सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 246

मुंबई उपनगरातील कुपोषित बालकांसाठी उपाययोजना निश्चित कराव्यात – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ३ : मुंबई उपनगरसारख्या प्रगत जिल्ह्यात तपासात कुपोषित बालके आढळणे, ही बाब चिंताजनक असून यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना निश्चित करून पुढील १० दिवसात अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

अंगणवाडी सेविकांच्या प्राथमिक पाहणीत १६,३४३ कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आल्याने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह महिला व बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील एकात्मिक बाल विकास सेवा विकास यंत्रणेच्या पोषण ट्रॅकर अॅपवर फेब्रुवारी २०२५ मध्ये एकूण २ लाख ३८ हजार ९४ बालकांची नोंद घेतली गेली. यातील २ लाख ३४ हजार ८९६ बालकांची वजन आणि उंची मोजण्यात आली. यानुसार अंगणवाडी स्तरावर वजन आणि उंची नोंदीत पोषण ट्रॅकर अॅपवर अतितीव्र कुपोषण म्हणून २ हजार ८८७ तर मध्यम तीव्र कुपोषण म्हणून १३ हजार ४५७ बालकांची नोंद झाली.

नोंद झालेल्या अति तीव्र आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामधून १,१५९ बालके तीव्र तर ३,०९६ मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे निष्पन्न झाले. तर माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये अतितीव्र कुपोषित ४५० आणि मध्यम तीव्र कुपोषित ४०७ बालके आढळली. या संख्येचे अधिकृत प्रमाणिकरण करण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणीला गती देण्याचा प्रयत्न सुरू असून तपासणीअंती आढळणाऱ्या सर्व तीव्र कुपोषित बालकांसाठी लवकरच अधिक शहरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

000

संजय ओरके/विसंअ/

राज्यपालांनी घेतला एचएसएनसी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा

मुंबई, दि. ३ : मुंबई येथील हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.हेमलता बागला यांनी आज राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमोर राजभवन येथे विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले.

यावेळी कुलगुरु डॉ. बागला यांनी राज्यपालांना विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंट व रोडमॅपची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठातर्फे होत असलेली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना कार्यानुभव तसेच आंतरवासितेच्या संधी प्रदान करणे, याबाबत मार्गदर्शन केले. परदेशी विद्यापीठांशी सहकार्य, अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा निर्माण करणे, विद्यापीठ परिसर ड्रगमुक्त करणे व स्वच्छ भारत अभियान राबविणे तसेच क्रीडा विकासाला चालना देणे आदी विषयांचा आढावा घेतला व विद्यापीठाला यथायोग्य सूचना केल्या.

सन २०२० साली स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठामध्ये के. सी. महाविद्यालय, एच. आर. महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा समावेश आहे.

0000

 

मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजीप्रवेश ॲप’वर नोंदणी करा

मुंबई, दि. ३ : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारीत प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना १ एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालय बाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षा विषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र परिधान करावे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे.

ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिली रिपब्लिकचे अध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट यांनी घेतली भेट

मुंबई, दि. 3 : चिली रिपब्लिकचे अध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन विविध क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली. 

ताज हॉटेल येथे झालेल्या या सदिच्छा भेटीवेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भारताच्या चिली येथील उच्चायुक्त अभिलाषा जोशी, चिली रिपब्लिकचे शिष्टमंडळ, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (पणन) डॉ. राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, परराष्ट्र मंत्रालय संचालक विनय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे व संबंधित उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी, पणन, उत्पादन क्षेत्र त्याचप्रमाणे माध्यमे, तंत्रज्ञान, ‘एआय’ यासह विविध क्षेत्रात असलेल्या भविष्यातील संधी आणि या क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात पूरक वातावरण असल्याचे सांगून त्यादृष्टीने संयुक्तपणे काम करण्याची संधी असल्याचे सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या उद्योग भवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आज मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले.

यावेळी पालकमंत्र्यांह मृद व जलसंधारण विभागाचे नागपुर येथील मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे, अमरावती येथील अधिक्षक अभियंता श्री.निपाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे यांच्यासह विभागाचे सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री श्री.राठोड यांनी संपुर्ण कार्यालयाची पाहणी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयाची मांडणी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान केले. मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री व राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे विभागाची शहरात स्वतंत्र चांगली ईमारत उभी राहू शकेल का? याबाबत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.

जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची अनेक कामे सुरु आहे. या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कामांसाठी लागणार निधी देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध कामांबाबत यावेळी त्यांनी चर्चादेखील केली.

