रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 195

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

नागपूर, दि. २० : नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हैदराबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयात करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहरातील नागरिकांच्या सेवेत ‘पौर जन हिताय’ हे ब्रिदवाक्य घेऊन अहोरात्र काम करणाऱ्या नागपूर महापालिकेची स्थापना २ मार्च १९५१ रोजी झाली. महापालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला २ मार्च २०२५ पासून सुरुवात झाली आहे. या औचित्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते, बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून महापालिकेच्या सर्व पत्रव्यवहार व मनपाच्या इतर प्रशासकीय कामकाजामध्ये याचा रितसरपणे उपयोग करण्यात येणार आहे.

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महापालिकेने विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या आठवणींनाही यादरम्यान उजाळा देण्यात येणार आहे.

शासनाने १९५१ मध्ये नागपूर मनपाचे प्रशासक म्हणून जी.जी. देसाई यांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनात जून १९५२ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर नगरीचे दोनदा महापौर  पद भूषविले आहे. तसेच विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास ठाकरे, संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर राहिलेले आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंत ५४ महापौर, ५६ उपमहापौर आणि ५० आयुक्तांची सेवा नागपूर महानगरपालिकेला लाभली आहे. महाराष्ट्रात नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी सी.एन.सी. ॲक्ट १९४८ अंमलात होता. आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून काम करणारे जे.एस. सहारिया आणि मनू कुमार श्रीवास्तव यांना राज्याचे मुख्य सचिव पदावर काम करण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच इतर आयुक्त म्हणून काम केलेले अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत.

0000

पिंक ई-रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २० : महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई-रिक्षा योजनेच्यामाध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. लाभार्थी महिलेच्या पिंक ई-रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृतिशील विश्वासही दिला.

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ५० पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार संदीप जोशी आणि डॉ. आशिष देशमुख, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने पिंक ई-रिक्षा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच कामकाजी महिलांना या महिलांच्या ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील ५० पात्र लाभार्थी महिलांना ई-रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात २ हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई-रिक्षा वितरीत होवून रोजगार उपलब्ध होणार आहे.

नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. यातून पिंक ई-रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा ही योजना आणली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरीत करण्याचे उद्दिष्ट आहे. नागपूर जिल्ह्यातील ५० पात्र महिला लाभार्थ्यांना ई -रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे. या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्था ही त्यांना करून देण्यात आली आहे. महामेट्रो सोबत करार करून फिडर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई-रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे. येत्या काळात विमानतळ, पर्यटनस्थळ अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ११ पात्र महिला लाभार्थ्यांना ई-रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांनी केला पिंक- ई-रिक्षातून प्रवास

कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपुरातील सन्याल नगर, टेका नाका नारीरोड  येथील पूजा नरेंद्र वानखेडे यांच्या पिंक ई रिक्षातून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे  आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह प्रवास केला. या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांना विश्वासही दिला.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात २००० पिंक ई-रिक्षा वितरित होणार आहेत. यासाठी २० ते ५० वर्षे वयोगटातील इच्छुक महिलांचे २०४० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी  जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने १०३२ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५० पात्र लाभार्थी  महिलांना पिंक ई-रिक्षा वितरित करण्यात आले.

थोडक्यात योजनेविषयी

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांकरीता राबविण्यात येणार आहे. यात नागपूर जिह्यामध्ये २००० महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे.

या योजनेंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

०००००

 

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन सुरू आहे.  शासनाने हाती घेतलेल्या या मिशनची २०१८ मध्ये नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ही संस्था इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी), नागपूर यांना मदत करत आहे. डब्ल्युसीएल या संस्थेच्या माध्यमातून आयजीएमसी, नागपूर यांनी गेल्या वर्षभरात साधारण चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीया केल्या आहेत. तसेच शासनासोबत केलेल्या कराराच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन स्वप्नपूर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून यापुढील तीन वर्षात दरवर्षी साधारण चार हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील ही संस्था सहकार्य करणार आहे.

