शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 196

वेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे होणारी ही भव्य समिट, भारताला जागतिक पातळीवर ‘कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. WAVES 2025 ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

WAVES 2025: का आहे ही परिषद खास?

भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment – M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत, आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताने गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे. FICCI-EY रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय M&E उद्योगाची किंमत $28 अब्जच्या पुढे गेली असून, 2025 पर्यंत तो $34 अब्ज गाठेल असा अंदाज आहे.

याच पार्श्वभूमीवर WAVES 2025 ही परिषद केवळ चर्चासत्रांचे व्यासपीठ नसून, भारतातील सृजनशील उद्योगक्षेत्राला जगभरातील गुंतवणूक, सहकार्य, आणि नवकल्पनांशी जोडणारा सेतू ठरणार आहे.

भारत – सृजनशील महासत्ता होण्याच्या वाटेवर

भारतात सध्या दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपट तयार होतात, ज्यात 20 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषा समाविष्ट असतात. OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेंटची मागणी केवळ देशातच नव्हे तर अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही वाढत आहे. या मागणीचा फायदा घेत, भारताने ‘कंटेंट एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. WAVES 2025 या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. ही परिषद केवळ संवादाचा नव्हे, तर कृतीशील धोरणनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरेल, जिथून भारताची M&E क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवली जाईल.

ऑस्कर, कान्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसच्या धर्तीवर वेव्ह्जचेही दरवर्षी आयोजन

वेव्हज् ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत आहे. वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे. या परिषदेस एक कायमस्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्ह्ज याचेही दरवर्षी आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार आहे.

वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मंनोरंजन क्षेत्रात क्रियेटिव्ह इॅकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे.

WAVES समिटची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे घटक:

  • ‘Create in India’ वर भर: ‘Make in India’ पाठोपाठ आता ‘Create in India’ ही नवी संकल्पना WAVES समिटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेली जाईल.
  • सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ: भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंट, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी.
  • ग्लोबल सहयोग आणि भागीदारी: Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील.
  • तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा संगम: AI, वर्च्युअल प्रोडक्शन, आणि इंटरॅक्टिव कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा.
  • धोरणात्मक चर्चासत्रे: धोरणकर्ते, गुंतवणूकदार, कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी.
  • क्रिएट इन इंडिया चॅलेंज – जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
  • वेव्हेक्स 2025 – हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.
  • वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.
  • मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे – उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

– वर्षा फडके -आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक(नव माध्यम)

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहण्याकरिता आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे शहरात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, प्रतिभाताई चौधरी, अंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी राज्य शासन विविध उपायोजना करीत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेत. याकरिता स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून या शिबिरांमध्ये आरोग्य पिडीत नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात येत आहेत. याठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरात विविध आजारांच्या 1560 पेक्षा अधिक तपासण्या करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष त्याचबरोबर ए.बी. फाउंडेशन व प्रतीक फाउंडेशन यांनी भरविलेले आरोग्य शिबिर उपक्रम सुत्य आहे. या शिबिराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरात जे आरोग्य पीडित रुग्ण असतील त्यांचेवर पुढील उपचार सिव्हील हॉस्पिटल त्याचबरोबर हिरे वैद्यकीय मेडिकल महाविद्यालयात करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी जे उपचार उपलब्ध होत नसतील अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक अथवा मुंबई येथे संदर्भित  करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला आरोग्य विषयक सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण करण्याचं आम्ही ठरवलं आहेत. याकरीता सिटीस्कॅन सोबतच अजून काही मशिन लवकरच हिरे महाविद्यालयाला उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रुग्णालय, तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. धुळे जिल्ह्य़ात सर्वाना सोबत घेऊन आरोग्य, सिंचन, उद्योग, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. यावेळी त्यांनी  ए. बी. फाउंडेशन आणि प्रतिक फाऊंडेशनच्या कामाचेही कौतुक केले.

यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी आरोग्य शिबीर आयोजनामागील भूमिका विषद केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्य शिबिरात रक्तदान ‍‍शिबीर  तसेच लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले या शिबिरास 2 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

धुळ्यातील गुंतवणूक परिषदेस उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 19 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायास पूरक वातावरण असून पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळाची मोठी उपलब्धता असल्यामुळे आगामी काळात धुळे जिल्हा उद्योग हब होणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी धुळ्यात गुंतवणूकदारांची परिषद होणार आहे. या गुंतवणूक परिषदेस राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार अनुपभैय्या अग्रवाल, दूरदृष्यप्रणालीद्वारे आमदार अमरिशभाई पटेल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक संतोष गवळी, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डिंगबर पारधी, खान्देश औद्योगिक विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग, खान्देश इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट असोसिएशनचे सचिव भरत अग्रवाल, धुळे अवधान मॅन्यु. असोसिएशनचे नितीन देवरे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष वर्धमान सिंगवी, मुकेश राठोड, प्रशांत देवरे, उद्योजक मोदी अग्रवाल, यांच्यासह विविध उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, राज्यात 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मोठे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा सहभाग असला पाहिजे. या 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये सामान्य माणसाची आर्थिक ताकदसुद्धा वाढली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुंतवणूक परिषदेचा (इन्व्हेस्टमेंट) चा कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. देशातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातात, देशाच्या चारही दिशांना जोडणारे रेल्वेचं जाळं येथे तयार होत आहे. शैक्षणिक हब असलेला आपला धुळे जिल्हा असल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यात सोयाबीन, इलेक्ट्रॉनिक हब आहे. शिरपूर टेक्सटाइल, शिंदखेडा तालुक्यात फुड ॲण्ड फॉर्मर  केंद्र विकसीत झाले आहे. साक्रीमध्ये 1 हजार मेगाव्हॅटचे सोलर प्रकल्प उभे राहिले आहे. तसेच धुळे जिल्हा मध्यप्रदेश, गुजरात राज्याला लागून आहे. जिल्ह्यातून वाढवण, जेएनपीटी बंदरास जोडणारे रस्त्यांचे जाळे आहे. त्याचप्रमाणे रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सिंचनाची व्यवस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे.  येत्या काळात उड्डाण योजनेत धुळ्यातील एअरपोर्ट विकसित करणार आहे.

धुळे जिल्ह्यात येत्या काळात जागतिकस्तराचे अँकर इंडस्ट्री उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. धुळे जिल्ह्याचे अनेक उद्योगपती हे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे उद्योग निर्माण करतात. आता महाराष्ट्रभर, देशभरामध्ये आणि जगभरातील उद्योग हे पुढच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात उभे राहतील आणि धुळे जिल्हा मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसचं एक मोठं केंद्र म्हणून पुढच्या काळात भारतामध्ये उभा राहणार आहे. यासाठी 28  एप्रिल रोजी गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या गुंतवणूक परिषदेस राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पालकमंत्री श्री.रावल यांनी बैठकीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गुंतवणूक परिषदेचे ब्रॅडींग करावे. मोठ्या उद्योजकांना गुंतवणूक परिषदेत आमंत्रित करण्यात यावेत. जिल्हा , तालुकास्तरावरील उद्योजकांना आंमत्रित करण्यात यावेत. त्याचप्रमाणे परिषदेत उत्कृष्ठ सादरीकरण करुन एक सकारात्मक वातावरण तयार करावे. एक खिडकी योजनेतून तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उद्योजकांना सहकार्य करण्यात येईल. उद्योजकांना जागा, वीज, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. एमआयडीसीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. अशा सूचना दिल्यात. यावेळी पालकमंत्री श्री.रावल यांनी काही उद्योजकांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून गुंतवणूक परिषदेस येण्याचे आमंत्रित केले.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी गुंतवणूक परिषद यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा दि. 19: कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटीची तरतूद एआय करिता केली आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी व उत्पादन खर्चात जास्तीत जास्त कृषि उत्पन्न मिळवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस यासह फळबागांची आधुनिक शेती करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिपोंडे बु. येथील बाजार पटांगणात नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करता येतो, खात्रीशीर जास्त उत्पादन मिळवता येते, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आजच्या घडीला शेतीबाबतीत मोबाईलवर शेती पीक, पाणीवापर, अचूक खत व्यवस्थापन, जमिनीचा पोत, किड नियंत्रण, हवामानविषयक अचूक माहिती, पिकांसाठी शाश्वत बाजारपेठ आदी सर्व माहिती उपलब्ध होते. या तंत्रज्ञानाचा वापर केला तरच शेतीचे उत्पन्न वाढवता येईल. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आधारित आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, शेतकऱ्यांच्या विकासासाठी निधीची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळबागांना शाश्वत बाजार पेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

उत्तर कोरेगावातील 26 गावात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी यावर काम सुरु केले आहे. सोळशी येथील प्रस्तावित धरण हे महाबळेश्वर तालुक्यात येत असून याच्या सर्वेक्षणाला आणि धरणाच्या कामासाठी प्राथमिक तरतूद केली आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेद्वारे यावर मार्ग काढला जाईल.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वारंवार दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासन सर्वोच प्राधान्य देत असल्याचे सांगून या करीता निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांचा दिमाखदार नागरी सत्कार करण्यात आला.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई, दि.19 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 5 मे ते 14 मे 2025 या कालावधीत एसएसबी (SSB) कोर्स क्र. 61 आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) च्या वेबसाईटवरून SSB-६१ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे.

