बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 183

माळशेज घाटात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर स्कायवॉक उभारण्यासाठी महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. २९ : – माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, माळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर या प्रमुख शहरांच्या जवळ आहे तसेच घाटाच्या जवळच शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड, विविध धबधबे, पिंपळगाव जोगा धरण इत्यादी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने एकत्रित प्रस्ताव सादर करावा. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

स्कायवॉक प्रकल्प उभारताना त्यातून इको सेन्सिटिव्ह भाग वगळावा तसेच या प्रकल्पामध्ये वन विभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

या बैठकीस आमदार किसन कथोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सार्वजनिक बांधकाम ( राष्ट्रीय महामार्ग) विभागाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार

पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई

बुलेट ट्रेनने २०२८ पर्यंत प्रवास शक्य

मुंबई, दि. 28 : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग आदींसह बंदर आणि विमानतळ विकासाच्या कामांचा समावेश आहे. या संपूर्ण विकासाच्या ‘इकोसिस्टीम’मुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॉटेल फोर सीजन येथे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडर समिट – 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सीएनबीसी टीव्ही 18 वृत्तवाहिनीच्या संपादक शिरीन भान यांनी घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरू आहे. या ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाची कामे सुरू आहेत. सागरी किनारा रस्ता, अटल सेतू, विविध मेट्रो मार्गांची कामे ही त्यातली ठळक उदाहरणे आहेत. या सर्व विकास कामांमुळे मुंबईत गुंतवणूक 50 बिलियन डॉलरपर्यंत जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणारे आहेत. यासोबतच पुणे येथील नवीन विमानतळ, शिर्डी, नागपूर विमानतळाच विकास, नदी जोड प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

सागरी किनारा रस्ता विरारपर्यंत वाढविण्यात येत आहे. वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टपेक्षा तीन पट मोठे आहे. या बंदराला प्रवेश नियंत्रित असलेल्या महामार्गाने नाशिकपर्यंत जोडण्यात येऊन पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. वाढवण बंदराजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच या परिसरात चौथ्या मुंबईचेही निर्माण करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी तसेच पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी धरण व मराठवाड्यात वळविण्यात येणार आहे. यावर राज्य शासन काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाडा निश्चितच दुष्काळमुक्त होणार आहे. ‘समृद्धी महामार्ग’ नंतर राज्यात नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ निर्माण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे नेहमी भविष्यासाठी ‘ रेडी ‘ असणारे राज्य आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणूकदारांना सोयी सुविधा मिळण्यासाठी व गतीने गुंतवणूक येण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ मध्ये राज्य मोठी झेप घेत आहे. 2029 मध्ये महाराष्ट्र ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ मध्ये पहिला असेल. गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी मैत्री पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून ‘सिंगल विंडो सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना सिंगल विंडो सिस्टीममुळे उद्योग स्थापन करण्यास सुलभता येत आहे.

दळणवळणाच्या सोयी सुविधांचा होणाऱ्या विकासामुळे राज्यात मालवाहतूक गतीने करण्यात येत आहे. नागपूरपर्यंत आठ तासांमध्ये जवाहरलाल नेहरू बंदरापासून जाता येते. वाढवण बंदरामुळे यामध्ये आणखी गतिमानता येणार आहे. नागपूर येथे कार्गो हब विकसित करण्यात आले आहे. यासोबतच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरही कार्गो हब विकसित करण्यात येत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विकासाचा आलेख मांडला.

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ तसेच ‘अटल सेतू’ यामुळे तिसरी मुंबई निर्माण होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या भागात नवीन एज्युसिटी निर्माण करण्यात येत आहे. जगभरातील विविध नामांकित विद्यापीठे या परिसरात शैक्षणिक दालन उघडणार आहेत. त्यासोबतच हेल्थ सिटी, इनोवेशनन सिटीचे निर्माणही करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे कृषी क्षेत्राचे 16000 मेगावॅटची वीज पूर्णपणे सौर उर्जेवर निर्माण करण्यात येणार आहे. सध्या या क्षेत्रात 21 टक्के राज्याची क्षमता असून 2030 पर्यंत ती 52 टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे 3000 रोहित्र सौर ऊर्जेवर आणण्यात आल्या आहे. सार्वजनिक वाहतूक आणि परिवहन सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मोठी मागणी राज्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये महाराष्ट्र हे देशाची राजधानी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

00000

नीलेश तायडे/विसंअ/

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015′ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून राज्यात हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त हा विशेष लेख

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा कायदा राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या कायद्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे. हा अधिनियम संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार पात्र असलेल्या व्यक्ती व  लोकसेवा देणारी सार्वजनिक प्राधिकरणे यांना लागू होतो. तसेच, या अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सर्व सेवांसाठी हा कायदा लागू आहे.

या कायद्याचा मुख्य उद्देश हा पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत लोकसेवा पुरवणे आहे. यासोबतच, लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे देखील या कायद्याचे उद्दिष्ट आहे. एखाद्या व्यक्तीची पात्रता संबंधित कायद्यातील तरतूदीनुसार ठरविली जाते. विशेष म्हणजे, या कायद्यानुसार सार्वजनिक सेवा मिळवण्यासाठी कोणताही पात्र व्यक्ती अर्ज करु शकते. परदेशात राहणारी एखादी व्यक्ती कोणत्याही अधिसूचित सेवेसाठी पात्र असेल, तर तीदेखील या कायद्यानुसार सेवा प्राप्त करू शकते.

गेल्या दहा वर्षात 18 कोटींपेक्षा अधिक अर्जदारांनी या अधिनियमानुसार अधिसूचित सेवा मिळविल्या आहेत. “आपले सरकार पोर्टल” यांसारख्या उपक्रमांनी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात सुलभता आणली आहे. सर्व विभागांच्या मिळून एक हजारपेक्षा जास्त सेवा अधिसूचित असून त्यापैकी त्यापैकी 583 सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. एकूण 1 कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी “आपले सरकार” पोर्टलवर नोंदणी केलेली आहे.

सेवेचा अधिकार म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या वेळेत लोकसेवा मिळवण्याचा हक्क. सार्वजनिक प्राधिकरणात शासनाचे विभाग, विविध सरकारी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या अशासकीय संस्था यांचा समावेश होतो. प्रत्येक सेवेसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या कायद्याची आणि नियमांची प्रत ‘आपले सरकार’ पोर्टल किंवा ‘आरटीएस महाराष्ट्र’ मोबाईल ॲपवरून विनामूल्य डाउनलोड करता येते.

सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका

या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्राधिकरणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अधिसूचित सेवा आणि त्यासंबंधीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे सार्वजनिक प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. यासाठी, राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात येते. सार्वजनिक प्राधिकरणाने पुरविलेल्या लोकसेवांची यादी, त्यासाठी लागणारा वेळ, विहित शुल्क, पदनिर्देशित अधिकारी आणि अपील प्राधिकाऱ्यांचे तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि त्यांच्या वेबसाइटवर किंवा पोर्टलवर दर्शविण्यात येतात. ही माहिती प्रदर्शित केली नाही, तर मुख्य आयुक्त किंवा संबंधित आयुक्त स्वतः दखल घेऊन कारवाई करू शकतात.

लोकसेवा मिळवण्यासाठी आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे कमी करण्यावर या कायद्यात भर देण्यात आला आहे.

अर्ज कुठे करावा?

लोकसेवा मिळवण्यासाठी अर्जदारास पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे, प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन किंवा ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरून ऑनलाईन अर्ज करता येतो. प्रत्येक विशिष्ट सेवेसाठी अर्ज करण्याचा नमुना वेगळा असतो. अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयात, ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मध्ये आणि संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते.

ऑनलाईन अर्ज सुविधा:

‘आपले सरकार सेवा पोर्टल’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) हे विविध विभागांच्या लोकसेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक सामान्य व्यासपीठ आहे. जे नागरिक स्वतःहून अर्ज करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी राज्यभरात 32000 हून अधिक ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ (ASSK) कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, ‘आरटीएस महाराष्ट्र’ नावाचे मोबाईल ॲपदेखील वापरकर्त्यांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. प्रत्येक ऑनलाईन अर्जाला एक विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर – UIN) मिळतो, ज्यामुळे अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होते.

