सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 23

‘वेव्हज्’ मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचा मंच – शाहरूख खान

  • आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा – शाहरूख खान  
  • ‘वेव्हज’ सर्व माध्यमांना एकाच मंचांवर आणणारा योग्य वेळी सुरू केलेला उपक्रम – दीपिका पदुकोण
  • यापुढे वेव्हज्‌च्या सोबतीने मोठी झेप घेण्यासाठी भारतातील सर्जक सर्व सामर्थ्याने सज्ज – करण जोहर

मुंबई, दि. ०१ : वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.  या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक अमर्याद शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून,  शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’  कसे बनू शकते,  याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला. शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्‍ये सिनेमा पाहण्‍याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हज्‌चे महत्त्व मांडले. माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले की, या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हज्‌चे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.

वेव्हज्‌ शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले ते सांगितले. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.

समाजमाध्‍यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल शाहरुख खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गुण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.

समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्‍यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

जागतिक बौद्धिक संपदा (आयपी) सर्व देशांसाठी रोजगार, विकास व नवोन्मेषासाठी उत्प्रेरक – डॅरेन टांग

वेव्हज् परिषद – २०२५

मुंबई, दि. ०१: मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद  (वेव्हज) मध्ये “दृकश्राव्य  कलाकार आणि आशय निर्मात्यांसाठी आयपी आणि कॉपीराईटची भूमिका” यावर परिसंवाद झाला. डिजिटल युगात निर्मात्यांना सक्षम बनवण्यात बौद्धिक संपदा (आयपी) अधिकारांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी जागतिक मनोरंजन, कायदा आणि सर्जनशील उद्योगांमधील प्रभावशाली व्यक्तींनी या सत्रात सहभाग नोंदवला.

या पॅनेलने कायद्याशी संबंधित बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले आणि विशेषत: कलाकार आणि आशय निर्माते, ज्यांचे काम अनधिकृत वापर आणि शोषणासाठी असुरक्षित आहे, त्यांच्यासाठी आयपी अधिकारांबद्दल अधिक जागरूकता आणि संरक्षणाची तातडीची गरज अधोरेखित केली.

ज्येष्ठ वकील अमित दत्ता यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. पॅनेलमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे (डब्ल्यूआयपीओ) महासंचालक. डॅरेन टांग यांचा समावेश होता, ज्यांनी धोरणात्मक चौकटी आणि जगभरातील कलाकारांसाठी संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी डब्ल्यूआयपीओच्या प्रयत्नांबाबत जागतिक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, गेल्या 5  दशकांमधील भारताचा बौद्धिक संपदाविषयक प्रवास असामान्य आहे आणि त्याची सर्जनशील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आयपी सर्व देशांसाठी रोजगार, विकास आणि नवोन्मेषासाठी  उत्प्रेरक म्हणून काम करते त्यामुळे जागतिक आयपी परिसंस्थेत परिवर्तन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डब्ल्यूआयपीओच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या डेटा मॉडेलबद्दल बोलताना ते म्हणाले की ते धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि त्याच्या सदस्य देशांच्या निर्मात्यांना सर्जनशील अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्यासाठी चांगली मोजमाप प्रणाली शोधण्यास मदत करत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार फिरोज अब्बास खान यांनी रंगभूमीतील अनेक दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि मूळ सर्जनशील कलाकृती जपताना येणाऱ्या आव्हानांमधून अनेक अंतरंग उपस्थितांसोबत सामायिक केले. ते म्हणाले, की बौद्धिक संपदा हा मानवी प्रतिष्ठेचा भाग आहे आणि समाजाने सर्वप्रथम कलाकारांच्या कामाचा आदर केला पाहिजे.

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माते स्टीव्ह क्रोन यांनी दृकश्राव्य कथाकथनामधील योगदानाचे संरक्षण करण्यासाठी कॉपीराइटचे महत्त्व आणि प्रमाणित जागतिक अंमलबजावणी यंत्रणेची आवश्यकता यांवर भर दिला. ते म्हणाले, की कॉपीराइट केवळ कमाईसंदर्भात नाही, तर निर्मात्यांच्या कामांचे शोषण होऊ नये यासाठी नियंत्रण म्हणून गरजेचे आहे.

