शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1694

 विधानपरिषद लक्षवेधी

आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 30 : बेरोजगार तरुणांना नोकरीची प्रलोभने दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

प्लेसमेंट कार्यालयाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असल्याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

नोकरीच्या आमिषाने फसवून देशाबाहेर नेलेल्या तरुणांना देशामध्ये परत आणण्यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. राज्यातील अशा प्रकारच्या तक्रारी त्या कक्षाच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

धोंडिराम अर्जुन/ससं

 

भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची वरिष्ठ पातळीवर चौकशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 30 : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाइपलाइनद्वारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उध्वस्त होत असल्याने या प्रकरणाची व्यवस्थापकीय संचालक किंवा संचालक यांच्यामार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.

या संदर्भातील लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली होता, या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रांचे युनिट क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीज निर्मिती होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ

 

विधवा महिलांविरुद्ध कुप्रथा बंद करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 30 : राज्यातील विधवा महिलांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

राज्यात विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा करण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रामराव पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यास श्री.फडणवीस यांनी उत्तर दिले.

विधवा महिलांच्या कुप्रथेच्या परिणामाबाबत 31 मे रोजी महिला विशेष ग्रामसभा घेतली जाईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाईल, असे श्री फडणवीस यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ

विधानसभेत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्यावतीने अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकसंदेश वाचून दाखविला.

शोकसंदेशात ॲड. नार्वेकर म्हणाले, हिराबेन मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आईंचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तसे एका मुलाखतीत बोलून दाखविले होते. आपल्या आईने जीवनात अनेक कष्ट केले असल्याचा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री निवासस्थानी त्या केवळ एकदाच गेल्या होत्या. नोटाबंदीच्या आपल्या मुलाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ  त्या एटीएमच्या रांगेतही उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे जीवन ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा आहे. त्यांच्या बालवयातील संघर्षाचे स्मरण औचित्यपूर्ण ठरेल. त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘काम करो बुद्धीसे और जीवन जीयो शुद्धी से’ असा जीवन संदेश दिला होता, असे श्री. नार्वेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

सभागृहाच्या वतीने दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाबद्दल स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकप्रस्तावाची एक प्रत शोकाकुल कुटुंबाला पाठविण्यात आली आहे.

विधानसभा प्रश्नोत्तरे

शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 30 : पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी शासन आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग असून या विभागाला गती देण्यात येईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

पर्ससीन मासेमारीवर बंदी असतानाही अनेक मच्छिमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याबाबत प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केला होता.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, 120 अश्वशक्ती स्पीड बोटीला परवानगी दिली आहे. 720 किमी असलेल्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या 7 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांत गस्ती बोटी उपलब्ध आहेत.  याबाबत उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊन २ स्पीड बोटी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

अशा पद्धतीने पारंपरिक मासेमारी करणाच्या आड कोणी येत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. शासन पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या सोबत सकारात्मक दृष्टीने आहे. मत्स्य व्यवसाय विभाग हा रोजगार क्षमता असणारा विभाग आहे  या संदर्भात राजाच्या व  केंद्राच्या योजनांबाबत दिल्लीत बैठक घेऊन या 7 जिल्ह्यातील प्रतिनिधीना बोलावण्यात येईल. 12 नॉटिकलच्या पुढे मासेमारी करण्यास बंदी आहे. याबाबत समिती गठीत केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत एकच धोरण तयार करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी सदस्य भास्कर जाधव, महेश बालदी यांनी सहभाग घेतला होता.

0000

प्रवीण भुरके/ससं

 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार प्रकरणी फेरचौकशी करणार – मंत्री संदीपान भुमरे

नागपूर, दि. ३० : उस्मानाबाद जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणी 4 अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरी  याप्रकरणी फेर चौकशी करण्यात येईल, संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत दिली.

याबाबत सदस्य कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. भुमरे बोलत होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, या प्रकरणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.  दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या असून इतर नियमित दोषी अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येत आहे.

या प्रकरणी 1 कोटी 12 लाखांचा अपहार झाला आहे. संबंधिताकडून 75 लाख 70 हजार वसूल करण्यात आले असून उर्वरित रकम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी चालू आहे. असे अपहार  होऊ नयेत यासाठी आधार लिंक केले जात आहे. हा सर्व प्रकार उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये झाला असून बीड जिल्ह्यात पैसे उचलण्यात आले आहेत. याबाबत खातेदाराची चौकशी चालू आहे. १०० दिवसात  रोजगार मिळण्यासाठी नगरपंचायतीमार्फत काम घेता येते. ज्याप्रकारे मागणी होते, त्या अनुषंगाने सर्व मजुरांना काम दिले जात आहे. अकुशल कामगारांना वेळेत पैसे उपलब्ध होत आहेत.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, यशोमती ठाकूर, प्रकाश साळुंखे, सुरेश वरपूडकर, अदिती तटकरे यांनी सहभाग घेतला.

000000

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. ३० : बनावट खत विक्री करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक  नियुक्त करून बी-बियाणे, खते यांची गोदामे तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा  बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती केल्याबाबत प्रश्न सदस्य संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी शेतकऱ्यांना घेण्याकरिता एक वेगळे खत घेण्याची सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. हे दुकान 15 वर्षांपूर्वीचे असून लिंकिंग पद्धतीने खते दिली. याबाबत प्राथमिक चौकशी केली आहे. त्या दुकानाचा दहा  दिवसांसाठी परवाना रद्द केला आहे. असे लिंकिंग पुन्हा होणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत अचानक तपासण्या करण्याच्या सूचना  संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वरिष्ठ जिल्हा कृषी अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करून दोषीअंती  संबधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल.

या दुकानाचा पंधरा वर्षे जुना परवाना आहे. यामुळे या दुकानाची पंधरा वर्षांत पहिलीच तक्रार असल्यामुळे परवाना पुन्हा दहा दिवसांनी पूर्ववत केलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत परवानाधारक खत विक्रेत्याने डीपी खतासोबत इतर खते शेतकऱ्यांना सक्ती करून विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सागर सीड्स अँड फर्टीलायझर यांचा विक्री परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला होता.

परंतु खरीप हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत लिंकिंग पद्धतीने विक्री न करण्याबाबात दिलेले हमी पत्र विचारात घेऊन निलंबित केलेला खत विक्री परवाना पूर्ववत करण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

प्रवीण भुरके/ससं/ 

नुकसान भरपाईपोटी ७२ हजार ५७६ लाभार्थी शेतकऱ्यांना ४० कोटी रुपये वाटप – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. 30 :- शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अधिक मिळाली पाहिजे यासाठी शासन सकारात्मक आहे. परभणी जिल्ह्यात  सोयाबीन पिकाकरिता आठ महसूल  मंडळामध्ये  73 हजार 814 शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाई पोटी 40.71 कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 72 हजार 576 शेतकरी लाभार्थ्यांना ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. नुकसान भरपाईपोटी 40.9 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम 63 कोटी रुपये बाकी असून लवकरात लवकर ही रकम वाटप केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

परभणी जिल्ह्यातील 44 मंडळाचा अग्रीम पीक विमा रकमेसाठी समावेश केल्याबाबतचा प्रश्न डॉ.राहुल पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते .

श्री देसाई म्हणाले,परभणी जिल्ह्यात सलग 21 दिवस पावसाचा खंड झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असूनही प्रशासनाने केवळ आठ मंडळाचाच अग्रीम रकमेसाठी समावेश केला असून उर्वरित 44 मंडळाचा अग्रीम रकमेसाठी समावेश करण्यात आल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. खरीप हंगाम 2022 मधील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत पावसातील तीन आठवडे व त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड नसल्यामुळे या 44 महसूल मंडळामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेमधील चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित नसल्याने अधिसूचनेत समावेश करण्यात आला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्जन्यमापक यंत्रात त्रुटी  असल्याबाबत महसूल व कृषी विभागाला सूचना करून या यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.   या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री सुरेश वरपूडकर, प्राजक्त तनपुरे यांनी घेतला होता.

