शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 19

दिव्यांग व्यक्तींना सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.२७ जून : दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सरकारी सेवा, आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सन्मान मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे एलिम्को मार्फत आयोजित अस्थिव्यंग प्रकारच्या  दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे, कॅलिपर्स व तत्काळ नि:शुल्क वितरण शिबिरात ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत चौधरी,  तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे, संजय कुसावळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, दिव्यांग व्यक्तीना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी एलिम्को मार्फत आयोजित हा उपक्रम प्रशंसनीय असून  संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे. समाजात विविध कारणांमुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अपघात, जन्मतः दोष, किंवा काही आजारांमुळे अनेक जण हात, पाय, ऐकण्याची किंवा बोलण्याची क्षमता गमावतात. या शारीरिक मर्यादा दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षणात, नोकरीत, प्रवासात, समाजातील सहभागात त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे  या शिबिराच्या माध्यामातून या व्यक्तींचे  पुनर्वसन करणे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी  विविध योजना राबवल्या आहेत. “दिव्यांगजन सशक्तीकरण योजना, “ALIMCO” या भारत सरकारच्या संस्था, तसेच सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या योजनांचा उद्देश केवळ सहाय्य करणे नाही, तर दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या गुणवत्तेचा समाजाच्या विकासात उपयोग करून घेणे आहे. आजच्या शिबिरात कृत्रिम पाय, कृत्रिम हात, व्हीलचेअर, ट्रायसायकल, हियरिंग एड्स, वॉकर, काठी इत्यादींची मोफत तपासणी व वाटप करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, डॉक्टरांची टीम, तांत्रिक सहाय्यक, आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आहेत, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
000000000

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

नागपूर, दि. २७: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर न्या. भूषण गवई यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षल विरोधी अभियान), विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधी क्षेत्र आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 29 जून 2025 पर्यंत नागपुरात मुक्काम असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

0000

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोकाभिमुख उपक्रम- मंत्री छगन भुजबळ  

नाशिक, दि.२७ जून : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्त्वाचा व लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरु  करण्यात आला असून हे अभियान  नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबवले जात आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला शहरातील माऊली लॉन्स येथे तहसील कार्यालय येवला आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे, संजय कुसावळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्न निकाली काढून नागरिकांच्या सोयीचे आहे. यात शेतकरी बांधवासाठी ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी,वारस नोंद, जाती,उत्पन्न,राहिवासी दाखले, जुने दस्त नोंदवही व पडताळणी,मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यासह विविध योजनांचे लाभ, दाखले नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. हे अभियान एक दिवसापुरते मर्यादित न ठेवता, गावोगावी, तालुक्याच्या पातळीवर, नियमितपणे आणि संपूर्ण सहभागासह राबविले जावे. तसेच प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा निकाल वेळेत, न्यायाने आणि पारदर्शकतेने दिला गेला पाहिजे हीच खरी जनतेची सेवा असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

आज आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1 हजार 300 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रदान केले जात आहेत. तहसील कार्यालयाच्या तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून 25 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येणार असल्याचे उप विभागीय अधिकारी  श्री. गाढवे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

येवला तहसील कार्यालयाने सन 1953 पासूनच्या 7/12 च्या 9 लाख नोंदी स्कॅन करून डिजिटल स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एकूण 1 हजार 343 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे प्रदान प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.  यात शासन आपल्या दारी अंतर्गत स्वयं सहायता गट धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखले,  उत्पन्न दाखले, गोल्डन कार्ड, महिलांना बेबी केअर किट, आभा कार्ड, डिबिटी लाभ, कुपोषित आहार किट, संगणक संच, शेततळे अस्तरीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ, फळपीक विमा, रोटाव्हेटर पेरणी यंत्र, नांगरणी यंत्र,  ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ, सिंचन विहीर लाभ, वृक्ष लागवड, लखपती दीदी, भुईमूग बियाणे वाटप, पीठ गिरणी, सनद वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप यांचे वाटप मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
000000

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेने कार्य करून जीवनात यशस्वी व्हा -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे, दि. २७ : सातत्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे स्नातकांनी जीवनात यश संपादन करावे. भविष्यातील वाटचाल करतांना निश्चित उद्दीष्ट ठेवून त्याला कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

सिम्बायोसिस विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र. कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. एम. एस शेजुळ आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, जीवनात थकवा येणे किंवा निराशा येणे स्वाभाविक आहे, पण तिथे थांबून चालणार नाही. जीवनात केलेला प्रत्येक प्रयत्न जीवनाला आकार देण्यासाठी उपयुक्त असतो, आनंद मिळविण्यासाठी असतो. आनंदी मन हे कार्यासाठी ऊर्जा देणारे आणि आपल्याला प्रेरित करणारे असल्याने आपण करीत असलेल्या कामाचा आनंद घेण्याची सवय ठेवावी. आतापर्यंत प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे जीवनात यश संपादन करावे, अशा शुभेच्छा श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या.

