शनिवार, मे 24, 2025
Home Blog Page 227

विभागस्तरावर ‘कृषी कक्ष’ स्थापन करणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागपूर, दि. 13 : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना  व उपक्रम राबविण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अडचणी व समस्या सोडविणे सुकर व्हावे यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील वनामती येथील सभागृहात शेतकऱ्यांनी अनेकविध सूचना, अपेक्षा, अडचणी कृषीमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषी आयुक्त सुरज मांढरे, अपर आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणी फाउंडेशनचे डॉ . अविनाश पोळ,  विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, क्षेत्र संचालक (पेंच) प्रभुनाथ शुक्ला, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह विभागातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रयोगशील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिके आयोजित करावीत. तंत्रज्ञानामध्ये पुढे जात शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध असून यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री श्री. कोकाटे म्हणाले.

शेतक-यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. या प्रयोगाची माहिती ही शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शेतकरी हा प्रयोगशील असतो. त्यामुळे शेतक-यांचे प्रयोग हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले.

 शेतक-यांचे एकूण 13 गट आज सहभागी झाले होते. प्रत्येक गटात 20 शेतकरी याप्रमाणे विभागणी करण्यात आली होती. या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अडचणी व सूचना मांडल्या. गडचिरोलीतील भामरागड ते नागपुरातील सावनेर अशा नागपूर विभागाच्या सर्वच भागातील शेतक-यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले. तर आभार विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी मानले.

राज्यपालांकडून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. १३ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव यांनी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन विद्यापीठाच्या कामकाजाचे सविस्तर सादरीकरण केले.

यावेळी कुलगुरूंनी राज्यपालांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, भारतीय ज्ञान, संस्कृत तसेच योग केंद्राची माहिती, भाषांतर प्रकल्पाचे कार्य, उच्च शिक्षण संस्थांमध्ये आंतरवासिता धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र, संस्कृत भाषा विभागाचे सबलीकरण, वसतिगृह सुविधा, शाळांशी संवाद, स्वच्छ भारत अभियान, विकसित भारत, विदेशी विद्यापीठांशी सहकार्य, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी उपक्रम, क्रीडा विकास, विद्यापीठाच्या सर्वोत्तम प्रथा, कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादी विषयांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीला विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ रुबी ओझा, कुलसचिव विलास नांदवडेकर, विज्ञान आणि  तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ हिम्मत जाधव उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor reviews work of SNDT Women’s University

The Vice Chancellor of Shreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University (SNDT) Prof. Ujwala Chakradeo presented a detailed overview of the university to the Governor of Maharashtra and Chancellor of universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Thursday (13 Feb).

The Vice-Chancellor apprised the Governor of the implementation NEP 2020, Indian Knowledge System Courses Integration, Strengthening of Sanskrit Department, Translation project, Internship policy in HEIs, Common Academic Calendar, Students Grievance Redressal Forum, Hostel facilities, School Connect, Swachh Bharat Abhiyan, ‘Viksit Bharat@2047’, collaboration with foreign universities, initiatives for the upliftment of tribal students, skill development, Best Policies of University and other related subjects.

Pro Vice Chancellor Ruby Ojha, Registrar Vilas Nandavadekar and Dean Prof. H. T. Jadhav were present.

 

0000

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, १३ : राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा गुणगौरव शासनामार्फत करण्यात येतो. राज्याचे युवा धोरण अंतर्गत राज्य युवा पुरस्कार शासनामार्फत देण्यात येतो. या पुरस्कारासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील  १ युवक, १ युवती  व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप युवक-युवती यांना रोख रुपये ५० हजार व संस्थेस १ लाख तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवक पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रत, आवश्यक छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली), तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, समता नगर, कांदिवली, मुंबई येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या कमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा या संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

मोहिनी राणे/ससं/

सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १३ :  समाज कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींना दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी  इच्छुक व्यक्तींनी व संस्थांनी आपले अर्ज १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर.सी. चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबूर (पूर्व) मुंबई, ७१ या पत्त्यावर विहित नमुन्यात सादर करावेत.