ही संस्था विदर्भातील ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचे निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवून त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील. डब्ल्यूसीएल संस्थेचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या यशस्वीतेसाठी शासनाला असलेले सहकार्य पाहून इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

00000000

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे, यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मावळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार  सचिन पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष  विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीष पाटणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्व पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून  घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आता पत्रकारितेतही होत आहे. हे तंत्रज्ञान आता पत्रकारांनीही अवगत केले पाहिजे. पत्रकारितेचे मूल्ये ही केवळ पत्रकारच जपू शकतात हेही लक्षात ठेवले पाहिजे.  पत्रकारांवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कसे

कायदेशीर संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न केला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते असे सांगून अजित पवार म्हणाले, पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रुपये दिला जाणारा सन्मान निधी 20 हजार रुपये करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तसेच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम शासन करीत आहे. शासन म्हणून काम करत असतानाच समाजातल्या सर्व घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, सर्वांचे प्रश्न हे कसे मार्गी लावता येतील यावर शासनाचा भर आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या उभारणीसाठी अतिशय मोलाची भूमिका त्यांनी बजावली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. श्री. बेडकीहाळ यांनी पत्रकारितेला एक दिशा दिली. त्यांनी केवळ पत्रकारिता व्यवसाय न मानता समाज जागृतीचं साधन म्हणून स्वीकारले. त्यांचे योगदान आजच्या तरुण पत्रकारांसाठी एक आदर्श आहे. त्यांनी   लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरावस्थेवर प्रकाश टाकण्याचे काम केले. रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मर्ढे येथील बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी त्यांनी पाठपुरावा केला. हे स्मारक पूर्ण झाले असून याचे लोकार्पणही लवकर करु असेही, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील म्हणाले, पत्रकार आणि साहित्य हे कुठल्या एका विचाराचे नसतात आणि कुठल्याही एका विचाराबरोबर ते जात नाहीत. जे दिसतं घडतं त्यावर ते त्यांचे मोकळेपणाने आणि स्पष्टपणे भाष्य करतात. श्री. बेडकीहाळ यांनी ही तत्वे जपली आहेत, परंतु त्यांनी पवार कुटुंबीयांशी आपले नाते हे आजपर्यंत ही अतिशय उत्तम पद्धतीने कायम ठेवले.  पत्रकारिता, साहित्य क्षेत्राबरोबरच, समाजकारणसुद्धा उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील    कविवर्य बा.सी. मर्ढेकर,  कवी यशवंत, कवी गिरीश आणि  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी   आणि या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा  असलेल्या सातारा जिल्ह्यात रवींद्रजी बेडकीहाळ यांची वाटचाल,  त्यांचा विचार आणि साहित्यक्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम हे निश्चितपणाने एक आगळावेगळा ठसा निर्माण करणारे आहे.

सत्काराला उत्तर देताना श्री. बेडकीहाळ म्हणाले,  आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी 11 हजार रुपये होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी 50 कोटी रुपयांची तरतुद केली. आता हा निधी 20 हजार रुपये करण्यात आला आहे. बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडत होता. साडेबत्तीस लाख रुपये देण्यात आले. हे स्मारक पूर्ण झाले आहे. त्याचे लवकरात लवकर लोकर्पण व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष  विनोद कुलकर्णी यांनी केले.  या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी राखली जाते, कोळसा खाण प्रबंधन कसे केले जाते, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच पाईप कन्व्हेनरचे निरीक्षण सुद्धा जाणून घेतले. पाईप कन्व्हेनरच्या माध्यमातून रोज 6 हजार टन कोळसा पाईपद्वारे वाहतूक होते. त्यामुळे प्रदूषण थांबण्यास मदत होते,  याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.

यावेळी बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या,  कोळसा खाण प्रकल्पात महिला कर्मचारी व अधिकारी सुद्धा कार्यरत आहे, हे जाणून आनंद झाला. सर्वांनी अतिशय चांगले काम करावे. महिला आज पुरुषांसोबत कोळसा खाण प्रकल्पामध्ये काम करीत आहे. चांगल्या कामामुळे आणखी वीज निर्मिती होईल. असेच काम भविष्यात सुद्धा सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इरई धरणाची सुद्धा पाहणी केली.

यावेळी ऑपरेशनल डायरेक्टर संजय मारुडकर, मुख्य अभियंता विजय राठोड, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, यांच्यासह एरिया जनरल मॅनेजर हर्षद दातार, क्षेत्र प्रबंधक पुनम जेढढोबळे, खाण प्रबंधक मोहम्मद, डी.एन. तिवारी, सुनील ताजने, हरीश गव्हाळे आदी उपस्थित होते

महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार :  ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते कोळसा खाण प्रकल्पात कार्यरत असलेल्या  महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विना गिरडकर, सारिका पोडे, प्रतिभा नांदे व इतर महिलांचा समावेश होता.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते.

क्रीडा मार्गदर्शकाचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या धनुर्विद्या प्रशिक्षक शुभांगी रोकडे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकडे, कबड्डी खेळाडू शंकर गदई यांचा पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार याच्या भावाने सन्मान स्वीकारला.

चारही खेळाडूंनी अतिशय कष्टाने  साध्य केलेले यश खूप महत्वपूर्ण आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील चार खेळाडूचा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान व्हावा ही बाब अतिशय भूषणावह असून या यशाने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंनी मिळविलेले हे यश इतरांनाही प्रेरक असल्याचे नमूद करून मंत्री विखे पाटील म्हणाले, सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम शासन स्तरावरून होत आहे. जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकारांना पाठबळ देण्यासाठी  विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून करण्यात येत असून यापुर्वी राष्ट्रीय स्तरावरील  कुस्ती स्पर्धेसाठी मॅटची उपलब्धता करून देण्यात आली होती. शहरातील क्रीडा संकुलाला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याने सर्व सुविधांनी परीपूर्ण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित  बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करावी. अवैध शस्त्रे आणि गुटखा विक्रीलाही पायाबंद घालण्यासाठी मोहीमस्तरावर कारवाई करावी. काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करावी. लहान अक्षरातील नंबर प्लेट लावलेल्या वाहनांवरदेखील दंडात्मक कारवाई करावी. जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी, शासनाचे पोलीस दलाला या कारवाईत पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी अशी कारवाई गरजेची असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. अधिकाधिक महिलांना लखपती बनविण्यासाठी  ‘लखपती दिदी’ ही योजना मिशन मोडवर राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे प्रभागसंघांतर्गत  महिला बचतगट व ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधीचे  प्रा. शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.        यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, तहसीलदार गुरू बिराजदार, गट विकास अधिकारी रूपचंद जगताप, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, नंदू नवले आदी उपस्थित होते.

प्रा.राम शिंदे म्हणाले,  समुदाय गुंतवणूक निधीमुळे महिलांना आर्थिक बळकटी मिळत असून   स्थानिक विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा उपक्रमांमुळे खऱ्या अर्थाने महिलांचा समावेशक विकास शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.

कर्जत तालुक्यामध्ये १ हजार ७२५ बचतगट, ८१  ग्रामसंघ असून विविध बँकांमार्फत ४१ कोटी रुपयांचे बचगटांना कर्ज स्वरूपात वितरण केले असून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत सीड कॅपीटल म्हणून ९ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी ३६ उद्योगांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ३ कोटी पेक्षा अधिक फिरत्या निधीचे वाटप आज या निमित्ताने करण्यात येत असल्याचे सांगत सुमारे ५१ कोटी रुपयांचा निधी बचतगटातील महिलांना उद्योगासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बचगटांच्या माध्यमातून महिलांना संघटित करत त्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचेही प्रा. शिंदे म्हणाले.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दिदी’ योजनेतून महिलांना लखपती करण्याचा संदेश दिला आहे. कर्जत तालुक्यात आतापर्यंत ५ हजार २१० महिला लखपती दीदी झाल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता अधिकाधिक महिलांना योजनेतून लखपती बनविण्यासाठी ही योजना मिशन मोडवर राबविण्यात यावी. तसेच ग्रामीण भागात महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी क्षेत्रात सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘ड्रोन दीदी’ ही योजनाही प्रभावीपणे राबविण्यात यावी. ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी, पेरणी, जमिनीचे सर्वेक्षण आदी कामांचे महिलांना प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रकल्प संचालक राहुल शेळके यांनी केले.  यावेळी ॲड. प्रतिभाताई रेणुकर यांनीही मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमात  बचतगटातील महिलांनी आपल्या यशोगाथाही मांडल्या.

राशीन येथे ग्रामसंघांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप

कर्जत तालुक्यातील राशीन येथे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामसंघांना १ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या समुदाय गुंतवणूक निधीचे वाटप करण्यात आले.

बचतगट, लाडकी बहीण, लखपती दीदी, ड्रोन दिदी यासारख्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतूनच महिला समाजाच्या मुख प्रवाहात येऊन आपल्या व आपल्या कुटुंबांची आर्थिक उन्नती निश्चित साधू शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१९- ग्रामीण भागात  टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे. टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही.  तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,  आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी पाण्याच्या उद्भवात उपलब्ध पाणीसाठ्याची स्वतः खात्री करावी. पाण्याचा उद्भव गावापासून कमी अंतरावर राहील याची दक्षता घ्यावी. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे आणि पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासावेत.  पाण्याचे नमुने तपासल्याशिवाय टँकर भरू नये. टँकर वेळेवर न आल्यास संपर्कासाठी व्यवस्था करण्यात यावी. जनतेला गरजेएवढे पाणी मिळावे हि शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, जलसंपदा अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल याचे नियोजन करावे. पाणी उपलब्ध असताना ग्रामीण पाणी पुरवठा योजना बंद पडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नागरिकांसोबत पशुधनालाही पुरेसे पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे. प्रत्येक पाणी पुरवठा योजनेचे शुद्धीकरण प्रकल्प सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. तलाव परिसरातील विंधनविहिरी आणि विहिरी आवश्यकतेनुसार अधिग्रहित कराव्या. पाणी योजनेसाठी सौर ऊर्जेचा उपयोग करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. श्री. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील चारा उपलब्धतेची माहितीही यावेळी घेतली, तसेच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतपिकाच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी उपस्थित आमदार महोदयांनी उपयुक्त सूचना केल्या. ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सादरीकरणाद्वारे टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती

मुंबई, दि. 19 : राज्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात महिला व बालविकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा अनधिकृत संस्थांवर एक वर्ष कारावास अथवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.

अनधिकृतपणे संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवणे,  त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याचे निदर्शनात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. कलम 42 नुसार, कोणत्याही संस्थेला नोंदणी प्रमाणपत्राशिवाय बालकांची देखभाल करण्याची परवानगी नाही. अशा संस्थांचे संचालन करणाऱ्यांवर एक वर्षाचा कारावास किंवा किमान एक लाख रुपयांचा दंड, किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे, असे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात अशी अनधिकृत बालक संस्था आढळल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अथवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. बालकांवरील शोषण रोखण्यासाठी समाजाने सजग राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त गुंडे यांनी केले आहे.

0000

श्रीमती श्रद्धा मेश्राम/विसंअ

ताज्या बातम्या

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

0
बारामती, दि.१२: माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक...

कराड – चिपळूण महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम १५ डिसेंबर आधी पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज...

0
सातारा दि. १२ : पाटण तालुक्यातील कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री...

मिरगाव येथील भूस्खलन बाधितांना पक्की घरे मिळण्यासाठी डिसेंबरअखेर काम पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि. १२ :  मिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना पर्यटन,...

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...