राज्यपाल पुढे म्हणाले, आज जगातील अनेक देश, विशेषतः ज्यांची लोकसंख्या वाढत आहे, ते कुशल मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. विद्यार्थ्यांनी ही संधी साधण्यासाठी तयार असले पाहिजे. महाराष्ट्रातील विद्यापीठांना जर्मन, फ्रेंच, जपानी, मँडरीन, स्पॅनिश, इटालियन आणि इतर भाषांमध्ये अल्प-मुदतीचे भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळेल. पुणे शहर वाहन उद्योग, माध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमुख केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना इथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.

कुलपती डॉ. मुजुमदार म्हणाले, विद्यापीठ ‘वसुंधैव कुटुंबकम’ या ध्येयाने कार्य करीत असून विद्यापीठात विविध देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सारे विश्व एक कुटुंब आहे या भावनेनेच येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे ते म्हणाले.

राज्यपालांच्या हस्ते, पदवी प्रदान समारंभात 22 देशातील 82 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्र. कुलगुरू डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची व अभ्यासक्रमाची माहिती दिली.

00000

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. ‘सेबी’चे नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.

हेजिंग डेस्कम्हणजे काय

‘हेज’ म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन, घराला जसे दार, तसे शेताला कुंपण. किंमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन तेही एक प्रकारचे कुंपणच आहे ज्याला ‘हेजिंग’ म्हणतात. भविष्यकाळातील कमी होणाऱ्या किंमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा ‘हेजिंग’ चा मुख्य उद्देश आहे. भविष्यकाळातील वाढणाऱ्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जाऊ शकतो. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात सहभागी होण्याकरिता तसेच त्यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी ‘हेजिंग डेस्क’ (Hedging Desk) सुरु करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अनिश्चितेपासून वाचवण्यासाठी हेजिंग डेस्क

कृषी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याचा राज्याच्या सकल उत्पन्नात 12% वाटा आहे. मात्र, राज्यातील शेतीमध्ये पिकांचे उत्पादन अजूनही नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. शेतीमध्ये पेरणी करूनही निश्च‍ित क्षमतेनुसार उत्पादन आणि उत्पादित मालाला योग्य भाव मिळण्याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच चिंता असते. शेतकरी पिकांचे उत्पन्न घेतो तरी मालाची किंमत ठरवणारा नसतो. ही अनिश्चीतता कमी करण्यासाठी शासनाकडून देखील विविध शासकीय धोरणे, सुधारित शेती पद्धती, विविध पिक विमा योजना यांचे पाठबळ शेतकऱ्यांना दिले जाते. शेतीतून किमान उत्पन्न मिळवण्यासाठी शाश्वत उपायोजना करणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेवून वैयक्त‍िक शेतकरी, मर्यादित संसाधने लक्षात घेवून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना बाजारातील अनिश्चिततेपासून वाचविण्यासाठी एककेंद्रीत समर्पित कृषी हेजिंग डेस्कची स्थापना पुणे येथे करण्यात आली आहे.

हेजिंग डेस्कची कार्यपद्धती

‘हेजिंग डेस्क’ मध्ये भविष्यकालीन विविध पर्यांयाचा विचार करण्यासाठी व जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) यांना सेवा कमोडिटी कराराबद्दल तज्ज्ञ माहिती देतील. तीन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाजार ट्रेंड, पुरवठा-तारणातील बदल, जागतिक किमतींवर रिअल-टाइम मार्केट इंटेलिजन्सची माहिती देणे. शेतकरी उत्पादक संघटनाना व शेतकऱ्यांना शेतीजवळ साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी एफपीओंना प्रोत्साहन दिले जाईल.

‘जोखीम व्यवस्थापन कक्षाअंतर्गत विविध प्रकारच्या जोखमींचा अभ्यास केला जाईल’, जोखीम निवारण करण्यासाठी धोरणे तयार केली जातील. मका, कापूस आणि हळदीसाठी ॲन्युअल कमोडिटी प्राईस रिस्क असेसमेंट रिपोर्टस (‘Annual Commodity Price Risk Assessment Reports’) तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचविले जातील. ‘कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज’ विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. मका, कापूस आणि हळदीच्या उत्पादन आणि विपनणामध्ये सहभागी असलेल्या किमान ५० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वायदेबाजारातील व्यवहारासाठी नोंदणी व प्रत्यक्ष व्यवहार घडवून  आणले जातील.

एनसीडीईएक्सआणि स्मार्ट प्रकल्पाचे सहकार्य

‘एनसीडीईएक्स’ आणि स्मार्ट प्रकल्प यांच्यात ८ एप्रिल २०२५ रोजी हेजिंग डेस्कबाबत करार करण्यात आला, या कराराचे नाव ‘शेतकरी उत्पादक संघटनासाठी हेजिंग डेस्कची स्थापना” असे आहे.या मध्ये  कापूस, हळद आणि मका ही पिके पिकवणाऱ्या पट्ट्यांमधील शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि शेतकऱ्यांवर अधिक लक्ष देण्यात येईल.हिंगोली, वाशिम, सांगली, यवतमाळ, अकोला, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे प्राधान्य देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचे कार्यालय पुणे येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम राज्यात सुरू झाले आहे.

हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे सकारात्मक बदल होतील

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निवडक कृषी वस्तूंच्या हेजिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगमुळे (Hedging and Options Trading) अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. उदाहरणार्थ, पेरणी करताना जर एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पिकाच्या भविष्यातील विक्री किमतीबद्दल अनिश्चितता वाटत असेल, तर तो ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून एक विशिष्ट किंमत निश्चित करू शकतो. यामुळे, बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी त्याला एक किमान सुरक्षित किंमत मिळते. हेजिंगमुळे अनपेक्षित बाजार बदलांपासून संरक्षण मिळते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल अधिक खात्रीशीर नियोजन करता येते. परिणामी, शेतकरी अधिक स्थिर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित राहतात आणि त्यांच्या शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होतील.

शेतकऱ्यांना याबाबत अधिक माहिती कुठे मिळेल

शेतकरी उत्पादक संघटना (FPO) आणि क्लस्टर आधारित व्यवसाय संघटना (CBBOs) व शेतकरी यांना हेजिंग डेस्कबद्दल माहिती व संपर्कासाठी पुढील क्रमांक आहेत. हेजिंग डेस्क (Hedging Desk) साठी संपर्क प्रकल्प अंमलबजावणी कक्ष – कृषी (स्मार्ट प्रकल्प) कार्यालाय पुणे येथील संपर्क पुढीलप्रमाणे आहेत. निविष्ठा व गुणनियंत्रण तज्ज्ञ बाबासाहेब जेजुरकर, मो. ९४०५००२८००, पिक विश्लेषक डॉ. ब्रम्हानंद देशमुख मो. ९५६१४२१५०९, एसीडीईएक्स आणि एनआयसीआर येथे (NCDEX – NICR) चे संपर्क- जोखीम निवारण व हेजिंग डेस्कचे प्रमुख सल्लागार नीरज शुक्ला मो. ९३२३६१४६२६, रिस्क अ‍ॅनालिस्ट – जोखीम निवारण व हेजिंग डेस्क गौतम आठवले मो. ९४२०४१९४७०, निधि मिश्रा मो. ९०२९३९१८०६ संपर्कासाठी ई मेल आयडी- hedgingdesk.smart@gmail.com आहे येथे हेजिंग डेस्कच्या अनुषंगाने याबद्दल अधिक माहिती मिळेल. एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या https://www.ncdex.com या संकेतस्थळावर about us मध्ये हेजिंग डेस्क बद्दल व प्रशिक्षणाविषयी, हेंजिंग डेस्क जनजागृतीपर माहिती देखील उपलब्ध आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ

पणन महामंडळाच्या योजनेची कमाल; देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार शेतमाल!

महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण करते. मात्र हा शेतमाल अनेक वेळा बाजारात पोहोचण्याआधीच खराब होतो. यामागे केवळ हवामान नाही, तर त्याहून अधिक गंभीर कारण म्हणजे ‘वाहतूक खर्च’!

शेतकऱ्यांचा उत्पादित नाशवंत शेतमाल जसे कांदा, टोमॅटो, केळी, द्राक्षे, डाळींब, आंबा, संत्रा, मोसंबी, आले आणि इतर भाजीपाला वेळेत परराज्यात पाठवता येत नाही. कारण फक्त परवडणारी वाहतूक नाही. त्यामुळे यामुळे शेतकरी कधी संधी गमावतो, तर कधी नफ्याऐवजी तोटा सहन करतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, ‘आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी रस्ते वाहतूक अनुदान योजना’. या योजनेंतर्गत आता शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था यांना वाहतूक खर्चावर ५०% अनुदान मिळणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून, देशांतर्गत व्यापाराला नवे पंख देणारी ठरणार आहे.

बाजारपेठेचा थेट रस्ता

शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी तो बाजारात पोहोचणे तितकेच गरजेचे आहे, जितके उत्पादन. फळभाजीसारखा नाशवंत शेतमाल वेळेत विक्रीच्या ठिकाणी न गेल्यास २० ते ३० टक्के नुकसान होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन, राज्य शासनाने शेतकऱ्यांना थेट देशभरातील बाजारपेठांशी जोडण्यासाठी वाहतूक खर्चात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांना त्यांच्याच सभासदांकडून उत्पादित शेतमाल परराज्यात विक्रीसाठी पाठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

योजनेच्या अटी व पात्रता

  • योजना केवळ महाराष्ट्रातून परराज्यांत रस्ते वाहतुकीने थेट विक्री होणाऱ्या शेतमालासाठी लागू.
  • नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था पात्र.
  • फक्त त्यांच्या सभासदांनी उत्पादित केलेला माल पाठवता येईल.
  • योजना आंबा, केळी, डाळींब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले, भाजीपाला या नाशवंत पिकांसाठी लागू आहे.

याशिवाय इतर नाशवंत मालासाठी मंडळाची पूर्वमान्यता घ्यावी लागेल.

  • माल विक्री झाल्यानंतरच अनुदान मिळणार.
  • प्रत्यक्ष वाहतुकीसाठीच अनुदान. इतर खर्चावर (पॅकिंग, हमाली, सेवा शुल्क) अनुदान नाही.

अंतरानुसार देय अनुदान

  1. 350 ते 750 किमी: 50% किंवा ₹20,000
  2. 751 ते 1000 किमी: 50% किंवा ₹30,000
  3. 1001 ते 1500 किमी: 50% किंवा ₹40,000
  4. 1501 ते 2000 किमी: 50% किंवा ₹50,000
  5. 2001 किमी आणि त्याहून अधिक: 50% किंवा ₹60,000
  6. सिक्कीम, आसाम, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा: 50% किंवा ₹75,000

(जे कमी असेल ती रक्कम देय असेल)

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • ३५० कि.मी. पेक्षा कमी अंतरावर अनुदान नाही.
  • एका संस्थेला वर्षाला ₹३ लाखांपर्यंत अनुदान मर्यादा.
  • वाहतूक भाडे केवळ बँक व्यवहारातून अदा करणे बंधनकारक.
  • किमान ३ सभासदांचा माल एका ट्रिपमध्ये पाठवणे आवश्यक.
  • विक्री न झाल्यास अनुदान नाही. मंडळ जबाबदार नाही.
  • विक्रीनंतर ३० दिवसांत अर्ज सादर करणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

पूर्वमान्यता अर्जासाठी

  • अर्ज, नोंदणी प्रमाणपत्र, सभासद यादी, 7/12 उतारे, बँक पासबुक प्रत, लेखापरिक्षण अहवाल

अनुदान मागणी अर्जासाठी

  • पूर्वमान्यता पत्र, ट्रान्सपोर्ट बिल व पावती, विक्री बिल, बँक व्यवहाराचा तपशील

ही योजना म्हणजे केवळ शेतमाल पोहोचवण्यासाठीचा खर्च वाचवण्याचा उपाय नाही, तर ही आहे एक संधी, थेट देशाच्या कोपऱ्यांपर्यंत आपल्या मालाची पोच वाढवण्याची! शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आता संयोजनबद्ध पद्धतीने ही योजना आत्मसात केल्यास फक्त राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर स्पर्धात्मक बाजारपेठ मिळवणे शक्य होईल. ‘शेती फक्त उपजीविका नाही, ती व्यवसाय व्हावा’ या उद्देशाने ही योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

माहिती आणि मार्गदर्शनासाठी…

नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील संस्थांनी खालील पत्त्यावर आपले प्रस्ताव सादर करावेत.

उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पंचवटी मार्केट यार्ड, दिंडोरी नाका, नाशिक – ४२२००३

फोन: (०२५३) २५१२१७६ ई-मेल: divnsk@msamb.com

०००

रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

 

 

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य करुन देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. राजर्षी शाहू महाराजांच्या समतेची शिकवण आत्मसात करुन माणुसकी जपा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टच्या सदस्य सचिव मोहिनी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, राजदीप सुर्वे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पद्मश्री डॉ.जब्बार पटेल म्हणाले, लोकांच्या भावना समजून घेऊन काम करणाऱ्या शाहू महाराजांनी समाजात समतेचा विचार रुजवला. लोकशाही नसतानाही मानवी व सामाजिक मूल्य जपणारा राजा कोल्हापूरने दिला. तळागाळातील माणसाशी सत्तेच्या माध्यमातून जोडण्याचा राजमार्ग त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केला. शाहू महाराजांच्या विचारमूल्य महाराष्ट्राने जपले आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केला. परदेशातील शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला. पाश्चात्त आणि भारतीय संस्कृतीचा संगम त्यांच्या राज्य कारभारात, त्यांच्या कार्यात दिसून येतो. राज्य करण्यासाठी सर्वप्रथम माणुसकी कळली पाहिजे, कोणत्याही विषयाची फाईल मंजूर करताना मानवी चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे, हे विचार शाहू महाराजांनी दिले. आरोग्य सेवा, कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन, बालविवाह बंदी, स्त्रियांना हक्क, आंतरजातीय विवाह, फासेपारधींना रोजगार, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण अशी अनेक कॅबिनेट खाती एकटे शाहू महाराज लिलया हाताळत होते. आपल्या कार्यकर्तृत्वातून रयतेला न्याय देणारे शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे नव्हे तर देशाचे राजे होते, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांप्रतिच्या भावना विशद केल्या. सिनेमाचे स्कूल असणाऱ्या कोल्हापूरशी माझे भावनिक नाते आहे. माझा पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला. कोल्हापूरच्या व्यक्तींनी मला भरभरुन प्रेम दिलं. ते आजही स्मरणात असल्याच्या आठवणी डॉ. पटेल यांनी यावेळी जागवल्या.

शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

देशाने आदर्श घ्यावा, असे उत्तुंग कार्य शाहू महाराजांनी केले आहे. शाहू महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत. शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

डॉ. जब्बार पटेल यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रासाठी बहुमोल योगदान दिले आहे. तमाशाच्या चित्रपटांमध्ये अडकलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.पुढच्या पिढीला त्यांनी आपल्या अनुभवाचा वारसा कोल्हापूर मधून देण्याचे काम करावे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे क्षेत्र नसून भविष्यात असे जब्बार पटेल घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटांच्या माध्यमातून रुजवला. कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम डॉ. जब्बार पटेल यांनी केले असल्याचे यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, डॉ.जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामना, जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा, एक होता विदूषक यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सत्ता संघर्ष, गिरणी कामगारांचे जीवन, स्त्री स्वातंत्र्य, नियती आणि माणसाची बुद्धिमत्ता यांचा संभ्रम आदी विषयांवर हुबेहूब चित्रण केले आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री चिपळूणकर यांच्या यांचे चरित्रपट निर्माण करुन सामाजिक आणि कलाविषयक उत्तुंग कार्य त्यांनी केले आहे.

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत, न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे, न्यायमूर्ती ए.एस. चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे, न्या. नितीन सामरे, न्या. श्रीमती व्ही.व्ही. कंकणवाडी, भारताचे महाअधिवक्ता अनिल सिंग, राज्याचे अभियोक्ता अमरजित सिंग गिरासे, उच्च न्यायालय प्रबंधक एस.एस.अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सह सचिव एस.एस. पल्लोड, विलास गायकवाड, तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष  विठ्ठल कोंडे देशमुख आदी मान्यवर तसेच सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई यांचीही सोहळ्यास उपस्थिती होती.

वकील संघाच्या वतीने न्या. गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी विधिज्ञ साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरणही न्या. गवई यांच्या हस्ते करण्यात आले.

न्या. गवई म्हणाले की, वडिलांच्या आग्रहाखातर मी वकील व नंतर न्यायाधीश झालो. लोकांना सामाजिक आर्थिक समता देणारा न्याय देण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाच्या सुत्रानुसार न्यायदानाचे काम मी करीत असतो. न्यायदान ही एक नोकरी नसून ती आपल्या हातून होत असलेली देशसेवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद खंडपीठात काम करतांना व येथील वास्तव्यातील अनेक आठवणीत न्या. गवई रमले होते.  न्यायाधीश म्हणून काम करतांना आपण घेतलेल्या शपथेशी एकरुप होऊन आणि संविधानाची मूल्ये जपून आपण न्यायदानाचे काम करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश बोरुळकर यांनी केले. उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत कावडे, ॲड, शिल्पा अचवार, सचिव रविंद्र गोरे, सह सचिव ॲड. शरद शिंदे, ॲड. सुस्मिता दौंड, खजिनदार ॲड. राम थोरात, ग्रंथालय समिती अध्यक्ष ॲड. बळीराम शिंदे, सचिव ॲड. विश्वेश्वर पठाडे, सदस्य ॲड. अक्षरा मडके, ॲड. नसीमबानु देशमुख, ॲड. मयुर बोरसे, ॲड. कृष्णा भोसले, ॲड. उमेश गिते, ॲड. संकेत पाळनीटकर, ॲड. आशुतोष सिसोदिया, ॲड. राहुल सुर्यवंशी, ॲड. ओमप्रकाश तोतावाड यांच्यासह वकील व विधी, न्याय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न

ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहिती आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळ्यात केले.

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचे भूमीपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभिकरण उपक्रमाचे भूमीपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले. त्यानंतर, त्यांनी शेठ लखमीचंद फतेचंद प्रसूतीगृहाचे लोकार्पण केले. तसेच तिथे जनतेशी संवादही साधला. 

खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतिगृह तयार झाले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

आतकोली येथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत २ लाख झाडे लावली जाणार आहेत. तसेच, सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करीत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले आहे

तत्पूर्वी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले.एकूण 10 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्यांची कामे सुरू झाली असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, रमाकांत पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मीनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनवणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. वर्षा ससाणे, डॉ. राणी शिंदे, वृक्ष अधीक्षक केदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे यांचे देखणे स्मारक होणार

छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तेथे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळाही आहे, हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराने येथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे. येथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सध्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये पाच बॅडमिंटन कोर्ट असून, नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखी पाच कोर्ट, तसेच मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह (हॉस्टेल), व्यायामशाळा व इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असून, येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले.

 

या प्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना (प्रदर्शनीय सामना) देखील खेळविण्यात आला. श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभिया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आरंभ

गोरगरीब महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती व्हावी, उपचार मिळावेत, यासाठी रोटरी क्लब च्या सहकार्याने ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जलतरणपटूंचा सत्कार

ठाणे महानगरपालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे सराव करणारे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या तीन जलतरणपटूंनी १८ जून, २०२५ रोजी इंग्लंड ते फ्रान्स हे इंग्लिश खाडी हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होवून पार केले. त्यापैकी, ठाण्याचा मानव राजेश मोरे (वय 20 वर्ष) याने इंग्लंड ते फ्रान्स हे 46 कि.मीचे सागरी अंतर रिले पध्दतीने 13 तास 37 मिनिटात पोहून पूर्ण केले. तर, आयुष प्रवीण तावडे (15 वर्ष) आयुषी कैलास आखाडे (14 वर्ष) या जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 कि.मीचे 11 तास 19 मिनिटात पोहून पूर्ण केले. या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ठाणे महापालिका व रोटरी कौशल्य विकास केंद्र

रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ यांच्या सहकार्याने आणि ब्लू स्टार कंपनीच्या सौजन्याने हा प्रकल्प होत आहे. त्यास, रोटरी डिस्ट्रीक्ट 3142 चे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर दिनेश मेहता यांचे विशेष योगदान प्रकल्पासाठी लाभले आहे.
गरजू महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे उपक्रमाअंतर्गत 15 ई- रिक्षाचे वाटप शुभारंभ
गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागावा, या हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी यांनी एटॉस इंडिया कंपनीच्या सहकार्याने ठाणे परिसरात 15 ई- रिक्षाचे वाटप गरजू महिलांना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले उपक्रम –

१. नूतनीकरण करण्यात आलेली दादोजी कोंडदेव क्रीडांगणाची प्रेक्षागॅलरी –
२. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागॅलरीत प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्या होत्या. या संपूर्ण प्रेक्षागॅलरीत खुर्च्या बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिला.
३. प्रेक्षागॅलरीत एकूण १२ हजार ५०० खुर्च्या बसविण्यात आल्या.
४. स्वतंत्र मिडीया बॉक्स देखील तयार करण्यात आला आहे.
५.सामने सुरू असताना प्रेक्षकांना स्कोअर दाखविण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था
६.रणजी क्रिकेट सामने, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केले जाणार सामने होतात.
७.आयपीएल सामन्यांच्या सरावासाठी आरसीबी, केकेआर, पंजाब, राजस्थान रॉयल हे संघ देखील येतात. खर्च – ७.६५ कोटी रुपये
८.शेठ लखमीचंद फतीचंद प्रसूतिगृह, कोपरी –
• कोपरी विभागातील रहिवासी शेठ लखमीचंद फतीचंद यांनी त्यांच्या मालकीची ही जागा सन १९६० मध्ये रुग्णालय उभारण्याकरीता ठाणे नगरपालिकेस दिली. या ठिकाणी सन १९७८मध्ये कोपरी प्रसूतिगृह सुरू करण्यात आले.
•शासन निधीतून नुतनीकरण – खर्च ०१ कोटी रुपये.
•एकूण खाटा : २५
•आरोग्य सेवा – गरोदर मातांची प्रसूतिपूर्व तपासणी (प्रयोगशाळा तपासणी तसेच सोनोग्राफी). प्रसूती सेवा (सामान्य प्रसूती व शस्त्रक्रियेद्वारे करण्यात येणारी प्रसूती), प्रसूती पश्चात सेवा, मुख्यमंत्री मातृत्व योजना, कुटुंब नियोजन साधने व शस्त्रक्रिया
• नवजात बालकांची तपासणी व उपचार (SNCU-बांधकाम पूर्ण झालेले आहे)
३. प्रसूतिगृह, बाळकुम –
•बाळकुम प्रसूतिगृहाची स्थापना १९८४ साली झाली. पुर्नबांधणी २०२५ मध्ये झाली.
• गरोदर मातांची नोंदणी, तपासणी व औषध उपचार, प्रसूती, प्रसूतिपश्चात सेवा.
• प्रधानमंत्री मातृत्व योजना
• कुटुंब नियोजनाची साधने पुरवली जातात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
४.१५ व्या वित्त आयोगांतर्गत १० नागरी आयुष्मान मंदिरे-
• १५ व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य संस्थाना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
• केंद्र शासनामार्फत “नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर” स्थापित केली जात आहे.
• पूर्ण निधी केंद्र सरकारचा आहे.
• शहरी भागातील अंदाजे १५,००० लोकसंख्येकरिता जन सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी दवाखान्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
• या आरोग्य केंद्रामध्ये मोफत बाह्यरुग्ण सेवा व औषध उपचार, मोफत चाचण्या गर्भवती माताची तपासणी, टेलिकन्सल्टेशन, लसीकरण, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.
• दवाखान्याची वेळ – सोमवार ते शनिवार सकाळी ०९.३० ते सायं ०४.३० वाजेपर्यंत
• ठिकाणे – पडले गाव, विटावा, चांद नगर, हजुरी शाळा, संजय नगर, रुपादेवी पाडा, गावदेवी मैदान, साठे नगर, दिवा शीळ अग्निशमन केंद्र
५.कन्हैयानगर उद्यान, कोपरी
• एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत सॅटीस पुलालगत असलेल्या १००६ चौ. मी. भूखंडावर उद्यान विकसित करणे.
• महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)
• पाथवे, गझिबो, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम आदी कामे
• खर्च – रुपये ७५ लाख
• डिसेंबर -२०२५मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित
६. सार्वजनिक-खाजगी सहभागातून विकसित कोपरी येथील ०५ दशलक्ष लिटर , प्रति दिन क्षमतेचा टर्शरी ट्रिटमेंट प्रकल्प
• ठाणे महापालिकेचा १२० दशलक्ष प्रति दिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र
• त्यातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी अल्ट्रा फिल्ट्रेशन मेंबरेन तंत्रज्ञानावर आधारित ०५ दशलक्ष लिटर, प्रति दिन क्षमतेचा टर्शरी ट्रिटमेंट प्लांट
• सार्वजनिक-खाजगी सहभागातून निर्मिती
• कोपरी बायो इंजिअरिंग प्रा. लि. यांच्याकडून प्रकल्पासाठी लागणारा भांडवली खर्च आणि प्रकल्प २० वर्षे चालवण्यासाठी येणारा खर्च.
७.फिरता दवाखाना
• मेअर ऑर्गेनिक प्रा. लि. कंपनीचा सीएसआर निधी
• सुसज्ज फिरता दवाखाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन / शुभारंभ झालेल्या प्रकल्पांची माहिती

१. छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धर्मवीर आनंद दिघे टॉवर इमारतीची पुनर्बांधणी, ध्यान मंदिर उभारणी आणि मैदान विकास
* महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)
* चौकातील मुख्य भागात धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक
* ४३ मीटर उंचीचा टॉवर, तळमजल्यावर खुला रंगमंच, ग्रीन रुम, पहिल्या मजल्यावर वाचनालय
* छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला आकर्षक प्रवेशद्वार, कुंपण
* खर्च – १५ कोटी रुपये
* एप्रिल – २०२६ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

२. ठाणे स्टेशन परिसर सुशोभिकरण प्रकल्प, ठाणे रेल्वे स्टेशन (प.)
* महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)
* पादचाऱ्यांचे व वाहतुकीचे सुरळीत नियमन होण्यासाठी
* रिक्षा व टॅक्सी स्टॅण्डचे नूतनीकरण, स्टेशन बाहेरील गटाराचे व पदपथाचे नूतनीकरण, माहिती फलक बसवणे, झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग करणे
* खर्च – रुपये ४.०० कोटी
* डिसेंबर -२०२५ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

३. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ
* महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)
* पाच माळ्यांचे बांधकाम
* खेळाडूंसाठी अधिक बॅडमिंटन कोर्ट
* खेळाडूंसाठी वसतिगृहांची सुविधा
* राष्ट्रीय केंद्राच्या धर्तीवर विकास

४. दोस्ती-बाळकूम येथील क्रीडा संकुल आणि ऑलिंपिक दर्जाची शूटींग रेंज
* बाळकूम येथील सुमार 2.5 एकरच्या आरक्षित भूखंडावर बांधकाम
* टीडीआऱच्या माध्यमातून बांधकाम
* महापालिकेचा निधी खर्च न होता खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होणार.
* १०, २० आणि ५० मीटरच्या ऑलिंपिक दर्जाची शूटींग रेंज
* स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, लॉन, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा
* बास्केट बॉल, लॉन टेनिस कोर्ट, व्हॉली बॉल कोर्ट,
* टेबल टेनिस आणि इतर इनडोअर खेळ, ज्युडो, बॉक्सिंग, क्रॉस फिट, योगा, ओपम जिम
* सभागृह, उपहारगृह

५. नगरविकास विभागाकडील निधीतून नाले बांधकाम प्रकल्प
* महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)
* ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांचे बांधकाम
* खर्च – २०० कोटी रुपये.

