शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 22

छत्रपती शाहू महाराज…लोक कल्याणकारी राजा! 

छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून रोजी झाला. शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात लोककल्याणाचे व समाज उद्धाराचे कार्य केले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजा असे संबोधले जाते. महाराष्ट्र शासनामार्फत त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण राज्यात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक कार्याची माहिती घेतल्यानंतर त्यांना लोक कल्याणकारी राजा का? म्हटले जाते याची प्रचिती येते.”

छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले(17 मार्च 1884).

छत्रपती शाहू महाराजांवर महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव होता. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरेखुरे वारसदार होते. सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्तानला आवश्यकता आहे असे सांगून त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षणासाठी सवलती जाहीर केल्या. महाराष्ट्राने छत्रपती शाहू महाराजांचा शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला. भारतातील वस्तीगृहाचे आद्य जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो. ते कल्याणकारी राजा होते. एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या अखिल भारतवर्षीय क्षत्रिय  महासभा या संस्थेच्या कानपुर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात शाहू महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली.

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती-धर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृह स्थापन शाहू महाराजांनी केली. तर सन 1901 मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंग ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तर नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारून शहरी भागात विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्याने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले.

सन 1902 मध्ये शाहू महाराजांनी राज्यातील मागासवर्गीयांसाठी प्रशासकीय सेवा मध्ये 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. तसेच महाराजांनी  15 नोव्हेंबर 1906 किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सन 1907 मध्ये मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी करून त्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. सन 1911 मध्ये कोल्हापूर संस्थानात जाहीरनामा काढून त्यानुसार 15 टक्के विद्यार्थ्यांना नादारी देण्याची घोषणा करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली केली.

शाहू महाराजांनी 1911 मध्ये शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना राबवले. तर 1917 मध्ये आदेश काढून माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. व कोल्हापूर संस्थानातील गोरगरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. 14 फेब्रुवारी 1919 पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू करण्याचा जाहीरनामा काढला.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

 

लष्करी शिक्षणासाठी  इन्फंट्री स्कूल सुरू केले व पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल तर जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट ची स्थापना करून शाहू महाराजांनी तांत्रिक शिक्षणाला महत्त्व देण्याबरोबरच लष्करी  शिक्षणाची दारे खुली केली.

शाहू महाराजांनी सन  1917 मध्ये विधवा विवाहाचा कायदा करून पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली तर 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. व समाजातील अनिष्ठ चाली-रीती वर हल्ला चढवला. 1918 मध्ये महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी ने करून दिल्या व वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली व 1920 मध्ये माणगाव अस्पृश्यतानिवारण परिषदेचे आयोजन केले.

छत्रपती शाहू महाराज यांनी व्यवसाय निर्बंध दूर करून अस्पृश्यांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले. जातिभेदास तीव्र विरोध केला महाराजांच्या या सर्व लोक कल्याणकारी कार्यामुळे खरेखुरे लोककल्याणकारी राजा होते. पददलित व मागासवर्गीयांची उन्नती हेच छत्रपती शाहू महाराजांनी जीवितकार्य मानले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही अशी घोषणा त्यांनी केली. उदार विचारप्रणालीचा राजा होते. राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही, असे शाहू महाराजांनी ठासून सांगितले. कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या असा संदेश त्यांनी दिला.

He was a king. But democratic king. असे गौरवउद्गार भाई माधवराव बागल यांनी शाहू महाराजांबद्दल काढले. तर थोर समाज सुधारक विठ्ठल रामजी शिंदे शाहू महाराजा बद्दल म्हणाले की,

शाहू राजा नुसता मराठा नव्हता ब्रह्मतोतर ही नव्हता. तो नव्या युगातील सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता.

 000

  • सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी ,सोलापूर

 

                  ******

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, दि. २५ जून (जिमाका वृत्तसेवा):- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे “आणीबाणी @५०” हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि त्यावरील मांडणीचे कौतुक केले.

