शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 191

राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ.आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि.१९ : राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. यामधील ज्या आरोग्य केंद्रांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे अशा ८६ आरोग्य संस्थांकरिता ८३७ नियमित पदे व १२३३ कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील ४७ उपकेंद्रे १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे पाच ग्रामीण रुग्णालये दोन ट्रॉमा केअर युनिट चार स्त्री रुग्णालये १० उपजिल्हा रुग्णालये आणि दोन जिल्हा रुग्णालये अशा विविध ८६ आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यात आली आहे. तसेच टप्याटप्याने सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिकारी म्बब्स पदाच्या प्रतीक्षा यादीतील ४०८ व बम्स गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील २५ डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सूचित केले आहे.

००००

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, नानासाहेब जाधव, रविंद्र वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्ये, उत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला.  त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केली, असे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे २१ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने शिवसृष्टीला ‘मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये ३६ मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणाले, देशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचना, पाण्याच व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, किल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालन, गंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले, ज्यावेळी भारतात अनाचार, अंध:कार होता आणि भारतातील अनेक राजे रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते. मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते. अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलविला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले. संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याची देण दिली.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते. शेतकऱ्यांचे कल्याण, जलसंवर्धन, जंगलांचे संवर्धन, उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माण, आरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदी, सागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल.

विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

डॉ. मांडविया म्हणाले, देशाच्या स्वाभिमानासमोर संकट होते अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा, सन्मानाचा नारा दिला तसेच जनतेच्या कल्याणाची मोहीम चालवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाचे नवयुवक विकसित भारताचा संकल्प घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येते, आदर्श शासन कसे चालवता येते, देशाच्या सन्मानासाठी मान न झुकविता कसे लढता येऊ शकते हा वारसा दिला आहे.

शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्था, अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्याच प्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’  पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ. मांडविया म्हणाले.

श्रीमती खडसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक श्रद्धास्थान, आस्था आहे. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी लाखो युवकांना सोबत घेतले. त्याचप्रमाणे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्माणासाठीचा संकल्प युवकांनी करावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. भरणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारल्यास अंगात एक ऊर्जा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपल्या जीवनात वाटचाल ठेवली पाहिजे. या आदर्शाची उजळणी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रमामुळे होणार आहे. राज्यातील युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनही खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त शेखर सिंह, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे,  क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

या पदयात्रेचे सीओईपी कॉलेज मैदान ते एस.एस.पी.एम.एस. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जंगली महाराज रस्ता ते झाशीची राणी पुतळामार्गे खंडूजीबाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग या मार्गाने आयोजन करण्यात आले.

या पदयात्रेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस,केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे, श्री. मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

0000

मराठी भाषेचा अभिजात प्रवास: ‘दर्पण’ ते 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, ती एक समृद्ध विचारधारा, संस्कृती आणि परंपरेचा अभिमानास्पद वारसा आहे. संस्कृतप्रभव असलेल्या या भाषेने अनेक संत, कवी, समाजसुधारक आणि साहित्यिक यांच्याकडून आपल्या विचारांची सखोल मांडणी केली आहे. तिच्या अभिव्यक्तीचे आणि साहित्यिक सामर्थ्याचे महत्त्व लक्षात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान केवळ भाषेच्या ऐतिहासिक प्रवासाचा पुरस्कार नसून, तिच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्याची जागतिक पातळीवरील मान्यता आहे.
मराठी भाषेच्या या गौरवशाली प्रवासात बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून लोकशिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषा विचार, चर्चा आणि सामाजिक परिवर्तनासाठी सक्षम बनली. त्यांची जयंती २० फेब्रुवारी रोजी आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिल्ली येथे होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, हा एक विलक्षण योग आहे.
बाळशास्त्री जांभेकर आणि ‘दर्पण’चा प्रभाव
बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश सत्तेखाली असलेल्या भारतात मराठीतून विचारांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी त्यांनी ‘दर्पण’ सुरू केले. त्या काळी इंग्रजी वृत्तपत्रे प्रामुख्याने ब्रिटिशांच्या हितसंबंधांना महत्त्व देत होती, त्यामुळे स्थानिक जनतेसाठी माहितीचा स्रोत नव्हता.
‘दर्पण’मध्ये केवळ बातम्या नव्हत्या, तर त्यात सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकणारे लेख, शिक्षणाचा प्रचार, राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि जनजागृतीचे कार्य केले जात असे. त्यांनी भारतातील तसेच जगभरातील राजकीय घडामोडींचे संक्षिप्त आणि समर्पक वर्णन केले. जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजातील अनिष्ठ रूढी, अंधश्रद्धा दूर करणे हा जांभेकरांचा मुख्य हेतू होता.
त्यानंतर मराठी पत्रकारितेचा विस्तार होत गेला आणि पुढे ‘केसरी’, ‘सुधारक’ व आजवरच्या अनेक वृत्तपत्रांनी सामाजिक आणि राजकीय विचारप्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘दर्पण’च्या प्रभावामुळे मराठी भाषा फक्त साहित्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती वैचारिक मंथन आणि लोकशिक्षणासाठी प्रभावी माध्यम बनली.
मराठी भाषा: अभिजाततेचे वैशिष्ट्य
मराठी भाषेचा इतिहास हजारो वर्षे प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास यांचे अभंग आणि ओव्या हे मराठी भाषेचे पहिले अभिजात साहित्य मानले जाते. संत साहित्यातून भावसंपन्नता, आध्यात्मिकता आणि सामाजिक परिवर्तनाची तत्त्वे प्रकट झाली. पुढे शाहिरी काव्य, लोककथा, ऐतिहासिक बखरी आणि नाट्यसाहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रवास अधिक विस्तृत झाला.
१८व्या आणि १९व्या शतकात सामाजिक सुधारकांनी मराठी भाषेतून स्त्री-शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि लोकशिक्षण यांसारख्या विषयांवर लेखन केले. टिळक, आगरकर, फडके, केशवसुत यांसारख्या विचारवंतांनी मराठीतून समाजप्रबोधन करत भाषा अधिक समृद्ध केली.
अभिजात भाषेच्या दर्जासाठी आवश्यक महत्त्वाचे निकषांमध्ये प्राचीन आणि समृद्ध साहित्य परंपरा, स्वतःची लेखनसंस्कृती आणि व्याकरण असणे, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानपरंपरा यात महत्त्वाचे योगदान असणे अनेक पिढ्यांमध्ये अबाधित अस्तित्व असणे या सर्व निकषांवर मराठी भाषा योग्य ठरली आणि त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हा दर्जा मिळणे म्हणजे मराठीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळणे आणि भाषेच्या अभ्यासासाठी विशेष अनुदाने उपलब्ध होणे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली
दिल्ली येथे २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी मराठी साहित्यिक, लेखक, कवी आणि वाचक एकत्र येऊन साहित्याच्या नव्या दिशा ठरवतात.
यंदा हे संमेलन अधिकच विशेष ठरणार आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या संमेलनात मराठी साहित्याच्या भविष्यकालीन वाटचालीबाबत चर्चा होणार असून, डिजिटल युगात मराठी भाषेचे अस्तित्व आणि जागतिक स्तरावर तिच्या संवर्धनासाठी कोणते प्रयत्न करावेत यावर विचारविनिमय होईल.
मराठी भाषा: पुढील दिशा
बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून मराठी भाषेला वैचारिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आज विविध माध्यमांच्या मदतीने आपल्याला मराठी भाषा आणि साहित्य अधिक व्यापक स्तरावर नेण्याची संधी आहे.
‘दर्पण’ने घालून दिलेल्या वाटेवर चालत आज मराठी भाषा नव्या संधींसाठी सज्ज आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवे धोरण आखणे, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करणे आणि नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपसूकच होणार आहे. मराठी भाषा ही केवळ एक संवादाचे माध्यम नाही, तर ती विचार, संस्कृती आणि सृजनात्मकतेचा उत्सव आहे. या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगून तिचे भविष्यातील स्थान अधिक भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत.
– गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली

छत्रपती शिवाजी महाराजांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

अमरावती, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजेंद्र फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

०००

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह; ११ ते १७ फेब्रुवारी विविध कार्यक्रम संपन्न

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथे मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागामार्फत ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान “मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताह” साजरा करण्यात आला.

मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाच्या अनुषंगाने आरोग्य भवनच्या सभागृहामध्ये ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. तसेच सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, मुख शल्यचिकित्साशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. अशोक डबीर, महाराष्ट्र राज्य मुख शल्यचिकित्साशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण शेनॉय यांच्यासह मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात येणाऱ्‍या टाक्यांचे प्रशिक्षण कार्यशाळा तसेच मुख कर्करोगावरील जनजागृतीसाठी व्हिडिओ आणि पोस्टर बनवण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागाने मरिनड्राईव्हच्या परिसरात मुखकर्करोगाची आणि तंबाखूच्या हानिकारक परिणामांची जनजागृती करण्यासाठी एका वॉकथॉन कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच माहिती पत्रिकांचे वितरण केले. तसेच १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुखकर्करोगाची तपासणी व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबीरामध्ये एक हजार ७७९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये टॅक्सीचालकांचे समुपदेशन करुन तंबाखू सेवनाने होणाऱ्‍या आजारांबाबत माहिती देवून मुख शल्यचिकित्साशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमार्फत प्राप्त ध्वनीचित्रफित देखील शिबिरादरम्यान प्रदर्शित करुन जनजागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय मुखरोग शल्यचिकित्सक सप्ताहाचे आयोजन मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड(पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली मुख शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अभिलाषा यादव यांनी केले होते.

००००

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव दिलीप देशपांडे, अपर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी नितीन राणे, नितीन बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000

शिवजयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईचे उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल शिंदे व महेश सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ प्रशांत नारनवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा भवन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सहभागी झाले.

यावेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, पोवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती आदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

00000

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

मुंबई, दि. १९ :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले.

0000

राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले  नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.

येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे;  लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.  याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे.गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. शिंदे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करताना पर्यावरणाचे रक्षण केले. छत्रपती शिवरायांची आरमारी ताकत नौदलाकरीता प्रेरणादायी आहे. नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर कुपवाडा, आग्र्याला देखील दिवाण-ए- आम तसेच विविध देशातही शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करण्यात येत आहे. महाराजाची वाघनखे ब्रिटनहून भारतात आणण्यात आली असून ती बघण्यासाठी नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.असे ते म्हणाले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्याअर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यशासनाच्यावतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतलेला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करुया, शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल, असे श्री. पवार म्हणाले.

आमदार श्री. सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0
पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

0
मुंबई दि १६ – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

0
मुंबई, दि. १६:- 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा...

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...