शनिवार, मे 24, 2025
Home Blog Page 226

ग्रामीण डाक सेवकांची २१ रिक्त पदे भरली जाणार; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर

ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे आवश्यक आहे. कोणत्याही अन्य माध्यमाद्वारे आलेले व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिसूचने मध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार शुल्क भरणे आवश्यक आहे.

पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोनकॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच  उमेदवारांशी, पत्रव्यवहार, केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अवैध फोन कॉल्सपासून सावध राहावे, अधिक माहितीसाठी www.indiapostgdsonline.gov.in संकेस्थळास भेट द्यावी. नियम व अटी, वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000

मोहिनी राणे/ससं/

विलेपार्ले येथे १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागिर व उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १८ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार असून, दररोज सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय ‘मधुबन’ मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ तसेच इतर ग्रामोद्योग उत्पादने यांसारख्या वस्तूंचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांबरोबरच आरोग्यासाठी लाभदायक सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील ६५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागांतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मधकेंद्र (मधमाशापालन), मधाचे गाव तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना आर्थिक मदत आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी दिली जाते.

ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक उत्पादने अनुभवण्याची तसेच खादी आणि ग्रामोद्योग वस्तूंची खरेदी करण्याची सुवर्णसंधी या प्रदर्शनात मिळणार आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक मुंबईकर नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग सभापती साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाविस्कार यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या लाभार्थ्यांची ‘लकी ड्रॉ’द्वारे निवड

मुंबई, दि. 14 : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन बालकांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील 17 विविध योजनांच्या एकूण 234 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रतिलाभार्थी याप्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे.  सर्वसाधारण गटातील प्रमोशन ऑफ रिक्रेशनल फिशरीज या 50 लक्ष रुपयांच्या योजनेचा लाभ एका लाभार्थ्याला देण्यात आला. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या 6 लाभार्थ्यांना आणि 32 महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. तसेच मत्स्य तलाव योजनेसाठी 6 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी 25 लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी 27 लाभार्थी निवड करण्यात आली. प्रत्येकी 25 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी 54 लक्ष या प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लक्ष  रुपयांचा लाभ दिला जातो. 10 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी 5 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रतिलाभार्थी 40 लक्ष याप्रमाणे एकूण 2 कोटींचा लाभ दिला जातो.

20 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना यासाठी 4 महिला लाभार्थी, प्रती लाभार्थी 80 लक्ष  या प्रमाणे 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर दीड कोटी रुपयांच्या 50 टन क्षमतेचे शीतगृह आणि बर्फ कारखाना यासाठी एका महिला लाभार्थीची निवड करण्यात आली. 6 लाभार्थींना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांच्या रेफ्रिजेरेटेड व्हेईकलचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत एकूण दीड कोटींच्या लाभाचे वाटप होणार आहे. इन्सुलेटेड व्हेईकल गटात 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे एकूण 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

याशिवाय 75 हजार रुपयांच्या मोटार सायकलसह आईस बॉक्स गटासाठी 9 लाभार्थी, 3 लक्ष रुपयांच्या थ्री व्हीलर सह आईस बॉक्स इन्क्लुडिंग ई-रिक्शा फॉर फिश वेंन्डीग या गटासाठी 7 लाभार्थींची निवड करण्यात आली. 20 लक्ष रुपयांच्या लाईव फिश वेन्डींग सेंटरसाठी 37 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या गटात प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे 7 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ  दिला जाणार आहे.

30 लक्ष रुपयांच्या मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 2 टन अ डे या गटासाठी 12 लाभार्थी, 1 कोटी रुपयांच्या मिडियम मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 8 टन अ डे या गटासाठी 1, प्रत्येकी 10 लक्ष रुपयांच्या कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क इन्क्लुडिंग किओस्क ऑफ ॲक्वेरिअम, ओर्नामेंटल फिश या गटासाठी 9 महिला लाभार्थी आणि पारंपरिक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौकांना सहाय्य या योजनेसाठी 18 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 1 कोटी 20 लाख या प्रमाणे एकूण 21 कोटी 60 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनांसाठी राज्यभरातून एकूण तीन हजार अर्ज आले होते. यापैकी 234 लाभार्थ्यांची निवड आज लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली.