प्राचीन ते वर्तमान लोकशाहीचा प्रवास

या विशेष प्रदर्शनात भारतातील प्राचीन लोकशाही संकल्पनांपासून ते १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीपर्यंतचा व त्यानंतरचा प्रवास माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. महाजनपद काळातील लोकसहभाग, बुद्धकालीन राजनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, महात्मा बसवेश्वर यांचा अनुभव मंडप, ईशान्य भारतातील स्वशासन, भारताचे स्वातंत्र्य, संविधान, प्रजासत्ताक भारत आणि त्यानंतरची आणीबाणीतील राजकीय-समाजपरिवर्तन घडामोडी याचे यथार्थ दर्शन या माध्यमातून घडवण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे बदल घडले, त्या काळात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्र कात्रणे, तसेच आणीबाणीत सहभागी व्यक्तींची नावे व योगदान यांचा समावेश आहे.

दस्ताऐवज आणि दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर

या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालक्रमानुसार मांडणी केलेले घटनाक्रम, त्या काळातील राजकीय निर्णय आणि त्याचे लोकशाहीवर झालेले परिणाम यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे माहिती फलक. त्याशिवाय संविधानिक मूल्ये, मुलभूत अधिकारांचे उल्लंघन, माध्यमांवरची नियंत्रणाची परिस्थिती, अटकसत्रे आणि सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरणही या प्रदर्शनात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.

लोकसहभागासाठी खुले निमंत्रण

या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.

00000000

आणीबाणीत सहभागी असलेल्या १७५ जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव

जळगाव, दि. २५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): – लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

देशात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १७५ लोकशाही सेनानींचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलते होते.

याप्रसंगी आमदार श्री.सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल, महापालिका आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास कुलकर्णी व श्री. अजित मेंडकी, श्री. उदय भालेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

तुमच्या संघर्षामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली, देश जगभर लोकशाही राष्ट्र म्हणून आपली छटा उमटवत आहे. आता देशात सर्व सामान्यांच्या कल्याणापासून ते देशात विविध पायाभूत सोयसुविधा उभा करून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडवीत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ. सुरेश भोळे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मिसा बंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास कुलकर्णी व श्री. अजित मेंडकी, श्री. उदय भालेराव यांनी आपल्या मनोगतातून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 175 व्यक्ती आणीबाणीच्या लढ्यात होती. यातील हयात असणाऱ्या अनेकांनी मंचावर येऊन गौरव स्विकारला, दिवंगत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी हा गौरव स्विकारला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. त्यात त्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

000000000

नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

मुंबई, दि. २५: नांदेड शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या शहराचा सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री अशोक चव्हाण, अजित गोपछेडे, रविंद्र चव्हाण, आमदार सर्वश्री हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, नगरविकास विबागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त विक्रमकुमार आदी यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

नांदेड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असून पवित्र नगरी म्हणून या शहराचा सुनियोजित विकास होणे गरजेचे आहे. याठिकाणी देश आणि जगभरातून लाखो भाविका येतात. त्यामुळे चांगले रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, बगिचे शहरात व्हावे याकरीता पुढील २५ वर्षांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन शहराचा विकास आराखडा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. एमएमआरडीने त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधितांची एक बैठक घेऊन शहराचा सुनियोजीत विकास कसा करता येईल याबाबत चर्चा करावी. आवश्यकता भासल्यास शहराच्या विकास आराखडा कसा असावा, पवित्र नगरी म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास करता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्री. चव्हाण, श्री. गोपछेडे, श्री. चव्हाण, आमदार श्री. पाटील, श्री. कल्याणकर, श्री. बोंडारकर यांनी नांदेड शहर व परिसर विकासाच्या दृष्टीने मनोगत व्यक्त केले.

००००

फुरसुंगी उरुळी देवाची नवीन नगर परिषद आणि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई, दि. २५ : पुण्यातील फुरसुंगी- उरुळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठी आणि पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पुणे मनपा हद्दीतील गावांच्या विविध प्रश्नांबाबत आज आमदार विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक  सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी या गावातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन ते तत्काळ सोडवण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आंबेगाव बुद्रुक येथील कचरा डेपोमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरीक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी या कचरा डेपोचे अभ्यासपूर्ण नियोजन करून त्यानंतरच कचऱ्याची व्हिल्हेवाट लावावी. गांडूळ प्रकल्प राबवून, खड्डा तयार करून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानंतर या कचऱ्याची  विल्हेवाट लावावी असे सांगितले. तसेच या कचरा डेपोची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच यावेळी आमदार विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे मनपा हद्दीतील ६५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या जांभूळवाडी तलावाच्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून ते आंबेगाव खुर्द आणि बुद्रुक तसेच मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोळीवाडे, गुजर निंबाळकरवाडी आणि इतर काही गावांना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी या पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता तपासून त्यानंतर त्यांचा पिण्यासाठी वापर करण्याची  प्रकिया सुरू करावी असे  निर्देश दिले.

