रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 224

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई दि.15:  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे  सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे,  यांच्यासह राजेंद्र बच्छाव,  मेघा गवळी तसेच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.

000

युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – जे. पी. डांगे

अमरावती, दि. १४: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक आदींनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन सदर परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच राज्य शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांना गुणात्मक उपाययोजना सुचवाव्यात, असे आवाहन माजी मुख्य सचिव तथा सुधारणा समितीचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी गुरुवारी केले.

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, अमरावती प्री आएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका डॉ. संगिता यावले, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक आदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

माजी मुख्य सचिव डांगे म्हणाले की, राज्यात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर असे सहा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उर्त्तीण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेऊन मेरीटनुसार प्रवेश दिला जातो. या केंद्रात युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन, विद्यावेतन यासह परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तके, ग्रंथालय, इंटरनेट सेवा आदी सुविधा पुरविण्यात येते. यासंदर्भात ग्रामीण व शहरी भागातील होतकरु विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये गुणात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय सुधारणा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून अध्यापन, शिक्षण व मुल्यांकन पद्धती, भौतिक सुविधा संसाधने व तांत्रिक सुविधा, ग्रंथालय सुविधा, प्रशिक्षणाचा कालावधी, ताणतणाव व्यवस्थापन, विद्यावेतन, मार्गदर्शकांना देण्यात येणारे मानधन, सर्व केंद्रामध्ये डिजीटल कनेक्टीविटी, निवासी वसतीगृह व तेथील सुविधा, संगणक प्रयोगशाळा सुविधा, प्रवेश प्रक्रिया व वसतीगृह प्रवेश नियमावली, नवी दिल्ली येथे मुलाखतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत पूर्व प्रशिक्षण आदी संदर्भात गुणात्मक उपाययोजना सुचविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा उत्तीर्ण अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत विशेष उपक्रम राबवून मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्रीमती सिंघल यांनी यावेळी केले.

०००

 

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल – मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे दि. १४: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेची सुमारे 4190 चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या या जागेतील 1/3 जागेवर 90-100 टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागेवर हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे 300 टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

Lahs Green India Pvt Ltd. SOLARISED CONTROL WINDROW COMPOSTING (IIT PAWAI, MUMBAI PATENTED) technology द्वारे अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला Enviro Invent System Pvt. Ltd या कंपनीने बनविलेले Treatment Of The Waste On The Go (TOWGO vehicle) वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे 2 टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी लवकर अजून 20 वाहने उपलब्ध होत आहेत.

या पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पहाणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी-कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे!” असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विकास कामांला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मूलन तातडीने करुन घ्यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

०००

कुटुंबसंस्था मजबूत करणे हाच मानस – रूपाली चाकणकर

छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका): कायद्याच्या चौकटीत राहून महिला सुरक्षेला प्राधान्य देत कुटुंब हा समाजाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून करण्याचा मानस असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज व्यक्त केला.

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी विविध पीडित महिलांची जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली. जन सुनावणीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, आयोगाच्या सदस्य श्रीमती नंदिनी आव्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, जनसुनावणीत आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चार पॅनल ची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सतीश कदम, वर्षा गायकवाड, शिल्पा अवचार, आबाराव कलम, पूर्णिमा साखरे, स्वाती लोखंडे आदी सदस्य  तसेच विधी तज्ज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

चाकणकर म्हणाल्या की, तक्रारदार महिलांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात सुनावणीची सुविधा उपलब्ध व्हावी. त्यांचा प्रवास खर्च,  वकिलांची फी वाचावी. तसेच मार्गदर्शनासाठी समुपदेशन सुविधा ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे  त्याच जिल्ह्यात ऐकून घेऊन तात्काळ तडजोड  करून तक्रार निकाली काढली जाते. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी जास्त प्रमाणात येत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून जीवन जगल्यास तक्रार होत नाहीत.  महिला सबलीकरणाचा केंद्रबिंदू हा कुटुंब आहे.  मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रत्येक आईने पुढाकार घेऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसभेमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

१५२ तक्रारी निकाली

जन सुनावणीत एकूण १५२ तक्रारीची सुनावणी घेण्यात आली. त्यात ९६ तक्रारी या कौटुंबिक समस्यांच्या होत्या. तसेच ११ तक्रारी सामाजिक समस्यांशी संबंधित, मालमत्ता व आर्थिक फसवणूकीच्या ३ व इतर ४२ अशा १५२ तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कौटुंबिक समस्यांच्या ९६ पैकी १४ तक्रारींमध्ये समेट घडविण्यात आला.

भिसेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिसेवाडी येथील विद्यार्थिनीने ‘गुड टच बॅड टच’ यावर  लघुपटामध्ये काम करून  विद्यार्थिनींमध्ये जाणीव जागृतीसाठी काम केल्याबद्दल अभिनंदन केले. या विद्यार्थिनींचा उत्साह आणि सहभागाबद्दल रूपाली चाकणकर यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला व आनंद व्यक्त करत, निर्भय वातावरणात शिक्षण घ्यावे, असे मार्गदर्शन केले.

विविध विभागांचा आढावा

चाकणकर यांनी बालविवाह प्रतिबंध, महिला आरोग्य, समुपदेशन केंद्र,भरोसा सेल, परिवहन, कामगार आयुक्त त्याचप्रमाणे समाज कल्याण, शिक्षण, महिला बाल विकास या विभागांचा आढावा घेतला. आढावा  बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे. पोलीस निरीक्षक आरती जाधव, सामाज  कल्याण सहाय्यक आयुक्त लकीचंद चव्हाण, उपयुक्त महानगरपालिका श्री बोरसे सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती गायकवाड ,सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा. श्रीमती गीता तांदळे उपशिक्षण अधिकारी. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे ,जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.

बालविवाह प्रतिबंधासाठी खबर देणाऱ्या व्यक्तीस विशेष बक्षीस देण्यात यावे. तसेच बालविवाहास प्रतिबंध करणाऱ्या घटकांना विविध पुरस्कार देण्याचेही घोषित करण्यात आले. सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दर्शनी भागात विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्पलाइन १०९८ चे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.

सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबतचे निर्देश दिले व बालकामगार तपासणीसाठी अचानक भेटी देण्याचे आदेश दिले. शाळा महाविद्यालयात सुद्धा पोलीस विभागाने अचानक भेट देऊन तेथील वातावरण सुरक्षित असल्याची भावना  मुलींमध्ये निर्माण करावी. वाढत्या लोकसंख्येच्या शहरानुसार समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव संबंधित पोलीस शिक्षण आणि महिला बालकल्याण विभागाने पाठवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पिंक पथक, दामिनी आणि भरोसा सेलचे कौतुक

महिला सुरक्षितता, समुपदेशन आणि इतर कायदेशीर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर करण्यात आलेला तपास याबाबत ‘पिंक पथक’ चे व  शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी दामिनी पथकाने केलेल्या कार्याचे कौतुकही यावेळी चाकणकर यांनी केले. समुपदेशन केंद्राच्या अंतर्गत भरोसा सेल ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये खऱ्या अर्थाने महिलांमध्ये एक विश्वास पोलीस विभागामार्फत निर्माण झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

हेल्पलाईन क्रमांक महिलांपर्यंत पोहोचवा

महिला, लहान बालकांच्या मदतीसाठी शासनाने विविध हेल्पलाईन क्रमांक सुविधा उपलब्ध केल्या असून हे क्रमांक अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन चाकणकर यांनी केले.

हेल्पलाईन क्रमांक 

  • पोलिसांची तात्काळ मदत -११२.
  • पोलीस नियंत्रण कक्ष-०२४०-२२४०५००
  • भरोसा सेल – ०२४०-२३२६४९०
  • चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक – १०९८
  • महिला हेल्पलाइन-१०९१
  • ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन -१०९०
  • दामिनी पथक हेल्पलाइन-९२२५५८८४९२

समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी उपक्रम राबवा- गृह राज्यमंत्री योगेश कदम

छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका): आपल्या राज्यात सामाजिक सौहार्द वाढावे, यासाठी पोलीस दलाने सर्व समाजातील लोकांना विशेषतः युवकांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवावे व सामाजिक एकोपा निर्माण करावा,असे निर्देश राज्याचे गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज येथे दिले.

येथील पोलीस आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, शिलवंत नागरेकर आदी सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.  छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा श्री. कदम यांनी घेतला. त्यात गुन्ह्यांचा तपास, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहतुक, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, जातीय दंगली, अंमली पदार्थ, दामिनी पथक, भरोसा सेल अशा विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत माहिती देण्यात आली की, गेल्यावर्षभरात झालेल्या ५९४७ दाखल गुन्ह्यांपैकी ४७०९ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. ५ लाख ६२ हजार ०९१ वाहनांवर कारवाई करुन ४ कोटी २८ लाख ७० हजार ८५० रुपये दंड आकारण्यात आला आहे.वाढते औद्योगिकीकरण आणि वाढते शहरीकरण यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढतांनादिसत आहे. आर्थिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थ असे गुन्हेही घडत आहेत. वर्षभरात  अंमलीपदार्थ संदर्भातील १३४ गुन्हे नोंदविण्यात आले. ४० लाख ४७ हजार ६५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन २२३ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. शहरी भागात ड्रोन पेट्रोलिंग, कमांड कंट्रोल सेंटर द्वारे सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवले जाते अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, औद्योगिक गुंतवणूक वाढत असतांना येथिल सामाजिक सौहार्द वाढविणे व सलोखा टिकवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व समाजातील युवकांना, व्यक्तिंना एकत्र आणून उपक्रम राबवावे, त्यांचे परस्पर विचार देवाण घेवाण वाढवावी. त्यातून हे सौहार्द वाढून शांतता व सलोखा प्रस्थापित होईल असे पहावे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या सात कलम कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थांबाबत कडक कारवाई करण्यात यावी. त्यात शिक्षक, पोलीस अधिकारी, पालक यांचाही सहभाग घ्यावा. तसेच जनजागृतीवर अधिक भर द्यावा. जिल्ह्यात बांगलादेशी अथवा रोहिंग्यांच्या रहिवासाबाबत असलेल्या प्रकरणांचा शोध घेण्यात यावा. पोलीस कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल अनेक वर्षे तसाच पडून राहतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी राज्यशासन संयुक्तिक धोरण ठरवित आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. ई- ऑफिस प्रणालीचा अधिक वापर वाढवावा. जिल्ह्यात उद्योगांची गुंतवणूक वाढत असतांना अनेक लोक स्थलांतरीत होऊन येथे येतील. लोकसंख्या वाढेल अशा परिस्थितीत येथील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी पोलीस दलाला अधिक अत्याधुनिक करण्यात येईल,असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

बैठकीनंतर राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते चैतन्य तुपे अपहरण तपास कामांत कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

०००

 

विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा- रुपाली चाकणकर

व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’

छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका):  सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या विश्वात अनेक प्रलोभने दिलीजातात. महाविद्यालयीन जीवनात या प्रलोभनांचा मोह पडतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून सावध रहावे. आपण फसवले जातोय असे वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आपल्या पालकांची मदत घ्या, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले.

सायबर विश्वात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार होत असतात. त्यात अनेक प्रकारे लोकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत असतात. आपल्या जीवनाला दिशा देणारे आपले राष्ट्रपुरुष हेच आपले खरे हिरो असून ‘रिलस्टार्स’ नव्हे, अशा शब्दात सायबर तज्ज्ञ अमोल सातोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

येथील देवगिरी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान पार पडले.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक तेजनकर हे होते.  सायबर सेलचे प्रमुख अमोल सातोडकर, पोलीस निरीक्षक आनंद झोटे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, डॉ.रवि पाटील, डॉ. अपर्णा तावरे, ॲड. रेणुका घुले आदी यावेळी उपस्थित होते.

सातोडकर म्हणाले की, सायबर विश्वात आभासी पद्धतीने आपण रममाण होतो. याचाच फायदा घेऊन येथे फसवणुकीचे प्रकार होत असतात. कोणत्याही प्रकारची फसवणूक वा घोटाळा हा देशविघातक कृत्यांसाठीच पाठबळ ठरतो, म्हणून अशा प्रकारांविरोधात कृती करावयास हवी. सायबर विश्वात जे काही आपण शेअर करतो, अपलोड करतो ते कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे काहीही शेअर करतांना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारीत आर्थिक फसवणूक, सेक्स्टॉर्शन, ब्लॅकमेल करणे अशा विविध कारणांनी फसवणूक होऊ शकते. त्यात प्रामुख्याने महाविद्यालयीन,अल्पवयीन मुलामुलींची फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्स, मित्रांची गर्दी असण्यापेक्षा आपल्या वास्तविक जीवनातील आणि खऱ्या मित्रांना प्राधान्य द्या. जीवनात काही चांगले करायचे असेल तर आपल्या राष्ट्रपुरुषांचे चरित्र अभ्यासा. आपले खरे हिरो हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. सोशल मीडियावरील रिलस्टार्स नव्हे.

चाकणकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी सायबर विश्वातला आपला वावर हा अतिशय सावध ठेवावा. आपले शिक्षण आणि करियर यास प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले ठेवून आपले शरीर निरोगी ठेवा. आपल्या आयुष्यातील कोणताही निर्णय घेतांना आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा.  आपल्याबाबत फसवणूकीचे प्रकार घडल्यास वा कुणी आपल्याला त्रास देत असल्यास १०९८ अथवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा. पोलीस लगेचच आपल्या मदतीला येतील.देशाचे चांगले नागरीक म्हणून स्वतःला घडवा.  युवक युवतींनी बालविवाह, हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. अपर्णा तावरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य तेजनकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रियंका पाटील हिने आभार मानले.

०००

शहरे बकाल, घाणेरडी दिसणार नाहीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. १४: जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, नाले, गटर स्वच्छता, पथदिवे, शहर सौंदर्यीकरण या बाबींवर भर द्यावा. कोणत्याही स्थितीत शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद, नगर पंचायतींच्या विकास कामांचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, नगरपालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरण याबाबतीत नगर पालिकांनी जाणिवपूर्वक लक्ष द्यावे. कराड, सातारा या शहरांसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात शहर स्वच्छतेचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

पालकमंत्री म्हणाले, शहरातील प्रमुख रस्त्यांवर नगर पालिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्याद्वारे कचरा व घाण पसरविणाऱ्यांवर नजर ठेवावी व दंडात्मक कारवाई करावी. रात्रीच्या वेळी डीप क्लिनींग सुरु करावे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अत्यंत सक्षमपणे चालविणे आवश्यक आहे. भविष्यात नगर पालिकांच्या कक्षा रुंदावणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन आत्ताच कचरा डेपो शहरातून बाहेर हलविण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी जागेचा शोध घ्यावा. येत्या काळात सर्व नगरपालिका सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. ही बाब ध्यानात घेऊन त्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यात यावा. जे दोन्ही प्रकारचे कचरे एकत्र देतील अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. दुकानदार व्यवसायिकांनी कचरा इस्तत: पसरला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. पुर्वी ग्रामविकास विभाग गुड मॉर्निंग पथके कार्यरत ठेवत होता, त्याप्रमाणे स्वच्छता पथके तयार करावीत. अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजीट द्यावी. यापुढे पालकमंत्री म्हणून नगरपालिका व नगर पंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, विविध विकास कामे यांचा नियमितपणे आढावा घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

०००

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान

प्रयागराज, दि. १४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रयागराज येथे पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यांच्यासह कुंभस्नान केले.

कुंभस्नानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, सहकुटुंब महाकुंभात येण्याचे भाग्य लाभले, याचा मला अतिशय आनंद आहे. यावर्षी १४४ वर्षांनी विशिष्ट योग आला आहे. त्या पर्वावर मला संगमावर स्नान करण्याचे भाग्य लाभले. कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. एक नवा विक्रम आणि नवा इतिहास येथे घडला आहे. ५० कोटी भाविकांनी आतापर्यंत येथे उपस्थिती लावली आहे. भारताची आस्था पाहून संपूर्ण जग आज आश्चर्यचकित आहे. हीच आपली दिव्यता, हीच आपली भव्यता, हाच आपला कुंभ आहे. हेच आमचे संस्कार आहेत, हीच आमची संस्कृती आहे. २०२७ च्या नाशिक महाकुंभाची तयारी आम्ही सुरु केली आहे.

दरम्यान, प्रयागराज येथून मुख्यमंत्री फडणवीस थेट वाराणसीत गेले आणि तेथे त्यांनी सहकुटुंब काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले.

 

०००

नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण -उद्योगमंत्री उदय सामंत 

नांदेड दि. १४: नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता पार्किंग समस्या सोडविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळाचे लवकरच शासन खासगी कंपनीकडून स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिली. मंत्री डॉ. सामंत हे शुक्रवारी नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी नांदेड विमानतळ व तेथील सुविधांबद्दल विस्तृत चर्चा केली.नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच खासगी कंपनीकडून काढून घेतले जाणार आहेत. खाजगी कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटीसांचा कालावधी देखील पूर्ण होत आला आहे. लवकरच एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती हे विमानतळ कंपनीकडून काढून घेण्याबाबत त्यांना नोटीस दिल्या आहेत. त्या नोटीसांचा कालावधीदेखील संपुष्टात आला असून, लवकरच सदर विमानतळ हे एमआयडीसीकडे हस्तांतरित केले जातील. त्यानंतर तिथे नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नियमित देखभाल, दुरुस्तीसह उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चार्टर विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

दावोसच्या जागतिक परिषदेला त्यांनी यशस्वी परिषद संबोधले. जवळपास पंधरा हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहेत. त्यातून नांदेडमध्ये एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्योगांना चालना देण्यासाठी सर्व जिल्ह्यांत उद्योग भवन उभारणार असून, औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, रस्ते, पथदिवे अशा भौतिक सुविधा देण्यासाठी प्राधान्य देत आहोत. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. नांदेडसाठी ३८ कोटी, परभणीसाठी २९ कोटी तर हिंगोली जिल्ह्याला १६ कोटी रुपये दिले आहेत.

तालुकास्तरावर एमआयडीसीला प्राधान्य

उद्योग, व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तालुकास्तरावर एमआयडीसी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या धोरणानुसार मारतळा, बिलोली, मुखेड, धर्माबाद येथील एमआयडीसी तर वसमत येथे ड्राय पोर्ट लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. ड्रायपोर्टसाठी १०० हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल.नव्याने उभारण्यात येणाऱ्या सर्वच औद्योगिक वसाहतींमध्ये २० टक्के जागा लघु उद्योगांसाठी आरक्षित असेल, असेही त्यांनी सांगितले.

सांगलीत उपकेंद्र उभारणार 

देशात सांगली आणि वसमत परिसरात हळदीचे सर्वाधिक उत्पन्न होते. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून वसमत येथे उभारलेल्या हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र सांगली येथे व्हावे, अशी सांगली येथील हळद उत्पादकांसह उद्योजकांची मागणी होती. त्यानुसार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून, आगामी काळात सांगली येथे उपकेंद्र उभारले जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

व्यापार उद्योग समिट घेणार 

नांदेड येथील विमानतळासारख्या काही प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर या भागात मोठे उद्योग यावे यासाठी व्यापार व उद्योग जगतातील मान्यवर कंपन्याचा सहभाग असणारी व्यापारी परिषद घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय समिती सक्रिय करणार 

मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करण्यावर भर असेल. यासाठी जिल्हास्तरवर जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे सांगीतले. जिल्हास्तरीय समितीमार्फत मराठी भाषा संवर्धनाचे उपक्रम सुरू असल्याने त्यांनी सांगितले. समिती आणखी सक्रिय करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी त्यांनी विभागाचा आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, खादी ग्रामोद्योग व विश्वकर्मा उद्योग योजनांच्या संदर्भात आढावा घेतला. योजना राबविताना बँकांनी अडथळे आणू नये, अशी सूचना त्यांनी केली. तसेच कोणतेही प्रकरण प्रलंबित ठेवू नका व अंमलबजावणीचा टक्का शंभर टक्के असावा,असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी व्यापार उद्योग समूहातील विविध संघटनांशी त्यांनी चर्चा केली.

आढावा बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे कार्यकारी अभियंता श्री. गव्हाणे, जिल्हा उद्योग केद्रांचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांच्यासह विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

०००

साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकदि. १४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा  सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईलअसे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्तेसाधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिकानाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेआमदार किशोर दराडेआमदार प्रा. देवयानी फरांदेआमदार सुहास कांदेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामपोलिस आयुक्त संदीप कर्णिकजिल्हाधिकारी जलज शर्मामहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळपोलिस अधीक्षक विक्रम देशमानेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदेमाजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीकुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार  देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारणजलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्हीध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  रामकालपथनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमोनोरेलचाही आढावा घेतला.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीगोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावीअसे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघातसुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीमती फरांदे यांनीही विविध सूचना केल्यातर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...