गुरूवार, जुलै 3, 2025
Home Blog Page 24

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी, सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे, तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी, अशा सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, कृषी, पाटबंधारे, आरोग्य व अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच तालुका स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकाशी मोबाईलद्वारे जोडा

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी सांगितले की, प्रत्येक माणसाकडे मोबाईल आणि इंटरनेट असले पाहिजे. त्यातूनच प्रशासन थेट नागरिकांशी संवाद साधू शकते. प्रत्येक नागरिकाचा मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवा व त्यांना आपत्तीपूर्व सूचना वेळेवर द्या. टेक्नॉलॉजीमुळे सामान्य नागरिकही जगाशी जोडले जातात आणि त्यांची आर्थिक व बौद्धिक प्रगती घडते, हे लक्षात घेत विकसित गडचिरोलीसाठी जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांना मोबाईल व इंटरनेट सुविधा देण्याचे लक्ष्य ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपत्तीची व्यापक तयारी ठेवा

आपत्ती व्यवस्थापनासाठी खरेदी केलेले साहित्य कुठे व कसे ठेवले आहे, त्याचा वापर यंत्रणेला झाला आहे का, साहित्य खराब होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे का अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. आपत्ती केवळ पूरपुरती मर्यादित नसून आग, भूकंप यांसारख्या अन्य आपत्तींचाही विचार करून आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्धतेबाबत नियोजन  करण्याचे त्यांनी सांगितले.

रेड आणि ब्लू लाईन सर्व्हेची आवश्यकता

पूर परिस्थितीत धोका असलेल्या झोनमध्ये किती घरे आहेत, याचा डाटा मिळावा यासाठी रेड आणि ब्लू लाईन सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नदीकिनाऱ्यावर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना स्थलांतर करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे देण्याचे त्यांनी सुचविले. पुढील वर्षी एकही घर नदी पात्रात राहणार नाही, हे सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

लहान लहान नाल्यात खेळताना मुले पाण्यात वाहून गेल्याच्या दुर्घटना घडतात अशा ठिकाणी जनजागृती करण्याची त्यांनी सांगितले.

आरोग्य, वीज, संपर्क व प्रसार यंत्रणा सज्ज ठेवा. गरोदर महिलांना सेवा मिळावी यासाठी संपर्कतुटलेल्या गावांत वैद्यकीय पथके नियुक्त करावीत. पूरस्थितीत ‘एअर ॲम्बुलन्स’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेवापुरवठादारांशी करार करावेत. मलेरिया व बालमृत्यू टाळण्यासाठी मच्छरदाणी, औषध फवारणी, व जाळी बसवण्यावर भर द्या. पावसाळ्यात ब्लिचिंग पावडरचे वितरण करा. लाईनच्या बाजूच्या झाडांची छटाई करून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपाय करा, २४ तासांत वीज रिस्टोरेशनची हमी ठेवा.

बोगस डॉक्टरांवर कारवाई

बोगस डॉक्टरांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

वनक्षेत्रातील रस्त्यावरील पूलांना वेगळ्या परवानगीची गरज नाही

पावसाळ्यात रस्ते बंद होऊन नागरिकांचे प्राण धोक्यात येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व राष्ट्रीय महामार्ग यंत्रणांनी रस्त्यांची निगा राखावी, अन्यथा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. रस्त्यावरील पूल रस्त्याचाच भाग असल्याने पूल बांधकामासाठी वनविभागाची परवानगी मागणे चुकीचे आहे, असा स्पष्ट उल्लेख करत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जास्तीत जास्त रस्ते मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अलर्ट मोडवर प्रशासन : आपसी समन्वय आवश्यक

सर्व प्रशासनाने अलर्ट मोडवर राहावे, आपसी समन्वय ठेऊन आपत्तीपूर्व, आपत्ती कालीन व नंतरच्या उपाययोजनांची रूपरेषा तयार ठेवावी, असे आवाहन करत जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा सहपालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची माहिती दिली यावेळी विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

नवी दिल्ली, 23 भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. 18 ते 20 जून 2025 या कालावधीत रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.