पुणे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांना आलेला वाढीव कर वसूल करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार या गावांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुणे मनपाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच 23 गावातील थकीत कराची वसूली करण्यासाठी तातडीने अभय योजना राबवावी आणि नगरविकास विभागाच्या सूत्रानुसार कर आकारणी करावी असे निर्देश पुणे मनपा आयुक्तांना दिले. तसेच या 23 गावांचा मनपा हद्दीत समावेश करून घेताना, ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ६२६ कर्मचाऱ्यांना आकृतिबंधाच्या तांत्रिक अडचणीमुळे सेवेतून कमी करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यासाठी त्यांची सद्यस्थिती तपासून  प्राधान्याने सेवेत समाविष्ट करावे असे निर्देश शिंदे यांनी दिले.

०००

 

वाहतूककोंडी सुटण्यास, वाहतूकव्यवस्था सुधारण्यास पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजूरीमुळे मदत होईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत, 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) या दोन कामांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय पुण्याची वाहतूककोंडी सोडवण्यात, सार्वजनिक वाहतुकव्यवस्था सुधारण्यात, पुणे व परिसराच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यालयातील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून पुण्यातील विकासप्रकल्पांसंदर्भात सातत्याने बैठका, आढावा घेऊन पुणे मेट्रोच्या विस्तारीत कामांना मंजूरी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वणाज ते रामवाडी मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. आज मंजूरी मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यात 1) वनाज ते चांदणी चौक (मार्गिका 2 अ) आणि 2) रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी (मार्गिका 2 ब) ही दोन कामे मार्गी पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गिका उन्नत आणि 12.75 किलोमीटर लांबीच्या आहेत. या मार्गिकांवर 13 स्थानके असणार आहेत. या सेवेचा उपयोग प्रामुख्याने चांदणी चौक, बावधन, कोथरुड, खराडी, वाघोली उपनगरातील प्रवाशांना होणार आहे. पुण्यातील आयटी, व्यापारी, औद्योगिक विकासासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. यासाठी 3 हजार 626 कोटी 24 लाख रुपये (रु.3626.74) खर्च येणार असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या कार्यालयातील प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीट’च्या (पीएमयु) माध्यमातून ते संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा आणि कामांना गती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. आजही (ता.25) त्यांनी ‘पीएमयु’ची बैठक घेऊन पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला. पुण्यासह मंत्रालयातील सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

—-००००—

राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम 

मुंबई, दि. 25 : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून धोरण तयार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांच्यासह नगर विकास व गृह विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी आपापल्या स्तरावर CCTV कॅमेरे बसवलेले असले तरी यामध्ये एकसंधपणा नसल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर समिती स्थापन करून सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे धोरण मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात  सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरत असून, त्यांचा वापर गुन्‍हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे यापुढे सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.

नवीन धोरणानुसार कोणती यंत्रणा कोणत्या प्रकारचे सीसीटीव्ही बसवेल, त्यांचा देखभाल खर्च, फुटेज, यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले जाणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, ती संपूर्ण प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी नमूद केले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

???????????????????????????????

मुंबई, दि. २५ : पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात मंत्रालयात श्री. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहत असतो. मात्र, यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का, तसेच तलावातील गाळ काढण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात यावेळी चर्चा झाली. पवई तलावातील प्रदुषणासंदर्भात ‘मेरी’ संस्थेने सर्वेक्षण केले आहे, असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पवई तलावचा परिसर हा ५५७ एकरावर आहे. जलपर्णी वाढल्याने तलाव परिसरातील सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई व तुळशीविहार तलावातील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी, अशा सूचना श्री. शेलार यांनी यावेळी दिल्या.

