शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 171

आजपर्यंतची मराठी साहित्य संमेलने

केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्णय जाहिर करून आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकाचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आपल्या मायमराठीचा जागर करण्यासाठी सज्ज झाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे हे देखील मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. मराठी साहित्य हे आपल्या संस्कृतीचे सजीव प्रतीक आहे ज्याने काळानुसार समाजाला मार्गदर्शन केले आहे. मराठी साहित्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तिप्रधान आणि लोकप्रबोधन करणाऱ्या विचारांपासून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकचळवळदर्शी लेखनापर्यंत आणि पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर आधारित जीवनदर्शनापर्यंत अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. मराठी लिहिणाऱ्यांनी भाषेचे माधुर्य दाखवताना प्रबोधनपर लेखनात मराठी वज्रासारखी किती कठीण होते हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. समाजाला विचारशील बनवण्याचे कार्य केले आहे. प्रत्येक पिढीतील बदलांना आपलेसे करण्याचे औदार्य मराठी साहित्यातून प्रकट होत आले आहे. समाजातील सर्व घटकांची भाषा आत्मसात करताना साहित्य अधिक समृद्ध आणि समकालाशी सुसंगत करणारी तरूण पिढी निर्माण होत राहिली हे मराठीचे भाग्यच आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यिकांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल माध्यमातून मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. मुलांचाच नव्हे तर पोक्त पिढीचाही स्क्रीन टाईम वाढत असताना या सर्वांना पुन्हा एकदा साहित्याकडे वळविणे हे सोपे काम नाही याची जाणीव आहे. त्यासाठी नव्या प्रयोगांची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनातून होणाऱ्या परिसंवादातून आणि चर्चांतून याबाबत उहापोह केला जाईल असा मला विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केला.

सुमारे २००० वर्षांपासूनची आपली भाषिक परंपरा एकविसाव्या शतकापर्यंत अव्याहत चालत आलेली आहे. हाल सातवाहनाने तत्कालीन लोकसाहित्यातील महाराष्ट्री प्राकृतातील गाथांचा संग्रह करून गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा ग्रंथ रचला. ह्या लोकभाषेच्या प्रवाहाला विविध धर्मपंथाच्या साहित्याने समृद्ध केले. लीळाचरित्र आणि त्यापासून सुरू झालेली महानुभावीय साहित्याची सघन परंपरा ज्ञानदेवी एकनाथी भागवत विविध संतांची अभंगवाणी आणि त्यावर तुकाबारायांच्या अभंगगाथेने चढवलेला कळस ह्यांमुळे तुकोबांच्या गाथेप्रमाणेच मराठी भाषाही लोकगंगेच्या प्रवाहासोबत वाहती राहिली. पंडित कवी आणि शाहिरांनी तिला नटवले. शिवछत्रपतींनी तिला राजभाषेचा सन्मान दिला. सामर्थ्य दिले. एकोणिसाव्या शतकात अन्य भाषांशी आणि साहित्यप्रवाहांशी संपर्क आल्याने अभिव्यक्तीच्या अनेक विधा तिने आत्मसात केल्या. पारतंत्र्यात तिने स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत ठेवली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाही बळकट करण्यासाठी ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा होऊन नागरिकांच्या अभिव्यक्तीचा आधार बनली आहे. आत्मबोधापासून समाजप्रबोधनापर्यंत आणि मनोरंजनापासून अन्यायनिर्मूलनापर्यंतची विविध वैयक्तिक आणि सामाजिक कार्ये पार पाडण्यासाठी आपली भाषा आपल्याला सक्षम करत आलेली आहे. लोकांच्या अभिव्यक्तीतून साकारलेल्या मराठी भाषेच्या साहित्याचा उत्सव आपण साजरा करत असताना त्या उत्सवाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृती आणि लोककला ह्यांच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर ह्यांची निवड होणे हा एक सुखद योग जुळून आला आहे. बालकाला आत्मसात होणाऱ्या पहिल्या भाषेला मायबोली अथवा मातृभाषा म्हणतात हा केवळ योगायोग नाही. भाषेच्या आणि संस्कृतीच्या विकासात स्त्रियांचा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या अभ्यासातून ह्या योगदानाचा साक्षेपाने आढावा घेणाऱ्या डॉ.भवाळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले हे संमेलन मराठी साहित्य मराठी भाषा ह्यांच्या पुढील वाटचालीत निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान संपन्न होत आहे. या गौरवास्पद संमेलनाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हे संमेलन मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या गौरवशाली परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरते.

मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने हे संमेलन विशेष महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध नामवंत साहित्यिक कवी विचारवंत अभ्यासक तसेच नव्या पिढीतील साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. संमेलनात मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात विविध चर्चासत्रे परिसंवाद कवी संमेलने ग्रंथप्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याची परंपरा त्यांनी ठेवली आहे. ही बाब त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेम आदर आणि आपलेपणाचा उत्तम प्रत्यय देणारी आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये मराठी संस्कृती आणि साहित्याच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले आहे. मराठी ही केवळ महाराष्ट्राची भाषा नसून ती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचा एक अभिमानास्पद भाग आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या उपस्थितीमुळे या संमेलनाचे महत्त्व आणखी वाढले असून मराठी साहित्याचा सन्मान वाढवण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. हे संमेलन मराठी भाषा आणि साहित्याची महती वाढवण्यास मोठे योगदान देईल. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला नवी प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होण्यास चालना मिळेल. मराठी भाषा आणि साहित्याच्या गौरवशाली वारशाचा जागर करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या या ९८व्या सम्मेलनांबरोबर मागील सम्मेलनाची माहिती घेऊ या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली सन १८७८ पुणे येथे पहिले अखिल भारतीय साहित्य सम्मेलन भरविण्यात आले होते. त्यानंतर दुसरे सम्मलेन १८८५ साली कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे तर १९०५ साली सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

चौथे सम्मलेन १९०६ पाचवे सम्मलेन १९०७ आणि सहावे सम्मेलन १९०८ साली पुणे येथे मराठी साहित्य सम्मेलने पार पडली. या सम्मेलनाचे अनुक्रमे वासुदेव गोविंद कानिटकर विष्णु मोरेश्वर महाजन आणि चिंतामण विनायक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९०९ साली बडोदे येथे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर १९१२ साली अकोला येथे हरी नारायण आपटे आणि १९१५ साली मुंबई येथे गंगाधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य सम्मेलन यशस्वीरित्या संपन्न झाले. सन १९१७ साली दहावे मराठी साहित्य सम्मेलन हे इंदूर येथे गणेश जनार्दन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली अकरावे मराठी साहित्य सममेलन बडोदे येथे १९२१ साली संपन्न झाले. १९२६ साली मुंबई येथे माधव विनायक किबे १९२७ साली पुणे येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर १९२८ साली ग्वाल्हेर येथे माधव श्रीहरी अणे १९२९ साली बेळगाव येथे शिवराम महादेव परांजपे १९३० साली मडगाव येथे वामन मल्हार जोशी १९३१ साली हैदराबाद येथे श्रीधर व्यंकटेश केतकर १९३२ साली कोल्हापूर येथे महाराजा सयाजीराव गायकवाड १९३३ साली नागपूर येथे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर तर १९३४ साली बडोदे येथे नारायण गोविंद चापेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य सम्मेलन पार पडले.

एकविसावे मराठी सम्मेलन हे १९३५ साली इंदूर येथे भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९३६ साली जळगाव येथे माधव जुलियन/माधव त्रिंबक पटवर्धन १९३८ साली मुंबई येथे विनायक दामोदर सावरकर १९३९ साली अहमदनगर येथे दत्तो वामन पोतदार १९४० साली रत्नागिरी येथे नारायण सीताराम फडके १९४१ साली सोलापूर येथे विष्णू सखाराम खांडेकर १९४२ साली नाशिक येथे प्रल्हाद केशव अत्रे १९४३ साली सांगली येथे श्रीपादा महादेव माटे १९४४ साली धुळे येथे भार्गवराम विठ्ठल वरेरकर १९४६ साली बेळगाव येथे गजानन त्र्यंबक माडखोलकर १९४७ साली हैदराबाद येथे नरहर रघुनाथ फाटक १९४९ साली पुणे येथे शंकर दत्तात्रय जावडेकर १९५० साली मुंबई येथे यशवंत दिनकर पेंढारकर/कवी यशवंत १९५१ साली कारवार येथे अनंद काकबा प्रियोळकर १९५२ साली अमळनेर येथे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी १९५३ साली अहमदाबाद येथे वि.द.घाटे १९५४ साली दिल्ली येथे लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी १९५५ साली पंढरपूर येथे शंकर दामोदर पेंडसे १९५७ साली औरंगाबाद येथे अनंत काणेकर आणि १९५८ साली चाळीसावे मराठी साहित्य सम्मेलन हे मालवण येथे अनिल/ आत्माराम रावजी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
एकेचाळीसावे मराठी साहित्यस संमलेन १९५९ साली मिरज येथे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर १९६० साली ठाणे येथे रामचंद्र श्रीपाद जोग १९६१ साली ग्वाल्हेर येथे कुसुमावती देशपांडे १९६२ साली सातारा येथे नरहर विष्णू गाडगीळ १९६४ साली मडगाव येथे वि.वा.शिरवाडकर/ कुसुमाग्रज १९६५ साली सातारा येथे वामन लक्ष्मण कुलकर्णी १९६७ साली भोपाळ येथे विष्णू भिकाजी कोलते १९६९ साली वर्धा येथे पु.शि.रेगे १९७३ साली यवतमाळ येथे गजानन दिगंबर माडगूळकर आणि १९७४ साली इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पन्नासावे संमेलन संपन्न झाले. पुढील ५१ वे मरराठी साहित्य सम्मेलन हे १९७५ साली कऱ्हाड येथे दुर्गा भागवत १९७७ साली पुणे पु.भा.भावे १९७९ साली चंद्रपूर येथे वामन कृष्ण चोरघडे १९८० साली बार्शी येथे गं.बा.सरदार १९८१ साली अकोला येथे गो.नी.दांडेकर १९८१ साली रायपूर (छत्तीसगढ) येथे गंगाधर गाडगीळ १९८३ साली अंबेजोगाई येथे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर १९८४ साली जळगांव येथे शंकर रामचंद्र खरात १९८५ साली नांदेड येथे शंकर बाबाजी पाटील आणि १९८८ साली साठावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

६१ वे मराठी साहित्य सम्मेलन १९८८ साली ठाणे येथे वसंत कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. १९८९ साली अमरावती येथे केशव जगन्नाथ पुरोहित १९९० साली पुणे येथे यू.म. पठाण १९९० साली रत्नागिरी येथे मधू मंगेश कर्णिक १९९२ साली कोल्हापूर येथे रमेश मंत्री १९९३ साली सातारा येथे विद्याधर गोखले १९९४ साली पणजी येथे राम शेवाळकर १९९५ साली परभणी येथे नारायण सुर्वे १९९६ साली आळंदी येथे शांता शेळके १९९७ साली अहमदनगर येथे ना.सं.इनामदार १९९८ साली परळी-वैजनाथ येथे द.मा.मिरासदार १९९९ साली मुंबई येथे वसंत बापट २००० साली बेळगांव येथे य.दि.फडके २००१ साली इंदूर येथे विजया राजाध्यक्ष आणि २००२ साली पुणे येथे राजेंद्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पंचाहत्तरवे मराठी साहित्य सम्मेलन यशस्वीपणे संपन्न झाले.

