गुरूवार, मे 22, 2025
Home Blog Page 228

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

नवी दिल्ली दि. 12 : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. त्या निमित्ताने मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, समन्वयक डॉ. शैलेश पगारिया तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

येथे विविध महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव असणार आहे. तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आले. तसेच सभागृह क्रमांक एकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, तर सभागृह दोनला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यासपीठाला  स्व. काकासाहेब गाडगीळ आणि स्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांची नावे असणार आहेत. 4000 व्यक्तींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी सर्व सभागृहात होणार आहे, अशी माहिती श्री. नहार यांनी श्री. सामंत यांना या पाहणी दौऱ्याच्या वेळी दिली.

पुणे येथून विशेष रेल्वे 19 तारखेला सुटणार आहे यामध्येही साहित्यविषयक परिसंवाद तसेच कवी संमेलनाचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. नहार यांनी दिली. साहित्य संमेलनासाठी दिल्ली येथे होणारे नियोजन याचीही माहिती श्री. नहार यांनी श्री. सामंत यांना दिली. महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण पाठबळ या साहित्य संमेलनाला असल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.38  / दिनांक 12.02.2025

‘जेएनयु’मधील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी भरीव निधी – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली, दि. 12 : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. सामंत यांनी जेएनयु विद्यापीठात भेट दिली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शांतिश्री पंडित आणि छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी स्टेटस चेअरपर्सन तथा डीन प्रोफेसर अमिताभ मट्टू यांच्याशी या अध्यासनाबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती श्री सामंत यांनी दिली.

या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील. तर, पुढच्या आर्थिक वर्षात सात कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषा अध्यासनासाठी यापूर्वी आर्थिक तरतूद करण्यात आली असून यापुढेही आर्थिक तरतूद करण्यात येईल. तसेच या दोन्ही अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून इमारत बांधण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. या निधी मधील काही भाग हा ‘जेएनयु’ येथील मराठी भाषा अध्यासनासाठीही वापरला जाईल. जेएनयु च्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स तर्फे बांधण्याचा मानस असून जेएनयु कडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

दिल्लीत विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध व्हावी दिल्लीतील मराठी शाळांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी दिली.

‘जेएनयु’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनामधील अभ्यासक्रम याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. अरविंद येलेरी आणि समन्वयक डॉ. जे. जगन्नाथन यांनी अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.  प्राध्यापक डॉ.मनीष दाभाडे, डॉ. राजेश खरात, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या समन्वयकाकडून छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाच्या माध्यमातून महाराजांचे प्रशासन, परराष्ट्रीय धोरण, व्यापार धोरण याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगितले.

0000

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.37  / दिनांक 12.02.2025

महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढावे – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमीच स्वागत आहे, असे सांगत महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले. स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर यांनी मुंबई येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभा अध्यक्ष  अॅड.राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून आजवर भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य होत असते. त्याचबरोबर सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रातही दोन्ही देशांतील आदानप्रदान वाढावे. महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने असे परस्पर सहकार्य कायमच महत्त्वाचे राहील, असे सांगत श्री. देसाई यांनी महावाणिज्यदूत मार्टिन मायर यांना पर्यटन विभागाकडून पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे पर्यटन विभागाकडून आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्टिन मायर यांना आमंत्रण दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 12 : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले. पुण्यासोबतच नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी 636.84 कोटी, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी 1526 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे – नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नवीन शहर नियोजन करताना रस्ते 18 मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकास योजना तयार करताना लागणारा कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, विज पुरवठा, स्मशान भूमी, दफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुणे व नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, छत्रपती संभाजी नगर प्राधिकरणाच्या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नागपूरच्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह अधिकारी उपस्थित होते.

प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात. प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

विकास योजनेत रस्ते 18 मीटर रुंदीचे करण्यासाठी नियमात बदल करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकासयोजनांचे नियोजन करताना चांगल्या दर्जाची सल्लागार एजन्सी नियुक्त करावी. प्राधिकरणांनी भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत प्रकल्प कार्यान्वित करावे. पाण्याची उपलब्धता बघूनच बांधकाम परवानगी देण्यात यावी.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सोंडापार येथील प्राधिकरणाच्या प्रस्तावित कार्यालय आणि कर्मचारी निवासी संकुलाची व्यवहार्यता तपासावी. नागपूर शहरात फुलांचे मार्केट तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासकीय जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव ठेवावी. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास योजना तयार करावी. नाशिक प्रदेशात ”स्पिरीच्युअल सिटी’ करण्यासाठी जमीन संपादित करावी.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळ, दुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा. सुरुवातीला पुणे महामंडळाला इलेक्ट्रिक बसेस दिल्या होत्या. या बसेसमुळे अत्यंत कमी दरात नागरिकांना वातानुकूलित प्रवास करता आला. महामंडळांने प्राधिकरणाकडे 500 बसेसची मागणी केली आहे. या बसेस सीएनजी असाव्यात. भविष्यात कुठल्याही प्रकारे व्यवस्थापनाचा प्रश्न येणार नाही, याची काळजी घ्यावी. पुणे, राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपूल सेवेसाठी देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

छत्रपती संभाजी नगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शहराजवळील औद्योगिक क्षेत्र व पर्यटन क्षेत्रांचा विचार करावा. त्यानुसार आपली विकास योजना तयार करावी यावी. प्राधिकरणाने शहराजवळील असलेले औद्योगिक क्षेत्र, पर्यटन स्थळे यांना जोडणारे प्रशस्त रस्ते तयार करावे.

नाशिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. माणिक गुरचळ, पुण्याच्या बैठकीत महानगर आयुक्त योगेश म्हसे, नागपूरच्या बैठकीत महानगर आयुक्त संजय मीना आणि छत्रपती संभाजी नगरच्या बैठकीत महानगर आयुक्त दिलीप गावडे यांनी सादरीकरण केले. बैठकीला नगरविकास, गृहनिर्माण तसेच प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा…

नवी दिल्ली येथे तब्बल ७० वर्षांनंतर होऊ घातलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मराठीला अनेक वर्षांच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचे महत्त्व मराठी मनाच्या दृष्टीकोनातून अधोरेखित होत आहे. या अभूतपूर्व घटनेचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे यांनी घेतलेला मागोवा…

  • तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा..
  • माय मराठीचा जागर होणार!
  • ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तारा भवाळकर यांना लाभणार सहाव्या महिला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!

राठी भाषा, तिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७० वर्षांनी राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे ९८ वे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. यापूर्वी १९५४ साली ३७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले आहे…

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना मिळणार संमेलनाध्यक्ष होण्याचा मान!

१८७८ साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरु आहे. यंदा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. १९६१ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होते. कुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. यानंतर जवळपास १५ वर्षांनी म्हणजेच १९७५ साली कराड येथे झालेल्या ५१ व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होता. यानंतर जवळपास २१ वर्षांनी १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविले. तर इंदूर येथे २००१ मध्ये झालेल्या ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.

यानंतर २०१९ मध्ये म्हणजे जवळपास १८ वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. २०१९ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ.तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणार संमेलन

केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. मराठी भाषा हा आपला अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचे योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. आता ७० वर्षांनंतर नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

७० वर्षांनंतर दिल्लीत होणार मराठीचा जागर !

१९५४ साली झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ तर संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता ७० वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

दिल्लीतील साहित्य संमेलन –एक ऐतिहासिक क्षण!

राजधानी दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मिता, भाषेचा समृद्ध वारसा आणि नव्या विचारांचे संमेलन ठरणार आहे. ७० वर्षांनी दिल्लीत मराठीचा जल्लोष अनुभवण्याची ही ऐतिहासिक संधी साहित्य रसिकांना लाभणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या गौरवशाली परंपरेचा हा अभिमानास्पद सोहळा अनुभवणे भाषाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.

  • वर्षा फडके- आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक

 

 

साहित्य सोनियाच्या खाणी…

नवी दिल्ली येथे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी १९५४ साली नवी दिल्ली येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. तथापि, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाच्या राजधानीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील साहित्य, साहित्यिक व साहित्य चळवळीवर प्रकाशझोत टाकणारा साहित्य अकादमीचे सदस्य, अविनाश सप्रे यांचा माहितीपूर्ण लेख… 

सांगली जिल्ह्याची वाङ्मयीन परंपरा उज्ज्वल आणि अभिमानास्पद आहे. अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत.

सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे हे लेखक केशवसुतांचे समकालीन होते. ‘समुद्र’ हे 132 श्लोकांचे त्यांचे दीर्घकाव्य 1884 साली प्रकाशित झाले. यशवंतराव होळकरांच्या जीवन आणि कर्तृत्वाचे वर्णन करणारे यशवंतराव हे खंडकाव्य 1888 साली प्रकाशित झाले. गुणोत्कर्ष, तारामंडल, चित्रवंचना, कृष्णकांचन, उग्रमंगल आणि शिवसंभव ही त्यांची गाजलेली नाटके. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी (1 मे 1960) चित्रपती व्ही. शांताराम यांनी बाबूराव पेंढारकरांच्या सहकार्याने ‘शिवसंभव’ चा मुंबईमध्ये भव्य स्वरूपाचा प्रयोग केला होता. मिरजेचे ‘खरे वाचन मंदिर’ हे त्यांच्या कार्याचे स्मारक आहे. या ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी होणारी वसंत व्याख्यानमाला एक जुनी आणि नामवंत व्याख्यानमाला असून महाराष्ट्रातल्या नामवंत लेखक, वक्ते, विचारवंत इत्यादिंना या ज्ञानयज्ञातून ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळत असते.

 

राजकवी साधुदास हे सांगली संस्थानातले एक आदरणीय कवी होते. ‘विहार’, ‘वनविहार’, ‘रणविहार’ अशी त्यांनी रामायणावर आधारित महाकाव्य रचना केली. पेशवे काळावरच्या पौर्णिमा’, ‘प्रतिपदा’ आणि व्दितिया या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत.

 

काव्यविहारी (गद्रे) हे यानंतरचे एक महत्त्वाचे कवी होते. रविकिरण मंडळाच्या काव्यदृष्टीचा आणि रचनापद्धतीचा त्यांच्या काव्यलेखनावर प्रभाव होता. ‘काव्यविहार’, ‘स्फूर्तिलहरी’, ‘स्फूर्तिनिनाद’, ‘स्फूर्तिविलास’ हे त्यांचे काव्यसंग्रह असून नाट्य सुगंध आणि नाटककार देवल व्यक्ती आणि वाङ्मय हे त्यांचे नाट्यसमीक्षा ग्रंथही प्रसिद्ध आहेत.

 

विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गो. चिं. भाटे यांची ‘प्रेम की लौकिक’ ही कादंबरी विषयाच्या वेगळेपणामुळे तत्कालीन कादंबरी विश्वात गाजली होती. त्यांनी प्रवास वर्णन हा वाङ्मय प्रकारही प्राचुर्याने हाताळला. कानडी वाङ्मयात मोलाचे योगदान देणारे प्राचार्य गोकाक आणि प्राचार्य मुगळी यांची वाङ्मयीन कारकीर्द इथेच बहरली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे प्राथमिक शिक्षणही मिरजेच्या शाळा नं. 1 मध्ये झाले.

 

उद्योग आणि उन्नतीचे संस्कार मराठी मनावर घडवणारी आणि नव्याने उदयाला येत असलेल्या शिक्षित मध्यमवर्गाची वैचारिक आणि वाङमयीन अभिरूची घडवणारी ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि आणिवा ही सुप्रसिद्ध मासिके सुरवातीला अनेक वर्षे या जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीतून प्रकाशित होत होती. नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. मासिकांचे संस्थापक संपादक शंकरराव किर्लोस्कर आणि नंतरचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे या संदर्भातले योगदान मौल्यवान आहे.

 

कवी सुधांशु आणि कथाकार म. भा. भोसले यांनी औदुंबर येथे सुरू केलेले सदानंद साहित्य संमेलन सत्तर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी भरत असते. महाराष्ट्रातल्या मुख्य साहित्य संमेलनांव्यतिरीक्त ग्रामीण भागात भरणारे महाराष्ट्रातले हे पहिले साहित्य संमेलन होय. या संमेलनाला महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व ख्यातनाम लेखक, कवी, नाटककार, ललित लेखक, समीक्षक अध्यक्ष म्हणून हजर राहिले आहेत. जिल्हास्तरावरची सर्वात जास्त म्हणजे जवळपास 16 साहित्य संमेलने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी नियमितपणे भरत असतात. मराठीतले मान्यवर ज्येष्ठ लेखक या संमेलनांना अध्यक्ष म्हणून आवर्जून येत असतात.

 

स्फुटकाव्य आणि खंडकाव्य लिहिणारे रविकिरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य कवी गिरीश (शं. के कानेटकर) यांचे सांगलीमध्ये वास्तव्य होते. त्यांचे सुपुत्र आणि पुढे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम नाटककार म्हणून प्रसिद्धी पावलेले वसंत कानेटकर यांचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले आणि आपल्या काही महत्त्वाच्या नाटकांचे लेखनही त्यांनी इथेच केले.

 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे हेही विलिंग्डन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी सांगलीत वास्तव्यास होते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि थोर लेखक आणि मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला, ते वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचेच. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. पुढे दत्तक गेल्यावर ते विष्णु सखाराम खांडेकर झाले. त्यांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. नंतरचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विं. दा. करंदीकर यांचे वास्तव्यही शिक्षक म्हणून काही काळ तासगावला होते. सुरवातीच्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या होत्या. सर्वश्री ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, ना. सं. इनामदार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर या सांगली जिल्ह्यातील प्रतिभावंत कवी, लेखक आणि समीक्षकांना मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.

 

वंचित, उपेक्षित, बहिष्कृत म्हटल्या गेलेल्या जमातीचे अनोखे दर्शन घडवणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीने बुलंद करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे, लावणीचे अध्वर्यू पठ्ठे बापूराव, अपरिचित अनुभवांचे सशक्त चित्रण करणारे श्री. दा. पानवलकर, दलितांच्या वेदना आणि दुःखांना शब्दरूप देणारे कथाकार बंधुमाधव, ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडणारे चारुता सागर, देवदत्त पाटील, भक्तीरसाचा आविष्कार करणारे कवी सुधांशु, गीतकार पी. सावळाराम, कवी व लोकसाहित्याचे अभ्यासक अशोकजी परांजपे, गीतकार सुधीर मोघे, लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर, तारा भवाळकर, सय्यद अमीन, सुलेखनकार र. कृ. जोशी, जीवनातील विरुपतेचे दर्शन घडविणाऱ्या कमल देसाई, प्राकृत साहित्याचे संशोधक ग. वा. तगारे, पानिपतकार विश्वास पाटील इत्यादींनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने आणि सौंदर्याने सांगली जिल्ह्याचे नाव आणि लौकिक वृद्धींगत केला आहे. अनिल दामले, शैला सायनाकर, कथाकार वामन होवाळ, कवी अभ्यासक अरुण कांबळे तसेच ललित लेखनाचे नितांत सुंदर रूप दाखवणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. जी. के. ऐनापुरे, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्राप्त वसंत केशव पाटील आणि बलवंत जेऊरकर, प्रा. वैजनाथ महाजन, कमलेश वालावलकर, संजीव खांडेकर यांच्यासारखे अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत…

  • अविनाश सप्रे (लेखक साहित्य अकादमीचे सदस्य आहेत)

 

 

 

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’ राबविणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह

मुंबई, ता. १२ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच ‘बालस्नेही पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून हे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी दिली.

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. बहुतांश प्रकरणात आरोपी हा पीडित बालकांच्या ओळखीतला असतो. तक्रार करण्याची भीती, सामाजिक दबाव यामुळे अनेक प्रकरणे दडपली जात असल्याचे निदर्शनात येते. या प्रकरणात तक्रार करण्याचे प्रमाण वाढावे, शाळांमध्ये बाल अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रभावी प्रतिसाद प्रणाली उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क आणि समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे आहे यासाठी आयोग बालरक्षा अभियान राबवित असल्याची माहिती अध्यक्षा शहा यांनी दिली.

या अभियानाचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी ‘बालरक्षा अभियान’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपर पोस्टर्सचे अनावरण, बालकांच्या तक्रार निवारणासाठी विकसित व सुधारित ‘बालस्नेही चिराग ॲप’ लाँच केले जाणार आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, अकोला, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बालरक्षा अभियान कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यात शिक्षक, पालक, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी व निवडक विद्यार्थी यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ७,००० जणांना बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्देश बालकांच्या सुरक्षिततेविषयी शिक्षक व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शालेय वातावरण अधिक सुरक्षित बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे, असे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने ‘बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा, संस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय ‘बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेच, बालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, हे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेत, त्याचे विवरण खालील प्रमाणे –

महसूल विभाग : ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी

पोलीस विभाग : जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी

शालेय शिक्षण विभाग : प्रत्येक महसूली विभागातून १ शाळा, अशा ६ शाळांचा गौरव

 महिला व बालविकास विभाग : एकूण ९८ अधिकारी व कर्मचारी, तसेच संस्था यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

‘जल जीवन मिशन’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई दि. 12 : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सुरू असलेल्या 1164 योजनांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. इतर योजनांची  कामे गतीने वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा काळ्या यादीत समावेश करावा. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची डेटा एंट्री वेळेत करावी. महिला बचत गटांमार्फत कचरा संकलन आणि वर्गीकरण करण्याची उपाययोजना करावी. ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्ती करून गावस्तरावर स्वच्छता व्यवस्थापन प्रभावी करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि शौचालयांच्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

आढावा बैठकीस जलजीवन मिशनचे संचालक ई. रवींद्रन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव बी. जी. पवार, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

भंडारा जिल्ह्यातील ‘साहित्य’ सोनियाच्या खाणी

नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील साहित्यविषयक आढावा घेतलेला प्रा.नरेश दे.आंबिलकर यांचा विशेष लेख

भंडारा जिल्ह्याच्या नावाची उत्पत्ती ‘भण भण’या शब्दापासून झाली आहे असे सांगितले जाते. पितळी भांड्याच्या ठोकापिटीतून या जिल्ह्याचे नाव भंडारा पडले असावे. भंडारा जिल्हा तलावांचा, धानाच्या कोठाराचा आणि विविध खाणींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात  प्राचीन काळापासून साहित्याच्याही खाणी असल्याचे आढळून येते. भंडारा जिल्ह्याने साहित्यासाठी दिलेल्या योगदानातून या जिल्ह्याचे वेगळेपण अधोरेखांकित होते.

भंडारा जिल्ह्याचे महत्त्व सांगताना कवी द.सा.बोरकर म्हणतात

“ महाराष्ट्राच्या पूर्व क्षितिजी चमचम चमके तारा /

इतिहासाशी नाते सांगतो आमचा भंडारा /

माझा प्यारा भंडारा //

भंडाऱ्याच्या प्रांती होती परगणे प्रसिद्ध /

कालिदास भवभूती  नांदले हरीनाथ सिद्ध /

आद्य मराठी ग्रंथ निर्मिला मुकुंदराजे आंभोरा /

इतिहास असे नाते सांगतो आमचा भंडारा /

माझा प्यारा भंडारा “

भंडारा जिल्ह्याचे  साहित्यातील योगदान मोठे असल्याचे इतिहासावरून लक्षात येते. नाटक हा कलाप्रकार राजप्रसादातून सामान्य जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भवभूती या नाटककाराने केले.  भवभूतीचे कार्यस्थान आमगाव तालुक्यातील पदमपुर हे आहे. भवभूतीने सुरू केलेली नाट्यलोकाश्रयाची  परंपरा आजही  झाडीपट्टीतील नाटकांच्या रुपाने जिवंत आहे. इसवी सन 1188 मध्ये लिहिल्या गेलेल्या आद्य काव्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ने भंडारा जिल्ह्याच्या साहित्याची मोहर संपूर्ण मराठी साहित्यावर उमटवली आहे.  ‘विवेकसिंधू’ या ग्रंथात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा व आंभोऱ्याचा उल्लेख  पुढील प्रमाणे आहे

वैन्यागंगेचिये तीरी/मनोहर अंबानगरी /

तेथे प्रकटले श्रीहरी/ जगदीश्वरु /

या ओळीतून भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी वैनगंगा नदीच्या तीरावरील मनोहर असलेली अंबानगरी  म्हणजे आजचे आंभोरा हे ठिकाण होय. या ग्रंथाच्या निर्मितीची साक्ष देत आंभोरा आज अभिमानाने उभा आहे.

भंडारा जिल्ह्याने महानुभव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांना पहिला शिष्य दिला. या पहिल्या शिष्याचे नाव आहे नीळोभट्ट भांडारेकर. लीळाचरित्राच्या एकाकातील ‘भांडारेकरां भेटी’ या लीळेत भंडाऱ्याच्या या शिष्याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. श्रीचक्रधरस्वामी  भंडारा येथे आले असतांना त्यांची नीळोभट्ट भांडारेकर यांच्याशी भेट झाली. श्रीचक्रधरस्वामी यांच्या भेटीनंतर नीळोभट्ट भांडारेकर हे सदैव श्रीचक्रधरांच्या सोबत राहिले. भंडारा येथून जातांना नीळोभट्ट भांडारेकर पत्नीला उद्देशून म्हणाले “एतुले दिस तुम्हांपासि होते: आता जयाचे तयापाठी जात असे:तुम्ही राहा:”

नीळोभट्ट व श्रीचक्रधरस्वामी यांच्या गुरु – शिष्य प्रेमाचे दाखले लीळाचरित्रात पदोपदी आढळतात. ‘भांडारेकारा देहावसान’  या लीळेतून श्रीचक्रधरस्वामी आणि नीळोभट्ट भांडारेकर यांचे  नाते किती अतूट होते हे दिसून येते.

मृत्यूसमयी त्यांचे डोके श्रीचक्रधरस्वामींच्या मांडीवर होते. मृत्यूसमयी नीळोभट्ट भांडारेकर श्रीचक्रधरांना म्हणाले  “ना:जी:हे सन्निधान जानु उसीसेया: जी जी : आता देह जाए तरि बरवे” . श्रीचक्रधरस्वामींनी  नीळोभट्टाचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख आहे.

श्रीचक्रधरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भंडारा शहरातील पाणीपात्र मंदिर, भोजनता मंदिर, दत्तात्रय मंदिर, पट्टीशाळा, वनदेवबाबा मंदिर तसेच आद्य शिष्य नीळोभट्ट भांडारेकर यांचे  घर राहते  ही सर्व ठिकाणे आज सर्व महानुभाव संप्रदायाच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत.

श्रीचक्रधरांनी झाडीपट्टीतील या भागाला अनेक वेळा भेटी दिल्याचे लीळाचरित्रातील लीळांवरुन स्पष्ट होते. ‘डाकरामी व्याघ्र बीद्रावण’,‘झाडी रामद्रणेचा भेटी’ या लीळा झाडीपट्टीतील आहेत.  झाडीपट्टीचा आणि लीळाचरित्राचा संबंध डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘लीळाचरित्रातील अर्थभेद’ या लेखातून उलगडून दाखविला आहे. यात आहाता, बुड्डा, आंबिल, कांजी, वेळण (येरन) गुळ, भेली, अडणी, तिवाई, भावसन, भाणे, सिलीक, सीत, खराटा, पालो, कोर, खांड, फोड, बोडी, पेंडी, पाटनी, वखर, कडप, वाक, पाड, मेर, वागूर, तीज, दर, इसाळ, गडन, लवन, हेंदडा, नोकणे, करु, सुसवणे, वोदरणे, भवणे, आटणे, उमटणे, खिरणे, पाचारणे या झाडीपट्टीतील शब्दांचा नेमका अर्थ सांगितला  आहे.  झाडीपट्टीतील या शब्दांचा नेमका अर्थ समजून न घेता काही नामवंत अभ्यासकांनी कसा चुकीचा अर्थ सांगितला आहे  हे साधार  डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी पटवून दिले आहे.

भंडारा जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील साहित्य सापडत नाही मात्र साहित्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा जिल्हा मध्यंतरीच्या काळात कसा कोरडा राहिला याचे आश्चर्य वाटते. कदाचित काळाच्या उदरात हे साहित्य आजही लपलेले असावे. चिकाटीने शोध घेत राहिल्यास मध्ययुगातील हे साहित्य समोर यायला वेळ लागणार नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वरदहस्त भंडारा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.  ग्रामगीतेची प्रयोगशाळा राष्ट्रसंतांनी भंडारा जिल्ह्यातील आमगाव या ठिकाणी उभारली होती. राष्ट्रसंताच्या साहित्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ‘ग्रामगीता’. ग्रामविकासाचे वेगवेगळे उपाय राष्ट्रसंतांनी 41 अध्यायातून सांगितले आहेत. खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामगीतील बहुतांश प्रयोग हे भंडारा जिल्ह्यातील ‘आदर्श आमगाव’ या ठिकाणी  राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष करुन पाहिले.

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील आदर्श गाव हे भंडारा जिल्ह्यातील आमगाव हेच आहे. या आमगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राबविलेल्या उपक्रमात ग्रामनियोजन वर्ग, न्यायपंचायत, ग्रामपंचायत संमेलन, सामुदायिक कृषी योजना, गौसेवा, महिला सर्वागीण शिक्षण प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश होता.