प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालय तर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे असलेच पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. 3 ( जिमाका):- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. या दोन्ही कामांसाठी नियोजन समितीच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नियोजन समिती सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजू खरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,  निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था झालेली दिसून येते परंतु जिल्हा परिषद व अन्य राज्यस्तरीय शासकीय कार्यालय तसेच जिल्हा तालुका स्तरावरील तसेच गाव पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तात्काळ करून घ्यावी यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियोजन समितीला प्रस्ताव पाठवावे. उत्तर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रत्येक वर्ग खोलीमध्ये बसवण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे सीसीटीव्ही फुटेज पाहता येईल अशी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. यासाठी आवश्यक तेवढा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत प्रशासन काम करत आहे परंतु शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा दिल्या गेल्या पाहिजेत. तसेच कृती आराखड्यात अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा जाहीर केलेले आहे त्याप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी विशेषता गावपातळीवरील ग्रामसेवक व तलाठी नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होतात का यावर योग्य नियंत्रण ठेवावे असे सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयापर्यंत ही ऑफिस प्रणाली सुरू करावी. सन 2024-25 मध्ये नियोजन समिती वरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना सहा कोटी तर जिल्हा शल्य चिकित्सक यांना सात कोटीचा निधी औषधी खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला होता. संबंधित आरोग्य यंत्रणेंनी औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे की नाही याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्वरित तपासणी करावी असेही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत का?  व शौचालय आहेत का याची तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी पुढील एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात त्यानंतर आलेल्या कामांच्या याद्यावर विचार केला जाणार नाही याची संबंधित यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पंढरपूर देवस्थान विकास आराखड अंतर्गत 73 कोटी 45 लाखाचा निधी मंजूर होता त्यानुसार विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धन कामे आषाढी वारी पूर्वी पुरात्व विभागाने पूर्ण करून घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली. तर दर्शन मंडप व  स्काय वॉक, श्री संत नामदेव महाराज स्मारक श्री महात्मा बसेश्वर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक नियोजन विभागाने आयोजित करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

टंचाईच्या परिस्थितीनुसार जिल्ह्याची सद्यस्थिती माहिती घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना टंचाईच्या काळात कोणालाही पाण्याची कमतरता पडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी सूचना करून एखाद्या गावातून पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मागणीप्रमाणे तात्काळ तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे टँकरला मंजुरी द्यावी असेही त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील 11 गावांना पाणीटंचाई जाणवत असून त्या ठिकाणी टँकरची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित तपासणी करून पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

नियोजन समितीतून घेण्यात आलेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा –

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 2025 सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला अकरा वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्या वाहनांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकार्पण केले. तर महसूल विभागाला देण्यात आलेल्या शासकीय वाहनांचे लोकार्पणही नियोजन समिती परिसरात पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत  ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी कौशल्य  विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांची सहमती

सिंगापूरचे वाणिज्य दूत  ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत श्री.फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.

युवकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पात प्रशिक्षणाची संधी

जगभरातल्या उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाचा सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन  सर्व्हिसेस ( ITEES ) या संस्थेत समावेश असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची संधी, तिथले आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, AI तंत्रज्ञान तसेच औद्योगिक व्यवस्था आणि सेवा याबाबतच्या प्रशिक्षणाची संधी या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या युवकांना मिळणार आहे.

जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षणाबाबत लवकरच सामंजस्य करार

सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात. याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या युवकांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे.  सिंगापूरचे वाणिज्य दुतचे ओंग मिंग फुंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश

रस्ते सुरक्षेसाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करावी

मुंबई, दि. ३ : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या १०० दिवस आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण करतांना त्याचे पुढील पाच वर्षाचे व्यवस्थापन संबंधित पुरवठादार कंपनीला देण्यात यावे. इमारतीवरील सौर पॅनलची स्वच्छता ठेवण्यात यावी. शासन साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या सौर उर्जेवर आधारित पंपांना अनुदान देत आहे. ज्या ठिकाणी बूस्टर पंपाची आवश्यकता आहे, तिथे बूस्टर पंपही देण्यात येतील.

शिक्षण हमी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत सूचित करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आरटीई’ अंतर्गत विहित अंतरातील मर्यादेत प्रवेश देताना प्रथम शासकीय शाळांना प्राधान्य देण्यात यावे. रस्ते सुरक्षितता महत्त्वाची आहे. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यात यावी. या प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रभावीपणे थांबविणे आणि अपघातप्रवण स्थळे दुरुस्त करणे सोयीचे होईल.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये इमारत बांधकामाबाबत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी इमारत नियोजन व्यवस्थापन यंत्रणा (बीपीएमएस) प्रभावीपणे कार्यान्वित करावी. यामुळे मुंबईचे जागतिक दर्जा स्थान सुधारण्यामध्ये आणखी मदत होईल. विकास हक्क हस्तांतरण प्रक्रियेमध्ये ऑनलाइन सुविधा देण्यात यावी. यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ई- टीडीआर सुरू करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत हिरव्या आणि पिवळ्या रंगातील मुद्द्यांवर विभागांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येत्या एक मे पर्यंत अपूर्ण असलेल्या लाल रंगातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून कामे पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस आराखड्यातील घेतलेली कामे, पूर्ण झालेली कामे व अपूर्ण कामे कारणांसह ‘पब्लिक डोमेन’ मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एसटी महामंडळाने स्वतःचे जाहिरात धोरण तयार करावे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढेल. शंभर दिवसांच्या आराखड्यामुळे नागरिकांना गतिमान सेवा मिळत आहेत. अशाच पद्धतीने भविष्यातही विभागांनी विहित कालमर्यादा आखून कामे पूर्ण करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

या बैठकीत एकूण २२ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी ४४ टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झाले आहे. तसेच ३७ टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. १९ अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.14 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी  देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतील. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी, पोलिस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनासह योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या 134 व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महानगरपालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी.

चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करावी. त्यामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारावेत. उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असावी. दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण करावे व त्यासंदर्भात जागोजागी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, ‘लोकराज्य’ चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिद्धी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ३ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य संजय खोडके यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सह सचिव नागनाथ थिटे, उप सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र घाडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

000

ताज्या बातम्या

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

0
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8...

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटिबद्ध : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि.21जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): शासनाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत शालेय स्तरावर अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व प्रयोगशीलता...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

0
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व...

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...