जर एखाद्या पात्र व्यक्तीला विहित वेळेत सेवा मिळाली नाही किंवा तिचा अर्ज फेटाळला गेला, तर ती व्यक्ती प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील करू शकते. प्रथम अपील अर्ज सेवा नाकारल्याच्या किंवा विहित कालमर्यादा संपल्याच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत दाखल करता येतो. मात्र, जर अर्जदाराकडे वेळेत अपील न करण्याचे योग्य कारण असेल, तर प्रथम अपील प्राधिकरण विलंब माफ करून 90 दिवसांत अपील स्वीकारू शकते. अपील सुनावणीची नोटीस अर्जदाराला प्रत्यक्ष, नोंदणीकृत पोस्टाने, ईमेलद्वारे, एसएमएसद्वारे किंवा मोबाईल ॲपद्वारे दिली जाते.

आपले सरकार सेवा केंद्रांबाबत माहिती

‘आपले सरकार सेवा केंद्रे’ ही नागरिकांना सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठी मदत करतात. ही केंद्रे तहसील, ग्रामपंचायती, नगरपालिका, आणि काही खाजगी ठिकाणीही उपलब्ध आहेत. ही केंद्रे आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व विभागांच्या सेवा पुरवतात.

लोकसेवेत कसूर झाल्यास कारवाई

या अधिनियमात लोकसेवा पुरविण्यात किंवा अपिलांवर निर्णय घेण्यात अधिकाऱ्यांकडून कसूर झाल्यास दंडात्मक कारवाईची स्पष्ट तरतूद आहे.

पदनिर्देशित अधिकाऱ्यावरील दंड

जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने विहित  वेळेत योग्य कारणाशिवाय लोकसेवा दिली नाही, तर त्याच्यावर कमीतकमी ₹ 500 ते कमाल ₹ 5,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. प्रथम अपील प्राधिकारी सुनावणीनंतर हा दंड लावू शकतात.

वारंवार लोकसेवा देण्यात दिरंगाई झाल्यास किंवा अपील प्राधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन न केल्यास, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणणारा एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून या कायद्याचा योग्य वापर केल्यास त्यांना वेळेत आणि पारदर्शकपणे लोकसेवा मिळू शकेल.

०००

  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई

 

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच इतर वैद्यकीय सेवा सुविधांमध्ये आपला देश आघाडीवर असून आपल्या देशात वैद्यकीय पर्यटनाच्या माध्यमातून नवे क्षेत्र खुले झाले आहे,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान,अंतर्गत आर. के. दमानी मेडिकल कॉलेज, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयाच्या कौशलम् – द स्किल लॅबचे उद्घाटन केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, उद्योजक कृषी कुमार बागला, उमेश दाशरथी, डॉ. विदेश केसरी, डॉ. सतीश कुलकर्णी, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती शिरेडकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या सेवेचा वारसा या रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. आणि ही संस्था आरोग्य सेवेसाठी समर्पित आहे. आरोग्य सेवेचे शाश्वत उद्दिष्ट समोर ठेवून मिशन मोडवर या रुग्णालयाने समाजाची गोरगरीब रुग्णांची सेवा केली आहे. या सेवेचे विस्तारित स्वरूप आर के दमानिया रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जाईल. बदलत्या आरोग्य सेवेतील तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हावा. यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालयातील प्रत्येक डॉक्टर आणि सेवा च्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य क्षेत्रामधील भारताची प्रगती ही इतर देशांना मार्गदर्शक आहे. लोकसंख्या व भौगोलिक विविधता असूनही आरोग्य व्यवस्था सक्षम आणि अग्रेसर असल्याचे, प्रतिपादन मंत्री नड्डा यांनी केले. जागतिक पातळीवर जास्तीत जास्त डॉक्टर विविध विषयातील तज्ज्ञ निर्माण करण्याची संधी भारताने निर्माण केली असून या देशातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर परदेशातही आपले विशेष स्थान निर्माण करून आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा ही एक संधी समजून समाजसेवा करण्याचे ध्येय ठरवावे, असे आवाहनही केंद्रीय मंत्री नड्डा यांनी विद्यार्थ्यांना केले.

०००

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, प्रवीण पोटे, ॲड. दिलीप एडतकर आदी उपस्थित होते.

सभापती शिंदे म्हणाले, सभापतीपदाने जनतेची कामे करण्यासाठी जबाबदारी दिली आहे. हा विश्वास आणखी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आहे. येत्या काळात सकारात्मकपणे कामे करण्यात येतील. प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त विविध कामे हाती घेण्यात येतील. अहिल्यादेवींनी केलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि धर्म जागविण्याचे कार्य ही यामागील संकल्पना आहे. अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वर, केदारनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि असंख्य धर्मशाळा, अन्नछत्र आणि घाट बांधले आहे. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून अहिल्यानगर नामकरण आणि सोलापूर विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. धनगर समाजाच्या असलेल्या न्याय्य मागण्यासाठी कायम पाठिंबा राहील. तसेच दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी सभापती शिंदे यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी विविध विकास कार्य करण्यात येतील. विधिमंडळातही सदस्य आणि शासनाचा समन्वय साधून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना ते पूर्ण झाल्याशिवाय सभागृह सोडत नाहीत. समाजात कार्य करत असताना आई-वडील, माती आणि समाजाचे ऋण चुकविणे गरजेचे आहे. हाच वसा जपत सभापती शिंदे कार्य करीत आहे. तसेच समाजातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळात कायदा होणे गरजेचे आहे. यासाठी सभापती शिंदे यांची सभापती म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.

एडतकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

०००

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल सह्याद्री अतिथीगृह येथे महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री तथा महामंडळाचे सहअध्यक्ष डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

प्रारंभी महामंडळातर्फे सहसचिव विवेक दहिफळे यांनी सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अल्प व मध्य उत्पन्न घटक यांच्यासाठी शासकीय जमिनीवर किंवा खासगी जमीन मालकासोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांचे घर निर्माण प्रकल्प महामंडळामार्फत राबविण्यात येतात. या महामंडळासाठी 600 कोटी रुपये भाग भांडवल मिळाले आहे. महाहौसिंगमार्फत आतापर्यंत बारामती येथील आंबेडकर वसाहत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि सोलापूर, नागपूर या भागात सात गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. यातून 21 हजार 35 सदनिका उपलब्ध होणार आहेत. यासाठी केंद्राकडून अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून 108 कोटी 59 लाख रुपये मिळाले असून 68 कोटी 54 लाख रुपये राज्य शासनाचा हप्ताही प्राप्त झाला आहे. याशिवाय टिटवाळा, खंडाळा या ठिकाणी दोन नियोजित प्रकल्प देखील आहेत. बांधण्यात आलेल्या घरांची विक्री बुक माय होम्स मार्फत केली जाते. साधारणपणे 15 लाखापर्यंत एका सदनिकेची विक्री किंमत येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना सुलभ गृह कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांना सध्या काही आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्पांमध्ये डीपी रस्त्याचे काम करणे, सांडपाणी व पावसाळी पाणी निचरा करणे, वीज पुरवठा करणे, पाणीपुरवठा करणे या बाबींसाठी महाहौसिंगच्या स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये तातडीने विविध महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे महावितरण व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येऊन या अडचणी सोडवण्यात येतील असे सांगितले. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे. महाहौसिंगसारख्या महामंडळाने आपल्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात गृहनिर्माण करणे आवश्यक आहे. महामंडळाला या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही त्याचप्रमाणे घरांची विक्री करण्यासंदर्भात म्हाडामार्फत योग्य ती संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल उपस्थित होते.

०००

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, सिडकोचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, दिलीप वेंगसरकर यांच्या सारख्या जाणकार क्रिकेटपटूंकडून प्रशिक्षण घेऊन या अकादमीतून उत्तम खेळाडू घडतील.

पनवेलचे खेळाडू भारतीय संघात दिसतील – पद्मश्री वेंगसरकर

यावेळी पद्मश्री दिलीप वेंगसरकर म्हणाले, पनवेल कार्यक्षेत्रात क्रिकेट खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येते. या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे त्यांना मोठे व्यासपीठ मिळेल आणि इथले खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघातून खेळताना दिसतील.

आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले की, हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साडेसात एकर क्षेत्रावर साकारले असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाले आहेत. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत आणि इतर आवश्यक सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित रायगड जिल्ह्यासाठी २५ टक्के आणि जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

०००

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

मुंबई, दि. २७: सामान्य प्रशासन विभाग (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिना’ निमित्त राज्यस्तरीय सोहळा उद्या सोमवार २८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १ वा. होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार व  मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे.

०००

औद्योगिक विकासाला चालना; सुसज्ज कन्व्हेंशन  सेंटर उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (विमाका) : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रीयल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र उभारताना व्यवहार्य तूट भरुन काढण्यासाठी शासन निधी देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

एमआयटी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर तर्फे आयोजित ‘उद्योग पुरस्कार 2025’ च्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विशेष आमंत्रित पाहुणे एन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन, सीएमआयचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वेशराज नंदावत, सीएमआयचे माजी अध्यक्ष राम भोगले आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर मॅन्युफॅक्चरींग मॅग्नेट

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचे पुढचे मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर -जालना आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले इंडस्ट्रीयल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर (औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र) उभारण्यात येईल. हे केंद्र चालविण्यासाठी अनुभवी संस्थेस दिले जाईल. त्यातील व्यवहार्य तूट शासन निधी देऊन भरुन काढेल. केंद्र सरकारच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीतील उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. तसेच, चाळीसगाव – संभाजीनगर रेल्वे बोगद्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार असून, भूसंपादनाची कार्यवाही केली जाईल.

जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही विविध प्रकल्प आणले जात आहेत. त्यात प्रामुख्याने  देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे. काही परवानग्या मिळाल्या असून, उर्वरित परवानग्या मिळाल्यानंतर काम सुरू होईल. दिल्ली-मुंबई (डीएमआयसी) कॉरीडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे तयार करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून देशातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीही छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात आली आहे. आता या कॅरिडॉरमध्ये आता जागा शिल्लक नसून आता आणखी ८ हजार एकर जमीनीचे संपादन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण देशात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन)  उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे. येथील ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाणार आहे.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, नागपूरहून गोव्यापर्यंत असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

अनुराग जैन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात औद्योगिक विकासाला गती मिळाली. शेंद्रा-बिडकीन वसाहत, विमानतळ विस्तार, जालना ड्रायपोर्ट आणि समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांनी जागतिक उद्योग व नवउद्योजकांना आकर्षित केले. त्यामुळे रोजगार व आर्थिक विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग आणि पर्यटन वाढीस मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्पित सावे यांनी, मराठवाडा विभागातील औद्योगिक वाढीच्या गुंतवणूक संधी व दिशा” याविषयावर सादरीकरण केले. छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या सोयी- सुविधांबाबत राम भोगले यांनी मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षा व्यक्त केल्या.

याप्रसंगी मराठवाडा प्रदेशातील आर्थिक विकास, नवोपक्रम आणि उद्योजकतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ग्राहक अभिमुखता, अभिनव उत्पादन, उद्योग ४.०, पर्यावरण जागरूकता, एचआर चॅम्पियन, उद्योजक (वैयक्तिक) आणि जागतिक लघु व मध्यम उद्योग या श्रेणींमध्ये, उद्योगाच्या आकारानुसार सूक्ष्म, लहान, मध्यम आणि मोठे उद्योग  विभागांमध्ये  विविध  उद्योजकांना तर ग्लोबल एसएमई पुरस्कार प्रॅक्टीक प्रा. लि. यांना देण्यात आला.

०००

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (विमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. दरम्यान देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार सांदिपान भुमरे, आमदार सतिश चव्हाण, आमदार संजय केणेकर, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,  राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ.कैलास शर्मा, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीमसारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. ट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे. मात्र, आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाडा तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळावे, यासाठी २०१६ मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करून आज अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगावरील संपूर्ण उपचार रुग्णांना मिळावेत, यासाठी पेट सिटी स्कॅनरलाही मंजूरी देण्यात आली आहे. हे उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी आणखी चांगली सुविधा मिळू शकेल. कर्करोग बरा होण्यासाठी लवकर निदान महत्त्वाचे असते, मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यासोबतच कर्करोग होवूच नये, यासाठीही जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये जवळपास दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतरीत झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर 90 टक्के रुग्णांवर 30 दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.

2019 मध्ये ज्या जागेवर मी भूमिपूजन केले त्याच जागेवर आज भव्य आणि अद्ययावत रुग्णालय उभे राहिले व माझ्या हस्ते उद्घाटन झाले याचा विशेष आनंद असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आरोग्य सुविधेबाबत केंद्र सरकार सर्वंकष धोरण राबवित असून यामध्ये लवकर निदान, उपचार यासोबतच प्रतिबंध या तीन सूत्रांवर काम सुरू आहे. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात 200 डे केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. तसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन 100 नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत अशी माहितीही केंद्रीय मंत्री नड्डा यांनी दिली.

टु बीम व्यवस्थेमुळे अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाचे संपूर्ण घर त्याच्या धसक्याने खचून जाते. अशा सर्वाना यातून खंबीर आधार देता येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत  केले जात आहेत. 780 वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. उपचारासाठी यंत्रणा उभारताना प्रतिबंधावर शासनाचा अधिक भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात 1 लाख 75 हजार आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापन केले आहेत. या सुविधेतून कर्करोगाचे निदान करण्यासाठी स्क्रिनिंग करण्यात येते. स्क्रिनिंगची क्षमता वाढविण्यात आली असून कर्करोगाचे वेळेत निदान होणे शक्य झाले आहे. यातून तोंडाचा कर्करोग, महिलांचा स्तनाचा कर्करोग याचे वेळेत निदान झाल्याने वेळेत उपचाराही सुरू झाले आहेत. देशातील आरोग्य व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येत आहेत. येत्या काळात देशातील आरोग्य व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी भरीव निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

15 व्या वित्त आयोगात 7 हजार कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी करण्यात आल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून देशातील 60 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील विमा योजनेला राज्याने जोड दिली असून आतापर्यंत 10 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यात आणखी एकाची भर घालण्यात येत असून अतिरिक्त 700 वैद्यकीय जागा महाविद्यालयात देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी वरदान – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्य कर्करोग संस्थेच्या इतिहासात आजचा हा दिवस महत्त्वाचा आहे. कर्करोग रुग्णांसाठी 2012 मध्ये 100 बेडवर सुरू झालेला कर्करोग रुग्णालयाचा 300 बेडपर्यंत विस्तार झाला आहे. राज्यात जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या मदतीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. कर्करोग रुग्णालयात लवकरच पेट स्कॅन सुविधा देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी या सुविधा निश्चितपणे वरदान ठरतील. या संस्थेला एम्सचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी केली.

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात दररोज तीन ते चार हजार रुग्ण येतात. त्यांना दर्जेदार सेवा देणे शासनाचे कर्तव्य आहे. येत्या दोन वर्षात जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व उपचार सुविधा देण्यात येणार आहेत. जेणेकरुन खाजगी रुग्णालयात रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही. अशी व्यवस्था उभारण्यासाठी राज्य शासनाकडून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ. कैलास शर्मा यांनी कर्करोग व उपचार व्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी भारतीय बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय प्रयोगशाळेबाबतचे विधेयक संमत केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

विधानसभा इतर कामकाज

0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देणार -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
मुंबई, दि. १२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबियांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट...

कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0
मुंबई, दि. १५ : कोकणातील वीज पुरवठा अधिक सक्षम, नियमित व तक्रारमुक्त होण्यासाठी कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा, अशा...

नागपूर, अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा मंत्री गिरीश महाजन व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

0
मुंबई दि. १५ : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा कामांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेऊन सिंचन...

राज्य क्रीडा विकास निधीसाठी  १४ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर –मंत्री दत्तात्रय भरणे

0
मुंबई, दि. १५ : राज्यातील गुणवंत, गरजू आणि प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने ‘राज्य क्रीडा विकास निधी’ अंतर्गत...