0000

प्रवीण भुरके/ससं/

 

 

मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि.30 ;  मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबंधित प्रलंबित विषय यामुळे मार्गी लागला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. धोकादायक किंवा किमान ३० वर्ष जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्वावर ३०० चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

म्हाडाने पुनर्बांधणी केलेल्या ३८९ इमारतींच्या पुनर्विकासाच्या नियमावलीत स्वतंत्र तरतुदींना मान्यता देण्यात आली आहे. बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत नवीन तरतूद करण्यात आली आहे. या फेरबदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे.

मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतींचा म्हाडाने विकास करुन त्यातील गाळे भाडे तत्वावर रहिवासासाठी देण्यात आले होते. या 389 इमारतीत असणारे सुमारे 30 हजार पेक्षा जास्त सदनिका आणि सुमारे दीड लाख रहिवासी 180 ते 225 चौरस फूट किंवा जास्त क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहत होते. म्हाडाने या पुनर्रचित केलेल्या असल्याने या इमारती उपकरप्राप्त मध्ये येत नव्हत्या. त्यामुळे या इमारतींचा विकास करण्यासाठी विकासक पुढे येत नव्हते. तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे पुनर्वसन शक्य होत नव्हते.  आता नव्या नियमांच्या तरतुदीमुळे  धोकादायक किंवा किमान 30 वर्ष जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन मालकी तत्वावर 300 चौरस फूट चटई क्षेत्राच्या सदनिकेत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत

पुणे, दि. ३०: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या  २ ते १२ जानेवारी २०२३ जानेवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून ४ जानेवारी २०२३ रोजी बालेवाडीकडे प्रयाण करणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ च्या आयोजनाबाबत राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी, क्रीडा स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व क्रीडा ज्योतींचे ३ जानेवारी २०२३ पर्यंत शिवछत्रपती क्रीडा संकुल , पुणे येथे आगमण होणार आहे. स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून ४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता निघणार असून ताम्हिणी घाट मार्गे सायं. ६ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मुक्कामी येणार आहे.

ऑलिम्पिक हॉकीपटू अजित लाकरा, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू समिक्षा खरे, राष्ट्रीय पदक विजते हॉकीपटू अक्षदा ढेकळे, प्रज्ञा भोसले, राहुल शिंदे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकर सोहम ढोले, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू गायत्री चौधरी, आंतरराष्ट्रीय वुशु खेळाडू श्रावणी कटके आणि स्वराज कोकाटे हे खेळाडू किल्ले रायगड ते पुणे दरम्यान क्रीडज्योत धावक असतील.

नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई व पुणे या ८ विभागातील मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणाहून क्रीडा ज्योतींचे आगमन दि. ३१ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे समायोजनासाठी येणार आहेत. किल्ले रायगडवरुन आलेली मुख्य क्रीडा ज्योत  ५ जानेवारी २०२३ रोजी प्रथम एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक शिल्प येथे येईल. याच ठिकाणी आठ विभागातून आलेल्या आठ क्रीडा ज्योती एकत्रित येऊन या सर्व क्रीडा ज्योतींचे मुख्य क्रीडाज्योतीत दुपारी १ वाजता समायोजन करण्यात येणार आहे.

ऑलिम्पियन खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कारार्थी यांच्या समवेत लक्ष्मी रोड -डेक्कन, फर्ग्यूसन महाविद्यालय मार्गे, शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळूंगे, बालेवाडी येथे ही क्रीडा ज्योत पोहोचणार आहे.

विभागीय क्रीडा ज्योत रॅलींचा मार्ग

नागपूर विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग नागपूर – वर्धा – समृद्धी महामार्गाने शिर्डी – अहमदनगर – येरवडा, अमरावती विभाग रॅली अमरावती – अकोला – शेगांव – खामगांव – शिंदखेड (राजा) – औरंगाबाद – अहमदनगर -येरवडा, औरंगाबाद विभाग रॅली औरंगाबाद- अहमदनगर – येरवडा, लातूर विभाग- लातूर – उस्मानाबाद- येरवडा, कोल्हापूर विभाग- कोल्हापूर – कराड – सातारा – येरवडा, पुणे विभाग रॅली- बारामती ते येरवडा, नाशिक विभागीय रॅलीचा मार्ग नाशिक – संगमनेर-येरवडा आणि मुंबई विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग गेट वे ऑफ इंडिया – वाशी – लोणावळा – येरवडा असा असणार आहे, अशी माहिती माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दिली आहे.

0000

‘नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्ष’ राज्यभर स्थापन करणार -मंत्री विजयकुमार गावित

नागपूर, दि. ३० : आदिवासी समाजातील युवक आणि युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती होण्याची गरज आहे. नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाच्या माध्यमातून ही गरज पूर्णत्वास येणार आहे. अत्यंत कौतुकास्पद अशी ही कक्ष संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज येथे सांगितले.

नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाचे उद्घाटन आज मंत्री श्री. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, सहाय्यक आयुक्त दशरथ कुळमेथे, उद्योजक गजानन भलावी यांच्यासह आदिवासी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. गावित म्हणाले की, आदिवासी समाज हा विविध कौशल्याने परिपूर्ण आहे. त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या क्षमता आहेत. त्यांच्या या क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. त्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी हा कक्ष मोलाची भूमिका बजावणार आहे. विविध योजना, उपक्रम तसेच शासकीय नोकरीची माहिती या कक्षाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचा विशेष आनंद आहे. माहिती देणारी व्यक्ती ही स्थानिक भाषिक असावी, अशी सुचनाही मंत्री श्री. गावित यांनी यावेळी केली.

राज्य शासनाचे विविध विभाग तसेच खासगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी ओळखून रोजगार मेळावा घेण्याचे नियोजन आहे. उद्योजकांना या रोजगार मेळाव्यात निमंत्रित करण्यात येईल. आदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

सहाय्यक आयुक्त श्री. कुळमेथे यांनी प्रास्ताविक केले.

नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाविषयी

आदिवासी समाजातील तरुण आणि तरुणींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहिती व्हावी यासाठी  नवचेतना स्वयंदीप आत्मनिर्भरता कक्षाची कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गिरीपेठ येथील अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयातील तळमजल्यात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रोजगार व स्वयंरोजगार असे गट या कक्षात असणार आहेत. रोजगार या विभागात विविध शासकीय रोजगाराच्या संधींची माहिती देण्यात येईल. तर स्वयंरोजगारामध्ये खाजगी क्षेत्रात असलेल्या विविध संधींची माहिती दिली जाणार आहे. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहितीही यावेळी दिली जाईल. यासाठी आदिवासी विकास विभाग आणि टिक्की या आदिवासी समाजाच्या उद्योग संघटनेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी यावेळी माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

000

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी – मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 30 : राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारण्याची कार्यवाही करू. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधील, शाळांमधील पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालाबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाच्या शिफारशी शासनाला सादर झाल्या आहेत. याबाबत योजना शिक्षण संचालक यांच्याकडून आर्थिक बाबींचा सविस्तर माहिती मागविली आहे. सध्या 50 टक्के पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आधार लिंकद्वारे विद्यार्थीसंख्या समजल्यानंतर पुढील 30 टक्के पदभरती करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांप्रमाणे अल्पभाषिक शाळांचीही पदभरती करू.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे यांनी उपप्रश्न उपस्थितीत करून सहभाग घेतला.

शिक्षकांचा पगार थेट खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न

शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन अधिकारी कार्यालयांत शिक्षकांना जावे लागू नये, यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू करणार आहे. शिवाय शिक्षकांचा पगार थेट बँकेत जमा होण्यासाठीही राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

शिक्षण कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने कामात दिरंगाई होत असल्याबाबत सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. श्री. केसरकर यांनी सांगितले की, कागदपत्रे योग्य असतील कामात दिरंगाई होत असेल तर कारवाई करण्यात येईल. राज्यात पदभरतीची मोहीम सुरू असून काही पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. जनतेला किंवा शिक्षकांना कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी कॅशलेस आणि डिजीटलायझेशन पद्धती सुरू करण्यात येणार आहे. खाजगी, अंशत: अनुदानित शाळांना न्याय देणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

या विषयाचा प्रश्न सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे, प्रवीण दटके, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला होता.

अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराबाबत पर्यायी व्यवस्था

अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराबाबत निविदा प्रक्रियेसंदर्भात न्यायालयात स्थगिती असल्याने दोन वर्षांपासून पोषण आहार देण्यात आला नाही. मात्र राज्य शासनाने सध्या पर्यायी व्यवस्था करीत पोषण आहार सुरू केला आहे. मागील दोन वर्षांचा पोषण आहार घरपोच केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

शालेय पोषण आहाराबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, शालेय पोषण आहारांतर्गत स्वयंपाकी, मदतनीस यांचे ऑक्टोबर 2022 पर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. शिवाय खाद्य तेलाचे अनुदानही वितरित केले आहे. इंधन आणि भाजीपाल्यांचे अनुदान, तांत्रिक अडचणीमुळे एप्रिल ते सप्टेंबर 2022 या कालावधीचे 70 टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही देण्यात येणार आहे.

नागपूर येथील सुसंस्कार बचत गटावर तांदळाचा गैरव्यवहार केल्याने त्यांचे काम रद्द करून काळ्या यादीत टाकून पोलीस कारवाई करण्यात येत आहे. पोषण आहार योजनेच्या निविदेमध्ये सध्या 19 महिला बचत गट सामील असून ई-निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राबविली जाते. यामुळे यामध्ये कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, उमा खापरे, डॉ. रणजित पाटील, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी

शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पगार थेट बँकेत जमा करण्याची पद्धती राज्य शासन सुरू करणार असून पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकित वेतन, प्रलंबित वैद्यकीय बिले, सातव्या वेतनाचे हप्ते याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता. श्री. केसरकर यांनी सांगितले की, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तिसरा हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. शिवाय सर्व जिल्हा परिषदांना वेतनांचा निधी वेतनावर खर्च करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच वैद्यकीय देयकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दराडे, निरंजन डावखरे, डॉ. सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.

००००

मनिषा पिंगळे/विसंअ

 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन दामोदरदास मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.

हिराबेन मोदी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला व आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

मनिषा पिंगळे/विसंअ

शारिरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे -उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे

मुंबई दि. ३०: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या जनजागृतीसाठी क्रीडा ज्योत रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून श्री. पांढरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा ज्योत रॅली बृहन्मुंबई महापालिकेनजीकच्या सेल्फी पॉइंट पर्यंत काढण्यात आली.

गेट वे ऑफ इंडिया येथे क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मथ्युकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

श्री. पांढरे म्हणाले की, प्रत्येकाने कुठलातरी खेळ खेळला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी होऊन यश संपादन करावे. जेणेकरून मुंबईचा लौकिक वाढेल.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व जळगाव येथे ३९ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बास्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, जिन्मॅस्टिक, तायक्वांदो, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, फेन्सिंग, बॉक्सिंग, थ्रो बॉल, शूटिंग, किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, क्रीडा अधिकारी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

000

श्री.निलेश तायडे /स.सं./30.12.2023

हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई दि. ३०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

हिराबेन प्रेमळ व मनमिळाऊ वात्सल्यमूर्ती होत्या. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने त्यांनी देशाला महान  सुपुत्र  दिला. त्या कृतार्थ जीवन जगल्या. ईश्वर श्रीमती हिराबेन यांच्या आत्म्याला श्रीचरणी स्थान देवो, ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

Maharashtra Governor condoles demise of Heeraben Modi

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has expressed grief on the demise of Smt Heeraben Modi, the mother of Prime Minister of India Narendra Modi.

“Heerabai Modi was a kind, caring and loving mother. She gave the world a noble son like Prime Minister Shri Narendra Modi. Smt Heeraben lived a fulfilling life.”

“I pray to Almighty God to grant peace to the mother and convey my heartfelt condolences to Prime Minister Narendra Modiji,” said the Governor in his message.

000

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...