७६ वे मराठी साहित्य सम्मेलन २००३ साली कऱ्हाड येथे सुभाष भेंडे २००४ साली औरंगाबाद येथे रा.ग. जाधव २००५ साली नाशिक साली केशव मेश्राम २००६ साली सोलापूर येथे मारुती चितमपल्ली २००७ साली नागपूर येथे अरुण साधू २००८ साली सांगली येथे म.द. हातकणंगलेकर २००९ साली महाबळेश्वर येथे आनंद यादव २०१० साली पुणे येथे द.भि.कुलकर्णी २०१० साली ठाणे येथे उत्तम कांबळे २०१२ साली चंद्रपूर येथे वसंत आबाजी डहाके २०१३ साली चिपळूण येथे नागनाथ कोत्तापल्ले २०१४ सासवड येथे फ.मुं.शिंदे २०१५ साली घुमान (पंजाब) येथे सदानंद मोरे २०१६ साली पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे श्रीपाल सबनीस आणि २०१७ साली डोंबिवली येथे अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर एक्यान्नववे साहित्य सम्मेलन २०१८ साली बडोदे येथे लक्ष्मीकांत देशमुख २०१९ साली यवतमाळ येथे अरुणा ढेरे संपन्न झाले.
९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक १० ११ १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ९४ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक २६ २७ २८ मार्च २०२१ रोजी नाशिक येथे जयंत नारळीकर आणि ९५वे सम्मेलन दिनांक २२ २३ २४ एप्रिल २०२२ रोजी उदगीर येथे भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. ९६ वे मराठी साहित्य सम्मेलन दिनांक ३ ४ ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर ९७ वे दिनांक २ ३ ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर (जळगाव) येथे रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तर यंदाचे ९८वे अखिल भारतीय मरराठी साहित्य सम्मेलन हे दिनांक २१ २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
– संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी
0000

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा पूर्णपणे सुरक्षित नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये – महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण
बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत. सध्या प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
याअनुषंगाने नागरिकांमध्ये गैरसमज पसरु नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.
मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते. हे सांधे आणखी रुंद होवू नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. या ठिकाणी आता अस्फाल्टचा नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, हे नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी कृपया लक्षात घ्यावे. कारण सदर दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. परिणामी, त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. सबब, प्रकल्पातील मार्ग बांधणीमध्ये कोणताही दोष नाही, हे सिद्ध होते.
उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व मुंबईकरांना, नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येते की, कृपया कोणत्याही अपुऱया माहितीवर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे. त्याच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत, बांधकाम दर्जाबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नयेत, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
000

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी राज्यभरातील आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव 

मुंबई, दि. २१ : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्हा-जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या राजाला वंदन करताना विद्यार्थ्यांनी आदर्श शिवजयंती उत्सव साजरा केल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवायचा आहे. आपल्या भारताची उद्याची पिढी बलशाली, आत्मनिर्भर, कुशल आणि समृद्ध व्हावी, यात महाराष्ट्र अग्रेसर असावे या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आदर्श शिवजयंती उत्सव साजरा करण्याची संकल्पना साकारली असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. महामानवांच्या आदर्श कार्यकुशलतेची आणि त्यांच्यातील प्रतिभेची जाणीव व जागृती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यातून आदर्श विद्यार्थी आणि आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, हाच प्रामाणिक एकमेव उद्देश असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त राज्यभरातील आयटीआयमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. प्रत्येक आयटीआयमध्ये महाराजांच्या प्रतिमेस, तसेच संस्थेच्या प्रांगणातील स्मारकास पुष्पहार अर्पण करून या आदर्श जयंती उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल मान्यवरांकडून उपस्थितांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहीम, शिवकालीन नाट्य आणि कलांचा आविष्कार असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षभेट अशा विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश यात करण्यात आला होता. यावेळी आयटीआयमधील विद्यार्थ्यांसह प्राचार्य आणि शिक्षक या सोहळ्यात सहभागी झाले होते.

०००

आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २१: आसियान देशांमधून भारत भेटीवर आलेल्या महिला उद्योजिका फिक्की महिला आघाडीच्या सहकार्याने भारतातील उद्योगांशी करीत असलेले परस्पर सहकार्य कौतुकास्पद असून यातून सर्व देशांमधील महिला उद्योजकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

भारत आणि आसियान देशांमधील २० आघाडीच्या महिला उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

भारत आणि आसियान देशांमधील उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सर्व देश परस्परांशी थेट विमानसेवेने जोडणे आवश्यक आहे, असे सांगून नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरु होत असून त्यानंतर मुंबई अनेक देशांशी थेट विमान सेवेने जोडले जाईल व त्यातून उद्योगांना चालना मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाहून तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत असून भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी सध्याची वेळ अतिशय योग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महिला उद्योजिकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना धन्यवाद दिले.

आसियान देशांमधील महिला उद्योजक नेत्यांच्या या भेटीचे आयोजन फिक्की संसथेच्या महिला विभागाद्वारे करण्यात आले होते.

यावेळी फिक्की मुंबई महिला विभागाच्या अध्यक्षा आर्मीन दोर्डी व आसियान इंडिया अध्यक्षा विनिता बिंबेट यांनी महिला उद्योजिकांच्या भारत भेटीबाबत माहिती दिली.

फिलिपिन्स येथील संस्थेच्या आसियान सह-अध्यक्षा पॅसीटा जुआन, उद्योजिका मारिया ख्रिस्तिना कॉन्सेपसियान,  तसेच इतर फिलिपिन्स आणि म्यानमार येथील महिला उद्योजिका यावेळी उपस्थित होत्या.

आसियान देशांतील महिला उद्योजिका आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी भारतभेटीवर आल्या आहेत.

०००

पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारणाच्या कामांचा आढावा

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारणाच्या विविध कामांचा पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. येत्या तीन महिन्यात जास्तीत जास्त कामे पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.निपाने, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पांडे यांच्यासह जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षातील मंजूर कामे, प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, सुरु झालेली कामे, पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली व सुरुच न झालेल्या जिल्ह्यातील सर्व कामांची माहिती घेतली. तालुकानिहाय अपुर्ण कामांची माहिती घेतांना येत्या तीन महिन्यात म्हणजे पावसाळा लागण्यापुर्वी बहुतांश कामे पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, जलसंधारण महामंडळाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेतला. जलयुक्त शिवाय योजनेचा जिल्ह्याचा ४० कोटींचा आराखडा आहे. या योजनेंतर्गत ३३० कामे मंजूर असून २८९ कामांना कार्यादेश देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेचा वाढीव आराखडा १३५ कोटी रुपयांचा करण्यात आला असून या आराखड्यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही योजना उत्तमप्रकारे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजना सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून योजनेंतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ठ ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले. सुरुवातीस संबंधितांनी आपआपल्या कामाचे सादरीकरण केले.

000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची मंगळवार २५ राेजी मुलाखत

मुंबई दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

 

‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू

तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय

नवी दिल्ली, दि. २१ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी मराठीजन, लोकनृत्यांचे सादरीकरण व ‘अभिजात मराठी’च्या जयघोषाने राजधानीतील तालकटोरा स्टेडियमचा अवघा परिसर मराठीमय झाला होता.

जुन्या संसद परिसरातील रकाबगंज गुरूद्वाराजवळ ग्रंथपूजन, ध्वजारोहण होऊन ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. यावेळी संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अ. भा. म. सा. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मावळते अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, खासदार सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, दिल्लीतील आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो मराठी बांधव मोठ्या उत्साहाने मराठमोळ्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. यावेळी पंढरपूर येथून साहित्य संमेलनासाठी आलेली विशेष दिंडीही सोबत होती.

ढोलताशाच्या गजरासह दिंडीत लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, पोवाडा, वासुदेव, आदिवासी नृत्य आदी लोककला, लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. यावेळी महिलांनी उत्स्फुर्तपणे फुगडी खेळली.

महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली दिल्लीकरांची मने

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, गड-किल्ले, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या रचना अशी आकर्षक सजावट चित्ररथावर करण्यात आली होती. दिल्लीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे विशेष चित्ररथ तयार करण्यात आला. या चित्ररथाच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या अभिजात भाषा- संस्कृतीचे दर्शन घडले.

०००

 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महत्त्व आणि मिळणारे लाभ

मराठी भाषा, जी भारतीय उपखंडातील एक प्रमुख भाषा आहे, तिचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ज्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. हा निर्णय केवळ भाषिक ओळखीतच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरही महत्त्वाचा ठरला आहे.

अभिजात भाषेचा दर्जा…

अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला, आणि संस्कृतीच्या गौरवाचा मान्यता मिळवणे. मराठी भाषेला हा दर्जा दिला गेल्यामुळे तिच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता मिळाली. अभिजात भाषांच्या यादीत समावेश झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काही निकष आहेत. या भाषेचा इतिहास प्राचीन असावा, त्यात मौल्यवान साहित्य असावे, आणि ती दुसऱ्या भाषांवर अवलंबून नसावी. मराठी भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांचा आहे, आणि तिचे साहित्य विविध शतकांमध्ये विकसित झाले आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण होते म्हणून केंद्र शासनाने दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे.

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारे लाभ-

१. संशोधन आणि अभ्यासाला चालना: अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे भाषाशास्त्रज्ञ आणि संशोधकांना अधिक संधी उपलब्ध झाल्यावर मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर संशोधन मोहीम सुरू होऊन मराठी भाषा अधिक विस्तृत होईल.

२. विद्यापीठांमध्ये शिक्षण: भारतातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही विद्यापीठात त्यांच्या मातृभाषेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे मराठी भाषेचा अधिक प्रचार व प्रसार होऊन संपूर्ण देशभरात मराठी भाषेचे अभ्यासक निर्माण होती व ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये लिखाण करतील, त्यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात आणखी भर पडेल.

३. प्राचीन ग्रंथांचे अनुवाद: मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यात सुरुवात होईल, ज्यामुळे या ग्रंथांचा व्यापक प्रसार होईल आणि त्यांचे महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. मराठीतील हे प्राचीन ग्रंथ अनेक भाषांत अनुवादित झाल्यानंतर मराठी भाषा ग्रंथ संस्कृती यांचा अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास मदत मिळणार आहे.

४. ग्रंथालयांचे सशक्तीकरण: राज्यातील हजारो ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे राज्यातील ग्रंथालयांना अधिक संसाधने आणि अनुदान मिळेल, ज्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र वाढेल. प्रत्येक ग्रंथालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रंथ साहित्य खरेदी होईल व ते पर्यायाने मराठी भाषिक वाचकापर्यंत पोहोचेल त्यातून मराठीचा साहित्याचा प्रचार प्रसार होऊन भाषा अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू राहील.

५. संवर्धनासाठी मदत: मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळेल. यामुळे भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातील. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रचार प्रसारणासाठी तसेच भाषा वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणे शक्य होणार आहे हे मदत मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम ग्राम स्तरापासून ते शहरी भागापर्यंत राबवणे शक्य होणार आहे त्यातून मराठी भाषेचा अधिक जोमाने विकास होण्यास नक्कीच मदत मिळेल.

६. राष्ट्रीय पुरस्कार: अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यामुळे मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक वर्षी मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या साहित्यिकांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. असे पुरस्कार मिळाल्यास मराठी भाषा संवर्धनात कार्य करणाऱ्या अनेकांसाठी ते प्रोत्साहन ठरेल व त्यातूनच मराठीचा विकास होण्यास मदत मिळेल.

मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व-

मराठी भाषा केवळ एक संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मराठी भाषेत अनेक महान कवी, लेखक आणि विचारवंत झाले आहेत, ज्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.

मराठी भाषेच्या साहित्याने भारतीय साहित्याला एक अद्वितीय स्थान दिले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, यांनी मराठी भाषेत आपल्या विचारांची मांडणी केली आहे. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला आहे.

भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता-

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर, मराठी भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता अधिक महत्त्वाची बनली आहे. भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जावे लागतील, जसे की:

-भाषाशास्त्रीय संशोधन: भाषाशास्त्रज्ञांनी मराठी भाषेच्या विविध बोलींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

-साहित्यिक उपक्रम: साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करणे आवश्यक आहे.

-तंत्रज्ञानाचा वापर: डिजिटल माध्यमांचा वापर करून मराठी भाषेचा प्रसार करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे. या दर्जामुळे मराठी भाषेच्या अभ्यास, संशोधन, आणि साहित्यिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यामुळे मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि तिचा विकास होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यातही ही भाषा समृद्ध राहील.

मराठी भाषा केवळ संवाद साधण्याचे एक साधन नाही, तर ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक एकता आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेच तसेच ते प्रयत्नही करत आहे परंतु प्रत्येक मराठी भाषिकाची ही जबाबदारी आहे की आपली मातृभाषा समृद्ध झाली पाहिजे तर चला आपण सर्वजण मिळून मराठी भाषेचे संवर्धन करूया. जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या समृद्ध वारशाचा भाग बनू शकतील.

सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर

शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- पालकसचिव, राजगोपाल देवरा

जिल्हास्तरीय कामकाजाबाबत घेतला आढावा, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर, दि.२१ : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने १०० दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी  करावी, अशा सूचना नियोजन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव तथा पालकसचिव कोल्हापूर, राजगोपाल देवरा यांनी केल्या. ते म्हणाले, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करा. शासनाची संकेतस्थळे, कार्यालयातील सेवासुविधा तसेच त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोप्या पद्धतीने नियोजन करा. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सात कलमी कृती आराखड्याबाबत तसेच १०० दिवसांच्या नियोजनाबाबत सादरीकरणातून माहिती दिली. बैठकीला कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजीत म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालक सचिव श्री.देवरा यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महापालिका यांचा सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेतला. कोल्हापूर महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी त्या त्या विभागांचे सादरीकरण केले. यावेळी  ते म्हणाले, सर्व विभागांची संकेतस्थळे सर्वसामान्य जनतेच्या कामाची असावीत. अगदी सहज त्यावरील विविध माहिती, सेवा त्यांना वापरता आल्या पाहिजेत. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि त्या घेण्याबाबतच्या लिंक त्यावर असल्याच पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या विविध सेवा सहज घेता येतील आणि सर्व संकेतस्थळे मोबाईलवरती वापरण्यासाठी योग्य असावीत. यानंतर त्यांनी कार्यालय स्वच्छता, कार्यालय सोयीसुविधा याबाबत माहिती घेतली. ई ऑफीसबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महसूल विभागाने यात काम पुर्ण केले आहे. आता राज्य शासनाच्या इतर जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्येही यापद्धतीने येत्या काळात काम करणार आहोत.

जिल्ह्यात गुंतवणूक वाढीस चालना देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवा

ज्या व्यावसायिकांबरोबर सामंजस्य करार झाले आहेत त्यांच्याशी बैठक घेवून सुरु असलेल्या कामकाजाबाबत चर्चा करा. मागील काळात 52 ठिकाणी सामंजस्य करार झाले, त्याचा आढावाही त्यांनी घेतला. ज्यांचे काम सुरु आहे व ज्यांचे अद्याप सुरु नाही अशा कंपनीबरोबर चर्चा करून काही अडचणी असल्यास त्या सोडवा. कारण त्यांना आवश्यक वीज, जागा, मनुष्यबळ, बँक कर्ज तसेच शासन स्तरावरील इतर परवानग्या बाबत काही अडचणी असतील तर त्या सोडवाव्या लागतील. यातून प्रकल्प उभारणीला गती मिळेल. तसेच इतर गुंतवणुकदार यामुळे अधिक सहभाग देतील.

यावेळी पालक सचिव यांनी शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि  शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात अशाही सूचना केल्या.

लोकाभिमुख होऊन काम करा

राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा क्षेत्र भेटी करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या १०० दिवसात कोल्हापूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी व्यक्त केली.

००००००००

नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो, ते मी पाहे

नव्यांना ऊर्जा देणारे मालगुंड मधील कवी केशवसुतांचे स्मारक

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारकाबाबत विशेष लेख..

‘नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,

कोण मला वठणीवर आणू शकतो, ते मी पाहे ’

वरील ओळी या कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत यांच्या ‘नवा शिपाई’ या कवितेतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे नजिक मालगुंड हे त्यांचे जन्मगाव. कोकण मराठी साहित्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. पु. भागवत आणि ६७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मे १९९४ रोजी कविवर्य केशवसुत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

केशवसुतांचे जन्मस्थान असणारी  वास्तू आजही सुंदर पद्धतीने जतन करुन ठेवली आहे. त्या काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू आजही जशाच्या तशा येथे पाहायला मिळतात. स्वच्छ सारवलेल्या या घरामध्ये त्या विराजमान आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखेचे कार्यवाह विलास राणे, कार्याध्यक्ष शुभदा मुळे, नलिनी खेर, सहसचिव रमानंद लिमये, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे ही मंडळी या स्मारकाच्या अनुषंगाने साहित्य चळवळ पुढे नेटाने चालवत आहेत.

 

स्मारकात प्रवेश केल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद निर्मित कवी केशवसुत स्मारक संकल्पना व आयोजन संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ही कोनशिला लावलेल्या ठिकाणी कवी कट्टा तयार केला आहे. पुढे त्यांच्या जन्मस्थानाची वास्तू आहे. त्यामागे तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीची आधुनिक कलाकृती लक्ष वेधून घेते. त्याच्या बाजूलाच बसविण्यात आलेल्या कोनशिलांवर निवडक कविता कोरलेल्या आहेत. याला वळसा घालून आतमध्ये पुढे गेल्यानंतर ‘आधुनिक मराठी काव्यसंपदा’ हे दालन दिसते. या दालनात मराठीतील नामवंत कवींची रेखाचित्रे आणि त्याखाली त्यांच्याच हस्ताक्षरातील कविता ही अत्यंत कल्पक मांडणी इथे आकर्षून घेते. त्यासोबत त्या काळातील वापरातील वस्तूही मांडलेल्या आहे. हे सर्व पाहताना त्या कालखंडात वावरायला होते. या दालनाच्या समोरच ग्रंथालय आहे.

या ग्रंथालयात ३५ हजाराहून अधिक पुस्तके, ८०० हून अधिक सभासद आहेत. कवी केशवसुतांची जयंती, पुण्यतिथी, मराठी राजभाषा दिन, वाचन प्रेरणा दिन , मराठी भाषा पंधरवडा, ग्रंथालय दिन असे कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. प्राथमिक शाळांमधूनच नवे साहित्यिक निर्माण व्हावेत, साहित्याची गोडी निर्माण करावी, या उद्देशाने ‘श्रावणधारा’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. स्वरचित कविता वाचन, निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात येतात. त्यामधील निवडक कवितांचे सादरीकरण स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात केले जाते.

केशवसुत जन्मशताब्दी समारोह समितीच्या माध्यमातून  केशवसुतांची कविता हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक इथे पाहून त्यामधील कवितांची छायाचित्रे घेण्याचा मोह आवरता येत नाही.

‘एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकिन जी मी स्वप्राणाने

भेदुनि टाकिन सगळी गगने

दीर्घ जिच्या त्या किंचाळीने

अशी तुतारी द्या मज लागुनि

समतावादी, पुरोगामी केशवसुतांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ म्हटले गेले आहे. मालगुंड मधील हे स्मारक तमाम मराठी जनांनी, भाषाप्रेमींनी एकदातरी पहायला हवे. नव्या लेखनाची प्रेरणा आणि ऊर्जा येथून घेवून पुढे जायला हवे. किमान शाळांमधील मराठी कवितांमध्ये इथे येवून एकदातरी हरवून जायला हवे..

000

 -प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

9403464101

ताज्या बातम्या

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी – पणनमंत्री जयकुमार रावल

0
पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात...

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

0
मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण...

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा ‘टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

0
मुंबई, दि. ९ : “माऊली... माऊली...” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या  “टेक वारी : महाराष्ट्र टेक...

८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०९ जून, २०२५ पर्यंत देय...

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन २०२५-२६...