शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
Home Blog Page 1695

विधानसभा लक्षवेधी

राज्य राखीव पोलीस बल केंद्राबाबत जानेवारी महिन्यात बैठक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 30 :  राज्य राखीव पोलीस बलाचे केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारत राखीव बटालियनचे दोन केंद्र राज्यासाठी मंजूर झाले होते. त्यातील एक केंद्र कुसडगाव येथे करण्याची मागणी होती. मात्र असे केंद्र नक्षलवाद प्रभावी क्षेत्रासाठी असल्याने ते अकोला येथे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात जळगाव जिल्ह्यातील वरणगाव (ता. भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. नंतर हे केंद्र पुन्हा कुसडगाव येथे हलविण्याचा निर्णय झाला. सध्या हे केंद्र वरणगाव येथे करण्याचे प्रस्तावित असले तरी दोन्ही लोकप्रतिनिधी यांची भावना लक्षात घेऊन लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

या चर्चेत सदस्य संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दिनांक ३०: “नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

ते म्हणाले की, नार-पार – औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करुन पूर्वेकडील अति तूटीच्या गिरणा उपखो-यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार, पार, औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नदीखो-यातील ३०४.६ दलघमी पाणी नार-पार गिरणा नदी जोड योजनेसाठी वळविण्याचे नमूद आहे. या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातून  २६०.३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा करुन चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ कि.मी. लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतील एकूण ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ

 

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून बोंडारवाडी प्रकल्प पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ३० : “सातारा जिल्ह्यातील नियोजित बोंडारवाडी प्रकल्प जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी जलसंपदा विभाग निधी उपलब्ध करून देईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, नियोजित बोंडारवाडी प्रकल्प हा कण्हेर प्रकल्पाच्या जलाशयाच्या वरच्या भागातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. त्याची क्षमता ०.२० टीएमसी एवढी आहे. बोंडारवाडी योजना ही कन्हेर धरणापासून २८ किलोमीटरवर वरच्या बाजूस वेण्णा तलावाच्या खालील बाजूस बोंडारवाडी गावाजवळ प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

पाणथळ जमिनीच्या निर्मूलनासाठी सांगली जिल्ह्यात पथदर्शी योजना -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ३० : “क्षारपड व पाणथळ जमिनीच्या निर्मूलनासाठी भूमिगत चर योजनेच्या पथदर्शी प्रकल्पासाठी सांगली जिल्ह्यातील पाच गावांत चर योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेच्या यशस्वितेनंतर राज्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात येईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज सदस्य समाधान अवताडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले, की बारमाही सिंचन, रासायनिक खतांचा अति वापरामुळे काही जमिनी पाणथळ होतात. पुढे त्यांचे रुपांतर क्षारयुक्त जमिनीत होते. परिणामी जमिनीच्या पीक उत्पादन क्षमतेमध्ये घट होते. अशा ठिकाणी पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचे क्षेत्र निश्चितीसाठी मोठ्या व मध्यम कालव्याच्या लाभ क्षेत्रात नियतकालिक निरीक्षणे घेतली जातात. पाणथळ, क्षारयुक्त जमिनीच्या निर्मूलनासाठी नैसर्गिक शेती करणे आवश्यक आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

इतर मागास प्रवर्गासाठी राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना – मंत्री उदय सामंत

नागपूर,दिनांक ३०:  राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सामंत उत्तर देत होते.

ते म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील फक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थी निवड करतांना विधवा/विधूर/दिव्यांग/अनाथ/परित्यक्ता/वयोवृध्द या व्यक्तींचा प्राधान्याने समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

गृहनिर्माण विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाते. या  योजनेंतर्गत ज्यांचे देशात कोठेही घर नाही, अशा व्यक्तींना घर मंजूर केले जाते. त्यासाठी केंद्र शासनामार्फत दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख असे अडीच लाख रुपये इतके अनुदान दिले जाते. मात्र या योजनेंतर्गत कोणतेही आरक्षण ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना (सामाजिक न्याय विभाग), शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम आवास योजना व पारधी आवास योजना (आदिवासी विकास विभाग), अटल बांधकाम कामगार योजना (ग्रामीण कामगार विभाग), यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) आदी योजना राबविण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

या चर्चेत सदस्य डॉ. अशोक उईके, रोहित पवार, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. ३० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनास मंजूरीकरिता सादर केला असून, यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचे प्रस्तावित आहे. यावर नगररचना संचालकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले की, (नैना) क्षेत्राकरिता शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० मधील तरतुदीनुसार  सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या अधिसूचित क्षेत्रामध्ये पनवेल, उरण व पेण तालुक्यातील एकूण १७५ गावांचा समावेश आहे. सदर नैना अधिसूचित क्षेत्रामधील २३ गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली असून, उर्वरित १५२ गावांची प्रारूप विकास योजना दि.१६ सप्टेंबर २०१९ च्या अधिसूचनेन्वये मंजूर केली आहे.

सिडकोमार्फत विकास आराखड्याची अंमलबजावणी नगर रचना परियोजनेद्वारे करण्यात येत असून आजतागायत सिडकोने १२ नगर रचना परियोजना जाहीर केलेल्या आहेत व त्याची अंमलबजावणी सुरु आहे, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली. या नगररचना परियोजनेतून गावठाण वगळण्यात आले असून या क्षेत्रातील मूलभूत सुविधांची दुरूस्ती, देखभाल व इतर विकास कामे करण्याची जबाबदारी ही त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे.

सिडको विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्ती होण्यापूर्वी या क्षेत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून बांधकाम परवानग्या दिल्या जात होत्या. या इमारतींची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी ही संबंधित गृहनिर्माण संस्थेची किंवा इमारत मालकांची आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींच्या गृहनिर्माण संस्थेने अथवा मालकाने नियोजन प्राधिकरणास कळवून पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून, असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास नियमानुसार पुनर्विकासाची परवानगी देता येईल. सिडकोकडे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

पाली देवद व शिलोत्तर रायचूर या महसुली गावांना मिळून स्थानिक लोकांमार्फत ‘सुकापुर’ असे संबोधले जाते. हा ‘सुकापूर’ भाग ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्राचा (नैना)’ भाग आहे. पाली देवद येथील इमारतीचा स्लॅब कोसळून काही दिवसांपूर्वी एका १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. त्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

000

कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याच्या तक्रारींची राज्य शासनाकडून दखल – मंत्री सुरेश खाडे

नागपूर, दि. ३० : अनेक कंपन्या त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य गीता जैन यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन नंबर. ९ प्रकल्प सुरू आहे. त्या अनुषंगाने तेथे सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेल्या कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना किमान वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. अशाच प्रकारच्या तक्रारी इतर अनेक कंपन्यांबाबत येत आहेत. त्याचीही दखल घेत याबाबत कामगार विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येईल. तक्रारींच्या अनुषंगाने आणि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत या बैठकीत व्यापक चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. खाडे यांनी दिली.

लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य योगेश सागर, वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यांमधील सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार  – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नागपूर, दि. ३० : मुंबईतील गोरेगाव पूर्व आरे कॉलनीमधील २७ आदिवासी पाड्यांमध्ये आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत संबंधित विभागांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज सदस्य रवींद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबातचा मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले की, या पाड्यांमधील रहिवास्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच तेथे भेट देऊन पाहणी करण्यात येईल. या पाड्यांमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून म्हाडा व महानगरपालिकेमार्फत जलवाहिनी, बोअरवेल, सार्वजनिक शौचालये, पायवाट बांधणे, गटार बांधणे, सौरदिवे बसविणे, काँक्रिटचे रस्ते आदी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य प्रा. वर्षा गायकवाड, सुनील राणे यांनी सहभाग घेतला.

०००००

स्थलांतर रोखण्यासाठी आराखडा तयार करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नागपूर, दि. ३० : नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी कुटुंबांचे हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह आराखडा तयार करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य राजेश पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते. डॉ. गावित यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. गेल्या सहा वर्षांत नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २,१९२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मितीची कामे हाती घेण्यात आली आहेत. आदिवासी कुटुंबांना स्वत:चे कायमस्वरूपी पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना, कृषी विभागाच्या माध्यमातून शेड नेट योजना तसेच सिंचनाच्या सुविधा, औजारे पुरविण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आमचूर, सीताफळ, तेंदू पत्ता यावर आधारित लघु उद्योग, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शबरी घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी २०१६- १७ ते २०२२- २३ या कालावधीत एकूण १५ हजार ४६ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. देवराव होळी, हिरामण खोसकर आदींनी सहभाग घेतला.

००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

परीक्षा, निकाल व प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि.30 :  विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रियेबाबत कालबद्ध नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

मंत्री श्री. पाटील यांनी आज सुयोग पत्रकार निवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिबिर प्रमुख विवेक भावसार उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दरवर्षी मार्च अखेरीस परीक्षा, जून अखेरीस निकाल व जुलै अखेरीस प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित आहे. त्याबाबत राज्य शासनाने अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. याविषयी लवकरच सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली जाणार आहे. त्यात धोरणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होईल. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रक्रिया अधिकाधिक अद्ययावत व सुलभ केली जात आहे.

अधिवेशनातील निर्णय, विधेयके, राज्य शासनाचे निर्णय, राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांवर मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. श्री.भावसार यांनी स्वागत केले.

मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान

नागपूर, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, “हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मा. मोदीजींवर जे संस्कार केले त्यातून देशाला कणखर, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व मिळाले”.

“वयाच्या १०० व्या वर्षीही कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने करण्याची शिकवण त्या देतात यावरून त्यांचा कणखरपणा दिसून येतो. श्री. मोदीजी आणि हिराबा यांचे आत्मीय नाते होते. जेव्हा जेव्हा मोदीजी त्यांना भेटायला जायचे तेव्हा तेव्हा दृढ आणि तेवढ्याच प्रेमळ हिराबा आपणा सर्वांना पाहायला मिळायच्या. अशा मातांमुळे आपला देश महान आहे. आई सोबत नसणे हे जगातील सर्वात मोठे दुःख असते, श्री. मोदीजी, त्यांचे कुटुंब व स्नेही यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

हिराबांच्या स्वर्गवासाने एक महान जीवन हरपले : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 30: “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळो. संपूर्ण देश प्रधानमंत्री  आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्वर्गीय हिराबांना ईश्वर सद्गती देवो. या महान मातेला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.”, अशा शब्दात  वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला.

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबांचा वाटा मोठा आहे. “काम करो बुद्धी से, जीवन जीयो शुद्धीसे” ही  त्यांनी दिलेली शिकवण प्रधानमंत्री  मोदी यांनी मोलाने जपली, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. ३० :- प्रधानमंत्री  नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही बाब पुत्र म्हणून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. प्रधानमंत्री  श्री. मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांमार्फत सर्वतोपरी मदत –   केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा

सोलापूर, दि. 29 (जि. मा. का.) :- सर्व प्रकारचे मतभेद विसरून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करावी ,असे प्रतिपादन केंद्रीय रासायनिक आणि खते, नवीन अक्षय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आज येथे केले.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान, कृषि विभाग, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 व्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

होम मैदान येथे आयोजित या प्रदर्शन उद्‌घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे, निवृत्त उपसंचालक आत्माचे बरबडे, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले, मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कारण आजच्या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. मी स्वत: शेतकरी नाही पण मला शेतीची खूप आवड आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 3.75 लाख शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांचा लाभ मी स्वत: लक्ष देवून मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांना बाबत कोणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी बाकी खूप विषय आहेत. शेतकरी हा अन्नदाता आहे. आजच्या या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे खूप आवश्यक आहे. कोणतेही पीक घेताना त्या पिकावरील होणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पादन या गोष्टींचा विचार पूर्वीच शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. केंद्राने व प्रत्येक राज्याने शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या योजना राबविल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावले पाहिजे.

शेतकऱ्यांनी  या कृषि प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेल्या विविध स्टॉल मधून सर्व माहिती घेऊन व येथे काही मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याचा फायदा आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे. शेतकऱ्यांनी रोज किमान अर्धा तास तरी कृषि विषयक टिव्ही चॅनेलसुध्दा पाहिले पाहिजेत. हे कृषि प्रदर्शन खूप चांगले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, सिध्दश्वर देवस्थान कमिटीने कृषि प्रदर्शनाचा खूप चांगला व शेतकऱ्यांच्या फायद्याचा उपक्रम राबविला आहे. या कृषि प्रदर्शनामध्ये जे काही मार्गदर्शन मिळेल त्यावर विचार करून आपल्याला आपल्या शेती मध्ये काय बदल करता येतील. आपले उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल मदत होईल. हे कृषि प्रदर्शन गेल्या अनेक वर्षापासून भरत आहे. पण अलीकडील काळात याचे रूप भव्यदिव्य असे होत आहे ही खूप चांगली बाब आहे.

श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी या प्रदर्शनाबद्दल उपस्थितांना माहिती देवून हे कृषि प्रदर्शन भरविण्याचे काय उद्दिष्ट आहे याबाबतची सविस्तर आशी माहिती उपस्थितांना दिली.

प्रदर्शनानिमित्त भव्य शामियाना उभारण्यात आला असून, २०० पेक्षा अधिक दालने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतीपूरक औजारे, प्रगत तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, दुर्मिळ देशी बियाणे, ट्रॅक्टर आदि शेती संबंधित दालनांचा समावेश आहे. २ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.

या प्रदर्शनाचा शेतकरी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून अभिनंदन !

नागपूर, दि.२९ : धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मेळघाटातील दुर्गम आरोग्य केंद्रांमध्ये बसवणार १४ जलशुध्दीकरण यंत्रे – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

अमरावती, दि. 29 : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 ग्रामीण रूग्णालय आणि एका उपजिल्हा रूग्णालयात सीएसआर (CSR) निधीतून 12 लाख रूपयांची एकूण 14 जलशुध्दीकरण यंत्रे बसवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिली.

डिसेंबर महिन्यात 2 आणि 3 तारखेला आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या आरोग्य केंद्रांचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर काही आरोग्य केंद्रामध्ये पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावे अशी निवेदने स्थानिक नागरीकांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केली होती. त्याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी सीएसआर फंडातून तात्काळ 12 लाख रूपये निधी मंजूर करून हि जलशुध्दीकरण यंत्रे पुरवण्याचे आदेश दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर वर्कस यांच्या सीएसआर फंडातून ही 12 लाख रूपयांची भरीव मदत आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे शुध्द़ पाणी उपलब्ध़ व्हावे यादृष्टीने आरोग्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेळघाट परिसरातील आरोग्य केंद्रांत जलशुध्दीकरण यंत्रे बसविल्याने जलमय आजारापासून रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे संरक्षण होईल. त्यामुळे आदिवासी बांधवांचे आरोग्य उत्त़म राहील, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली आहे.

चौकट

इथे बसवणार जलशुध्दीकरण यंत्रे

प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय
1.      कळमखार      1. चुर्णी

2. चिखलदरा

    1. धारणी
2.      साद्रावाडी
3.      बिजुधावडी
4.    बैरागड
5.     हरिसाल
6.      धुळघाट रे.
7.     सलोना
8.     टेंबुरसोंडा
9.      सेमाडोह
10.  काटकुंभ
11.  हतरू

000

विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

नागपूरदि. २९ : विधान परिषद सभागृहातून येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  निवृत्त होणाऱ्या सर्वश्री विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ)डॉ.सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ)डॉ.रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ)नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ)बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ)  या पाच विधान परिषद सदस्यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभा विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 ची माहिती

राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकीक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यात 23 वर्षानंतर अशा स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. दिनांक 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत 9 जिल्ह्यात 39 क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3 हजार 857 पुरुष व 3 हजार 587 महिला खेळाडू असे एकूण 7 हजार 444 खेळाडू सहभागी होणार आहेत.    क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण 10 हजार 456 जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा ज्योत

रायगड, नागपूर, बारामती- पुणे , लातूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर , अमरावती येथून दि.30 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे आणण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेसाठी 19.08 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजनेतून 11.51 कोटी रुपये असे एकूण 30.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय होणाऱ्या स्पर्धा 

  1. पुणे-ॲथलेटिक्स,फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग,स्क्वॅश, बॉक्सींग, हॉलीबॉल, रोलर स्केटींग,गोल्फ, सॉप्ट टेनिस,
  2. नागपूर- बॅडमिंटन,नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
  3. जळगांव – खो-खो,सॉप्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
  4. नाशिक- रोईंग,योगासन
  5. मुंबई- याटींग, बास्केटबॉल
  6. बारामती- कबड्डी
  7. अमरावती- आर्चरी,
  8. औरंगाबाद – तलवारबाजी
  9. सांगली कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...