ज्येष्ठ पटकथालेखक अंजुम राजाबली यांनी सर्जनशील प्रक्रियेबद्दल आणि गुंतागुंत वेगाने वाढणाऱ्या आशय अर्थव्यवस्थेत लेखकांनी त्यांचे हक्क समजून घेण्याची, तसेच त्यांच्या अधिकारांवर दावा करण्याची आवश्यकता याबद्दल विचार व्यक्त केले. ते म्हणाले, की आज कशाचाही अ‍ॅक्सेस मिळणे खूपच सोपे झाले आहे, पण त्यावर निर्बंध असले पाहिजेत.

संपूर्ण सत्रात, पॅनेलवरील सदस्यांनी कॉपीराईट मालकी, परवाना, नैतिक अधिकार, एआयचा प्रभाव आणि वेगाने डिजिटलाइझ होत असलेल्या जगात प्रवेश आणि संरक्षण यांच्यातील संतुलन यावर सखोल चर्चा केली.

०००

‘वेव्हज्’ २०२५ मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्याबाबत विचारांचे आदानप्रदान

मुंबई, दि. ०१ : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे वेव्हज् २०२५  च्या पहिल्या  दिवशी “भारतीय माध्यम आणि मनोरंजन @१०० : माध्यम आणि मनोरंजनाच्या भविष्याची  पुनर्कल्पना” या अंतर्गत लक्षवेधी परिसंवाद झाला. या सत्रात उद्योगातील प्रमुख व्यक्तींनी २०४७ च्या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या भारताचा विकास आणि पुढील वाटचालीबाबत आपले विचार मांडले. बिझनेस स्टँडर्डच्या स्तंभलेखिका  वनिता कोहली खांडेकर यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.

सत्राच्या सुरुवातीला, वनिता कोहली खांडेकर यांनी वर्ष २००० च्या सुमारास अवघे ५०० कोटी रुपये मूल्य असलेले माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्र आता ७०,००० कोटी रुपयांची उलाढाल असलेला प्रमुख उद्योग बनला असल्याचे सांगितले. या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन धोरणात्मक निर्णयांकडे त्यांनी लक्ष वेधले. यापैकी एक आहे  चित्रपट निर्मितीला देण्यात आलेला उद्योगाचा दर्जा आणि मल्टीप्लेक्सना दिलेल्या प्रारंभिक कर सवलती. आशय सामग्रीचा केवळ दर्जा सुधारण्यात नाही तर महसूल वाढीतही  मदत करण्याच्या एआयच्या क्षमतेबाबत त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. देशाच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेवर भर देत, त्यांनी अधोरेखित केले की वेगवान वाढ ही भारताच्या विविध प्रेक्षकांसाठी समावेशक आणि संवेदनशील असायला हवी.

ग्रुपएमचे व्यवस्थापकीय संचालक विनित कर्णिक यांनी नमूद केले की आज माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ६०% जाहिरात महसूल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून येतो. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आशय सामग्रीचा वापर आणि विपणन यात मूलभूत बदल झाला आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एआयचा स्वीकार करताना, त्यांनी आशय मानवीय राहिला पाहिजे यावर भर दिला. विशेषतः अशा वेळी जेव्हा संस्कृती स्वतः मोबाईल तंत्रज्ञानाद्वारे आकाराला येत आहे. कथात्मक मांडणीला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि भविष्यातील व्यावसायिकांना सुसज्ज करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या  नवीन अभ्यासक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

जेटसिंथेसिसचे संस्थापक आणि सीईओ राजन नवानी यांनी भविष्यातील कंटेंट डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत केले, जे क्रॉस-प्लॅटफॉर्म इंटरॅक्टिव्ह अनुभवांमध्ये विकसित होईल,असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी सांगितले की जागतिक एम अँड ई बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त २-३% आहे आणि २०४७ पर्यंत हा वाटा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणे आणि देशाची गुंतवणूक क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यांनी नमूद केले की मनोरंजन अधिकाधिक गतिमान होत आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल.

वनिताच्या मुद्रीकरणाबाबतच्या चिंतेचे निराकरण करताना त्यांनी विकसित बाजारपेठांच्या तुलनेत भारतातील ग्राहकांच्या तुलनेने कमी खर्च करण्यायोग्य उत्पन्नाकडे लक्ष वेधले, परंतु, शाश्वत आर्थिक वाढीमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल, असा आशावाद व्यक्त केला. त्यांनी ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगचे उदाहरण दिले, जिथे प्रेक्षक आधीच वैयक्तिकरीत्या वापर आणि पेमेंटमध्ये सहभागी होत आहेत.

