे डॉ.ऊईके यावेळी म्हणाले.
राज्यातील ४९७ आश्रमशाळांमध्ये, लोकप्रतिनिधी, अधिकारी मुक्कामी
आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या सर्व ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुक्कामाला आहे. अनेक ठिकाणी आदिवासी खासदार, आमदार यांनी देखील मुक्काम केला. बोटोणी येथील आश्रमशाळेतूनच डॉ.ऊईके यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये मुक्कामी असलेल्या खासदार, आमदार व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोजन, निवास व सोई-सुविधांची पाहणी
विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री डॉ.ऊईके यांनी रात्री वसतिगृहातील स्वयंपाकघर, धान्यसाठा गृह, विद्यार्थी व विद्यार्थीनींची निवास व्यवस्थेची पाहणी केली. आश्रमशाळेत तयार झालेले भोजन विद्यार्थ्यांसह पंगतीत बसून घेतले. विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ, कोलामी नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे मंत्री डॉ. उईके यांनी कौतूक केले.
जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता
मुंबई, दि. ७: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.
वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकूण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.
वाहनांचे प्रदूषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
000
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी
मुंबई, दि. ७ : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.
वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.
000
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई, दि. ७ : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार- मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये २ लाख असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
मराठी भाषा मंत्री सामंत यांनी बीकेसी येथे पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात या पार्श्वभूमीवर यंदापासून हे पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया समोर दिमाखदार सोहळ्यात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी नामवंत साहित्यिकांची समिती नेमण्यात असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाङमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नसल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नसल्याची माहीती यावेळी देण्यात आली. तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना घोषित करण्यात आला आहे. या प्रौढ वाङमय प्रकारातील प्रत्येक पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख आहे.
वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे.
वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नसल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे.
वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला असल्याचे मराठी मंत्र्यांनी घोषित केले. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.
या दिमाखदार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचबरोबर २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचे ‘कवितांचे गाव’ म्हणून उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले.
त्याचबरोबर रत्नागिरी येथील कवि केशवसूत यांच्या मालगुंड यास ‘पुस्तकाचे गाव’ करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे मराठी भाषा मंत्र्यांनी जाहीर केले. कवितांचे गाव या संकल्पेनुसार शिरवाड गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय निर्माण करून तेथे कवितांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे आणि ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पेत गावातील ३५ घरांमध्ये प्रत्येक एक हजार नवी कोरी पुस्तके ही लहान मुले, युवक आणि प्रौढांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.
मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.
२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ
जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता
मुंबई, दि. ०७: केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.
वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
०००
निलेश तायडे/विसंअ