पात्रता

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:

  1. कंबाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण, तसेच सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी पात्रता प्राप्त केलेली असावी.
  2. एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडसह उत्तीर्ण, आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून एस एस बी SSB साठी शिफारस मिळालेली असावी.
  3. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी Technical Graduate Course साठी SSB मुलाखत पत्र असणे आवश्यक.
  4. विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी SSB मुलाखत पत्र किंवा शिफारस यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे training.petenashik@gmail.com या ईमेल, दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सअॅप नंबर 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांना मानवंदना; मुंबईत गेट व ऑफ इंडिया येथे २० एप्रिलला कार्यक्रम

मुंबई, दि. 19 :- संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे रविवार, 20 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधासभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, नंदेश उमक, अवधूत गुप्ते व शाहीर राजा कांबळे हे कलाकार सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीते, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, दि. 19 :  बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे 93 वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 93 व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार सर्वश्री सुरेश धस, श्रीमती नमिता मुंदडा, श्रीमती मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले, गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम सुरू असून अजूनही पुढे विकासाची ही कामे करायची आहेत. संतानी दाखविलेला भक्तीचा मार्ग समाजाने सोडलेला नाही. समाज घडविणाऱ्या या परंपरेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये मुस्लिम समाज बांधव देखील सहभागी झाले, याचा आनंद आहे.  आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याशी वेगळे नाते निर्माण झाले आहे. आज मला वामनभाऊंच्या या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद असल्याचे ते म्हणाले.

 

गहिनीनाथ गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे, गडासोबतच या परिसरातील भाविकांच्या सोई सुविधांचा तसेच या परिसराचा  देखील विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, मराठवाडा व बीड जिल्ह्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. ते पाणी संपूर्ण बीड जिल्ह्यात पोचविण्याचा आपला प्रण आहे. मराठवाडा व बीड जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी 53 टीएमसी पाणी गोदाखोऱ्यात आणण्याच्या आराखड्यालादेखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल. आजच्या या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, असेही श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा सुरू केली, ती अखंडपणे सुरू आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी संत वामनभाऊ यांनी ९३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड नारळी सप्ताह परंपरेबाबत माहिती दिली. यावेळी बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा – वनमंत्री गणेश नाईक

सातारा दि. 18: जंगलातील वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा सभागृहात वनविभागातील योजनांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री श्री. नाईक अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक पंकज गर्ग, सातारच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, कोयना वन्यजीव प्रकल्पचे उपसंचालक किरण जगताप, सामाजिक वनीकरण सातारचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, वन विकास महामंडळ पुणे येथील विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, चांदोली वनजीव विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील आदी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणाव मुक्त, आनंददायी वातावरणात काम करून वन विभागाचे बळकटीकरण करावे. वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडे उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. प्रत्येक वन परिक्षेत्रात सुरंगी, बकुळी, बेल, मोह, भाडोळी जांभूळ या रोपांची लागवड करण्यावर प्राधान्य द्यावे. याचबरोबर सीजनल फळे व रीजनल फळांच्या रोपांच्या लागवडीवर भर देण्यात यावा. वन विभागाच्या जुन्या व नादुरुस्त वाहनांची यादी करावी. अशा वाहनांचे विहित पद्धतीने निर्लेखन करावे. जंगलात फिरतीवर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मजबूत बनावटीची वाहने खरेदी केली जातील.

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणा व शौर्याचे प्रतिक – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

छत्रपती संभाजीनगर, दि.18 एप्रिल, (विमाका) : महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आलेला त्यांचा पुतळा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रदिर्घ संघर्ष केला. त्यामुळे ते भारताचे जननायक म्हणून मानले जातात, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा उभारण्यात आलेला पुतळा आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे, खऱ्या अर्थाने महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणा व शौर्याचे प्रतिक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या कॅनॉट गार्डन येथे आज महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केनेकर, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज लक्ष्यराज सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे अनावरण केले, याचा आनंद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा आहे. त्यामुळे प्रेरणेची कमतरता या ठिकाणी असणार नाही. महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त, देशभक्त होते, ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. स्वराज्यासाठी महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले पण मोगलांचे कधीही मांडलिकत्व स्वीकारले नाही. आज आपण खऱ्या अर्थाने या वीरपुरूषांमुळेच स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या ठिकाणी असलेला महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा केवळ पुतळा नाही तर एक प्रेरणास्त्रोत आहे. या वीर पुरूषांच्या प्रेरणास्त्रोताच्या माध्यमातूनच स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केला जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची मानके, देशाच्या समृद्ध वारसाला पुनर्रचित करण्याचे काम सुरू आहे. अशा या पर्वामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्यासाठी महाराणा प्रतापसिंह पुतळयाच्या माध्यमातून विराजमान झाले आहेत. मी खरोखर संभाजीनगरकरांचे मनापासून अभिनंदन करतो. वीर पुरूषांच्या मार्गाने चालण्याचा निर्धार आपण करूयात, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते झाले याचा मला मनस्वी आनंद आहे. हा पुतळा प्रेरणा, आदर्श, साहस यांचे खरे प्रतिक आहे. महाराणा प्रतापसिंह हे देशाचे जननायक आहेत, त्यांची प्रेरणा आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांचा खरा इतिहासही आजच्या पिढीने जाणून घ्यावा. या महापुरूषांनी कधीही भेदभाव केला नाही, त्यांनी कायम जनहितासाठी कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात हे महापुरूष स्वातंत्र्य विरांचे प्रेरणास्थान राहीले आहेत, असा उल्लेख त्यांनी केला.

महाराणा प्रतापसिंह यांनी समाजाला संघटीत करण्याचे मोठे काम केले. सर्व समाज घटकांनी त्यांना साथ दिली असून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरणारे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारलेला त्यांचा पुतळा आपल्याला कायम शौर्याची व त्यांच्या विरतेची प्रेरणा देत राहील, नव्या पिढींने त्यांचा आदर्श समोर ठेवत वाटचाल करावी, असे आवाहनही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव आदराने घेतले जात आहे. 2014 मध्ये 11 व्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आता 5 व्या क्रमांकावर आली आहे. भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन प्रगत देशात ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अतिशय प्रेरणादायी व आदर्शवत आहे. राजस्थान ही त्यांची भूमी विरांची भूमी म्हणून देशात ओळखली जाते. महाराणा प्रतापसिंह यांचा त्याग व परिश्रम हे युवकांसाठी आदर्श आहेत, असे सांगून श्री बागडे यांनी महाराणा प्रतापसिंह यांची कारकिर्द विशद केली.

पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, मी महानगरपालिकेत असताना महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाबाबतचा ठराव घेण्यात आला. आज अतिशय सुंदर जागेत त्यांचा पुतळा उभारण्यात आल्याने खऱ्या अर्थाने आमचे स्वप्न पुर्ण झाले आहे.

मंत्री अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रवास विशद केला. आभार मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मानले.

यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपा – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आवाहन

वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांच्यासह भीमालपेन जन्मोत्सव यात्रेला उपस्थिती

नागपूर, दि 18 : कुवारा भिवसन देवस्थान पंचकमेटी, भिवगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमालपेन जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याला परिसरातील हजारो आदिवासी बांधव येत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचा हा उत्सव भाविकांच्या सहभागामुळे अधिकच उत्साही ठरत आहे. आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यावेळी केले.

मंत्री श्री. उईके  यांनी आज भीवगड येथील भीमालपेन ठाणा देवस्थानाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पंचकमेटीच्या कार्याचे कौतुक करत भाविकांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा हे आपल्या राज्याचे वैभव आहे. ही परंपरा ही केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्याचे काम सातत्याने करायला हवे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत हे वैभव पोहोचवणे गरजेचे आहे. देवस्थानाच्या विकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे मंत्री श्री. उइके यावेळी म्हणाले.

राज्य शासन आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या प्रथा, परंपरांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देईल. कुवारा भिवसन देवस्थानचा विकास येत्या काळात अधिक गतीने करण्यास कटिबद्ध असल्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे...

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

0
मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी...

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

0
सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील...