पारंपारिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यम विश्वास क्रांतिकारी बदल – गॅझप्रोम मीडियाचेमुख्यकार्यकारी अधिकारी
मुंबई, दि.२ : पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत असून यामुळे सशक्त ‘माध्यम इकोसिस्टम’ तयार होत आहे, असे प्रतिपादन गॅझप्रोम मीडिया होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर झारोव्ह यांनी केले.
वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘माध्यम सामग्रीच्या एकत्रित शक्ती’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.
श्री. झारोव्ह म्हणाले, भारत-रशिया सहनिर्मितीचा ‘द लिट्ल किंग ऑफ माय हार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचे चित्रीकरण मुंबई आणि जोधपूर येथील ऐतिहासिक स्थळांवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय कलाकारांनी रशियन कलाकारांसोबत एकत्रित काम केले आहे. यामध्ये भारतीय सिनेमातील भावनात्मक शैली आणि रशियन विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले देश आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत दोन्ही देशांमधील कलावंत एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन काम करत होते,असेही झारोव्ह यांनी यावेळी नमूद केले.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्सनी मोलाची भूमिका बजावली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास श्री.झारोव्ह यांनी यावेळी व्यक्त केला.
0000
वेव्हज 2025 ने अधोरेखित केले भारताचे बदलणारे प्रसारण
मुंबई,दि.२: मुंबईत कालपासून सुरू झालेल्या वेव्हज 2025 (WAVES 2025) या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या ब्रेकआउट सत्रांमध्ये माध्यम आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रातील बदलणारे परिदृश्य आणि नियामक आराखड्याची गरज यांना महत्त्व प्राप्त झाले.
‘डिजिटल युगातील प्रसारण नियमन – चौकटी आणि आव्हाने’ या ब्रेकआउट सत्रात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय माध्यम नियामक संस्थांमधील प्रमुख व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले. पॅनेल सदस्यांमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी; आशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) च्या संचालक फिलोमेना ज्ञानप्रगासम; आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) चे सरचिटणीस अहमद नदीम आणि मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा संचालक कॅरोलिना लोरेन्झो यांचा समावेश होता.
लाहोटी यांनी भारतातील नियामक उत्क्रांतीचा आलेख सादर केला, ज्यात 1995 च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायद्यापासून ते केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनपर्यंत आणि आता ग्राहक निवड व सेवेच्या गुणवत्तेवर ट्राय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सध्या देत असलेला भर यांचा समावेश होता. त्यांनी समान संधी सुनिश्चित करण्याच्या (TRAI) प्रयत्नांवर भर दिला आणि जिथे ग्राहकांच्या हिताशी तडजोड केली जात नाही, तिथे नियम शिथिल करण्याचा पुरस्कार केला.
पॅनेल सदस्यांनी ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या झपाट्याने झालेल्या वाढीवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या गुंतागुंतीवर चर्चा केली. 2024 मध्ये भारताची डिजिटल मीडिया बाजारपेठ 9.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यामुळे, संतुलित नियमनाची गरज सर्वोच्च आहे. लाहोटी यांनी डिजिटल रेडिओ, सिंप्लिफाईड नेटवर्क आर्किटेक्चर आणि राष्ट्रीय प्रसारण धोरणासंबंधी या प्राधिकरणाच्या प्रस्तावांना अधोरेखित केले.
ज्ञानप्रगासम यांनी नियमनासोबतच माध्यम साक्षरतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. अहमद नदीम यांनी जबाबदारी सुनिश्चित करताना नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमनाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा पुरस्कार केला. मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संचालक कॅरोलिना लोरेन्झो यांनी स्मार्ट टीव्हीसारख्या तंत्रज्ञानातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये नेटवर्क इफेक्ट्सच्या उदयास येत असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकत, प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीबाबत युरोपमधील अनुभवाकडे लक्ष वेधले.
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि नियामक गुंतागुंत कमी करणे यासोबतच सुसंगत नियमनाची गरज यावरील सहमतीने या सत्राचा समारोप झाला.
000000
मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात
मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.
काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.
श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.
नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.
कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.
अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, दिनांक १ : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य आज दिवस आहे. या दोन्ही राज्यांना त्यांच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत हा प्रवास असाच सुरू राहील, असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.
दिल्लीतील उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य दिवस आज डीडीए असिता ईस्ट पार्क, विकास मार्ग येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. शाह बोलत होते.
या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया, दिल्लीचे तसेच गुजरातचे राज्यमंत्री, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, महाराष्ट्र आणि गुजरातचे दिल्ली स्थित विविध क्षेत्रातील निवासी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय श्री. शाह पुढे म्हणाले, गुजरात व महाराष्ट्र यांनी, कोणताही वाद न घालता, एकाच राज्यातून निर्माण झालेले दोन स्वतंत्र राज्य म्हणून परस्पर सन्मान राखत विकासाच्यादृष्टीने स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. हे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
पंतप्रधान मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेद्वारे भाषिक व सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश दिला असून आज विविध भाषा व संस्कृती एकमेकांना बळ देतात.
व्यक्ती मनोमन ठरवले की फूट निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंत करायचा आहे, तर त्याचे आदर्श उदाहरण मोदींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” ची कल्पना साकारून दाखवले आहे.
महाराष्ट्र, ही वीर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, त्यांनी आणि बाजीराव पेशव्यांसारख्या सेनानींनी मुगल सत्तेला जबरदस्त प्रतिकार देत स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषेचे रक्षण केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हे लोकमान्य टिळकांनी पुढे नेले.
सामाजिक सुधारणा, भक्ती चळवळ यामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांचे योगदान संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले.
गुजरात, जेथे श्रीकृष्णांनी जीवन व्यतीत केले, तेथे स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी व सरदार पटेल यांसारख्या थोर नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी स्वातंत्र्य चळवळ घडवून आणली.
स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी गुजरात व महाराष्ट्र या राज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज महाराष्ट्रात गरबा तर गुजरातमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. ही परस्पर संस्कृतीची देवाणघेवाण भारताची खरी ताकद आहे.
महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असून गुजरातची जीएसडीपी ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा बंदर, रिफायनरी, एशियातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क, पहिली बुलेट ट्रेन, गिफ्ट सिटी आणि आता धोलेरा स्मार्ट सिटी उभी राहत आहे.
वायब्रंट गुजरात आणि मॅग्निफिसंट महाराष्ट्र हे दोन्ही राज्य भारताच्या विकासाचे मजबूत स्तंभ आहेत. दोन्ही राज्यांनी २०४७ पर्यंतचा आपला विकास आराखडा निश्चित केला आहे.
या दोन राज्यांनी आपल्या वारशाचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारले असून देशाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी मांडलेली महान भारताची संकल्पना साकार करण्यासाठी ही राज्ये आरोग्यदायी विकास स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करत आहेत.
२०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र यांचा सर्वाधिक वाटा असेल.
००००००००००००
अंजू निमसरक,मा.अ./
मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
वेव्हज् परिषद – २०२५
मुंबई, दि. ०१ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (व्हेव्ज) चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्री. वैष्णव बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माहिती व प्रसारण मंत्री वैष्णव म्हणाले, ‘आयआयसीटी’च्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
सर्जनशीलतेच्या जगात सध्या मोठे परिवर्तन घडत आहे. तंत्रज्ञानामुळे सर्जनशील उद्योग आता सर्वांसाठी खुले झाले आहेत. कंटेंट तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे, तसेच कंटेंटचा उपभोग घेण्याचे माध्यमही बदलत आहे. या बदलत्या प्रक्रियेची समज आणि वाटचाल एकत्रितपणे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सर्जनशील जगाला वेव्हजच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे व्यासपीठ जगभरातील निर्मात्यांसाठी खुले आहे. हे व्यासपीठ नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, गुंतवणूकदार, निर्माते आणि खरेदीदार यांच्याशी जोडणारी संधी देईल. यामुळे नव्या आर्थिक संधींचा उगम होईल.
या परिषदेस जगभरातून धोरणकर्ते, उद्योग नेते आणि ७५ देशांतील निर्माते सहभागी झाले असून पुढील चार दिवसांत १०० सत्रे विविध स्वरूपात पार पडणार आहेत. सर्जनशील समुदाय क्रिएट इन इंडिया स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून ३२ क्षेत्रांमध्ये ह्या स्पर्धा झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना ‘वेव्हज्’ ची श्रद्धांजली
मुंबई, दि. ०१: वेव्हज् २०२५ मध्ये ‘मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्माते, अस्सल राष्ट्रवादी’ या ‘वेव्हज् ब्रेकआउट’ सत्रात श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पॉडकास्टर मयंक शेखर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात चित्रपट आणि साहित्य जगतातील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येत दिग्गज अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्मात्याच्या वारशाबाबत आपले विचार मांडले.
हरिकिशन गिरी गोस्वामी हे मनोज कुमार यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म 1937 मध्ये झाला. मनोज कुमार यांचे आयुष्य त्यांच्या चित्रपटांइतकेच नाट्यमय आणि प्रेरणादायी होते. फाळणीमुळे कोलमडून गेलेले मनोजकुमार अनेक स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत आले पण चित्रपट जगतामध्ये त्यांचा कुणाशीही संबंध नव्हता. सुरुवातीला उर्दूमध्ये पटकथा लिहिणारे एक स्वयंघोषित कथाकार असणाऱ्या मनोज कुमार यांनी चित्रपट अभिव्यक्तीत वेगळा बाज तयार केला – मुख्य प्रवाहातील आकर्षणाला राष्ट्रवाद आणि सामाजिक विवेकाच्या भावनेची जोड दिली.
मनोज कुमार यांचे सुपुत्र आणि अभिनेता कुणाल गोस्वामी यांनी सत्राची सुरुवात जिव्हाळ्याच्या आठवणींनी केली: “माझ्या वडिलांनी फाळणीत सर्वस्व गमावले, पण त्यांनी कधीही आपले स्वप्न हरवू दिले नाही. निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यापासून ते उर्दूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास लवचिकतेचा दाखला आहे. त्यांनी भगतसिंगांच्या आईला ‘शहीद’ च्या प्रीमियर प्रसंगी सोबत आणले होते – वैयक्तिक स्तरावरही त्यांची देशभक्ती इतकी प्रखर होती की, त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली त्याच्या खोलवर मुळाशी राष्ट्रवादचं असे.’’
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी मनोज कुमार यांच्या सिनेमॅटिक तंत्रांची आठवण करून देताना सांगितले की गाणी चित्रित करण्याची त्यांची शैली आगळी-वेगळी होती. भांडारकर पुढे म्हणाले की मनोज कुमार यांचे चित्रपट राष्ट्रवाद आणि सामाजिक वास्तववादाने भरलेले होते, जे त्यांनी स्वतःच्या कामातही प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्येष्ठ लेखक आणि गीतकार डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की, मनोज कुमार यांचे जीवन म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेतील सिनेमॅटिक मिशन होते.
ज्येष्ठ स्तंभलेखिका आणि चरित्रकार भारती एस. प्रधान म्हणाल्या की, मनोज कुमार यांना प्रचंड यश मिळाल्यानंतरही ते सर्वांना अगदी सहजतेने भेटत होते. इतकेच नाही तर, आजारी असतानाही ते त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे स्वप्न पाहत असत. नेहमी पुढची, भविष्यात करावयाच्या नवीन कामांविषयी त्यांना खूप उत्साह असे.’’
एक वारसा जो जिवंत राहिला…
प्रेमाने भारत कुमार म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार यांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांचे चित्रपट – शहीद, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, उपकार, क्रांती – हे केवळ चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे टप्पे नव्हते, तर सांस्कृतिक टप्पे होते. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात तसेच देशभक्ती आणि कथाकथनाला उदात्त बनवणाऱ्या माणसाबद्दल कृतज्ञतेची सामूहिक भावना व्यक्त करत सत्राचा शेवट झाला.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/
‘वेव्हज्’ सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद – हेमा मालिनी
वेव्हज् परिषद – २०२५
- कला आणि व्यावसायिक सिनेमा यामध्ये भेदभाव नाही – लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं ते कथाकथन – मोहनलाल
- अभिनय हे माझं बालपणापासूनचं पहिलं प्रेम आहे – चिरंजीवी
- ‘महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा यावरील चर्चेने वेव्हज् २०२५ चा प्रारंभ
मुंबई, दि. ०१: जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेची जियो वर्ल्ड सेंटरमध्ये ‘महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा’ यावरील चर्चेने अतिशय दिमाखदार सुरुवात झाली. या सत्रामध्ये भारतातील नामवंत सिनेकलावंतांनी याविषयावरील चर्चासत्रात सहभाग नोंदवला.
या उद्घाटन कार्यक्रमातील परिसंवादात प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी, मोहनलाल आणि चिरंजीवी यांसारखे नामवंत सिनेकलाकार सहभागी झाले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अक्षय कुमार यांनी केले.
यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “ भारत सरकारचा हा अतिशय सुंदर उपक्रम आहे, याचा एक भाग असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि त्यांचे नेतृत्व यामुळे वेव्हज् हा सृजनकार आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी एक उल्लेखनीय मंच बनला आहे.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल सिनेमाच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाबद्दल म्हणाले की, समांतर सिनेमा आणि मनोरंजनासाठीचा सिनेमा यामध्ये सूक्ष्म फरक आहे, कारण समांतर सिनेमांमध्येही मनोरंजनाचे मूल्यदेखील असते. “मी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये फरक करत नाही. ते एक प्रकारचे कथाकथन आहे, जे लोकांच्या हृदयाला स्पर्श करत असते”.
प्रख्यात अभिनेते चिरंजीवी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल हृदयस्पर्शी आठवण सांगितली, ज्यामध्ये सिनेमावरील अढळ प्रेम आणि उत्कृष्ट योगदानासाठी अथक प्रयत्न सर्वांनीच अनुभवले. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील धडपड आणि मेहनतीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “लहानपणापासूनच अभिनय हे माझे पहिले प्रेम राहिले आहे. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इच्छेने प्रेरित असे. एक चांगला अभिनेता बनण्यासाठी मी कोणती अनोखी गोष्ट करू शकतो?” असे मी सतत स्वतःला विचारत असे.
प्रामाणिक कामाबद्दलच्या वचनबद्धतेवर त्यांनी विशेष भर दिला. “प्रेक्षकांनी मला नेहमीच ‘त्यांच्यातील एक’ अशा रूपात पाहावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी शक्य तितका नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय करण्याचा प्रयत्न करतो,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कलेला, त्यांच्यातील अभिनेत्याला घडवणाऱ्या दिग्गजांप्रति त्यांनी आदर व्यक्त केला. मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांसारख्या सिनेमा जगतातील आदर्श कलाकारांचा त्यांच्यातील अभिनेत्याच्या जडणघडणीवर खोलवर प्रभाव असल्याचे चिरंजीवी म्हणाले.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/
‘वेव्हज्’ मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचा मंच – शाहरूख खान
- आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा – शाहरूख खान
- ‘वेव्हज’ सर्व माध्यमांना एकाच मंचांवर आणणारा योग्य वेळी सुरू केलेला उपक्रम – दीपिका पदुकोण
- यापुढे वेव्हज्च्या सोबतीने मोठी झेप घेण्यासाठी भारतातील सर्जक सर्व सामर्थ्याने सज्ज – करण जोहर
मुंबई, दि. ०१ : वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक अमर्याद शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून, शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ कसे बनू शकते, याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला. शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हज्चे महत्त्व मांडले. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले की, या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हज्चे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.
वेव्हज् शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले ते सांगितले. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.
समाजमाध्यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल शाहरुख खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गुण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.
समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/