शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 223

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ : ६० फेलोंची निवड करण्यात येणार

मुंबई, दि. ११ :- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी १५ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येऊन यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

फेलोंच्या निवडीचे निकष : अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.

अनुभव : किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा व संगणक ज्ञान : मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-

या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.

वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस व वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.

फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.

सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

0000

 

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती

मुंबई, दि. 11 :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी), जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी).

000

संजय ओरके/विसंअ/

वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

मुंबई, दि . ११ : दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बी.के.सी. येथे वेव्हज् २०२५ परिषद अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट  समिट  होणार आहे. या परिषदेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय व राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत घेण्यात आला. या वेव्हज परिषदेस राज्य शासन पूर्णतः तयार असून वेव्हज् च्या माध्यमातून मोठी पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबई क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज् ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येईल. या परिषदेस एक कायम स्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाईल. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्हज् याचेही दरवर्षी आयोजन केले जाईल. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

माहिती व  प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वेव्हज् या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रिएटिव्ह इकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज् परिषदेस १०० पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी – २० पेक्षा खूप मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील तक्रारींचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला आढावा

परभणी, दि. 11 (जिमाका) : पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.

पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” या उपक्रमाच्या माध्यमातून 93 अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही 93 गावे आदर्श गाव करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत गावांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जांच्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. जनता दरबारामध्ये एकूण 887 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 421 अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.

जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिली. जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकारी यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावा. जनता दरबारात जास्त अर्ज शेत रस्त्यांचे येत असून हे अर्ज या महिन्याअखेर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

महावितरण मंडळ कार्यालयावरील ‘रुफ टॉप सोलार सौरऊर्जा’ प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या 35 किलो व्हॅट रुफ टॉप सोलार सौरऊर्जा प्रकल्पाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद‌्घाटन करण्यात आले.

यावेळी महावितरणचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, नांदेड महावितरण मुख्य अभियंता आर.बी.माने, अधीक्षक अभियंता आर.के.टेंभुर्णी, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, जी.के.गाडेकर,यु.व्ही घोंगडे आदींसह महावितरणचे अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

यावेळी सौरऊर्जा प्रकल्प वेळेच्या आधी उभारणारे कंत्राटदार कैलास कापसे, भागवत देशमुख, योगेश मुळी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहनाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांचे मार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका, अग्निशमन विभागास, अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे. अग्निशमन वाहने अनुक्रमे नगरपरिषद गंगाखेड, सेलू, जिंतूर व अग्निशमन विभाग, परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, शहर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, संबंधित नगरपरिषद विभागाचे अग्निशमन अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँक उर्जितावस्थेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 11 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा मध्यवर्ती बँकचे जवळपास 50 हजार शेतकरी सभासद आहेत. या शेतकऱ्यांनी त्यांची बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार सुरू करावेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास बँकेस उर्जितावस्थेस प्राप्त होईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा मध्यवती बँक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी जलज शर्मा, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक बाळासाहेब आनासकर, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील,  बँकेचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक सुरळीत होण्याच्या दृष्टीने बँकेविषयी शेतकऱ्यांच्या मनातील असलेले संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या तीन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून कोणऱ्याही प्रकारची सक्तीची वसूली न करण्याचे निर्देश कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सहकार विभाग व बँक प्रशासकांना दिले. येणाऱ्या आठवडाभरात शेतकऱ्यांसाठी नवीन ओटीएस स्कीम सुरू करणार असून मयत शेतकरी सभासदांच्या वारसांसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व्याजदर आकारणीबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील. जिल्हा मध्यवर्ती बँक खाते सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभही येणाऱ्या काळात डिबीटी माध्यमातून प्रदान करण्यात येतील. शेतकऱ्यांमध्ये बँकेबाबत विश्वासाहर्ता निर्माण होण्यासाठी सर्व संचालक बँकेत पाच लाख रूपयांच्या ठेवी जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आढावा

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, खासदार शोभा बच्छाव, खासदार पराग वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ.राहूल आहेर, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहेर, माजी आमदार नरेंद्र दराडे,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने मागील अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने समृद्धी महामार्गावरील  सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखिंड येथे आगमन व निर्गमन निर्माण करून बोरखिंड ते नाशिकला जोडणारा पर्यायी रस्ता मंजूर करण्यात यावा. यामुळे  नाशिक- पुणे व मुंबई-आग्रा हायवे वरील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होईल.  सिन्नर- नायगाव जोगलटेंभी हा चौपदरी क्राँक्रीट रस्ता तयार करून गोदावरी नदीवर  दारणासांगवीला जोडणाराा मोठा पूल बांधण्यात यावा व दारणासांगवी ते नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडरस्ता करून पंचवटीला जोडणार अत्यंत जवळचा पर्यायी मार्ग निर्माण केल्यास गोदावरी-दारणा संगमावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल, अशा सूचना कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालाच्या ब्रॅंडिंगबाबत विशेष प्रयत्न करणार – पणन मंत्री जयकुमार रावल

आंबा व काजू उत्पादकांची बैठक

सिंधुदुर्गनगरी दिनांक 11 (जिमाका) :- प्रामुख्याने राज्यात उत्पादित भौगोलिक मानांकन प्राप्त काजु व आंब्याकरिता ब्रॅंडिंग व मार्केटिंग करणेकरिता कृषि पणन मंडळामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल. तसेच भेसळ रोखण्याकरिता अन्न व औषध विभागाची मदत देखील घेण्यात येणार आहे. तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याकरिता कृषि पणन मंडळ व भौगोलिक मानांकन मालकी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी, कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य काजु मंडळाचे संचालक डॉ. परशराम पाटील व रुपेश बेलोसे तसेच माजी आमदार ॲड. अजित गोगटे, डॉ. विवेक भिडे, विलास सावंत,  वासुदेव झांट्ये यांचेसह काजु व आंबा उत्पादक, प्रक्रियादार व कृषि विद्यापीठ, दापोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

श्री रावल म्हणाले, दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत पुण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा महोत्सव कोकणात घेतला जाईल. या महोत्सवामध्ये जीआय व युआयडी  टॅग लावलेला आंबा ग्राहकांना विक्री केला जात आहे.  कृषि पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवाची व्याप्ती वाढवुन इतर राज्यामधे तसेच परदेशामध्येदेखील प्रयत्न करण्यात येणार. राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी काजू बी अनुदान योजनेअंतर्गत 4196 लाभार्थींच्या बँक खात्यात रु. 4.97 कोटी थेट जमा करणेची प्रक्रिया सुरु झालेली असुन रकमा जमा होत आहेत असेही पणन मंत्री यांनी सांगीतले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ज्या भागात अथवा देशात आंब्याचे उत्पादन होत नाही अशा ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करणेबाबत प्रयत्न करण्यात यावे असे सुचविले. आमदार दिपक केसरकर यांनी ब्राझील देशाला भेट दिले असता तेथील काजु बोंडु प्रक्रिया तंत्रद्नायाबाबत त्यांचे अनुभव विषद करुन त्या धर्तीवर प्रकल्प उभारणीबाबत अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य काजु मंडळाकडुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई मार्फत स्थानिक काजु बी खरेदी करणे, त्याची प्रतवारी व पॅकेजिंग करुन गोदामात साठवणुक करणे याबाबतचा सविस्तर विशिष्ठ कार्य पध्दती (SoP) बाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करुन अंतिम करणेत येणार आहे अशी माहिती पणन मंत्र्यांनी यावेळी दिली. काजू फळपिक विकास योजने अंतर्गत 1000 मे. टन क्षमतेच्या गोदाम उभारणीची योजना  राज्य शासनास सादर केलेली असुन त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादकांना घेता येईल.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य काजु मंडाळाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. कृषि पणन मंडळामार्फत विकसीत देशांना आंबा निर्यातीकरिता आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रियांची माहिती सदर बैठकीस उत्पादकांना देण्यात आली. बैठकीमध्ये कोकणातील काजू व आंबा उत्पादक, प्रक्रियादार इ. यांनी अडीअडचणी मांडल्या.

बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती – पणन मंत्री जयकुमार रावल

  • आंब्याला युआयडी सील देण्यासाठी प्रयत्न
  • ‘आंबा महोत्सव’कोकणात भरवणार
  • पात्र लाभार्थ्यांना काजु अनुदान देणार

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- राज्य शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करुन पिक घेतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे. बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहिल असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण करून पार पडले, यावेळी ते बोलत होते.

श्री. रावल म्हणाले, प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उप बाजार समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून शासन  काम करत आहे. 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत या पहिल्या बाजार समितीचे भूमिपूजन होत आहे. राज्यात एकूण 305 बाजार समित्या तर 662 उप बाजार समित्या असून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वेगवेळ्या बाजार समितींच्या माध्यमातून होते. आज वाघेरी येथे पहिल्या बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन  होत आहे. टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी उप बाजार समितींची देखील उभारणी करुन जिल्ह्याचा विकास केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 5 कोटी 66 लाख रुपयांच्या कामाचे आज भूमिपुजन करण्यात आले आहे. येणाऱ्या 18 महिन्यांमध्ये ही इमारत पूर्ण होणार आहे. या इमारतीमध्ये फळ व धान्यासाठी साठवणूक केंद्र, काजू बी साठविण्यासाठी गोडाऊन, मत्स्य उत्पादनासाठी कोल्ड स्टोरेज, व्यापारी भवन, दुकानगाळे, वे-ब्रिज, पाण्याची सुविधा, शेतकरी भवन, हमाल भवन आणि इतर साऱ्या व्यवस्था उभा राहणार आहेत.  या इमारतीसाठी सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून 75 टक्के निधी मिळाला आहे. उर्वरित 25 टक्के निधी उभारावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या ॲग्रीकल्चर मार्केटींग इन्‍फ्राट्रक्चर योजनेच्या माध्यमातून जवळपास 1 कोटी मी या प्रकल्पाला देणार आहे. या मार्केट कमिटीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास साधला जाणार आहे असेही ते म्हणाले.

श्री. रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा महत्वाचे फळ आहे. या मातीमध्ये लोह असल्याने या आंबाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. म्हणूनच आंब्याच्या जीआय टॅगिंगच्या संदर्भात आपण भूमिका घेतली आहे. पुढील काळात आंब्याला युआयडी सील व पॅम्पर प्रुफ सिल हे येथील मार्केट मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  ई-नाम योजनेअंतर्गत डिजिटल डिस्प्ले बोर्डवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारभावांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. काजू बोर्डामार्फत जवळपास 370 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पणन महामंडळामार्फत घेतला जाणारा ‘आंबा महोत्सव’ यावर्षी कोकणात घेतला जाईल असेही ते म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, या बाजार समितीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोणातून एक महत्वाचं स्थान बनवू असा विश्वास मी देतो. या ठिकाणी सर्व कारभार पारदर्शक पध्दतीने होईल. बाजार समितीची ही जागा रेल्वे लाईन तसेच महामार्गालगत असल्याने निर्यातीसाठी योग्य आहे. निसर्गातील बदलांमुळे आंबा आणि काजू उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक काजूला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळावी यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. बांदा येथे मच्छी बाजारासाठी नक्कीच जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्व प्रयत्न करणार असल्याचेही श्री राणे म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी विविध्‍ उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घ्यावीत जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल. एकरी उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील महिलांनी देखील व्यवसायात सहभाग घेऊन उत्पन्न वाढवावे असेही ते म्हणाले.

आमदार दिपक केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यात या बाजार समितीचे योगदान मोठे असणार आहे. या इमारतीत सर्व प्रक्रीया उद्योग एकाच छताखाली आले तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणाले की, ही बाजारा समिती कोकणाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारी बाजारपेठ ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी या बाजार समितीने काम करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील वेगवेगळे उत्पादन घेऊन विकास साधावा असेही ते म्हणाले.

पाच वर्षाचा कृती आराखडा बनवून जुन्नर, आंबेगावचा विकास करणार – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

पुणे, दि. ११ : जुन्नर आणि आंबेगाव तालुके दत्तक घेऊन ५ वर्षाचा कृती आराखडा बनवून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले. आदिवासी बांधवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे येथील आई वरसुआई देवीला अभिषेक केल्यानंतर आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, मंदिर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय गवारी आदींसह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

‘पेसा’ कायदा २०१४ मध्ये लागू करण्याचे आणि ‘पेसा’ अंतर्गत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला ५ टक्के निधी देण्याचे काम शासनाने केले. यामुळे या अंतर्गत येणारे जिल्हे, तालुके, ग्रामपंचायतींचा विकास होत आहे. अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मंजूर झालेल्या सर्व निधीचा वापर शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी करण्यात येईल. विविध योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अधिक प्रभावीपणे, गतीने कसे पोहोचतील यासाठी काम करण्यात येईल.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जलसंपदा, महसूल, वनविभाग आदी विभागांसोबत चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. समाजाला बळ, आत्मविश्वास देऊ, त्यासाठी नियमितपणे येथे येऊन येथील अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी असलेला जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला असून आदिवासी विकास विभागाकडून त्याअंतर्गत आवश्यक तो निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

येथील गावांचा पिण्याच्या पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न सुटावा, बुडीत बंधारे व्हावेत, दाऱ्या घाट व्हावा, अशी मागणी आमदार सोनवणे यांनी यावेळी केली. यावेळी दत्तात्रय गवारी यांनी प्रास्ताविक केले.

‘शासन आपल्या मोबाईलवर’ उपक्रमामुळे सुसंवाद वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

‘शासन आपल्या मोबाईलवर’उपक्रमाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

यवतमाळ, दि.11 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, गतिमान सेवा देण्याचे शासनाने धोरण आहे. त्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम देखील राबविले जातात. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक देखील केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसिलदार आदित्य शेंडे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत प्रशासनाच्यावतीने यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे. या चॅनेलवर महसूल विभागाचे विविध विषय जसे, जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम 155 दुरुस्ती पद्धत, अतिक्रमन नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेतांना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौणखनिज संदर्भात माहिती, अदिवासी जमिनींचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे. संबंधित विषयाची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. विषय समजून सांगतांना त्याचे बारकावे, नियम, अटी, दक्षता, काळजी यावर देखील माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरबसल्या महसूलसह विविध विभागांच्या किचकट प्रक्रिया देखील नागरिकांना सोप्या भाषेत स्वत: अधिकाऱ्यांकडून माहिती होतील.

जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसात हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सेवा, पारदर्शक आणि गतिमानपणे मिळण्यासोबतच त्यांचा पैसा, वेळ आणि परिश्रम वाचविण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. वेळोवेळी उद्भवणारे विषय देखील या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला असून सोप्या भाषेत नागरिकांना विविध योजना, उपक्रम आत्मसात होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांशी देखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. उपक्रमांतर्गत उत्तम काम करून नागरिकांना अधिकाधिक सेवा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी उपक्रमाची भूमिका, गरज आणि महत्व विषद केले. सुरुवातीस कळ दाबून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महसूल अधिकाऱ्यांसह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

पेंच प्रकल्पांतर्गत प्रास्तावित सात प्रकल्पांना गती आवश्यक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि. 11: मध्यप्रदेशात चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पांतर्गत निर्माण झालेली पाण्याची तुट भरुन काढण्यासाठी आपण सात उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे. या पाणी तुटीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांना शासनाने दुष्काळ निवारण कार्यक्रमात मान्यताही दिली आहे. असे असतांना या कामाला गती मिळणे अपेक्षित होते. याचबरोबर जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी का पोहचत नाही, असा उद्विग्न सवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नियोजन भवन येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता रवी पराते, अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता केतन आकुलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पेंच प्रकल्पाच्या 40 टक्के लाभ क्षेत्रात पाणी पोहाेचत नाही. या प्रकल्पाच्या टेलवर अडचण आहे. अनेक शेतकरी व ग्रामस्थ याबाबत सातत्याने शासनाला विनंत्या करीत आहेत.  हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेंच प्रकल्पांतर्गत सात उपसा सिंचन योजनांना गती दिली जाईल. मात्र ज्या क्षेत्रात, गावात पाणी पोहचत नाही अशा गावांचा सर्वे करुन नेमक्या किती व कोणत्या गावात पाणी पोहचत नाही याची वस्तुस्थितीदर्शक पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन अधिकाऱ्यांना दिले.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेची जोड दिली आहे. जिल्ह्यातील काटोल, नरखेड या दोन तालुक्यात पाण्याची पातळी खुप खोल गेली आहे. भविष्यातील पाणीप्रश्नचा आवाका लक्षात घेता पाणीटंचाई अंतर्गत विहिर पुर्नभरण कामांवर भर, जेवढ्या गावांसाठी नळयोजना आहेत त्या नळयोजनांच्या पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या ऑनलाईन सुविधेसाठी संवाद सेतू ॲपचा क्रमांक कार्यान्वित; 86694 94944 क्रमांकावर साधा थेट चॅट

प्रशासकीय पातळीवरील नागरिकांच्या असलेल्या विविध सेवा व सुविधा सुलभ पध्दतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने व्हॉटस्ॲप चॅटबोट क्रमांक जाहिर केला. आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते याचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हा एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याला आपल्या शेजारील अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने राबविलेल्या विशेष उपक्रमाची जोड देऊन ही सुविधा अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ऑप्टीक फायबर केबलपेक्षा वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरांवर भर द्या

नागपूर महानगराच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सिसिटिव्ही कॅमेरांपैकी अनेक ठिकाणची कॅमेरे केबलची जोडणी निघाल्याने उपयोगात येत नाहीत. विविध ठिकाणी रस्ते व इतर कामांमुळे या कॅमेरांना जोडणारी केबल प्रणाली वेळोवेळी जर तुटल्या जात असतील तर त्यापेक्षा नागरिकांचा सहभाग घेऊन मोक्याच्या ठिकाणी वायरलेस सिसिटिव्ही कॅमेरे लावलेले उचित ठरेल. याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व पोलीस विभागाला दिले.

नागरिकांच्या जीवीताचे व त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे त्यादृष्टीने अधिकाधिक दक्ष राहण्यासह सिसिटिव्हीचा प्रभावी उपयोग व्हावा, असे ते म्हणाले.

या बैठकीत हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथील कार्यक्रम, सुरक्षा आढावा, शासकीय मुद्रणालय व ग्रंथालय स्थानांतरण, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सामाजिक न्याय विभागांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कन्यादान योजनेचे अनुदान, छत्रपती शिवाजी महाराज चषक, पुरुष व महि ला कबड्डी स्पर्धा यांचे नागपूर येथे आयोजन, मौदा येथे तालुका क्रीडा संकुलाची नव्याने उभारणी आणि कामठी नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.

ताज्या बातम्या

विधानसभा निवेदन

0
विदर्भातील नझूल जमीनींबाबत विशेष अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १८ : विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात निवासी...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो...

0
मुंबई दि. १८: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ...

विधानसभा लक्षवेधी

0
सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणार-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई, दि. १८ :- सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन या...

राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

0
शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून...

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना...