गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 184

वर्धेकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे साहित्य संमेलन

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा “मराठी भाषेचा जागर’ केवळ महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. या निमित्ताने वर्धा येथे झालेल्या ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा धांडोळा घेणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी २०२३ ला विदर्भ साहित्य संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या शताब्दी वर्षाची सांगता म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान वर्धा नगरीला दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. यापूर्वी १९६९ साली वर्धा येथे ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. कविश्रेष्ठ पुरुषोत्तम शिवराम रेगे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ५३ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला.

वर्धा शहराचे नाव ज्या लोकमातेवरून पडले त्या लोकमातेचे म्हणजे नदीचे नाव वर्धा आहे. तिचे मूळ प्राचीन नाव ‘वरदा’ असे आहे. वरदा म्हणजे वर देणारी. विदर्भाच्या संपन्न प्रदेशाला उत्तर-दक्षिण विभागून आसपासचा प्रदेश सुजलाम् सुफलाम् करणारी वर्धा नदी, हिच्या पाण्यात सेवाभावाचा गुण आहे. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी या नगरीला आपली कर्मभूमी मानले. केवळ या दोन विभूतीच नव्हे तर जमनालालजी बजाज, बाबा आमटे, सिधुताई सपकाळ, क्रांतिवीर पांडुरंग सदाशिव खानखोजे, बापूरावजी देशमुख, वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर अशी अनेक महान रत्ने याच मातीत निर्माण झाली.

वर्धा हे जसे समाजसेवकांचे प्रेरणास्थान आहे, तसेच कलावंतांचेही प्रेरणास्थान आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त ही वर्धा शहराचीच देणगी आहे. पांढरे सोने म्हणून ज्याला गौरविले जाते त्या कापसाची शेती हे वर्ध्याचे भूषण आहे. वर उल्लेखित केलेल्या महनीयांशिवाय अनेक कलावंत, साहित्यिक, राजकारणी, समाजसेवी, शिक्षणप्रेमी आणि अन्योन्न मंडळींनी तसेच संस्थांनी वर्धा शहराच्या आणि परिणामी महाराष्ट्राच्या कीर्तीत भर घातली आहे.

वर्धा ही महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासोबतच साहित्यिक, कलावंत व पत्रकारांची भूमी आहे. त्यामुळेच वर्धा येथे पार पडलेले ९६ वे साहित्य संमेलन विशेष महत्वाचे आहे. या संमेलनाच्या साहित्यप्रेमींच्या खूप आठवणी आहेत.

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, विदर्भातील बोली भाषा, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता, समाज माध्यमातील अभिव्यक्ती: एक उलट तपासणी, वैदर्भीय वाङ्मयीन परंपरा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून व वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयावरील परिसंवादामधून साहित्याची विविधांगी चर्चा घडवून आणली.

कथाकथन, संमेलनाध्यक्षांची भाषणे आणि त्यावर चर्चा, मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा, एकांक गावकथा, निमंत्रितांचे कविसंमेलन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद व स्त्री-पुरुष तुलना अशा वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रमाची मेजवानी ही या संमेलनाची खास वैशिष्ट्य होती.

यानिमित्ताने ‘वरदा’ अत्यंत सुरेख व माहितीपूर्ण स्मरणिका आयोजकांनी केली आहे. ही स्मरणिका साहित्यिक ठेवाच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी मध्ये लेखक, साहित्यिक, कलावंत, प्रसिद्ध व नामांकित साहित्यिकांना भेटण्याचा व अनुभवण्याचा योग वर्धेकरांना दीर्घकाळ स्मरणात राहील असाच आहे.

 

रवी गिते

जिल्हा माहिती अधिकारी

वर्धा

दिल्ली येथील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

मराठी भाषेचा इतिहास – मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी भाषेला २४०० वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. इ.स.१११० मध्ये मुकुंदराजांनी ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी ‘लीळाचरित्र’ लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.

संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि ‘एकनाथी भागवत’, ‘भावार्थ रामायण’ आदि ग्रंथांची भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत भाषेचे पद दिले. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. प्रदिर्घकाळ केंद्रशासनात प्रलंबीत राहिलेला मराठी भाषेच्या अस्मितेचा निशान असलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिर झाला.

दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलन – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले. ७१ वर्षापूर्वी नवी दिल्ली येथे १९५४ साली ऑक्टोंबर महिन्यात ३७ वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. त्त्यानंतर आता जवळजवळ ७० वर्षांनी यंदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

यंदाच्या ९८ व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

या संमेलनात वाचन मुलाखत परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २१ फेब्रुवारीला उद्घाटनानंतर सायंकाळी ६.३० वाजता दुसरे सत्र सुरु होईल. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. या दिंडीत साहित्यिक साहित्यप्रेमी ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

गोवर्धन बिसेन, गोंदिया

कवी, लेखक व समीक्षक

अभिजात मराठी भाषा..जतन आणि संवर्धन

मराठी भाषेबाबत महाराष्ट्रात माता व बालक यांच्या मधील संवादाची जी बोलीभाषा असते तिलाच मराठी मातृभाषा संबोधले जाते. मराठी माणूस जेथे वस्ती करीत राहिले तेथे संवाद साधताना रोजच्या वापरात, व्यवहारात रूढ असलेली मराठी भाषा मातृभाषा प्रचलित झाली. अन त्याच भाषेत शालेय विद्यार्थी शिक्षण घेत, अभ्यास करीत, मराठी भाषेला समृद्ध करू लागले. प्रत्येक तालुका, जिल्हाच्या गावागावातून बोलीभाषा ऐकायला वेगळी वाटली, तरी बोललेली समजते, कळत असते. या भाषेत शब्दकोष भांडार विपुल आहे, हे मराठी वाड•मयाचा अभ्यास करताना आढळून येते. मराठी संत साहित्य याचा अभ्यास करताना भाषा विविध अलंकाराने नटलेली वाक्प्रचार, म्हणी यांच्या सौंदर्याने सजलेली समृद्ध अन आकर्षक अशी जाणवते.

अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी सकल जणांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शब्दांचे मतितार्थ अन् भाव, आशय समजून उच्चार करताना शब्द उच्चारले पाहिजे. व्याकरणाचा अभ्यास करून त्यातील बोलीतून येणारा भेसळपणा दूर केला पाहिजे. जनमानसात ती टिकून राहण्यासाठी चर्चा सत्रे, निबंध अन काव्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, शिबिरे, इत्यादी आयोजित करावयास पाहिजे, नुसतेच मराठी भाषा दिन साजरे करीत, पुढे गप्प राहून उपयुक्त नाही. अगदी शिशु वर्ग, पूर्व प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाविष्ट करून अभिजात मराठी भाषेचा प्रचार अन् प्रसार करायला पाहिजे. बक्षिसे, शिष्यवृत्ती अन् पुरस्कार, पारितोषिके आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. दानशूर प्रायोजक यांना सहभागी करून निरंतर कार्यक्रम राबविले पाहिजे. शासन दरबारी भाषेचे महत्व अधोरेखित करीत तिचा वापर व्यवहारात वाढविणे गरजेचे आहे.

राज्यातील इंग्रजी भाषा माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयांमधून मराठी भाषेला डावलून हद्दपार करू नये, म्हणून सर्वांनीच जागरूक राहायला पाहिजे. शासनाच्या सर्वच विभागातून अन् मंत्रालयीन कामकाज, तसेच न्यायालयीन स्तरावरील कामकाज काटेकोरपणे मराठी भाषेतून होते किंवा कसे हे दक्ष राहून पाहायला हवे. सर्वच स्तरावर भाषा विकासाचे, समृद्धीचे शर्थीचे प्रयत्न करताना आताच्या तरुण पिढीतील युवक-युवतींना मराठी ग्रंथालये, आध्यात्मिक साहित्य, संत साहित्य वाड•मय व इतर अवांतर वाचनाकडे वळविले पाहिजे तरच अभिजात मराठी भाषेला उत्कर्षांचे दिवस मिळाल्याचे आपणा सर्वांना पाहावयास मिळेल, असे जाणवते.

आपली अभिजात मराठी भाषा ही स्वतःच्या भाषिक सौंदर्यावर ठाम उभी आहे, तिला इतर कोणत्या भाषिकांनी नव्हे तर सुशिक्षित अन सुसंस्कृत मराठी माणसांनीच भक्कम आधार देणे गरजेचे आहे. स्वतंत्र लिपी, स्वर, व्यंजन, वर्ण, व्याकरणाच्या नियमांनी ती बद्ध आहे. विविध विषयावर साहित्य संपदा विपुल असून आपल्या महाराष्ट्र मधील लोकांची लोकभाषा आहे. प्राचीन काळातील शिलालेख यावर ही मराठी कोरीव अक्षरे, उत्खननाच्या वेळेस इतिहासकार तज्ञांना संशोधनात त्याबाबतचे पुरावे मिळालेले आहेत.

मराठी माणसांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या अपत्यांना, पाल्यांना वाचन संस्कृती चे महत्व विषद करून भाषेचे संस्कार रुजविले पाहिजे. ही सुरुवात प्रत्येक घराघरातून व्हायला हवी. त्यांची भाषेबाबतची गोडी वाढवायला हवी. जितकी मराठी अस्मिता आपण त्यांच्यामध्ये जागृत ठेवू, तितका अभिजात मराठी भाषेचा स्तर व अभिमान वाढतच राहील. उच्च अभिरुची अन् उच्च दर्जा असणारी अभिजात मराठी भाषा ही प्रत्येकास स्वतःच्या आईइतकीच प्राणप्रिय असायला हवी. मराठी भाषेच्या समृद्धीची आणि विकासाची जबाबदारी आपल्या सर्व मराठी समाज बांधवांची आहे, एवढेच नव्हे तर ते प्राधान्याने आद्य कर्तव्य समजून जाणीवपूर्वक सजगतेने आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या या अभिजात मराठी भाषेला वैभवाचे दिवस येण्यासाठी सतर्क अन् जागरूकच राहायला पाहिजे, असे मला अभ्यासू प्रवृत्ती, वाचनाअंती मनापासून कळकळीने जाणवते !!!

मराठी भाषेमध्ये प्रभावी लेखन आपल्या पूर्वसूरींनी अजरामर करून साहित्यात पूर्वापार त्यात पिढीगणिक लेखकांनी भर घालून वाचकांसाठी अमोल नजराणाच ठेवलेला आहे, अन् प्रत्येक मराठी ग्रंथालये यामध्ये विपुल ग्रंथसंपदा आजवर तेथील व्यवस्थापक यांनी अमूल्य ठेवा आपला सर्व प्रयत्नांनी जतन करून ठेवलेला आहे, वाचकप्रिय वाचकांसाठी कायम उपलब्ध करून दिला आहे. तिथे स्वतः जाऊन वाचकांनी वाचण्याचा आस्वाद घ्यायला हवा, अन् आपल्या पाल्यांना तेथे त्यांच्यासोबत जाऊन भेटी द्यायला पाहिजे. त्यांनाही त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन गोडी लागेल अन ज्ञान समृद्ध होतील, अशी आशा जाणवते.

निरनिराळी विषयांवरील पुस्तकांच्या वाचनाने बुद्धीची भूक शमवली जाते अन् व्यक्ती सकारात्मकतेने विचार करण्यास प्रवृत्त होतो. विचारांना आखीव रेखीव दिशा मिळून खंबीरता प्राप्त होते. अन् निर्णयक्षम होऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होतो. यासाठीच पालकांनी न कंटाळता अपत्यांकडून पुस्तकाचे वाचन करून घेतले पाहिजे. पुस्तकाने मानवाचे मस्तक हे सशक्त होत असते. सशक्त झालेले मस्तक कधीच कुणाचे हस्तक होत नसते. अन् हस्तक न झालेले मस्तक कुणापुढे नतमस्तकही होत नसते. लोक स्वतःहून वाचन संस्कृती जपत वाचनालयाकडे वळतील, तेथील पुस्तके वाचतील तरच स्वबुद्धीच्या बळावर स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. देशाचे भवितव्य, नाव उज्ज्वल तर होईलच, प्रगतीही कोणी रोखू शकणार नाही. यासाठी तरी भाषेचे संस्कार मनस्वी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या मनावर रुजविले पाहिजे, असे मला अनुभवांती सांगावेसे वाटते.

लेखन:-

सौ.मीना घोडविंदे (वनगे),

साहित्यिका, ठाणे

(8451997915)

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना करणार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

मुंबईदि. 20 : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चेअरची (अध्यासन) स्थापना केली जाणार असून या अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली.

मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रलोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकेंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादवमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरेकुलसचिव डॉ. प्रसाद कारंडेप्रा. मनिषा करणेअनिल कुमार पाटीलप्रभात कुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. वीरेंद्र कुमार म्हणालेसंविधान अमृत महोत्सव हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संविधान  जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षणसर्वाना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत आरक्षण अशा तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिकआर्थिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरदोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहीर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे आभार मानले. विद्यापीठामार्फत लवकरच या अनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी आपल्या उदबोधनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

अभिजात मराठी भाषा संवर्धनासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न व्हावेत – ९८ व्या अ.भा.म.सा.सं.अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर

नवी दिल्ली येथे दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असून सांगलीच्या प्रा. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असल्याने सांगलीकरांना याचा वेगळाच आनंद आहे. यानिमित्त त्यांची घेतलेली मुलाखत—-

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे हे संमेलन होणार आहे. प्रा. डॉ. तारा भवाळकर हे नाव मराठी साहित्य लोक साहित्य आणि रंगभूमीच्या अभ्यासात प्रसिद्ध आहे. ताराबाई सुरुवातीपासून शिक्षिका आहेत तशाच लोकशिक्षिका म्हणूनसुद्धा त्यांची ख्याती आहे. त्यांच्या व्याख्यानात नेहमीच प्रबोधनाची दिशा आणि नवी माहिती असते. या निमित्त डॉ. भवाळकर यांच्याशी साधलेला संवाद…

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपण अध्यक्ष आहात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना मराठी साहित्य व मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटते?

साहित्यिकदृष्ट्या ग्रामीण भागातील सामान्य माणूस जागा होत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नवीन माणसं लिहायला  लागली आहेत. ज्यांच्या घरात पूर्वी लेखन, वाचन नव्हते, अशी मुलं, मुली लिहायला लागली आहेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते सर्वजण अभिव्यक्त होताना दिसतात. व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून लेखक, कवी अभिव्यक्त होत असतात. त्यांची साहित्य संमेलने छोट्या स्वरूपात का होईना, पण होत असतात. वेळेच्या मर्यादेमुळे राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात साहित्यिकांना कमी वाव मिळणे स्वाभाविक आहे. अशा वेळी माझ्या सांगलीसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये वर्षाला दहा ते पंधरा संमेलने होतात. त्यामुळे मराठी साहित्याचा मंच अनेक लोकांना उपलब्ध होत आहे आणि स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. लिहिणाऱ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळत असते आणि त्यातूनच लेखक पुढे येत असतात. लोकल टू ग्लोबल म्हणजेच स्थानिक ते जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठीच्या प्रवासाची ही सुरवात आहे, असे माझे निरीक्षण आहे.

 अभिजीत भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला नवीन ऊर्जा मिळाली का?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून शासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक मराठी व्यक्ती म्हणून समाधान वाटले. केवळ सरकारी शिक्कामोर्तब झाले म्हणून भाषेचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यातून आर्थिक फायदे मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून मराठी भाषक, संस्था, विद्यापीठ, नवलेखक आणि संशोधकांना आर्थिक सहाय्य होऊ शकेल. त्यातून प्रकाशन संस्था निघू शकतील आणि त्या निघाव्यात, त्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत. केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही तर तो वाढवणं आणि टिकवणं हे मराठी भाषकांच्या हातात आहे. एकीकडे मराठी भाषेचा अभिमान बाळगत असतानाच त्या अभिमानाच्या अंमलबजावणीसाठी मराठी भाषक, मराठी माणसे काय करतात, याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी लोकांना तिच्याबद्दल आपुलकी असणे गरजेचे आहे. मराठी भाषक आणि मराठी लोकांनी त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा आता ज्ञानभाषा कशी करता येईल?

यासाठी सर्व समाजानेच प्रयत्न करायला हवेत. शिक्षण संस्थांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे मराठी बोलणाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मराठीचा अभिमान बाळगायला हवा. मनातील स्वभाषेविषयीच्या न्यूनगंडातून सर्वप्रथम बाहेर यायला पाहिजे. त्यानंतरच ती ज्ञानभाषा करण्यासाठी प्रयत्न होतील. ज्ञान याचा अर्थ नव्याने एखाद्या गोष्टीचे भान येणे आणि ते आपल्या भाषेतून व्यक्त करणे. हिंदी किंवा इंग्रजीमधून सांगितले की जगाच्या पाठीवर ते पसरेल, असा समज आहे. ज्ञान तुमच्याजवळ असेल तर ते घेण्यासाठी तुमची भाषा आपणहून शिकण्यासाठी इतर ठिकाणहून लोक यायला पाहिजेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनी सारख्या अन्य देशांची उदाहरणे पाहता त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञान, यंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या भाषेतच उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आधी त्यांची भाषा अवगत करणे अपरिहार्य असते. त्याचप्रमाणे मराठीमध्येही तसे ज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र असेल तर मराठी भाषा अन्य लोक स्वतःहून शिकतील. त्या दर्जाचे संशोधन, लेखन करणारी मराठीतील शहाणी आणि आत्माभिमानी माणसं निर्माण व्हायला पाहिजेत.

भाषा आणि लिपी यांच्यातील अनुबंधाकडे आपण कसे पाहता?

भाषा आणि लिपी यांच्यात अनुबंध आहे, तो शिक्षितांनाही माहिती नसतो. मी तंजावरला व्यंकोजीराजे भोसलेराजे यांनी केलेल्या कार्याचा आणि साहित्य संग्रहाचा अभ्यास केला. त्याठिकाणी अनेक नाटकांची हस्तलिखिते सापडली आहेत. त्यातील गंमत अशी की त्या नाटकांची भाषा मराठी पण लिपी तमिळ, तेलगु किंवा कन्नड आहे. भाषा कन्नड पण लिपी देवनागरी आहे. गुजराती लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या माझ्या परिचयातील एका व्यक्तिने गुजराती भाषेत पुस्तक लिहिले आहे, पण ते देवनागरी लिपीत छापले. त्याचा परिणाम असा झाला ज्यांना गुजराती येत नाही, पण देवनागरी येते त्यांनी ते वाचले तर त्यांना त्यातील 70 ते 80 टक्के आशय सहज समजतो. गोव्यामध्ये कोकणी तसेच मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिणारे, वाचणारे, काम करणारे आहेत. त्यातील एक लेखिका कोकणी भाषेत लिहिते, मात्र ती लेखनासाठी देवनागरी लिपी वापरते. त्यामुळे तिने लिहिलेलं साहित्य आपल्याला 80 ते 90 टक्के समजते. त्या भाषांमध्ये उच्चारांचा थोडासा फरक वगळला तर बऱ्याच गोष्टी समान असतात आणि लिपीमुळे आपल्याला त्या उलघडतात.

भाषा किंवा कोणत्याही भाषेतील साहित्याच्या वाढीला राज्यांच्या सीमांची बंधने आहेत, असे वाटते का?

माझ्या मते कोणत्याही सीमाप्रदेशातील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सीमा नाहीत. असल्या तर त्या फार पुसट आहेत. भौगोलिक सीमा प्रदेशांमध्ये राहणारी मंडळी उभयभाषक आहेत. आपण एकीकडे बहुभाषक असतो किंवा शाळांमध्येही जागतिक भाषा शिकण्यासाठी आग्रही राहतो. त्यामुळे आपल्या लगतच्या राज्यातील भाषांचे, भाषाभगिनींचे शिक्षणही या माध्यमातून अंगिकारले जाते. माझ्या मते सीमा प्रदेशातील लोक विशेषतः शाळा, महाविद्यालयात शिकणारी मुलं ही भाषेच्या समृद्धीमुळे जास्त श्रीमंत आहेत. कारण ते उभय भाषांमध्ये व्यवहार करतात. तसेच सीमाभागात मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलन होत असतात. सीमा भागांमध्ये दोन्ही भाषांमध्ये आदान प्रदान करणाऱ्या संस्था आहेत. तिथे अनुवादकांचा सत्कार केला जातो. साहित्यानं तो ऋणानुबंध टिकवून ठेवला आहे. भाषिक सीमा राजकारणामुळे दुभंगल्या असल्या तरी चाली, रीती, रूढी, लोकसंस्कृती, श्रद्धा, खाद्यपदार्थ यांचं आदानप्रदान सीमाप्रदेशात झालं आहे आणि आजही ते सुरू आहे.

मराठी भाषा संवर्धनात अन्य भाषक किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांची भूमिका कोणती होती?

आपल्याकडे जेव्हा इंग्रज प्रथम आले, त्यावेळी त्यांना आपल्या गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण झाली. संस्कृतमधील नाटकं, वेद उपनिषदे यासारखे ग्रंथ यामध्ये काय आहे, हे समजण्यासाठी इथं आलेले ब्रिटिश लोक प्रथम संस्कृत शिकले. त्यांनी संस्कृतची अक्षरशः संथा घेतली. मॅक्समुल्लरसारख्या विद्वानांना ज्ञानाची ओढ होती. युरोपमधून व्यापारासाठी लोक आले, राज्य करण्यासाठी आले. त्यांनी ज्या प्रांतामध्ये धर्म, व्यापाराचा प्रसार करायचा असेल, त्या त्या प्रांतातील भाषांचे प्रथम शिक्षण घेतले. पोर्तुगालमधील लोक गोव्यात आल्यानंतर मराठी, कोकणी भाषा शिकले. मराठीतील पहिलं व्याकरण युरोपियन माणसाने लिहिलं. विरामचिन्हं इंग्रजांनी दिली. मराठीतील पहिले पुस्तक छापलं ते कोलकात्याजवळील मिशनच्या एका छापखान्यात. हे मराठी माणसाने केलं नाही. हे भारतीय माणसानं केलं नाही. त्यांच्या हेतूसाठी का होईना इंग्रज आपली भाषा शिकले. आम्ही त्यांची भाषा शिकायला लागलो. आमच्या सांगलीसारख्या छोट्या संस्थानात इंग्रजी बुक वाचणारा कोणी आला तर त्याचे कौतुक वाटे. पण मराठी शिकणारा कोणी आला तर त्याचे फारसे कौतुक वाटले नाही. ते काम ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टिफनसनने गोव्यामध्ये केलं. मराठीचं कौतुक जसं ज्ञानेश्वरांनी केलं तसं सातासमुद्रापारहून आलेल्या फादर स्टीफनसनने मराठी भाषा शिकून मराठी भाषेची स्तुती केली.’ जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, परिमळामाजी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजरी, भाषा मराठी’ या शब्दात फादर स्टीफनसनने मराठी भाषेचं कौतुक केलं. या पार्श्वभूमिवर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७५ वर्षांनंतर आम्ही मराठी लोक काय करतो, याचं आत्मपरीक्षण करावं लागेल.

मराठी माध्यमातून शिकलेली मुलं स्पर्धेच्या सर्व क्षेत्रात कमी पडतात असे वाटते का?

अलीकडच्या काळात इंग्रजी भाषेत शिकलं तर त्याला प्रतिष्ठा. जुन्या काळात जसं संस्कृतमधून बोललं कि पांडित्य होतं, तसं सध्याचं पांडित्य इंग्रजीत आहे. अगदी ग्रामीण भागातील पालकांचाही आपल्या मुलांनी इंग्रजीत शिकावं, असा आग्रह असतो. इंग्रजीला प्रतिष्ठा आहे, हा शहरी लोकांचा अपसमज आहे आणि तो ग्रामीण भागापर्यंत रूजवला जातोय. पण, माझ्या मते मराठी माध्यमातून शिकलेली मुलं कुठेही कमी पडत नाहीत. याची अनेक यशस्वी उदाहरणे देता येतील.

मराठी भाषकांमधील हा न्यूनगंड दूर करण्यासाठी काय उपाय आहे?

वास्तविक आमच्या देशाची संस्कृती प्राचीन आहे, तत्त्वज्ञान मोठं आहे. मग आमच्या देशातील उच्चवर्णीय, उच्चशिक्षित पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना का असावी? माझा मुलगा परदेशात नाही गेला तर दुसरा मार्गच मिळणार नाही, असे त्यांना का वाटते, असा मला प्रश्न पडतो. एकीकडे आम्ही अभिजात दर्जा मिळाला म्हणतो, त्यावेळी मुंबईसारख्या महानगरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, हे खेदजनक आहे. जपानसारखा दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला देश राखेतून ताठ मानाने उभा राहिला. आमची भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला आमचे तंत्रज्ञान मिळणार नाही, असे म्हणतो. तेव्हा मराठी जनांनी आपल्या मुलांना आग्रहाने मराठी शिकवलं पाहिजे आणि त्यांना प्रवृत्त केले पाहिजे कि तुम्ही संशोधन करा व मराठी भाषेमध्ये मांडा कि ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी लोक तुमच्याकडे आले पाहिजेत. अशा शिक्षणासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सर्वच स्तरातून केले गेले पाहिजेत.

लोकसाहित्यावर आपण खूप संशोधन, संकलन केले आहे. त्याबद्दल थोडेसे….?

लोकसाहित्याबद्दल म्हणाल तर काही अपसमज आहेत. लोकसाहित्य ग्रामीण असते, अशिक्षित लोकांचे असते, भूतकाळातील असते असे काही समज आहेत. खेडेगावातील महिलांनी जात्यावर दळण दळत असताना ओव्या लिहिल्या. या सर्वांशी आमचा संबंध नाही असे शहरी लोकांना वाटते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये करमणुकीचे साधन व पैसे देणारे साधन म्हणून गोंधळ, जागरण, पोवाडा, लावण्या काही अंशी टिकले आहे. कारण त्यामध्ये गीत, नृत्य, नाट्य, वाद्य आहे. त्या सगळ्याचा संगम म्हणून ते नृत्यनाट्य सादर होत आहे. मात्र त्यातील धार्मिक भावना, संस्कृतीची गुंफण होती, ते श्रद्धाविश्व गळून पडले आहे. त्यामध्ये नकळत धर्मश्रद्धेचा धागा असतो, तो क्षीण झाला आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे. त्या पार्श्वभूमिवर त्यातील कलात्मक घटकांचा विकास होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्याचा इथून पुढे आपण कसा वापर करणार, यावर विचार व्हायला पाहिजे.

स्त्रीवादी किंवा स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य तसंच लोकसाहित्याबद्दल काय सांगाल?

एकूणच साहित्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या सामाजिक स्तरातील महिला लिहित आहेत. व्यक्त होत आहेत. आदिवासी महिला, ग्रामीण भागातील महिला लिहित आहेत. केवळ शिक्षण घेतल्यानंतर महिला शहाण्या झाल्या, हा माझ्या दृष्टीने अपसमज आहे.

लोकसाहित्यातील महिलांचा विचार करता, त्यांच्या लेखनातून महिला पहिल्यापासून खूप शहाण्या आहेत, असे मला वाटते. आमच्याकडे स्त्रियांबद्दल पुरुष काय म्हणतात त्याचा विचार झालेला आहे. मात्र महिला, घरातील स्त्री स्वतःबद्दल काय म्हणते हे कोणी नीट पाहिलं नाही. तथाकथित स्त्रीमुक्ती वादी महिला म्हणते त्याच्यापेक्षा जात्यावर दळण दळणारी बाई जास्त क्रांतिकारी बोललेली आहे हे मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ती बोलून दाखवत होती फक्त ते ऐकायला कोणी नव्हतं. बहिणाबाईंनी अशिक्षित असूनही अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती सांगितल्या. संत स्रिया आधुनिक कवियित्रींच्या खूप पुढे होत्या.

वाचनसंस्कृती वाढण्यासाठी काय करायला पाहिजे?

पुस्तकांचे ढीग आणून टाकले म्हणजे वाचन संस्कृती वाढत नाही. माणसांना आतून वाटल्याशिवाय, पोटातून वाटल्याशिवाय ते ओठात येणार नाही. माणसांना ज्ञान संपादनाची निकड वाटली पाहिजे आणि ते ज्ञान संपादन ज्या मार्गाने होत असेल त्या मार्गाने केले पाहिजे. ऐकून, वाचून किंवा अन्य भाषा शिकून ज्ञानसंपादन केले पाहिजे. मला नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि मी ते वाचनातून संपादन करेन असे माणसाला वाटले पाहिजे. कविता, कथा किंवा कादंबरी असे सर्व साहित्यप्रकार शिकवतात. आपल्याला फक्त ते नीट वाचता आलं पाहिजे.

साहित्य क्षेत्रात नव्या पिढीकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?

ग्रामीण भागातील मुलं, मुली नव्याने लिहायला लागली आहेत. पुस्तकं मोठ्या संख्येने प्रकाशित होत आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये प्रकाशक पुढे येत आहेत. सुदैवाने काही जणांना स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित करण्याची आता ऐपत निर्माण झाली आहे. एकूणच खर्च करण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. साहित्याच्या दृष्टीने पुस्तके विकत घ्यावीत, स्वखर्चाने पुस्तके प्रकाशित करावीत असे नव साहित्यिकांना तसेच लोकांना वाटते आहे. यातून पुस्तकाबद्दलची आस्थाच प्रगट होत आहे. ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

 (शब्दांकन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा

 राणीसाहेब रूसल्या (एकांकिका), मधुशाला (बच्चनकृत काव्य अनुवाद), यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 1, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 2, प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), लोकनागर रंगभूमी, महामाया (डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने), मिथक आणि नाटक, लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये जातीच्या, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे, लोकसाहित्य, वाडमय प्रवाह, कुमारभारती, बारावी संपादन, मराठी लोकसाहित्य एम.ए. भाग 1 व 2 साठी, मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे, मायवाटेचा मागोवा (स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन), तिसऱ्या बिंदूच्या शोधात, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, बोरीबाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्री विषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना, पायवाटेची रंगरूपे (आत्मकथनपर लेखसंग्रह) आकलन आणि आस्वाद, लोकसंस्कृतीची शोधयात्रा (डॉ. रा. चिं. ढेरे व्यक्ती आणि वाड्मय), माझिये जातीच्या (दुसरी आवृत्ती), लोकांगण (लोकसंस्कृती विषयक), लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा, मनातले जनात (ललित लेखसंग्रह), निरगाठ सुरगाठ (ललित लेखसंग्रह), मातीची रूपे (लोकसंस्कृती विषयक), मरणात खरोखर जग जगते (कथा संग्रह), नाट्याचार्य खाडिलकर चरित्र, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (दुसरी आवृत्ती), स्नेहरंग (साहित्यातील व्यक्तीचित्रे), लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, प्रातिभ संवाद : संपादन मुकुंद कुळे, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, सीतायन, कथा जुनी तरी नवी, मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी.

00000

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस

मुंबई, दि. २० : अरुणाचल प्रदेश व मिझोरम या उत्तरपूर्वेकडील राज्यांची संस्कृती व लोककला आपल्या गीत व नृत्याद्वारे उत्कृष्टपणे सादर केल्याबद्दल राज्यपाल तसेच कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी संजीवनी भेलांडे यांनी आपल्या सुरेल स्वरांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यगीत सादर केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपालांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन राजभवनातर्फे डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात आले होते.

विभिन्न धर्म, जात, संप्रदाय व भाषा बोलणारे लोक देशात गुण्यागोविंदाने राहत असून गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही राज्यांनी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. खंडप्राय असलेला भारत एकसंध असल्यामुळे त्याचे जागतिक पटलावर महत्वाचे स्थान निर्माण झाले असून आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. विभिन्न राज्यांमधील एकात्मतेमुळे स्वातंत्र्याच्या शतकी वर्षापर्यंत भारत विकसित राष्ट्र निर्माण होईल,  असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात उत्तरपूर्व राज्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षांमध्ये तेथील सर्व राज्यांना रेल्वे, रस्ते तसेच हवाई मार्गाने जोडले आहे. भारत सरकारच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणामुळे उत्तर पूर्वेकडील राज्ये दक्षिण आशियाई देशांशी जोडले गेले असून आगामी काळात आपण इंडोनेशियापर्यंत रस्ते मार्गाने जोडले जाऊ. उत्तरपूर्व राज्ये ही स्वित्झर्लंडप्रमाणे निसर्ग सौंदर्याने नटली असून विदेशात जाण्याअगोदर लोकांनी आपल्या देशातील उत्तरपूर्व राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अरुणाचल प्रदेश येथे लोक परस्परांना भेटतात त्यावेळी ते ‘जय हिंद’ म्हणतात ही गोष्ट सर्वांनी शिकण्यासारखी आहे.

विविध राज्यांचे राज्यस्थापना दिवस साजरे केल्यामुळे राज्यातील लोकांना त्या त्या राज्यांच्या लोककला व जनजीवन याबद्दल अधिक माहिती मिळत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाच्या सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तसेच दोन्ही राज्यांची माहिती देणारे माहितीपट सादर केले.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत यांसह सिडनहॅम व इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

0000

Arunachal Pradesh, Mizoram Formation Days Celebrated in Maharashtra Raj Bhavan

Mumbai, 20th Feb : The State Formation Day of Arunachal Pradesh and Mizoram States was celebrated in the presence of Maharashtra Governor and Chancellor of Universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Thursday (20 Feb). The programme was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the Dr Homi Bhabha State University.

The Arunachal Pradesh and Mizoram State Foundation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

A cultural programme depicting the rich culture, folk dance and traditions of Arunachal Pradesh and Mizoram was presented by the students of Sydenham College, the constituent college of Dr Homi Bhabha State University Mumbai on the occasion.

Audio visual films showing the beauty, history, heritage, cuisine, culture and tourist destinations of the two States were also shown on the occasion.

Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Deputy Secretary S Ramamoorthy, Vice Chancellor of Dr Homi Bhabha State University Prof Rajneesh Kamat, Principals of affiliated colleges, members of faculty and students were present on the occasion. The Governor felicitated Sanjeevani Bhelande, alumnus of Sydenham College for presenting the Arunachal Pradesh State Song. Students of Sir J J School Deemed to be University who drew live portraits of the Governor and other dignitaries on the dais were also felicitated.

0000

 

‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परी अमृताते ही पैजा जिंके।।’ ‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !’’

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एक लढाई यशस्वी झाली. आपल्या मराठी भाषिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. मराठीने हे सर्व निकष पूर्ण केले आणि म्हणूनच तिचा दर्जा अभिजात भाषांमध्ये समाविष्ट केला गेला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी अभिनंदन आणि आनंद साजरा केला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा सुरू होता. संसदेत वारंवार याबाबतची मागणी होत होती. राज्यातल्या सर्वच पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे अभिजात भाषा म्हणजे काही तरी आहे, इतकीच माहिती सामान्य नागरिकांना होती.

संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी  केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय  घेतला आहे.  केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीसह पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी मातृभाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अर्थ हा आहे की, मराठी भाषा आता भारतातील त्या विशिष्ट भाषांच्या यादीत आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ज्यांना त्यांच्या प्राचीन परंपरा, साहित्यिक, श्रीमंती आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अभिजात भाषा म्हणून मराठी ओळखली जाणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. मराठीने हे सर्व निकष पूर्ण केले आणि म्हणूनच तिचा दर्जा अभिजात भाषांमध्ये समाविष्ट केला गेला हे विशेष असून यास केंद्र सरकारने दिलेली मराठी भाषिक यांच्यासाठी पर्वणीच आहे.

मराठी भाषेने अभिजात भाषेसाठी असलेले निकष पुर्णपणे पार पाडले. मराठी भाषाचे पुरातन साहित्य: संबंधित भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांपेक्षा अधिक आहे आणि तिचे प्राचीन साहित्य आजही उपलब्ध आहे. मराठी भाषेला समृद्ध साहित्य परंपरा असून या भाषेत असे साहित्य आहे की, जे प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. मराठी मूळ भाषा आहे. संबंधित भाषा स्वतःची स्वतंत्र आहे, म्हणजेच इतर कोणत्याही भाषेपासून थेट उधार घेतलेली नाही. मराठी भाषेला सांस्कृतिक महत्त्व आहे व भाषा मराठी समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जाकेंद्र सरकारचा मोठा निर्णय. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे आहेत ते म्हणजे भाषेचे संवर्धन आणि संरक्षण सरकारकडून मराठी भाषेच्या संशोधनासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निधी मिळेल. त्यामुळे मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्राचीन साहित्याच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल. शोधकार्याला प्रोत्साहन मिळाल्याने अभिजात भाषांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातील. शैक्षणिक विकास, मराठी भाषेतील प्राचीन साहित्य, संस्कृती आणि इतिहास यांचे अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होईल, ज्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेचा अधिक खोल अभ्यास करता येईल. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा दर्जा उंचावला गेला आहे आणि तिच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी अनेक नवे मार्ग खुले झाले आहेत.

प्रा.डॉ.बबन मेश्राम,

साहित्यीक व लेखक

समाजशास्त्र विभाग प्रमुख,

एन.एम.डी.महाविद्यालय गोंदिया  

चला, अभिमानाने मराठीत बोलूया, लिहूया आणि तिचा सन्मान वाढवूया

मराठी भाषा ही भारताच्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून सुमारे ८ कोटी लोकांची मातृभाषा आहे. संस्कृतप्रभवित असलेल्या या भाषेचा समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. मराठी भाषेचा उगम साधारणतः ९ व्या- १० व्या शतकात प्राकृत-अपभ्रंशातून झाला. याचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये आढळतो. ११ व्या शतकातील हेमाडपंती लिपी आणि संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मराठी भाषेच्या प्राचीनतेचे साक्षीदार आहेत. शिवकालीन काळात मराठीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा वापर करून तिला सन्मान दिला.

मराठीत संत, कवी, लेखक, विचारवंत यांनी अमूल्य योगदान दिले आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी भक्तिसंप्रदाय वृद्धिंगत केला. आधुनिक काळात पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, राम गणेश गडकरी यांसारख्या लेखकांनी साहित्यविश्व समृद्ध केले.

आजच्या डिजिटल युगात मराठी भाषा विविध माध्यमांतून पुढे जात आहे. मराठी चित्रपट, साहित्य, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यामुळे ती अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. शालेय आणि उच्च शिक्षणात मराठीला अधिक महत्त्व मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

मराठी भाषेसमोर इंग्रजीच्या प्रभावाचे मोठे आव्हान आहे. तरुण पिढीला मराठीकडे आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योगांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे.

मराठी ही केवळ एक भाषा नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. चला, अभिमानाने मराठीत बोलूया, लिहूया आणि तिचा सन्मान वाढवूया!

तुषार पिलाजी उरकांदे

वरिष्ठ लिपीक

जिल्हा माहिती कार्यालय

गोंदिया

भाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण

‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :’ हा मराठी बाणा व-हाडाने कायम जपला आहे. संत चक्रधरांचे शिष्य आचार्य नागदेव हे व-हाडातील. त्यांनी केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. मराठी भाषेच्या इतिहासात व-हाडभूमीचे आणि अकोल्याचेही स्थान अनन्यसाधारण आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत प्रचार केला. पंथाचे आचार्य नागदेव यांनीही हा दृष्टिकोन कटाक्षाने आचरणात आणला. या तत्वज्ञान व लोकभाषेच्या आग्रहापोटी मराठी भाषेत अमूल्य ग्रंथसंपदा निर्माण झाली. याच भूमीत मराठी भाषेचा आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला.

श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. धर्माचे तत्वज्ञान जनभाषेत सांगितले. श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. हा व-हाडाचा आणि महाराष्ट्राचा गौरवास्पद इतिहास आहे.

महानुभाव पंथांमध्ये सात ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यापैकी ज्ञानप्रबोध या ग्रंथाचे लिखाण पं. विश्वनाथ बाळापूरकर यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे केले होते. या ग्रंथात बाराशे ओव्या असून, काव्याची बैठक पारमार्थिक आहेते. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी अकोला जिल्ह्यात आठ ठिकाणी भेट दिल्याचे सांगितले जाते. त्यात मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी व माना, अकोला तालुक्यातील येळवण, बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी व भटाळी, तसेच पातूर तालुक्यातील आलेगाव व भटाळी या गावांचा समावेश आहे. चक्रधरस्वामींच्या जिल्ह्यातील संचारामुळे येथील भूमीत तीर्थक्षेत्रे व त्यांना अनुसरणारा संप्रदाय निर्माण झाली.

संकलन : हर्षवर्धन पवार, अकोला

ही साहित्य संमेलने कोणाची?

दिल्ली येथे दिनांक २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ या काळात डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे आणि सरहद्द, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत . ७१ वर्षानंतर दिल्लीत असे साहित्य संमेलन दुसऱ्यांना भरत आहे .१९५४ साली  ३७ वे साहित्य संमेलन लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भरले होते. त्यावेळी उद्घाटन होत असताना व्यासपीठावर पंतप्रधान नेहरू आणि लोकसभेचे सभापती ग .वा. माळवणकर उपस्थित होते. या दोन्ही साहित्य संमेलनांची वैशिष्ट्ये म्हणावित ती म्हणजे दोन्ही साहित्य संमेलनांना त्या त्या काळचे देशाचे पंतप्रधान व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.

* साहित्य संमेलनाची पूर्वपिठीका –

इ.स. १८७८ मध्ये पुणे येथे पहिले मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांच्या पुढाकारातून झाले होते. त्या संमेलनाचा  मुख्य उद्देश ग्रंथ प्रसारास चालना देणे हा होता .त्यामुळे अशा विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन विचार विनिमय करावा म्हणून हे संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी या संमेलनास ग्रंथकार सभा किंवा ग्रंथकार  परिषद असे म्हटले गेले होते. यात विविध ग्रंथकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तशा पद्धतीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये ७ फेब्रुवारी १८७८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले होते.

या परिषदेचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. नंतर दुसरे वार्षिक मराठी साहित्य संमेलन २४ मे १८८५ मध्ये पुणे येथे कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार होते. या संमेलनाचे निमंत्रण आयोजक न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुले यांना पत्राद्वारे पाठविले होते. त्यावेळी महात्मा फुल्यांनी या ग्रंथकार सभेस उद्देशून ‘उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाला मी येणार नाही ‘असे कडक शब्दांत संबोधले होते. या पत्रातील महत्त्वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे होता -सामान्यतः मानवी हक्कांचा विचार करण्यास जी मंडळी नकार देतात. जे ते इतरांना मान्य करत नाहीत आणि त्यांच्या वर्तनानुसार भविष्यात ते मान्य करण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या परिषदा आणि पुस्तके आपल्याला अर्थपूर्ण वाटत नाहीत.

महात्मा फुले यांचे हे पत्र ११ जून १८८५च्या ज्ञानोदय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. महत्वाची बाब म्हणजे या साहित्य संमेलनाच्यावेळी निमंत्रितांपैकी ज्या मंडळींनी आपल्या भावना पत्रांद्वारे कळविल्या होत्या अशा एकूण 43 पत्रांचे वाचन केले गेले .आणि त्यात पहिले पत्र महात्मा फुले यांचे होते. खरे तर हा आयोजकांचा मोठेपणा होता.

* साहित्य संमेलनाचे वेळोवेळी होत गेलेले नामांतर-

अगदी सुरुवातीचे म्हणजे १८५८ चे पुणे येथे संपन्न झालेले साहित्य संमेलन हे ग्रंथकार संमेलन किंवा ग्रंथकार सभा,परिषद  म्हणून नामनिर्देशित झाले. त्यानंतर १९०७ मध्ये या संमेलनास लेखक संमेलन असे संबोधले गेले. तर १९०९मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन असे त्याचे नामाभिधान केले गेले. मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलन असे नाव बदलण्यात आले. १९३५ ते १९५३ या काळात महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने ओळखले जाऊ लागले. पुन्हा १९५४ मध्ये मराठी साहित्य संमेलन असे नाव योजले गेले. १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी महामंडळाकडे साहित्य संमेलनाचा कारभार गेला. कारण त्यावेळेस या महामंडळाची स्थापना करण्यात आली.

ही स्थापना करताना मराठी भाषेचे, साहित्याचे आणि संस्कृतीचे प्रश्न सोडविण्यासाठी  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भरविणे हा उद्देश ठरविण्यात आला.  तेव्हापासून आजपर्यंत संमेलने भरविण्याची  ही परंपरा कायम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ही संस्था संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई साहित्य संघ ,मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थांचे मिळून  स्थापन करण्यात आली. दर तीन वर्षांनी या महामंडळांची जबाबदारी वरील चारपैकी एका साहित्य संस्थेकडे जात असते. आणि ती  साहित्य संस्था अखिल भारतीय मराठी  महामंडळाच्या सहकार्याने संमेलनाचे आयोजन करत असते . या महामंडळाशी आजूबाजूच्या राज्यांतील मराठी साहित्य संस्थाही निगडित झालेल्या आहेत.

* अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेवेळी वा आधी  उद्भवणारे वाद –

दरवर्षी होणारी साहित्य संमेलने ही कुठल्या ना कुठल्या तरी वादाला बळी पडतात . हे वाद उद्भवण्यात वेगवेगळी कारणे निमित्तमात्र ठरतात  . पैकी काहीची यादी पुढील प्रमाणे तयार करता येईल -१) महामंडळांतर्गत कार्यरत असणाऱ्या घटक संस्थांचे अंतर्गत वाद ,२) संमेलनस्थळ ठरवण्यावरून वाद ,३) अध्यक्षपद निवडण्याच्या पद्धतीवरून/निवडीवरून वाद,४) आयोजकांमुळे निर्माण झालेले वाद,5) आयोजनात ,व्यासपीठावर राजकारणी मंडळींची हजेरी असण्यावरून वाद,६) सरकारी अनुदानावरून होणारे वाद,७) महामंडळाशी संलग्न नसणाऱ्या इतर काही मराठी भाषक साहित्य संस्था किंवा साहित्यिक यांच्याकडून उद्भवणारे वाद,८) अध्यक्षपदाची निवडणूक लढवितांना वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये निर्माण  झालेले वाद,९) निवडून येण्यापूर्वी वा निवड झाल्यावरही एखाद्या उमेदवाराच्या /अध्यक्षाच्या पुस्तकावरून ,विधानावरून निर्माण झालेले वाद,१०) वादग्रस्त बाबींच्या विरोधात राज्यातील काही राजकीय ,सामाजिक, साहित्यिक ,सांस्कृतिक संघटनांनी विरोध दर्शनासाठी सुरू केलेले आंदोलनात्मक वा इतर स्वरूपाचे वाद,११)  अध्यक्षीय भाषणातील एखाद्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद,१२) तत्कालीन देश -राज्य काल परिस्थितीवरून  निर्माण होणारे वाद ,१३) आयोजनातील ढिसाळपणामुळे निर्माण होणारे संमेलनोत्तर वाद,१४) मानापमान नाट्यावरून उद्भवणारे वाद,१५) महामंडळाने वा आयोजकांनी गरजू घटकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्यावरून उपस्थित झालेले वाद.दरवर्षी होणारी साहित्य संमेलने अशा कुठल्या ना कुठल्या वादाला जन्म देत असतात. यावर्षीच्या साहित्य संमेलनप्रक्रियेत असा कुठलाही लक्षवेधी वाद निर्माण झाला नाही. तरी एका बाबीने  साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली .ती बाब म्हणजे  ९८व्या साहित्य संमेलनासाठी परदेशातून आमंत्रित म्हणून येणाऱ्या व्यक्तींना सरकारने आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक रक्कम बहाल करणे.

* साहित्य संमेलनाची उपयुक्तता-

साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. आज गावपातळीपासून ते वैश्विक पातळीपर्यंत मराठीची साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत .त्यात विश्व ,अखिल भारतीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक ,प्रांतिक ,नगरीय, उपनगरीय, जिल्हास्तरीय ,ग्रामीण ,दलित, आदिवासी, महिला,कामगार,जातीय,व्यावसायिक , बालकुमार ,नवोदित, युवा, आंबेडकरी ,ख्रिस्ती अशा वेगवेगळ्या शीर्षकांनी ही संमेलने आयोजित करण्याचा झपाटा फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अलीकडेच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. ही  सर्व मराठी भाषकांसाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. ह्या गोष्टी मराठी भाषेच्या संपन्नतेसाठी आवश्यक अशा आहेत . मात्र अलीकडे अ . भा . साहित्य संमेलने समाजविन्भुख होत आहेत की काय असा प्रश्न पडतो. ही संमेलने कोणासाठी? सामान्य जनांसाठी,आयोजकांसाठी , साहित्यिकांसाठी की राजकारण्यांसाठी ? त्यामुळे पुन्हा एकदा महात्मा फुले यांची ती विधाने आठवू लागतात. ही संमेलने ‘घालमोड्या दादांची’च हे पटते. महात्मा फुलेंनी अशा संमेलनांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या ही संमेलने कितपत वास्तवात आणतात हा प्रश्न उरतोच. तरीही ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

_ बाबाराव मुसळे,

ज्येष्ठ साहित्यिक,वाशिम

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...