६. ‘बी द चेंज’ (Be The Change) संस्थेच्या सहकार्याने –
* स्मार्ट बालवाडी प्रकल्प –
* ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या बालवाड्या या स्मार्ट बालवाडी बनिण्यासाठी “Be The Change” या संस्थेकडून प्रस्ताव.
* त्यानुसार विभागाकडून ४० बालवाडया “स्मार्ट बालवाडी” बनविण्याचा प्रस्ताव तयार
* स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातून ई-लर्निंग उपक्रम
* बालवाड्यांतील पट वाढवण्यासाठी उपयुक्त

७. रोटरी क्लबच्या सहकार्याने-
* कौशल्य विकास केंद्र –
* ठामपा शाळा क्र. १९, विष्णू नगर येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना
* रेमंड्स आणि व्होल्टास या कंपन्यांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम
* युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी
• ई-ऑटो रिक्षा वाटप
* निराधार महिला आणि तृतीयपंथी यांना स्वयंरोजगाराची संधी
* एकूण १० ई-रिक्षाचे वाटप
00000000000

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित  विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगुरूळे, तहसीलदार आबा महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलिप देवरे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटविकास अधिकारी संदीप वायाळ,  तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, नगरपालिकाचे मुख्याधिकारी तुषार आहेर, उप अभियंता पी आर घोडे, उप अभियंता आर. यू. पुरी पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन, शाखा अभियंता गणेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, खरिप हंगामात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे रास्त दराने विक्री होईल तसेच खताचा बफर स्टॉक करून ठेवावा आणि खताची लिंकिंग होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. तालुक्यात पाऊस सुरू झाला असून पाणी टंचाईच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू ठेवावेत. येवला तालुक्यात 50 कोटी उद्दिष्टापैकी 39 कोटी पीक कर्ज वाटप झाले आहे ही बाब समाधानकारक असून मागणीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतांना मंत्री श्री भुजबळ म्हणाले की,  राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेतील पंपिंग जॅकवेल व पाईप जोडणी संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाण्यांच्या टाक्यांचे बांधकाम संबंधित कामांना गती द्यावी. येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील रिट्रोफिटिंगकरिता आवश्यक असलेल्या मोटर्स साठी निविदा प्रक्रिया सुरू करावी. विंचूर लासलगावसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रिट्रोफिटिंग ची कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले.
येवला शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी झोपडपट्टी वासियांना घरकुल/आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत.  पंचायत समितीकडील घरकुल/आवास योजनेतील घरकुलांसाठी आवश्यक जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला-लासलगाव येथील शेतकरी व नागरिकांच्या वीज संदर्भातील सर्व तक्रारींचे निवारण करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.
पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरण टप्पा 1 मधील कालवा दुरूस्ती व लाइनिंगची कामांना गती द्यावी. येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील  दुरुस्ती व आनुषंगिक कामांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करावेत. स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारकाचे कामासाठी निधी उपलब्ध झाला असून काम पूर्ण करण्यात यावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील भुयारी गटार योजनेची कामे करतांना आवश्यकतेनुसार खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील खोदकाम करण्यात यावे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. शहरातील शॉपिंग कॉम्लेक्स वाटपासाठी आरक्षण नियमाप्रमाणे कार्यवाही करून लिलाव प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी. शिवसृष्टीची उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने करून प्राप्त निधीतून प्रस्तावित कामे सुरू करावीत.लासलगाव बाह्य वळण योजनेची कामे पूर्ण करावी. उपजिल्हा रुग्णालय लासलगाव इमारतीचे काम, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रोड इत्यादी कामे सुरू करण्यात यावे. लासलगाव विंचूर चौपदरी सह खेडलेझुंगे कॉंक्रीट रोडची कामे गुणवत्तापूर्ण होतील यासाठी दक्ष राहावे. मनरेगा अंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड जुलैअखेर करावयाची आहे. त्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे. राज्य नदी संवर्धन योजने अंतर्गत लासलगाव शिव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी या कामांची निविदा प्रक्रिया प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचनाही मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...