इरॉस नाऊचे सीईओ विक्रम टन्ना यांनी भारताला माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनविण्याचे आवाहन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, आशय सामग्रीची निर्मिती आणि वितरण या दोन्हीमध्ये एआय बदल घडवून आणेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना निर्माता बनण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. त्यांच्या मते डिजिटल युगात अनेक वळणे येतील आणि भारत स्पर्धात्मक राहावा, यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहेत. त्यांनी यावर भर दिला की नवीन तंत्रज्ञान सोपे करणे – त्यांना इंटरनेट इतके सुलभ करणे – यामुळे स्वाभाविकपणे व्यवसायाचा विस्तार होईल. त्यांनी सत्राचा समारोप करताना असे नमूद केले की, या विकसित वातावरणात, उद्योगाने यंत्रांशी कसे जोडले जावे आणि जाहिराती आणि प्रेक्षकांच्या सहभागासाठी विशाल आशय सामग्री परिचित्राचा कसा वापर करावा, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या सत्रात भारताच्या एम अँड ई क्षेत्राचा भविष्यकालीन दृष्टिकोन सादर करण्यात आला, ज्यात त्याचे भविष्य घडवण्यासाठी धोरण, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि सांस्कृतिक प्रासंगिकता यांच्या परस्परसंवादावर भर देण्यात आला. वेव्हज् २०२५ जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ४ मे पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगांमधील जागतिक कल दर्शविणारी  सत्रे असतील.

०००

सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर – केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

वेव्हज् परिषद – २०२५

मुंबई, दि. ०१: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेच्या माध्यमातून भारतीय कला जगभर पोहोचवण्याची संधी प्राप्त झाली आहे. यातून सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जागर होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उद्योग मंत्री उदय सामंत, राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, यु-ट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी निल मोहन तसेच विविध देशातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक मंत्री शेखावत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा उद्घोष झाला आहे. भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेल्याने याचे फलित म्हणून कोडियाट्टम, वैदिक पठण, रामलीला, गरबा यांसह १५ सांस्कृतिक घटक युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. याशिवाय, भरतमुनींचे नाट्यशास्त्र आणि भगवद्गीताही युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली.

मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहे, म्हणूनच जागतिक माध्यमे आणि विकास क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. वेव्हजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. त्यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. नागालँड येथील कलाकारांनी नागालँडची लोककला सादर केली.

पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याला तर पॉप संगीत गायक अलन वाल्कर यांच्या पॉप संगीताला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण

एम. एम. किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि ए. आर. रहमान, शंकर महादेवन, प्रसन्न जोशी, रॉकी केज, मित ब्रदर यांनी गायलेल्या वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

‘वेव्हज्’मध्ये आज जागतिक माध्यम संवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मुंबई, दि. ०१: वेव्हज् 2025 या आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेत उद्या 2 मे 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

दालन क्रमांक 105 ए अण्ड बी, दालन क्रमांक 104 ए आणि 103, क्युब ॲण्ड स्टुडिओ येथे वेव्हज् बाजार असणार आहे. वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असून, ते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूईंग रूम हे वेव्हज् बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असून, ते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले राहील.

तसेच लोटस-1 येथे जागतिक माध्यम संवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील भागधारक, मीडिया व्यावसायिक आणि कलाकार एकत्र येतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यतांत्रिक नवोन्मेष आणि नैतिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने रचनात्मक चर्चेत सहभागी होतील. तसेच दु. 2.30 जास्मीन हॉल क्र.1 येथे क्रिएट इंडिया चँलेज पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

परिषदेत प्लेनरी सत्रामध्ये जस्मीन हॉल क्र.1 येथे स. 10 ते दुपारी 2 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, सादरीकरण आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  तर जास्मीन हॉल क्र.2 येथे स 10 ते सायंकाळी 6 दरम्यान विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, संवाद सत्र, फायर साईट चॅट उपक्रम होणार आहे. तसेच जास्मीन हॉल क्र.3 येथे स 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरची चर्चासत्रे, परिसंवाद, फायर साईट चॅट होणार आहे.

या परिषदेत ब्रेकऑउट सत्रात दालन क्रमांक 202, 203, 205, 206 मध्ये स 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपट माध्यम क्षेत्राचे विविध तंत्रज्ञान, नवीन आव्हाने, नव्या संधी याविषयी चर्चासत्रे होणार आहेत. परिषदेत मास्टर क्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3.30 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा बनविण्याचा निर्धार करुन हा प्रवास सुरू केला आणि आज आपला जिल्हा राज्यात ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरला असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

‘ए आय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी या संपूर्ण ए.आय प्रणालीविषयी सादरीकरण केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले,  आज आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण आहे. एआय प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा आघाडीवर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. विशेष म्हणजे भविष्यात ‘एआय’ प्रणालीयुक्त  जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपला जिल्हा यापुढे एआय प्रणालीचा उपयोग करणार आहे. आज आपण पहिल्या टप्प्यात असून नुकतीच सुरूवात झालेली आहे. या प्रणालीमध्ये टप्याटप्याने होणारे बदल आपण स्विकारणार आहोत. अनेक देश एआय प्रणालीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करुन देशाचा विकास करत आहेत. आपल्या जिल्ह्यानेही या प्रणालीच्या वापरात पहिले पाऊल ठेवले आहे. जिल्ह्याचा विकास करत असताना अनेक आव्हाने समोर आहेत पण त्यावर देखील मात करत आपण जिल्ह्याचा विकास करणार आहोत.  शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी देखील या प्रणालीचा मोठा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले.

    जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, प्रशासनामध्ये या प्रणालीचा उपयोग व्हावा  यासाठी पालकमंत्री नितेश राणे पाठपुरावा करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन या कामात पुर्णपणे गुंतलेले आहे. या प्रणालीमुळे प्रशासनाच्या कामकाज नक्कीच पारदर्शक, गतीमान आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन सुकर होणार असल्याचेही ते म्हणाले.

0000000

जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १ : केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे. यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या-त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल. यातून मागास वर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

वरुड तहसील कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहळे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे. जिवंत सातबारा ही मोहीम राबवून सातबारावरील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावांचे सातबारे शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. बंधारे बांधणे, नाला खोलीकरणनातून काढण्यात आलेले गौण खनिज या रस्त्यासाठी उपयोगात आणले जात आहे. शेतकऱ्यांना दुपारी 12 तास वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा. प्रशासनाने ही त्यांना सहकार्य करून त्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नागररिकांना शासनाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत असल्यास थेट संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान, मतदान कार्ड वाटप, पीएम किसान सन्मान निधीची वाटप, ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.

०००००

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग  जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अनिल पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, तसेच कक्षातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना  पालकमंत्री  श्री राणे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या कक्षामुळे सिंधदुर्ग जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य मिळणार आहे. कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापनेचा उद्देश:

समाजातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती व सुविधा रुग्णांना मिळवून देणे, तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह प्राधान्याने उभारावेत – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. १ : शासनाचा शाळांमधील पटसंख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही पटसंख्या वाढवताना दर्जेदार शिक्षणासोबतच शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, ई सुविधा प्राधान्याने उभारावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, शिक्षणाधिकारी अनिल मोहोरे, प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी यात सुधारणा कराव्या लागतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर फंड, तसेच नागरिकांच्या योगदानातून शाळांना आवश्यक असणाऱ्या सोयी उपलब्ध कराव्यात. रोजगार हमी योजनेतून शाळांना संरक्षक भिंती, वृक्ष लागवड करण्यात यावी.

राज्यभर आयडॉल शिक्षकांशी संवाद साधण्यात येत आहे. यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमधील शिक्षक नावीन्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. विविध क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. ही परंपरा कायम राहावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यावर्षीपासून सीबीएससी शाळांमधील चांगल्या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीमधून शाळांच्या छोट्या समस्या निकाली निघू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात. या भेटीमधून शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात. शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पालकांचा सहभाग जाणीवपूर्वक घेण्यात यावा. शिक्षकांना जागतिक पातळीवरील ज्ञानाच्या पद्धती अभ्यासण्यासाठी विदेश दौरे आयोजित करण्यात येतात. येत्या काळात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचाही यात समावेश केला जाईल. त्यामुळे शिक्षणविषयक प्रशिक्षण देताना लाभ होईल.

येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. तसेच राज्यभरातील प्रत्येक अधिकारी एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. या शाळा संबंधित अधिकाऱ्यांना दत्तक दिल्या जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमधील प्रश्न, समस्या सोडविण्यात येणार आहे. राज्यभरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००००

महाराष्ट्र दिनी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आचल गोयल, अपर जिल्हाधिकारी रवी कडकधोंड, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाम सुरवसे उपस्थित होते.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना असामान्य कामगिरीबद्दल मुंबई शहर व जिल्ह्यातील सहा रक्षकांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

00000

 

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...