सानवी ही पोदार इंटरनॅशनल स्कूलभुसावळ येथील इयत्ता 6 वी मधील विद्यार्थीनी असून ती आंबेडकर नगरभुसावळ येथे राहते. तिने आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी थायलंडच्या खेळाडूंना मागे टाकत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके पटकावली आहेत. तिच्या या कामगिरीचा भुसावळसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान असून सानवीच्या यशामागे तिचे कठोर परिश्रम तर आहेचपण तिचे प्रशिक्षक पीयूष दाभाडेदीपक सोनार सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि तिची आई ज्योती सोनवणे व वडील डॉ. आनंद सोनवणे यांचे सातत्याने दिलेले प्रोत्साहनही कारणीभूत ठरले. सानवीच्या पालकांनी तिला खेळात करिअर करण्यासाठी सर्वतोपरी साथ दिली आहे.

 मागील वर्षी सानवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करत 1 सुवर्ण व 2 रौप्य पदके मिळवली होती. तिच्या या उल्लेखनीय यशासाठी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेतसेच केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तिला प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.

सानवीच्या या यशामुळे देशातील इतर युवक-युवतींनाही प्रेरणा मिळत असूनतिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

000000000000

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी / वृत्त विशेष  –134

मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

मुंबई, दि. २३ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये ९००-मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. प्रवेशासाठी विहित पात्रता आवश्यक आहे. या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून, वसतिगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा.

या वसतिगृहात ११ वी व आय. टी. आय. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी ५५ टक्केपेक्षा जास्त गुण असावेत. विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. गृहपाल, मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटी, सर्वोदय नगर मुलुंड, मुंबई-४०००८० येथे हे वसतिगृह आहे.

****

 

शैलजा पाटील/विसंअ/

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२५-२६ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापक, शासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे.

या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर(पू) मुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

शाश्वत शेतीसाठी प्रयोगशील शेती आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई दि. 23 : शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देऊन प्रयोगशील शेती करणे आवश्यक आहे. फळपिकाची लागवड करताना त्या-त्या पिकानुसार कोणते संरचनात्मक तंत्रज्ञान वापरावे आणि त्याचा उत्पादनावर काय परिणाम होईल याचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या तांत्रिक निकषाबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, द्राक्ष, संत्र, आंबा, केळी, डाळिंब, अंजीर या फळपिकांचे उत्पन्न आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्लास्टिक अथवा कपड्याचे पॉलीनेट वापरण्याचा परिणाम प्रत्यक्ष शेतावर जाऊन तपासावा. रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीचा परिणाम गुणवत्ता व उत्पादनावर कसा होतो. याबाबत कृतीशील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अनुभवाच्या आधारे अभ्यासपूर्वक अहवाल सादर करावा. शेती संशोधनाच्या दृष्टीने तांत्रिक दृष्टीकोन महत्वाचा असून, यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही सुधारता येईल, असेही त्यांनी सांगितले.

शाश्वत शेतीसाठी प्रयोगशील शेती करणे गरजेचे आहे. शासन द्राक्ष बागांना क्रॉप कव्हर तसेच डाळिंब फळपिकाला एन्टी हेलनेट कव्हर देत असून, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत आहे. याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.

बैठकीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक दत्तात्रय काळभारे, तंत्रसल्लागार सचिन मोरे, राहुरी शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंग्रे, यांच्यासह संग्राम विभुते, नामदेव पाटील, चेतन डेडीया, श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.

 

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

समाधानी समाजाची निर्मिती संवादातून – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई, दि. 23 : भगवान महावीरांनी सांगितलेले ‘संवादातून समाधानाकडे’ हे तत्व आजच्या काळात सर्वाथाने उपयुक्त आणि आवश्यक आहे. कारण सशक्त संवादातून समाधानी समाजाची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

महाविरायतन फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘संवाद से समाधान- एक परिचर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, महाविरायतन फाऊंडेशनचे देवेंद्र ब्रम्हचारी  यांच्या सह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, कोणत्याही प्रश्नाचे, समस्येचे निराकरण, पर्याय हा संवादातून, चर्चैतून निघत असतो. जगात लोकशाही संकल्पनेसाठी भारत आदर्श मानला जात असून संवादातून समाधानाकडे या तत्वाचा समावेश लोकशाही संकल्पनेत आहे. आपल्या देशातील सांस्कृतिक, भाषिक, भौगोलिक विविधता या सर्वांना एकत्रित ठेवत यशस्वी वाटचाल करण्यात भारताच्या लोकशाही संकल्पनेचा निश्चितच खूप मोठा वाटा आहे. भारतीय संस्कृतीत लोकशाहीचे तत्व प्राचीन काळापासून अंर्तभूत आहे. देशातील विविध संस्कृती, पंरपंरा, विविधता यांना एकमेकांशी जोडण्याचे काम लोकशाहीमुळे शक्य झाले आहे. भारताने लोकशाही संकल्पनेच्या माध्यमातून मागील ७५ वर्षाच्या वाटचालीतून एक आदर्श निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे आपल्या देशाचे मूलभूत वैशिष्ट आणि संस्कृती ही लोकशाही आहे. सशक्त लोकशाही समाधानी संवादी समाजाच्या निर्मितीला पूरक वातावरण तयार करण्यात महत्वाची भूमिका निभावत असते. जगाचाही लोकशाही संकल्पना स्वीकारलेल्या देशांवर जास्त विश्वास आहे. लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो. त्यामुळे ग्रामपातळीवरील पंचायत पासून ते देशाच्या संसदेपर्यंत कोणत्याही प्रश्नावर, विषयावर चर्चेतून संवादातून मार्ग काढला जातो. भगवान महावीर यांचे तत्वज्ञान आजही उपयुक्त असून मनुष्याला मनुष्यत्वाकडे नेणारे विचार, सिद्धांत त्यांनी सांगितले जे आजच्या काळातही प्रासंगिक आणि उपयोगी ठरणारे आहेत. महावीरांनी सांगितलेले ‘जगा आणि जगू द्या’, अहिंसा, अपरिग्रह संयमव्रत, संवादातून समाधानाकडे यासह त्यांचे विविध सिद्धांत केवळ जैन समाजालाच नाही तर संपूर्ण मानवसमाजासाठी दिशादर्शक आहेत. संवादातून समाधानाकडे या तत्वाची आज जगाला गरज आहे. कारण जगातील विविध शंका, समस्या, चिंता, आव्हाने या सगळ्यांवर संवादातून समाधानकारक उपाय तोडगा निघू शकतो, असे श्री.बिर्ला यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भारत गौरव पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

0000

वंदना थोरात/विसंअ/

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

मुंबई, दि. 23 : भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग – इन – चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, (पीव्हीएसएम) (एव्हीएसएम), यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन परस्पर संवादाच्या अनुषंगाने झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लष्कराचे दक्षिण विभाग प्रमुख यांच्यात नागरी संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि माजी सैनिकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या भेटीदरम्यान लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव पी.अन्बलगन उपस्थित होते.

 

00000

अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई, दि. २३  : देशाच्या संसदीय लोकशाही रचनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या अंदाज समितीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अमृत महोत्सवी वर्षात संसदीय लोकशाहीतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनाच्या मूल्यांचा गौरव करण्याची  संधी आहे. असे गौरवोद्वगार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात काढले.

भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित देशभरातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास राज्यसभा उपसभापती हरिवंश, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जैसवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, सर्व राज्य, संघराज्य क्षेत्रांच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले,  दि. १० एप्रिल १९५० रोजी स्थापन झालेली संसदेची अंदाज समिती सार्वजनिक निधीच्या योग्य  वापरावर लक्ष ठेवते. समितीने आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक अहवाल सादर करून शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या शिफारशी देशाचे धोरण ठरविताना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

विशेष म्हणजे, १७ व्या लोकसभेत सादर झालेल्या ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ अहवालामुळे केंद्र सरकारने ईव्ही (इलेक्ट्रॉनिक वाहने) वरील करसवलती आणि रस्ता कर माफीसारख्या निर्णयांची अंमलबजावणीसुद्धा केली असल्याचे सांगत श्री. बिर्ला यांनी  अंदाज समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या सर्व सभापतींचे, पहिले लोकसभा अध्यक्ष जी. व्ही. मावळणकर यांचे स्मरण केले.  त्यांच्या दूरदर्शी नेतृत्व व वित्तीय शिस्तीच्या कार्याच्या गौरव केला.

संसदेतील आणि राज्य विधानमंडळांतील अंदाज समित्यांनी सार्वजनिक खर्चाचे प्रभावी परीक्षण करत प्रशासनाला कार्यक्षम आणि जनतेला जबाबदार बनवले आहे. समितीने भारतीय रेल्वेसारख्या क्षेत्रातील धोरणात्मक सुधारणा, शासकीय सचिवालयाच्या पुनर्रचनेसारख्या शिफारशी आणि लोकसेवांमधील परिणामकारकता वाढवणारे निर्णय यावर उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने या समित्यांची विश्लेषण क्षमता वाढवणे, सदस्यांचे कौशल्यवर्धन करणे आणि जनतेशी अधिक सुसंवाद साधणे या गोष्टी भविष्यातील कार्यासाठी आवश्यक असल्याचेही श्री.बिर्ला यांनी  यावेळी स्पष्ट केले.

या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र व राज्य समित्यांमधील सहकार्य वाढवून सर्वोत्तम शासकीय पद्धतींचा प्रसार करण्यासाठी विचारविनिमयाचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. डिजिटल साधनांचा वापर, डेटा विश्लेषण आणि लोकसहभाग यावर भर दिला जात आहे. यामध्ये  सर्वांनी कृतीतून लोकहितासाठी कार्य करावे. आणि लोकशाहीचा खंबीर आधारस्तंभ असलेल्या समित्या अधिक सक्षम करण्याचे आवाहनही श्री. बिर्ला यांनी यावेळी केले.

अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाही, तर ती अंतिम माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी प्रभावी यंत्रणा आहे लोकशाहीत या अंदाज समितीचे योगदान महत्वाचे असल्याचे    प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राक्कलन” हा शब्द संस्कृतमधून आलेला असून ‘पूर्वीची गणना’ म्हणजेच अंदाज होय. सरकारचे अंदाजपत्रक सादर होते, तेव्हा त्यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया असते. विभागांना निधी देताना त्यांच्या योग्य विनीयोगावर अंकुश ठेवणारी यंत्रणा असणारी  अंदाज समिती अत्यंत प्रभावी भूमिका बजावते. ही समिती केवळ शिफारसी करत नाही, तर ती सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासही भाग पाडते. महाराष्ट्रात अंदाज समितीच्या सुमारे 65 ते 70 टक्के पेक्षा अधिक शिफारसींची अंमलबजावणी होते, ही  अत्यंत सकारात्मक बाब आहे.

प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण करून शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा संस्कार घडवणाऱ्या समितीमुळे अचूक कामकाजाबाबत प्रशासनाला जाणीव राहते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अंदाज समितीमुळे लोकशाही व्यवस्था सक्षम होते. प्रशासनातील कार्यपद्धती तपासणे, धोरणांचे मूल्यांकन करणे आणि अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचतात का, हे पाहणे या समितीच्या माध्यमातून शक्य होते. समित्या सरकारवर अंकुश ठेवणारे माध्यम आहे. अधिवेशनाच्या बाहेरही या समित्या बाराही महिने काम करत असतात. यामुळे प्रशासन अधिक गतिमान होते.

या अमृतकाळात आपण सर्वांनी मिळून या समितीला अधिक सक्षम, प्रभावी आणि परिणामकारक कसे करता येईल, यावर विचार केला पाहिजे. भविष्यातील पुढील पिढ्यांसाठी आदर्श मानके निर्माण करण्याचे हे सुवर्णसंधीचे वर्ष आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे सुशासनाचे तत्त्व आजही आदर्श – सभापती प्रा. राम शिंदे

“सुशासन म्हणजे लोकहिताचा, न्यायाचा आणि संवेदनशीलतेचा समतोल राखणारी शासनव्यवस्था जेंव्हा-जेंव्हा सुशासनाची चर्चा होते, तेव्हा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव श्रद्धेने घेतले जाते. यावर्षी त्यांच्या जन्माचा त्रिशताब्दी वर्षप्रवेश असून, संपूर्ण देशभरात त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर पोहोचवण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या काळातही प्रेरणा घेण्यासारख्या अनेक बाबी आहेत,” असे प्रतिपादन  विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी चर्चासत्रात सांगितले.

लॉर्ड थॉमस लॉरेन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय विचारवंतांनी त्यांचे वर्णन ‘फिलॉसॉफर क्वीन ऑफ इंडिया’ असे केले. त्यांनी महिलांसाठी सैन्यतुकडी स्थापन करणे, शेतकऱ्यांना करमाफी देणे, विहिरी-तलावांच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, भूमापन आणि अभिलेख तयार करणे अशा अनेक प्रशासनिक सुधारणांद्वारे लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवली.

या अनुषंगाने ‘भिलकौडी प्रयोग’ हे सुशासन आणि संवेदनशीलतेचा अद्वितीय संगम असल्याचे उदाहरण पुढे आले. महाराणी अहिल्यादेवी यांनी भिल्ल समाजाला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. बदल्यात त्यांना ‘एक कौडी’ शुल्क ठरवले. या प्रयोगातून भिल्ल समाजाला रोजगार मिळाला आणि प्रवाशांना संरक्षण. सुशासन हे केवळ नियमांचे पालन नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांना समाविष्ट करून शाश्वत उपाय शोधणे आहे. ही भूमी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असून, त्यांनी संसदीय लोकशाहीला जबाबदारी, सहकार आणि नैतिकतेचे प्रतीक मानले. हे चर्चासत्र सुशासनाच्या परंपरेला चालना देणारे ठरेल, असा विश्वास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

अंदाज समितीच्या शिफारशींवर आधारित अर्थसंकल्प आर्थिक शिस्तीचा आणि सामाजिक विकासाचा – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

संविधान निर्मात्यांच्या दृष्टिकोनानुसार आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि लोककल्याणाच्या मूल्यांची अंमलबजावणी हे राज्यघटनेच्या सशक्त व्यवस्थेचा मूळ गाभा आहे. याचे प्रभावी माध्यम म्हणजे अंदाज समिती आहे. अंदाज समितीच्या शिफारशींवर आधारित अर्थसंकल्प आर्थिक शिस्तीचा आणि सामाजिक विकासाचा मार्गदर्शक असतो,  अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी अंदाज समितीच्या कार्याचा गौरव केला.

 

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या लोकाभिमुख राज्यव्यवस्थेला छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा दृष्टिकोन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संवैधानिक अधिष्ठानमुळे आज हीच परंपरा अंदाज समितीच्या कार्यातून पुढे चालत आहे. अंदाज समितीच्या अहवालाद्वारे शासनाच्या आर्थिक धोरणांचे सखोल विश्लेषण होते. या शिफारशींवर आधारित अर्थसंकल्प तयार करणे हे केवळ प्रशासनाचे कार्य नव्हे, तर ते सरकारचे संविधानिक व नैतिक कर्तव्य आहे.

राज्य आणि केंद्र सरकारांनी संतुलित, परिणामकारक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक योजना राबवताना संसदीय समित्यांच्या मार्गदर्शनाचा आधार घेतला पाहिजे. जनतेच्या गरजा लक्षात घेऊन जोखमींचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे नीट नियोजन यासाठी अंदाज समितीचे अहवाल दिशादर्शक दस्तऐवज ठरतात.

अंदाज समिती ही केवळ परीक्षण करणारी नाही, तर आर्थिक कार्यक्षमतेचे नियमन करणारी शक्तिशाली संसदीय रचना आहे. ही यंत्रणा निधीच्या वापरावर लक्ष ठेवत नाही, तर योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रित करते, असेही श्री. नार्वेकर म्हणाले.

विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंदाज समित्यांची भूमिका खूप महत्त्वाची

विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राक्कलन समितीचे (अंदाज समिती) काम खूप परिणामकारक ठरते. संसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गरीब कल्याण हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अजेंडा असून प्रत्येक रुपया हा गरिबांपर्यंत पोहोचलाच पाहिजे हे त्यांचे नेहमी सांगणे असते. अंदाज समित्या या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असतात. तसेच प्रशासनाची कार्यक्षमता, अर्थकारण आणि पारदर्शकता सुनिश्चित करतात. सध्या या समित्यांचा अमृतकाल असून देशाचीही प्रगती दुप्पट गतीने होत आहे.

संसदीय समित्या म्हणजे छोटी संसद किंवा छोटी विधिमंडळे असतात. या समित्या म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याचा आरसा आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  लोकशाही व्यवस्थेत आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता हे अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ असून अंदाज समिती हे एक अत्यंत सक्षम आणि प्रभावी संसदीय माध्यम आहे. आपल्या अंदाजपत्रकात अनेक गोष्टी असतात. घोषणा आणि  तरतुदीही असतात. या तरतुदींचा योग्य, ठराविक वेळेत आणि प्रभावी वापर होतोय की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरते आणि हीच जबाबदारी ही समिती पार पाडते असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशाचाही उल्लेख केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू करण्याआधी ‘आरबीआय’च्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा, अंदाजपत्रकातील तरतुदींचा, एफआरबीएम कायद्याचा पूर्ण विचार करून पाऊल उचलले. जनतेच्या व्यापक हितासाठी अशा योजना अत्यावश्यक असतात.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील ११ वर्षांच्या कार्यकाळात शासकीय कार्यात पारदर्शकतेचा आदर्श प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे अंदाज समितीचे कार्य सुलभ झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  एकीकडे आर्थिक पातळीवर सावध आणि कुशल राहून शिस्तीचे पालन करावे लागते तर, दुसरीकडे जनतेने निवडून दिलेल्या सरकारने जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणेही महत्त्वाचे असते. शेवटी लोकशाहीतील सरकार हे जनतेसाठीच असते असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अंदाज समितीच्या ईव्ही धोरणासह शिक्षण, आरोग्यासंदर्भात प्रभावी शिफारशी – अध्यक्ष संजय जैसवाल

सार्वजनिक निधीच्या पारदर्शक आणि जबाबदार वापरासाठी अंदाज समितीने सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आतापर्यंत या समितीने १ हजार ३३ अहवाल सादर केले असून, ईव्ही धोरणासह शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा आढावा घेऊन महत्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत, असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी केले. ते म्हणाले, १७ व्या लोकसभेतील ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण’ अहवाल सादर केल्यानंतर शिफारसीनंतर सरकारने ‘ईव्ही’वरील करसवलती लागू केल्या आणि रस्ता कर माफ करण्याबाबत अधिसूचना जारी केली. तसेच या समितीने कार्यपद्धतीतही सुधारणा केली आहे व १९६८ पासून नियमावली राबवली आहे. ही समिती कार्यक्षमतेसह प्रशासकीय सुधारणांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

अंदाज समित्यांचे योगदान धोरणात्मक निर्णयात  महत्त्वपूर्ण – अर्जुन खोतकर

लोकशाही व्यवस्थेत संसद आणि विधानमंडळांना सर्वोच्च स्थान असून, या संस्थांतील विविध समित्यांचे कामकाजही तितकेच महत्त्वाचे आहे. या समित्या लोकशाहीची मूल्य जपत धोरणनिर्मितीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. समित्या विधिमंडळातील संघटनेचे एकक असून प्राशसन आणि जनतेमध्ये दुवा म्हणून काम करतात. अंदाज समित्यांनी झुणका-भाकर योजना, ग्रामीण स्वच्छता योजना, पाठ्यपुस्तक संशोधन मंडळ, एकाधिकार कापूस खरेदी योजना यासारख्या महत्त्वाच्या धोरणांवर प्रभावी शिफारशी केल्या आहेत. या परिषदेतून सर्व सदस्यांना नव्या संकल्पना, अभ्यासाचे दृष्टिकोन आणि कार्यपद्धती मिळतील. अंदाज समित्यांनी अधिक सशक्त, सक्रिय भूमिका घ्यावी, हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे, असे अर्जुन खोतकर यांनी यावेळी सांगितले.

विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पोलीस बँड पथकाकडून सलामी देण्यात आली. महाराष्ट्रायीन पद्धतीने त्यांचे टिळा लावून औक्षण करण्यात आले. त्यानंतर संसद आणि सर्व राज्यातील विधानमंडळांच्या अंदाज समिती प्रमुख आणि सदस्यांचे एकत्रित समूह छायाचित्र काढण्यात आले. संसदेच्या अंदाज समितीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त  स्मरणिकेचेही  मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी प्रशासनात कार्यक्षमतेस व काटकसर साध्य करण्यासाठी अर्थसंकल्पीय प्राक्कलनावर प्रभावी देखरेख व पुनरावलोकनामध्ये प्राक्कलन समित्यांची भूमिका यावर दोन दिवसीय परिषदेत संसद व विविध राज्यांच्या प्राक्कलन समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सहभागी होऊन अनुभवांची देवाणघेवाण करणार असल्याचे सांगून आभार मानले.

०००

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 23 : सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) यांच्यात सामंजस्य करार झाला.

मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी व सीईजीआयएसचे सह-संस्थापक कार्तिक मुरलीधरन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पिंगळे, सल्लागार विनी महाजन, स्ट्रॅटेजी सल्लागार मुरुगन वासुदेवन, वरिष्ठ कार्यक्रम सल्लागार ओंकार देशमुख, वरिष्ठ कार्यक्रम सल्लागार तन्वी ब्रम्हे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मागोवा प्रणाली (ट्रॅकिंग सिस्टीम) उपयुक्त ठरणार आहे. ही प्रणाली सीएम डॅशबोर्डशी जोडण्यात यावी. या करारामुळे धोरणात्मक क्षमता वाढेल. तसेच क्षेत्रीय समन्वय सुधारून नागरिकांना अधिक प्रभावी व उत्तरदायित्व असलेली सेवा पुरविण्यासाठी मदत होणार आहे.

या कराराअंतर्गत सीईजीआयएस ही संस्था पुढील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध विभागांसोबत काम करणार असून धोरणे आणि अंमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयासाठी निर्णय सहाय्य प्रणाली  (डिसीजन सपोर्ट सिस्टीम) विकसित केली जाणार आहे. ही यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वॉररुमसाठी डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम करण्यासाठी मदत करणार आहे. या प्रणालीद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकषांच्या आधारे परिणामकारक लक्ष्य ठरवणे, माहितीतील विसंगती कमी करणे आणि नागरिकांच्या अभिप्रायाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यक्षम देखरेखीसाठी या प्रणालींचा उपयोग केला जाणार आहे.

‘सीईजीआयएस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय पिंगळे यांनी सादरीकरणाद्वारे कामाची माहिती दिली. ही भागीदारी परिणामाभिमुख आणि उत्तरदायित्व असलेली शासनव्यवस्था घडवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. आम्ही महाराष्ट्र शासनासोबत संस्थात्मक क्षमतेत वाढ, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि सेवा वितरणात सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्सुक आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.मुरलीधरन यांनी लिहिलेले Accelerating India’s Development हे पुस्तक भेट दिले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

मुंबई, दि. 23 : उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व अकृषी विद्यापीठे आणि सर्व संस्था यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा अभ्यास करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या संस्थेची निवड करण्यात आली होती. तसेच या अभ्यासासाठी संस्थेकडून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ.अजित रानडे, प्रा.अभय पेठे, विश्वनाथ गिरीराज, डॉ. विशाल गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीने आपला अंतिम अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

या समितीने प्रामुख्याने पुढील बाबींचा अभ्यास केला आहे. उच्च शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर कशा प्रकारे वित्तीय सहाय्यता प्राप्त होते, सद्य:स्थितीत राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना कशा प्रकारे निधी प्राप्त होतो. तसेच यातील असमानता व विसंतगी शोधणे, सर्व अकृषी विद्यापीठे व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा विद्यमान आर्थिक स्थितीविषयक अहवाल व तूट भरून काढण्यासाठी उपाय योजना, उच्च शिक्षणामध्ये भागिदारी व गुंतवणुकीतून आर्थिक सहाय्य उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे, पर्यायी वित्त पुरवठा मॉडेलचा संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेच्या प्रवेश क्षमता, गुणवत्ता, शैक्षणिक शुल्क तसेच संभाव्य परिणामांवर पडणारा अनुकूल प्रभावाची समिक्षा करणे.

हा अभ्यास करताना या समितीने राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी विद्यापीठांचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे, उत्पन्न वाढवण्याचे पर्यायी मार्ग, जमीन, पायाभूत सुविधा आणि बौद्धिक संपदांचे मॉनिटायझेशन करणे तसेच विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था यांचे शासनावरील अवलंबित्व कमी करण्याविषयी उपाययोजना सूचवल्या आहेत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज

0
राज्यात वाळू वाहतुकीसाठी काही अटींसह २४ तास परवानगी  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. ३  : राज्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि....

विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

0
छत्रपती संभाजीनगर दि.3 (विमाका): राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमा अंतर्गत तसेच प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान, अचूक व पारदर्शक करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 3 : शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची...

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

0
मुंबई, दि. 3 : कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती व अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात 40:50:10 या प्रमाणानुसार सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार 26 जिल्हा परिषदांमध्ये प्रक्रिया...