०००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 :- राज्यातील सर्व शासकीय कार्यालये स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून इमारतींच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात यावे. राज्यात ज्या ठिकाणी विकासकामे सुरु आहेत त्याठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाची असणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव  ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपरमुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैसवाल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांच्यासह पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

पुणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, पुणे मेट्रो 1 व 2 मार्गिकेच्या कामाचा आढावा घेत, कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेडी किनारा महामार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यावेळी त्यांनी लोणावळा येथील स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकास, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, औंध-पुणे येथील नियोजित एम्स हॉस्पिटल, रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदर विकास, मुंबई येथील रेडीओ क्लब जेट्टी, नेरळ-शिरुर-कर्जत रस्ता, सातारा सैनिक स्कूल, परळी (जि. बीड) येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय, पुरंदर विमानतळ, बारामती विमानतळ, बीड विमानतळ, पुणे येथील कृषीभवन, ऑलिम्पिक भवन,  कामगार कल्याण भवन, नगररचना भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, पुणे येथील वीर लहूजी वस्ताद स्मारक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू आणि तुळापूर येथील स्मारक, फुलेवाडा स्मारक आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

*****

 

औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

मुंबई, दि. २५ : जगाच्या अनेक भागांत युद्ध आणि संघर्षाचं सावट आहे, मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास केंद्रित वाटचाल करत असून महाराष्ट्रात आपण औद्योगिक वाढ आणि आर्थिक प्रगतीवर संवाद करत आहोत, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

बीकेसी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या पुढाकाराने आयोजित “महाराष्ट्र उद्योग संवाद २०२५” या भव्य औद्योगिक परिसंवादाचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ कन्वेशन सेंटर येथे करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग सचिव पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, देशभरातील उद्योजक तसेच महाराष्ट्रातील एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे गौरवोद्गार काढले.

राज्याच्या औद्योगिक सामर्थ्याचा उल्लेख करताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्र देशाच्या जीडीपी मध्ये १४ टक्के हून अधिक योगदान देणारे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १.६४ लाख कोटींच्या थेट परकीय गुंतवणुकीसह भारतातील एकूण एफडीआय पैकी ४० टक्के वाटा मिळवला आहे. महाराष्ट्र स्टार्टअप्सचे केंद्र झाले आहे, असे सांगत राज्यपालांनी काही महिन्यांपूर्वी स्टार्टअप उद्योजकांसोबत झालेल्या भेटींचा उल्लेख केला. त्यांनी राज्यातील युवकांमध्ये असलेल्या कौशल्यावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, अनेक विकसित देश भारताकडे कुशल मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी पाहत आहेत.

विद्यार्थ्यांनी जर्मन, जपानी, चिनी, पोर्तुगीज, स्पॅनिश, आदी भाषा शिकल्यास त्यांना विविध देशांमध्ये रोजगार मिळणे सुलभ होईल. या दृष्टीने आपण विद्यापीठांना परकीय भाषेचे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचित केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचे जागतिक व्यापारातील स्थान आणखी बळकट होणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम – डावोस २०२५ मध्ये महाराष्ट्राने १५.७२ लाख कोटींच्या सामंजस्य करारांवर (MoUs) वर स्वाक्षऱ्या करत १५ लाख नव्या रोजगार निर्मितीचा मार्ग उघडला.

महाराष्ट्रातील ८२.६३ लाख MSME ही भारतातील सर्वात मोठी रजिस्टर्ड एमएसएमई संख्या आहे. टेक्निकल टेक्सटाईल्ससाठी सुरू करण्यात आलेले ‘महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाइल्स मिशन’ राज्याच्या नवकल्पनात्मक दृष्टिकोनाचे पाऊल आहे.

