सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 190

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना

मुंबई, दि. 23 : जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गे मुंबईला पाठविण्यात येत असून दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क करण्यात आला असून ते सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जम्मू व काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचेही राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.

००००

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत.

आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही.

मतदार यादी संदर्भात आयोगाने सांगितले की, 1950 च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार तयार केली जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि अंतिम यादी सर्व पक्षांना उपलब्ध यादी करून दिली जाते.

याशिवाय, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 90 अपीले करण्यात आली, जी एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदवलेली नाही.

मतदान प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 97,325 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सर्व पक्षांकडून 1,03,727 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते. यामध्ये काँग्रेसच्या 27,099 बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादी संदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून कायद्याचा अवमान करणारे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

24 डिसेंबर,2024 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसला लेखी उत्तर दिले असून, ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तरीही पुन्हा पुन्हा असे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

०००

संजय ओरक/विसंअ/

जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला; मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

मुंबई, दि. २३: पहेलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष मुंबई शहर

दूरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)

संपर्क क्रमांक : 8657106273

संपर्क क्रमांक : 7276446432

 

पर्यटकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

24×7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter, DC office, Srinagar for assistance of Tourists.

Contact details :

  1. A) 0194-2483651

0194-2457543

  1. B) WhatsApp Nos.

7780805144

7780938397

Courtesy :  District Administration Srinagar

०००

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. २३ : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संपर्क क्रमांक

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा, यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397

०००

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता-उपमुख्यमंत्री अजित पवार

  • पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था

मुंबई, दि. २३: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षीत परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारशी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशीदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठीही उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबियांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

०००

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर

ठाणे, दि.२२(जिमाका): जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७

अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भारत विकसित राष्ट्र होण्याच्या प्रक्रियेत ‘एकात्म मानवदर्शन’ चा आधार – तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी

Oplus_131072

मुंबई दि. 22 : एकेकाळी भारत विकसनशील देश म्हणून ओळखला जात होता, मात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे. या प्रगतीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञानाचा आधार असल्याचे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी केले. माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

राज्यपाल आर. एन. रवी म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञानात समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या तत्वानुसार राज्यकारभार सुरू आहे. अंत्योदय अर्थात शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली जात आहे. त्यामुळेच भारताचा विकसनशील देश ते विकसित राष्ट्र पर्यंत प्रवास झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतातील परिस्थिती बदलली असून तिथे शांतता निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. अंत्योदयाचा मार्ग अवलंबून त्यांनी ईशान्य भारतात पायाभूत सुविधा निर्माण करून खऱ्या अर्थाने भारताला जोडण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Oplus_131072

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सवाला सुरुवात झाली. रिजिजू यावेळी म्हणाले की, याच रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी साठ  वर्षापूर्वी ‘एकात्म मानव दर्शन’ तत्वज्ञान जनतेपुढे मांडले. या ऐतिहासिक वास्तूत पुन्हा पंडितजींच्या विचारांना आत्मसात करताना मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. पंडितजींचे विचार भारताला शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगात ओळख देत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रिजिजू यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाळ ‘एकात्म मानवदर्शन’ हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारात राष्ट्रप्रेमासह संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वागीण विकासाचे मर्म जपले गेले आहे. त्यांच्या विचारांचा खजिना जनतेसमोर उघडताना अत्यानंद होत आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ऐतिहासिक सोहळा आयोजित केल्याबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कौतुक केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तपस्येतून देशाला दिशा देणारे विचार मिळाले असून सर्वांनी त्याचा अंगिकार केला पाहिजे.

पंडितजींच्या एकात्म मानव दर्शनाच्या हीरक महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्याने विशेष टपाल कव्हर तयार केले असून राज्यपाल रवी यांच्या हस्ते यावेळी त्याचे प्रकाशन करण्यात आले.

एकात्म मानव दर्शन या हीरक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंडित दीनदयाळ उपाध्याय संशोधन संस्थेचे अध्यक्ष अतुल जैन, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के जैन, पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा पुढील तीन दिवस रुईया महाविद्यालयात सुरू राहणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, डॉ.कृष्ण गोपालजी, सुनीलजी अंबेकर, डॉ.मनमोहनजी वैद्य तसेच सुरेशजी सोनी आणि एल.संतोषजी यांचा या व्याख्यानमालेतील वक्त्यांमध्ये समावेश आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेचे प्रकाशन

मुंबईदि. २२ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिकप्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंहसामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकरसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुलडॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपलं मंत्रालय‘ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या कथाकवितास्वानुभव तसेच पाककलाभ्रमंती या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.

हा अंक  https://online.publuu.com/855586/1875618/page/10 व https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:e5191597-43f9-409c-b53e-36c54d8b58c7 या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

0000

अश्विनी पुजारी/ससं/

चंद्रपूर आणि कोल्हापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘स्वस्थ जन्म अभियान’ – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

RAJU DONGARE Govt Photographer

मुंबई, दि. २२ : महिलाचे प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात आरोग्य उत्तम राहावे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉईड संप्रेरकांचे कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष राहावे. गर्भधारणेपूर्वी या महत्त्वपूर्ण घटकांचे अनुकूलन व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रथम चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून ‘स्वस्थ जन्म अभियान’ मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली.

‘माझे आरोग्य, माझ्या हाती’ या अभियानांतर्गत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.मंगेश गुलवाडे, चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट्स सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) च्या डॉ.सुनीता तांदुलवाडकर तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे कोल्हापूर आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

RAJU DONGARE Govt Photographer

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, गर्भधारणेच्या वेळी प्रत्येक महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली पाहिजे. यासाठी गर्भवती महिलांच्या सदृढ आरोग्यासाठी फॉग्सी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘आयव्हीएचएम’ यांच्यासोबत प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि कोल्हापूरमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी. या समितीत शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून फॉग्सी आणि आयव्हीएमएमचे सदस्य घेण्यात येईल.

गर्भधारणेचा काळ फक्त नऊ महिन्यांचा प्रवास नसून गर्भधारणेपूर्वीचा कालावधी हा मातेचे आरोग्य अनुकूल करण्यासाठी आणि गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षमता निरोगी गर्भधारणा, सुरक्षित प्रसुतीसाठी महत्वपूर्ण ठरते. गर्भधारणेपूर्वी या महत्वपूर्ण घटकांचे अनुकूलन नसेल तर रक्तक्षय, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब, अकाली प्रसूती, जन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन आणि गर्भधारणेशी संबंधित इतर गंभीर समस्यांसह गुंतागुंत होण्याचा धोका संभवतो. यासाठी ‘स्वस्थ जन्म अभियान’ चंद्रपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल. या अभियानाच्या यशस्वीतेनंतर ते सर्व राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिंक ओपीडी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथे स्मार्ट पीएससी करण्यात येत आहे. राज्यातील जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सर्व रूग्णालयातील पदभरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 22 : राज्यातील पात्र शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा  लाभ  मिळावा यासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजना पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या समन्वयाने विविध शिष्यवृत्ती योजनांची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या सक्षमीकरणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक ऊईके, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत एन.एम.एम.एस. (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) योजना राबवली जाते. राज्यातील एन.एम.एम.एस.ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले, पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सारथीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा तसेच उत्पन्न मर्यादाही पुनर्रचित करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देशही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.

आदिवासी विकास मंत्री डॉ.ऊईके यांनी ‘सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेबाबत नमूद करत सर्व विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता असली पाहिजे व जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असे सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री सावे म्हणाले, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

आधुनिक कौशल्यांच्या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे – मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित...

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...