शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 21

‘सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. २५ : ‘माविम’तर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘सीएमआरसी’ अंतर्गत कार्यरत कर्मचा-यांचे मानधन तसेच त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी  सांगितले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे महिला बालविकास विभागातील लोकसंचलित केंद्र (सीएमआरसी) विषयक विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, ‘माविम’च्या सह संचालक नंदिनी डहाळे, वित्त विभागाचे अवर सचिव अ.मु.डहाळे, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव सुनील सरदार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, भारतीय मजूर संघाचे प्रदेश महामंत्री गजानन गटेलवार, माधव लोहे, पद्मावती गायकवाड, सुरेश गोगले, सुनील चव्हाण,स्मिता कांबळे, राहुल शिंदे यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महिला व आर्थिक विकास महामंडळातर्फे स्थापन करण्यात आलेले लोकसंचालित साधन केंद्रे स्वयंपूर्ण लोकसंस्था असून स्वबळावर खर्च भागवण्याचे मॉडेल त्यांनी महाराष्ट्रात यशस्वीपणे सिद्ध केले आहे. या ‘सीएमआरसी’ मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत राज्य शासन संवदेनशील असून ‘माविम’ स्थापित बचत गटासाठी फिरता निधी व माविम स्थापित ‘सीएमआरसी’ करिता वार्षिक तत्वावर विशेष आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर आहे. त्याचा पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

 

महाराष्ट्र कृषी व औद्योगिक विकासासाठी सज्ज – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 25 : “आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, कृषी व औद्योगिक क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आयोजित “महाराष्ट्र उद्योग संवाद” या बीकेसी येथील परिसंवादात ते बोलत होते.

“संपूर्ण जगाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे हे आमचे पहिले पाऊल आहे. आपण काय देऊ शकतो आणि जगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे समजून घेण्याची ही सुरुवात आहे,” असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

पणन मंत्री रावल म्हणाले, “महाराष्ट्र हे केवळ उद्योगप्रधान राज्य नाही, तर राज्याच्या कृषी संपन्नतेचाही भक्कम पाया आहे. नाशिकची द्राक्षबागायत, सोलापूरचे डाळिंब, कोकणातील हापूस आंबा आणि साताऱ्याची मसाल्याची उत्पादने जागतिक दर्जाची आहेत.”

महाराष्ट्रने २०२३-२४ मध्ये २५,००० कोटींपेक्षा अधिक (३ अब्ज USD) कृषी उत्पादन निर्यात केली. नाशिकच्या द्राक्षांना युरोपियन युनियनची मान्यता मिळाली असून ३० हून अधिक देशांत त्यांची निर्यात होते. कोकणातील हापूस आंब्यांना GI टॅग मिळाल्यामुळे जपान, यूएई, युके या देशांत त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. २०२४ मध्ये हापूसची निर्यात ५०० कोटी रुपयांच्या घरात गेली. या वर्षी ही निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सोलापूरमध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना राज्याच्या मदतीने नवसंजीवनी मिळाली आहे. ‘भगवा’ जातीच्या डाळिंबामुळे आता थेट दुबई, तेहरान, अ‍ॅमस्टरडॅम व लंडनपर्यंत निर्यात केली जाते.

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिक, सोलापूर, सांगली आणि रत्नागिरी येथे निर्यात क्लस्टर तयार करण्यात येत आहेत. थंड साखळी (कोल्ड चेन) सुविधा, मेगा फूड पार्क्स, GI टॅग उत्पादने आणि ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे.”

राज्य शासन ‘सिंगल विंडो एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सिस्टम’ निर्माण करत आहे. समृद्धी महामार्गालगत वाढवण बंदरावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ उभारण्याचे नियोजन आहे, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे अभ्यास दौरेही सुरु आहेत.

0000

संजय ओरके/विसंअ/

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. 25 : नागपूर जिल्ह्यात कामठी येथे ओगावा सोसायटीने ड्रॅगन पॅलेस परिसरातील जागेची उपयोगिता बदलून पर्यटकांची निवास व्यवस्था करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त आणि ओगावा संस्था ही कार्यान्वयन यंत्रणा असेल. संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ओगावा संस्थेच्या नवीन बांधकाम प्रस्तावाबाबत मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओगावा संस्था ड्रॅगन पॅलेस परिसर विकसित करीत आहे. तेथील बांधकामाबाबत ओगावा संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून काम करावे. तसेच याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या उपयोगिता बदलण्याच्या प्रस्तावाबाबत नागपूर जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करुन तो शासनाकडे पाठवावा, असे आदेशही त्यांनी दिले.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

मलेरिया व डेंग्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना वाढवा –  मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई, दि. 25 : मलेरिया व डेंग्यू रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये  सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवण्याचे  निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मुंबईत वाढत असलेले डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबत आढावा बैठक मंत्रालयात मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर, महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदीर मारण्यात आल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत असून याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. शेलार यांनी  महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आली.

या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदिर मारण्यात आले. तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या उंदरांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या उंदरांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून  पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात, या सर्वांची तीन महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश पालकमंत्री शेलार यांनी यावेळी दिले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-२ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 25 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प टप्पा -1 मधील विद्यमान वनाज – रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील. हे दोन उन्नत कॉरिडॉर 12.75 किमी लांबीचे असतील आणि त्यात 13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉर- 2 चा विस्तार आहे आणि व्यापक गतिशीलता योजनेच्या (सीएमपी) उद्दिष्टांशी सुसंगत आहे. या प्रकल्पांतर्गत चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडोर, असा एक सलग मेट्रो मार्ग तयार होणार आहे जो पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करेल.

हे विस्तार प्रमुख आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना सेवा देतील, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि नेटवर्कमधील प्रवाशांचा सहभाग वाढेल. नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन – 1 (निगडी-कात्रज) आणि लाईन – 3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) यांच्यासोबत एकत्रित केले जातील जेणेकरून प्रवाशांसाठी बहुआयामी शहरी प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

दीर्घकालीन वाहतूक नियोजनांतर्गत, मुंबई आणि बेंगळुरू येथून येणाऱ्या आंतरशहर बस सेवा चांदणी चौक येथे एकत्रित केल्या जातील, तर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर येथून येणाऱ्या बस सेवा वाघोली येथे मेट्रोशी जोडल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांना पुण्याच्या मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोचता येईल. या विस्तारांमुळे पौड रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना सुरक्षित, जलद तसेच पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध होतील.

हे कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण लाईन 2 साठी दररोजच्या अंदाजीत अतिरिक्त प्रवाशांची संख्या पुढील प्रमाणे वाढणे अपेक्षित आहे – 2027 मध्ये 0.96 लाख, 2037 मध्ये 2.01 लाख, 2047 मध्ये 2.87 लाख आणि 2027 मध्ये 3.49 लाख. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) द्वारे केली जाणार असून सर्व सिव्हिल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.

स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि तपशीलवार डिझाइन सल्लागार सेवा यासारखी बांधकामपूर्व कामे याआधीच सुरू झाली आहेत.

हा धोरणात्मक विस्तार पुण्याच्या आर्थिक क्षमता विस्तारण्यासाठी, शहराची वाहतूक पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी आणि संपूर्ण महानगर प्रदेशात शाश्वत आणि समावेशक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज आहे

0000

 

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

मुंबई, दि. 25 :  सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव संतोष खोरगडे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, महाविद्यालयाचे संचालक प्रा. राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महाविद्यालयात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. काम दर्जेदार करावे आणि वेळेत पूर्ण करावे असे सांगून महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या दुर्मिळ व ऐतिहासिक चित्रसंग्रहाचे जतन आणि सादरीकरण यासाठी त्यांनी Centres of Research & Creativity (CRC) फंडाच्या माध्यमातून एक अत्याधुनिक “आर्ट गॅलरी” उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन या गॅलरीचे  काम दि. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या आर्ट गॅलरीमुळे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या ऐतिहासिक संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वारशाला अधिक बळकटी मिळणार असल्याचेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करणे, वेतन आयोगाची थकबाकी देणे यासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी  सांगितले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांच्या विविध विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव ई रविंद्रन, वित्त विभागाचे संचालक सिताराम काळे, उपसचिव राजेंद्र गैगने, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश मंत्री गजानन गटलेवार, दशरथ पिपरे, माधव लोहे, अनिल तळेले, बाजीराव सोनवणे, व्ही.के.पांडव, व्ही.जी.शिरसाठ यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे विविध सेवाविषयक मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आणि लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा 

मुंबई, दि. २५ : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि महानिर्मितीने वीज निर्मिती आणि वीज बचतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवावे असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

एच.एस.बी.सी.बँक, फोर्ट येथे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्याच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर घेतला. महापारेषणचे कार्यकारी संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी प्रकल्प संचालक अविनाश निंबाळकर, कार्यकारी संचालक श्रीमती  सुचित्रा भिकाने, मुख्य अभियंता पियुष शर्मा, संचालक वित्त बाळासाहेब थिटे, संचालक संचालन, संजय मारुडकर, प्रकल्प संचालक अभय हरणे, कार्यकारी संचालक नितीन वाघ यासह विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्याच्या वीज निर्मितीचे प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती, महाअभिकरण ऊर्जा, विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत आढावा घेतला.

विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मागेल त्याला कृषी पंप योजना, केंद्र व राज्य शासनाच्या इतर विविध योजना यांची माहिती यावेळी बैठकीत सादर करण्यात आली.

000

संध्या गरवारे/विसंअ/

 

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २५ :- राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 1.93 वरून 0.61 टक्क्यांवर आले आहे. तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण 5.9 वरून 3.11 टक्क्यांवर आले असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात यश आले आहे.

राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने सुरु असलेली ही वाटचाल, राज्याच्या विविध विभाग, यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्न, समन्वय आणि संवादाची फलश्रृती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांनी या यंत्रणातील विविध अधिकारी, घटकांचे, क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या सर्वांचेच कौतुक केले आहे. महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही राज्याने अनेक महत्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्याचबरोबरीने मानव विकास आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असणे, हे देखील आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद असल्याचे, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचे यश आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्यात गेल्या दोन वर्षात महिला व बालकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. कुपोषणाच्या अनुषंगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष निहाय वजन व उंची घेण्यात आलेल्या बालकांची संख्या पुढील प्रमाणे मार्च अखेर अशी – २०२३ मध्ये ४१ लाख, ६७ हजार १८०, सन २०२४ – ४२ लाख ६२ हजार ६५२, सन २०२५ – ४८ लाख १० हजार ३०२. यात राज्यात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या मार्च 2023 अखेर 80,248 (1.93%) एवढी होती, ती मार्च 2024 अखेर 51,475 (1.21%) एवढी झाली. तर मार्च 2025 अखेर हे प्रमाण 29,107 (0.61) इतके कमी झाले आहे. त्याचबरोबर मध्यम कुपोषित बालकांची संख्या मार्च 2023 पासून अनुक्रमे 2,12,203 (5.09%), 1,66,998 (3.92%) आणि 1,49,617 (3.11%) अशी लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेंतर्गत 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला व स्तनदा मातांना नियमीत पूरक पोषण आहार दिला जात आहे. 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना घरपोच आहार (टीएचआर), 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार (एचसीएम) दिला जात आहे.

आदिवासी प्रकल्पामध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जात आहे. ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना केळी, अंडी दिली जात आहेत. तसेच अतितीव्र कुपाषित(SAM) बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली असून तेथे बालकांना तीन वेळा आवश्यक पोषक आहार आणि आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. याच धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपाषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. NURTURE या ॲपच्या माध्यमातून या मुलांच्या संपूर्ण विकासाबाबात संनियंत्रण केले जात आहे. त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील लाभार्थ्यांचे पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून संनियंत्रण केले जात आहे. लाभार्थ्यांना १०० टक्के पूरक पोषण आहार वेळेत उपलब्ध करुन देणे, बालकांची वजन व उंची घेऊन पोषण ट्रॅकरवर अचूक नोंद करणे, कुपोषित बालकांवर व्यक्तिश: लक्ष देऊन उपाययोजना करणे तसेच १०० टक्के गृहभेटींचे उद्दिष्ट, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अंगणवाडी स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन यामुळे हे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे.

राज्यात कुपोषण कमी करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आले असून त्यांच्या शिफारशींनुसार कार्यवाही केली जात आहे. योजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणांचा साप्ताहिक आढावा घेतला जात आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियमीत प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जात असल्याने हा सकारात्मक बदल घडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

०००

आणीबाणीतील कारावास भोगलेल्या सन्मानधारकांचा शासनाने केला गौरव

नागपूर, दि. २५ – भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अमूल्य अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा दिवस म्हणून 25 जूनचे स्मरण केल्या जाते. देशावर लादलेल्या आणीबाणीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आपल्या घरादाराचा विचार न करता अनेकांनी कारावास भोगला. त्यांच्या या योगदानाप्रती शासनातर्फे आज कृतज्ञता व्यक्त करुन कारावास भोगलेल्या सन्मानार्थींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर आयुक्त तेजुसिंग पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी हे सन्मानपत्र सन्मानार्थींना त्यांच्या जागेवर जाऊन बहाल केले.

आणीबाणी लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सदर येथील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमास बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव, उमाबाई पिंपळकर, देवेंद्र वैद्य, संध्याताई पंडित व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली कृतज्ञता

आणीबाणीमध्ये जेलमध्ये जाणे पसंत केलेल्या सर्व सन्मानार्थींनी देशाची लोकशाही वाचविली. एक प्रकारे लोकशाहीच्या रक्षणाचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले. देशावर लादलेल्या हुकूमशाहीचा धाडसाने प्रतिकार करुन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी केलेला संघर्ष व दिलेले योगदान मोलाचे असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. संविधान हत्या दिवस पाळतांना आपण सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढण्याचा निर्धार आणखी दृढ करु अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाद्वारे व्यक्त केल्या. या संदेशाचे वाचन तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सर्व सन्मानार्थींना शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सन्मानधारकांची उत्स्फूर्त उपस्थिती

देशासाठी, संविधानासाठी आणीबाणीच्या काळात सोसलेल्या अवहेलनांना विसरुन आपल्या या योगदानाचा शासनातर्फे सन्मान केला जातो आहे ही भावना आमच्यासाठी खुप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचे मूल्यांसमवेत संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात ज्या जागरुक सैनिकांनी योगदान दिले याबाबत नव्या पिढीला सजग करण्यासाठी असे समारंभ अधिक महत्वाचे असतात, अशी प्रतिक्रीया सन्मानार्थी बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव यांनी दिली. या समारंभासाठी सर्व सन्मानार्थींनी आपल्या वार्धक्याचा विचार न करता घरातील सदस्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्व सन्मानार्थीप्रती शासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार स्नेहलता मेढे पाटील यांनी तर सूत्रसंचा तहसीलदार श्रध्दा बागराव यांनी केले.

आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

नव्या पिढीपर्यंत आणीबाणी लढ्यातील मूल्य पोहचावे, प्रत्येक नागरिकांना मिळालेल्या अभिव्यक्तीसह मौलिक अधिकाराच्या रक्षणाप्रती आणीबाणीमध्ये ज्यांनी कारावास भोगला त्याची माहिती देणाऱ्या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन श्रीपाद रिसालदार, बिंदूमाधव उर्फ बंडुजी देव, जयंत पुराणिक, उमाबाई पिंपळकर, पुष्पाताई तोतडे, मोहन वाघ, शाम देशपांडे, अजय सालोडकर, देवेंद्र वैद्य,संध्या पंडित दिनकर अजंटीवाले, संजय बंगाले, अविनाश देशपांडे, कमलाकर घाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर आणीबाणी संदर्भात विशेष मुलाखतींवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार  उपस्थित होते. हे चित्रप्रदर्शन नियोजन भवन येथे सभागृहात लावण्यात आले.

00000

ताज्या बातम्या

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 3  (विमाका) :- विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर...

१५ ऑगस्टपर्यंत सुनावण्यांची सर्व प्रकरणे ईक्युजे पोर्टलवर नोंदवा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर, दि. ३  (विमाका) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणांची...

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

0
मुंबई,दि.३: शेतकरी, शेतमजूर दिव्यांग, मच्छिमार व मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सकारात्मक  निर्णय घेण्यात येईल  असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विधानभवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध...

बेकायदेशीर ॲप आधारित बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईस सुरुवात

0
मुंबई, दि. ३ : महानगर क्षेत्रात रॅपिडो, उबेर व ओलाने बेकायदेशीर व परवाना न घेता बाईक टॅक्सीने प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ९३...