शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 170

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी राज्यभरातील आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव 

मुंबई, दि. २१ : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्हा-जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या राजाला वंदन करताना विद्यार्थ्यांनी आदर्श शिवजयंती उत्सव साजरा केल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवायचा आहे. आपल्या भारताची उद्याची पिढी बलशाली, आत्मनिर्भर, कुशल आणि समृद्ध व्हावी, यात महाराष्ट्र अग्रेसर असावे या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आदर्श शिवजयंती उत्सव साजरा करण्याची संकल्पना साकारली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. महामानवांच्या आदर्श कार्यकुशलतेची आणि त्यांच्यातील प्रतिभेची जाणीव व जागृती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यातून आदर्श विद्यार्थी आणि आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, हाच प्रामाणिक एकमेव उद्देश असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त राज्यभरातील आयटीआयमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. प्रत्येक आयटीआयमध्ये महाराजांच्या प्रतिमेस, तसेच संस्थेच्या प्रांगणातील स्मारकास पुष्पहार अर्पण करून या आदर्श जयंती उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम, शिवकालीन नाट्य आणि कलांचा आविष्कार असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षभेट अशा विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश यात करण्यात आला होता. यावेळी आयटीआयमधील विद्यार्थ्यांसह प्राचार्य आणि शिक्षक या सोहळ्यात सहभागी झाले होते.

०००

आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २१: आसियान देशांमधून भारत भेटीवर आलेल्या महिला उद्योजिका फिक्की महिला आघाडीच्या सहकार्याने भारतातील उद्योगांशी करीत असलेले परस्पर सहकार्य कौतुकास्पद असून यातून सर्व देशांमधील महिला उद्योजकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

भारत आणि आसियान देशांमधील २० आघाडीच्या महिला उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

भारत आणि आसियान देशांमधील उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सर्व देश परस्परांशी थेट विमानसेवेने जोडणे आवश्यक आहे, असे सांगून नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरु होत असून त्यानंतर मुंबई अनेक देशांशी थेट विमान सेवेने जोडले जाईल व त्यातून उद्योगांना चालना मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाहून तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत असून भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी सध्याची वेळ अतिशय योग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महिला उद्योजिकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना धन्यवाद दिले.

आसियान देशांमधील महिला उद्योजक नेत्यांच्या या भेटीचे आयोजन फिक्की संसथेच्या महिला विभागाद्वारे करण्यात आले होते.

यावेळी फिक्की मुंबई महिला विभागाच्या अध्यक्षा आर्मीन दोर्डी व आसियान इंडिया अध्यक्षा विनिता बिंबेट यांनी महिला उद्योजिकांच्या भारत भेटीबाबत माहिती दिली.

फिलिपिन्स येथील संस्थेच्या आसियान सह-अध्यक्षा पॅसीटा जुआन, उद्योजिका मारिया ख्रिस्तिना कॉन्सेपसियान,  तसेच इतर फिलिपिन्स आणि म्यानमार येथील महिला उद्योजिका यावेळी उपस्थित होत्या.

आसियान देशांतील महिला उद्योजिका आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी भारतभेटीवर आल्या आहेत.

०००

पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारणाच्या कामांचा आढावा

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारणाच्या विविध कामांचा पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. येत्या तीन महिन्यात जास्तीत जास्त कामे पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.निपाने, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पांडे यांच्यासह जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षातील मंजूर कामे, प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, सुरु झालेली कामे, पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली व सुरुच न झालेल्या जिल्ह्यातील सर्व कामांची माहिती घेतली. तालुकानिहाय अपुर्ण कामांची माहिती घेतांना येत्या तीन महिन्यात म्हणजे पावसाळा लागण्यापुर्वी बहुतांश कामे पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, जलसंधारण महामंडळाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेतला. जलयुक्त शिवाय योजनेचा जिल्ह्याचा ४० कोटींचा आराखडा आहे. या योजनेंतर्गत ३३० कामे मंजूर असून २८९ कामांना कार्यादेश देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेचा वाढीव आराखडा १३५ कोटी रुपयांचा करण्यात आला असून या आराखड्यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही योजना उत्तमप्रकारे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजना सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून योजनेंतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ठ ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले. सुरुवातीस संबंधितांनी आपआपल्या कामाचे सादरीकरण केले.

000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मंगळवार २५ राेजी मुलाखत

मुंबई दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

 

‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू

तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय

नवी दिल्ली, दि. २१ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता.

जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरूद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो मराठी बांधव मोठ्या उत्साहाने मराठमोळ्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती.

ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे फुगडी खेळली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली दिल्लीकरांची मने

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या रचना अशी आकर्षक सजावट चित्ररथावर करण्यात आली होती. दिल्लीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या अभिजात भाषा- संस्कृतीचे दर्शन घडले.

०००

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महत्त्व आणि मिळणारे लाभ

मराठी भाषा, जी भारतीय उपखंडातील एक प्रमुख भाषा आहे, तिचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ज्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. हा निर्णय केवळ भाषिक ओळखीतच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही महत्त्वाचा ठरला आहे.

अभिजात भाषेचा दर्जा…

अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, आणि संस्कृतीच्या गौरवाचा मान्यता मिळवणे. मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष आहेत. या भाषेचा इतिहास प्राचीन असावा, त्यात मौल्यवान साहित्य असावे, आणि ती दुसऱ्या भाषांवर अवलंबून नसावी. मराठी भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांचा आहे, आणि तिचे साहित्य विविध शतकांमध्ये विकसित झाले आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होते म्हणून केंद्र शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे लाभ-

१. संशोधन आणि अभ्यासाला चालना: अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे भाषाशास्त्रज्ञ आणि संशोधकांना अधिक संधी उपलब्ध झाल्यावर मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर संशोधन मोहीम सुरू होऊन मराठी भाषा अधिक विस्तृत होईल.

२. विद्यापीठांमध्ये शिक्षण: भारतातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही विद्यापीठात त्यांच्या मातृभाषेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे मराठी भाषेचा अधिक प्रचार व प्रसार होऊन संपूर्ण देशभरात मराठी भाषेचे अभ्यासक निर्माण होती व ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये लिखाण करतील, त्यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात आणखी भर पडेल.

३. प्राचीन ग्रंथांचे अनुवाद: मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात सुरुवात होईल, ज्यामुळे या ग्रंथांचा व्यापक प्रसार होईल आणि त्यांचे महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मराठीतील हे प्राचीन ग्रंथ अनेक भाषांत अनुवादित झाल्यानंतर मराठी भाषा ग्रंथ संस्कृती यांचा अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास मदत मिळणार आहे.

४. ग्रंथालयांचे सशक्तीकरण: राज्यातील हजारो ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील ग्रंथालयांना अधिक संसाधने आणि अनुदान मिळेल, ज्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र वाढेल. प्रत्येक ग्रंथालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रंथ साहित्य खरेदी होईल व ते पर्यायाने मराठी भाषिक वाचकापर्यंत पोहोचेल त्यातून मराठीचा साहित्याचा प्रचार प्रसार होऊन भाषा अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहील.

५. संवर्धनासाठी मदत: मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळेल. यामुळे भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातील. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रचार प्रसारणासाठी तसेच भाषा वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणे शक्य होणार आहे हे मदत मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम ग्राम स्तरापासून ते शहरी भागापर्यंत राबवणे शक्य होणार आहे त्यातून मराठी भाषेचा अधिक जोमाने विकास होण्यास नक्कीच मदत मिळेल.

६. राष्ट्रीय पुरस्कार: अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यामुळे मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक वर्षी मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. असे पुरस्कार मिळाल्यास मराठी भाषा संवर्धनात कार्य करणाऱ्या अनेकांसाठी ते प्रोत्साहन ठरेल व त्यातूनच मराठीचा विकास होण्यास मदत मिळेल.

मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व-

मराठी भाषा केवळ एक संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी भाषेत अनेक महान कवी, लेखक आणि विचारवंत झाले आहेत, ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

मराठी भाषेच्या साहित्याने भारतीय साहित्याला एक अद्वितीय स्थान दिले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांनी मराठी भाषेत आपल्या विचारांची मांडणी केली आहे. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.

भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता-

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर, मराठी भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता अधिक महत्त्वाची बनली आहे. भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जावे लागतील, जसे की:

-भाषाशास्त्रीय संशोधन: भाषाशास्त्रज्ञांनी मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

-साहित्यिक उपक्रम: साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे.

-तंत्रज्ञानाचा वापर: डिजिटल माध्यमांचा वापर करून मराठी भाषेचा प्रसार करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यास, संशोधन, आणि साहित्यिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि तिचा विकास होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातही ही भाषा समृद्ध राहील.

मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेच तसेच ते प्रयत्नही करत आहे परंतु प्रत्येक मराठी भाषिकाची ही जबाबदारी आहे की आपली मातृभाषा समृद्ध झाली पाहिजे तर चला आपण सर्वजण मिळून मराठी भाषेचे संवर्धन करूया. जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या समृद्ध वारशाचा भाग बनू शकतील.

सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर

शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- पालकसचिव, राजगोपाल देवरा

जिल्हास्तरीय कामकाजाबाबत घेतला आढावा, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर, दि.२१ : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने १०० दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी  करावी, अशा सूचना नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव तथा पालकसचिव कोल्हापूर, राजगोपाल देवरा यांनी केल्या. ते म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करा. शासनाची संकेतस्थळे, कार्यालयातील सेवासुविधा तसेच त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोप्या पद्धतीने नियोजन करा. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सात कलमी कृती आराखड्याबाबत तसेच १०० दिवसांच्या नियोजनाबाबत सादरीकरणातून माहिती दिली. बैठकीला कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजीत म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालक सचिव श्री.देवरा यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महापालिका यांचा सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेतला. कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी त्या त्या विभागांचे सादरीकरण केले. यावेळी  ते म्हणाले, सर्व विभागांची संकेतस्थळे सर्वसामान्य जनतेच्या कामाची असावीत. अगदी सहज त्यावरील विविध माहिती, सेवा त्यांना वापरता आल्या पाहिजेत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि त्या घेण्याबाबतच्या लिंक त्यावर असल्याच पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध सेवा सहज घेता येतील आणि सर्व संकेतस्थळे मोबाईलवरती वापरण्यासाठी योग्य असावीत. यानंतर त्यांनी कार्यालय स्वच्छता, कार्यालय सोयीसुविधा याबाबत माहिती घेतली. ई ऑफीसबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महसूल विभागाने यात काम पुर्ण केले आहे. आता राज्य शासनाच्या इतर जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्येही यापद्धतीने येत्या काळात काम करणार आहोत.

जिल्ह्यात गुंतवणूक वाढीस चालना देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवा

ज्या व्यावसायिकांबरोबर सामंजस्य करार झाले आहेत त्यांच्याशी बैठक घेवून सुरु असलेल्या कामकाजाबाबत चर्चा करा. मागील काळात 52 ठिकाणी सामंजस्य करार झाले, त्याचा आढावाही त्यांनी घेतला. ज्यांचे काम सुरु आहे व ज्यांचे अद्याप सुरु नाही अशा कंपनीबरोबर चर्चा करून काही अडचणी असल्यास त्या सोडवा. कारण त्यांना आवश्यक वीज, जागा, मनुष्यबळ, बँक कर्ज तसेच शासन स्तरावरील इतर परवानग्या बाबत काही अडचणी असतील तर त्या सोडवाव्या लागतील. यातून प्रकल्प उभारणीला गती मिळेल. तसेच इतर गुंतवणुकदार यामुळे अधिक सहभाग देतील.

यावेळी पालक सचिव यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि  शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात अशाही सूचना केल्या.

लोकाभिमुख होऊन काम करा

राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा क्षेत्र भेटी करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या १०० दिवसात कोल्हापूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी व्यक्त केली.

००००००००

नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो, ते मी पाहे

नव्यांना ऊर्जा देणारे मालगुंड मधील कवी केशवसुतांचे स्मारक

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारकाबाबत विशेष लेख..

‘नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,

कोण मला वठणीवर आणू शकतो, ते मी पाहे ’

वरील ओळी या कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत यांच्या ‘नवा शिपाई’ या कवितेतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे नजिक मालगुंड हे त्यांचे जन्मगाव. कोकण मराठी साहित्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. पु. भागवत आणि ६७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मे १९९४ रोजी कविवर्य केशवसुत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

केशवसुतांचे जन्मस्थान असणारी  वास्तू आजही सुंदर पद्धतीने जतन करुन ठेवली आहे. त्या काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू आजही जशाच्या तशा येथे पाहायला मिळतात. स्वच्छ सारवलेल्या या घरामध्ये त्या विराजमान आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखेचे कार्यवाह विलास राणे, कार्याध्यक्ष शुभदा मुळे, नलिनी खेर, सहसचिव रमानंद लिमये, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे ही मंडळी या स्मारकाच्या अनुषंगाने साहित्य चळवळ पुढे नेटाने चालवत आहेत.

 

स्मारकात प्रवेश केल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद निर्मित कवी केशवसुत स्मारक संकल्पना व आयोजन संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ही कोनशिला लावलेल्या ठिकाणी कवी कट्टा तयार केला आहे. पुढे त्यांच्या जन्मस्थानाची वास्तू आहे. त्यामागे तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीची आधुनिक कलाकृती लक्ष वेधून घेते. त्याच्या बाजूलाच बसविण्यात आलेल्या कोनशिलांवर निवडक कविता कोरलेल्या आहेत. याला वळसा घालून आतमध्ये पुढे गेल्यानंतर ‘आधुनिक मराठी काव्यसंपदा’ हे दालन दिसते. या दालनात मराठीतील नामवंत कवींची रेखाचित्रे आणि त्याखाली त्यांच्याच हस्ताक्षरातील कविता ही अत्यंत कल्पक मांडणी इथे आकर्षून घेते. त्यासोबत त्या काळातील वापरातील वस्तूही मांडलेल्या आहे. हे सर्व पाहताना त्या कालखंडात वावरायला होते. या दालनाच्या समोरच ग्रंथालय आहे.

या ग्रंथालयात ३५ हजाराहून अधिक पुस्तके, ८०० हून अधिक सभासद आहेत. कवी केशवसुतांची जयंती, पुण्यतिथी, मराठी राजभाषा दिन, वाचन प्रेरणा दिन , मराठी भाषा पंधरवडा, ग्रंथालय दिन असे कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. प्राथमिक शाळांमधूनच नवे साहित्यिक निर्माण व्हावेत, साहित्याची गोडी निर्माण करावी, या उद्देशाने ‘श्रावणधारा’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. स्वरचित कविता वाचन, निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात येतात. त्यामधील निवडक कवितांचे सादरीकरण स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात केले जाते.

केशवसुत जन्मशताब्दी समारोह समितीच्या माध्यमातून  केशवसुतांची कविता हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक इथे पाहून त्यामधील कवितांची छायाचित्रे घेण्याचा मोह आवरता येत नाही.

‘एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन जी मी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगने

दीर्घ जिच्या त्या किंचाळीने

अशी तुतारी द्या मज लागुनि

समतावादी, पुरोगामी केशवसुतांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ म्हटले गेले आहे. मालगुंड मधील हे स्मारक तमाम मराठी जनांनी, भाषाप्रेमींनी एकदातरी पहायला हवे. नव्या लेखनाची प्रेरणा आणि ऊर्जा येथून घेवून पुढे जायला हवे. किमान शाळांमधील मराठी कवितांमध्ये इथे येवून एकदातरी हरवून जायला हवे..

000

 -प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

9403464101

नगरविकास विभागाने समन्वयाने नवीन धोरण तयार करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २१: खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक पार पडली. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते)चे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे सहसचिव दीपक देसाई, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, नगरविकास विभागाचे सहसचिव निर्मलकुमार चौधरी, विधी व न्याय विभागाच्या उपसचिव मनिषा कदम, मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कटकधोंड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, सहसचिव दीपक पाटील, खजिनदार अरमान मल्लिक, कार्यकारी सचिव सी. एस. नाईक, सदस्य संदीप विचारे, प्रमोद यादव आणि महाव्यवस्थापक किंजल पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुंबईतील आझाद मैदान, ओव्हल मैदान व क्रॉस मैदान ही सर्व खेळांसाठी महत्त्वाची मैदाने आहेत. या मैदानांवर हजारो क्रीडापटू रोज विविध क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षणासह खेळाचा सराव करत असतात. ही तिन्ही मैदानाची मालकी महसूल विभागाची आहे. क्रीडा विभागामार्फत ती खेळाच्या क्लबला भाडेपट्टा कराराने देण्यात येतात. सध्या या तिन्ही मैदानांवरील भूखंडांवर साठहून अधिक क्लब खेळाडूंना प्रशिक्षणाच्या व सरावाच्या सुविधा देतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून तो पुन्हा करण्यासाठी महसूल विभाग, क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने एक स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करावे. हे नव्याने तयार करण्यात येणारे धोरण मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच आझाद मैदान, ओव्हल मैदान व क्रॉस मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ही स्वच्छतागृहे अत्याधुनिक करताना खेळाच्या सरावाला बाधा येऊ नयेत, तसेच मैदानाचे सौंदर्य खराब होऊ नये याची दक्षता घेत ती मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

 

ग्रामीण साहित्य : संकल्पना, स्वरूप व विकास

प्रस्तावना :

मराठी साहित्यात कथाकवितानाटकललित गद्यचरित्रआत्मकथन आदी वाङ्‍मय प्रकार आहेतस्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाजामध्ये राजकीयसामाजिकआर्थिकसांस्कृतिक क्षेत्रात अनेक चळवळी झाल्या. ग्रामीण जीवनाचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश असलेल्या या चळवळी काही प्रमाणात यशस्वी ठरल्या तर काही प्रमाणात अयशस्वी ठरल्या. या चळवळींमधून साहित्यामध्येही ग्रामीणदलितस्त्रिवादीआदिवासीजनवादी इत्यादी वाङ्‌मयीन प्रवाह निर्माण झाले. या सर्व प्रवाहांमध्ये महत्त्वाचा वाड्.मयीन प्रवाह म्हणजे ग्रामीण साहित्याचा प्रवाह होय. महात्मा जोतिबा फुले यांची मुख्य प्रेरणा असलेल्या साहित्य प्रवाहात प्रामुख्याने ग्रामीण लोकांच्या सुख-दुःखांचाव्यथा-वेदनांचाश्रद्धा-अंधश्रद्धांचारुढी-परंपरांचाकृषिनिष्ठ समाजव्यवस्थेचा चर्चेचा विषय येतो. महात्मा गांधीजवाहरलाल नेहरूशाहू महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरकर्मवीर भाऊराव पाटीलइंदिरा गांधी यांच्या समाजक्रांतीकारी विचाराने समाजामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली व या सर्व गोष्टींचा प्रभाव साहजिकपणे ग्रामीण साहित्यावर पडला. घटनेने दिलेल्या लेखन व भाषण स्वातंत्र्याचा वापर करत ग्रामीण सुशिक्षित तरूण आपल्या व्यथावेदनासुखदुःखे साहित्यात मांडू लागलात्यामध्ये व्यंकटेश माडगूळकरश्री. म. माटेआनंद यादवशंकर पाटीलग.ल. ठोकळरा. रं. बोराडेसदानंद देशमुख इत्यादी अनेक प्रतिभा संपन्न माणसांची नावे घेता येतील. या सर्व प्रतिभासंपन्न लोकांनी आपल्या ग्रामीण बोलीत आपलं रोजचं जगणंबोलणंवागणं मांडायला सुरवात केली. यासाठी त्यांनी कथाकादंबरीकवितानाटकवैचारिक लेखन इत्यादी वाड्.मयीन प्रकार हाताळले. या सर्व वाङ्‌मयीन प्रकारामधून त्यांनी ग्रामीण जीवनजाणीवा कशा पद्धतीने जिवंत केल्या आणि ग्रामीण साहित्य चळवळीच्या साहित्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे.

ग्रामीण’ साहित्य संकल्पना :

मराठी साहित्यात ‘ग्रामीण’ ही संज्ञा सर्वसाधारणपणे १९२५ पासून रूढ झाली आहे. कोणतीही संकल्पना किंवा संज्ञा एकदम अस्तित्वात येत नसते. त्यापाठीमागे कोणतीतरी पार्श्वभूमी असते अशीच पार्श्वभूमी ‘ग्रामीण’ या संज्ञेच्या निर्मितीमागेही आहे हे लक्षात घ्यायला हवे.

ग्राम म्हणजे खेडं. आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. सत्तर-ऐंशी टक्के समाज खेड्यांमध्ये राहतो. शेतकरी हा खेड्यातील प्रमुख घटक आहे. खेड्यात राहणारा शेतकरी हा शेती आणि निसर्गाशी संबंधित असा घटक आहे. शेती व्यवसायनिसर्गाचे सान्निध्यतुरळक लोकवस्तीएकजिनसीपणाभौगोलिकता इत्यादी वैशिष्ट्यामुळे हा समाज शहरी जीवनापासून वेगळा ठरतो. या समाजाची स्वत:ची अशी संस्कृती निर्माण होऊन या खेड्याची रचना ही एका विशिष्ट पध्दतीनुसारच रचलेली असते. या विशिष्ट पध्दतीच्या ग्रामव्यवस्थेच्या रचनेविषयी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, “या देशात अनेक राज्यव्यवस्था आल्या गेल्या परंतुग्रामव्यवस्था कायम राहिली.”

कृषिकेंद्रित रचना’ हे ग्रामसंस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याने ग्रामव्यवस्थेत शेतकरी हा प्रमुख घटक असतो. संपूर्ण ‘गावगाडा’ शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झाल्याचे दिसून येते. त्रि. ना. अत्रे यांनी ग्रामरचनेविषयीचे चित्र रेखाटले आहे ते असे, “खेडे म्हटले की अगोदर चटकन काळीच डोळयापुढे उभी राहते. शेतेपिकेगवतझाडेगुरेढोरेशेळया मेंढयामेंढकेशेतकरीगुराखेपाटबुडक्याविहिरीनांगरकुळवमोटमळागोफण वगैरे. बळीराजाचे वैभव खेड्याचे नाव काढताच इतके मन व्यापून टाकते कीखेड्यात शेतीखेरीज दुसरा व्यवसाय चालत असेल किंवा शेतकऱ्याखेरीज दुसरे कोणी रहात असेल असे एकाएकी मनातही येत नाही. कुणबी पुढे झाल्याखेरीज एकाही खेड्याची वसाहत झाली नाही. त्याने धान्य पैदा करून इतरांच्या खाण्याची तरतूद केली तेव्हा इतर गोळा झाले.

कृषिजीवनाशी निगडित असणारे सणउत्सव साजरे केले जातात. ग्रामीण जीवन हे शेतीपाऊसनिसर्गातील घटक यांच्याशी निगडित असते. भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असते. ग्रामसंस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला अधिक महत्त्व असते. शेतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी एकत्रित कुटुंबपध्दतीला महत्त्व असते पणआजच्या काळात ही पध्दती कोलमडून पडलेली दिसते. ग्रामीण भागात परिवर्तन होत असले तरी जातिव्यवस्था नष्ट झालेली नाही प्रत्येक जातीची स्वत:ची अशी एक स्वतंत्र रचना असतेवेगवेगळी संस्कृती असते.

ग्रामीण व्यक्ती ही कुटुंबालाकुटुंब जातीलाआणि जात गावगाड्याला बांधलेली असते. या साऱ्या विवेचनातून असे लक्षात येते कीमाणसाच्या मनोविश्वाचे आणि व्यवहाराचे चित्र ग्रामीण साहित्यातून प्रकट होत जाते. ग्रामीण जीवनातील वास्तव प्रकट होते.

थोडक्यातग्रामीण साहित्यात ग्रामीण माणसाचे माणूस म्हणून असणारे धर्म प्रकट होतात. ग्रामीण साहित्य हे व्यक्तीकेंद्रित असते. कृषिकेंद्रित संस्कृती या संस्कृतीने निर्माण केलेले लोकमानसगावगाडा यातूनच ग्रामीण साहित्य आकारास येते. ग्रामसंस्कृतीतूनच ‘ग्रामीण’ साहित्याची संकल्पना उदयास आली आणि ती झाली.

ग्रामीण साहित्य हे ग्रामीण व्यवस्थेशी संबंधित असते. “कृषिकेंद्रित व्यवस्था निसर्गसन्मुख आणि आदिमातेशी संवाद साधू पाहणारी स्वतंत्र अशी व्यवस्था म्हणजे ग्रामीण व्यवस्था.” हे नागनाथ कोत्तापल्लेचे मत उचित ठरते.

ग्रामीण साहित्य व्याख्या :

ग्रामीण साहित्य निर्मिती होऊन आज पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी ग्रामीण साहित्याची समीक्षा करणारे समीक्षक अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असले तरी ग्रामीण साहित्यसमीक्षा उपेक्षितच राहिली आहे. एखादा समीक्षक ग्रामीण साहित्याचे लेख किंवा एखादा ग्रंथ निर्माण करतो हा एखादा अपवाद सोडता कोणत्याही समीक्षकाने ग्रामीण साहित्याची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाहीत.

१९६० नंतर ग्रामीण साहित्याने नवे रूप धारण केले. विविध भागातून ग्रामीण लेखकांचा उदय झाला. १९७५ नंतर ग्रामीण साहित्यात क्रांती घडून आली. ग्रामीण साहित्याने चळवळीचे स्वरूप धारण केले. ग्रामीण साहित्याची प्रथम दखल घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला तो ‘आनंद यादव’ या ग्रामीण लेखकानेच ग्रामीण साहित्याच्या अभ्यासाला यादवांचे ग्रंथ एक वरदानच ठरले असे म्हणावे लागेल.

आनंद यादवानंतर मराठी साहित्य समीक्षेत ग्रामीण साहित्यावर समीक्षा करणारे अनेक समीक्षक निर्माण झाले. नागनाथ कोत्तापल्लेभालचंद्र नेमाडेवासुदेव मुलाटेद. ता. भोसलेगो. म. कुलकर्णीचंद्रकुमार नलगेरवींद्र ठाकूर हे समीक्षक ग्रामीण साहित्याला लाभले. ग्रामीण साहित्याचा सखोलपणे अभ्यास करून त्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील ग्रामीण साहित्याला कोणत्याही एका व्याख्येत बांधणे अशक्यप्राय आहे. यावरून ग्रामीण साहित्याचा प्रवाह किती विस्तारित स्वरूपाचा आहे याची कल्पना येते. ग्रामीण साहित्याच्या विविध समीक्षकांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे अभ्यासता येतील.

१. डॉ. आनंद यादव :

खेडेगाव तेथील जीवनपध्दतीखास अशा रीतीशेतीतेथील निसर्गाशीमातीशी असलेले मानवी पण प्रदेशनिष्ठ वैशिष्ट्यपूर्ण संबंध तेथील एकूण संस्कृतीला लाभलेली काही प्रादेशिक वैशिष्ट्येमानवी जीवनाला लाभलेल्या आर्थिकसामाजिकधार्मिकज्ञानविषयकमर्यादा व त्यातून उद्भवणारे प्रश्नसमस्या इ. सर्व अनुभूतीतून निर्माण झालेले साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य होय.

२. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले :

ग्रामीण जीवनातून फुलणारे ग्रामीण वास्तवातून साकार होणारे साहित्य ते ग्रामीण साहित्य.”

३. डॉ. गो. म. कुलकर्णी :

आधुनिक काळाने ग्रामसंस्कृतीत जगलेला परंतु नवशिक्षणामुळे या संस्कृतीपासून कालांतराने अलग झालेला नव विचारवंतांचानवलेखकांचा जो वर्ग निर्माण झाला त्याला स्वतःचे वा इतराचे ग्रामीण जीवन जाणवते त्याचे दर्शन आजचा ग्रामीण लेखक प्राधान्याने घडवित असतो एकूणच आजचे वा कालचे ग्रामजीवन त्याचे मनोव्यापारसांस्कृतिक संवेदनसखोलपणे आणि सर्वागीण स्वरूपात ज्यात व्यक्त होते असे साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य.”

४. डॉ. भालचंद्र नेमाडे :

ग्रामीण संस्कृतीची ओढ आणि त्यातील आनंदतत्त्वाबद्दलची आस्था ग्रामीण साहित्यातून प्रकट होते.

थोडक्यात ग्रामीण जीवनपध्दतीग्रामीण माणसांचे मन आणि संस्कृतीचा ठेवा यांचा घेतला जाणारा शोध आणि बोध म्हणजे ग्रामीण साहित्य. या सर्व व्याख्यांवरून असा निष्कर्ष काढता येईल की, ‘ग्रामीणता’ साकार होण्यामध्ये कृषिनिष्ठ संस्कृतीनिसर्गसन्मुखता यातून निर्माण झालेले लोकमानस हे घटक महत्त्वाचे ठरतात. यातूनच जगण्याची एक ‘रीत’ साकार होत जाते या रीतीचे चित्रण ज्या साहित्यात आढळते ते ग्रामीण साहित्य.

 

ग्रामीण साहित्याचा विकास :

ग्रामीण साहित्याचा उदय आणि विकास खऱ्या अर्थाने विसाव्या शतकात झाला. एकोणिसाव्या शतकात ग्रामीण साहित्याचा पाया रचला गेला आणि विसाव्या शतकात खरेखुरे ग्रामीण साहित्य उदयास आले. ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना १९२५ पासून रूढ झाली तेव्हापासून ग्रामीण जीवनातील वास्तव चित्र मराठी साहित्यात दिसू लागले. ग्रामीण साहित्यात पहिला आविष्कार कवितांमधून झाला कवितांमधून ग्रामीण जीवन उमटू लागले पणया कवितांवर इंग्रजी कवितांचा प्रभाव जाणवतो. इंग्रजीतील ‘पॅस्टोरल पोएट्री’ (Postoral poetry) वरून मराठीत जानपदगीतेगोप – गीते निर्माण झाली असली तरी ग्रामीण साहित्याला एक दिशा मिळाली हे निश्चित मानावे लागेल. भा. रा. तांबेकवी गिरीशग. ल. ठोकळ यांनी विशेषत: ग्रामीण वातावरणग्रामीण भाषा वापरून कविता निर्माण केल्या आहेत हे विसरून चालणार नाही.

१९२० मध्ये टिळकयुगाचा अस्त झाला आणि गांधीयुगाचा प्रारंभ झाला. ‘गांधीवाद’ ग्रामीण साहित्याचा प्रेरणास्त्रोत ठरला. राजकीयसामाजिकसांस्कृतिकधार्मिकपरिवर्तन घडलेसारा समाज ढवळून निघाला. या सर्व घटनांचा परिणाम साहित्यावरही तितकाच प्रखरतेने झाला. साहित्यातही नवे परिवर्तन झाले. गांधीजींच्या विचारांनी साऱ्या जीवनाला व्यापून टाकले होते. ‘खेड्याकडे चला’ हा मूलमंत्र गांधीजींनी जनतेला देऊन खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात घडविले. खेड्याचे महत्त्व नव्या जाणिवासह पटवून दिले. खेड्याचा उध्दार करून विषमताअज्ञानदारिद्र्य यांना दूर करून भारताला प्रगत राष्ट्र बनवायचे गांधीजींचे स्वप्न होते. गांधीजींचे विचार अत्यंत प्रभावी होते त्यात शंकाच नव्हती. त्याच्या प्रगल्भशाली विचारांचा प्रभाव इतका जबरदस्त होता कीग्रामीण साहित्याची नवी कवाडे उघडली गेली असे म्हणावयास हरकत नाही. १९२५ नंतर ग्रामीण साहित्यावर गांधीजींच्या विचाराचा प्रभाव अधिक जाणवतो.

१९२५ नंतरच्या ग्रामीण साहित्यात वेगळेपण जाणवत असले तरी मराठी साहित्यापेक्षा फारसे वेगळे वाटत नाही. या संदर्भात नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत विचारात घेऊया. त्यांच्या मते, “१९२५ नंतर अवतरणाऱ्या ग्रामीण साहित्यामागील प्रेरणांचे वेगळेपण दिसत असले तरी स्वरूप मात्र तत्कालीन एकूण मराठी साहित्यापेक्षा फारसे वेगळे नाही. तत्कालीन मराठी साहित्य हे मोठया प्रमाणात ‘स्वप्नरंजनपर’ आणि ‘अवास्तव कल्पनाविश्वात रमणारे आहे. ग्रामीण साहित्य या पेक्षा फारसे वेगळे आहे असे म्हणता येणार नाही.”

१९२३ मध्ये रविकिरण मंडळाचा उदय झाला. या मंडळातील अनेक कवींनी ग्रामीण जीवनाविषयक कविता निर्माण करून ग्रामीण जीवनाचे चित्र टिपले आहे. कवी गिरीशकवी यशवंतभा. रा. तांबे यांच्या काव्याने विशेष लक्ष वेधून घेतले. १९३१ मध्ये वि. स. सुखटणकर यांनी ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ हा कथासंग्रह प्रसिध्द करून खेड्यातील समाज दर्शन घडविले. १९३२ मध्ये ग. ल. ठोकळांनी ‘मीठभाकर’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिध्द करून ग्रामीण जीवन चित्रण केले आहे.

याच दरम्यान ग्रामीण साहित्यात एक नवा प्रवाह येऊन मिळाला. तो प्रवाह म्हणजे ‘प्रादेशिक’ ग्रामीण संज्ञेप्रमाणेच ‘प्रादेशिक’ ही संज्ञाही रूढ झाली. साधारणत: १९२७२८ पासून प्रादेशिक जीवनचित्रण साहित्यातून प्रकट होऊ लागले होते. वि. स सुखटणकरांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ (१९३१) या कथासंग्रहातून गोमांतक प्रदेशाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. १९३० साली मडगावच्या साहित्य संमेलनात ‘प्रादेशिक’ ही संज्ञा ऐकल्याचे कवी बा. भ. बोरकरांनी सांगितले आहे.

प्रादेशिक’ ही संज्ञा ‘ग्रामीण’ या संज्ञेपेक्षा व्यापक स्वरूपाची मानली जाते. या संदर्भात मधु कुलकर्णी लिहितात, “ग्रामीण साहित्य आणि प्रादेशिक साहित्य यामध्ये काहींनी भेद मानलेला आढळतो पणपरिसर म्हणजेच प्रदेश हे मान्य असल्यास ग्रामीण व प्रादेशिक या संज्ञा समानधर्मीच आहेत हे मान्य होण्यास हरकत नाही. किंचितसा फरक मानायचाच झाला तर ‘प्रादेशिक’ ही संज्ञा ‘ग्रामीण’ संज्ञेपेक्षा जास्त व्यापक आहे असे फार तर म्हणता येईल.

आनंद यादवांनी प्रादेशिक वाङ्मय ग्रामीण वाङ्मयातच असते असे मत व्यक्त करून पुढे ते असेही म्हणतात, “ग्रामीण वाङ्मय असा शब्दप्रयोग मराठीत करीत असताना त्या वाङ्मयाकडून तेथील समूहाच्या ग्रामजीवनाची अपेक्षा नसते. तेथील एखाद्या व्यक्तीचे जीवनदर्शनही ग्रामीण वाङ्मयात चालते प्रादेशिक वाङ्मयात त्या प्रदेशातील ग्रामविभागाचे समूहदर्शन अभिप्रेत असण ग्रामीण वाङ्मयात त्या त्या ग्रामविभागातील व्यक्तीनिष्ठ जीवन अभिप्रेत असते. तो त्या प्रदेशाचाच पर्यायाने एक भाग असतो.

प्रादेशिक वाङ्मय हे ग्रामविभागातील समूहजीवनदर्शन आणि ग्रामीण वाङ्मय म्हणजे ग्रामविभागातील व्यक्तिनिष्ठ जीवनदर्शन असा भेद करून प्रादेशिक वाङ्मय हे त्या प्रदेशातील ग्रामजीवनाचेच चित्रण असते असा समन्वय साधून ‘ग्रामीण वाङ्मय’ या शब्दावर अधिक भर यादवांनी दिलेला आहे.

प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ या संज्ञात काही साम्य असले तरी त्या वेगवेगळया आहेत असे नागनाथ कोत्तापल्ले नमूद करतात पुढे ते असेही म्हणतात, “… प्रादेशिक साहित्य ग्रामजीवनालाग्रामसंस्कृतीला फारसे महत्त्व देत नाही तर महत्त्व देते ते एका विशिष्ट प्रदेशाच्या समग्र टप्प्याला कधी ग्रामजीवन आलेच तर ते स्वतंत्रपणे येत नाही ते येते त्या प्रदेशातील समग्र संस्कृतीचा एक भाग म्हणूनच येते ग्रामसंस्कृतीपेक्षा त्या प्रदेशाचा टापू अधिक महत्त्वाचा असतो त्या दृष्टीने प्रादेशिक साहित्यातून व्यक्तिकेंद्रितता दिसत नाही तर समूहकेंद्रितता हे या साहित्याचे वैशिष्ट्य असते.

थोडक्यात ‘प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ या दोन संज्ञामध्ये काही साम्य भेद दिसून येत असले तरी हे दोन्हीही प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत असेच म्हणणे अधिक योग्य ठरेल. ग्रामीण संज्ञेसोबतच प्रादेशिक संज्ञेची वाटचाल झाली आहे.

१९४१ पासून ग्रामीण साहित्याला विशेष बहर आला. र. वा. दिघ्यांनी ‘पाणकळा’ (१९३९) निर्माण करून प्रादेशिकतेची खाण शोधली. र. वा. दिघेग. ल. ठोकळविशेषतः श्री. म. माटे यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ (१९४१) हा ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द करून ग्रामीण भागातील दलितांच्या उपेक्षित भटक्या जीवनाचे अंतरंग उलगडून दाखविले आहे.

१९४१ ते १९६० च्या दरम्यान ग्रामीण साहित्याला नवी दिशा मिळाली. श्री. ना. पेंडसेगो. नी. दांडेकार यांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव आपल्या लेखणीतून समृध्दपणे आविष्कृत केला. याच काळात ग्रामीण साहित्यात नवे पर्व सुरू झाले. नव्या चाकोरीतील ग्रामीण लेखकांचा उदय झाला. व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य एक नवतेज घेऊन जन्माला आले. माडगूळकरांबरोबर शंकर पाटीलद. मा. मिरासदार अशा काही लेखकांनी ग्रामीण साहित्याला एक नवदिशा दिली.

काही ग्रामीण स्त्री लेखिका उदयास आल्या बहिणाबाई चौधरीप्रतिमा इंगोले या ग्रामीण स्त्री लेखिकांनी ग्रामीण साहित्य विस्तारात मोलाचा हातभार लावला आहे.

ग्रामीण’ या संज्ञेबरोबरच ‘प्रोदशिक’ या संज्ञेनेही चांगलाच जोम धरला होता. श्री. ना. पेंडसेव्यंकटेश माडगूळकर यांच्या कादंबरीतून प्रदेशाचे जिवंत चित्रण दिसून आले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ (१९५५) या कादंबरीने ‘प्रादेशिक’ हा शब्द सार्थकी लावला असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

१९६० नंतरच्या ग्रामीण साहित्याने फार मोठी झेप घेतली. या काळात ग्रामीण लेखकांची नवविचारांची नवी पिढी उदयास आली. आपल्या ग्रामीण जीवनानुभवाची शिदोरी घेऊन ग्रामीण साहित्याला नवजीवन दिले. उध्दव शेळकेरा. रं. बोराडेआनंद यादवना. धो. महानोरमहादेव मोरेसखा कलालबाबा पाटीलशंकरराव खरातआनंद पाटील याशिवाय अन्य लेखकांनी विविध भागातील ग्रामीण वास्तवाचे जीवनचित्रण करून बदलत्या ग्रामीण वास्तवाला लक्षणीय पध्दतीने हाताळले आहे.

१९७५ नंतर ग्रामीण साहित्यास नवउभारी मिळाली. ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा उदय होऊन या चळवळीतून ग्रामीण लेखकांचा एक वर्ग उदयास आला. राजन गवसअरूण साधूबाबा भांडचंद्रकुमार नलगेदेवदत्त पाटीलमनोहर तल्हारवासुदेव मुलाटेभास्कर चंदनशिवनागनाथ कोत्तापल्लेयोगिराज बाघमारेइंद्रजित भालेरावसदानंद देशमुख या लेखकांनी ग्रामीण साहित्यात अमूल्य अशी भर घातली आहे. ग्रामीण साहित्यात या लेखकांनी आमूलाग्र बदल घडवून आणला.

लेखक जेथे जन्मलाजेथे वाढलाज्या निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्तपणे जगलातेथील परिसराच्या रंगगंधासह बऱ्या वाईट अनुभवासह तो बरेच काही शिकला या अनुभवातूनच त्यांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याला आकार दिला.

१९८० च्या दरम्यान खेड्यातील एकूणच समाजजीवन बदलले. ग्रामीण भागातील शिक्षित झालेला लेखक वर्ग स्वत:ला आलेले अनुभव आणि ग्रामीण भागाचे चित्रण ग्रामीण साहित्यात करू लागला.

समारोप :

एकविसाव्या शतकात ग्रामीण साहित्यविश्वात अग्रेसर म्हणून प्रा. सदानंद देशमुख या लेखकांचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. ग्रामीण साहित्यातील नव्या दमाचे ग्रामीण लेखक प्रा. सदानंद देशमुख यांनी ग्रामीण साहित्यात मोलाची अशी भर घालून स्वत:चा असा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. २१ व्या शतकाच्या उंबरठयावरचे बदलते खेडे तेथील ग्रामीण जीवन आणि निसर्गाशी चालणारा जीवनसंघर्ष याचे चित्रण ‘तहान’ (१९९८) या कादंबरीत आले आहे. धगधगत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करून ग्रामीण साहित्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य केले आहे. या नव्या ग्रामीण लेखकाने ग्रामीण साहित्यातून वर्तमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कथा कादंबऱ्यातून ग्रामीण जीवनाचे भेदक चित्रण वाचकासमोर उभे केले आहे. त्यांनी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे.

– डॉमारोती गायकवाड

सहाय्यक प्राध्यापक  संशोधन मार्गदर्शक

मराठी विभागभारतीय तथा विदेशी भाषा संस्था

एमजीएम विद्यापीठछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

मो७९७२३८२५५६

संदर्भ सूची :

१.         शिंदे विठ्ठल : ‘रामजी शिंदे लेखसंग्रह’, (संपादक) मंगुडकरपृ. १८४.

२.         अत्रे, त्रि. ना. : ‘गावगाडा’, राजहंस प्रकाशनपुणे२०१६पृ. १-२.

३.         कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणेपृ१९७

४.         यादव, आनंद : ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणे १९७९, पृ. ६.

५.         कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणे, पृ. ७.

६.         कुलकर्णी गो. म. : ‘ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही’, (संपादक) मुलाटे वासुदेवलेख ‘ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्ताने’, पृ. ३६.

७.         नेमाडे, भालचंद्र : ‘टीकास्वयंवर’, साकेत प्रकाशनऔरंगाबाद१९९०पृ३७

८.         कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणेपृ. ३.

९.         कुलकर्णी, मधु : ‘महाराष्ट्र साहित्यपत्रिका’, (ग्रामीण साहित्य विशेषांक)महाराष्ट्र साहित्य परिषदपुणेजुलै – डिसेंबर १९८०पृ. ४५.

१०.     यादव, आनंद : ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणे १९७९पृ. ६२.

११.     कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊसपुणे, पृ. १५.

www

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...