अधिक माहितीसाठी   ०२२-२५२२२२०२३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

१०वी व १२वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे १० मार्च पर्यंत स्वीकारले जाणार

मुंबई, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे इयत्ता १०वी व १२वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफ लाइन अर्ज मागविले जातात. माहितीचे संकलन कार्यालयाद्‌वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठवले जातात. सन २०२४-२५ पासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारा ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांनी या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे १० मार्च, २०२५ पर्यंत  सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

खेळाडू विद्यार्थी,  जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणाली‌द्वारे आपोआप पाठवली जाईल. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालय, अथवा शिक्षण मंडळास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाहीत. अशा प्रकाराचा ऑफलाइन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद  आहे.

000

बंदीजनांच्या कुटुंबियांशी संवादासाठी ई-मुलाखत सुविधा;राज्यात ३ लाख १६ हजार ६४७ ई-मुलाखती

मुंबई, दि. १३ : बंदीजनांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई- प्रिझन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत ई- मुलाखत सुविधा ०४ जुलै २०२३ पासुन कार्यान्व‍ित झाली आहे. ही सुविधा सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत ०१ जानेवारी २०२४ ते ०९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये बंद्यांच्या संवादासाठी राज्यात ३ लाख १६ हजार ६४७ ई-मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

या कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह ४५ हजार १७४, तळोजा मध्यवर्ती कारागृहात ४३ हजार ८४८, ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ३६ हजार ३७१, मुंबई मध्यवर्ती कारागृहात २९ हजार ३४७, नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे ३१ हजार ४४४, कल्याण जिल्हा कारागृहात २२ हजार ६०८, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे २३ हजार ८६० इतक्या ई-मुलाखती झालेल्या आहेत. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंदीजनांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

पूर्वी मुलाखत नाव नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरुन प्रवास करुन कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पहावे लागायचे. त्यामुळे बंद्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु आता बंदीजनांसोबत मुलाखत घेण्याकरिता नातेवाईक काही दिवस आधीच ई प्रिझन  (ePrisons)  प्रणालीद्वारे नोंदणी करतात.  त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी संवाद साधता येतो.

राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल आहेत. त्यांची परदेशातील मुले, मुली व नातेवाईकांशी ई-मुलाखत अथवा व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर सुविधा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये ११०५ पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु ही सुविधा सुरु झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद होत आहे. त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेशी बंद्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.

बंदीजनांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे यांचे २२ मार्च २०२४ रोजीचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार न्यायाधीन बंद्यांना महिन्यातून चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईक, मित्र व वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन ई मुलाखत सुविधा देण्यात येत आहे. बंद्यांना ही सुविधा देण्यासंबंधीच्या या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

बंदीजनांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाईकांचा या  सुविधेकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष संवादासाठी येण्याच्या खर्चातदेखील बचत झालेली आहे. या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत पुणे येथील कारागृह व सुधारसेवेचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.

ही सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरिता सर्व कारागृहांच्या दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच नातेवाईक भेटीच्या ठिकाणी बंद्यांच्या नातेवाईक अथवा वकील यांना एनपीआयपी पोर्टलवर मुलाखत नोंदणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक एलईडी स्क्रीनवर व्हिडीओ क्लीपद्वारे दाखवण्यात येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांच्या नातेवाईकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असल्याचे कारागृह प्रशासनाने कळविले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी- मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. १३ : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

००००

 

अर्चना देशमुख/विसंअ/

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा

मुंबई, दि. १३ : राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी गुरुवारी (दि. १३) डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरु प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी राज्यपालांपुढे विद्यापीठ कामकाजासंदर्भात सादरीकरण केले.

