शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 169

यवतमाळ जिल्ह्याची साहित्य समृद्धी 

साहित्य हा तीन अक्षरी शब्द! जीवन व्यापून टाकणारा, जीवनाला गवसणी घालणारा, जीवनाचे प्रतिबिंब असणारा, जीवनाला समजावून सांगणारा, जीवनाला साथ देणारा, जीवनाला समजून घेणारा, जीवनाला व्यापून उरणारा, जीवनाचा मार्गदर्शक असणारा आणि जीवनाला घडविणारा! साहित्याने माणसे घडतात, एवढेच नव्हे तर परिवर्तनेही घडतात. जे जीवनाच्या सहीत असतं ते साहित्य-असं म्हटलं जातं. पण खरं तर जे जीवनाला सावरतं ते साहित्य हेच पूर्णांशाने खरं आहे. जीवन कसं आहे, हे साहित्य दाखवीतं. पण त्यासोबतच जीवन कसं असावं हेही साहित्य दाखवतं. त्यामुळेच साहित्याचे मानवी जीवनात अनन्य साधारण स्थान आहे. आज सर्वत्र साहित्य आणि साहित्यिकांची अगदी रेलचेल झालीय. यातलं खरं साहित्य तेच जे वाचकांच्या डोळ्यांद्वारे मस्तकापर्यंत जातं, आणि मस्तकापासून मन, मेंदू पर्यंत पोहचतं. एखाद्याने सलग काही दिवस विविध साहित्य प्रकारातील काही पुस्तके वाचलीत. तर त्या सर्व पुस्तकांमधील जे-जे त्याच्या मन मेंदूला चिकटून राहील, त्याच्या मनावर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव करेल, ते खरं साहित्य!

आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून राष्ट्रीय स्तरावर शासनमान्य झाली आहे. त्यामुळे तिच्यात निर्माण होणारे साहित्य हे यापुढेही अभिजातच असायला हवं. मराठी भाषेतील यच्चयावत साहित्याचा समग्र अभ्यास केला तर काही किरकोळ अपवाद वगळता एकूणच सारं साहित्य हे अभिजात वा सकस, सरस आणि अक्षर साहित्य म्हणूनच गणल्या गेलं आहे.

……………………

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातला लैकिक प्राप्त जिल्हा आहे. आदिवासी लोकजीवन, कापसाची निर्मिती, विविध ऐतिहासिक व रमणीय स्थळे आणि स्वातंत्र्य चळवळीतील भरीव योगदान यासाठी या जिल्ह्याची भारतभर ख्याती आहे. अशा लौकिक प्राप्त जिल्ह्याचे साहित्य क्षेत्रात नाव मागं कसं राहील. यवतमाळ जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृती  यांचाही विलोभनीय, स्पृहणीय व भरीव असा वारसा आहे. अगदी प्राचीन काळ सोडला तरी साधारण दीडशे दोनशे वर्षापूर्वीपासून यवतमाळ जिल्ह्याची साहित्य समृद्धी ही वाखाणण्यासारखी आहे. पृथ्वीगीर गोसावी, गु. ह. देशपांडे, वीर वामनराव जोशी, कवी उत्तमश्लोक ही या जिल्ह्यातील प्राचीनतम साहित्य श्रेष्ठीची नावे. त्यानंतर इंग्रजकालीन संमिश्र जीवन व्यवस्थेत निष्ठेने लेखन करणारे व सामाजिक उत्थानासोबतच स्वातंत्र्य चळवळीची पाठराखण करणारे साहित्य श्रेष्ठीही या जिल्ह्यात होऊन गेले आहेत. लोकनायक बापूजी अणे, ब. ना. एकबोटे, वीर वामनराव जोशी, प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर, सिंधुताई मांडवकर आणि अन्य काही नावे ही यातली जनमान्य नावे आहेत.

या श्रेष्ठींनी आपल्या साहित्यकृतींनी तत्कालिन जनमानसावर सुयोग्य प्रभाव टाकला अशा नोंदी वाचल्याचे मला आठवते. मात्र त्यानंतरचा स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ यवतमाळ जिल्ह्यासाठी अगदी बहारीचा काळ म्हणावा लागेल असा आहे. कथा, कविता, कादंबरी, गीते, नाट्ये आणि वैचारिक ललित लेखनाला सुगी येण्याचा हा स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा काळ. या काळात पां. श्रा. गोरे, भाऊसाहेब पाटणकर, गौतम सुत्रावे, प्राचार्य राम शेवाळकर ही आणि अन्य काही नावे यवतमाळ जिल्ह्यात आघाडीवर होती. या साधारणत: पन्नास वर्षाच्या कालखंडात पां. श्रा. गोरे यांची ‘कात टाकलेली नागिन’” ही ग्रामीण जीवनावरील वास्तववादी कादंबरी त्या काळातील रसिक व बहुश्रुत वाचकांच्या चर्चेचा, पसंतीचा आणि कौतुकाचा विषय ठरली. गोरेंच्या कविताही तेवढ्याच ताकदीच्या व खुमासदार. “आम्ही तर जंगलची पाखरे” ही त्यांची कविता तर अलीकडील विठ्ठल वाघाच्या तिफन कवितेसारखी त्या काळात सर्वतोमुखी झाली होती. भाऊसाहेब पाटणकर हे त्यांच्या थोड्या बहुत आगचे मागचे कवी. मात्र भाऊसाहेबांना महाराष्ट्रातला जनलोक ओळखतो तो कवीपेक्षा शायर म्हणून. हिंदी उर्दूच्या धरतीची मराठी शायरी भाऊसाहेबांनी प्रसवली. अन् त्या शायरीने त्या काळात अगदी पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर म्हणजे अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत लोकांना वेड लावले.

यवतमाळ जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध करणारे पाटणकर बहुदा पहिले साहित्यिक असावे.  त्यानंतरच्या  काळात  दे.शि. दुधलकर, गौतम सुत्रावे, श्रीकृष्ण काळे आदी मंडळींनी काव्य लेखन केले. परंतु साहित्य क्षेत्रात जिल्ह्याला नाव लौकिक प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले ते वणीचे गौतम सुत्रावे यांनी. सुत्रावेंच्या गीतकाव्यांनी त्याकाळी महाराष्ट्रीय जन माणसाला सर्वार्थाने जिंकून घेतले. “अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान, साधण्या या जन्मी निर्वाण” यासारखी गहन गीते लिहिणाऱ्या सुत्रावेंनी जिल्ह्याला फार मोठा लौकिक प्राप्त करून दिला. त्यांच्यासोबतच्या त्या काळातल्या अनेक कवींनी आपापल्या कवितांतून जनप्रबोधन केले. परंतु आपली नाम मुद्रा साहित्याच्या प्रांतात यवतमाळ जिल्ह्याची म्हणून उमटविण्यात जे काही फार थोडे लोक यशस्वी झाले, त्यापैकी आणखी एक नाव म्हणजे पोहंडूळ येथील नीलकृष्ण देशपांडे हे होय. पोहंडूळ सारख्या आडबाजूच्या खेड्यात राहून कुठलेही साहित्यिक वातावरण व  वारसा नसताना त्यांनी केलेली काव्य साधना नवोदितांना प्रेरित करून गेली. दिग्रसचे प्राध्यापक ज. सा गवळीकर यांनीही त्या काळात काही साहित्य निर्मिती केली.

सुधाकर कदम हेही नाव त्या काळात आमच्या सतत कानावर पडायचे. परंतु ते लेखक व कवी म्हणून नव्हे तर मुख्यत्वे गझल गायक म्हणून. कदम यांनी त्यानंतर काही थोडी बहुत साहित्य निर्मिती केली परंतु ती बरीच नंतर. त्यांचा “फडे मधूर खावया” हा ललित लेख संग्रह त्याकाळात बराच गाजला. त्या काळात आपल्या लयबद्ध, नादबध्द आणि लोकानुवर्ती काव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं ते शंकर बडे या लोककवीने. त्यांच्या वऱ्हाडी ठसक्यांच्या कविता आणि ‘बॅरिस्टर गुलब्या’” हे रंगतदार व्यक्तीकथन महाराष्ट्राच्या कौतुकाचे विषय ठरले होते. कविवर्य शंकर बडेचा हा काव्य वारसा थोड्याफार वेगळ्या  ढंगाने चालविला तो नेर परसोपंत (माणिकवाडा) येथील डॉ. मिर्झा रफी बेग यांनी. आपल्या किस्सेबाज कवितांनी आणि खटकेबाज विनोदी किस्से यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा  कवी यवतमाळ जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर रोशन करण्यात अव्वल ठरला हे नक्की.

याच काळात कविता आणि गझलेच्या क्षेत्रात कलिम खान, ललित लेखांच्या क्षेत्रात सुरेश गांजरे, कथेच्या क्षेत्रात प्रा. कमलाकर हनवंते, आंबेडकरी विचारधारेच्या कविता क्षेत्रात प्रा.डॉ. सागर जाधव, बळी खैरे, सुनिल वासनिक, आनंद गायकवाड, योगानंद टेंभुर्णे, मूळचे यवतमाळ जिल्ह्याचे असलेले कवी केतन पिंपळापुरे, प्रा. माधव सरकुंडे या दिग्गज कवींनी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने यवतमाळ जिल्ह्याचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे केले. त्यापैकी बळी खैरे यांच्या कविता आणि चित्रे भारताच्या सीमा ओलांडून विदेशात ही गेल्या. प्रा. डॉ. सागर जाधव व प्रा. माधव सरकुंडे यांच्या कथा, कविता व वैचारिक लेखनांनी केवळ विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळवले असे नव्हे तर जनसामान्याच्या अंत:करणावरही त्यांनी आपली छाप पाडली. प्रा. डॉ. सागर जाधव यांचा ‘उजेड’ हा काव्यसंग्रह आणि प्रा. माधव सरकुंडे यांचे मर्यादित परंतु सरस साहित्य हा जनलोकांचा चर्चेचा आणि विचार मंथनाचा विषय ठरला. वामनदादा कर्डकांचे काव्यमय चरित्र  लिहिणारे व त्यांच्या गीत-लेखनाचे समर्थपणे संपादन करणारे प्रा. डॉ. सागर जाधव हे महाराष्ट्रातील प्रथम साहित्यिक ठरले आहेत.