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून पावले टाकायची आहेत. उद्योग सुलभता, नावीन्य, आणि सर्वसामान्यांच्या सहभागातून आपण हे लक्ष्य गाठू शकतो,” असे सांगून राज्यपालांनी उद्योगजगतातील सर्व सहभागी, नवकल्पक आणि विचारवंतांना संवादात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र लक्ष्यासाठी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील १० वर्षांत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात जी झेप घेतली, ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाली. ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या लक्ष्यासाठी नेहमीच पुढे राहू”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

“महाराष्ट्राची खरी ताकद म्हणजे इथल्या उद्योजकांची मानसिकता आणि मेहनत आहे. राज्याची वाटचाल घडवणारे तुम्हीच आहात,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग संवादाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित उद्योजकांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोक मला अनेकदा विचारतात, ‘महाराष्ट्राची ताकद काय आहे?’ आणि मग आपण आकडेवारी सांगायला लागतो – १४ टक्के राष्ट्रीय GDP, ३१ टक्के FDI, देशातील सर्वाधिक निर्यात (तेल वगळता), २५ टक्के स्टार्टअप्स – ही सगळी आकडेवारी यथार्थ आहेच. पण खरी ताकद आहे, ती तुम्हा सर्व उद्योजकांमध्ये आहे, ज्यांनी महाराष्ट्राला उद्योजकतेचं केंद्र बनवलं.”

महाराष्ट्र हे नेहमीच गुंतवणुकीसाठी पसंतीचं ठिकाण राहिले आहे आणि आजचा ‘उद्योग संवाद’ हा केवळ विचारांचा नव्हे, तर कृतीचा संगम आहे. मागील १० वर्षांत महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांमध्ये औद्योगिक क्रांतीची नवी दिशा निर्माण झाली आहे. “कधी काळी शून्य औद्योगिकीकरण असलेल्या गडचिरोलीने आता स्टील हब बनण्याचं स्वप्न पाहिले आहे. या भागाला ‘नवीन स्टील सिटी म्हणून विकसित करत आहोत.”

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध औद्योगिक केंद्रांचा उल्लेख केला. यात अमरावती हे कापसापासून फॅशनपर्यंतचा टेक्टाईल व्हॅल्यू चेन विकसित करणारे तर छत्रपती संभाजीनगर हे भारतातील पहिलं स्मार्ट इंडस्ट्रियल टाउनशिप आणि ईव्ही कॅपिटल होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक हे संरक्षण व अंतराळ क्षेत्रासाठी नवा उद्योग केंद्रबिंदू ठरत असून पुणे-नवी मुंबई-रायगड हे ग्रीन टेक्नोलॉजी, GCCs, डेटा सेंटर्स, नवोन्मेष यंत्रणा निर्माण करणारे आहे. तसेच वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठ्या JNPT बंदराच्या तिप्पट क्षमतेचं नवीन जागतिक दर्जाचं बंदर उभारणीच्या मार्गावर आहे. हे बंदर २० जिल्ह्यांशी थेट जोडणार असून त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी घट होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मित्रा या एकात्मिक सिंगल विंडो यंत्रणेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, ‘मित्रा’ ही खरी एक खिडकी आहे जिच्याद्वारे गुंतवणूक सुलभ केली जात आहे,”. “वाढ हवी, पण शाश्वततेसह”. गडचिरोलीत एक कोटी झाडं लावण्याचा संकल्प, पर्यायी इंधनावर आधारित ट्रक व यंत्रणा, ग्रीन पॉवरचे ५२ टक्के उत्पादन हे सर्व शाश्वत महाराष्ट्रासाठीचे टप्पे असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे औद्योगिक प्रेरणा देणारे बलशाली राज्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र, मुंबई केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर देशाला औद्योगिक प्रेरणा देणारे बलशाली राज्य आहे. येथे गुंतवणुकीची अमर्याद शक्यता आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत अनेक विक्रमी सामंजस्य करार केले असून त्यांचे प्रत्यक्षात रूपांतरही देशात सर्वाधिक प्रमाणात झाले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतातील पहिली विश्व ऑडियो-व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट परिषद मुंबईत भव्यदिव्य स्वरूपात झाली. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चित्रपट, संगीत, गेमिंग, ॲनिमेशन आणि इतर मनोरंजन उद्योगातील महाराष्ट्र व विशेषतः मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्व अधोरेखित केले. ‘ईज ऑफ डूइंग बिझनेस’ ही संकल्पना आता फक्त कागदावर नाही, तर वास्तवात अनुभवता येते. सिंगल विंडो क्लीयरन्स, सक्षम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि त्वरित निर्णयक्षम यंत्रणा महाराष्ट्रात अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रात ₹१५ लाख कोटी गुंतवणुकीचे विक्रमी करार झाले. त्यामुळे आता राज्यात उद्योगधंदे सुरू करणे अधिक सुलभ झाले आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात फार्मा, बायोटेक, ई-व्हेईकल्स, टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग, डेटा सेंटरसारख्या उद्योगांचे केंद्र बनत आहेत. नवी मुंबईत सुरू होणारा सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) च्या महत्त्वावरही भर दिला. मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद ही शहरे जीसीसी हब म्हणून उदयाला येत असून यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील. भारतातील जीसीसी आज जगातील 1700 प्रकल्प हाताळत आहेत.

मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, नवीन मुंबई एअरपोर्ट आणि वाढवण पोर्टसारखे महत्त्वाचे प्रकल्प वेगाने उभारले जात आहेत. “पुढील पाच वर्षात ₹४० लाख कोटी गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार संधी निर्माण होतील,” अशी खात्रीही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली.

या ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग’द्वारे राज्यात नवीन औद्योगिक क्रांतीची सुरुवात होत असून, पुढील पाच वर्षात महाराष्ट्राचे औद्योगिक स्वरूप पूर्णतः बदललेले दिसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला. “औद्योगिक प्रगती ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर उद्योग समूह, शैक्षणिक संस्था, आणि नागरिकांच्या समन्वयातूनच महाराष्ट्र ‘इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट’होईल,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

गेल्या वर्षांत दावोस येथे झालेल्या परिषदेतून महाराष्ट्रात एकूण १५.७२ लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली असून, या कालावधीत ८० टक्क्यांहून अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरले आहेत. दावोसमध्ये करण्यात आलेल्या ४६ सामंजस्य करारांपैकी २० उद्योगांना जागा देण्यात आली असून आणखी ८ उद्योजकांना लवकरच जागा मिळणार आहे, असे प्रतिपादन उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत मागील तीन वर्षांत ५२,००० उद्योजक तयार करण्यात आले, ज्यामधून १,०४,००० नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. तसेच, स्थानिक उद्योजकांनी १.२७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून आणखी १ लाख रोजगार निर्माण केले आहेत. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये ७५,००० कोटी रुपयांपर्यंत स्टील क्षेत्रात गुंतवणूक झाली असून हा जिल्हा लवकरच “उद्योगनगरी” म्हणून ओळखला जाईल. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ३०,००० कोटींची गुंतवणूक झाली असून व्हीआयटी सेमीकंडक्टर (२०,००० कोटी) आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी (१०,००० कोटी) यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरात ६०,००० कोटींची ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, राज्य सरकारने जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग परिषद, मैत्री पोर्टल, आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर अशा उपक्रमांद्वारे उद्योगवाढीचा पाया भक्कम केला आहे. मैत्री पोर्टलवरील ९९ टक्के अर्जांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील मर्यादा वाढवून मॅन्युफॅक्चरिंगसाठी १ कोटी आणि सर्व्हिस सेक्टरसाठी ५० लाख रुपये करण्यात आल्या आहेत. या कर्जांवर १७ टक्के सबसिडी देण्याचा निर्णयही घेतला आहे. तसेच, ओबीसी, दिव्यांग व पर्यटन क्षेत्रातील स्टार्टअप योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि ‘नॅसकॉम’ तसेच ‘एमएसएसआयडीसी’ आणि नॅसकॉम यांच्यामध्ये सांमजस्य करार झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सचिव पी.अन्बळगन आणि आभारप्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू यांनी केले.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 3  (विमाका) :- विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर...

१५ ऑगस्टपर्यंत सुनावण्यांची सर्व प्रकरणे ईक्युजे पोर्टलवर नोंदवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर, दि. ३  (विमाका) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणांची...

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

0
मुंबई,दि.३: शेतकरी, शेतमजूर दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेण्यात येईल  असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध...

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

0
मुंबई, दि. ३ : महानगर क्षेत्रात रॅपिडो, उबेर व ओलाने बेकायदेशीर व परवाना न घेता बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ९३...

राज्यातील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांचा मार्ग मोकळा; पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हताधारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा मागील पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली लागला असून दीर्घकाळ सेवेत असूनही अनेक लाभांपासून वंचित असलेल्या १ हजार ४२१ प्राध्यापकांना...