आमगावात श्रीगुरुदेव सहकारी धान्य भंडार, श्रीगुरुदेव तेलघाणी, कला मंदिर, चिकित्सा मंदिर, सेवाश्रम, अध्ययन मंदिर, व्यायाम मंदिर, श्रीगुरुदेव जंगल कामगार सोसायटी, श्रीगुरुदेव भारत नवनिर्माण विद्या मंदिर, प्रचार प्रशिक्षण केंद्र यांची स्थापना केली. याच ठिकाणी पहिल्यांदा अत्याधुनिक विद्युतदीप राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केले. आमगावातील या सर्व यशस्वी प्रयोगाची नोंद  ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायात आलेली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची प्रयोगशाळा असलेल्या या आमगावाला राष्ट्रसंतांनी राज्यपाल श्रीपट्टाभिसीतारामय्या, आरोग्यमंत्री मा.सा.कन्नमवार, मध्यप्रांताचे अन्नमंत्री दीनदयाल गुप्ता, उद्योगमंत्री अशोक मेहता, विकास मंत्री रा.कृ. पाटील, कृषिमंत्री शंकरराव तिवारी, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पंडित कुंजीलाल दुबे, लोककर्म मंत्री राजा नरेशचंद्र, रेल्वेमंत्री व नंतरचे भारताचे प्रधानमंत्री झालेले लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा, तुकारामदादा गीताचार्य, मंत्री गुलजारीलाल नंदा, मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल, गृहमंत्री कैलासनाथ काटूज, जयप्रकाश नारायण या सर्वाना भेट द्यायला लावून आदर्श गावाची संकल्पना समजून सांगितली.

सर्वात महत्त्वाची  बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी आयोजित 18 व्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीते’चे प्रकाशन 25 डिसेंबर 1955 ला तुमसर येथील या संमेलनात करण्यात आले. या संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध साहित्यसंपदेबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात तुकडोजी महाराज म्हणाले होते “हा ग्रामगीता ग्रंथ बिघडलेल्या जीवनाला विशाल मानवतेची जाण करून देईल” राष्ट्रसंतांच्या साहित्य निर्मितीत भंडारा जिल्ह्याचे योगदान  किती मोठे होते हे लक्षात येते.

आधुनिक काळात भंडारा जिल्ह्यातील साहित्यिक ना.रा.शेंडे यांचे साहित्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. भंडारा शहरातील गणेशपुर येथील रहिवाशी असलेले ना.रा.शेंडे  विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य  संघाच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.ना.रा.शेंडे यांनी विपुल  साहित्य निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या ‘मी व माझे लेखन’ या पुस्तकात ते म्हणतात “ मी 20 कादंबऱ्या, 8 नाटके, 65 लघुकथा, 150 कविता, एक धर्मग्रंथ, एक चरित्रग्रंथ  लिहिला.” मात्र त्यांनी यातील बहुतांश ग्रंथ होळीत जाळून टाकल्याचे त्यांनी ‘मी व माझे लेखन’या ग्रंथात नमूद केले आहे.ना.रा.शेंडे यांनी अनेक संत व राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचे लेखन केले. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ‘माहिती अधिकारी’हे पद मिळाले होते. त्यांचा आज उपलब्ध असलेला व अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेल्या ग्रंथ म्हणजे ‘लोकसाहित्य संपदा’ हा आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला. मात्र आज ना.रा.शेंडे यांचे ग्रंथ दुर्मिळ झाले आहेत.

‘बोलीमहर्षी’या पदवीने सन्मानित असलेले डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचेही साहित्य क्षेत्रातील स्थान फार मोठे आहे. संशोधक, लोककलेचे तारणहार म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा नावलौकीक  आहे. शासनाचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना मिळाले आहे.त्यांनी साकारलेला ‘झाडीबोली मराठी शब्दकोश’ हा बोलीतील एक मैलाचा दगड आहे. झाडीपट्टीतील लुप्त पावलेल्या लोककलांना त्यांनी पुनरुज्जीवित केले. आज झाडीपट्टीत जेवढे नाट्यप्रयोग होतात तेवढे संपूर्ण महाराष्ट्रात होत नाहीत. त्यांच्यामुळे दंडार, खडीगंमत या लोककलांना संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे. एकंदरीत भवभूतीपासून सुरू झालेला हा साहित्य प्रवाह आजही भंडारा जिल्ह्यात अविरतपणे वाहत आहे

संदर्भ

१) प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास – ल. रा. नसीराबादकर फडके प्रकाशन कोल्हापूर .

२)  झाडीबोलीतील मराठी शब्दकोश – डॉ.  हरिश्चंद्र बोरकर विजय प्रकाश,  नागपूर.

३) ग्रामगीता – वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज  साहित्य प्रकाशन समिती अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ मोझरी.

४) लोकसाहित्य संपदा -ना. रा. शेंडे विदर्भ साहित्य संघ प्रकाशन नागपूर

५) मी आणि माझे लेखन -ना. रा. शेंडे श्रीशेष प्रकाशन गणेशपुर.

६) लीळाचरित्र – डॉ. वि. भ. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई

७) झाडीपट्टीत राष्ट्रसंत – डॉ. हरिश्चंद्र बोरकर झाडीबोली साहित्य मंडळ साकोली

०००

  • प्रा.नरेश दे.आंबिलकर, मराठी विभाग प्रमुख, नटवरलाल जशभाई पटेल कला वाणिज्य महाविद्यालय मोहाडी, जि.भंडारा भ्रमणध्वनी- 9423112181, ई-मेल  ambilkarnaresh@gmail   

आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई, दि. १२ : ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा AI सँडबॉक्स’ म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनाला गती देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञांना MTW 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, श्री. अश्विनी वैष्णव, आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, उद्योगपती आकाश अंबानी तसेच गुगल डिपमाईंड, ॲन्थ्रोपिक, स्केल, कृत्रिम, सर्वम, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि सेल्सफोर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचे ‘एआय’ क्षेत्रातील तज्ज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबईची टेक इकोसिस्टम आणि TEAM ची भूमिका

TEAM ही मुंबईतील तंत्रज्ञान उद्योजकांची अग्रगण्य स्वायत्त संघटना आहे. या संघटनेमध्ये 65 हून अधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न कंपन्यांचे संस्थापक असून, त्यांची एकत्रित बाजारपेठेतील किंमत $60 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

TEAM च्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये ड्रिम11 चे सह-संस्थापक हर्श जैन, हापटिकचे सह-संस्थापक आकृत वैष, द गुड ग्लॅम ग्रुपच्या नय्या साग्गी, लॉगीनेक्स्टचे ध्रुविल संघवी आणि GoQii चे विशाल गोंडल यांसारखे नामवंत उद्योजक समाविष्ट आहेत.

मुंबई टेक वीक 2025 : भारताला जागतिक ‘एआय’ स्पर्धेत आघाडीवर आणण्याचा प्रयत्न

या महोत्सवाच्या माध्यमातून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर, स्टार्टअप्ससाठी नवीन संधी, भारतीय ‘एआय’ संशोधन, आणि उद्योजकांसाठी गुंतवणूक व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. देश-विदेशातील तंत्रज्ञ, संशोधक आणि गुंतवणूकदारांसाठी हा कार्यक्रम या क्षेत्रातील संधींचे दार उघडणारा ठरणार आहे.

MTW 2025 साठी नोंदणी आणि अधिक माहिती

➡️ अधिकृत वेबसाइट: www.mumbaitechweek.com

➡️ ताज्या घडामोडींसाठी आम्हाला फॉलो करा: LinkedIn | Twitter | Instagram

 

——000——-

ताज्या बातम्या

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर राज्यात “इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ” स्थापन करण्यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आरोग्यमंत्र्यांकडे...

0
मुंबई, दि. 21 : आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थानी आज आरोग्य...

भटक्या-विमुक्तांचे सर्वेक्षण करून दाखले तत्काळ वितरित करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

0
मुंबई, दि. २१ : भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात यावीत. सर्वेक्षण करून, त्यांना महत्वाच्या दाखल्यांचे वितरण करुन शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून...

धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

0
धुळे, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार...

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीचा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला आढावा 

0
मुंबई, 21 : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज सुरळीत होण्यासाठी नियोजन योग्य करण्याच्या सूचना...

पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा – नगरविकास...

0
मुंबई, दि. 21 : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांची पुररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागा विकासासाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गुजरात राज्याच्या धर्तीवर रिव्हर बंडिंगचा पर्याय...