बैठकीत विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस संकल्पना, सेंटर ऑफ हॅपिनेस, भावी योजना, शैक्षणिक वेळापत्रक, शाळांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, स्वच्छ भारत अभियान, ‘विकसित भारत’ उपक्रम, आदिवासी विद्यार्थी उत्थान योजना, क्रीडा संस्कृतीला चालना आदी विषयांवर चर्चा झाली.

डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठामध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था यांसह ६ संस्थांचा समावेश आहे.

बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये हे देखील उपस्थित होते.

0000

Maha Governor reviews functioning of Homi Bhabha University

Maharashtra Governor and Chancellor of Universities C P Radhakrishnan reviewed the progress of implementation of various programmes and policies by the Dr Homi Bhabha State University at Raj Bhavan, Mumbai on Thursday (13th Feb).

Vice-Chancellor of HBSU Prof. Rajanish Kamat made an elaborate presentation before the Governor on the occasion.

Issues such as the implementation of NEP 2020, Innovative programmes, the concept of Professor of Practice, Center of Happiness, Future Plans of the University, Academic Calendar, School Connect programme, Hostel facilities for students, ‘Viksit Bharat’ initiative, Tribal Student Upliftment Scheme etc were discussed at the meeting.

The Homi Bhabha State University has under its aegis six Colleges including the Elphinstone College, Sydenham College, Secondary Training College and The Institute of Science.

Registrar of the University Prof Vilas Padhye was also present.

 

000

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ आदर्श निर्माण करेल- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १३: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे मंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कल्याणकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत श्री. सरनाईक  बोलत होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ रोजी आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.

राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क व ३०० रुपये  वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने  चालकांना सभासद नोंदणी करता येईल. स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होणार आहे.

तसेच ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत १० हजार रुपये  सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.

कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असेही श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले. बैठकीला परिवहन आयुक्त  विवेक भीमनवार यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

000

नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.१३ : पार्टीकल ॲक्सीलरेटर (कण त्वरक) तंत्रज्ञान पूर्वी संशोधनापुरतेच मर्यादित होते. आता ते कॅन्सर सारख्या आजारावर उपचार तसेच शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखासह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतात सद्यस्थितीत अवघी २४ सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी एक हजार केंद्राची आवश्यकता आहे. नागपूर येथे विविध वैद्यकीय व अभियांत्रिकी पायाभूत संस्था असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृतीगट स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपूर येथे सायक्लोट्रॉन केंद्राच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल, प्रो.किशोर भूरचंडी, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, आयजीएमसीचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे संचालक वैद्यकीय संचालक डॉ.आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर उपस्थित होते.

नागपूरमध्ये व्हीएनआयटी, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या  आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या पायाभूत संस्था आहेत. यादृष्टीने विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्यभारतासाठी महत्वाचे ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी, जलशुद्धीकरण, आरोग्य, ऊर्जा अन्य प्रक्रिया सारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालने सक्षम होण्यास मदत होईल, असे एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सादरीकरणात सांगितले.

संशोधन, वैद्यकीय क्षेत्रासह कॅन्सरवरील उपचार, भौतिक विज्ञान व अभियांत्रिकी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरेल, असे व्हीएनआयटीचे संचालक प्रेम लाल पटेल यांनी सांगितले. मध्य भारतातील आवश्यक अशा या केंद्राच्या उभारणीसाठी व्हीएनआयटी सर्वतोपरी योगदान देईल. व्हीएनआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात रस घेणारे संशोधक पुढे आले आहेत. असे श्री. पटेल यांनी सांगितले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक यांनी मध्य भारतासह विदर्भ-मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांना याद्वारे होणाऱ्या लाभासंदर्भात सादरीकरण केले.

0000

ताज्या बातम्या

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार...

0
एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचाही वापर मुंबई, दि. २३ : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

0
मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत...

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

0
मुंबई, दि. २३ : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे...

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा; मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण...

0
मुंबई, दि.२३ : मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तर मंत्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार...

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सांगली, दि. 23 :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस...