रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 222

उत्सव अभिजात मराठीचा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे  २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे  हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहे. शासनही याला पाठबळ देत आहे.  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.                                                                                        

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: काय बदल होणार?

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारताची समृद्ध भाषिक परंपरा लक्षात घेता, विविध भाषांना त्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या दृष्टीने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी मोठी चालना मिळेल. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यासकांना, संशोधकांना आणि साहित्यप्रेमींना अनेक संधी मिळतील.

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय?

भारत सरकारने काही विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यामध्ये खालील प्रमुख अटी पूर्ण करणाऱ्या भाषांचा समावेश होतो.

प्राचीन वारसा: संबंधित भाषेचा उगम आणि तिचा लिखित इतिहास किमान १५०० वर्षे जुना असावा. समृद्ध साहित्य परंपरा: भाषा केवळ बोलीभाषा नसून तिच्या साहित्य वारशाचा स्वतंत्र ठेवा असावा. मूळ लिपी आणि व्याकरण: भाषेची स्वतःची व्याकरणशास्त्र आणि लिपी असावी. संस्कृती आणि परंपरेशी नातं: भाषेचे साहित्य आणि परंपरा आधुनिक भारतीय भाषांवर मोठा प्रभाव टाकत असाव्यात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मलयाळम आणि ओडिया या भाषांना आधीच हा दर्जा प्राप्त झाला आहे. आता मराठीलाही हा बहुमान मिळाल्याने मोठे बदल घडणार आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने होणारे फायदे

1) मराठीच्या बोलीभाषांचा आणि व्याकरणाचा सखोल अभ्यास

मराठीत अनेक बोलीभाषा आहेत, जसे की कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी इत्यादी. या बोलींचा अभ्यास, संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रोत्साहन मिळेल.

2) संशोधन आणि साहित्यवाढीला चालना

अभिजात भाषेसाठी केंद्र सरकार संशोधन कार्यक्रमांना अधिक आर्थिक मदत देते. मराठी भाषेतील साहित्य, लेखन आणि ऐतिहासिक ग्रंथांचे संरक्षण करण्यासाठी विशेष योजना आखल्या जातील.

मराठीत प्राचीन हस्तलिखित ग्रंथांचे संकलन, संगणकीकरण आणि भाषांतर करण्यासाठी निधी दिला जाईल.

3) शैक्षणिक संधी आणि विद्यापीठांमध्ये अधिक महत्त्व

भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा निर्माण केली जाऊ शकते. मराठीतील संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळेल. मराठी अभ्यासक्रमांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि विद्यापीठांना यासाठी विशेष अनुदान मिळेल.

4) सरकारी अनुदान आणि मदत

अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी देते. मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी काम करणाऱ्या संस्था, संशोधक आणि साहित्यिकांना आर्थिक मदत मिळेल.  मराठी संस्कृतीशी निगडित विविध उपक्रमांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल.

5) राष्ट्रीय पुरस्कार आणि गौरव

अभिजात भाषेतील उत्कृष्ट संशोधनासाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे मराठीतील भाषातज्ज्ञ, साहित्यिक आणि संशोधक यांना हे पुरस्कार मिळू शकतील. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारकडून गौरव मिळेल.

6) आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि महत्त्व

अभिजात भाषांचा दर्जा मिळालेल्या भाषा अधिक सन्माननीय मानल्या जातात. यामुळे जागतिक स्तरावर मराठी भाषा आणि तिच्या समृद्ध साहित्याला अधिक मान्यता मिळेल. मराठी भाषा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वाढेल.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी भाषिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे भाषा टिकवण्यासाठी, तिच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करता येतील. संशोधन, शैक्षणिक संधी, साहित्यवाढ आणि सरकारी मदतीमुळे मराठीचा विकास वेगाने होईल.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड – अलिबाग

अभिजात मराठी : नव्या ध्येयाकडे वाटचाल…

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे वृत्त वाचल्यावर अमराठी  कुटुंबातला असूनही मला अतिशय आनंद झाला. कारण अमराठी असूनही माझी वाणी आणि लेखणी या दोघोवर माय मराठी प्रसन्न आहे. ती कशी काय?  याच्या तपशीलात जाणार नाही पण आनंदाची अनुभुती मन प्रफुल्लीत करणारी आहे. मात्र सोबतच मराठीला खूप उशिरा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणुन खूप थोडे वाईटही वाटले. कारण हजारो वर्षापासूनचा इतिहास संभाळणारी जगात 10 व्या आणि भारतात 3 –या क्रमांकावर असणारी आणि मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी सबंधीत मौलिक साहित्य पसरवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळविण्यापासून अनेक वर्ष वंचित राहिली. तामिळ भाषेला इ.स.2000 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठीला सर्व निकष पूर्ण करण्याची क्षमता असूनही हा दर्जा मिळविण्यासाठी इ.स.2024 पर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्षे वाट पहावी लागली हे दुदैवच म्हणावे लागेल. ‘देर आए दुरुस्त आए’ या हिंदी म्हणीप्रमाणे समाधान मानण्यास हरकत नाही.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे सिद्ध झाले की, ही प्राचीन भाषा आहे. या भाषेत अभिजात व दर्जेदार साहित्याची निर्मिती झाली आहे. लिळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, गाथा सप्तशती, तुकारामाची गाथा आणि इतर संत वाङमयाने समृद्ध असे साहित्य मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा वेध घेणारे आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व वैज्ञानिक क्षेत्रातही मौलिक साहित्याची निर्मिती मराठीतून झालेली आहे. मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व असून तिचे स्वत:चे व्याकरण आहे. साहित्यिक मुल्ये  व परंपरेचा मोठा वारसा  या भाषेला लाभला आहे. या सर्व बाबी आज अधिकृतरित्या मान्य झालेल्या आहेत. म्हणून मराठी भाषेच्या इतिहासात सुवर्णांक्षराने नोंद करणारा हा क्षण आहे. समस्त मराठी बांधव यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. कारण आपल्यापैकी अनेकांनी या क्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे.

भाषा ही पिढ्या न पिढ्या लोकजीवनाचा, सामाजिक मुल्ये व विचारांचा आणि संस्कृतीचा भाग असते. सांस्कृतिक जीवनाची अभिव्यक्ती भाषेच्या माध्यमातून होत असते. ज्यामुळे एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा तिच्या साहित्यिक परंपरेचा गौरव असतो. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्या भाषेला शासकीय पाठबळ प्राप्त होते. त्यामुळे संशोधन आणि अध्ययनाला अधिक वाव मिळतो. भाषेचे संवर्धन व तिच्या प्रचार – प्रसाराला नवे आयाम प्राप्त होतात. भाषेच्या विकासाला एक गती प्राप्त होऊन त्या भाषेला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते.

अभिजात हा शब्दच मुळात श्रेष्ठत्व दर्शविणारा आणि वर्चस्व वृत्तीचा सूचक मानला जातो. म्हणून मराठी भाषेचा फार मोठा विजय आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता व्दिगुणित होणार आणि मराठीची विजयी पताका आता देशभर मिरविणार यात शंका नाही.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार आणि नवी ध्येये गाठण्याकरीता त्याचा कसा उपयोग होणार हे खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट  करता येईल.

मराठी भाषा आणि बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. परिणामी नवीन संशोधन आणि साहित्यसंग्रह यांना चालना मिळेल.

भारतातील 450 विद्यापीठातून मराठी भाषेचे अध्यापन स्थापन करता येईल व त्यातून मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध केली जाऊ शकेल.

मराठीतील प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यास सुरुवात होईल. राज्यातील 12 हजार ग्रंथालये सशक्त होतील. त्यांची दुरवस्था संपेल.

मराठी भाषा जपण्यासाठी, तिच्या उत्कर्षासाठी आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती व विद्यार्थी यांना मोठी मदत मिळू शकेल.

अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.

अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषांना दिला जातो. त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर इतके सगळे फायदे आता मराठी भाषा व मराठी  माणसाला मिळणार आहेत. पण ही तर सुरवात आहे. आपल्याला नवी ध्येये गाठण्याची आणि नवी नवी क्षितीजे पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली आहे. संधीही उपलब्ध झाली आहे, पण या संधीच सोनं करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आता गरज आहे. मराठी भाषेला तिच्या पर्वाचा उत्सव साजरा करण्याची आणि तिच्या उज्वल भविष्यासाठी कसोशीने उभे राहण्याची.

आज मराठी भाषेची काय स्थिती आहे ते लपून राहिलेले नाही. त्याची चर्चा करणार नाही पण एक इशारा द्यावासा वाटतो की हीच स्थिती जर कायम राहिली तर अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही काहीच उपयोग होणार नाही.

मराठीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा जगणे अत्यंत आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यासाठी शासन, समाज, संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांना जबाबदारीच्या भावनेने प्रामाणिक प्रयत्न करावे, लागतील याबाबत दुमत असू शकत नाही.

०००

  • प्रा. शेख हाशम, 9372028943

वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पूरक : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

नवी दिल्ली, दि. 15 : वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्सपो मध्ये महाराष्ट्रासोबत 380 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे दिली.

प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान ‘भारत टेक्स एक्सपो 2025’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने नॉलेज पार्टनर राज्य म्हणून सहभाग घेतला आहे. आज विविध सामंजस्य करार वस्त्रोद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्याच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री.सावकारे बोलत होते. 

यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा, राज्यातील वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, रेशीम संचालनालयाचे संचालक डॉ.विनय मून मंचावर उपस्थित होते.

श्री.सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. महाराष्ट्रात या संदर्भात चांगले काम होत आहे. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी नवनवीन योजना तयार करून अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन वीज पुरवठा, जमीन उपलब्ध करून देणे आणि निगडित असणाऱ्या बाबींवर अनुदान देत आहे. याचा परिणाम वस्त्रोद्योग चांगली भरारी घेत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्र शासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही श्री सावकारे यांनी यावेळी सांगितले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात सादरीकरणालाही फार महत्त्व असून या उद्योगात असणारे पारंपरिक व्यावसायिकांनी सादरीकरणावर आणि जाहिरातीवरही भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण आणून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन उमेद निर्माण केली आहे.

राज्य शासनाने 100 दिवसात करावयाच्या कामांतर्गत नागपूर येथे अर्बन हार्ट सुरू करण्यात येईल. याअंतर्गत या ठिकाणी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकर, कलाकुसर करणारे कलाकार स्वतःच्या सामानांची विक्री एकाच ठिकाणी वर्षभर करू शकतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यासह अमरावती येथे पीएम मित्र पार्क वस्त्रोद्योगासाठी तयार केलेले आहे, असेही सावकारे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा यांनी महाराष्ट्रात पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित चांगले काम सुरू आहे. इचलकरंजी सारख्या छोट्या शहरात एक लाखापेक्षा अधिक यंत्रमाग आहेत, अशीच इचलकरंजी सारखी गावे भारतात इतरत्र सुरू करण्याचा केंद्र शासनाचा मानस असल्याचे सांगितले. केंद्र शासन वस्त्रोद्योग वाढीसाठी सर्वतोपरीने महाराष्ट्र राज्याला मदत करत आलेला आहे यापुढेही करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सचिव विरेंद्र सिंह यांनी आपल्या मनोगतात म्हणाले,  वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणारे लोक हे उत्कटतेने काम करतात, त्यांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि तोच प्रयत्न महाराष्ट्र शासन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज झालेल्या सत्रामध्ये महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन’ चे लॉन्चिंग करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील हातमाग विणकारांवर आधारित ‘करघा’ या वेब सिरीजचे तसेच Anthem चे लॉन्चिंग करण्यात आले. करघा या वेब सिरीज चा पहिला भाग हिमरू पारंपरिक या प्रकारावर असून तो दाखविण्यात आला. सर्वांसाठी ही वेब सिरीज 28 तारखेपासून प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, रेशीम संचालनालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ असे एकूण ५ स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्र अधिक ठळक दिसेल यासाठी उपसचिव श्रीकृष्ण पवार, कक्ष अधिकारी प्रमोद पवार, अंजुम पठाण यांनी विशेष प्रयत्न केला.

000000

।। एथ ज्ञान हें उत्तम होये ।। (भाग-१)

भगवद्गीतेतील न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यतेहा एक प्रसिद्ध श्लोक आहे. तितका या श्लोकाचा उत्तरार्ध प्रसिद्ध नाही. वास्तविक अर्थनिश्चितीसाठी संपूर्ण श्लोक, त्याच्या पूर्वीचे आणि नंतरचे श्लोक, त्यांचे संदर्भ माहिती असणे आवश्यक असते. असे असले तरी, बऱ्याचदा अशी प्रसिद्धी अप्रसिद्धी होत असते. याचा प्रत्यय ज्ञान व्यवहारात येतो, तसाच ज्ञानेश्वरीच्या अभ्यास परंपरेतही येतो.

या विषयाकडे वळण्यापूर्वी काही बाबी पाहाव्या लागतात. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यतेया श्लोकावर ज्ञानेश्वरीत आठ ओव्यांचे निरूपण येते. त्यातील दुसऱ्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ‘एथ ज्ञान हें उत्तम होये। आणिकही एक तैसें के आहे। जैसे चैतन्य कां नोहो ।। दुसरें गा‘ (४.७९) चैतन्य एकच असते, दुसरे नाही. तसे इहलोकी ज्ञान हे उत्तम, त्याच्यासारखे आणखी काही नाही. पुढे ते म्हणतात, सूर्याचे प्रतिबिंब तेजस्वी असले तरी ते सूर्याच्या कसोटीला लावता येईल का ? आकाशाला कवेत घ्यायला गेल्यानंतर त्याला कवेत घेता येईल का ? पृथ्वीच्या तोलाची उपमा सापडली तरच ज्ञानाला उपमा सापडेल. या सर्व ओव्यांतून ज्ञानाला दुसऱ्या कशाची उपमा देता येणार नाही, अशी ज्ञानदेवांनी ज्ञानाची थोरवी सांगितली आहे. ती ज्ञानसंन्यासयोगाचे निरुपण करताना वर्णिली आहे.

ज्ञानदेव हे योगी, तत्त्वज्ञानी, संत कवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. त्यांचा जीवनकाल इ.स. १२७५ ते इ. स. १२९६ असा मानला जातो. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी‘, ‘अमृतानुभव‘, ‘चांगदेव पासष्टी‘, तसेच काही अभंगांची निर्मिती केली. आज ज्ञानेश्वरीची निर्मिती होऊन सातशे एकतीस वर्षे झाली. इतकी वर्षे होऊनही ज्ञानेश्वरीचा समाजावरील प्रभाव कमी झालेला नाही किंबहुना तो वाढत आहे. ज्ञानेश्वरीहा श्रद्धाळू भाविकांच्या श्रद्धेचा, अभ्यासकांच्या अभ्यासाचा आणि टीकाकारांच्या टीकेचा विषय आहे. ज्ञानेश्वरीइतके अनुसरण, गौरव आणि अभ्यास दुसऱ्या कोणत्याही मराठी ग्रंथाचे झाले नाही. शतकानुशतके माणसांच्या श्रद्धेचा, कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असणारा हा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला, तो केवळ भाविक, अभ्यासक यांच्या अखंड ज्ञानपरंपरेमुळे !

अशा या प्रदीर्घ ज्ञानपरंपरेत ज्ञानदेवांपूर्वी काय दिसते ? हे पाहाणे आवश्यक आहे. कारण, अनेकदा ज्ञानेश्वरीतील एखाद्या ओवीचा दाखला देऊन आपण किती प्रगत होतो. असे उल्लेखले जाते. अशा उल्लेखांनी प्रभावीत होणे शक्य आहे. पण, ‘ज्ञानेश्वरीची थोरवी काही अशा उल्लेखांमध्ये नाही. हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेवांपूर्वी ज्ञान परंपरा, किमान त्यांचा क्रम लक्षात घ्यावा लागतो.

भारतीय विचारविश्वाची वैदिक, लोकायत, जैन, बौद्ध या क्रमाने; तर विज्ञानाची कणाद, आर्यभट्ट, भास्कराचार्य अशी परंपरा दिसते. वेदांतांची उपनिषदे, बादरायण प्रणित ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना प्रस्थानत्रयी मानले जाते. प्रस्थान म्हणजे आधारभूत ग्रंथ होय. भगवद्गीतेवर आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीची भाष्ये आज उपलब्ध नाहीत. ही भाष्ये आद्य शंकराचार्य (इ.स. ७८८ इ.स. ८२०), पैशाच भाष्य, रामानुजाचार्य (इ.स. १०१७ – इ.स. ११३७), श्रीमध्वाचार्य (इ.स. ११९९- इ.स. १२७८) अशी आहेत. अशा भाष्यकारांते वाट पुसतज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आहे. ज्ञानेश्वरीही गीतेवरील पहिली ओवीबद्ध मराठी टीका आहे. ज्ञानदेवांपूर्वी नाथ, बसवेश्वर, श्रीचक्रधर आदींचेही विचार आहेत. ज्ञानदेवांच्या काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. त्यापूर्वी या महऱ्हाटी प्रदेशावर सातवाहन, अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांची सत्ता होती. यातील पैठणच्या सातवाहनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार होता.

कालप्रवाहाच्या अशा एका विशिष्ट स्थानी ज्ञानदेव आहेत. ज्ञानेश्वरीपूर्वी काही महानुभावीय ग्रंथांचा अपवाद सोडला तर फारसे मराठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे मराठी साहित्य परंपरेतील पहिल्या काही ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरीचा समावेश होतो. ज्ञानदेवांनी इ. स. १२९० मध्ये नेवासे येथे ज्ञानेश्वरीआणि त्यानंतर अमृतानुभवची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीची भावार्थदीपिका‘, ‘ज्ञानदेवीही पर्यायी नावे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव असा उल्लेख येतो; तर नामदेव हे ज्ञानेश्वर असा उल्लेख करतात. नामदेव हे ज्ञानदेवांचे पहिले चरित्रकार आहेत. त्यांनी आदि, समाधी आणि तीर्थावळीतून श्री ज्ञानदेव चरित्र लिहिले आहे. यातील आदि प्रकरणातील एका अभंगांमध्ये पैठण ते नेवासा हा प्रवास आणि ज्ञानेश्वरी‘, ‘अमृतानुभवच्या निर्मितीचा उल्लेख येतो. ज्ञानदेव आणि भावंडे शुद्धिपत्र घेतल्यानंतर नेवाश्याला येतात. मागाहून म्हैसायेतो. त्यानंतर प्राकृतमधून गीतादेवीआणि अमृतानुभवची निर्मिती होते. त्यानंतर म्हाळासेचे दर्शन घेऊन सगळे नेवाश्याहून पुढे निघतात. पुढे आळे गावाला म्हैसाशांत होतो. त्यानंतर सर्वजण अलंकापुरीला म्हणजे आळंदीला जातात. या भावंडांचा हा बहुतांश प्रवास नदीमार्गे म्हणजे गोदावरी, प्रवरा, मुळामार्गे झाला असण्याला अधिक वाव आहे.

ज्ञानेश्वरीहे एक नागर काव्य आहे. ते सातशे एकतीस वर्षांपूर्वी नेवासा नगरीतील लोकांसमोर आकाराला आले. सामान्यतः ग्रंथ हे एकांतात लिहिले जातात; ‘ज्ञानेश्वरीलोकांतात लिहिली गेली. त्यातही ज्ञानदेवांसारखे प्रज्ञावंत हे श्रोत्यांना भगवद्गीतेचा अर्थ लोकांच्या दिठीचा विषोहोण्यासाठी मराठीतून, लोकभाषेत समजावून सांगतात. त्यावेळी ते अतिहळुवारपणा चित्ताआणून हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी ॥‘ (१.५८) असे गीताभाष्य ऐकण्याचे गमक सांगतात. ग्रंथाच्या अखेरीस किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेलें। एथ माझें जी उरलें। पाईकपण ||’ (१८ : १७९२) असे नम्रतापूर्वक सांगतात. ज्ञानदेव हे ज्ञानेश्वरीत अनेकवेळा श्रोत्यांचा गौरव करतात; ते कधीही स्वतःतील ऋजुता सोडत नाही. ज्ञानेश्वरीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

ज्ञानेश्वरीहा नीतिशास्त्राचा धडा असणारा एक अक्षरग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे एक काव्यमय प्रवचन आहे, एक श्रोतृसंवाद आहे. या ग्रंथातून ज्ञानदेवांनी मराठी भाषेतील देशीकार लेणेघडविले, शांतरसाला श्रेष्ठ ठरविले आहे. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूप आहे, हे प्रतिपादिले. गुरुदेव रा. द. रानडे यांच्या मते, या ग्रंथात तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन आहे. तसेच त्यामध्ये सृष्टि निरीक्षणाचे सखोल व सूक्ष्म वर्णनही येते.

(क्रमश:)

०००

 – प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे ता. नेवासा. जि. अहिल्यानगर – ९४०४९८०३२४.

।। एथ ज्ञान हें उत्तम होये ।। (भाग-२)

।। एथ ज्ञान हें उत्तम होये ।। (भाग-२)

ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या मध्यमातून धर्म आणि तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचविले. भक्तिमार्गाला शुद्ध केले. अनासक्तीचा गृहस्थाश्रम हा परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग दाखविला. भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला. अशा या थोर ग्रंथाचे हिंदी, संस्कृत, बंगाली, ओरिसा, कन्नड, तेलुगू, तमिळ, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, चिनी भाषेत अनुवाद झालेले आहेत.

या सर्व प्रवासामध्ये अनेकांनी ज्ञानेश्वरीचे परिशीलन केले. त्यामध्ये भाविक, अभ्यासक अशी अनेक माणसे आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांचे कालखंडाच्या दृष्टीने मुद्रणपूर्व आणि मुद्रणोत्तर असे दोन स्वतंत्र भाग मानता येतात. ज्ञानेश्वरीची मुद्रणपूर्व काळातील वाटचाल ही हस्तलिखीत स्वरूपात पारंपरिक पद्धतीने झाली. या हस्तलिखित पाठांच्या सिद्धनाथ, सच्चिदानंद, एकनाथ आणि पाटंगणकर अशा मुख्यतः चार परंपरा मानल्या जातात.

पुढे ब्रिटिशांच्या आगमनानंतर इ.स. १८४५ मध्ये ज्ञानेश्वरीला मुद्रित स्वरूपात बाळशास्त्री जांभेकर यांनी आणले. त्यानंतर इ.स. १८५४ मध्ये परशुरामतात्या गोडबोले यांनी आपल्या नवनीतमधून ज्ञानेश्वरीचे काही वेचे प्रसिद्ध केले. या वेच्यांमुळे ज्ञानेश्वरीची माहिती झाली, अशी कबुली विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेतून दिली आहे. याचा अर्थ इ.स. १८७७ ७८ नंतरच्या काळात ज्ञानेश्वरीकडे नवशिक्षीतांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या आधुनिक पद्धतीच्या अभ्यासाला चालना मिळाली. अशा या अभ्यासाच्या हजारोंवर नोंदी आहेत. ज्ञानेश्वरीचा मुद्रणोत्तर काळात अनेक प्रकारांनी आणि पद्धतींनी अभ्यास झाला आहे. यातील अनेक अभ्यास हे मूलगामी, दिशादर्शक आणि वैशिष्ट्यपूर्ण होते. यातून अभ्यासकांची बुद्धिमत्ता, त्यांचा व्यासंग, कष्ट आणि चिकाटीचा प्रत्यय येतो. या परंपरेत तीन उल्लेखनीय, दिशादर्शक प्रयत्न अहमदनगरच्या परिसरात झाले आहेत.

यातील पहिला प्रयत्न भारद्वाज यांचा होता. शेवगाव जि. अहमदनगर येथील शिवराम एकनाथ भारदे यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारकमधून ५ डिसेंबर १८९८ ते इ. स. १८९९ या कालावधीत भारद्वाज या नावाने ज्ञानदेवांविषयक लेखमाला लिहिली. ही लेखमाला सोळा लेखांची होती. ज्ञानेश्वरीलिहिणारे ज्ञानदेव आणि अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर हे भिन्न होते, असा या लेखमालेचा उद्देश होता. भारदे यांच्या मताचा प्रतिवाद श्री. र. भिंगारकर यांनी केसरीतून; तर कू. ना. आठल्ये यांनी केरळकोकीळातून प्रतिवाद केला. ही लेखमाला ज्ञानदेवांविषयक अभ्यासात क्रांतिकारक ठरली. भारदे यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्दयांना आजही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असे मानले जाते. या लेखमालेमुळे ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक अभ्यासाला प्रारंभ झाला.

त्यानंतरचा दुसरा प्रयत्न हा अहमदनगर शहरात झाला. नेवासे येथे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. तेथे अहमदनगरच्या वाङ्योपासक मंडळाने १ एप्रिल १९३४ मध्ये एक साहित्य संमेलन भरवून श्रीज्ञानेश्वरदर्शनहाग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाचे नरहर बाळकृष्ण देशमुख हे संपादक होते. १५०३ पृष्ठांचा हा ग्रंथराज दोन भाग, चार खंडात विभागलेला होता. या ग्रंथातून ज्ञानदेवांच्या व्यक्तित्त्वाचे भाषा, साहित्य, समाज, इतिहास, तत्त्वज्ञान, व्याकरण, अध्यात्म, राजकारण, शास्त्र, ज्योतिष अशा अनेक पैलूंतून दर्शन घडविले आहे. याशिवाय ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरीविषयक अभ्यासाचे किती पैलू आहेत; याचे दर्शनही घडविले आहे. ज्ञानदेवांविषयक अभ्यासातील नवार्थ दर्शन, अभ्यास आणि चिकित्सेचा श्रीज्ञानेश्वरदर्शनने प्रत्यय दिला. भारदेंच्या लेखमालेमुळे ज्ञानदेव व ज्ञानेश्वरीविषयक अभ्यासाच्या चिकित्सेला प्रारंभ झाला; तर ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरीविषयक अभ्यास हा किती वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून आणि प्रकारांनी करता येतो, हे दाखविणारा पहिला ग्रंथ म्हणजे श्रीज्ञानेश्वरदर्शनहोय. मर्यादित साधनांच्या आधारे भाविक आणि अभ्यासकांनी निर्मिलेल्या या ग्रंथात श्रद्धा आणि चिकित्सेचा समन्वय पाहावयाला मिळतो. असा सामूहिक प्रयत्न पूर्वी आणि नंतरही झाला नाही, म्हणून तो अपूर्व ठरला आहे. या ग्रंथाने ज्ञानदेवांविषयक आधुनिक अभ्यासाचा पाया घातला. अशा मुलभूत कार्यामागील ग्रंथनिर्माते आणि त्यातील लेखकांचा द्रष्टेपणा प्रत्ययाला येतो.

अशा या ग्रंथाच्या प्रकाशनार्थ नेवासे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ल. रा. पांगारकर हे अध्यक्ष; तर सरदार नारायणराव यशवंतराव मिरीकर हे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनात ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कार्य करण्याकरिता सरदार मिरीकर, त्र्यंबक गंगाधर धनेश्वर, अ. बा. रसाळ यांची समिती नेमली गेली. आजवर ज्ञानेश्वर विद्यापीठ काही झाले नाही; पण श्रीज्ञानेश्वरदर्शनची मी नव्याने संपादित केलेली नवी आवृत्ती लवकरच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित होणार आहे.

त्यानंतर आणखी एक उल्लेखनीय प्रयत्न नेवासा येथे झाला. ज्ञानदेव आणि त्यांचा कालपट उलगडण्यासाठी नेवासा येथील लाडमोड टेकाडावर उत्खनन व्हावे, अशी तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची इच्छा होती. या इच्छेला पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडळाचे तत्कालीन अधिकारी एम. एन. देशपांडे यांच्यामुळे चालना मिळाली. हे उत्खनन सुरू होण्यापूर्वी डॉ. हं. धी. सांकलिया आणि डॉ. इरावती कर्वे यांनी प्रवरा खोऱ्याची पाहणी केली. त्यानंतर नेवासा येथे लाडमोड टेकडावर १९५४ मध्ये उत्खनन सुरू झाले. त्याचा अहवाल ऑगस्ट १९६० मध्ये From History To Pre-History at Nevasa या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नेवासा गावाच्या इतिहासापासून प्रागैतिहासिक काळातील शोध येतो.

नेवासा परिसरात प्रागैतिहासिक काळापासून म्हणजे दीड लाख वर्षांपासून मानवी अस्तित्व आहे. भटक्या मानवाने नेवासा येथील लाडमोड टेकाडावर इ.स.पूर्व १५०० म्हणजे ताम्रपाषणयुगीन काळात पहिली वस्ती केली. त्यानंतर नेवाश्याच्या सातवाहन काळातील भरभराटीच्या, जागतिक व्यापारी मार्गावरील वस्तीच्या खुणा सापडल्या. त्यानंतर यादव, बहामनी, शिवकाळ, पेशवाई आणि ब्रिटीश अशा काळात नेवासा गावाची वाटचाल झाली. या उत्खननाने नेवासा येथील मानवाच्या अन्नाच्या शोधात भटकण्यापासून ते नागरीकरणापर्यंतच्या अवस्था स्पष्ट केल्या आहेत. नेवासा येथे अनेकप्रकारचे व्यवसायिक होते. व्यापारी मालाची देवाणघेवाण चालायची. तेथे मणी, बांगड्या, शिंपले, काच, हस्तिदंती वस्तू निर्माण होत. धान्य व्यापाऱ्याला धानिक, जलयंत्र चालावणाऱ्याला ओद यांत्रिक, सुगंधी पदार्थांच्या व्यापाऱ्याला गांधीक म्हणायचे. येथे सुवर्णकार, सेलवढकी (पाथरवट), कुलरिक (कुंभार) आदी व्यावसायिक होते. त्यांचे व्यवसायएकमेकांवर अवलंबून असल्यामुळे ते एकसंघ असायचे. विविध व्यवसायांमुळे, व्यापारामुळे नेवाश्यातील लोकांचे जीवनमान, राहणीमान उंचावले होते. त्याचा परिणाम म्हणून याकाळातील नेवासा येथील बांधकामाच्या दर्जात वाढ झालेली दिसते.

 ज्ञानेश्वरीच्या परिशीलनातील हे तीन उल्लेखनीय प्रयत्न अहमदनगरच्या परिसरात झाले आहेत. यातील उत्खननाचा ज्ञानेश्वरीशी काय अनुबंध? असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. या उत्खननाचा ज्ञानेश्वरीतील त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोशक्षेत्र। जेथ जगाचें जीवसूत्र। श्रीमहालया असे ।।‘ (१८.१८०३) या ओवीशी अनुबंध आहे. या ओवीची भाषा, व्याकरण, पाठभेद आदींतून अर्थनिश्चीती करण्याचाही प्रयत्न झाला. या ओवीतील अनादिया शब्दाचा पुरातत्वीय शोध दीड लाख वर्षांपर्यंत जातो. हे एक उदाहरण म्हणता येईल, पण अशा साहित्य, धर्म आणि विज्ञानाच्या शोधातून हाती येणारे ज्ञान हे अपूर्व ठरले आहे. त्याचवेळी, या पुरातत्त्वीय शोधातून हाती आलेल्या तथ्यांचे पुढे काय झाले ? भारदे यांच्या प्रश्नांना कितपत उत्तरे मिळाली ? ‘श्रीज्ञानेश्वरदर्शनने घातलेला ज्ञानदेवांविषयक आधुनिक अभ्यासाचा पाया कितपत विस्तारला ? असे अनेक प्रश्न आणि त्यांचे शोधही अनुत्तरीत राहतात.

ज्ञान परंपरेत श्रद्धा – चिकित्सा, भावना बुद्धी अशी कितीतरी द्वंद्वे होती, आहेत आणि राहतील. त्यांचे उल्लेख – अनुल्लेख, त्यांचे समर्थक विरोधक अशा सर्व मत मतांतरांमध्ये आजवरच्या या ज्ञानव्यवहाराचे स्मरण – विस्मरण झाले तर ? तर हा ज्ञानव्यवहार उत्तम राहील का ? म्हणून एक लक्षात घेतले पाहिजे की; ज्ञानदेव, ‘ज्ञानेश्वरीआणि त्यानंतरच्या भाविक, अभ्यासकांच्या प्रयत्नांतून निर्मिलेले हे ज्ञान उत्तम होये‘, त्याला सर्वोत्तम करण्याची जबाबदारी आपली आहे. हे विसरून चालणार नाही.

०००

  • प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे ता. नेवासा. जि. अहिल्यानगर – ९४०४९८०३२४

मराठी भाषेसाठी अपरांतभूमीचे योगदान..

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख…

सावंतवाडीचे कवी वसंत सावंत यांनी आपल्या कवितेत म्हंटलय अशा लाल मातीत जन्मास आलो । जिचा रंग रक्तास दे चेतना।।

कोकणची ही माती खरोखरच चैतन्यदायी आहे. इथल्या कवी, लेखक, इतिहास संशोधक संशोधक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ यांनी भरतभूमीला आपल्या कर्तृत्वाने विविध आभूषणे अर्पण केली.

नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. अर्थात ही भाषा अभिजात होण्यासाठी या अपरांत भूमीतील अनेक साहित्यिकांनी विविध अलंकार घातले.

भारतावर इंग्रजी अंमल बसू लागला होता. पाश्चात्य देशाची दारे खुली व्हायला लागली होती. अशावेळी समाजातली गतानुगतिकता संपून नवविचारांना सामोरा जाण्यासाठी प्रबोधनाचे माध्यम म्हणून वृत्तपत्राची गरज आहे हे जाणून कोकणातील एक महापुरुष पुढे आला. ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. इ.स.१८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण ‘ साप्ताहिक सुरू केले. बाळशास्त्रींचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावचा. त्यांनी साप्ताहिक दर्पणमधून स्त्रियांना शिक्षण, विधवा विवाह अशा अनेक समस्यांवर जनमानसात जागृती करण्यासाठी प्रयत्न केला. रुढींची बेडी तोडल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून आपल्या ‘शतपत्रांमधून रूढीग्रस्तांवर चाबूक उगारणारे लोकहितवादी रत्नागिरी जिल्ह्यातील पावसचे तर त्यांची शतपत्रे तितक्याच निर्भयतेने प्रसिद्ध करणारे भाऊ महाजन हे रायगड जिल्ह्यातील पेण गावी जन्मले. १८४१ साली त्यांनी ‘प्रभाकर’ साप्ताहिक सुरू केले.

रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वृत्तपत्र सुरू केले ते जनार्दन हरी आठल्ये यांनी. ‘जगन्मित्र ‘ साप्ताहिक म्हणजे त्याकाळी रत्नागिरी गँझेट म्हटले जायचे. मराठी भाषेच्या वृत्तपत्रीय योगदानात कोकणभूमी अग्रेसर होती.

जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाला मान्यता मिळाली पाहिजे यासाठी संशोधन आंग्ल भाषेत प्रसिद्ध करायला हवे. मात्र मला माझे संशोधन माझ्या मराठी बांधवांना कळायला हवे म्हणून मी मराठी भाषेतच लिहीन हा विचार करून इतिहास संशोधकाचे अवाढव्य काम केले इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी. इतिहासाचार्य मूळचे देवरुखचे. पुढे त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यात वरसईला गेले. त्यांच्या प्रमाणे वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई, वा.वि. मिराशी, दत्तो वामन पोतदार अशा अनेक कोकणातील  संशोधकांनी आपल्या संशोधनाने आणि लेखनाने मराठी भाषा समृध्द केली. इतिहासाइतकेच खगोलशास्त्रालाही कोकणभूमीने महत्त्वाचे योगदान दिले

स्वातंत्र्य आंदोलनातला धगधगता अंगार म्हणजे लोकमान्य टिळक ! लोकमान्यांनी खगोलशास्त्रातही फार मोठे कार्य केले. त्यांचा ‘आर्यांचे मूलस्थान’ हा खगोलशास्त्रावर आधारित ग्रंथ जगभर गाजला. दापोली तालुक्यातील मुरुड गावी जन्मलेल्या शं. बा. दीक्षितांनी १८९६ साली ‘भारतीय ज्योतिःशास्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास हा संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केला इतिहास संशोधक फ्लिटने म्हंटलय गुप्त साम्राज्याचा काळ शोधण्यासाठी मला शं. बा. दीक्षितांचा उपयोग झाला.  मराठी भाषा समृद्ध होण्यात मोठा वाटा आहे तो प्रादेशिक बोलींचा. महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. आपल्या कोकणातही मालवणी, दालदी, कातोडी, सामवेदी, चित्पावनी, तिल्लोरी कुणबी अशा अनेक बोलींनी मराठी भाषेचा गंगौघ समृद्ध केला आहे. आचार्य विनोबाजींनी गीता मराठी भाषेत आणली तर, वालावलचे अर्जुन बळवंत वालावलकर यांनी गीतेचे मालवणी बोलीत रुपांतर केले. चिपळूणचे नामवंत कवी आणि लेखक वि. ल. बरवे यांनी आपल्या ‘मुचकुंददरी’ कादंबरीत कुणबी बोलीचा वापर केला. अरुण इंगवले यांनी कुणबी बोलीतील दहा हजारहून अधिक शब्द वाक्प्रचार यांच्या कोशाचे काम केले आहे. ह. मो. मराठे यांच्या ‘बालकांड’ आत्मचरित्रात आपल्याला चित्पावनी बोलीचे दर्शन घडते. जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे यांच्या कथा कादंबरीत अस्सल कोकणी भाषेचा झणझणीत अनुभव येतो. गंगाराम गवाणकरांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकातून मालवणीचा मासला कळतो . आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते केशवसुत असोत वा चरित्र लेखनाचा मानदंड निर्माण करणारे धनंजय कीर अशा अनंत अपरांतपुत्रांनी अभिजात भाषे भरभरून योगदान दिले आहे.

०००

  • प्रकाश देशपांडे, चिपळूण

अहिराणी बोलीचा इतिहास (भाग २)

अहिराणी बोली समृद्ध आहे. पुरातन काळापासून तीला मोठा इतिहास आहे. ती आजही शेतकरी, स्थानिकांमुळे, लोकगीते, अन्य प्रकारे टिकून आहे. तीचा इतिहास, परंपरा आदींचा या भाषेचे अभ्यासक संशोधक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी घेतलेला आढावा, वाचकांना नक्कीच माहितीत भर घालणारा, विचारप्रवर्तक ठरेल…

खानदेशी बोली

१) प्रादेशिक प्रभेद – बागलानी, तप्तांगी, डोगरांगी, वरल्ह्यांगी, खालल्यांगी, नंदुरबारी, जामनेरी / तावडी, दखनी, घाटोयी2) सामाजिक प्रभेद – अहिराणी / खानदेशी,  लेवा पाटीदार,  गुजरी, लोडसिक्की, काटोनी, तडवी, परदेशी, पावरी, महाराऊ  खानदेशात जनमानसात खानदेशी आणि अहिराणी ह्या दोन संकल्पना कधीही नव्हत्या. खानदेशी व अहिराणी हे दोन शब्द अर्थभेदक कधीही ठरले नाहीत. अहिराणी ही खानदेशाची मध्यवर्ती बोली. तिच्या प्रभावाने आजुबाजूच्या प्रदेशातील बोली ह्या त्या प्रदेशाच्या नावाने (प्रादेशिक प्रभेद बागलाणी, घाटोयी, तप्त्यांगी, खालल्यांगी, वरल्ह्यांगी, डोगरांगी, डांगी, जामनेरी इ.) तर जाती, जातीच्या बोली ह्या जाती वा समाजाच्या नावाने (सामाजिक प्रभेद महाराऊ, गुजरी, परदेशी, भिलाऊ, लेवा, पाटीदार, तडवी, इ.) ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आजही संपूर्ण खानदेशात जनसामान्यात व्यवहार करतांना प्रत्येकजण अहिराणी (खानदेशी) बोलत असला तरी कागदोपत्री, शाळेत नाव दाखल करतांना, जनगणनेच्यावेळी वा कुठलाही फॉर्म भरताना मातृभाषा या रकान्यात ‘मराठी’ हीच मातृभाषा नोंदवितो. (जनगणना अधिकाऱ्यास या बोलीची नोंद घ्यावी असे कधी वाटले नाही. शासनानेही त्या रकान्यात काही बोलींची नावे टाकलेली नाहीत) साधारणतः दोन कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भू-भगातील लोकांची ही दैनंदिन व्यवहाराची बोली असली तरी आपल्या बोलीविषयी अनास्था, लाज वा ग्राम्यतेचे लक्षण मानने ह्या बाबीमुळे सरकार दरबारी अहिराणी किंवा खानदेशी बोली बोलणारांची खरी संख्या कागदोपत्री आजवरही आलेली नाही.

अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा उपरोक्त भाषा भूगोल (आधीचा खानदेश जिल्हा, त्यानंतर नासिकचे कळवण, सटाणा, मालेगांव तालुके व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सोयगांव व कन्नड हे तालुक्यातील डोगराखालील खानदेश लगतची गावे) आजवर संशोधकांनी स्विकारला आहे. आता नुकत्याच माझ्या क्षेत्रिय पाहणीतून असे लक्षात आले की ही खानदेशात बोलली जाणारी बोली जशीच्या तशी विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गांवातून केवळ गवळी समुदायाकडून बोलली जाते. मात्र या लोकांना अहिर वा अहिराणी वा खानदेशी या संकल्पना अद्यापही ज्ञात नाहीत. ते आपल्या या बोलीला गवळी बोली म्हणून संबोधतात. त्यामुळे आता खानदेशी बोलीच्या सामाजिक प्रभेदात गवळी बोली तर प्रादेशिक प्रभेदात वऱ्हाडची अहिराणी म्हणून समावेश करुन सध्याचा भाषा भूगोलाचा विस्तार करावा लागत आहे.

असे असले तरी सोरटी सोमनाथावरील गझनीच्या महंमदाच्या स्वारीनंतर पलायन केलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवगीरीला आश्रय घेतला व तेथून त्यांना तामीळनाडूतील मंदिराच्या पौराहित्यासाठी नेले गेले पुढे ते मांसांहारीही बनले व सुताला रंग देण्याच्या व्यवसायातही उतरले. (हा इतिहास के. सी. कृष्णमुर्ती यांनी ‘द मायग्रन्ट सिल्क व्हेव्हर्स ऑफ तामिलनाडू’ या ग्रंथात केला आहे. प्रकाशन फेब्रु. २०१४) त्यांची बोली तेथे सौराष्ट्री म्हणून प्रचलित असून तिच्यात आणि अहिराणीतही बरेच साम्य आढळते. या शिवाय नेपाळच्या नेपाळी बोलीत आणि अहिराणी बोलीतही बरेच साम्य आहे. अधिकचा अभ्यास करुन त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे)

अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील मेळघाट अभयारण्याचा मध्य प्रदेशाच्या, अशिरगड किल्ल्यापर्यतचा भागातील वस्तीला असलेले गवळी या जातीच्या लोकांची बोली ही गवळी बोली आहे. या गवळी बोली बोलणारांची संख्या ही सुमारे पन्नास हजाराहून अधिकची आहे. देवगांव, कुकरु, खामगांवसारखी काही गावे ही संपूर्ण गवळी या जातीच्या लोकसंख्येची गावे आहेत. चिखलदरा, सांगोळा, कोहा ढाकण, मोथा, लवादा, देवगांव, धामनगांव गढी, हरीसाल, अंबापाटी, टेंभरु सोजाई, जामली, वस्तापूर, कुलंगणा खुर्द, उपासखेडा, नवाखडा अशाही काही गावांची नावे ही गवळ्यांची वस्ती असलेली गावे सांगता येतील. अभ्यासाअंती असे लक्षत येते की, या सगळ्या गवळ्यांची ही गवळी बोली आणि खानदेशात प्रचलित असलेली अहिराणी बोली ह्या दोन बोली भिन्न वा स्वतंत्र वेगवेगळ्या बोली नसून त्या एकच बोली आहेत. मात्र, खानदेशात ती अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ती गवळी बोली म्हणून ओळखली जाते आहे. विशेष बाब ही की आजपर्यंत अहिराणीच्या अभ्यासकांना ज्या प्रमाणे गवळी बोली हे अहिराणीचे वेगळ्या भू-प्रदेशात आढळणारे रुप आहे ही बाब ज्ञात नाही. तशीच गवळी बोलीच्या अभ्यासकांनाही गवळी बोली ही अहिराणी बोलीचेच रुप आहे हे ज्ञात नाही. मात्र शब्दावली, वाक्याची रुपे, विभक्ती प्रत्यय, ही भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासाची सगळी वैशिष्टे ही दोनही बोलीत सारखी आणि एकच आहेत. धारणी, चिखलदरा या भागात या गवळ्यांना अहिराणी हा शब्द ज्ञात नाही. ते आपल्या बोलीला गवळी बोली असेच म्हणतात. हे सारे गवळी लोक कोरकू, कुणबी, गोंड वा कोलामांसोबत राहात असले तरी गवळी बोली ही केवळ गवळी लोकांचीच बोली असून तेच बोलतात. गवळी बोली वर आजवर भाषावैज्ञानिक अभ्यास कुणी मांडल्याचे ज्ञात नाही. भाषा सव्र्व्हेक्षणातही मेळघाटातील या गवळ्ळ्यांच्या बोलीला ग्रिअर्सन पासून आताच्या भारतीय भाषा सर्वेक्षणापर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही. म्हणजे या मेळघाटात बोलीच्या सर्वेक्षणाचेही आदिवासीप्रमाणे कुपोषण झालेले आढळते.

या गवळ्यांच्या या भागातील आगमनाबाबतच्या काही कथाही मिळतात. कौडीण्यपूरहूर रुक्मीनी आणण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या गवळ्यांच्या लवाजम्यासह विदर्भात कूच केली. त्यांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बलदेवानेही गवळी आणि त्यांच्या गुराढोरांसह कूच केली. परतीच्या मार्गावर चांदूर बाजार, अचलपूर सारख्या काळ्या जमिनीवर आपल्या गुरांचे पाय फसतात व गुरांना त्रास होतो हे जाणून त्यांनी तो काळ्या जमिनीचा भाग सोडून टणक जमिनीकडे वाटचाल केली. ते मेळघाट आले. रुक्मिणीला घेवून श्रीकृष्ण व गवळी रातोरात परतलेत. मात्र, काही गवळ्यांना आपल्या गुराढोरांसह, लवाजम्यासह परतने शक्य झाले नाही. शिवाय आपल्या गुरांसाठी चारा असलेले घनदाट जंगल त्यांना आवडले. हे गवळी परत मथुरेला न जात तेथेच राहिलेत. वन्यजीवांकडून आपल्या गुरांचे सरंक्षण करण्याच्यादृष्टिने त्यांनी मातीच्या भिंतीची तटबंदी बांधून गाविलगड किल्ला बांधला. गाविलगड हा गवळ्यांचा किल्ला. पुढेही चिखलदऱ्याहून इंग्रजांनी या गवळ्यांना हुसकावून जंगलात पिटाळले. अशिरगड, नरनाळा आणि गाविलगड ही किल्ले गवळी आपले किल्ले समजतात. अशिरगडची आशादेवी ही त्यांचे कुलदैवत मानतात. ते कृष्णाला आपले पूर्वज मानतात. केवळ बोलीच नव्हे तर त्यांच्या रुढी परंपरा, विवाह विधी, सण उत्सव, हे खानदेशातील अहिराणी भार्षिक लोकांप्रमाणेच आहेत. या विदर्भातील गवळ्यामध्ये खेडके, हेकडे, शेडके, शनवारे, सावडे, गायन, तोटे अशी आडनावे आढळतात. मात्र, अशी आडनावे खानदेशातील अहिराणी भाषकांत आढळत नाहीत. खानेदशातील अहिराणी भाषिक हे विविध जातीचे असून कुणबी, मराठा, सोनार, शिंपी अशा विविध जातीत विभागले गेले आहेत. या गवळ्यांनी आपल्या दुग्धव्यवसायाशी संबंधित जी धार्मिक विधी आजही जपून ठेवलेली आहेत ती खानेदशात नावालाच आढळतात. विदर्भातील हे गवळी गुलाबाई, गौराई, भालदेव, विवाहाची गाणी, जात्यावरची गाणी हे सगळ आजही जपून आहेत. मात्र खानदेशात महत्त्वाचा समजला जाणरा कानबाईचा उत्सव या विदर्भातील गवळी जमातीत आढळत नाही. खानदेशातील या अहिराणी भाषकांप्रमाणे त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी कमी आलेला असल्याने खानदेशीच्या मानाने त्यांच्यात सांस्कृतिक वा भाषिक बदल कमीच आढळतो. आजही हे गवळी मुलाच्या जन्मा नंतर कास्य या धातूची थाळी वाजवितात तर मुलीच्या जन्मा नंतर सूप वाजवितात. या गवळ्याचे महत्वाचे सण वा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी आणि दिपावलीची गायगोंदन. आपल्या दुग्ध व्यवसायाशी व कृष्णाशी संबंधित हे विधी ते आजही पाळतांना दिसतात. आपल्या जनावरांची हेटी करुन राहणे हे या गवळ्यात आजही आढळते. मात्र खानदेशात हे प्रमाण कमी झाले आहे. खानदेशाप्रमाणे आखाजीला पित्तर जेवू घालणे, विवाह प्रसंगी पूर्वजाना निवतं देणे हे विदर्भातील गवळ्यात आढळते. खानदेशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जीवनाशी साधर्म्य राखणारे हे गवळी स्वतःला गवळी, गोपालक, श्रीकृष्णाचे वंशज म्हणत असले तरी ते खानदेशातील अहिराहून वेगळे नाहीत हे अहिराविषयी जाणून घेतल्यावर लक्षात येते. विदर्भतील या गवळी जातीवर इतिहासकारांनी विषेश प्रकाश टाकलेला आढळत नाही.

खानदेशातील बऱ्याच परंपरा या मोडीत निघाल्या, मात्र दुग्धव्यवसायासंबंधीत बऱ्याच परंपरा आजही बोली सोबत या गवळी समाजाने जपून ठेवलेल्या आढळतात. तेही स्वतःला गोपालक समजतात. दोहोचे नाते श्रीकृष्णाशी अन अशिरगड, गावीलगड यांच्याशी आहे. अर्थात यादव, अहिर, गवळी हे एकाच कुलातील.

अहिराणी काल, आज आणि उद्या- अहिराणी ही ऐके काळी खानदेश परिसरातील मुख्य बोली होती. ती व्यवहाराची भाषा होती. अहिरराजे यांची ती प्रमुख बोली. धुळे, नंदूरबार, जळगांव, नासिकचा कळवण, सटाणा, मालेगांव अन छत्रपती संभाजीनगरचा कन्नड व सोयगांव या तालुक्यांचा भाग या परिसरात ती आजही बोलली जाते. या परिसराची लोकसंख्या ही दिड कोटीच्या आसपास आहेच. या शिवाय उर्वरित महाराष्ट्रात आणि गुजरात व मध्यप्रदेशात नोकरी वा व्यापारा निमित्ताने गेलेले सारे खानदेशवासी हे आपल्या घरात अहिराणीच बोलतात. जगाच्या पाठिवर अनेक देशातही खानदेशातील माणूस स्थाईक झालेला आहे. तेथेही तो आपल्या कुटूंबात अहिराणी जपून आहे. पूर्वी अहिराणी बोलणे गावंढळ, ग्राम्यतेचे लक्षण मानले जाई. अलिकडे भाषिक अन प्रादेशिक अस्मिता जोपासली जाऊ लागली आहे. या शिवाय जागतिक स्तरावर विविध विद्यापिठातून बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्व पटू लागल्याने त्या जतन करण्याकडे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जगाचा कल वाढू लागला आहे. आजवर प्रमाण भाषांनी बोलींना, बोलीतील शब्दांना दूर ठेवले होते. आता अलिकडे अभ्यासकांना याच बोलीतून प्रमाण भाषा जन्माला येते व बोलींच्या आधारानेच ती वाढते, टिकते हे कळू लागले आहे. त्यामुळे आपली बोली जतन करण्याचा तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सामान्य स्तरावरही होऊ लागला आहे.

अलिकडे अहिराणीतून दिनदर्शिका, लग्नपत्रिका, माहिती पत्रके छापली जात आहेत. जे जे मराठीतून असते ते ते आता अहिराणी बोलीतून प्रकाशित होत आहे. सकस वांङमयाचे अहिराणीतून भाषांतरेही होवू लागली आहेत. अहिराणी बोलीचा शब्दकोश, भाषावैज्ञानिक अभ्यास, सुलभ व्याकरण, सचित्र कोश, म्हणी कोश, वाकप्रचार कोश, ओवी कोश अहिराणी बोलीतील  लोकसाहित्य आदी प्रकारचे माझे ग्रंथ प्रकाशित आहेतच. कालऔघात बोली नष्ट होत आहेत असे म्हटले जात असेल तरी जगभर या बोली वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. या बोली वाचवून ठेवण्यात शेतकरी व शेतमजूर यांच मोठा वाटा आहे. हा वर्ग आपली बोली आजी सांभाळून आहे. जगभर बोली वाचविण्याची चळवळ सुरुच आहे. त्या मुळे बोलीच भवितव्य हे उज्वल असेच आहे.

०००

  • डॉ. रमेश सुर्यवंशी, अभ्यासिका‘,

वाणी मंगल कार्यालया समोर, कन्नड

ता. कन्नड जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) पिन ४३११०३

मोबाईल ०९४२१४३२२१८/८४४६४३२२१८

शासकीय प्रयोजनात मराठी

प्रशासकीय कामकाज मराठीतून करणे आवश्यक आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण याची सुरुवात नक्की कधीपासून झाली, कोणत्या नियमान्वये झाली याची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसेल. , हे सर्व मराठीजनांना माहिती होणे आवश्यक आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने याबाबतचा घेतलेला आढावा…

मराठी भाषेचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून २०१० मध्ये स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन करण्यात आला प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्यासाठी सर्वांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न करणे आदी विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विभागामार्फत विविध योजना, उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून मराठीचे वैभव जपण्यासाठी, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. भाषा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शासकीय/केंद्रशासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत मराठी भाषेत विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अमराठी कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येते.

धोरण जाहीर

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्य शासनाने शक्य तितक्या लवकर इंग्रजीऐवजी मराठीतून राज्यकारभार करण्याचे धोरण जाहीर केले. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ या अधिनियमान्वये २६ जानेवारी  १९६५ पासून मराठी ही राज्याची राजभाषा म्हणून घोषित करण्यात आली व महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला. राज्य सरकार वेळोवेळी निर्दिष्ट करील अशी वर्जित प्रयोजने वगळता उर्वरित सर्व शासकीय प्रयोजनांकरिता महाराष्ट्र राज्याच्या संबंधात उपयोगात आणावयाची भाषा मराठी असेल. अशी तरतूद या अधिनियमाद्वारे करण्यात आली.

राजभाषा अधिनियमान्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून ३०.०४.१९६६ ध्या अधिसूचनेन्वये काही वर्जित प्रयोजने निर्दिष्ट करण्यात आली. १ मे १९६६ पासून सदर वर्जित प्रयोजने वगळता सर्व शासकीय प्रयोजने मराठीतून करणे अनिवार्य करण्यात आले. वर्जित प्रयोजने म्हणजे अशी शासकीय कामकाजाची प्रयोजने ज्यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची सक्ती नाही. त्यामध्ये साधारणपणे केंद्र शासन व केंद्रीय कार्यालये, अन्य राज्ये, परराष्ट्रांचे दूतावास, महालेखापाल यांच्याशी करण्यात येणारा पत्रव्यवहार तसेच, वैद्यकीय औषधी योजना व अहवाल आणि वैद्यकीय विभागातील तांत्रिक बाबी इत्यादींचा समावेश आहे.

विविध उपाययोजना

शासन व्यवहारात मराठीचा वापर करणे सुलभ व्हावे, म्हणून शासनाने बन्याच उपाययोजना केल्या. शासकीय कर्मचाऱ्यांना मराठीतून टिपण्या व पत्रव्यवहार करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने प्रशासनिक लेखनाला उपयुक्त होईल असे साहित्य, पुस्तके. शुद्धलेखन नियमावली, विविध परिभाषा कोश, शब्दावल्या तयार करण्यात आल्या व त्यांच्या प्रती शासकीय कार्यालयांना पुरवण्यात आल्या. इंग्रजी टंकलेखकांना व लघुलेखकांना मराठी टंकलेखनाचे व लघुलेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले. अमराठी भाषिक अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मराठीचे प्रशिक्षण वर्ग चालवण्यात आले. एतदर्थ मंडळामार्फत मराठी भाषा परीक्षा घेण्यात येऊ लागल्या. मराठी भाषेचा वापर शासकीय प्रयोजनांमध्ये सर्व विभागांनी व प्रशासकीय कार्यालयांनी करावा, यासाठी मराठी भाषा विभागामार्फत वेळोवेळी परिपत्रके, शासन निर्णय इत्यादींद्वारे सूचना देण्यात आल्या. या सर्व सूचना ७ मे २०१८ च्या परिपत्रकामध्ये एकत्रितरीत्या पुन्हा सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

वर नमूद केलेले सर्व प्रयत्न करूनही मराठी भाषेच्या वापराबाबत शासनाने ठरवलेले उद्दिष्ट साध्य होत नसल्याने महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम २०२१ नुसार करण्यात आल्या. यामध्ये नक्की कोणकोणत्या शासकीय प्रयोजनांमध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे, ती शासकीय प्रयोजने स्पष्ट करण्यात आलेली आहेत. वर्जित प्रयोजने वगळता उर्वरित शासकीय प्रयोजनात मराठी भाषेचा वापर होतो आहे ना. हे पाहण्यासाठी प्रत्येक कार्यालयात मराठी भाषा अधिकारी नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मराठी व्यवहारात

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील तरतुदी फक्त प्रशासकीय कामकाजापुरत्याच मर्यादित आहेत. मात्र, दैनंदिन व्यवहारात लागणान्या अनेक गोष्टी मराठी भाषेत उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांची असते. त्यानुसार तक्रारी मराठी भाषा विभागाकडे प्राप्त होतात. त्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित असतात. उदाहरणार्थ रस्ते, उद्याने, दुकाने, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या पाट्या, वस्तूंची वेष्टणे व त्यावर लिहिलेली माहिती, नगरपालिकांमार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती इ. माहिती त्यांना मराठी भाषेत हवी असते. संबंधित विभागांनी ती माहिती मराठी भाषेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाचे प्रत्येक कार्यालय जनसंवाद व जनहित यासंबंधी त्यांच्या धोरणामध्ये मराठीचा वापर करण्यासाठी यथोचित तरतूद करेल आणि सर्व कार्यालये त्यांच्या संकेतस्थळावर किंवा संदेशवहनाच्या कोणत्याही साधनावर मराठी भाषेच्या वापराबाबत स्वयंप्रेरणेने प्रकटीकरण करतील, अशी तरतूद अधिनियमात करण्यात आली आहे.

मराठी भाषेचा वापर न केल्याबाबत येणाऱ्या तक्रारींची जिल्हापातळीवरच दखल घेऊन लगेच कार्यवाही करण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर समिती जिल्ह्यामध्ये प्राप्त होणान्या तक्रारींवर कार्यवाही करेल आणि मराठी भाषेबाबतचे उपक्रम आपापत्या जिल्ह्यात राबवेल. जिल्हास्तरीय समितीला मदत करण्यासाठी तसेच सल्ला देण्यासाठी राज्यस्तरावरदेखील एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी न करणान्या कर्मचान्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूददेखील अधिनियमात करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी वरीलप्रमाणे अनेक उपाययोजना विभागाकडून निरंतर सुरू आहेत. अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी इतर विभागांचा व प्रशासकीय कार्यालयांचा सहभाग देखील मोलाचा आहे.

०००

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, रायगड – अलिबाग

अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि खानदेशातील साहित्य परंपरा…

                          

 बोरी, पांझरा, गिरणा                    

 नांदे तापीच्या कुशीत,

 पिक साहित्याचे डुले

 सोनं खान्देश भूमीत…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी देशभर साहित्य पंढरीच्या रुपाने घुमते आहे. शब्द वारकरी आनंदाने सहभागी होताना ज्ञानाची गंगा वाहते आहे, ग्रंथसार भाषा रसाचा बोलीभाषेच्या अमृताने साहित्य समृध्दतेच्या घागरीतून पाझरतो आहे, लेाकवाङ्मयाची दौलत काळाचा महिमा घेऊन आधुनिक साहित्याची दालने खेालत आहे, प्राकृत वाणीच्या इतिहासाची कौतुके ज्ञानबा-तुकोबाच्या गाथेची पारायणे करत आहे, शब्दांची भाषा, लेखनीच्या अंगाने बोलू लागली की, संवेदनांचे काहूर मानवी मनाच्या गाभाऱ्यात भावगर्भ रचनांनी संचयित साहित्य कोशाला संपन्न करते आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांचे बिगुल वाजते. २१ ते २३ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत पार पडत आहे. संयुक्त १९५४ नंतर ७ दशकांचा टप्पा पार पडल्यानंतर पुन्हा दिल्लीवारी साहित्य संमेलनाला होत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली दरबारी होते आहे आणि खान्देशी साहित्य परंपरेचा भूतकाळ नजरेसमोर उभा राहतेा आहे. माळवा, दायमाबाद, हरप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीनता टिकवून ठेवणाऱ्या खानदेशी संस्कृतीच्या खानदेशात अभीरांची अहिरानी भाषा आपल्या प्रभाव क्षेत्रातील बारा बोलीभाषा मध्यवर्ती अहिरानी, बागलानी, नंदुरबारी, डांगी, नेमाडी, लाडशिक्की, पावरी भिल्ली, भिलाऊ, भावसारी, लेवा पाटीदारी, गुजराऊ, तडवी अशा मौखिक वाङ्मयाच्या सरिता प्रवाहीत ठेवल्या आहेत. या भाषेतील साहित्य परंपरा प्राचीन काळापासूनची अजरामर आहे. पाटणादेवीच्या जंगलातील रहिवास याची साक्ष देतो. वाडे, ता. भडगाव येथील महालिंगदास अहिरराव महाराजांचे अजरामर साहित्य म्हणजे राजनितिवर आधारीत पंचोपाख्यान, सिंहासन बत्तिसी-वेताळ आणि विक्रमाची कथा, पंचतंत्र-राजपुत्रांसाठीचा अभ्यासक्रम, शालिहोत्र-अश्वचिकित्सा म्हणजे प्राणीशास्त्रावरील पाहिला ग्रंथ, चाणक्यनिती-चाणक्याची राजनिती आणि अर्थशास्त्र या पाच महान ग्रंथांचे लेखन होय. महालिंगदास महाराजांच्या पंचोपाख्यानाचा आधार घेत स्वराज्याचे आज्ञापत्र राज्यघटना लिहिल्याचे शिखर शिंगणापूरचा शंभो महादेव या पुस्तकात रा. चि. ढेरे नमूद करतात. गणिततज्ञ, खगोल शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांचा चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे निवास राहिलेला आहे.

 

”या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे…

कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे”……

यांसारख्या अजरामर रचना बहाल करणारे सांगवी पळासखेडे येथील निसर्गकवी ना. धो. महानोर…

 

”अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,

आधी हाताले चटके, तवा मिळते भाकर”….

असे जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या कवयित्री, आसोद्याचे माहेर असलेल्या बहिणाबाई चौधरी, धरणगावचा जन्म असलेले बालकवी, भडगावची कर्मभूमी असलेले केशवसुत, बहादरपूरचे बा. सी. मर्ढेकर, अमळनेरची कर्मभूमी असलेले मातृहृदयी साने गुरूजी, शेंदुर्णीचे दु.आ. तिवारी, अंतापुरचे कवी कमलनयन, शिरपुरच्या स्मिता पाटील, थाळनेरचे आजोळ असलेल्या लता मंगेशकर, मालेगावचे दा.गो.बोरसे, पिंपळनेरचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, चाळीसगावचे रहिवासी तथा जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस यांच्याप्रमाणेच सामान्य माणसांचे असामान्य लेखन जगातील विद्वानांनी संदर्भ म्हणून वापरावे एवढी समृद्धी तथा प्रगल्भता येथील साहित्यिक विचारवंतांमध्ये ठायीठायी भरलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, कृषी संस्कृती, बुध्दविचार व अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारीक मांडणी करणारे विचारवंत कॉ. शरद पाटील होय. दास शुद्रांची गुलामगिरी, रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष, जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्व, शिवाजींच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद, स्त्री शुद्रांच्या स्वराज्याचा राजा अशी असंख्य प्रकारची साहित्य संपदा त्यांनी निर्माण करून साहित्य विश्वाला तथा वैचारीक चळवळींना अधिक बळ दिले. श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेत प्राध्यापकाची नोकरी करत असताना कवितेच्या प्रांतात पाऊल टाकणारे पुपाजी आपल्या काव्यप्रतिभेने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे काव्यसमिक्षक होते. कविता रतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य नामवंत कवींना उजेडात आणण्याचे काम पुपाजींनी केले. जेष्ठ गांधीवादी तथा हिंदी, मराठी साहित्यिक म्हणजे डॉ.मु.ब. शहा होय. कवी नागेश मोगलाईकर, नाट्य कलावंत शरद यादव, मुकुंद धाराशिवकर, राम सुतार, दिपक निकम आणि कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालसाहित्य व विनोद लेखन अशा विविध साहित्य प्रकारात मुशाफिरी करणारे प्रा. अनिल सोनार हे नाव धुळ्याच्या वैभवात भर घालणारे आहे. ३८ वर्षाच्या भ्रमंतीनंतर लेखनाची साधने गोळी करत इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा धुळे शहराशी संबंध आल्यानंतर बराच काळ कार्य केले. राजवाडे संशोधन मंडळात वि. का. राजवाडे यांनी जमविलेल्या असंख्य कागदपत्रांचा दफ्तरखाना आहे. आजही धुळे जिल्हा व खानदेशातील साहित्य व वैचारीक चळवळीची परंपरा मोठ्या तपस्येनंतरही अविरतपणे सुरूच आहे.

बोलीभाषा या मराठीला उपनद्यांसारख्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून मराठीची गंगा समृद्ध होताना दिसते आहे. खान्देशातील लोकवाङ्मय गावोगावी संवर्धित केले जात आहे. अशाच प्रकारची कवणे हळद लावल्यानंतर तेलवण पाडताना, आंघोळ करताना, लग्न लागताना म्हटली जातात. जो मौखिक वाङ्मयाचा मोठा ठेवा आहे. जात्यावर दळण दळताना, उखळात कांडण करताना, घरगुती सामान बनवताना, गोंधळाला व खास करून मरणाच्या देखील ओव्या खानदेशात गायल्या जातात. धुळे जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या आहिराणी भाषेत गप-गफूडा, कोडी, आन्हा, उखाणे, म्हणी, वाकप्रचार, लग्नाची गाणी, जात्यावरील ओव्या, भारुड, गण, गवळण, सणांची गाणी, गौराईचे गाणे, कानबाईचे गाण, गुलाबाईचे गाणे, लावणी, पोवाडा, गद्यगोट, पद्यगोट, लघुगोट, सकी, चुटके, छाप, गद्य चुटका, पद्य चुटका व गोंधळ जागरण, भगताच्या वह्या असा लोकवाङमयाचा साहित्य प्रकार खान्देशातील धुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक व भाषिक उत्कर्षासाठी हातभार लावणारा आहे. भाषा, साहित्य व संस्कृतीची समृध्द परंपरा खानदेशाला लाभली आहे. म्हणून आपण या लिखित, मौखिक व भौतिक साधनांच्या आधारे भाषेचा समृद्ध ठेवा जपून त्यास संवर्धित करण्याची आवश्यकता आहे. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राष्ट्रप्रेम व मानवतावादी विचारांचा समृध्द वारसा जपणाऱ्या खान्देशातील मुल्याधिष्ठित अधिष्ठानाला आपले भविष्यातील संचित माणून जपूया.

अभिजात भाषा म्हणून गणल्या जाणाऱ्या मराठीला समृद्ध करण्यासाठी खानदेशातील साहित्य परंपरा अखिल भारतीय संमेलनात सजावी, नटावी या आशेने पाहते आहे. खान्देशात खूप कमी वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन होत असते. खानदेशातील बोलीभाषा व साहित्याला संमेलनांमध्ये सहभागी करून साहित्यिक दरी दूर करून माणूस म्हणून सर्व भिंती पाडून एकत्रित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिशा आखली जावी हीच खानदेशी साहित्य परंपरेची माफक आशा आहे.

०००

  • डॉ. सदाशिव सुर्यवंशी, अध्यक्ष, खानदेश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य, धुळे, भ्रमणध्वनी 9405371313

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. १४ : सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्द‍िष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित उर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम २०२४-२५ (संरक्षण क्षमता महोत्सव) १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री कु.तटकरे बोलत होत्या.

कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे बिझनेस हेड राहूल टंडन, हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिश बसक, बीपीसीएलचे राज्य प्रमुख राकेश सिन्हा, इंडियन ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत गिते,  जीएआयएल इंडिया लि.चे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दिपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समुहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधनबचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारत सरकारने २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्द‍िष्ट असले पाहिजे.

घरातही आपण गॅस, वीज वापर, योग्य पद्धतीने केला. इमारतींवर सौर पॅनल वापरले, सिग्नलला वाहन बंद करणे अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण इंधनाची बचत करू शकतो आणि शाश्वत विकास गाठू शकतो, असे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

राज्य समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी सांगितले की, १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहे. यामध्ये  विद्यार्थी, तरूण, वाहन चालक, क्लिनर, कर्मचारी, शेतकरी, निवासी संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था अशा अनेकांपर्यंत पोहोचून इंधन बचतीचे महत्व, फायदे यासंदर्भात जागृती करण्यात येणार आहे. इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सायक्लोथॉन, वॉकेथॉन, चित्रकला स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश पोहोचविला जाणार आहे.

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...