0000

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध – मंत्री डॉ. उदय सामंत

  • शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे
  • एमआयडीसीच्या रखडलेल्या समस्या सोडवू
  • जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील

परभणी, दि. १४ (जिमाका) : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो अन्नदाता आहे. त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही. बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उदघाटन मंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, संजीवनी मित्र मंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

अतिशय उत्कृष्ट रितीने कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे, असे कौतुक करुन मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, देशाने दखल घ्यावी, असे हे प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम पुढेही असाच सुरु ठेवावा. शेतकऱ्यांसाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी. शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करु नये. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. संरक्षण विभागाला सुमारे एक लाख टन कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कापूस खरेदी करुन त्यांना दिला जाईल. जिल्ह्यातील एमआयडीसीचे रखडलेले प्रश्न उद्योग मंत्री या नात्याने निश्चितपणे सोडविण्यात येतील, यासाठी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल. उद्योगासंबंधी ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविल्या जातील. जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. रोजगारासाठी जिल्ह्यातून होणारे स्थलांतर थांबविले जाईल. जमलेल्या महिलांना ग्वाही देताना डॉ. सामंत म्हणाले की, राज्य शासन लाडकी  बहीण योजना बंद करणार नाही.

प्रारंभी आमदार राजेश विटेकर आणि आनंद भरोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतीशील शेतकरी पुरस्कार-2025 ने जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. चंद्रकांत वरपुडकर, भूषण रेंगे, विजय कोल्हे, अशोक देशमाने, शिवाजीराव खटींग अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मंत्री डॉ. सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या. परभणी शहरातील वसमत रोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात भरविण्यात आलेले भव्य कृषी प्रदर्शन 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे, याचा शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

०००

 

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. १४ : सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहुल टंडन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसक, बीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा,इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते,  जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समूहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधन बचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅस, वीज वापर, योग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरले, सिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये  विद्यार्थी, तरूण, वाहन चालक, क्लिनर, कर्मचारी, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्व, फायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सायक्लोथॉन, वॉकेथॉन, चित्रकला स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

एथ ज्ञान हें उत्तम होये (भाग-१)

भगवद्गीतेतील ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हा एक प्रसिद्ध श्लोक आहे. तितका या श्लोकाचा उत्तरार्ध प्रसिद्ध नाही. वास्तविक अर्थनिश्चितीसाठी संपूर्ण श्लोक, त्याच्या पूर्वीचे आणि नंतरचे श्लोक, त्यांचे संदर्भ माहिती असणे आवश्यक असते. असे असले तरी, बऱ्याचदा अशी प्रसिद्धी अप्रसिद्धी होत असते. याचा प्रत्यय ज्ञान व्यवहारात येतो, तसाच ‘ज्ञानेश्वरी’च्या अभ्यास परंपरेतही येतो.

या विषयाकडे वळण्यापूर्वी काही बाबी पाहाव्या लागतात. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ या श्लोकावर ‘ज्ञानेश्वरी’त आठ ओव्यांचे निरूपण येते. त्यातील दुसऱ्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ‘एथ ज्ञान हें उत्तम होये। आणिकही एक तैसें के आहे। जैसे चैतन्य कां नोहो ।। दुसरें गा’ (४.७९) चैतन्य एकच असते, दुसरे नाही. तसे इहलोकी ज्ञान हे उत्तम, त्याच्या सारखे आणखी काही नाही. पुढे ते म्हणतात, सूर्याचे प्रतिबिंब तेजस्वी असले तरी ते सूर्याच्या कसोटीला लावता येईल का ? आकाशाला कवेत घ्यायला गेल्यानंतर त्याला कवेत घेता येईल का ? पृथ्वीच्या तोलाची उपमा सापडली तरच ज्ञानाला उपमा सापडेल. या सर्व ओव्यांतून ज्ञानाला दुसऱ्या कशाची उपमा देता येणार नाही, अशी ज्ञानदेवांनी ज्ञानाची थोरवी सांगितली आहे. ती ज्ञानसंन्यासयोगाचे निरुपण करताना वर्णिली आहे.

ज्ञानदेव हे योगी, तत्त्वज्ञानी, संत कवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. त्यांचा जीवनकाल इ.स. १२७५ ते इ. स. १२९६ असा मानला जातो. ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’, तसेच काही अभंगांची निर्मिती केली. आज ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती होऊन सातशे एकतीस वर्षे झाली. इतकी वर्षे होऊनही ‘ज्ञानेश्वरी’चा समाजावरील प्रभाव कमी झालेला नाही किंबहुना तो वाढत आहे. ‘ज्ञानेश्वरी’ हा श्रद्धाळू भाविकांच्या श्रद्धेचा, अभ्यासकांच्या अभ्यासाचा आणि टीकाकारांच्या टीकेचा विषय आहे. ‘ज्ञानेश्वरी’ इतके अनुसरण, गौरव आणि अभ्यास दुसऱ्या कोणत्याही मराठी ग्रंथाचे झाले नाही. शतकानुशतके माणसांच्या श्रद्धेचा, कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असणारा हा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला, तो केवळ भाविक, अभ्यासक यांच्या अखंड ज्ञानपरंपरेमुळे !

अशा या प्रदीर्घ ज्ञानपरंपरेत ज्ञानदेवांपूर्वी काय दिसते ? हे पाहाणे आवश्यक आहे. कारण, अनेकदा ‘ज्ञानेश्वरी’तील एखाद्या ओवीचा दाखला देऊन आपण किती प्रगत होतो. अशी उल्लेखले जाते. अशा उल्लेखांनी प्रभावीत होणे शक्य आहे. पण, ‘ज्ञानेश्वरी’ची थोरवी काही अशा उल्लेखांमध्ये नाही. हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेवांपूर्वी ज्ञान परंपरा, किमान त्यांचा क्रम लक्षात घ्यावा लागतो.

भारतीय विचारविश्वाची वैदिक, लोकायत, जैन, बौद्ध या क्रमाने; तर विज्ञानाची कणाद, आर्यभट्ट, भास्कराचार्य अशी परंपरा दिसते. वेदांतांची उपनिषदे, बादरायण प्रणित ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना प्रस्थानत्रयी मानले जाते. प्रस्थान म्हणजे आधारभूत ग्रंथ होय. भगवद्गीतेवर आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीची भाष्ये आज उपलब्ध नाहीत. ही भाष्ये आद्य शंकराचार्य (इ.स. ७८८ इ.स. ८२०), पैशाच भाष्य, रामानुजाचार्य (इ.स. १०१७ – इ.स. ११३७), श्रीमध्वाचार्य (इ.स. ११९९- इ.स. १२७८) अशी आहेत. अशा ‘भाष्यकारांते वाट पुसत’ ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ही गीतेवरील पहिली ओवीबद्ध मराठी टीका आहे. ज्ञानदेवांपूर्वी नाथ, बसवेश्वर, श्रीचक्रधर आदींचेही विचार आहेत. ज्ञानदेवांच्या काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. त्यापूर्वी या महऱ्हाटी प्रदेशावर सातवाहन, अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांची सत्ता होती. यातील पैठणच्या सातवाहनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार होता.

कालप्रवाहाच्या अशा एका विशिष्ट स्थानी ज्ञानदेव आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ पूर्वी काही महानुभावीय ग्रंथांचा अपवाद सोडला तर फारसे मराठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे मराठी साहित्य परंपरेतील पहिल्या काही ग्रंथांमध्ये ‘ज्ञानेश्वरी’चा समावेश होतो. ज्ञानदेवांनी इ. स. १२९० मध्ये नेवासे येथे ‘ज्ञानेश्वरी’ आणि त्यानंतर ‘अमृतानुभव’ची निर्मिती केली. ‘ज्ञानेश्वरी’ची ‘भावार्थदीपिका’, ‘ज्ञानदेवी’ ही पर्यायी नावे आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये ज्ञानदेव असा उल्लेख येतो; तर नामदेव हे ज्ञानेश्वर असा उल्लेख करतात. नामदेव हे ज्ञानदेवांचे पहिले चरित्रकार आहेत. त्यांनी आदि, समाधी आणि तीर्थावळीतून श्री ज्ञानदेव चरित्र लिहिले आहे. यातील आदि प्रकरणातील एका अभंगांमध्ये पैठण ते नेवासा हा प्रवास आणि ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’च्या निर्मितीचा उल्लेख येतो. ज्ञानदेव आणि भावंडे शुद्धिपत्र घेतल्यानंतर नेवाश्याला येतात. मागाहून ‘म्हैसा’ येतो. त्यानंतर प्राकृतमधून ‘गीतादेवी’ आणि ‘अमृतानुभव’ची निर्मिती होते. त्यानंतर म्हाळासेचे दर्शन घेऊन सगळे नेवाश्याहून पुढे निघतात. पुढे आळे गावाला ‘म्हैसा’ शांत होतो. त्यानंतर सर्वजण अलंकापुरीला म्हणजे आळंदीला जातात. या भावंडांचा हा बहुतांश प्रवास नदीमार्गे म्हणजे गोदावरी, प्रवरा, मुळामार्गे झाला असण्याला अधिक वाव आहे.

‘ज्ञानेश्वरी’ हे एक नागर काव्य आहे. ते सातशे एकतीस वर्षांपूर्वी नेवासा नगरीतील लोकांसमोर आकाराला आले. सामान्यतः ग्रंथ हे एकांतात लिहिले जातात; ‘ज्ञानेश्वरी’ लोकांतात लिहिली गेली. त्यातही ज्ञानदेवांसारखे प्रज्ञावंत हे श्रोत्यांना भगवद्गीतेचा अर्थ लोकांच्या ‘दिठीचा विषो’ होण्यासाठी मराठीतून, लोकभाषेत समजावून सांगतात. त्यावेळी ते ‘अतिहळुवारपणा चित्ता’ आणून ‘हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी ॥’ (१.५८) असे गीताभाष्य ऐकण्याचे गमक सांगतात. ग्रंथाच्या अखेरीस ‘किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेलें। एथ माझें जी उरलें। पाईकपण ||’ (१८ : १७९२) असे नम्रतापूर्वक सांगतात. ज्ञानदेव हे ‘ज्ञानेश्वरी’त अनेकवेळा श्रोत्यांचा गौरव करतात; ते कधीही स्वतःतील ऋजुता सोडत नाही. ‘ज्ञानेश्वरी’च्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

ज्ञानेश्वरी’ हा नीतिशास्त्राचा धडा असणारा एक अक्षरग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे एक काव्यमय प्रवचन आहे, एक श्रोतृसंवाद आहे. या ग्रंथातून ज्ञानदेवांनी मराठी भाषेतील ‘देशीकार लेणे’ घडविले, शांतरसाला श्रेष्ठ ठरविले आहे. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूप आहे, हे प्रतिपादिले. गुरुदेव रा. द. रानडे यांच्या मते, या ग्रंथात तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन आहे. तसेच त्यामध्ये सृष्टि निरीक्षणाचे सखोल व सूक्ष्म वर्णनही येते.

000

-प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे,

जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय,

ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे ता. नेवासा.

जि. अहिल्यानगर – ९४०४९८०३२४

श्री. आनंदराव जाधव, सांगली यांनी ‘स्त्री’ या कवितेतून स्त्रीयांचा गौरव केला आहे…

उत्सव अभिजात मराठीचा…!

श्री. आनंदराव जाधव, सांगली यांनी ‘स्त्री’ या कवितेतून स्त्रीयांचा गौरव केला आहे…

#उत्सवअभिजातमराठीचा
#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन
#अभामसासं-२०२५

माहेरवाशीणीच्या आठवणी सांगणारी श्रीमती मनिषा मिसाळ यांनी सादर केलेली ‘माहेरच्या आठवणी’ ही कविता….

उत्सव अभिजात मराठीचा…! माहेरवाशीणीच्या आठवणी सांगणारी श्रीमती मनिषा मिसाळ यांनी सादर केलेली ‘माहेरच्या आठवणी’ ही कविता…

 

अभिजात मराठी : अहिराणी बोलीचा इतिहास (भाग २)

अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत. त्यानिमित्ताने आपल्या राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यांना उजाळा या निमित्ताने देण्यात येणार आहे. या निमित्ताने खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले प्रगल्भ संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण दोन भागात देत आहोत.

खानदेशी बोली
१ ) प्रादेशिक प्रभेद – बागलानी, तप्तांगी, डोगरांगी, वरल्ह्यांगी, खालल्यांगी, नंदुरबारी, जामनेरी / तावडी, दखनी, घाटोयी
2) सामाजिक प्रभेद – अहिराणी / खानदेशी, लेवा पाटीदार, गुजरी, लोडसिक्की, काटोनी, तडवी, परदेशी, पावरी, महाराऊ
खानदेशात जनमानसात खानदेशी आणि अहिराणी ह्या दोन संकल्पना कधीही नव्हत्या. खानदेशी व अहिराणी हे दोन शब्द अर्थभेदक कधीही ठरले नाहीत. अहिराणी ही खानदेशाची मध्यवर्ती बोली. तिच्या प्रभावाने आजुबाजूच्या प्रदेशातील बोली ह्या त्या प्रदेशाच्या नावाने (प्रादेशिक प्रभेद बागलाणी, घाटोयी, तप्त्यांगी, खालल्यांगी, वरल्ह्यांगी, डोगरांगी, डांगी, जामनेरी इ.) तर जाती, जातीच्या बोली ह्या जाती वा समाजाच्या नावाने (सामाजिक प्रभेद महाराऊ, गुजरी, परदेशी, भिलाऊ, लेवा, पाटीदार, तडवी, इ.) ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आजही संपूर्ण खानदेशात जनसामान्यात व्यवहार करतांना प्रत्येकजण अहिराणी (खानदेशी) बोलत असला तरी कागदोपत्री, शाळेत नाव दाखल करतांना, जनगणणेचेवळी वा कुठलाही फॉर्म भरतांना मातृभाषा या रकान्यात “मराठी” हीच मातृभाषा नोंदवितो. (जनगणना अधिकाऱ्यास या बोलीची नोंद घ्यावी असे कधी वाटले नाही. शासनानेही त्या रकान्यात काही बोलींची नावे टाकलेली नाहीत) साधारणतः दोन कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भूभगातील लोकांची ही दैनंदिन व्यवहाराची बोली असली तरी आपल्या बोलीविषयी अनास्था, लाज वा ग्राम्यतेचे लक्षण मानने ह्या बाबीमुळे सरकार दरबारी अहिराणी किंवा खानदेशी बोली बोलणारांची खरी संख्या कागदोपत्री आजवरही आलेली नाही.
अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा उपरोक्त भाषा भूगोल (आधीचा खानदेश जिल्हा, त्यानंतर नासिकचे कळवण, सटाणा, मालेगांव तालुके व औरंगाबाद जिल्ह्याचा सोयगांव व कन्नड हे तालुक्यातील डोगराखालील खानदेश लगतची गावे) आजवर संशोधकांनी स्विकारला आहे. आता नुकत्याच माझ्या क्षेत्रिय पाहणीतून असे लक्षात आले की ही खानदेशात बोलली जाणारी बोली जशीच्या तशी विदर्भातील अमरावती जिल्हयाच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गांवातून केवळ गवळी जातीच्या लोकांकडून बोलली जाते. मात्र या लोकांना अहिर वा अहिराणी वा खानदेशी या संकल्पना अद्यापही ज्ञात नाहीत. ते आपल्या या बोलीला गवळी बोली म्हणून संबोधतात. त्यामुळे आता खानदेशी बोलीच्या सामाजिक प्रभेदात गवळी बोली तर प्रादेशिक प्रभेदात वऱ्हाडची अहिराणी म्हणून समावेश करुन सध्याचा भाषा भूगोलाचा विस्तार करावा लागत आहे.
(असं असली तरी सोरटी सोमनाथावरील गझनीच्या स्वारी नंतर पलायन केलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवगीरीला आश्रय घेतला व तेथून त्यानां तामीळनाडूतील मंदिराचे पौराहित्यासाठी नेले गेले पुढे ते मासांहारीही बनले व सुताला रंग देण्याच्या व्यवसायातही उतरलेत. (हा इतिहास के.सी कृष्णमुर्ती यांनी ‘द मायग्रन्ट सिल्क व्हेव्हर्स ऑफ तामिलनाडू’ या ग्रंथात केला आहे. प्रकाशन फेब्रु. २०१४) त्यांची बोली तेथे सौराष्ट्री म्हणून प्रचलित असून तिच्यात आणि अहिराणीतही बरेच साम्य आढळते. या शिवाय नेपाळच्या नेपाळी बोलीत आणि अहिराणी बोलीतही बरेच साम्य आहे. अधिकचा अभ्यास करुन त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे)
अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील मेळघाट अभयारण्याचा मध्य प्रदेशाच्या, अशिरगड किल्ल्यापर्यतचा भागातील वस्तीला असलेले गवळी या जातीच्या लोकांची बोली ही गवळी बोली आहे. ह्या गवळी बोली बोलणारांची संख्या ही जवळजवळ पन्नास हजाराहून अधिकची आहे. देवगांव, कुकरु, खामगांव सारखी काही गावे ही संपूर्ण गवळी या जातीच्या लोकसंख्येची गावे आहेत. चिखलदरा, सांगोळा, कोहा ढाकण, मोथा, लवादा, देवगांव, धामनगांव गढी, हरीसाल, अंबापाटी, टेंभरु सोजाई, जामली, वस्तापूर, कुलंगणा खुर्द, उपासखेडा, नवाखडा अशाही काही गावांची नावे ही गवळ्यांची वस्ती असलेली गावे सांगता येतील. अभ्यासाअंती असे लक्षत येते की, या सगळ्या गवळ्यांची ही गवळी बोली आणि खानदेशात प्रचलित असलेली अहिराणी बोली ह्या दोन बोली भिन्न वा स्वतंत्र वेगवेगळ्या बोली नसून त्या एकच बोली आहेत. मात्र खानदेशात ती अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ती गवळी बोली म्हणून ओळखली जाते आहे. विशेष बाब ही की आजपर्यंत अहिराणीच्या अभ्यासकांना ज्या प्रमाणे गवळी बोली हे अहिराणीचे वेगळ्या भूप्रदेशात आढळणारे रुप आहे ही बाब ज्ञात नाही. तशीच गवळी बोलीच्या अभ्यासकांनाही गवळी बोली ही अहिराणी बोलीचेच रुप आहे हे ज्ञात नाही. मात्र शब्दावली, वाक्याची रुपे, विभक्ती प्रत्यय, ही भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासाची सगळी वैशिष्टे ही दोनही बोलीत सारखी आणि एकच आहेत. धारणी, चिखलदरा या भागात या गवळ्यांना अहिराणी हा शब्द ज्ञात नाही. ते आपल्या बोलीला गवळी बोली असेच म्हणतात. हे सारे गवळी लोक कोरकू, कुणबी, गोंड वा कोलामांसोबत राहात असले तरी गवळी बोली ही केवळ गवळी लोकांचीच बोली असून तेच बोलतात. गवळी बोली वर आजवर भाषावैज्ञानिक अभ्यास कुणी मांडल्याचे ज्ञात नाही. भाषा सव्र्व्हेक्षणातही मेळघाटातील या गवळ्ळ्यांच्या बोलीला ग्रिअर्सन पासून आताच्या भारतीय भाषा सर्वेक्षणापर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही. म्हणजे या मेळघाटात बोलीच्या सर्वेक्षणाचेही आदिवासी प्रमाणे कूपोषण झालेले आढळते.
या गवळ्यांच्या या भागातील आगमना बाबतच्या काही कथाही मिळतात. कौडीण्यपूरहूर रुक्मीनी आणण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या गवळ्यांच्या लवाजम्यासह विदर्भात कूच केली. त्यांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बलदेवानेही गवळ्ळ्यासह त्यांच्या गुराढोरांसह कूच केली. परतीच्या मार्गावर चांदूर बाजार, अचलपूर सारख्या काळ्या जमिनीवर आपल्या गुरांचे पाय फसतात व गुरांना त्रास होतो हे जाणून त्यांनी तो काव्ळ्या जमिनीचा भाग सोडून टणक जमिनीकडे वाटचाल केली. ते मेळघाट आले. रुक्मीनीला घेवून श्रीकृष्ण व गवळी रातोरात परतलेत. मात्र काही गवळींना आपल्या गुराढोरांसह, लवाजम्यासह परतने शक्य झाले नाही. शिवाय आपल्या गुरांसाठी चारा असलेले घनदाट जंगल त्यांना आवडले. हे गवळी परत मथुरेला न जात तेथेच राहिलेत. वन्यजिवांकडून आपल्या गुरांचे सरंक्षण करण्याच्या दृष्टिने त्यांनी मातीच्या भिंतीची तटबंदी बांधून गाविलगड किल्ला बांधला. गाविलगड हा गवळ्यांचा किल्ला. पुढेही चिखलदराहून इंग्रजांनी या गवळ्यांना हुसकावून जंगलात पिटाळले. अशिरगड, नरनाळा आणि गाविलगड ही किल्ले गवळी आपले किल्ले समजतात. अशिरगडची आशा देवी ही त्यांचे कुलदैवत मानतात. ते कृष्णाला आपले पूर्वज मानतात. केवळ बोलीच नव्हे तर त्यांच्या रुढी परंपरा, विवाह विधी, सणउत्सव, हे खानदेशातील अहिराणी भार्षिक लोकांप्रमाणेच आहेत. या विदर्भातील गवळ्यामध्ये खेडके, हेकडे, शेडके, शनवारे, सावडे, गायन, तोटे अशी आडनावे आढळतात. मात्र असली आडनावे खानदेशातील अहिराणी भाषकांत आढळत नाहीत. खानेदशातील अहिराणी भाषिक हे विविध जातीचे असून कुणबी, मराठा, सोनार, शिंपी अशा विविध जातीत विभागले गेले आहेत. या गवळ्यांनी आपल्या दुग्धव्यवसायाशी संबंधित जी धार्मिक विधी आजही जपून ठेवलेली आहेत ती खानेदशात नावालाच आढळतात. विदर्भातील हे गवळी गुलाबाई, गौराई, भालदेव, विवाहाची गाणी, जात्यावरची गाणी हे सगळ आजही जपून आहेत. मात्र खानदेशात महत्वाचा समजला जाणरा कानबाईचा उत्सव या विदर्भातील गवळी जमातीत आढळत नाही. खानदेशातील या अहिराणी भाषकां प्रमाणे त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी कमी आलेला असल्याने खानदेशीच्या मानाने त्यांच्यात सांस्कृतिक वा भाषिक बदल कमीच आढळतो. आजही हे गवळी मुलाच्या जन्मा नंतर कास्य या धातूची थाळी वाजवितात तर मुलीच्या जन्मा नंतर सूप वाजवितात. या गवळ्याचे महत्वाचे सण वा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी आणि दिपावलीची गायगोंदन. आपल्या दुग्ध व्यवसायाशी व कृष्णाशी संबंधित हे विधी ते आजही पाळतांना दिसतात. आपल्या जनावरांची हेटी करुन राहणे हे या गवळ्यात आजही आढळते. मात्र खानदेशात हे प्रमाण कमी झाले आहे. खानदेशा प्रमाणे आखाजीला पित्तर जेवू घालणे, विवाह प्रसंगी पूर्वजाना निवतं देणे हे विदर्भातील गवळ्यात आढळते. खानदेशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जिवनाशी साध्यर्म्य राखणारे हे गवळी स्वतःला गवळी, गोपालक, श्रीकृष्णाचे वंशज म्हणत असले तरी ते खानदेशातील अहिराहून वेगळे नाहीत हे अहिराविषयी जाणून घेतल्यावर लक्षात येते. विदर्भतील या गवळी जातीवर इतिहासकारांनी विषेश प्रकाश टाकलेला आढळत नाही.
खानदेशातील ब-याच परंपरा या मोडीत निघाल्या मात्र दुग्धव्यवसाया संबंधीत ब-याच परंपरा आजही बोली सोबत या गवळी समाजाने जपून ठेवलेल्या आढळतात. तेही स्वतःला गोपालक समजतात. दोहोचे नाते श्रीकृष्णाशी अन अशिरगड, गावीलगड यांचेशी आहे. अर्थात यादव, अहिर, गवळी हे एकाच कुलातील.
अहिराणी काल, आज आणि उद्या- अहिराणी ही ऐके काळी खानदेश परिसरातील मुख्य बोली होती. ती व्यवहाराची भाषा होती. अहिरराजे यांची ती प्रमुख बोली. धुळे, नंदूरबार, जळगांव, नासिकचा कळवण, सटाणा, मालेगांव अन औरंगाबाद चा कन्नड व सोयगांव या तालुक्यांचा भाग या परिसरात ती आजही बोलली जाते. या परिसराची लोकसख्या ही दिड कोटीच्या आसपास आहेच. या शिवाय उर्वरित महाराष्ट्रात आणि गुजरात व मध्यप्रदेशात नोकरी वा व्यापारा निमित्ताने गेलेले सारे खानदेशवासी हे आपल्या घरात अहिराणीच बोलतात. जगाच्या पाठिवर अनेक देशातही खानदेशातील माणूस स्थाईक झालेला आहे. तेथेही तो आपल्या कुटूंबात अहिराणी जपून आहे. पूर्वी अहिराणी बोलणे गावंढळ, ग्राम्यतेचे लक्षण मानले जाई. अलिकडे भाषिक अन प्रादेशिक अस्मिता जोपासली जाऊ लागली आहे. या शिवाय जागतिक स्तरावर विविध विद्यापिठातून बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्व पटू लागल्याने त्या जतन करण्याकडे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जगाचा कल वाढू लागला आहे. आजवर प्रमाण भाषांनी बोलींना, बोलीतील शब्दांना दूर ठेवले होते. आता अलिकडे अभ्यासकांना याच बोलीतून प्रमाण भाषा जन्माला येते व बोलींच्या आधारानेच ती वाढते, टिकते हे कळू लागले आहे. त्यामुळे आपली बोली जतन करण्याचा तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सामान्य स्तरावरही होऊ लागला आहे.
अलिकडे अहिराणीतून दिनदर्शिका, लग्नपत्रिका, माहिती पत्रके छापली जात आहेत. जे जे प्राण्मा मराठीतून असते ते ते आता अहिराणी बोलीतून प्रकाशित होत आहे. सकस वांङमयाचे अहिराणीतून भाषांतरेही होवू लागली आहेत. अहिराणी बोलीचा शब्दकोश, भाषावैज्ञानिक अभ्यास, सुलभव्याकरण, सचित्र कोश, म्हणी कोश, वाकप्रचार कोश, ओवी कोश अहिराणी बोलीतील लोकसाहित्य आदी ग्रंथ डॉ. रमेश सूर्यवंशी यांची प्रकाशित आहेतच. कालऔघात बोली नष्ट होत आहेत असे म्हटले जात असेल तरी जगभर या बोली वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. या बोली वाचवून ठेवण्यात शेतकरी व शेतमजूर यांच मोठा वाटा आहे. हा वर्ग आपली बोली आजी सांभाळून आहे. जगभर बोली वाचविण्याची चळवळ सुरुच आहे. त्या मुळे बोलीच भवितव्य हे उज्ज्वचल असेच आहे.

0000

डॉ. रमेश सुर्यवंशी
‘अभ्यासिका’, वाणी मंगल कार्यालया समोर कन्नड
ता. कन्नड जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) पिन ४३११०३
मोबाईल ०९४२१४३२२१८/८४४६४३२२१८

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – सुधारणा समितीचे अध्यक्ष जे. पी. डांगे

अमरावती, दि. 13 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आदींनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन सदर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच राज्य शासनाव्दारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांना गुणात्मक उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन माजी मुख्य सचिव तथा सुधारणा समितीचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी आज केले.

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त श्र्वेता सिंघल, अमरावती प्री आएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका डॉ. संगिता यावले, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक आदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

श्री. डांगे म्हणाले की, राज्यात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर असे सहा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उर्त्तीण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन मेरीटनुसार प्रवेश दिला जातो. या केंद्रात युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन, विद्यावेतन यासह परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तके, ग्रंथालय, इंटरनेट सेवा आदी सुविधा पुरविण्यात येते. यासंदर्भात ग्रामीण व शहरी भागातील होतकरु विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यात यावी.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये गुणात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय सुधारणा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून अध्यापन, शिक्षण व मुल्यांकन पध्दती, भौतिक सुविधा संसाधने व तांत्रिक सुविधा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाचा कालावधी, ताणतणाव व्यवस्थापन, विद्यावेतन, मार्गदर्शकांना देण्यात येणारे मानधन, सर्व केंद्रामध्ये डिजीटल कनेक्टीविटी, निवासी वसतीगृह व तेथील सुविधा, संगणक प्रयोगशाळा सुविधा, प्रवेश प्रक्रिया व वसतीगृह प्रवेश नियमावली, नवी दिल्ली येथे मुलाखतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत पूर्व प्रशिक्षण आदी संदर्भात गुणात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा उत्तीर्ण अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत विशेष उपक्रम राबवून मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्रीमती सिंघल यांनी यावेळी केले.

00000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि.२४: शेतकरी हा राज्यशासनाच्या केंद्रस्थानी असून संकट काळात त्यांना मदत करणे हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या हक्काचे संरक्षण, तांत्रिक मदत, आर्थिक सहाय्य, जलसिंचनावर...

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि.२४: महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच...

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार...

0
एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचाही वापर मुंबई, दि. २३ : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

0
मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत...

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

0
मुंबई, दि. २३ : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे...