सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 215

मंत्री संजय शिरसाट यांची ‘दिलखुलास’मध्ये ७ व ८ एप्रिल तर ‘जय महाराष्ट्र’ मध्ये ८ रोजी मुलाखत

मुंबई दि. ०४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त’ करण्यात आलेली तयारी, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि अंमलबजावणी या विषयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. ७ आणि मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

राज्यातील अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील लोकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना व उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभरात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी आणि नागरिक चैत्यभूमीवर येणार असल्याने त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंत्री शिरसाट यांनी विभागांतर्गत घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त करण्यात आलेल्या तयारीबाबत माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

‘भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ०४: हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, ‘रोटी, कपडा और मकान’ आणि क्रांति यांसारख्या अजरामर चित्रपटांद्वारे देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान त्यांनी जपला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवले. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखले जात असे. त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत राहतील.

त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

०००

संजय ओरके/विसंअ/

राज्यांनी परस्परांच्या संस्कृती, परंपरांचा आदर केल्यास एकात्मता वाढेल -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ०४: देशातील लोकांमध्ये एकी नसल्यामुळे विदेशी शासकांनी आपल्यात फूट पाडून देशावर अनेक शतके राज्य केले. राज्यांनी परस्परांच्या संस्कृती परंपरांचा आदर केल्यास लोकांमधील एकात्मता वाढेल व सर्वांनी एकदिलाने राष्ट्रासाठी योगदान दिल्यास ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्मितीचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे संयुक्तपणे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व लोकगीतांच्या माध्यमातून राजस्थान व ओडिशा राज्यांच्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

केंद्र सरकारच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी देशातील लोकांमध्ये फूट पाडून करोडोंची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशावर अनेक दशके राज्य केले. आगामी काळात प्रगतीची शिखरे सर करण्यासाठी देशात एकात्मता टिकून राहणे आवश्यक असून एकतेमुळे देशाचे जगातील स्थान उंचावले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राजस्थान व ओडिशा राज्यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात देखील महत्वाचे योगदान आहे. ओडिशाचे सुपुत्र शेलेंद्र यांनी इंडोनेशियातील जावा, सुमात्रा इथपर्यंत राज्यविस्तार केला होता. ओडिशात जन्मलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण होते असे सांगून एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे देशातील लोकांना इतर राज्यातील महान नेत्यांचे योगदान समजण्यास मदत होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचा इतिहास, सौंदर्य, वारसा, कला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया आणि झिरमीर बरसे आणि लोकनृत्य चिरामी, घूमर आणि कालबेलिया सादर केले. राजस्थानी राज्यगीत ‘पधारो म्हारो देस’ ने उपस्थितांची माने जिंकली.

तसेच, ओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत- ‘रसरकेली बो’ आणि लोकनृत्य – संभलपुरी ढलकाई सादर करण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

०००

महिलेच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश

मुंबई, दि. ०४: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

०००

नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

मुंबई, दि. ०४:  नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेतीकामासाठी जात होत्या.

विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

०००

‘भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई, दि. ४ : हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी, कपडा और मकान आणि क्रांति यांसारख्या अजरामर चित्रपटांद्वारे देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान त्यांनी जपला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवलं. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखले जात असे. त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत राहतील.

त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
000

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ४ : अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करण्याच्या उद्देशाने “मिशन लक्ष्यवेध” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून, इच्छुक क्रीडा अकादमींनी २१ एप्रिल पर्यंत अर्ज करावेत अशी माहिती मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. खेळाडूंनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरिता नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी वॉक्सिग, अथलेटीक्स, कुस्ती, टेबल टेनिस, व शूटिंग हे खेळ आहेत.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडामार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग तसेच ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक रु.१०.०० लक्ष, ‘ब’ वर्ग रु.२०.०० लक्ष व ‘अ’ वर्ग रु.३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ बाबींवर खर्च करण्यासाठी शासना मार्फत देण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजी नगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१ या पत्त्यावर संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती रश्मी आंबेडकर यांनी केलेले आहे. तरी अधिक माहितीसाठी श्रीमती प्रिती टेमघरे (क्रीडा कार्यकारी अधिकारी) मो. क्र. ९०२९२५०२६८ यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अभ्यास अहवाल तयार करावा – वनमंत्री गणेश नाईक

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागातील ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात कांदळवन असून येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असते. पर्यटनाच्या दृष्टिने या भागात कांदळवन सफारी पार्क (मँग्रोव्ह पार्क) उभारण्याच्या दृष्टिने अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

वन विभागाच्या विविध विषयासंदर्भात वनमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र इस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले की, पर्यटन विकासासाठी नवी मुंबईतील खाडी किनारी उत्तम संधी आहेत. कांदळवन, फ्लेमिंगो पक्षी हे निसर्ग पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात.त्यामुळे या परिसरातील ऐरोली, घनसोली या भागात जागतिक दर्जाचे मँग्रोव्ह पार्क उभारता येईल का याचा अभ्यास करून जागा पाहणी करावी. यासंदर्भातील सविस्तर अहवाल द्यावा.

तसेच वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. विशेषतः जुन्नर, कराड व संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. राजस्थानमधील जवाई बिबट सफारीच्या धर्तीवर या तीन तालुक्यातही बिबट सफारी करता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश वन मंत्री श्री. नाईक यांनी दिली.

रान म्हैस, माळढोक या सारख्या संकटग्रस्त प्रजाती वाचविण्यासाठी नागपूरमधील गोरेवाडा प्रकल्पात आंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र स्थापण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीबरोबर सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. नाईक यांनी यावेळी दिले.

श्री. परदेशी यांनी आंतरराष्ट्रीय प्रजनन केंद्र व बीएचएनएसबरोबरचा करार महत्त्वाचा असून यास चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

दोडामार्ग परिसरातील रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे – वनमंत्री गणेश नाईक

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. ४ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करावे. तसेच या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे होणारा त्रासासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात  मंत्रालयात वनमंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार ही बैठक लावण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी.व्ही. रामाराव आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा. या हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवल्यास ते शेताकडे येणार नाहीत. त्यासाठी तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी हत्तींच्या उपजिवीकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस आदी झाडे लावण्यात यावे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांचे फेन्सिंग करण्यासंदर्भात नियोजन करावे. या रानटी हत्तींना रेडिओ कॉलरिंग करून त्यांच्या वावरावर लक्ष ठेवण्यात यावे. यासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वन विभागातील प्रशिक्षत मनुष्यबळांचे मार्गदर्शन घ्यावे.

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवावा. तसेच यामध्ये बांबू पिकाच्या समावेशाबद्दलही प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. नाईक यांनी दिले.

श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४: मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
००००

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...