याच काळात थोडे मागे पुढे लिहू लागलेले शरद पिदडी, गजेश तोंडरे, विनय मिरासे ‘अशांत’, सुभाष उसेवार, प्रा. रमेश वाघमारे, रवींद्र चव्हाण, प्रा.दिनकर वानखडे, कृष्णा लाडसे, रमेश घोडे, आशा दिवाण, विजया एंबडवार, शुभदा मुंजे, विलास भवरे, प्रा. अनंत सूर, प्रा.डॅा.रविकिरण पंडित, आत्माराम कनिराम राठोड, प्रा. डॉ. दिलीप अलोणे, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, पंढरीदास खर्डेकर, रशिद कुरैशी, बसवेश्वर माहुलकर या व इतर काही कवी लेखकांनी जिल्ह्याच्या साहित्य इतिहासाला वैभव प्राप्त करून दिला. यापैकी बहुधा सर्वांनी फक्त कविता हा प्रकार हाताळला. मात्र विनय मिरासे यांनी कवितेसोबतच बालवाड:मय, कथा, वैचारिक लेख, ललित लेख व समीक्षणे ह्या प्रांतातही यशस्वी मुसाफिरी केली. शरद पिदडी यांच्या गेय व भाव कवितांनी महाराष्ट्रभर लोकांची दाद घेतली. त्यानंतरच्या पिढीतले तरुण तडफदार व ख्यातीप्राप्त साहित्यिक म्हणजे पुसदचे प्रा. रविप्रकाश चापके, विजय ढाले, प्रा. सुरेश धनवे, गजानन वाघमारे, निशा डांगे, अल्पना देशमुख, हेमंत कांबळे, विनोद बुरबुरे, प्रमोद कांबळे, प्रशांत वंजारे, प्रविण चांदोरे, अतुल कुमार ढोणे, सुनील आडे, अनिमिष मिरासे, दुष्यंत शेळके, स्नेहल सोनटक्के, रुपेश कावलकर, प्रविण तिखे, गजेंद्र ठुणे, गिरीश खोब्रागडे, आनंद देवगडे, प्रा. पुनीत मातकर, विजयकुमार ठेंगेकर, प्रफुल ठेंगेकर, अजय चव्हाण, वैशाली गावंडे, गजानन वाघमारे, निलेश तुरके, व्ही. पी.पाटील, गजानन दारोडे, शेख गणी, जयकुमार वानखेडे, विजय बिंदोड हे होत.

यापैकी प्रा. पुनित मातकर, गजानन वाघमारे, प्रशांत वंजारे, प्रमोद कांबळे, गुलाब सोनोने, निलेश तुरके, प्रविण तिखे, रुपेश कावलकर, रविप्रकाश चापके, विजय ठेंगेकर ही अत्यंत प्रभावी व बिनीची नावे आहेत. त्यातील प्रशांत वंजारे, विनोद बुरबुरे व हेमंत कांबळे ही नावे आंबेडकरी वैचारिक साहित्यात आणि गझलच्या क्षेत्रात आपापली नाममुद्रा उमटून बसली आहेत. रुपेश कावलकर, स्नेहल सोनटक्के, गुलाब सोनोने, अतुल ढोणे, निलेश तुरके, अक्षय गहुकार, ज्योती उमरेडकर व वैशाली गावंडे हे कविता, गझल आणि निवेदन या क्षेत्रातील चमकते तारे आहेत.

एकूणच यवतमाळ जिल्ह्याची साहित्य परंपरा ही अत्यंत भरीव व समृद्ध आहे. महाराष्ट्राच्या साहित्य राशीत यवतमाळ जिल्ह्याने छोटी पण मोलाची भर टाकली आहे.  यवतमाळ जिल्ह्यात लेखन करणारे आणखीही काही लेखक कवी असतील पण त्यांची नावे न घेणे हा माझ्या विस्मरणाचा भाग आहे. तेव्हा अशा लेखकांनी मला अंत:करणापासून क्षमा करावी, ही विनंती.

-विनय मिरासे “अशांत”
यवतमाळ
942036 8272

अहिल्यानगरचे वाङ्मयोपासक मंडळ

मराठी भाषा अनेक कारणांनी समृद्ध होत गेली आहे. अनेकांनी त्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या प्रवासाचे एका अर्थाने मंथनचं सुरु झाले आहे. मराठीला योगदान दिलेल्या छोट्या मोठ्या प्रवाहांची यानिमित्ताने चर्चा होत आहे. सध्याचे अहिल्यानगर तत्कालिन अहमदनगरमध्ये सुमारे ९७ वर्षांपूर्वी ‘वाङ्मयोपासक मंडळ’ स्थापन झाले होते. या निमित्ताने मराठी भाषाप्रेमी, साहित्यरसिकांना या घटनेचा इतिहास जाणून घेण्यासाठी या लेखाची नक्कीच मदत होईल…

मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी सुमारे ९७ वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये (आताचे अहिल्यानगर) ‘वाङ्मयोपासक मंडळ’ स्थापन झाले होते. या संस्थेची स्थापना १९२८ मध्ये न्यायाधीश श्री. फाटक यांच्या प्रोत्साहनाने झाली. मंडळाचे तेच पहिले अध्यक्ष. १९३० मध्ये या मंडळाची रितसर नोंदणी केली गेली. मायबोली मराठीचा विकास व्हावा, असे वाटणारी मंडळी हळूहळू यानिमित्ताने एकत्र येऊ लागली.

वाङ्मयाची अभिवृद्धी करणं, वाङ्मयोपासकांना एकत्र आणणं, साहित्यविषयक व्याख्यानं आयोजित करणं, प्राचीन आणि ऐतिहासिक वाङ्मयाचं परिशीलन करून त्याच्या प्रसिद्धीसाठी खटपट करणं, उत्साही लेखकांना उत्तेजन देणं, याशिवाय नगर आणि नाशिक जिल्ह्यातील वाङमयोपासकांची शाखा संमेलनं भरवणं आणि प्रसिद्ध साहित्य सेवकांचा परिचय घडवून आणणं देणं हे या मंडळाच्या स्थापनेचे उद्देश होते. काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य आदी विषयांवर मंडळानं साहित्य प्रकाशित करायला सुरुवात केली. आजचा नाशिक जिल्हा पूर्वी नगर जिल्ह्यात समाविष्ट होता. इंग्रज राजवटीत नाशिक जिल्हा वेगळा केला गेला, तरी सांस्कृतिकदृष्ट्या नगर आणि नाशिकचं एकत्व अबाधित असल्यानं दोन्ही जिल्ह्यांतील साहित्यिकांनी दरवर्षी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकत्र यायचं ठरवलं.

वाङ्मयोपासक मंडळानं १५ फेब्रुवारी १९३१ रोजी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं ‘काव्य-शास्त्र-विनोद’. या पुस्तकाची किंमत होती एक रुपया. या पुस्तकावर प्रकाशक म्हणून मंडळाचे चिटणीस जगन्नाथ एकनाथ नरवणे यांचं नाव आहे. लेख आणि कविता मिळवण्याचं काम मंडळाचे चिटणीस केशवराव लक्ष्मण टेंभुर्णीकर यांनी जिल्हाभर आणि जिल्ह्याबाहेर हिंडून केलं होतं. पद्य विभागात संत दासगणू, के. ल. टेंभुर्णीकर, गोपाळ, ना. य. मिरीकर, ग. ल. ठोकळ, गिरिजात्मज, मनोरमाबाई रानडे, दासविठू कोल्हारकर, वि. प्र. घुले, दत्ताग्रज, वेणुबाई मोडक, विठ्ठलराव घाटे, बा. रा. सिन्नरकर, त्र्य. रा. गोडगे, भां. शं. देवस्थळी, मो. शं. मुळे आणि गोमागणेश यांच्या काव्यरचना आहेत. ( ‘गोमागणेश’ हे टोपणनाव घेऊन गणेश कृष्ण फाटक हे कविता लिहायचे.)

नगरचे दिवंगत साहित्यिक डॉ. पां. दा. गुणे, कवि दत्त, शिवरामपंत भारदे, रेव्हरंड नारायण वामन टिळक, बालकवी ठोंबरे आणि अण्णासाहेब हिवरगावकर यांना हे पुस्तक समर्पित करण्यात आलं होतं. प्रस्तावना लिहिली होती मंडळाचे अध्यक्ष नरहर बाळकृष्ण देशमुख यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित झालं नगर आणि नाशिककरांच्या १९३१ मधील पहिल्या संमेलनात. मुंबईचे प्रिन्सिपाल पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये हे संमेलन पार पडलं होतं.

दुसरं संमेलन संगमनेरला शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली झालं. १९३३ मध्ये झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अध्यक्षस्थान दैनिक केसरीचे संपादक ज. स. ऊर्फ तात्यासाहेब करंदीकर यांनी भूषवलं होतं. १९३३ च्या संमेलनात वाङ्ममयोपासक मंडळानं `ज्ञानेश्वर दर्शन’ नावाचा सुमारे आठशे पानांचा ग्रंथराज प्रसिद्ध करायची योजना जाहीर केली. ही कल्पना मंडळाचे उत्साही चिटणीस कवी केशवराव टेंभुर्णीकर यांनी १९३१ मध्येच सूचवली होती. या प्रकल्पाची रूपरेषा असलेलं पत्रक तयार करून दैनिक केसरीमध्ये तशी बातमीही प्रकाशित झाली होती.

‘ज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथाच्या मुखपृष्ठावर संत ज्ञानेश्वराचं चित्र छापायचं ठरलं. तेव्हा उपलब्ध असलेली संत ज्ञानेश्वरांची बहुतेक चित्रं पगडी आणि अंगरखा घातलेली होती. ज्ञानेश्वर हे संन्यस्त प्रवृत्तीचे असल्याने त्यांना हा पोषाख शोभणार नाही, असं सरदार नानासाहेब मिरीकर यांना वाटलं. संन्याशाच्या मुलांना साधी वस्त्रं मिळणं जिथं कठीण, तिथं जरीचा पितांबर, शाल दाखवणं योग्य होणार नाही. त्याऐवजी त्यांची संन्यस्त वृत्ती, जटा, चेहऱ्यावरचं दिव्यत्व या गोष्टी नजरेसमोर ठेवून चित्रं रेखाटावं, अशी नानासाहेबांची कल्पना. त्यांनी ही कल्पना चित्रकार मित्र रघुनाथ हरी आफळे यांना सांगितली आणि आपल्यासमोर बसवून ते चित्र काढून घेतलं. हे चित्रं सर्वांनाच आवडलं. नंतर संत ज्ञानेश्वरांवर निघालेल्या चित्रपटांतही हेच रूप पहायला मिळालं. आफळे हे प्राथमिक शाळेत साधे शिक्षक असले, तरी उत्तम कलावंत, फोटोग्राफर, वैद्य आणि ज्योतिषीही होते. त्यांनी केवळ कोळसा वापरून काढलेलं शिर्डीच्या साईबाबांचं अस्सल चित्र मिरीकर वाड्यात आहे.

ग्रंथराज ज्ञानेश्वरीची यथार्थ ओळख करून देणारा ‘ज्ञानेश्वरदर्शन’ हा ग्रंथ वाङ्मयोपासक मंडळानं नेवाशात १९३४ मध्ये झालेल्या संमेलनात प्रकाशित केला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार्या सर्व विद्वानांचे लेख मिळवून ते प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य केशवराव टेंभुणीकर यांनी यशस्वीरित्या पेललं. या ग्रंथातील लेखांची जळणी करून छापण्यापर्यंतची सर्व कामगिरी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष त्र्य. ग. धनेश्वर आणि सेनापती दादा चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. हा ग्रंथ मोहन मुद्रा मंदिर या तेव्हाच्या नगरमधील सर्वात आधुनिक छापखान्यात छापला गेला. नागरिकांनी देणग्या देऊन या उपक्रमासाठी मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रावबहाद्दूर नरहर बाळकृष्ण ऊर्फ अप्पासाहेब देशमुख यांनी स्वतः १५०० रूपयांची देणगी दिली होती.

नेवाशात झालेल्या वाङ्मयोपासक मंडळाच्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव पांगारकर लाभले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सरदार नानासाहेब मिरीकर होते. महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख साहित्यिक  उपस्थित राहिल्यामुळे हा सोहळा अपूर्व ठरला.

वाङ्मयोपासक मंडळाच्या आमंत्रणावरून १९३९ मधील ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ नगर येथे महामहोपाध्याय दत्तोपंत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली भरलं. स्वागताध्यक्ष होते रावबहादूर न. वा. देशमुख आणि कार्याध्यक्ष होते रावबहाद्दूर बाबासाहेब हिवरगावकर (संसदपटू प्रा. मधू दंडवते यांचे वडील). सरचिटणीस दत्तोपंत डावरे, पटवर्धन, भोगे, पंडित आणि शरदिनी वेदक यांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं भरवलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार र. बा. केळकर होते, तर अध्यक्ष शं. वा. किर्लोस्कर होते. ग्रंथालय आणि वाचनालयांच्या कार्यकर्त्यांची परिषदही यावेळी झाली. या परिषदेचे स्वागताध्यक्ष कुंदनमल  फिरोदिया होते, तर अध्यक्षस्थान मराठीतले नामवंत विनोदी साहित्यिक चिं. वि. जोशी यांनी भूषवलं होतं. नगरला संमेलनाचा मान मिळावा म्हणून मंडळाच्या आद्य संस्थापकांपैकी असलेले गोपाळराव गायकैवारी आणि धनेश्वर यांनी विशेष खटपट केली होती.

नेवासे येथे ज्ञानदेव विद्यापीठ उभारावं, अशी वाङ्मयोपासक मंडळाची इच्छा होती. त्याकरितां सरदार नानासाहेब मिरीकर, धनेश्वर आणि रसाळ यांची समितीही नेमण्यात आली होती. ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध आवृत्ती तयार करून छापण्याचं काम या समितीकडे सोपवण्यात आलं होतं. १९५३ मध्ये धनेश्वर हे या मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या पाठशुद्ध आवृत्तीचा पूर्व खंड अध्याय १ ते ९ तयार करून संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तेव्हा आमदार असलेले बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते प्रकाशित केला. पुढील खंडाची तयारी चालू असून तोही लवकरच प्रसिद्ध होईल, असं त्यावेळी जाहीर करण्यात आलं होतं.

वाङ्मयोपासक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून गो. रा. गायकैवारी, बाबासाहेब हिवरगावकर, शं. वा. आंबेकर आणि वेणूबाई मोडक यांनी काम केलं. चिटणीस म्हणून प. प. पटवर्धन, दत्तोपंत डावरे आणि सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी बरीच वर्षे काम केलं.

वाङ्मयोपासक मंडळाचा एक उद्देश ऐतिहासिक ग्रंथांचे संशोधन करणं हा होता. ज्याप्रमाणे मंडळानं ‘ज्ञानेश्वर मंडळ’ नेमलं, त्याचप्रमाणे ‘इतिहास संशोधन मंडळ’ असंही एक पोटमंडळ स्थापन केलं. १५ मार्च १९५३ रोजी प्रा. कृ. दा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली या पोटमंडळाचं उदघाटन झालं. हे इतिहास संशोधन मंडळ पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाशी संलग्न होतं. या मंडळाची कचेरी मिरीकर वाड्यात सरदार बाबासाहेब मिरीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. पुढं याच मंडळींनी नगरला ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाची स्थापना केली.

०००

  • भूषण देशमुख, अहिल्यानगर, ९८८१३३७७७५

 

मराठी भाषा आणि पैठण नगरी

मराठी संस्कृती आणि मऱ्हाटी भाषा यांचे नाते पैठणनगरीशी अतिप्राचीन काळापासून आहे. अगदी इसवी सन पूर्व ६ व्या शतका पासून ते थेट १९ व्या शतकापर्यंत या पुरातन नगरीचे योगदान महाराष्ट्र, देश व अंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणारे आहे. स्थानिक मराठी साहित्य व ऐतिहासिक घडामोडी यांच्या नोंदी तत्कालीन पाश्चात्य प्रवाश्यांनी लिखाणात नमूद केलेल्या आहेत. यात टॉलेमी, प्लिनी व एरीयन या विदेशी लेखकांचा समावेश आहे. भारतातील मुख्य व्यापारी पेठ, वास्तुशास्त्र, कला, साहित्य, शिक्षण व राजकीयदृष्ट्या वर्षानूवर्षे केंद्रस्थानी राहिलेल्या व मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या पैठणनगरीला भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक व सत्तासंघर्षाची मोठी पार्श्वभूमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैठणच्या सातवाहन या मराठी राजघराण्याने इ.स. पुर्व २३० ते इ.स. २३० असे तब्बल ४६० वर्षे दक्षिण हिंदुस्थानवर राज्य केले. त्यांच्या राजधानीचे ठिकाण तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण होते. या घराण्याने एकुण ३० सम्राट दिले. यापैकी पराक्रमी सम्राट शालिवाहन यांनी सुरू केलेली “शालिवाहन शके” हिंदू कालगणना जगभर मान्यताप्राप्त आहे.

            सातवाहन कुळातील सम्राट हाल यांनी “गाहासत्तसई” अर्थात गाथासप्तशती या पहिल्या मराठी ग्रंथाची निर्मिती केली. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्तीच्या अहवालात पैठणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच मराठी अद्यग्रंथाचा संदर्भ त्यासाठी महत्वाचा ठरला आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या “अभिजात मराठी भाषा समिती”ने सातवाहन राजा हाल यांनी पहिल्या शतकात संपादित केलेल्या गाथा सातसई (गाथा सप्तशती) चा मराठीतील आद्य ग्रंथ म्हणुन उल्लेख केला आहे. अभिजात भाषेसाठी ती भाषा किमान २ हजार वर्षे जुनी असावी. किंवा त्या काळापासून वापरात असावी. हा महत्वाचा निकष होता. त्यासाठी गाथा सप्तशती या सातवाहन काळातील सम्राट हाल याने संपादित केलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथास प्रमाण मानले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी भाषा प्राचीन आहे. यासाठीचा पुरावा म्हणुन गाथा सप्तशतीतील संकलीत कवितांचा पुरावा या अहवालात दिला आहे. सुरवात गाथा सतसई या सातवाहन राजा हल यांनी संपादित केलेल्या ग्रंथाने झाली.

शके १२१५ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज (जन्म आपेगाव ता. पैठण) व लीळाचरीत्र काळात मराठीचे विकसित रुप बघावयास मिळते. तर “,एकनाथी भागवत” या ग्रंथामध्येही मराठीची महती नमूद करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या “ज्ञानेश्वरी” या मराठी ग्रंथाची शुध्दप्रत (संपादन) संत एकनाथ महाराज यांनी केली. त्या अर्थाने संत एकनाथ महाराज हे आद्य संपादक आहेत. पैठणच्या अनेक महत्वाच्या संपादक आणि लेखकांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. राजा हल याने संकलित आणि संपादित केलेलं साहित्य (गाथा सप्तशती), संत ज्ञानेश्वरादी भावंडे, महानुभाव संप्रदायाचे साहित्य ग्रंथ, संत एकनाथ महाराज, संत गावबा, संत कृष्ण दयार्णव यांचे साहित्य असे अनेक संदर्भ प्राचीन संदर्भ साहित्य आणि भाषेच्या अनुषंगाने पैठण मधे असल्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा सप्तशती आदी ग्रंथांस मराठी साहित्यात खुप महत्व आहे.

१५३३ साली जन्म झालेल्या संत एकनाथ महाराज यांनी संपूर्ण लिखाण मराठी प्राकृत भाषेत केलेले आहे. चतुःश्लोकी भागवत या ग्रंथाचे लिखाण त्यांनी काशी क्षेत्री पुर्ण केले. तथापि संस्कृतचा अट्टाहास करणाऱ्या धर्ममार्तंडांनी विरोध केला. नंतर मराठी भाषा, त्याचे महत्त्व नाथांनी पटवून दिले. भागवताच्या ११ व्या स्कंदावर टिका करणाऱ्या “एकनाथी भागवत” या अलौकिक मराठी ग्रंथाची त्यावेळी काशीकरांनी चक्क हत्तीवरून मिरवणूक काढली होती. विशेष म्हणजे “रुख्मिणी स्वयंवर” हा अजरामर मराठी ग्रंथही त्यांनी काशी येथेच पुर्णत्वास नेला. तेथील वास्तव्यात नाथांचा संत तुळशीदास यांच्याशी संपर्क झाला. दोन्ही संतांमध्ये रामभक्तीवर प्रदीर्घ चर्चा झाली. याच प्रभावातून एकनाथांना परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी बये “दार ऊघड ! बये दार ऊघड !!” असे साकडे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी मातेला घातले. अन् शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

पैठणच्या संतांनी मराठी शिक्षण केंद्रे म्हणून देशभरात केली मठांची उभारणी !

पैठण शहरात मध्ययुगीन काळात अनेक संतांनी ज्ञानदानाच्या हेतूने भव्य दिव्य मठांची उभारणी केली. मराठी संतांनी मराठी भाषेची शिक्षण केंद्रे म्हणून उभारलेल्या या मठांच्या शाखा देशभरातील तीर्थक्षेत्रांमध्ये आजही पाहायला मिळतात. आजमितीस पैठणला २१ महाकाय मठ कार्यरत असून बहुतांश मतांचे निवासस्थानात रुपांतर झालेले आहे. तर काही मठांची दुरावस्था झाली आहे.

संत एकनाथ महाराज यांचे शिष्य असलेल्या कृष्ण दयार्णव महाराज यांचा पैठणच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेला मठ प्रसिद्ध आहे. या मठाच्या शाखा मथूरा, तिरुपती, द्वारका, तुंगभद्रा, म्हैसूर, कांची, केदारनाथ व बद्रिनाथ येथे आहेत. प्राकृत भाषा मराठीची शिक्षण केंद्रे म्हणून या मतांचे बांधकाम केले गेले होते. आचार्य आणि विद्यार्थी यांची निवासस्थाने तसेच भोजन व्यवस्थेचे स्वतंत्र दालन होते. ज्ञानदानासाठी केली जाणारी व्याख्याने व चर्चासत्रे यासाठीची बांधकामे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या मठांना ४०० वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा आहे. कालांतराने १८ व्या शतकानंतर या मठांचा वापर यात्रेकरूंना थांबण्यासाठी होऊ लागला.

येथील शिवदिन केसरी महाराज यांच्या मठाची निर्मिती १७६१ साली करण्यात आली. विशेष म्हणजे तत्कालीन मराठा शासकांवर संत शिवदिन केसरी यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे शिवदिन केसरी महाराज यांच्या पैठण येथील मठाच्या शाखा आजही नागपूर, बडोदा, देवास, ईंदोर, धार व ग्वाल्हेर येथे आहेत. बाहेरील दगडी सीलकोट व आतील लाकडी कोरीव काम ही शिवदिन केसरी मठांची खासीयत म्हणावी लागेल.

लेखकः बद्रीनाथ खंडागळे, पैठण

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

ख्रिस्ती साहित्य संमेलन – एक वेगळा प्रवाह

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठीतील विविध प्रवाहांची चर्चा होणे स्वभाविक आहे. मराठीच्या आजवरच्या प्रवासात अनेक जणांनी तीची जोपासना करण्याचा प्रयत्न झाला आहे. ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा प्रवाहही यानिमित्ताने समजून घ्यावा लागेल..

मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पुण्यात १८७८ साली पार पडले. महाराष्ट्राच्या समाजजीवनात वेगवेगळ्या क्षेत्रांत नव्या मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडेच मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ करण्याचाही मान जातो. यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि इतरत्र मराठी साहित्य संमेलने होत राहिली. मुख्य प्रवाह मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून वेगळे होऊन समांतर किंवा वेगळे अस्मिता दर्शवणारी विद्रोही, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक, कोकण, मराठवाडा अशी प्रादेशिक पातळीवरची आणि विविध विचारसरणीला वाहिलेली अनेक साहित्य संमेलने आजकाल होत असतात.

मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे होऊन पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलन या वेगळ्या प्रवाहाने शंभर वर्षांपूर्वीच केले होते हे मात्र अनेकांना माहितही नसेल.

पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या ‘महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह दिडशे लोक हजार होते.

मराठी साहित्य संमेलनातून याप्रमाणे अनेक नावे प्रवाह वेगळे झालेले असले तरी त्यापैकी अनेक काळाच्या ओघात नंतर लुप्त झाले आहेत वा केवळ अस्तित्व राखून आहेत. शतकापूर्वी वेगळी वाट चोखणारा ख्रिस्ती संमेलनाचा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही वाहता आणि खळाळता राहिला आहे.

गंमत म्हणजे कालांतराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नामांतर झालेल्या मूळ ग्रंथकारांच्या संमेलनातून फारकत घेतलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांतूनसुद्धा मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९९२ पासून स्वतंत्र चूल मांडली आहे आणि आतापर्यंत वेगळी तब्बल दहा संमेलने भरवली आहेत.

विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांचे जसे दस्तऐवजीकरण झाले आहे तसेच या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि हो, मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झाले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलीत करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे योगदान सुनिल श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे.

‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ ‘ या शिर्षकाचा चारशेदहा पानांचा जाडजूड ग्रंथ (दिलीपराज प्रकाशन, पुणे) आढाव यांनी पुढील पिढ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला आहे. .या ग्रंथाचे विशेष महत्त्व म्हणजे संमेलनाध्यक्षांच्या भाषणांबरोबरच ग्रंथकाराने ‘समीक्षकाच्या दृष्टिकोनांतून’ या शिर्षकाच्या लेखातून प्रत्त्येक संमेलनांची पूर्वपीठिका आणि त्यात्या संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या विचारांची समीक्षा केली आहे. मराठी साहित्यातील ख्रिस्ती साहित्याचे आणि साहित्यिकांचे स्थान, ख्रिस्ती साहित्याची व्याख्या, या साहित्याचा साहित्यिक आणि वैचारीक दर्जा, संमेलनाध्यक्षांचे उपस्थित केलेले मुद्दे, या शतकभरात मराठी ख्रिस्ती साहित्यजगात उमटलेली वादळे, वगैरे विविध विषयांचा आढाव यांनी या ग्रंथात उहापोह केला आहे. त्यादृष्टीने हा ग्रंथ केवळ मराठी साहित्यक्षेत्रासाठीच नव्हे तर एकूण मराठी साहित्यक्षेत्रासाठी .एक मौलिक ऐवज ठरतो.

.१९२७ नंतर चार संमेलने सलग झाल्यानंतर १९३३ नंतर पुढचे ख्रिस्ती साहित्य संमेलन भरायला १९७२ साल उजाडावे लागले. त्यानंतर मात्र, कॅथलिक आणि प्रोटेस्टंटपंथीय साहित्यिकांनी अगदी चंग बांधून वेळोवेळी ही संमेलने भरवली आहेत. विविध कारणांमुळे या संमेलनांच्या क्रमसंख्यांविषयी मात्र स्पष्टता नाही हे आढाव यांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केले आहे. काही संमेलनांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

गेल्या शतकभरात एकूण ३६ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली असून त्यात २६ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटून पालटून निवडले जातात. गेल्या काही दशकांच्या या पायंड्याकडे पाहू जाता कॅथलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसई उर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत. वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.

आतापर्यंतच्या इतर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. दुसरे – मनोहर कृष्ण उजगरे ((मुंबई १९३०), तिसरे – देवदत्त नारायण टिळक (निपाणी १९३२) चौथे – लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे- १९७२), सातवे – फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई १९७३) , दहावे – भास्करराव जाधव (बारामती १९७५), ,अकरावे – रॉक कार्व्हालो (सोलापूर १९७७), बारावे – रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर १९८१) , तेरावे – फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई १९८४), चौदावे- जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर १९८६), पंधरावे – विजया पुणेकर (मुंबई १९९०), सोळावे – फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), – सतरावे – निरंजन उजगरे (मालवण १९९४), अठरावे -सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर १९९८), एकोणिसावे – -सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००), विसावे – देवदत्त हुसळे (अहमदनगर २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना २००७ ), तेविसावे – फादर मायकल जी. (वसई २००९), चोविसावे -अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११ ), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४ ). आणि सव्वीसावे पौलस वाघमारे (बीड २०२२).

दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने – पहिले – अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर -१९९२), दुसरे – सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना १९९३), तिसरे – अरविंद पी निर्मळ (लोणावळा १९९४), चौथे – देवदत्त हुसळे (अहमदनगर- १९९५), पाचवे – बिशप प्रदीप कांबळे (पुणे २००१), सहावे – सुभाष चांदोरीकर (संगमनेर २००४), सातवे – डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर २००६), आठवे – वसंतराव म्हस्के (उदगीर २००८), नववे – अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर २०११) आणि दहावे – फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर २०१८),

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात तुलनात्मकरित्या पाहिल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे, आठ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या संत मुक्ताबाईंपासून ही स्त्रीसाहित्याची परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे. कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (कऱ्हाड), शांता शेळके (आळंदी ) विजया राजाध्यक्ष (इंदूर) आणि अरुणा ढेरे (यवतमाळ २०१९)  आणि आताच्या संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या त्या सहा महिला संमेलनाध्यक्ष.

याउलट केवळ पस्तीस संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा महिला संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत, यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या.

आतापर्यंत होऊन गेलेल्या पंचवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांबाबतीत आणखी दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे यापैकी अनेक जण एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊबहिण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य अशा व्यक्ती संमेलनाध्यक्ष झालेल्या आहेत.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनाध्यक्षपद अनेक धर्मगुरुंनी भुषवले आहे, यात कॅथलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरु यांच्या प्रभावाखाली आहे हेच यातून दिसून येते.

वादविवाद, आरोप प्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ”ख्रिस्ती साहित्य” या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसचा आकडा आहे, अगदी तशीच स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे. अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत ‘दलित ख्रिस्ती’ या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे.

मराठी दलित ख्रिस्ती चळवळीचे प्रणेते अरविंद पी. निर्मळ यांनी १९९२ अहमदनगरमध्ये पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले त्यावेळी प्रचंड विरोधामुळे ऐनवेळी संमेलनाच्या जागा बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. परिस्थितीत आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा ‘दलित ख्रिस्ती’ हा शब्द गावकुसाबाहेरच आहे.

ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो. पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.

आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे तत्कालिन अहमदनगर व सध्याचे अहिल्यानगर संमेलन. मालवणच्या १९९४च्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाआधीच संजय सोनवणी यांनी ‘उत्तुंग’ हा माझा व्यक्तिचित्रसंग्रह प्रकाशित केला होता, मी मात्र संमेलनात प्रेक्षक म्हणून हजर होतो.

मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.

मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवात आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे.

  • कामिल पारखे, ज्येष्ठ पत्रकार तथा मराठी ख्रिस्ती साहित्याचे अभ्यासक, 9922419274

कालसंवादी मराठी लोककला, प्रवाही लोकसंस्कृती!

प्राचीन काळापासून भारतीय पारंपरिक लोककलांचे विश्व समृद्ध आणि संपन्न आहे. विविधतेतील एकता हे पारंपरिक लोककलांचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. मौखिक परंपरा हे भारतीय लोककला आविष्काराचे वेगळेपण होय. हा वारसा एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द केला आहे. त्यामुळे या लोकाविष्काराचे आकलन करताना त्यातील सूक्ष्म बारकावे लक्षात घेतले असता काही नवे प्रवाह गोचर होतात. पारंपरिक लोककलांचे जनसंवाद हे सामर्थ्य हे अतिशय लक्षणीय स्वरुपाचे आहे. परंतु, ते उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे. पारंपरिक लोककलांचे आणि त्यांच्या आविष्काराचे दृढ नाते हे कलावंतांच्या जीवनाशी निगडीत आहे. देशाच्या, राष्ट्राच्या उन्नतीचेही ते एक प्रमुख साधन आहे.

काय आहे लोकसाहित्य..? 
लोक हा बहुवचनी शब्द आहे. लोकांचे आपोआप घडत गेलेले जीवन, त्यांनी निर्माण केलेला परिसर, त्या अनुभवांची गाणी, गोष्टी, म्हणी, उखाणे, चाली-रिती, श्रद्धा-समजुती, देवदेवता, कला, क्रीडा म्हणजे लोकसाहित्य! समूहमनाचा स्वीकार किंवा नकार, समूह मनाने केलेले बदल, बरे-वाईट प्रत्येक युगातच घडत असतात. ‘लोक’ ते स्वीकारीत-नाकारित असतात आणि भाषेतून व्यक्तही करीत असतात. म्हणून लोकसाहित्य सतत घडत-बि-घडत असते, ते केवळ ग्रामीण किंवा भूतकालीन नसते. समाजाच्या विविध स्तरातले लोकमन सामूहिक अबोधपणे ते घडवित आणि मोडीत असते. ते प्रवाही आणि कालप्रवाही असते.

शिक्षितांकडूनच दुर्लक्ष!
मी येथे समग्र लोकसाहित्याबद्दल गंभीर चिकित्सा करीत बसणार नाही. आपल्या डोक्याला मुद्दामहून, अगदी जरासा ताण देण्याचाही माझा यत्किंचितही हेतू नाही. तर लोकमन कालप्रवाहात कोणते लोकसंचित कसे स्वीकारीत जाते, त्याला कशी वळणे मिळतात, गाभा परंपरेतला राहूनही बदल-परिवर्तन कसे होत जाते, यांच्या काही उदाहरणांसह मागोवा घेण्याचा हा एक छोटेखानी माझा प्रयत्न आहे.
इंग्रजोत्तर नागरी शिक्षित समूहातून तमाशासारख्या लोककलांकडे दुर्लक्ष झाले. त्याची जागा ‘नाटक’ या कलाप्रकाराने घेतली. मराठी नाटक हे इंग्रजोत्तर शिक्षित मंडळींनी इंग्रजी नाटकांच्या अनुकरणातूनच उचलले, कारण आज आपण ज्याला नाटक म्हणतो ते शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्यांसाठी तेव्हा उपलब्धच नव्हते. तेथे प्रथम इंग्रजीतून शेक्सपिअरची आणि पुढे अन्य पाश्चिमात्य नाटककारांचीच नाटके शिकविली गेली. स्नेहसंमेलनात त्यांचेच प्रयोग होवू लागले, तेच आम्ही उत्साहाने पाहत आलो. सांस्कृतिक भूक भागवत गेलो.

लोककला आवाहक ताकद!
संस्कृत नाटकेही शिकविली गेली. मग इंग्रजी आणि संस्कृत नाटकांची भाषांतरे, रुपांतरे होवू लागली. मग त्या पद्धतीच्या अनुकरणातून मराठी नाटके लिहिली गेली. पण, नाटकाचा खरा प्राण त्याचा ‘प्रयोग’ असतो. प्रारंभीचा हा भाषांतरित नाटकांचा एक जोरकस प्रवाह आला आणि काही काळ बराच स्थिरावला. १९२५ मध्ये एका नाटककाराला एकदम आपल्या पारंपरिक लोककलांचा बाज एका नागर नाटकात आणावासा वाटला. माधवराव जोशी यांचे ‘संगीत संस्थानिक स्वराज्य अथवा म्युनिसिपालिटी’ हे ते नाटक होय! नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था उदयास आल्या होत्या. त्या म्युनिसिपालिटीची निवडणूक हा नाटकाचा विषय. धमाल विडंबन आहे हे. आजही कोणी प्रयोग केला तर आजच्याच नगरपालिकांचे हुबेहूब चित्र त्यात आहे असे वाटते.
स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा देशीपणाची अस्मिता जागी झाली. लोकसाहित्य, लोककलांचा पुन्हा वापर केला गेला. मात्र, नाटकात पुन्हा लोककलांचा उपयोग झाला, तो जर्मन नाटककार बर्टोल्ड ब्रेख्त यांच्या अनुकरणाने. समाजामध्ये सामाजिक, राजकीय परिवर्तन करायचे असेल तर लोककलांमधील सामूहिक आवाहक आणि आश्वासक ताकदीचा प्रयोग आणि उपयोग करून घेणे प्रभावी ठरते. डाव्या विचाराच्या ब्रेख्तने श्रमकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्यायाचे प्रश्न मांडण्यासाठी केलेल्या प्रयोगापैकी ‘कॉकेशियन ऑफ चॉक सर्कल’ या ‘अजब न्याय वर्तुळाचा’ (अनु. चिं. त्र्यं. खानोलकर) या अनुवादित नाटकाने मराठी रंगभूमीला एक दिशा दाखविली. सर्वसामान्य लोकांना परिचित अशी एखादी लोककथा लोककलांच्या माध्यमातून मांडायची. ते लोकांना परिचित असते, आवडते. मग त्याच परिचित कथेतून नवा, कालसंवादी आशय, विषय मांडून परंपरेला कलाटणी देवून नव्या काळाशी संवाद साधायचा.
ब्रेख्तच्या या तंत्रातून १९७०-८० च्या दशकात काही भाषांतरित, रुपांतरित नाटके झाली. श्रमकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे भीषण महानगरी वास्तव मांडणारे रत्नाकर मतकरींचे ‘लोककथा ७८’ हे नाटक आले. पुण्याच्या सतीश आळेकर आणि जब्बार पटेल यांनी विजय तेंडूलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगमंचावर आणून इतिहास घडविला. हे नाटक आशय आणि प्रयोग दोन्ही दृष्टींनी युगप्रवर्तक ठरले.
वर-वर पाहता कथा ऐतिहासिक, सादरीकरणासाठी दशावतार, भारूड, गोंधळ अशा लोककला प्रकारांचा वापर आणि आशय कालातीत. प्रत्येक वेळी नाटक नवेच वाटावे. याच प्रवाहात मग सतीश आळेकरांचेच ‘महानिर्वाण’ नाटक आले. एकूण मानवी जगण्या-मरणातील विसंगतीवरची ही उपहासिका ‘ब्लॅक कॉमेडी’ म्हणता येईल, अशी आविष्कारासाठी प्रामुख्याने वापरली. कीर्तन शैली म्हणजे एक लोककलाच !

नित्यनूतन आविष्कार !
त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागरणासाठी ‘राष्ट्रीय कीर्तन’ नावाचा एक प्रकार येवून गेला. तर बहुजन जागरणासाठी म. ज्योतिबा फुले यांच्या काळात ‘सत्यशोधक जलसे’ लोककलावंतांनी लिहिले, सादर केले आणि गाजविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी देखील ‘आंबेडकरी जलसे’ ताकदीने सादर केले अन् गाजविले. समूहमनाला जेव्हा-जेव्हा मरगळ येते, तेव्हा-तेव्हा प्रयोगसिद्ध लोककलांनी नवनवे आविष्कार आणून समाजाला वळण दिले. कारण समूहाला आवाहन
करण्याची प्रचंड ताकद लोककलांमध्ये असते. पारंपरिकता, सामूहिकता, सुबोधता, उत्स्फूर्तता आणि लवचिकता अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक काळात लोककला नित्य नूतन आविष्कार सादर करीत असतात, करीत आल्या आहेत. स्त्री चळवळींच्या काळातही ‘मुलगी झाली हो…’ या लोकशैलीतल्या पथनाट्याने जागतिक विक्रम केला आहे.
प्रभावी लोकाविष्कार शैली!
एकेकाळी दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या विरोध यावर पोवाडे केले गेले. आजही ही परंपरा त्याच ताकदीने सुरू आहे. ‘म्युनिसिपालिटीची’ आठवण यावी असा पु. ल. देशपांडे यांचा ‘पुढारी पाहिजे’ हे वगनाट्य तुफान गाजले होते.
नाटकांमधून प्रामुख्याने प्रबोधनासाठी, सामाजिक, राजकीय परिवर्तनपर विचार जागृतीसाठी लोकाविष्कार शैलींचा प्रभावी उपयोग पुन:पुन्हा होतो आहे. खरे तर प्रबोधनासाठी समाजमन तयार करण्यासाठी वारकरी, संतांनी प्रथम लोककलांचा प्रभावी उपयोग केला. अंधश्रद्धेतून, नवस-सायास आदी कर्मकांडातून, भक्तीच्या नावावर केल्या जाणाऱ्या आत्मक्लेषी कर्मातून, भोंदू बाबांच्या अध्यात्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या शोषणातून सर्वसामान्य, निरक्षर, दरिद्री स्त्री-पुरुषांची मने मोकळी व्हावी, त्यांना भक्तीची उन्नत वाट मिळावी, म्हणून संत एकनाथ महाराजांनी भारूडांतून, रूपकांतून केलेल्या रचना सर्वज्ञात आहेत. सर्वच वारकरी संतांचे या क्षेत्रातले योगदान खूप मोठे, नव्हे तर अनन्यसाधारण आहे. आता पुन्हा त्यांचे आविष्कार सादर व्हावेत अशी परिस्थिती आली आहे, असे वाटते.

लोकमनाचा उत्स्फूर्त उद्गार
आतापर्यंतच्या सर्व विवेचनावरून लक्षात आले असेल की, सगळे लोकाविष्कार कालसंवादी राहिले तर टिकतात. केवळ जुने टिकवायचे म्हटले तर ते शक्य नाही. त्याचा अभ्यास जरूर होवू शकतो, व्हायलाच हवा. त्यामुळे परंपरेतले टिकाऊ काय आणि टाकाऊ काय, हे समूहमनच ठरवते. एखादी व्यक्ती नाही ठरवू शकत, हे तेवढेच सत्य म्हणावे लागेल. कारण सर्व (लोक) संस्कृती, साहित्य, कला या लोकसमूह निर्मित, समूहरक्षित आणि समूहाच्या गतीबरोबर घडणाऱ्या आणि बिघडणाऱ्या आहेत.
इंग्रजोत्तर काळात नाटकांखेरीज अन्य कलाप्रकारांचा कसा उपयोग स्वातंत्र्यपूर्व काळातही झाला, हे राष्ट्रसेवादलाच्या कलापथकांतून राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. एक फरक मात्र इंग्रजोत्तर नागर जीवनात झाला आहे. व्यक्तीनिर्मित साहित्य, कथा, कविता, कला यांच्यावर कर्त्याची नाममुद्रा आली. भांडवली मनोवृत्तीत कॉपीराईट, स्वामित्व हक्क म्हणून ‘अर्थ’ संबंध निर्माण झाले. ते लोकसाहित्य नव्हे, ज्यावर अभावितपणे लोकमनाच्या स्वीकृतीची मोहर उमटते, असे साहित्यही त्याचवेळी समांतरपणे निर्माण होत असते. आहे, त्याकडे फारसे लक्ष जात नाही. कर्त्याची नाममुद्रा प्रारंभी असली तरी तो लोकमनाचा सहज, उत्स्फूर्त उद्गार असल्यासारखा त्याचा वापर लोक नागरी जीवनातही करीतच असतात. उदा. संत वचने.. अनेकदा कर्त्याच्या नावाचेही विस्मरण होते. पण कृती शिल्लक राहते. रूढ लोकसाहित्य, लोककला, या बाहेरच्या काही उदाहरणातून माझे म्हणणे जास्त चांगले स्पष्ट होईल. अशा साहित्याला लौकिक साहित्य अशी संज्ञा वापरली जाते.

कालसापेक्ष अभिव्यक्ती!
संवेदनांची अभिव्यक्ती व्यक्तिनिरपेक्ष पद्धतीने सतत होत असते. ही लोकसाहित्याचीच निर्मिती होत असते. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जी गाणी वाजवली जातात, ती वस्तीतल्या बायका-मुले गुणगुणताना दिसतात. त्यांचा कर्ता कोणीतरी असणारच, पण त्यावर स्वामित्व लोकमनाचे असते.
आजच्या क्षणाला सुद्धा राजकीय, सामाजिक वास्तवावरच्या चारोळ्या, उखाण्यांसारखे यमक, अनुप्रास साधीत, शब्दचमत्कृती आणि अर्थचमत्कृतीयुक्त एसएमएस, ट्विटरच्या प्रतिक्रिया ही लोकमनाची उत्स्फूर्त, सहज आणि मुख्य म्हणजे मूळ निर्मात्याचा स्वामित्व हक्क नसलेली ही आधुनिक लोकसाहित्य निर्मितीच आहे. स्वरूप बदलले, आशय बदलला तरी तत्व कायम असते. समूहमनाला शब्दातून अभिव्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही. कधी गंभीरपणे, कधी मिश्किलपणे असा हा प्रवाह आहे. अगदी खळाळत्या प्रवाही पाण्यासारखा. काळ बदलला, जुने संदर्भ सुटले तरी बिघडत नाही. लोककला कालसंवादीच असून, प्रवाही लोकसंस्कृतीच्या असंख्य अगणित पाऊलखुना आहेत. नव्या संदर्भांना नव्या पद्धतीने लोकमन शब्दातून मोकळे करीत पारंपरिक, अस्सल मराठी लोककलांचा आणि लोकसंस्कृतीचा हा झरा अखंडपणे प्रवाहीच राहणार आहे, एवढे मात्र निश्चित!

-डॉ. शेषराव पठाडे, छत्रपती संभाजीनगर. मो. ९६०४८८४०५६
-लेखक लोककलांचे अभ्यासक, लोककलावंत व पत्रकार आहेत.

सर्वसामान्यांच्या भाषेला सामावून घेतल्यास मराठीला अधिक समृद्धी – डॉ.तारा भवाळकर

नवी दिल्ली दि.२१ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर- व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले.   

नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार,  मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे,  संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी उपस्थित होते.

डॉ.भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेची संमेलने आयोजित करतांना. मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहार करणरी माणसे वाढणे आणि ग्रामीण आणि सीमावर्ती भागात मराठी भाषेला पुढे नेण्याचे प्रयत्न करणाऱ्या लेखक, कवी, प्रकाशकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे.  मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच व्हावे. इंग्रजी माध्यमातून मराठीचे शिक्षण देतांना उच्च मराठीची पुस्तकेच शिकवावी.  मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची  आणि तिला वैश्विकतेकडे नेतांना  आपणही विशालतेच्या भावनेने  समावेशकतेचे सूत्र स्विकारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर ते विशिष्ट वर्गाचे संमेलन असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, आज संमेलनाची व्याप्ती विस्तारते आहे.  मराठी भाषेचा विकासात  शिक्षण न घेतलेल्या, परंपरेने शहाणपण आलेल्यांनीदेखील महत्वाचे  योगदान दिले आहे. साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर साक्षरतेचा उपयोग नाही. पुस्तकापेक्षा संत कवींनी, पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या महिला कवयित्रींनी जास्त ज्ञान दिले आहे.

भाषा समाजातील सर्व परंपरा, लोकव्यवहार आणि विचारांची वाहक असते.  लोककलेत  नृत्य, गाणी, नाट्य, संगीत, कला, वाद्य, कथा असते,  एखादी देवता यांच्याशी लोककला जोडलेली असते. जीवनाचं समग्र आकलन लोककलेसोबत  प्रत्यक्ष लोकजीवनात असतं. लोकजीवनातील सर्व साधनं मिळून लोकसाहित्य बनते. लोकसाहित्यात या सगळ्याचा अविष्कार होतांना दिसतो.

लोककलेतील गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी मोठ्या प्रमाणात झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जात्यावरची ओवी गाणारी स्त्री राजकीयदृष्ट्याही जागरूक होती. भोवतालच्या वातावरणातून आलेलं शहाणपण हे लोकपरंपरेतून मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून कामगार चळवळीतून आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात लेखक-कवी झाले. त्यातून लोकसंस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकसंस्कृतीत आदीम काळापासून आजपर्यंतचा प्रवाह दिसतो.

 डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेचा प्रवास गेल्या अडीच हजार वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे आणि पुढेही असाच जोमाने सुरू राहणार आहे. बृहन्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. या साहित्य संस्थांमध्ये वावरणारी नवी पिढीदेखील आस्थेने काम करीत आहे. अशा साहित्यिक संस्थांना शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास  या प्रयत्नांना बळ मिळेल. नव्या मंडळीच्या मनात साहित्याविषयी गोडी निर्माण करण्याचे कार्य जुन्या मंडळींनी करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. मराठी भाषा विभागाची स्थापना करून त्या माध्यमातून मराठीच्या विकासाचे चांगले कार्य करण्यात येत आहे. विश्व संमेलनाच्या निमित्ताने जगातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे कार्य झाले असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले.

अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षांकडे सोपवितांना कृतार्थतेची भावना असल्याचे नमूद करून डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे संमेलन असल्याने त्याला महत्व आहे, हा योग अतिशय महत्वाचा आहे. आजच्या मराठी साहित्य विश्वाला तर्कनिष्ठ आणि वैज्ञानीक दृष्टी देणारे साहित्यिक म्हणून तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते.  त्याच पायवाटेवरून पुढे जाणाऱ्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या  डॉ.तारा भवाळकर अध्यक्ष झाल्या आहेत.  साहित्य संमेलनाच्या माध्यमातून  सकारात्मक ऊर्जा देण्याचे आणि त्यासाठी पायवाट निर्माण करण्याचे कार्य होते, असे डॉ.शोभणे म्हणाले.

 यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ.भवाळकर यांच्याकडे सोपविले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक  ‘अक्षरयात्रा-मराठी साहित्यिकांचे समाजभान’ चे प्रकाशन डॉ.भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

रिंगाण’कार कृष्णात खोत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाला आणि आपल्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे त्याचा मला साहित्यिक म्हणून खूप आनंद होतो आहे. तारा भवाळकर याच्या अध्यक्ष आहेत. साठ वर्षांपूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या भारत देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलेलं होतं. त्यानंतर आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी होत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे जाणते राज्यकर्ते आणि साहित्य क्षेत्राचे जाणकार शरद पवार यांचे स्वागताध्यक्ष आहेत.

आपली मराठी भाषा ही अनेक खेड्यापाड्यांमध्ये बोलल्या जात असणाऱ्या बोलीभाषेतून आली असून ते जे भाषेचे झरे येतात आणि त्यातूनच या अभिजात भाषेचे असणारे अनेक पुरावे आपल्याला देत असते. इतकी वर्ष अभिजात भाषा मिळवण्यासाठीचा असणारा जो खटाटोप आहे, त्याला यश मिळालं आणि अनेक समितीने अगदी रंगनाथ पठारे यांच्या समितीने जो अहवाल मांडला, त्याचा अभ्यास करून आपल्याला केंद्र सरकारने या अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही गोष्ट सरकारच्या दृष्टिकोनातून शिक्कामोर्तब करणं जेवढी गरजेची होती त्याच्यापेक्षा जास्त गरजेचे आपण आपल्या भाषेमध्ये जे साहित्य निर्माण करतो ते साहित्य इतर भाषेमध्ये जाणं आहे. आपल्या अभिजातपणाच्या खुणा आपल्या साहित्यातल्या साहित्य मूल्यातून दाखवून देणं ही गोष्ट मराठीत लिहिणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात असली पाहिजे. आणि त्यातूनच आपण अभिजात भाषेचा असणारा दर्जा टिकवू शकतो. सातत्याने चांगली निर्मिती होणे, सातत्याने आपण तिच्याबद्दलचा विचार करणं गरजेचं आहे.

मराठी भाषा खेड्यापाड्यात बोलली जाते, ती शहरांमधून जरा लोप पावते आहे. खेड्यापाड्यातील लोक आज शहरामध्ये राहत आहेत आणि आपल्या मुलांनी मराठी शकु नये अशी त्यांची अपेक्षा आहे, इतर भाषा शिकण्याबद्दल कुणाचाही दुमत असणार नाही परंतु, त्याच बरोबर आपली मराठी भाषा आपली मातृभाषा ही आपली भाषा कशी होईल याकडे लक्ष अनेक विचारवंतानी, साहित्यिकांनी, इथल्या शास्त्रज्ञांनी दिले पाहिजे. जर ही माझी मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर निश्चितपणे ते अभिजात भाषा आहे असं कोणाला सांगावे लागणार नाही. तिचं अभिजातपण हे तिच्यामध्ये असणाऱ्या सामर्थ्यांमध्ये लपलेलं आहे. अनेक बोली नष्ट होत असताना आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवतो. आपण या अनेक बोलीभाषा जगवल्या पाहिजेत. ते या अभिाजात भाषेचे झरे आहेत असं मला वाटतं. प्रमाण भाषेला या खेड्यापाड्यातल्या बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा आहेत त्या भाषा मिळतात आणि त्यातून प्रमाण भाषेला जोड मिळते.

माझा साहित्य अकादमी पर्यंतचा प्रवास जो आहे तो माझ्या भाषेनेच मला करता आला. मला इतर भाषेतून तो करता आला नसता. मी माझ्या गावची माझ्या परिसराचीच बोलीभाषा घेऊन प्रथम आलो. अभिजात भाषा ही वरून पडत नाही ती खालून उगवलेली असते आणि ही गोष्ट आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिकांनी दाखवून दिलेली आहे. वि. स. खांडेकरांच्या पासून अगदी राजन गवसांच्यापर्यंत, किरण गुरवांच्या पर्यंत. कोल्हापूरच्या असणाऱ्या वेगळ्या बोलींचे अनेक सार आनंद यादव यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांच्यामध्ये ती गोष्ट दिसते. किरण गुरव, विश्वास पाटलांच्यामध्ये ती गोष्ट दिसते. आणि नव नवीन येणाऱ्या अनेक मुलांच्या वतीने ती गोष्ट दिसते. मला वाटते कोल्हापूरमध्ये प्रत्येक परिसरामध्ये बोलणारी वेगवेगळी बोलीभाषा आहे ती देखील अभिजातचे झरे आहेत. चंदगड, निपाणी ह्या परिसरामध्ये मराठी बोलणारी वेगळी आणि इकडे शाहुवाडी, कोकण परिसराच्या घाटमाथ्यावर बोलणारी भाषा वेगळी. आमच्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये बोलणारी भाषा वेगळी जरी असली तरी ती मराठीचे अतिशय एक ऊर्जा स्त्रोत आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मराठी शाळा देखील आज मरता कामा नयेत, मराठी शाळा देखील टिकल्या तर आपल्या अभिजात भाषेला अजून जोर मिळेल.

000000

मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान

मराठी भाषेचं पुनर्जीवन करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हंटलं तर ते वावग ठरणार नाही इतकं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जो काळ होता, त्या मध्ययुगामध्ये आणि त्याच्या अगोदर जवळजवळ दोन शतक भारताच्या बहुतांशी भागावर परकीय लोकांनी राज्य केलेलं आहे. जे राज्यकर्ते होते त्यांनी तिकडून येताना आपली भाषासुद्धा घेऊन आलेले होते. आणि मुख्यतः राज्यकारभार जो चालायचा तो त्यांच्या भाषेमध्ये चालायचा. परकीय त्यांच्या भाषेमध्ये चालायचा. शिवाजी महाराजांनी ज्या मुख्यतः ज्या राजवटीतून आपलं स्वराज्य आकाराला आणलं, ते आदिलशाही मधली काही फर्माने आहेत तर आदिलशाहीची फर्माने पहिला भाग जो आहे तो फारसीमध्ये आहे. आणि दुसरा भाग मराठीमध्ये दिलेला आहे. कारण ती त्यांची गरज होती की राज्य जर चालवायचे असेल, इथल्या लोकांना फारसी येत नव्हती. त्याच्यामध्ये कन्नड आणि मराठी असे दोन प्रबळ असणारे भाषेचे समूह त्या राज्यांमध्ये येत होते. आणि त्यामुळं फारसी भाषा राज्य व्यवहाराची भाषा ठेवली आणि त्याचबरोबर इथल्या सामान्य रयतेला समजावं म्हणून मराठी भाषेचा सुद्धा त्यांनी थोडाफार अंगीकार त्यांच्यात केलेला होता, म्हणजे दोन भाषेत द्विभाषिक ती फर्माने असायचीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळं इथल्या मूळची जी काही आपली मराठी भाषा होती. महाराष्ट्राची जी भाषा होती, मराठी भाषा होती त्या भाषेमध्ये फारसी शब्दांचा खूप मोठा प्रभाव निर्माण झालेला होता.

शिवाजी महाराज हे असे पहिले राज्यकर्ते आहेत की ज्यांनी या फारसीचा प्रभाव काढून टाकायचा प्रयत्न केला. तो राज्याभिषेका नंतर. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ ला झाला. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मिती त्यांनी नुकतीच सुरू केलेली होती. पुणे जहागीरीतून ते १६४२ ला जिजाऊ साहेब आणि शिवाजी राजे हे बंगळूरवरुन आत्ताच्या कर्नाटकातून पुणे जहागीरीत आलेले होते. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून जी पत्र निघायची ते जे मायने होते ते पूर्ण फारसी असायचे. शिवाजी राजे जे नाव आणि गावाची नावे सोडली तर ती सगळी फारसी आहेत. हे पत्र आहे ३० ऑक्टोबर १६४० ला लिहिलेलं महाराजांनी. आणि १६७४ पर्यंत महाराजांच्या दरबारातून महाराजांच्या कार्यालयातून जी पत्र निघायचीत ती या फारसी प्रभावानेच निघायचीत. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकानंतर जसं त्यांनी नवीन सृष्टी तयार केली. धर्म संस्थापना केली. नवीन सृष्टी म्हणजे काय केलं महाराजांनी तर त्यांनी हा जो काय परकीय प्रभाव होता. मराठ्यांच्या सगळ्याच एकंदरीत गोष्टींवर आणि खास करून भाषेवर तो प्रभाव कमी करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले.

राज्याभिषेका नंतर जे पहिलं पत्र निघालं त्याच्यामध्ये मायना बदलला आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे संस्कृत आणि मराठी यांचे प्रभाव असणारे पत्र निर्माण होऊ लागले. शिवाजी महाराजांनी काय केलं की जो फारसीचा प्रभाव होता तो पूर्ण प्रशासकीय व्यवहारातून सुद्धा काढायचा प्रयत्न केला. या पत्रांचा संशोधकाने अभ्यास केलेला आहे, खास करून यु मु पठान नावाचे आपले मराठीचे एक मोठे साहित्यिक होऊन गेले, फारसी आणि मराठी हा त्यांचा दोन्हीवर हातखंडा होता. त्यांनी शिवकालीन राज्याभिषेकाच्या अगोदरची पत्र आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरची पत्र याच्या मधल्या शब्दांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर जी पत्र छत्रपतींच्या दरबारातून निघायचीत त्याच्यामध्ये अनेक मराठी शब्द, संस्कृत शब्दांचा अंतर्भाव सुरू झाला. म्हणजे अगोदर जी पत्र निघायचीत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा साहेब हा उल्लेख यायचा. त्यांच्या पत्रामध्ये नंतर तो स्वामी असा शब्द यायला लागला. म्हणजे महाराजांनी हा इतका प्रभाव मोठा होता या सगळ्या राज्यसत्तांचा, २५०-३०० वर्षाच्या परकीय राज्यसत्तांनी नुसतं लष्करी राज्य केलेलं नव्हतं तर त्यांचं एकप्रकारे भाषिक साम्राज्य सुद्धा या आपल्या मराठी भाषेवर निर्माण झालं होतं. ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका नंतर कमी केलं.

महाराजांनी व महाराजांच्या नंतरचे जे सर्व राज्यकर्ते आहेत त्या सगळ्या राज्यकर्त्यांच्या मुद्रा ज्या आहेत त्या संस्कृत मध्ये निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी मोठं योगदान दिलं. त्यांच्या आधीच्या काळात, प्रशासन, लष्करी व्यवहार आणि राजकीय दस्तऐवज फारसी भाषेत असत. हे तत्कालीन परकीय सत्ता (मुघल, आदिलशाही, निजामशाही इत्यादी) आणि त्यांचे प्रभाव यामुळे होत असे. पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मराठी आणि संस्कृत भाषांना राजकारभारात अधिक महत्त्व दिलं. त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला, तो प्रशासकीय व्यवहारात मराठी आणि संस्कृत शब्दांचा उपयोग करण्यासाठी तयार करण्यात आला. फारसीच्या प्रभावाखाली असलेले अनेक शब्द गाळून, त्याऐवजी भारतीय भाषांतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला. शिवकालीन पत्रांमध्येही हा बदल दिसून येतो. पूर्वीच्या पत्रांमध्ये “साहेब” हा शब्द असायचा, तर नंतरच्या पत्रांमध्ये “स्वामी” किंवा तत्सम शब्दांचा वापर होऊ लागला.

त्याशिवाय, मुद्रा (शिक्का) यामध्येही हा बदल स्पष्ट होतो. जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज यांच्या मुद्रांमध्ये फारसी प्रभाव होता, पण शिवाजी महाराजांच्या मुद्रा संस्कृत छंदात रचलेल्या होत्या. हा भाषिक बदल फक्त प्रशासनापुरता मर्यादित नव्हता, तर त्याचा प्रभाव पुढील छत्रपतींच्या कारकिर्दीतही दिसतो. छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, ताराबाई यांच्याही काळात मराठीत अधिकाधिक प्रशासनिक कामकाज होऊ लागलं. यामुळे मराठी भाषेचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यात शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. त्यांनी मराठीला अभिमानाची भाषा बनवलं, आणि हा वारसा पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात कायम राहिला. विशेषतः शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेचा वापर, फारसीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न, आणि राजव्यवहार कोषाची रचना ही सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे.

-इतिहास तज्ञ, इंद्रजित सावंत

0000

मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाला वाचलं पाहिजे

नवी दिल्ली येथे येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. समकालामध्ये मराठी साहित्य याबद्दल खूप उलट आणि सुलट चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. एकीकडे मराठी वाचक खूप कमी होतात अशी चर्चा होताना दिसते व पुस्तक वाचली जात नाहीत अशी चर्चा होताना दिसते. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तरी देखील एक चर्चा मराठी भाषा ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे, अशीही चर्चा काही अभ्यासक करताना दिसतायत. वास्तविक, मराठी साहित्य कोण वाचतं याचा जर आढावा घेतला तर केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांच्या पलीकडे मराठी वाचकांचं फार मोठं जग आहे, आणि या सर्व वाचकांची जर प्रतिक्रिया पाहिली, या पुस्तकांकडे पाहण्याची तर ती अतिशय स्वागतार्ह आहे. म्हणजे अलीकडच्या पाच-दहा वर्षांमध्ये, जर कोरोनाचा काळ सोडला तर मराठी पुस्तकांची निर्मिती आणि प्रकाशनाची संख्या गती अतिशय वेगवान आहे. तितकीच गती ही पुस्तक विक्रीची आहे आणि सर्व स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तके वाचणारे वाचकही वाढत आहेत. म्हणजे एखाद्या पुस्तकाची आवृत्ती एका विशिष्ट काळामध्ये २५-२५ वर्षे जात नव्हती, पण अलीकडचं चित्र उलटं आहे. म्हणजे बऱ्याच पुस्तकांची आवृत्ती ही वर्षात-दोन वर्षात संपताना दिसते.

उदाहरण द्यायचं झालं तर शरद बाविस्कर यांची “भूरा कातंबरी” एका वर्षांमध्ये सहा आवृत्त्या गेल्या. अशा पद्धतीने अनेक पुस्तक आहेत की ज्यांची ७००-८००-१००० पुस्तकांची आवृत्ती ही वर्षभरात संपलेली आहे. याचा अर्थ कोणीतरी वाचतय, त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं पुस्तक विक्री केंद्र आहेत किंवा प्रदर्शने भरली जातात तिथे मोठ्या संख्येने पुस्तके विकली जात आहेत, आणि ती सर्व प्रकारची पुस्तक विकली जातायेत. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी ग्रंथप्रदर्शन भरवलं जातं.  या वर्षीचा आढावा घेतला तर अतिशय वैचारिक जी पुस्तक, संशोधनात्मक आहेत, वर्षानुवर्षाच्या मेहनतीने तयार केलेली आहेत, अशी बुद्धिजीवी वर्ग वाचतील अशी पुस्तके देखील शेकड्याने विक्री झालेली आहेत. याचा अर्थ पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या ही वाढते आहे किंवा अबादित आहे, त्यामुळे चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही.

वर्गातली मुलं वाचतायत की नाही याबद्दल सर्व्हे केले, असता समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा कोरोनाच्या काळानंतर वर्गात विद्यार्थी येण्याची संख्या कमी होते आहे. परिणामी, असं वाटतं की वाचक कमी होतायेत, पुस्तके वाचली जात नाहीत. पण तसं चित्र नाहीये. विद्यार्थी देखील काही दिवसांनी परततील. काही दिवसातच असं चित्र लक्षात येईल की वर्गा बाहेर राहून हाती काही लागत नाही. किमान वर्गात बसल्यानंतर जे काही ऐकू येतं कानावरती पडतं त्यातूनच व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. हे वर्गात एखादा शिक्षक शिकवू लागल्यानंतर बोलण्याच्या ओघात पाच-पंचवीस पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, त्यांच्या लेखनाबद्दलची चर्चा येत राहते आणि त्यातूनच वाचक घडतात. ही प्रक्रिया नक्कीच वर्गात सध्या खंडित आहे, पण बाहेर जर आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पुस्तकांची चर्चा होताना दिसते.

जुनी पुस्तक विकत घेणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे, पुस्तक विकणारा वर्ग तयार झालेला आहे, खूप नवीन मुलं पुस्तक विक्रीच्या क्षेत्रामध्ये आलेली आहेत आणि त्यांचे अनुभव खूप उत्तम आहेत. अतिशय उत्तम दर्जाची पुस्तक निर्मितीची देखील प्रक्रिया मराठीमध्ये सुरु झालेली आहे. काही प्रकाशन संस्था अतिशय उत्तम दर्जाची पुस्तक तयार करत आहेत. हे सगळं वातावरण उत्साहवर्धक आहे. वाचक वाढतायेत, पुस्तक संख्या वाढते आहे, लेखक वाढतायेत, अनेक प्रकारचं लेखन मराठीमध्ये येऊ लागलेल आहे. रिपोर्टाज पद्धतीचं, संशोधनात्मक, ललित आणि नवोदित लेखकांमध्ये जर पाहिलं तर अतिशय दमदार अशा कथा लिहिणारे कथाकार, कादंबरीकार, कवी समोर येतायेत आणि ही सगळी गोष्ट अतिशय स्वागतार्ही आहे, उत्साहवर्धक आहे मराठीच्या वाचकांसाठी आणि मराठीच्या वातावरणासाठी फारच आनंदायी अशी गोष्ट आहे.

खरंतर सगळ्या मराठी भाषिकांनी, भाषिकांना अभिमान वाटावा अशी एक दैदीपीमान परंपरा संतांची मराठीमध्ये आहे. ज्ञानेश्वरांपासून मराठी संतांनी अतुलनीय असं योगदान दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक संतांवरती स्वतंत्र पणे बोलता येईल इतकं योगदान प्रत्येकाचं आहे. शिवाजी विद्यापीठाने १८०० पानाचं गाथेचं निरूपण प्रकाशित करून एक वर्ष व्हायच्या आधी ते संपलं. त्याच्या ११०० प्रती विकल्या गेल्या, ही अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामील १८०० पानाचं वैचारिक लेखन हातोहात विकलं जातं, तेही विद्यापीठाच्या एका खिडकीमधून. कारण आमची विक्री केंद्र महाराष्ट्रभर नाही आहेत. म्हणजे विद्यापीठामध्ये येऊन विकत घेऊन लोकांनी हे संपवले आणि म्हणून त्याची दुसरी अध्यवत आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे आणि तिचा देखील खप तशाच पद्धतीने चाललेला आहे.

दिल्ली इथं बऱ्याच वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही खरंतर खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मराठी भाषेची वहीवाट इतिहासामध्ये जर शोधली तर या वहीवाटीमध्ये अर्ध्या पेक्षा जास्त भारत येतो. म्हणजे तंजावर पासून दिल्ली पर्यंत अनेक प्रांतांमध्ये एका विशिष्ट काळामध्ये मराठी भाषा ही राजभाषा होती. कालपरवा पर्यंत मध्य प्रदेश मध्ये मराठी भाषा राजभाषा होती, गोव्यामध्ये राजभाषा होती, महाराष्ट्र तर आहेच पण महादजी शिंदे यांच्या रूपाने दिल्लीमध्ये आपण मराठीचा झेंडा रोवलेला होता आणि मराठी माणसाचे जे कार्य आहे हे कार्य जगा समोर आणण्यासाठी दिल्लीत साहित्य संमेलन होणं खूप महत्त्वाचे आहे. खरं कारण मराठी साहित्य हे जागतिक दर्जाचे साहित्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही वाचनामधून होते. आपण नेहमी भाषिक कौशल्यांच्या गोष्टी करतो की भाषिक कौशल्य येण्याचा मार्ग एकमेव मार्ग म्हणजे वाचन हे आहे. म्हणजे चांगलं लिहिता येणे, चांगलं बोलता येणे हे आजच्या काळात फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि कोण चांगलं लिहितो, कोण चांगलं बोलतो याचा अभ्यास केला तर जो चांगलं वाचतो तो चांगलं बोलतो, चांगलं लिहितो आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये भाषिक कौशल्य फार महत्त्वाची आहेत आणि ती आत्मसात करण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी वाचनाशी जोडून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. आज वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर समृद्ध करणारी गोष्ट आहे, समज वाढवणारी गोष्ट आहे, आकलन शक्ती वाढवणारी गोष्ट आहे. त्यामुळे देशाची जर प्रगती व्हायची असेल, आपला देश पुढे न्यायचा असेल, मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाला वाचलं पाहिजे.

-डॉ. नंदकुमार मोरे मराठी भाषा, विभाग प्रमुख

0000

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  • स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  •  संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर

नवी दिल्ली दि.२१ : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी ‘माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके’ असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही श्री मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली. मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले, मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे, सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत, समानता आणि समरसता आहे, मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.

गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला, जनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.

देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले, भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते, विकासाशी जोडते, भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.

मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, साहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलन, साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – भवाळकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी – पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.नहार म्हणाले, दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.

प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा नवा भारत आहे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले...

0
बीड दि. 9 ( जिमाका ) : -पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम भारत करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा घुसके...

जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गोदामाची साठवणूक क्षमता वाढवावी – पणनमंत्री जयकुमार रावल

0
पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात...

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

0
मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण...

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधणारा ‘टेक वारी’ उपक्रमाचा यशस्वी समारोप

0
मुंबई, दि. ९ : “माऊली... माऊली...” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या  “टेक वारी : महाराष्ट्र टेक...

८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई, दि.९ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२५% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. ०९ जून, २०२५ पर्यंत देय...